गुरुदत्त

Submitted by अशोक. on 10 July, 2012 - 04:59

guru1.jpg

काल ९ जुलै ~ हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल लिहिताना वाचताना चर्चा करताना आपण हरवून जातो अशा दोन कलाकारांचा हा जन्मदिवस. ज्यांची नावे उच्चारताच सर्वच स्तरावरील रसिकप्रेमींच्या मनी ज्यांच्याबद्दल 'अपनापन' भावना निर्माण होतेच होते, ते दोघे - गुरुदत्त आणि संजीवकुमार.

हा लेख 'गुरुदत्त' विषयी. लेख लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी याला शीर्षक काय द्यावे यासाठी काही वेळ खर्च केला. 'मनस्वी कलाकार, काळाच्या पुढे गेलेला दिग्दर्शक, प्रतिभावंत, शतकातील एक...' आदी अनेक विकल्प नजरेसमोर आले. पण शेवटी लक्षात येऊ लागले की, जसे 'लता' च्या आगेमागे 'गानकोकिळा, स्वरलता, दैवीदेणगी...' अशी विशेषणे लावण्यात काही अर्थ नसतो...म्हणजे 'लता' या दोनच अक्षरात विश्वातील सारे सुमधुर स्वर एकत्रित आले आहेत, तद्वतच 'गुरुदत्त' या नावातच त्याच्याविषयी चर्चीली जाणारी विशेषणे, विशेषनामे सामावली आहेत. मग लेखाचे शीर्षक केवळ 'गुरुदत्त' हेच सुयोग्य मानले.

मराठीच काय, पण इंग्रजीसह भारतातील कित्येक भाषात गुरुदत्त या कलाकारावर विविध प्रकारे लेखन झाले असून असा मान मिळविणार्‍यामध्ये जे कुणी मूठभर आहेत त्यात गुरुदत्तचा फार वरचा क्रम लागेल. मराठीतही ज्येष्ठ साहित्यिक भाऊ पाध्ये, नामवंत समीक्षक अरुण खोपकर, लेखक शशीकांत किणीकर, तसेच स्फुट लेखन करणारे अंजन कुलकर्णी यानी हा विषय घेऊन पुस्तकरुपाने ते प्रसिद्धही केले आहे. इथल्या जवळपास सर्वच रसिक सदस्यांना गुरुदत्तविषयी कसली ना कसली तरी माहिती आहेच असे जर विधान मी केले तर त्यात अतिशयोक्ती असणार नाही, इतके आपले भावविश्व या नावाने व्यापले आहे. चित्रपट या माध्यमाकडे गांभीर्याने पाहणार्‍या गुरुदत्त यांच्यावर इंग्लिशमध्ये सहा-सात पुस्तके आहेत. यातील नसरीन मुन्नी कबीर यांनी गुरुदत्त यांच्यावर पीएच. डी. केली आहे.

माझ्या जन्मवर्षात (१९५६) गुरुदत्तने दिग्दर्शित केलेला देव आनंद, वहिदा रेहमान अभिनित 'सी.आय.डी.' प्रदर्शीत झाला होता ही माहिती शिक्षिका असलेल्या माझ्या थोरल्या बहिणीने मला पुढे सांगितली. तर त्याच्या आदल्याच वर्षी (१९५५) मध्ये खुद्द गुरुदत्त नायक आणि स्वर्गसुंदरी मधुबाला यांचा नर्मविनोदी 'मि.अ‍ॅण्ड मिसेस ५५' हा बॉक्स ऑफिस हिट झळकला होता अशीही हळूहळू चित्रपटविषयक माहितीत भर पडत गेली.

