प्रतापगड !

Submitted by Yo.Rocks on 9 July, 2012 - 14:57

धुंदमय महाबळेश्वर इथुन पुढे..

प्रतापगडावर जायचे तर प्रायवेट टॅक्सीचे भाडे रुपये ७५०/- च्या घरात आहे.. एसटीची खास प्रतापगड दर्शन म्हणून हंगामी बसदेखील आहे.. पण आम्ही मुळातच भरपावसात बिगरहंगामी मोसमात आलो होतो.. अश्यावेळी सकाळी ९ वा. सुटणारी एक एसटी आहे जी गडावर जाते.. पण परतण्यासाठी संध्याकाळी पाच-सव्वापाच वाजेपर्यंत वाट बघावी लागते.. म्हटले थांबू पाच वाजेपर्यंत.. आम्हाला कुठलीच घाई नव्हती तसेपण मुख्य महाबळेश्वर ढगांमुळे झाकला गेला होता.. एसटी स्टँड गाठले ते पण ढगांमध्ये ..

सकाळची ९ ची एसटी सुटली.. गाडीतच परतीच्या प्रवासाची चौकशी केली तेव्हा कळले की गडाच्या पायथ्याशी 'वाडा' नावाचे गाव आहे.. तिथून एसटी मिळू शकेल.. म्हटले बघू तरी किती अंतर असेल मग ठरवू..

महाबळेश्वरचे मुख्य मार्केट परिसर सोडला की लगेच घाटरस्ता सुरु झाला. दोन्ही बाजूला बघून तरी मउ पावसाने दरी गोठलीचा प्रत्यय येत होता.. वाटेत नुकतेच सुरु झालेले ताजेतवाने छोटे छोटे धबधबे दिसत होते.. पाउणतासात वाडयाला गाडी आली.. इथे वातावरण बर्‍यापैंकी स्वच्छ होते पण पाउस होताच अधुनमधून.. पंधरावीस मिनीटात गाडी गडावर आली.. जंगलातून जाणारा हा डांबरी रस्ता वळणावळणाचा नि चढणीचा होता.. सो येताना उतार लागेल असे गृहीत धरूनच पक्के केले की पायपीट करत वाडयाला यायचे.. !!

पायथ्याशी गाडी पोहोचली तर इथेही ढगांचा कल्लोळ सुरुच होता.. मस्तपैकी थंडगार वाराही सुटला होता.. एसटीने आम्हाला टाटा केले.. नि आम्ही पुढे सरकलो..
प्रचि १:

इथेच परिसरात वाहनतळासाठी सुविधा आहे.. आजुबाजूलाच दोन हॉटेल बघून जीव सुखावला.. गडसफर संपुर्ण झाल्यावर पेटपूजा करु म्हणत गडाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जाउ लागलो.. तोच गाईडलोकांची विचारणा सुरु झाली.. मुद्दामहून भाव विचारला तर दिडेकतासांचे रुपये दोनशे घेणार सांगितले.. त्यांना प्रामाणिकपणे नाकारत पुढे गेलो.. गडापर्यंत गाडी येते तिथे गाईड कशाला.. 'चल आज मी तुझा गाईड' असे सौ. रॉक्सला म्हणत आम्ही पुढे गेलो.. हिची पहिलीच गडभ्रमंती.. आम्ही सक्काळी दहा-साडेदहाच्या सुमारास पोहोचलेलो.. फारसे कुणी आले नव्हते.. जेमतेम १०-१५ पायर्‍या चढताच बुरुजांच्या साक्षीने उभा असलेला महादरवाजा नजरेस पडला.. ! सुंदरच !

प्रचि २:

प्रचि ३:

इथेच आतून दरवाजा आहे..
प्रचि ४:

आत प्रवेश करताच नेहमीप्रमाणे देवडया आहेत.. उजव्या बाजूच्या देवडीमध्ये एक तोफ ठेवण्यात आली आहे.. आतून पुढे गेल्यावर सरळ चालत गेलात तर प्रतापगडाचा सुप्रसिद्ध टेहेळणी बुरुज (जीवा महाला बुरुज) नजरेस पडतो.. आम्ही आलो तर अगदीच धुसर दिसत होते.. ढगांनी सर्व काही झाकून ठेवले होते.. तरीसुद्धा तटबंदी थोडीफार आपले अस्तित्व दाखवत होती.. दुरचे काही दिसण्याचा प्रश्णच नव्हता...

