मॅजेस्टिक प्रकाशन व एव्हरेस्ट एण्ट. पुरस्कृत मायबोली गाथाचित्रशती लेखनस्पर्धेतील परीक्षकांची व प्रायोजकांची माहिती

Submitted by Admin-team on 30 July, 2012 - 01:02

आपल्याला आयुष्यभर आनंद देणार्‍या या भारतीय चित्रपटसृष्टीला, तिला आकार देणार्‍या सार्‍या तंत्रज्ञांना आणि तिच्या द्रष्ट्या जनकाला सलाम करण्यासाठी, भारतीय चित्रपटसृष्टीचं शतकमहोत्सवी वर्ष दणक्यात साजरं करण्यासाठी मायबोली.कॉमवर आपण आयोजित करत आहोत गाथाचित्रशती लेखनस्पर्धा!!!

या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत गिरीश कुलकर्णी, वीणा जामकरगणेश मतकरी हे चित्रसृष्टीतील मान्यवर.

girish.jpg एक उत्तम लेखक व तितकाच दर्जेदार अभिनेता म्हणून गिरीश पांडुरंग कुलकर्णी हे नाव सुपरिचित आहे. भूमिकेत जीव ओतून काम करणारा एक प्रगल्भ अभिनेता, अशी त्यांची ओळख आहे. 'गिरणी', ’विलय’ हे लघुपट, तसंच ’वळू’, ’देऊळ’, ’विहीर’, ’मसाला’ या चित्रपटांचे पटकथा व संवाद गिरीश कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. ’गिरणी’, ’गारुड’ अशा अनेक लघुपटांतून, व 'वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', ’गंध', ’बाधा’, ’रेस्टॉरंट’, ’मसाला’ या चित्रपटांतून त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहेत. 'गिरणी' या त्यांनी लिहिलेल्या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा राष्टीय पुरस्कार मिळाला होता. ’देऊळ’ या चित्रपटातील कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा व सर्वोत्कृष्ट पटकथा-संवादलेखनाचा असे दोन राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला गेला. ’अरभाट चित्र’ ही त्यांची निर्मितीसंस्था असून ’वळू’, ’मसाला’ व आगामी ’पुणे - ५२’ या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे.

veena.jpg ’वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', 'जन्म', ’बेभान’, ’मर्मबंध’, 'लालबाग परळ', ’तुकाराम’, 'पलतडचो मुनिस' असे चित्रपट असोत, किंवा 'चार दिवस प्रेमाचे', 'एक रिकामी बाजू', 'दलपतसिंग येता गावा', 'खेळ मांडियेला', 'जंगल में मंगल', ’दावेदार’, ’वदनी कवळ घेता’, ’तीच ती दिवाळी’ यांसारखी नाटकं, वीणा जामकर यांचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करणार्‍या वीणा जामकर यांनी व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. आजपर्यंत त्यांनी नऊ नाटकं, तेरा एकांकिका, दोन दीर्घांक आणि बारा चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांची भूमिका असलेले अनेक चित्रपट व लघुपट कान, टोरंटो, बर्लिन अशा बिनीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गाजले आहेत. 'पलतडचो मुनिस' या त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाला टोरंटो चित्रपट महोत्सवात समीक्षकांचं पारितोषिक मिळालं होतं. ’बेभान’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार त्यांना मिळाला होता. २०१० साली ’लालबाग परळ’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा म. टा. सन्मान व मिफ्ता पुरस्कार त्यांना मिळाला होता. याशिवाय नाटकांमधील त्यांच्या कामगिरीसाठी नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार, मामा वरेरकर पुरस्कार व प्रतिष्ठेचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

ganesh.jpg साक्षेपी समीक्षक व लेखक म्हणून गणेश मतकरी चित्रपटप्रेमींमध्ये नावाजले आहेत. गेली पंधरा वर्षं ते सातत्यानं चित्रपटविषयक लेखन करत आहेत. कुठलेही पूर्वग्रह न बाळगता, चित्रपटमाध्यमाचा संपूर्ण आदर राखत केलेल्या त्यांच्या समीक्षणांचे नवखे व दर्दी प्रेक्षक चाहते आहेत. उत्तम चित्रपट निर्माण होण्यासाठी उत्तम प्रेक्षक आवश्यक असतात, असं मत ते आपल्या समीक्षणांतून अनेकदा मांडत असतात. अनेक चित्रपटविषयक नियतकालिकांशी व फिल्म सोसायट्यांच्या चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध आहे. ’रूपवाणी’सारख्या चित्रपटांना वाहिलेल्या नियतकालिकांसाठी, ’सा. सकाळ’ व ’अक्षर’ दिवाळी अंकासाठी, त्यांनी अनेक वर्षं सातत्यानं लेखन केलं आहे. सध्या ते ’दिव्य मराठी’ या वृत्तपत्रात व ’मुक्त शब्द’ या मासिकात चित्रपटविषयक सिद्धांतांबद्दल लिहितात.