हायस्कूल कॉलेजच्या वर्षात गुरुदत्तचे चित्रपट नव्याने थिएटर्समध्ये आले नाहीत. १० ऑक्टोबर १९६४ रोजी भंगलेल्या मनःस्थितीत त्याने जीवनाचा शेवट करून घेतला होता. पण त्यामुळे झाले असे की १९६५ पासून पुढे जवळपास तीनचार वर्षे कोल्हापूरातील पद्मा, राजाराम आणि व्हीनस (व्हीनसचे मालक अन्वरभाई बोहरी तर जॉनी वॉकरचे नातेवाईक असल्याने त्यांच्या गुरुदत्तसमवेत काही बैठकाही झाल्या होता. त्यांच्याकडील फोटो कलेक्शन पुढे आम्ही पाहिलेही होते) या थिएटर्समधून गुरुदत्त यांचे जवळपास सर्वच चित्रपट 'री-रन' ला प्रदर्शित झाले अन् तेही ५० पैसे सवलतीच्या दरात. त्या प्रसंगी मात्र आम्ही 'गुरुदत्त' पाहणे सुरू केले. अर्थात ते शालेय वय नेमक्या कोणत्या भूमिकेतून आम्ही ते चित्रपट पाहतोय हे समजण्याच्या पलिकडील होते. तरीही 'प्यासा' आणि 'कागझ के फूल' ही दोन चित्ररत्ने 'काहीतरी वेगळे सांगत आहेत' असा विचार आमच्या मनावर ठसविण्यात यशस्वी झाली. पुढे इंग्रजी चित्रपटांचा 'भयंकर' म्हणावा असा नाद लागल्यावर पडद्यावर जे दिसते त्याहीपलिकडे चित्रपटातून दिग्दर्शकाला, पटकथाकाराला, गीतकाराला, कॅमेरामनला काही सांगायचे असते ही जाण मनी रुढ होत गेली. कोल्हापूरातील 'चित्रपटमय' वातावरणही त्याला कारणीभूत होतेच. टीएफटी युनिट स्थापन झाल्यावर वेळोवेळी मग दसरा चौकातील शाहू सभागृहात विविध विषयावर 'चित्रपट महोत्सव' भरत गेले, तीमध्ये सत्यजीत रे यांच्या जोडीने गुरुदत्त असणे अगदी अपरिहार्यच झाले होते. व्याख्यानेही झडत या विषयावर. कॉलेजजीवनापासून मात्र गुरुदत्त व्यक्तीविषयी खोलवर माहिती करून घेण्यास सुरुवात झाली....आणि काळाच्या पुढे जाऊन आपली प्रतिभा सिद्ध करणारा हा कलाकार खर्‍या अर्थाने मनस्वी कलाकार कसा होता याचा अभ्यास करण्याचा छंदच लागला. मित्रही तसल्याच विश्वात रममाण होणारे असल्याने चर्चामाध्यमासाठी हा विषय असणे क्रमप्राप्तच झाले.

गुरुदत्तला त्याच्या हयातीत जास्त प्रसिद्धी मिळाली की त्याच्या मृत्युनंतर ? हा प्रश्न नेहमी समीक्षक आणि रसिकांसमोर येतो. त्याला कारण म्हणजे त्याने जे चित्रपट निर्माण केले त्यातील सत्य त्या काळात पचनी पडणे कठीण गेले, पण पुढे कालौघात त्या चित्रपटांना असे काही महत्व प्राप्त झाले की जो 'प्यासा' पाहिल्यावर दिलीपकुमारने 'बरे झाले, मी यात विजय साकारला नाही...' असे पळपुटे उदगार काढले होते, तोच 'प्यासा' टाईम मॅगेझिनने शतकातील १०० उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत झळकवला....साल होते २००५. म्हणजे १९५७ मधील निर्मिती ही जगभर मान्यता पावण्यासाठी जवळपास पन्नास वर्षे वाट पाहते, याचाच दुसरा अर्थ की गुरुदत्तची क्षमता त्याच्या काळातील प्रेक्षकांना न पेलणारी अशीच होती. पाठोपाठ १९५९ च्या अत्यंत कलात्मक म्हणून गौरविल्या गेलेल्या 'कागझ के फूल' चे. आजही आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी, रामगोपाल वर्मा आदी बिनीचे दिग्दर्शक त्यांची जडणघडण गुरुदत्तच्या याच दोन चित्रपटांवर झाली असे जाहीरपणे मुलाखतीत सांगतात त्यावरून या चित्रपटांचे कालातीत महत्व लक्षात यावे.