प्रचि ५:

त्यामुळे आम्ही डावीकडे वळालो.. महाबळेश्वरचे पर्यटक इथेपण गर्दी करतात नि म्हणूनच की काय इथे टाईल्स टाकून बांधलेल्या पायर्‍या आहेत.. खर सांगतो.. गडावरती त्या पण अश्या पायर्‍या.. खरच कस-कसंतरी वाटत होत अश्या निर्जीव पायर्‍या चढताना.. याच मार्गाच्या डावीकडे जुन्या काळच्या पायर्‍या दिसतात.. पण दुर्दैवाने त्यांचा आता वापर केला जात नसल्याने तिथून जाणे बंद आहे.. उजवीकडे खाली एक तळे दिसले.. 'रहाट तळे' असे नाव.. थोडे वरती गेलो नि दुकाने/हॉटेल यांची रांगच सुरु झाली.. मग लक्षात आले इथे गाडी वरपर्यंत येते मग कसले काय.. वेगळी दुनिया वाटतच नाही.. असो.. तशी इथे वस्तीदेखील आहे.. इथेच वरती एक वाट श्रीभवानीमातेच्या मंदीराकडे नेते.. एका प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर श्रीभवानीमातेच्या मंदीराचा परिसर लागतो.. सभोवताली पावसाचे पाणी झाले होते.. ते तुडवत मंदीरात प्रवेश केला नि श्रीभवानीमाता समोर.. काय ते दर्शन.. अगदी प्रसन्न.. फक्त बघतच रहावे असे मातेचे तेज... ! गाभार्‍यात आमच्याशिवाय कोणीच नव्हते.. अगदी शांत... आपसुकच हात जोडले गेले व डोके झुकले..

प्रचि ६:

- -

हे दोन्ही फोटो परवानगी घेउन काढलेले आहेत.. अन्यथा फोटुग्राफीला मनाई आहे.. परवानगी कशी व का दिली हे विचारु नये वा गैरसमजूत करु नये... तिथे बाकी कोणी आसपास नव्हते सो निर्मळ मनाने विनंती केली व होकार मिळाला एवढच सांगेन..

नेटवरून साभार : "महिषासूरमर्दिनीच्या रुपातील ह्या मुर्तीचे वैशिष्टय म्हणजे ही मुर्ती नेपाळमधील गंडकी नदीकाठाहून आणलेल्या खास शाळिग्राम शिळेतून घडवलेली आहे.. असे म्हटले जाते राजे लीलासेनच्या मदतीने ही शिळा नेपाळमध्ये जिथे त्रिशुळ गंडकी, श्वेत गंडकी व सरस्वती या तीन नद्यांचा जिथे संगम होतो त्या डोंगरातून आणली होती..रायगडावरच ही मुर्ती प्रथम पुजली होती व नंतर मोरोपंत पेशव्यांनी ह्या प्रतापगडावर तिचे मंदीर स्थापन केले.. " (* जाणकरांनी इथे प्रकाश टाकावा :))

ह्या मुर्तीसमोर स्फटीकाचे छोटे शिवलिंग ठेवलेले दिसते.. नि समोरच एक तलवार ठेवलेली आहे.. (महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहीते यांचे नाव कोरलेले आहे असे नेटवरून कळले) मंदीराच्या समोर सभामंडप (नव्याने बांधलेला) व दिपमाळेचे दोन स्तंभ उभे आहेत..

याच मंदीराच्या परिसरातून पलिकडे गेले की हस्तकला केंद्र उभारले आहे.. हे बघून तर हा गड म्हणजे आता पर्यटन स्थळ असल्याचे समजुन चुकते..इथे खरेदीसाठी आकर्षक वस्तू ठेवल्या आहेत.. बाहेर परिसरात काही जुने तुटके अवशेष दिसून येतात.. तिथूनच माघारी फिरलो..

