गझलची तोंडओळख -२ (वृत्त विचार)

Submitted by kaaryashaaLaa on 16 September, 2008 - 09:48

काय दोस्तांनो, व्याकरणातसुद्धा मजा येऊ शकते हे पटतंय ना? Happy

आता लघु आणि गुरू हे तर आपले दोस्त झाले. यांचा हात धरून आता वृत म्हणजे काय ते बघू या.
हा लघु आणि गुरू अक्षरांचा एखाद्या अनुक्रमाची जेव्हा कवितेत पुनरावृत्ती होते, तेव्हा त्या कवितेला वृत्तबद्ध कविता म्हणतात. (अबब!)

म्हणजे काय? आता गेल्या कार्यशाळेत आपण भुजंगप्रयात वृत्तात गझल लिहीली होती.

ऋतू ये | त होते | ऋतू जा | त होते
ल गा गा | ल गा गा | ल गा गा | ल गा गा

इथे 'ल गा गा' हा अनुक्रम (pattern) ४ वेळा आला.

सुन्या सुन्या मै | फिलीत माझ्या | तुझेच मी गी | त गात आहे
ल गा ल गा गा | ल गा ल गा गा | ल गा ल गा गा | ल गा ल गा गा

इथे 'ल गा ल गा गा' हा अनुक्रम ४ वेळा आला.

तुमच्या लक्षात आलं का, की या पुनरावृत्तीमुळेच हे काव्य लयीत वाचता येतं?

हे लक्षात आलं, की वृत्त म्हणजे काय हे समजलंच की तुम्हाला! Happy

जसं गाणं सुरात गाण्यासाठी रागाचं नाव माहीत असणं आवश्यक नसतं, तसंच वृत्तबद्ध लिहीता येण्यासाठी वृत्तांची नावं पाठ करणंही गरजेचं नाही.
हा अनुक्रम ओळखता यायला लागला, की झालं! Happy

(गंमत म्हणून तुम्हाला आवडणार्‍या गाण्यातली एखादी ओळ लिहून बघून त्यातला पुनरावृत्त होणारा अनुक्रम ओळखायचा खेळ खेळून बघायला हरकत नाही, काय?)

आता हे उदाहरण बघा :

हिरवे हिरवे गार गालिचे
(ल ल गा ल ल गा गा ल गा ल गा)

हरित तृणांच्या मखमालीचे
(ल ल ल ल गा गा ल ल गा गा गा)

अरेच्च्या! हे लयीत तर वाचता येतंय. पण मग अनुक्रमाचं काय झालं?

तर अश्या प्रकारच्या वृत्ताला 'मात्रावृत्त' असं म्हणतात. लघु अक्षराची १ मात्रा आणि गुरू अक्षराच्या २.
अश्या कवितेच्या प्रत्येक ओळीतल्या मात्रांची संख्या मोजतात, आणि त्या संख्यांचा एक अनुक्रम पुनरावृत्त होतो.
जसं वरच्या उदाहरणात दोन्ही ओळी प्रत्येकी १६ मात्रांच्या आहेत. (नाही पटत? मोजून बघा! Happy )

वर सांगितलेल्या, लघु गुरूंचा क्रम सांभाळणार्‍या वृत्तांना 'अक्षरगणवृत्त' म्हणतात.

मग आता वृत्ताची भानगड आली ना लक्षात? Happy
पुढच्या पोस्टमधे माहिती करून घेऊ गझलच्या व्याकरणाची.
रदीफ, काफिया, अलामत ही कुठल्या पदार्थांची नावं आहेत ते तरी बघू! Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोडाक्षराचा आधीच्या अक्षरावर आघात होत असेल तर आधीचे अक्षर गुरू होईल
जसे सत्या, सुस्ती, अर्पण, व्यक्त ह्यात 'स', 'सु', 'अ', 'व्य' हे सारे गुरू होतील...>>> अर्रर.. ह्याच्याकडे दुर्लक्ष झाले माझे... मी दुरुस्ती केलिये. आता बरोबर आहे का?

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
गालगागा गालगागा गालगागा गालगा

माझियासा ठी न माझा पेटण्याचा सोहळा
गालगागा गा ल गागा गालगागा गालगा

भटांच्या गझलमध्ये वृत्त नाही असं म्हणण्याचं पातक मी कधीच करणार नाही. फक्त माझं कुठे चुकतयं हेच मी विचारलं Happy

मीही भटांबद्दल तसे म्हणालो नाही पण सरीविणाची ओळ पुर्णतः बरोबर आहे असे समजून जेंव्हा लघु गुरु पाडलेत तेंव्हा मी विचारून घेतलं इथे. मला वाटलं कदाचित लघुगुरु हे गरजेचे नाही दरवेळी गझल मधे.

वृत्त ही नक्की काय चीज आहे? ह्याचा विचार करताना हे सुचलं.... जसंच्या तसं देतेय.

आपल्याच घरातल्या एखाद्या खोलीत वीज असते, दिवाही असतोच.... फक्तं त्या स्विचच्या नानाची %^&*!
तो ही अस अत्रंग की, जाम ऑन होत नाही. म्हणजे खाट खाट वर खाली होतो पण बल्ब काही पेटत नाही.
आणि एकदा का ऑन झाला, की ऑफ होत नाही.... म्हटलं नव्हतं अत्रंग?

काही महत्वाचं काम निघालं त्या खोलीत (अंधारात हं) की.. काय करतो? सोडून देतो? मुळीच नाही. खाट खाट.... *&%^% खाट खाट.... *&%^% खाट खाट.... *&%^% (तबियतदारांनी ह्या फुल्या आपापल्या तब्येतीत भराव्यात).
शेवटी एकदाची "त्याची" ट्यूब पेटते.

तर शब्दांच्या लयीत खेळता येणं, त्याची मजा घेता येणं, शब्दं सुचतानाच एकदम हव्या त्या लयीतच सुचणं..... सॉरी कल्पना शब्दांत उतरतानाच आपल्याला हव्या त्या तालात उतरणं.... हा तो अत्रंग स्विच आहे, गडे हो... तो ऑन व्हावा लागतो.
एकदा का प्रकाश पडला की तो स्विच ऑफ करता येत नाही.

मग? त्यानंतर स्व'छंद', लिहिताच येणार नाही की काय? आमच्या नवकवितांचं काय? (असं कुणी आकांताने (ही) म्हणेल)
सोप्पय! प्रकाश पडलेला असला तरी आपल्याला आंधळी कोशिंबीर खेळता येतेच की नाही? तस्सं!

वीज आहे, बल्ब आहे..... कल्पना आहेत, शब्दं आहेत.... तेव्हा होऊन जाऊद्या... खाट खाट....
-----------------------------------------------------
जान दी, दी हुई उसी की थी
हक तो यह है, के हक अदा न हुआ

Pages