पण दुर्दैवाने चित्रपटाची रीळे फिरतात ती ऑपरेटरच्या हातावर नव्हे तर निर्मात्याच्या बॅन्क बॅलन्सवर. सापाच्या आतड्यासारखी विखारी आहे चित्रपटसृष्टी. इथल्या बाजारात पैसा ओतणार्‍याला समीक्षकांनी रविवारच्या आवृत्तीमध्ये चित्रपटाविषयी काय लिहिले आहे हे वाचण्याची गरज पडत नाही, त्याना गरज असते ती तिकीट खिडकीत असलेल्या शोचार्टवर किती फुल्या पडल्या आहेत त्या पाहणे. पोस्टरवरील मधुबालेच्या वेड लावणार्‍या हास्यापेक्षा निर्मात्याला 'हाऊस फुल्ल' चा बोर्ड जादा मोहक वाटतो. पैशाशिवाय स्टुडिओतील बेलमनदेखील बेल वाजवीत नाही तर मग चित्रपट निर्मितीसाठी लागणार्‍या अवाढव्य खर्चाच्या बाजू पाहण्यासाठी दिग्दर्शक कितीही प्रतिभावंत आहे हे सिद्ध झाले असले तरी आर्थिक अपयशाचा त्याच्यावरील शिक्का त्याच्यातील कलात्मकता जाळून टाकण्यास कारणीभूत ठरतो.

मग १९६२ चा "साहिब बिवी और गुलाम" असो वा १९६१ चा 'चौदहवी का चांद' असो.....बाजारातील व्याख्येनुसार आर्थिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी गणली गेली, पण स्वतःला 'अपयशी दिग्दर्शक' समजू लागलेल्या गुरुदत्तने या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन अब्रार अलवी आणि एम.सादिक यांच्याकडे जाणीवपूर्वक सोपविले. एका अर्थी 'गुरुदत्त' नावाचे वादळ जीवनाच्या अखेरच्या पर्वाकडे जात असल्याची ती एक स्पष्ट खूण होती. गुरुदत्त प्रॉड्क्शन्स बॅनर्सचा शेवटचा चित्रपट होता "बहारे फिर भी आयेगी". निम्म्याहून जास्त काम केल्यानंतर गुरुदत्त पुनश्च त्या नैराश्येच्या गर्तेत गेला आणि अटळ असा शेवटही करून घेतला त्याने. त्यामुळे जरी पुढे 'बहारे...' त्यांच्या धाकट्या भावाने - आत्माराम - पूर्ण करून पडद्यावर आणला तरी लौकिकार्थाने 'चौदहवी का चांद' हाच गुरुदत्तचा स्वत:चा म्हणता येईल असा शेवटचा चित्रपट.

guru3.jpg

गुरुदत्तच्या प्रणयविश्वातील नायिका

guru4.jpg

गुरुदत्तच्या वैवाहिक जीवनातील नायिका

"चौदहवी का चांद" चित्रपटातील 'चांद....'ने त्याचे खाजगी आयुष्य सर्वार्थाने व्यापले होते आणि शेवटी तो चंद्रमा आपल्या अवकाशात कधीच येणार नाही हे कटु सत्य उमगल्यावर यातील कलाकाराचे तडफडणे त्याच्यातील व्यक्तीला असह्य झाले. गुरुदत्त + गीता रॉय हे नाते जितके सत्य तितकेच गुरुदत्त + वहिदा रेहमान हेही. रितीरिवाजानुसार गीता रॉय पुढे गीता दत्त झालीही; पण अगदी १९५६ पासून ज्या वहिदा रेहमानसमवेत गुरुदत्तचे नाते प्रस्थापित झाले ते त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच सूरात राहिले. ज्याचा इन्कार वहिदानेही कधी केलेला नाही.