प्रचि ७:

मंदीराच्या परिसरात तोफांचे काही अवशेष बाजूला ठेवलेले आहेत..
प्रचि ८:

इथुन बाहेर आलो नि मग वरच्या बाजूस(बालेकिल्ल्याच्या) जाउ लागलो.. इथेपण त्या निर्जीव पायर्‍याच (गडपण नाहीच मुळी).. वरती आलो तिथेच मग स्वयंभू केदारेश्वर मंदीर आहे.. ह्या गडाचे बांधकाम करताना हे शिवलिंग सापडले होते..

प्रचि ९: हे देखिल तितकेच भव्यदिव्य..

या मंदीरासमोरच राजसदर सदृश बांधकाम दिसते.. इथूनच पुढे अगदी चिंचोळी वाट आपल्याला केदारेश्वर मंदीराच्या मागच्या बाजूस घेउन जाते.. वाटेत एक चोरमार्ग नजरेस पडतो.. नि पुढे जिथे तटबंदी दिसत नाही तिथे रेलिंग लावलेली एक छोटी जागा आहे.. इथुन म्हणे कडेलोट करण्यासाठी ही जागा ठेवली होती.. आम्हाला दरी किती खोल आहे ते जाणून घेण्याचा प्रश्नच नव्हता.. फक्त ढगांचे लोट जोरात खालून वरच्या बाजूस येत होते... नि दरी म्हणावी तर मउ कापसाने गोठलेली..
आमच्या दोघांव्यतिरिक्त एखाद दुसरा गाईड चार-पाच जणांच्या ग्रुपला माहिती देताना आढळत होता.. त्यातच हे एक जोडपे दिसले..

प्रचि १०:

इथवर आलो नि वार्‍याने जोर धरला.. ढगांची पिसारे सैरावैरा उडू लागले.. क्षणात हिरव्यागार दरीचे दर्शन झाले.. नि 'वाह' हे उदगार निघण्याआधीच पुन्हा दरी ढगांनी झाकून टाकली.. अश्या या ढगांच्या उघडझापीतच एक सुंदर दृश्य समोर दिसले.. तटबंदीची हिरवाईने नटलेली एक बाजू नि त्यांना चिकटलेले ढगांचे अवशेष.. बस्स.. ट्रेकींगमध्ये तर या क्षणांसाठीच आपला जीव आतुरलेला असतो... Happy

प्रचि११:

आता मात्र आमच्या उत्साहाला उधाण आले.. नि तटबंदी न सोडता पुढे जायचे ठरवले.. खरेतर गाईडलोक्स इथूनच माघारी फिरत पर्यटकांना प्रतापगडावरील बगीच्यामध्ये घेउन जातात.. जिथे महाराजांचा पुतळा उभारलेला आहे.. पण आम्ही तटबंदीवरूनच महाराजांचा फोटो घेतला नि तिथून पुढे चालू लागलो..

प्रचि १२:

इथून पुढे कुणाचाच मागमूस नव्हता.. बगीचा दृष्टीपथात होता पण आम्ही त्या दिशेने न जाता तटबंदीवरून सरळ पुढे सरकत होतो.. चुकामूक नको म्हणून त्या बगीच्याचे स्थान मात्र लक्षात ठेवले.. पुढे मार्गात असलेली झाडी नि अधुनमधून होणारी ढगांची भरगच्च दाटी यामुळे आम्हाला जपूनच जावे लागत होते.. जसजसे पुढे गेलो तसतशी आमच्या सौ. ची धाकधुक होउ लागली.. म्हटले ट्रेक खरा आता सुरु झाला आहे.. एका ठिकाणी वळण लागले.. तिथेपण तटबंदीची भिंत दिसत नाही.. इथेच पुन्हा एकदा दरीचे दर्शन झाले..

प्रचि १३: जावळीचे खोरे ?

पुढे उजव्या बाजूस वळल्यावर चार-पाच मोठया दगडी पायर्‍यांनी तटबंदी खालच्या बाजूस उतरते.. डावीकडे तर ढगांचा दाट पडदा दिसत होता.. नि पुढे झाडाझुडुपांची दाटी अगदीच वाढलेली.. त्यातही ढग घुसलेले.. अडकलेले... सो असे दृश्य पाहून आता सौ. रॉक्सना पुढे जाण्यास काही धीर झाला नाही... आम्ही दोघेच असल्याने मलाही पुढे जाण्याचे थोडे धोक्याचे वाटले नि तटबंदीवरुन फिरण्याचा नाद सोडून द्यावा लागला.. इथे मात्र माझ्या भटक्या मित्रांना मिस केले.. नाहीतर.. Happy (नेटवर नंतर गुगलले तर कळले ही रेडका बुरुजच्या आसपासची तटबंदी) ..

