दवबिंदू..!

Submitted by बागेश्री on 12 July, 2012 - 08:18

मी व्यर्थसा दवबिंदू
पानावर गोठलेला,
धरणीला जो नकोसा
आकाशाने त्यागलेला..!

तुज रुपवान भासे,
मज भासे, मी अभागी
उदास घुसमटतो,
थिजतो, बसल्या जागी...!

क्षणभंगूर सारे काही
जाणतो आपण सारे,
देखणे दिसणे फक्त
हे जगणे आहे का रे..?

पानावर ओल्या ओल्या
मी खिन्नसा बसलेला
टिपेल का मज कोणी,
आशेवर बेतलेला..

मज नाते ना रुचते
ना जमते बिलगाया,
थिजणे संपून जावे
वाटे जन्म नवा घ्यावा!
जिथे स्वैर मी असावे
अलगद मी रुजावे,
अन् माझ्या रुजण्याने
जन्म नवे उमलावे..

ही इच्छा अधू आहे
ही आसही कोरी कोरी,
मज ठाव आहे सारे
जन्म, ना कोणी उद्धारी!

घे जगून संपतो आहे
मी मिथ्या जगलो आहे,
इच्छा लपेटून सार्‍या
जागीच विरतो आहे!

माझ्या रूपाने जिंकले
तुज पुरते मोहवले,
पण जाण जगा, तू ही
मी जगलो थिजलेले!!

मी जगलो थिजलेले...

गुलमोहर: 

बागेश्री

मनापासून लिहीतो..

अष्टाक्षरी म्हणजेच वृत्त नव्हे. अक्षरगणवृत्त असले तरी लयीत असणे महत्वाचे. गेयता हे एक सौंदर्यस्थळ आहे कवितेचे. असावेच असे नाही. लय ही गुणगुणण्याचीही असते आणि कवितावाचनाचीही. तुझे जिद्दीने प्रयत्न चालू आहेत असं काहीसं जाणवतंय. शुभेच्छा ! मात्र त्यामुळे काही तडजोडी झालेल्या आहेत त्या टाळता आल्या असत्या.

का रे .. हा शब्दप्रयोग उगाच वाटला. इथे कदाचित न्यारे हा शब्द सुटसुटीत झाला असता. कधीकधी स्वरकाफिया देखील चालून जातो.

वाटे जन्म नवा घ्यावा!
जिथे स्वैर मी असावे
अलगद मी रुजावे,
अन् माझ्या रुजण्याने
जन्म नवे उमलावे..

या ओळी ही तुझी स्ट्रेंग्थ !! ही शैली ही तुझी ओळख आहे. नाव बदलून लिहीलंस तरीही ओळखता येईल.. Proud मात्र उकाका म्हणतात त्याप्रमाणे इथे कविता थांबते तर वेगळाच फील आला असता.

किरण, तू मनापासून दिलेला प्रतिसाद मी मनापासून स्वीकारते आहे.. 'गेयता' ह्या गोष्टीकडे मी फार कमी लक्ष पुरवते, हे माझ्याही ध्यानात येते आहे. बाकी काय म्हणू, असेच लक्ष असू देत Happy

कवितेची दखल घेऊन प्रतिसाद देणार्‍या सार्‍यांची खूप आभारी आहे दोस्तांनो! धन्स!! Happy

Pages