अशा या जादुई कलाकाराचा जन्म झाला ९ जुलै १९२५ रोजी बंगलोर (कर्नाटक) येथील पदुकोणे कुटुंबात. वडील शिवशंकर पदुकोणे शाळामास्तर आणि आईदेखील शिक्षिका. मात्र या दोघांनी गुरुदत्तला शालेय शिक्षणासाठी मामाकडे (बी.बी.बेनेगल, श्याम बेनेगलचे आजोबा) कलकत्ता इथे ठेवले आणि कदाचित त्या कारणामुळेच गुरुदत्तच्या निर्मिती क्षमतेवर विचारावर 'बंगाली साहित्य' आणि वातावरणाचा प्रभावी परिणाम दिसून येतो. अगदी अस्खलीत बंगाली भाषा ते लिहित बोलत आणि वाचत असत. मॅट्रिकनंतर आर्थिक परिस्थिती खराबीच्या कारणामुळे कॉलेज शिक्षण हुकले पण काकांच्या मदतीने पुढील पाच वर्षे अल्मोडास्थित उदय शंकर इंडिया कल्चर सेंटर इथे नृत्य आणि संगीताचे धडे गिरविले. किंबहुना त्यांचे नृत्यकौशल्यच त्याना मुंबईच्या चित्रपटसृष्टीत पाय ठेवण्यासाठी कारणीभूत ठरले. उदय शंकर यांचे डान्स बॅले व त्यातील कलाकारांना छोटीमोठी कामे मिळत गेली. दुसर्‍या महायुद्धानंतर चित्रपट निर्मितीवर जी बंधने आली, लायसेन्सराज आले, नियमावली आली तीमुळे मुंबईतील चित्रपटनिर्मितीला चांगलीच खीळ बसली आणि मग खर्‍या अर्थाने जे निर्माते आणि संस्था टिकल्या त्यांच्याकडील निर्मिती नियमित झाली. पण त्यामुळे असे धडपडणारे कलाकार एकदम बेकारीच्या खाईत गेले. पडद्यावर सितारे म्हणून चमकणार्‍या कलाकारांचा उद्या कुठे काम मिळेल याची जर चिंता होती तर मग साध्या नृत्यदिग्दर्शकाला कोण विचारेल ? या विचारात गुरुदत्त आपल्या कलकत्यातील मित्रासमवेत पडलेला असायचा. या मित्रात मोहन सैगल (जे पुढे चित्रनिर्मातादिग्दर्शकही झाले...'अनपढ', 'अपना हाथ जगन्नाथ, 'देवर' आदी), मोनी भट्टाचार्य ("मुझे जीने दो", "उसने कहा था" चे दिग्दर्शक)...हे दोघे होते. एकत्रच राहत होते तिघे आणि बेकारी दिवसातील या तिघांचा खर्च एकटा गुरुदत्त करी. त्याला किमान वडील आणि मामाकडून थोडेफार आर्थिक सहाय्य होत असे. अशाच बेकारीच्या कालखंडात गुरुदत्तचा परिचय झाला 'मदर इंडिया'नियतकालिकाचे बाबुराव पै. यांच्याशी. फार आदराचे नाव होते पै यांचे चित्रपटसृष्टीत. उदय शंकर बॅलेमुळे पै यांचा त्यातील कलाकारांशी किरकोळ का होईना, परिचय होताच. गुरुदत्तमध्ये केवळ एक नृत्य दिग्दर्शकापेक्षा आणखीन् काही अधिक आहे हे पै यानी ओळखले होते (त्याला कारण त्या कन्नड युवकाने बंगाली भाषेवर मिळविलेले प्रभुत्व आणि तेथील साहित्याची त्याला झालेली जाण) व त्यानीच मग गुरुदत्तला पुण्याच्या 'प्रभात फिल्म स्टुडिओ' मध्ये नृत्यदिग्दर्शक आणि सहा.चित्रपट दिग्दर्शक या पदावर तीन वर्षाच्या करारावर नियुक्त केले. इथे पुण्यात तर "धडपडणार्‍यां"चा अड्डाच जमला होता. गुरुदत्तला इथे भेटले देव आनंद, रेहमान, अब्रार अल्वीसारखे पुढे आयुष्यभर साथ दिलेले मित्र (बलराज साहनीही मित्रात होते, पण बलराज ईप्टाशी जोडले असल्याने त्यांची भेट त्याच जागी होत असे). विश्राम बेडेकरांनी 'लाखाराणी' (१९४५) च्या दिग्दर्शनात गुरुदत्तला 'असि.सिने.डायरेक्टर' अशा नावाचे श्रेय टायटल्समध्ये दिले. मला वाटते पडद्यावरील 'डायरेक्टर' या नावाची मोहिनी त्याचा मनी तिथेच स्थिर झाली असणार. कारण प्रभात करार संपल्यानंतर पुढे मुंबईत भेटायच्या आणाभाका झाल्यावर गुरुदत्तने देव आनंदला आपल्या पहिल्या चित्रपटात नायक म्हणून घ्यायचे तर देवने आपल्या पहिल्या निर्मितीसाठी गुरुदत्तकडे दिग्दर्शन सोपवायचे हे ठरले.

इथून पुढे सुरू झाला तो प्रवास "गुरुदत्त" - एक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणूनही....त्याचा आढावा पुढील लेखात.