तिथून पुन्हा पायर्‍यांनी वरती आलो.. नि आल्या मार्गी न जाता तटबंदीवरून सरळ खाली उतरलो.. नि बगीचाच्या दिशेने जाउ लागलो.. इथे पुन्हा दोन- तीन वाटा मघाशी आमची वाटचाल जिथे अडकली त्या दिशेने जात होत्या.. त्यापण आमजवून पाहिल्या पण पुढे जाणे मुश्किल दिसत होते.. त्यात एक पाण्याचा झरा मात्र नजरेस पडला.. शिवाय ढगांचा पडदा काहीक्षणासाठी दुरु झाला नि.. दुरवर एक बुरुज नजरेस पडला..

प्रचि १४:

जिथे एक पाण्याचे छोटे तळेही दिसत होते.. पण इथून तिथवर जाणारी वाट काही दिसत नव्हती.. नि सौ. रॉक्स सोबत येण्यास तयार नव्हत्या.. इथून नाही तर दुसरीकडून वाट शोधू म्हणत आम्ही बगीच्या दिशेने कूच केले... नि मागच्या बाजूने आवारात प्रवेश केला.. इथे आलो नि वातावरण अचानक स्वच्छ झाले.. जणु महाराजांचे दर्शन नशिबात होते..

प्रचि १५:

बगीच्यात प्रवेश कुठूनही करु शकता.. इथे फिरण्यात वा आराम करण्यात वेळ दवडला नाही कारण मला त्या बुरुजाची भेट कधी होतेय असे झाले होते.. साहाजिकच इथे तिथे वाट बघू लागलो नि तोच महाराजांच्या पुतळ्याच्या मागच्या बाजूस उजव्या बाजूने तटबंदी त्या दिशेने खाली उतरताना नजरेस पडली.. लगेच लेटस गो केले.. पण जल्ला ढगांनी लगेच स्वागतासाठी आक्रमण केले..

प्रचि १६:

उतरताना डाव्या बाजूच्या परिसरात काही निवासस्थानाची सोय असणारी दोन तीन घर(गेस्ट हाउस) नजरेस पडली.. आम्ही जसे खाली उतरलो तसे पावसानेदेखिल शिडकावा सुरु केला.. पण इथली वाट बर्‍यापैंकी सुरक्षित वाटत होती सो आमच्या सौ. ना सोबत येण्यास भाग पाडले.. हिला तर ट्रेकचे धडेच देत होतो.. चालताना कशी काळजी घ्यावी, कुठे जपावे, तटबंदीवरुन चालताना घ्यायची काळजी इत्यादी लेक्चर अधुनमधून चालू झालेच होते.. ती पण वैतागली नाही.. घाबरली मात्र नक्कीच होती.. Proud

आम्ही त्या बुरुजापाशी पोहोचलो तिथेच तटबंदीला आमने सामने पायर्‍या दिसतात... ह्या परिसरात आलो नि एकदम खुष.. मघाशी वरतून ह्या परिसराचा फोटो काढला होता तेव्हाच या बुरुजाबद्दल कुतूहल वाढले होते.. नि खरेच इथे बुरुजाची बांधणी छानच.. दुहेरी तटबंदी(चिलखत स्वरुपात).. चोरमार्ग.. पायर्‍या सारे मस्तच.. याच बुरुजाला "यशवंत बुरुज" असे म्हणतात..

प्रचि १७: तटबंदीवरून समोरासमोर उतरणार्‍या पायर्‍या..

प्रचि १८: तटबंदीजवळच असलेले छोटे तळे..

प्रचि १९: या बुरुजात असणारा चोर दरवाजा..

प्रचि २०: दोन तटबंदीतून जाणारी वाट..