कार्लोवी व्हेरी, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अशा महोत्सवांमध्ये परीक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे. २०११साठीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या प्रांतीय परीक्षकमंडळाचे ते सदस्य होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे व फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या विविध अभ्यासवर्गांमध्ये ते मार्गदर्शन करतात.

***

गाथाचित्रशती लेखनस्पर्धेसाठीची बक्षिसं मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि., यांनी प्रायोजित केली आहेत.

majestic logo.png ‘मॅजेस्टिक’ची स्थापना (कै.) केशवराव कोठावळे यांनी केली. मालतीबाई बेडेकर, गो. नी. दाण्डेकर, जयवंत दळवी, व्यंकटेश माडगूळकर, मधु मंगेश कर्णिक, अरुण साधू, वि. स. वाळिंबे, अनिल अवचट, सुभाष भेण्डे, ह. मो. मराठे, वसंत सरवटे, भारत सासणे, मुकुंद टाकसाळे, रंगनाथ पठारे, अनंत सामंत, राजन खान, निरंजन उजगरे, संजीव लाटकर, सदानंद देशमुख यांसारख्या अनेक मान्यवर साहित्यिकांची पुस्तकं ‘मॅजेस्टिक’नं प्रसिद्ध केली आहेत.

‘ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह’ या विषयांना वाहिलेलं ‘ललित’ मासिक व ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांचं 'दीपावली' हे वार्षिक 'मॅजेस्टिक'तर्फे प्रसिद्ध केले जातात. ’ललित’ व ’दीपावली’ या दोन्ही प्रकाशनांतर्फे ग्रंथप्रसारासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या जातात. पुण्यात सुरू झालेल्या व नंतर १९८४ सालापासून पार्ल्यात नियमितपणे भरवल्या जाणार्‍या 'मॅजेस्टिक गप्पा' हा लक्षवेधी उपक्रम 'मॅजेस्टिक'तर्फे अनेक वर्षं सुरू आहे.

‘मॅजेस्टिक’नं ललितवाङ्‌मयाबरोबरच आरोग्य, मानसशास्त्र, पाककला, धर्म, इतिहास, व्यवस्थापन, क्रीडा, युद्ध, अशा विविध विषयांवरची दीड हजारांहून अधिक पुस्तकं आजवर प्रसिद्ध केली आहेत. साहित्य अकादमी, महाराष्ट्र फाऊंडेशन अशा संस्थांतर्फे ’मॅजेस्टिक’च्या पुस्तकांचा गौरव झाला आहे. मराठी प्रकाशन क्षेत्रात मानाचं मानलं जाणारं `वि. पु. भागवत पारितोषिक’ ‘मॅजेस्टिक’ला मिळालं आहे, तसंच २००४ साली औरंगाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनात श्री. अशोक कोठावळे यांना उत्कृष्ट प्रकाशकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं.

‘मॅजेस्टिक’चे संस्थापक केशवराव कोठावळे यांच्या निधनानंतर श्री. अशोक कोठावळे ‘मॅजेस्टिक’चे संचालक म्हणून काम पाहत आहेत.

एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि. ही मराठी चित्रपटविश्वात अतिशय नावाजलेली संस्था आहे. मराठी चित्रपटांच्या निर्मितीत आणि वितरणात ही संस्था अग्रेसर आहे. दूरचित्रवाणी, सीडी / डीव्हीडी, इंटरनेट अशा माध्यमांतून मराठी चित्रपट घरोघर पोहोचवण्याचं काम ही संस्था करते.

भालजी पेंढारकर, जब्बार पटेल, प्रभात, सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर अशा दिग्गजांच्या चित्रपटांचं जतन एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटनं केलं आहे. चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रातही ही संस्था कार्यरत आहे. ’मी शिवाजीराजे बोलतोय’ हा या संस्थेनं निर्मिलेला पहिला चित्रपट. तुफान यश मिळवलेल्या या चित्रपटानंतर ’शिक्षणाच्या आईचा घो’, ’हापूस’, ’आयडियाची कल्पना’, ’मोरया’ आणि ’तुकाराम’ हे चित्रपट ’एव्हरेस्ट’नं प्रेक्षकांसमोर आणले.

***

भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या गाथाचित्रशती लेखनस्पर्धेला सर्व मायबोलीकर भरघोस प्रतिसाद देतील, अशी खात्री आहे.

***

वळू मधील गिरीशजींच्या भुमिकेवर मी मुख्य नायकाच्या भुमिकेपेक्षा जास्त इंप्रेस्ड झाले होते, त्याचे कारण होते अभिनयातील नितांत सहजता.
ह्या स्पर्धेच्या निमित्ताने लिहीलेले काही त्यांच्यापर्यंत पोहोचणार हेही समाधानकारक आहे, त्याकरिता संयोजक आणि प्रायोजकांचे मनःपूर्वक आभार Happy