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा मामा. जवाब नही आपका. मस्त लेख. खुप नविन माहिती मिळाली या कलाकारा बद्दल Happy
खरं तर मी पैलीच आले असते प्रतिसाद देन्यात पन मेलं पानंच लोड हुइना लवकर Sad
पुढील लेखनास शुभेच्छा.
लवकर टाका पुढचा भाग

वा, सुरुवात तर अग्दी छान केलीत अशोकराव. आता पुढील भागाची चांगलीच उत्कंठा लागून राहिलीये.
तुमचे लेख म्हटल्यावर अभ्यासपूर्ण, ओघवते असणारच.....
'गुरुदत्त' हे एक गारुडच. त्यात त्याचे मनस्वीपण, त्याची उत्तुंग प्रतिभा, चित्रपटातील प्रत्येक फ्रेममधून जाणवणारा खास टच्...... या व अशा कित्येक गोष्टी येतातच...

मामा मस्तच लिहीलय्........भन्नाट.......... Happy
बर्‍याच गोष्टी नव्याने कळाल्या...........छानच्........आणि धन्यवाद......... Happy

मला नेहमीच कुतुहल होते गुरुदत्तविषयी.. तुमच्यामुळे गुरुदत्त हे कोडे उलगडेल.. धन्यवाद..
'गुरुदत्त' अशोक काकांच्या चष्म्यातून.. Happy

मजा आली वाचायला. पण मी त्या दोन पैकी एकही पहिलेला नाहिय अजुन, या विकेंडला नक्कि बघेन.

या थिएटर्समधून गुरुदत्त यांचे जवळपास सर्वच चित्रपट 'री-रन' ला प्रदर्शित झाले अन् तेही ५० पैसे सवलतीच्या दरात.>> इसको बोलते है कोल्हापुरी हौस Wink

छान Happy

मामा,
लेखाची सुरूवात अत्यंत सुरेख झाली आहे. लेखाच्या शेवटी पोहोचल्यावर वाटलं लेख संपला कसा काय इतक्यात? Uhoh मग क्रमश: पाहिलं. आणि हुश्श झालं.

लेखातल्या प्रत्येक आणि प्रत्येक वाक्याला, शब्दाला अनुमोदन.
आजकालचे दिग्दर्शक हे गुरुदत्तच्या चित्रपटांचे फॉलोअर आहेत हे नक्कीच पण सुदैवाने ते भ्रष्ट नक्कल करत नाहीत ही जमेची बाजू. गुरूदत्त यांनी आजच्या पिढीच्या दिग्दर्शकांना त्यांच्यातला स्पार्क ओळखायला खूप मदत केली यात शंका नाही.
त्यांना जिवंतपणी जास्त प्रसिद्धी मिळाली की मृत्यू नंतर हे वाक्य काळीज चिरणारं आहे. प्यासा पाहताना गुरूदत्तचं आयुष्य आपल्या डोळ्यासमोरून सरकत जातं, बहुतेक तो वास्तवात तसंच जगला असं वाटतं, कारण त्या सिनेमात त्याने वेगळा असा अभिनय केला नाही. त्यातली पात्रं सुद्धा फार सुज्ञपणे निवडलेली होती. पुन्हा पुन्हा पाहताना तो चित्रपट नव्याने कळतो.

दिनेशना अनुमोदन, गुरूदत्तच्या प्रत्येक चित्रपटावर एकेक लेख होईल.

पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.

पुलेशु! Happy

अशोक मामा मस्तच त्या काळी आम्ही नसलो तरी तो काळ जाणवता येतोय तुमच्या लिखाणाच्या शैलीतुन .......पुढचा भाग लवकर येऊदया

लेखाचे शिर्षक वाचल्याबरोबर 'प्यासा' असं आपोआपच तोंडातुन बाहेर पडलं!

अशोक मामा, मस्त लेख! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!

खूप अभ्यासपूर्ण लेख!
गुरुदत्त हे नामच विशेषण होऊन बसले होते.
आमच्या लेखी त्याचा चित्रपट म्हणजे , पाहात राहावा असा त्याचा रेखीव चेहरा, निखळ अभिनय, गीता दत्तच्या आवाजातील उत्तमोत्तम गाणी, जॉनी वॉकर व त्याच्या तोंडी असलेले एखादे विनोदी गाणे अशी भरगच्च मेजवानीच! पण त्याही पलिकडील पैलू तुमच्या लेखातून उलगडत आहेत. त्याबद्द्ल धन्यवाद!