इथवर आलो नि पुन्हा ढग दाटून आले.. पावसाची एक जोरदार सर येउन गेली.. जिथे गाईडलोक्स पर्यटकांना तासभर जेमतेम फिरवून लगेच टेहळणी बुरुजाकडे नेतात तिथे आम्ही इथवर फिरेस्तोवर जवळपास दोन तास घेतले होते.. कुठलीही घाई नव्हती.. अगदी पावसाचा मनमुराद आनंद घेत होतो.. यशवंत बुरुजाला मागे सोडून आम्ही तटबंदीवरूनच खाली उतरु लागलो.. रेडका बुरुज एक सोडला तर आमची संपूर्ण फेरी घडली होती.. इथूनच समोर पुन्हा भवानीमातेच्या मंदीराचा परिसर दिसू लागला.. तर अगदी खाली 'रहाट तळे'

प्रचि २१:

तर एकीकडे प्रतापगड म्हटले की छायाचित्रात दिसणारा सुप्रसिद्ध टेहळणी बुरुज (ध्वज बुरुज/ जीवमहाला बुरुज) ढगांमध्ये गुरफटलेला होता..
प्रचि २२:

पण इथली जीवंत दृश्ये क्षणाक्षणाला नजरेसमोरच बदलत होती.. हाच बुरुज जेव्हा ढगांपासून स्वतंत्र झाला तेव्हा..
प्रचि २३:

आणि त्या बुरुजापर्यंत पसरलेली माची..
प्रचि २४

ह्या बुरुजाबद्दल सांगायचे तर पुर्वी हा उद्ध्वस्त स्वरुपात होता.. २००७ मध्ये दुरुस्तीचे काम सुरु झाले होते नि यशस्वीरित्या पुर्ण केल्याचे दिसून येते.. हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन बघा..

http://www.pratapgad.in/marathi/current_project_work/work_completed_mara...

सध्या तटबंदीच्या चिलखताचे काम सुरु असल्याचे वाटते..
प्रचि २५:

प्रचि २६:

हा बुरुज नव्याने बांधल्यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे.. बसण्यासाठी आतून कटटा बांधलेला आहे.. नि तितकाच मग क्षणभर विश्रांती आणि फोटोग्राफीला वाव मिळतो.. या बुरुजाच्या अगदी खाली वाहनतळाची जागा आहे जिथवर एसटीसुद्धा येते.. आम्ही इथेच थोडावेळ विसावा घेतला.. इथून घेतलेले काही प्रचि..

प्रचि २७: गडापर्यंत येणारा रस्ता धुक्यात हरवलेला..

प्रचि २६: बुरुजावरुन दिसणारा बालेकिल्ला व अगदी उजवीकडे असलेला यशवंत बुरुज..

प्रचि २७: तर इथून दरीचे दिसणारे दृश्य..

आम्ही फोटो काढेस्तोवर आलेले बरेच पर्यटक माघारी परतले.. म्हटले बरे झाले तशी पण गर्दीची अ‍ॅलर्जीच असते... त्या शांततेत आम्ही दोघे भवतालची फोटोग्राफी करत होतो तोच अचानक कुठूनतरी मधमाश्यांचा मोठा घोळका बुरुजावरती घोंघावत आला.. जल्ला मग काय.. त्यांना कोणी डिवचले काय माहीत पण आमची तिकडून धूम ठोकताना सॉल्लिड तारांबळ उडली.. इथे सौ. रॉक्सना तर कापरे भरले.. तिच्या पहिल्याच वहिल्या गडभ्रमंतीमध्ये भारी अनुभव... आम्ही त्या बुरुजापासून जवळपास अर्धी माची धावत आलो होतो.. नशिब त्या माश्यांनी आमच्यावर हल्लाबोल केला नाही.... इथूनच मग आम्ही गडाचा निरोप घेउन खाली आलो..

प्रचि २८:

खाली येइस्तोवर दुपारचे दोन वाजत आले होते.. तब्बल तीन तासांची मस्त गडभ्रमंती झाली होती.. नि अश्या भ्रमंतीत पिठले-भाकर कोण चुकवेल.. Happy
प्रचि २९:

पेटपूजा झाली.. आता पुढचा प्रश्ण होता.. एसटी काय संध्याकाळी पाच शिवाय वरती येणार नव्हती.. सो ठरल्याप्रमाणे पुन्हा पायपीट सुरु केली.. म्हटले गड चढणे झाले नाही.. निदान पायी तरी उतरुया.. Happy आम्ही सुरवात केली नि पावसाने आमच्या या निर्णयाचे स्वागत केले...

