जलतरण

Submitted by ललिता-प्रीति on 27 July, 2012 - 06:29

८ दिवस, ९०० स्पर्धक, ३२ सुवर्णपदके

- इ.स. १९०० मधील पॅरीस इथल्या ऑलिंपिक खेळांच्या वेळेस जलतरणाच्या स्पर्धा सीन नदीत भरवण्यात आल्या होत्या. १९०८ सालच्या लंडन ऑलिंपिक्समधे प्रथमच तरणतलावाचा वापर करण्यात आला. १९१२ सालच्या स्टॉकहोम ऑलिंपिक्समधे प्रथम महिला जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

- १९०० सालच्या पॅरीस गेम्सच्या वेळेसच Underwater Swimmingच्याही स्पर्धा घेण्यात आल्या. खेळाडू जितका वेळ आणि जितके अंतर पाण्याखाली राहू शकेल, त्यानुसार त्याला गुण बहाल केले जात.

- जॉनी वेसम्युलर या अमेरिकी खेळाडूने १००मी. अंतर १ मिनिटापेक्षा कमी वेळात (५८.६ सेकंद) पार करण्याचा सर्वप्रथम मान पटकावला. (जलतरणाव्यतिरिक्तही तो सिनेकलाकार म्हणून प्रसिध्द होता. त्यानं चित्रपटांत १२ वेळा टारझनची भूमिका निभावली होती.)

- यावेळी जलतरणाच्या स्पर्धा लंडन येथील ‘ऑलिंपिक पार्क-अ‍ॅक्वेटिक सेण्टर’ इथे खेळवल्या जाणार आहेत.

- ऑलिंपिक तरणतलाव ५० मीटर लांब आणि ३ मीटर खोल असतो.

- प्रत्येक खेळाडूचे आपापले एक लेन (lane) असते. तलावातील मधली ८ लेन्स (lanes) वापरली जातात.

- जलतरणात भरपूर निरनिराळे स्पर्धाप्रकार आहेत. बहुतेक स्पर्धाप्रकारांत पोहण्याची कुठलीतरी एकच पध्दत वापरली जाते. सर्वात छोटी शर्यत ५० मीटरची असते. (तलावाची १ फेरी) आणि सर्वात मोठी शर्यत १५०० मीटरची असते. (तलावाच्या ३० फेर्‍या)

- पोहण्याच्या चार निरनिराळ्या पध्दती आहेत.
१. फ्री-स्टाईल : ही सर्वात जलद पध्दत आहे. यात ५० मी., १०० मी., २०० मी., ४०० मी., ८०० मी., १५०० मी. इतक्या शर्यती असतात.
२. ब्रेस्ट-स्ट्रोक : यात १०० मी. आणि २०० मी. अशा दोन शर्यती असतात. शर्यत संपवताना खेळाडूचे दोन्ही हात एकाच वेळी तलावाच्या किनार्‍याला लागणे आवश्यक असते.
३. बॅकस्ट्रोक : पाण्यावर उताणे पडून पोहण्याची पध्दत. यात १०० मी. आणि २०० मी. अशा दोन शर्यती असतात.
४. बटरफ्लाय : यात १०० मी. आणि २०० मी. अशा दोन शर्यती असतात. शर्यत संपवताना खेळाडूचे दोन्ही हात एकाच वेळी तलावाच्या किनार्‍याला लागणे आवश्यक असते.

- मिडले शर्यत : या शर्यतीत पोहण्याचे चारही प्रकार वापरले जातात. बटरफ्लायने सुरूवात करून नंतर बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि शेवटी फ्री-स्टाईल या क्रमाने खेळाडू पोहतात. २०० मी. शर्यतीत प्रत्येक प्रकाराने तलावाची एक फेरी (५० मीटर) मारली जाते. ४०० मी. शर्यतीसाठी प्रत्येक प्रकाराने तलावाच्या दोन फेर्‍या (१०० मीटर) मारल्या जातात.

- रीले शर्यत : ही सांघिक शर्यत आहे. प्रत्येक संघात ४ खेळाडू असतात. पहिला खेळाडू बटरफ्लाय, दुसरा खेळाडू बॅकस्ट्रोक, तिसरा ब्रेस्टस्ट्रोक आणि चौथा फ्री-स्टाईल या प्रकारे पोहतात. एका खेळाडूने आपले अंतर पोहून पार करून तलावाच्या किनार्‍याला हात लावल्यावरच त्याच्यापुढचा खेळाडू पाण्यात उडी घेतो.

- जलतरणात एकूण ३२ स्पर्धा असतात. सर्वात लांब पल्ल्याची शर्यत सोडल्यास पुरूष आणि महिलांसाठी अन्य स्पर्धा एकसारख्याच असतात. पुरूषांची सर्वात लांब पल्ल्याची शर्यत १५०० मीटरची (३० फेर्‍या) असते, तर महिलांची ८०० मीटरची (१५ फेर्‍या) असते.