'गुरुदत्त' या नावातच त्याच्याविषयी चर्चीली जाणारी विशेषणे, विशेषनामे सामावली आहेत.>>सहमत.
चांगला लेख.

अतिशय सुंदर लिहीलंय..

या लेखातून बरीच माहिती मिळाली. त्यांचं आडनाव पदुकोण होतं हे नव्हतं माहीत. प्रकाश पदुकोण शी संबंधित आहेत का ते ? तसंच त्यांना नृत्य अवगत होतं हे ही या लेखातूनच कळालं. अशाच माहितीच्या प्रतिक्षेत आहे.

किरण चांगली माहीती.
आणि आपण म्हणतोच नाही का की जे होतं ते चांगल्यासाठीच. ती भूमिका निव्वळ गुरूदत्त साठीच योग्य होती हे माझं मत.

मधुबालासमोर तोर्‍यात वावरू शकणारा आणि तो तोरा शोभणारा एकमेव अभिनेता - गुरुदत्त.भल्या भल्या अभिनेत्यांचे अभिनय, नखरे मधुबालाच्या एका हसण्याने झाकोळून जात पण Mr & Mrs. 55 नायक मधुबालाच्या सौंदर्या इतक्या ताकदीने मनात उतरतो. 'ए जी दिलपर हुआ ऐसा जादू' मधील प्रेमात आकंठ बुडालेला नायक जेंव्हा 'उधर तुम हसीं हो' म्हणतो तेंव्हा त्याच्या प्रेमाची व्याकुळता आपल्यालाही जाणवते पण तरीही सगळ्या चित्रपटभर तो आपले स्वत्व कधीच सोडत नाही. असा नायक हिंदी सिनेमात अभावानेच आढळतो कारण बहुतेक नायकांचे प्रेमात पडल्यावर माकड बनते Happy

'ये दुनीया अगर मिल भी जाये' मधला तो नायकाच्या मागून येणारा प्रकाश! कसे काय सुचते बाबा असे काही करणे? नुसत्या त्या गाण्याचे शब्द आणि तो प्रकाश नायकाची प्रसिद्धीपराङ्मुखता एका झटक्यात दाखवतात, नुसती दाखवतच नाहीत तर मनात रुतवतात. ह्याला म्हणतात गाणे चित्रीत करणे.

त्याच प्यासाचा शेवट इतका तरल आणि सुंदर आहे. प्रेक्षक त्याचा आपल्या स्वभावामुसार अर्थ लाऊ शकतो - दु:खांत अथवा सुखांत. त्या शेवटाचा विचार मनातून बराच काळ जातच नाही.

साहब बीबी और गुलाम मधली नायीका तर अप्रतिमच. त्यातला तो 'गहने बनवाओ, गहने तुडवाओ..' संवाद तर प्रचंड आवडता - नायीकेचा मनस्वीपणा अलगद उलगडून दाखवणारा.

अशोक, तुमच्या लेखाने खूप मस्त वाटले. पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतोय.

मामा मस्त लेख!!!!!

गुरुदत्त चा "साहब बीबी और गुलाम" हा सीनेमा माझा ऑल टाइम फेव्हरेट.... त्यातल्या मीना कुमारीचे "डोळे" हे एक स्वतंत्र पात्र आहे, येवढं त्यांना महत्व आहे. बावळट भुतनाथ त्याने अप्रतिम रंगवला आहे. छोटी बहुचं अनामिक आकर्षण आणि जबा चा अवखळ पणा ह्यात अडकलेला भुतनाथ म्हणजे उत्क्रुष्ट अभिनयाचा नमुना. त्यातला रेहेमान पण माझा आवडता. रेहेमान ने गुरुदत्त च्या सीनेमांमध्ये अप्रतिम कामं केली आहेत. उदा. चौदहवी का चांद.

प्यासा मधे खरतर मला न आवडणारी अभिनेत्री (माला सिन्हा ) आहे. पण तिच्या कडे लक्षच जात नाही. अगदी "हम आपकी आंखोमे" मधे पण मी त्याच्या कडेच बघत असते.

गीता आणि गुरुदत्त चं सहजीवन अजिबात चांगलं न्हवतं. शेवटी शेवटी तो वेगळा भाड्याच्या घरात रहायचा. ह्या लोकांनी फक्त कले वर प्रेम केलं. पैसा वगैरे गोष्टी गौण मानल्या. म्हणुनच कदाचित त्यांच्या हातुन इतिहास घडले.

Pages