प्रचि ३०:

गडापासून जवळच वाटेत अफझलखानची समाधी लागते (इतिहास/माहिती सर्वश्रुत आहेच, सांगणे नको).. इथे 'प्रवेश बंद' चा फलक व सभोवताली पहारेकर्‍यांच्या छावण्या हे बघून तिथे जाण्याचा प्रश्णच नव्हता.. सो पुढे कूच केले.. वाटेत मुद्दामहून एका प्रायव्हेट टॅक्सीला 'वाडया'पर्यंत किती भाडे घेणार तर म्हणे रुपये २००/- कै च्या काय ! आता उतरणीचा रस्ता असल्याने चालताना काहीच अडचण नव्हती.. रस्त्यावर एखाद दुसरी गाडी अधुनमधून जात होती.. मग पुन्हा शांतता.. आवाज फक्त पावसाच्या थेंबांचा... ओलाचिंब रस्ता.. अधुनमधून खळखळाट करत भेटणारे इटुकले पिटुकले धबधबे.. दोन्ही बाजुला झाडींची दाटी.. नि त्यांच्या झरोक्यातून दिसणार्‍या सभोवतालच्या डोंगररांगा नि त्यांच्यावरती काजळाप्रमाणे भासणारे काळे ढग.. एकदम सुहानी सफर चालू होती...

प्रचि ३१:

त्यातच वाटेत करवंदांची जाळी दिसली.. मग तर काय सोने पे सुहागा.. मागच्याच महिन्यात आजोबा ट्रेकला भर उन्हात करवंद खाल्ली होती.. नि आता भर पावसात खात होतो.. चव मात्र तशीच होती.. सगळं काहि कसलीही चिंता न बाळगता चालले होते.. उशीरही झाला नव्हता.. अर्ध्यापाउणतासातच आम्ही मुख्य रस्त्यावर आलो.. आत्ताशे सायंकाळचे चार वाजत होते.. पण वातावरण एकदम भन्नाट होते.. या प्रतापगडाच्या फाटयानंतर रायगडची हद्द सुरु होते.. अगदी घाटातला रस्ता सुरु होतो.. सो इकडेच मग महाबळेश्वरला जाण्यासाठी एसटी मिळेल या आशेने आम्ही तिथेच टिपी करु लागलो.. तसेपण ही जागा पावसाळी वातावरणामुळे भारी दिसत होती..

प्रचि ३२:

प्रचि ३३:

आतापर्यंतच्या सुखावह अशा सफरीबद्दल जल्लोष तर आपल्या स्टाईलने झालाच पाहिजे..
प्रचि ३४:

गाडी काही इकडे मिळणार नाही असे चिन्ह दिसताच आम्ही मग वाडयाच्या दिशेने निघालो.. पाच दहा मिनीटांवरच गाव आहे.. तिथेच मग एक कटींग घेतली नि चौकशी केली.. पण कळले एसटी आता थेट सव्वापाचला.. तीच गडावर येणारी संध्याकाळची पाचची एसटी.. !! या गावातून चारच्या सुमारास एसटी महाबळेश्वरसाठी निघून गेली होती.. खरे तर हे ऐकून वैतागण्यासारखी स्थिती होती.. पण इथे घाई कोणालाय.. सरळ बाजुच्या हॉटेलमध्ये मिसळपावची ऑर्डर केली नि 'वाट पाहेन पण एसटीने जाईन' म्हणत टिपी करत बसलो.. इथून प्रायवेट शेअरने जाणारी एखाद दुसरी गाडी मिळेल अशी आशा होती.. पण शेवटी तासभरात एसटीच न्यायला आली.. Happy

महाबळेश्वरला परत आलो तर इथे 'ये धुआ ये धुआ' सुरुच होते..
प्रचि ३५:

अश्याच मग मंदधुंद वातावरणात जेवण घेतले नि मस्तपैंकी स्ट्रॉबेरी क्रिम खात दिवसाची गोड सांगता केली..