- सुरूवातीला ८-८ खेळाडूंचे गट तयार केले जातात आणि प्रत्येक स्पर्धाप्रकाराच्या प्राथमिक फेर्‍या पार पडतात. प्रत्येक फेरीतला विजेता खेळाडू पुढील फेरीसाठी पात्र ठरतो. बहुतेक स्पर्धाप्रकारांत सर्वोत्तम १६ खेळाडू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतात. काही स्पर्धाप्रकारांत प्राथमिक फेर्‍यांमधील सर्वोत्तम ८ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.

- उपांत्य फेरीत ८-८ खेळाडूंच्या दोन गटात दोन फेर्‍या पार पडतात आणि त्यातील सर्वोत्तम ८ खेळाडू अंतिम फेरीत प्रवेश करतात.

- अंतिम फेरीत प्रथम येणार्‍या खेळाडूस सुवर्णपदक, दुसर्‍या येणार्‍या खेळाडूस रौप्यपदक आणि तिसर्‍या येणार्‍या खेळाडूस कास्यपदक बहाल करण्यात येते.

मॅरथॉन जलतरण

२ दिवस, ५० खेळाडू, २ सुवर्णपदके.

- लंडनमधील हाईडपार्क येथील सर्पेण्टाईन या तलावात ही १० कि.मी.ची शर्यत पार पडणार आहे.

- पुरूषांची शर्यत गुरूवार, ९ ऑगस्ट २०१२ रोजी, तर महिलांची शर्यत शुक्रवार, १० ऑगस्ट २०१२ रोजी.

----------------------------------------

माहितीची मूळ लिंक -

http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/84...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेल्प्स ने यंदा सांगितलं आहे की परत ८ मेडल्स मिळवणं अवघड आहे.. त्याचा बटरफ्लाय स्ट्रोक निव्वळ महान आहे ! Happy अमेरिकेचा गेल्यावेळचा कॅप्टन जेसन लिझॅक आहे का यंदा?

फेल्प्स ने यंदा सांगितलं आहे की परत ८ मेडल्स मिळवणं अवघड आहे >>> कारण त्याचाच संघ सहकारी Ryan Lochte !! (उच्चार ??)

हे वाचा -

http://www.reuters.com/article/2012/07/27/oly-swim-preview-day-idUSL2E8I...

पुरूष ४०० मी. वैयक्तिक मिडले उद्याच असणार आहे !!

फेल्प्स यंदा सातच स्पर्धात आहे ना???
त्याची सकाळ मध्ये माहिती आली आहे.. त्याच्या पायाचा नंबर १४ आहे.. एखाद्या माश्याच्या कल्ल्याएवढा मोठा.. त्याचा त्याला पोहताना खूप उपयोग होतो..

जलतरण स्पर्धांविषयीची इथे दिलेली अगदी सखोल अशी माहिती वाचत असतानाच यातीलच एक अत्यंत देखणा म्हणावा असा उपप्रकार आठवला, तो म्हणजे "डायव्हिंग" (मराठीत योग्य असे रुपनाम नाही, पण 'सूर' असे सर्वसाधारण म्हणण्याचा प्रघात आहे). चार वर्षाची जीवतोड मेहनत, आणि तिला आलेले फळ पाहाण्यात डायव्हरकडे असतात ते फक्त २ ते ४ सेकंद. फार रोमहर्षक असतो हा जलतरण क्रिडाप्रकार

चीन ने यात विलक्षण असे यश प्राप्त केले असून त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि जपानी डायव्हर्स त्याना लंडन ऑलिम्पिकमधे शह देऊ शकतील असे आजचे चित्र आहे.

८ गोल्डमेडल्स आहेत "डायव्हिंग' प्रकारात....४ पुरुष, ४ स्त्रिया
३ मीटर स्प्रिंगबोर्ड, २. १० मीटर प्लॅटफॉर्म, ३. १० मीटर प्लॅटफॉर्म सिन्क्रोनाईज्ड डायव्हिंग, ४. ३ मीटर स्प्रिंगबोर्ड सिन्क्रोनाईज्ड डायव्हिंग.

लंडन ऑलिम्पिक्समध्ये 'जलतरण' च्या या गटात २५ राष्ट्रांतील सूरपटूंना संधी मिळाली आहेत. ऑलिम्पिक सोहळ्यात प्रेक्षकांचा अगदी श्वास रोखून धरायला लावणार्‍या या क्रिडा प्रकारात भारताने आजपर्यंत कधीच भाग घेतलेला नाही.