प्रचि ३६:

समाप्त नि धन्यवाद Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव्..मस्त फोटोज आणी वर्णन...
धुक्यात हरवलेला रस्ता..
पिठलं भाकरी... स्लर्प!!!! ओरिजिनल टेस्ट पण विसरायला झालीये आता...
'निर्मळ मनाने विनंती केली व होकार मिळाला एवढच सांगेन." Lol

क्लास रे Happy

तिथे बाकी कोणी आसपास नव्हते सो निर्मळ मनाने विनंती केली व होकार मिळाला एवढच सांगेन>> म्हणजे पुजारी पण नव्हते?? Uhoh

लकी आहेस. मी दोनदा गेलोय पण तेव्हा गाभार्‍यात प्रवेश नव्हताच. एका छोट्याशा खिडकिसारख्या ठिकाणातुन दर्शन घ्यायच.

माझी वाचीव आणि ऐकीव माहिती त्या तलवारीबाबत अशी आहे की, ती तलवार सरसेनापती हंबीरराव मोहीते यांचीच असुन एका लढाईत त्यानी ६०० (ह्या आकड्याविषयी थोडिशी शंका आहे) शत्रुना कंठस्नान घातले होते. तशा खुणा देखील तलवारीवर आहेत.
चु भु द्या घ्या.

झकास! महाराजांचा धुक्यातला फोटो (१२) खासच.

हो, तो ६०० हा आकडा बरोबर आहे. आमच्या गाईडने पण तेच सांगितले होते. त्या तलवारीवर ६ खूणा जडवलेल्या आहेत. १०० शत्रूसैनिकांचे पारीपत्य केल्यावर १ खूण असे गणित होते.

भवानीमातेच्या मंदिराचा कळस चांदीचा आहे आणि अतिशय सुंदर आहे.

एकदम गारेगार
अरे हो एक सांगायचं राहीलं..... तुम्हा दोघांचा फोटो तर भारीच आवडला....... तोच तो प्रचि १० मधला Proud

सुंदर वर्णन आणि पावसाळी प्रचि तर अफलातून!

आंबेनळी घाटातून दिसणारा डावीकडचा रेडका बुरुज आणि उजवीकडचा यशवंत बुरुज...

रेडका बुरुज

मस्त रे योग्या. Happy
टेहळणी बुरूजाचा अजून एक फोटो वेगळ्या अँगलने हवा होता असं वाटलं. "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" च्या टायटलिंगची आठवण झाली. जिथे महेश मांजरेकर त्या बुरूजावर ध्वजाच्या बाजूला उभा असलेला दाखवलाय.

छान वर्णन...... आणि फोटो सुद्धा मस्तच.....
प्रतापगड म्हणजे माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय... Happy
देवीच्या मुर्तीपाशी जे स्फटीकाचे शिवलिंग आहे ते महाराज कायम जवळ बाळगत... खासकरुन युद्धाच्या वेळेस...
प्रतापगडावरील देवीचे हे स्थाह अत्यंत जागृत आहे.. देवीच्या मंदिरासाठी ज्यावेळेस बांधकाम सुरु केले त्यावेळेस फोटो क्रमांक ९ मधील शिवलिंग सापडले.. म्हणुन देवीचे देऊळ तिथे न बांधता महाराजांनी तिथे शिवमंदिराची स्थापना केली.... ( लहानपणापासुन ऐकलेल्या माहीतीवरुन )

अवांतर : श्या खुप नॉस्टॅल्जिक केलेत तुम्ही.... देवीच्या मंदीराशेजारीच जे घर आहे ते माझं आजोळ.... तुमचे फोटो बघुन आता लवकरात लवकर प्रतापगडावर जावसं वाटत आहे....

हिला तर ट्रेकचे धडेच देत होतो.. चालताना कशी काळजी घ्यावी, कुठे जपावे, तटबंदीवरुन चालताना घ्यायची काळजी इत्यादी लेक्चर अधुनमधून चालू झालेच होते.. ती पण वैतागली नाही.. घाबरली मात्र नक्कीच होती.. >>>>> हे मात्र अतिच - नवरा लेक्चर देतोय आणि बायको ऐकतीये - खरा बहाद्दर आहेस गड्या.....
अवांतर - सर्व वर्णन व प्र चि बेष्टच - धुक्यात असा गड पहायचा हा अनुभव काही औरच - त्यासी तुळणा नाही.....
सो मज्जाच एकंदरीत.....