अशोक पाटील

जलतरणातही मॅरॅथॉन असते हे माहीतच नव्हते.
सांघिक रीलेत तीन प्रकार असतात.
४ X १०० मीटर फ्रीस्टाइल रिले, ४ X २०० मीटर फ्रीस्टाइल रिले आणि ४ X १०० मीटर मेडले रीले ज्यात चार स्विमर्स चार वेगळ्या पद्धती अवलंबतात.

ललिता-प्रीति

~ सॉरी. कसे काय कोण जाणे, पण मला तुमचा 'जलतरण' धागा वाचताना (चुकून) "डायव्हिंग" राहिले की काय असेच वाटले. शिवाय या प्रकाराकडे भारतीयांचे सहसा कधी लक्षही जात नसल्याने या निमित्ताने या सर्वांगसुंदर अशा क्रिडाप्रकारावर दोन ओळी लिहाव्यात असे वाटले. (मी स्वतः जलतरणपटू आणि बर्‍यापैकी डायव्हरही आहे, हे आणखीन् एक कारण).

तुमचा 'डायव्हिंग' बाबतचा स्वतंत्र धागा आत्ताच पाहिल्यावर मी घाई केल्याचे पटले.

असो.

अशोक पाटील

अशोक, सॉरी वगैरे म्हणू नका, हो. डायव्हिंगचे नाव नेहेमीच जलतरणासोबत घेतले जाते. त्यामुळे तुम्हाला तसे वाटणे साहजिक आहे.

बाकी, माझाही हा अत्यंत आवडता क्रीडाप्रकार आहे. मी ही पूर्वी बर्‍यापैकी जलतरणपटू होते. तुम्ही दोन का, चार ओळी सुध्दा लिहा की. वाचायला आवडतीलच. हा ग्रूप चर्चा करण्यासाठीच काढला आहे. Happy

मायकेल फ्लेप्ससारखा 'बॉस स्वीमर' ने तलावात उडी घेतल्याचे कसलेही दडपण मनावर (तसेच शरीरावरही) न आणता रायन लोख्त (असाच Lochte चा उच्चार निवेदक करीत होता) याने ४०० मीटर इंडिव्हिज्युअल मेडले स्वीमिंगच्या 'सुवर्णपदका'वर ताबा मिळविला. चक्क चार सेकंदाचे अंतर त्याने स्वतःच्या आणि फ्ल्पेप्सच्या एकूण टायमिंगमध्ये राखले, हा फ्ल्पेप्सच्या दृष्टीने एक धक्काच.

पण असो....आजची ही सुरुवात आहे....विक्रमीवीर फ्ल्पेप्सच्या दृष्टीन 'मंझिले और भी है आगे...."

अशोक पाटील

धक्का नाही हो पाटील. इथे ऑलिम्पिक ट्रायल्समध्येही लॉक्टीने फेल्प्सला हरवले होते. २०० मी. मेडलीचे वर्ल्ड रेकॉर्डही त्याचे आहे. या (लंबी) रेसमध्ये तसा फेल्प्स अगदी स्ट्रॉन्ग नाही, गेल्यावेळी कशीबशी जिंकली होती.

आज रिलेमध्ये काय झाले! Sad फेल्प्सने चांगले लीड दिले होते. शेवटच्या लेगमध्ये लॉक्टीलाच त्या फ्रेन्च माणासाने मागे पाडले आणि गोल्ड गेले.

राईट लोला....धक्का नव्हता तसे पाहिले तर.....पण एका विश्वविक्रमी जलतरणपटूला ४ सेकंदाचा फरक ही असह्य अशी घटना, या अर्थाने धक्का.

दुसरीकडे चीनच्या १६ वर्षीय ये शिवेन या युवतीने वुमेन्स ४०० मी. इंडिव्हिज्युअल मेडले रीले मध्ये चक्क पुरुष सुवर्णपदक विजेत्या लॉक्टीपेक्षाही कमी (म्हणून विक्रमीही) वेळेत सुवर्णपदक जिंकून जलतरणमधील पंडितांच्या त्या शक्यतेबाबतच भुवया वक्र केल्या आहेत.

साहजिकच मग लंडनमधील विविध मिडिया चर्चेत 'डोपिंग' ची शक्यता आहे काय यावर तू-तू-मै-मै सुरू झाले आहे. बीबीसीने तर थेट इंग्लंडचा माजी ऑलिम्पिक विजेता जलतरणपटू मार्क फोस्टरलाच गाठले, पण अशी लागलीच डोपिंगची शक्यता न वर्तवता मार्क याने छान प्रतिक्रिया दिली आहे. त्याने बीबीसीला सुनावले : Bearing in mind she is 16 years of age, and when you are young you do some big best times… it can be done.''

चीन जलतरणमधील अमेरिकन वर्चस्वाला शह देत आहे, हे मात्र सत्य युरोप आणि अमेरिकेला पचवावे लागेल.

अशोक पाटील