मस्तच रे यो... फोटो आणी लेखपण...

आमच्या प्रतापगड ट्रेकची आठवण झाली.. आम्ही २ वर्षांपुर्वी होळीच्या सुमारास महाबळेश्वर-जावळी-प्रतापगड-हातलोट्-मधुमकरंद्-हातलोट घाट्-बिरमणी-खेड असा भन्नाट क्रॉसकंट्री ट्रेक केला होता...

गडापासून जवळच वाटेत अफझलखानची समाधी लागते (इतिहास/माहिती सर्वश्रुत आहेच, सांगणे नको).. इथे 'प्रवेश बंद' चा फलक व सभोवताली पहारेकर्‍यांच्या छावण्या हे बघून तिथे जाण्याचा प्रश्णच नव्हता>>>>ह्याच अफजलखान कबरी पाठून एक वाट पायथ्याच्या पार गावात उतरते (येथेच जावळीच्या मोर्‍यांची रामवरदायीनी ही कुलदेवता आहे). या वाटेने आम्ही उतरलो होतो..

झकास रे यो मस्त सफर, सुंदर प्रचि, Happy
'वाट पाहेन पण एसटीने जाईन' >> जल्ला तु काय यस्टी सोडायला तयार नाय Proud

खुप मस्त प्रचि.. Happy

एप्रिल मधे च जाऊन आलेलो त्याची ऊजळणी झाली. मडक्यातले ताक तर खासच.. (त्याचा फोटो नाहीये का?)

आठवणी रे आठवणी... Happy सायकलने एकदा ठाणे ते प्रतापगड आणि तिथुन वाई - महाबळेश्वर मार्गे पुन्हा पुणे-ठाणे असा प्रवास केला होता तेंव्हा ह्या पार गावात मुक्काम केला होता. त्यानंतर ३-४ वेळा गडावर गेलो असीन.

जो जुना मार्ग आता वापरात नाहिये ना तिथुन वर गेलास की देवळ्याच्या मागे जाता येत. इथे भोसले कुटुंबियांसाठी बांधलेले एक छोटेसे १ मजली घर आहे. तिथुन घेतलेले हे फोटो. Happy शेवटचा फोटो खालच्या रस्त्यावरुन.

धन्यवाद मंडळी Happy

झकासा.. पुजारी नव्हते.. पण अभिषेक नोंदणीवाले एक गृहस्थ बसले होते..
बाकी माहितीबद्दल तुझे, माधव व अमृता यांचे धन्यवाद.. Happy

भवानीमातेच्या मंदिराचा कळस चांदीचा आहे आणि अतिशय सुंदर आहे. >> +१.. धुक्यामुळे नीटसा टिपता आला नाही..

इंद्रा.. झब्बू बद्दल विशेष आभारी.
स्मिहा.. त्या ढगांच्या धुक्याचा जिथे भरोसा नाही तिथे जल्ला कसला अँगल शोधणार.. पाउस आला की मग कॅमेरा पण जपायचा.. Happy बाकी तो ध्वज अडकवून ठेवला होता..

मनोज.. तुझे अनुभव ऐकायची खूप इच्छा आहे..

सही फोटो आणि वर्णन तर अप्रतिम, वर्षापुर्वीच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्स मित्रा Happy

हो, तो ६०० हा आकडा बरोबर आहे. आमच्या गाईडने पण तेच सांगितले होते. त्या तलवारीवर ६ खूणा जडवलेल्या आहेत. १०० शत्रूसैनिकांचे पारीपत्य केल्यावर १ खूण असे गणित होते.>>>>>>>>>>+ १
बाकी अप्रतिम फोटो

मस्त वर्णन आणि प्रकाशचित्रे..! Happy
प्रतापगडावरिल महाराजांच्या त्या अश्वारुढ पुतळ्यात, पुतळा घडवताना शिल्पकाराकडून एक चुक झालेय. ओळखु शकता का ती चुक. प्र.चि. १५ पहा.....

Pages