[३] सत्यमेव जयते ! ... पाठीशी शक्ति असेल तोवरच ! : ’विपुलाच सृष्टी’

Submitted by दामोदरसुत on 6 July, 2012 - 04:47

सत्यमेव जयते ! ... पाठीशी शक्ति असेल तोवरच ! :[ब्लॉगचे नाव असते तसे]

’विपुलाच सृष्टी’

"प्रयोग परिवार साधतोय द्राक्षशेतीतून प्रगती:
’एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ' हे संतवचन सत्यात उतरवणाऱ्या 'श्री. अ. दाभोळकर कृषी प्रयोग परिवार' या शेतकर्‍यांच्या गटसमूहाने गेल्या दहा वर्षांपासून प्रगतीचा सुपंथ धरला आहे. नाशिक व सांगली जिल्ह्यांतील एकत्रित तीनशेहून अधिक द्राक्ष उत्पादक, प्रयोगपरिवाराच्या माध्यमातून सातत्याने शास्त्रीय दृष्टिकोनातून गुणवत्तेचा ध्यास घेत दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेत आहेत. त्यामुळेच प्रयोग परिवाराने केवळ आर्थिक उन्नतीच केली नाही तर आमचे आयुष्यच बदलून टाकले आहे, असा भाव या द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो."

योगायोगाने वाचनात आलेल्या वरील बातमीमुळे माझी भूतकाळातील आठवण जागी झाली.

१९७०च्या आसपास 'प्रयोग परिवार'चे संस्थापक श्री. अ. दाभोळकर यांचा एक लेख वाचण्यात आला. माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळी ते गारगोटी विद्यापीठात प्राध्यापक असावेत. त्यांना पत्र लिहिले. त्यांनीही वेळ काढून सविस्तर उत्तर स्वहस्ताक्षरात पाठविले. स्केचेस इ. काढून माती संदर्भातील एक प्रयोग त्यांनी माझ्यासाठी सुचवला होता. लोकांनी प्रयोग करून पाहावेत यासाठीची त्यांची आंतरीक तळमळ त्या पत्रातून स्पष्ट जाणवत होती. तो प्रयोग करणे त्यावेळी शक्य झाले नाही ते नाहीच. याची मला खंत होती. त्यानंतर त्यांचा नि माझा कधीच संपर्क झाला नाही. खूप वर्षे उलटली.
२००० सालाच्या आगेमागे ’विपुलाच सृष्टी’ या त्यांच्या पुस्तक प्रकाशनाची बातमी वाचली आणि पुन्हा त्यांच्या प्रयोगांशी पुस्तकाच्या माध्यमातून तरी जोडले जावे असे वाटले. आमच्या येथे पुस्तक मिळेना. नंतर पुण्यात २००१ नंतर शोध घेतला. तेव्हां एका ठिकाणी मिळाले :
विपुलाच सृष्टी
- श्री. श्री. अ. दाभोळकर, प्रयोग परिवार, १०३, साळोखेनगर, कोल्हापुर.
किंमत रु ६५, पृष्ठे १२३. ऑगस्ट २००० मधील सहावी आवृत्ती. पहिली १९९३-९४ मध्ये निघालेली दिसते. असे असले तरी अनेक दुकानदारांना पुस्तकाचे व लेखकाचे नावही त्यावेळी परिचित नव्हते याचे आश्चर्य वाटले. पण म्हणून या सुटसुटीत पुस्तकाची गुणवत्ता कमी होत नाही.
बागकाम, शेती इ.मध्ये असणार्‍यांनी त्यांच्या कामात वैज्ञानिक दृष्टी कशी बाणवावी आणि त्या दृष्टिकोनातून प्रयोग कसे करावेत याबद्दल सोप्या भाषेत केलेल्या मार्गदर्शनामुळे हे पुस्तक मला आवडले. माझ्या घराभोवतालच्या मर्यादित जागेत मी त्या पुस्तकातील कांही अगदी थोडे छोटे प्रयोग करुन पाहिले. ते माझ्या प्रयत्नांच्या प्रमाणात यशस्वी झाले. त्या पुस्तकाच्या वाचनाने घराभोवतीच्या बागेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्ण बदलला हे मुख्यत: नमूद केले पाहिजे.
त्यांच्या 'प्रास्ताविका'त आणि शेवटच्या मनोगतात दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रात अनेक प्रयोग गट तयार केले आणि त्यांच्यात ही वैज्ञानिक दृष्टी रुजविली. ती वैज्ञानिक दृष्टी रुजविण्यासाठी व प्रयोग परिवाराने जे प्रयोग केले त्याची माहिती देण्यासाठी जे लेख त्यांनी लिहिले, त्यांच्या संकलनातून हे पुस्तक तयार झाल्याचे त्यात नमूद केले आहे. प्रयोग परिवार नुसताच कार्यरत नाही तर खूप प्रगती करतो आहे हे सुरुवातीला दिलेल्या बातमीमुळे समजले आणि दाभोळकरांच्या कष्टांचे चीज झाले असे वाटले.
प्रास्ताविकात ते म्हणतात,
"आधुनिक विज्ञानाची नवी दृष्टी लावून पाहिले तर समृद्धि, सुख व स्वातंत्र्य प्राप्त करण्यास निसर्ग, आपला परिसर, आपले पर्यावरण आपणास अनंत हस्तांनी मदत करावयास तयार आहे हे लक्षात येईल, एवढेच नव्हे तर नवी वैज्ञानिक विद्या मिळविणाऱ्या व्यक्तींना या निसर्गाशी हातमिळवणी करण्याची तंत्रविद्या पण उभी करता येण्यासारखी आहे. ’तुझे आहे तुजपाशी, परी जागा चुकलासी’ अशी आपली स्थिती, दुसऱ्याच्या ज्ञानावर अवलंबून आपले प्रश्न सोडवू पाहाण्याच्या आपल्या वृत्तीमुळे झालेली आहे."
"परदेशात रासायनिक खते, औषधे याविरुद्ध कृषिविचाराची एक वैज्ञानिक लाट आली आहे. ’आपले परिसर, आपले पर्यावरण आपले आपण सुख, समाधान,समृद्धीत राहू’ हा या नव्या चळवळींच्या अग्रदूतांचा महामंत्र आहे."
"एका लहानशा दाखल्याने या क्रांतिची व्यापकता आपल्या लक्षात येईल. शेताच्या बांधावर व शेताशेतांवर माजणारे कॉंग्रेस गवत द्राक्षक्रांतीतील प्रगत शेतकऱ्यांनी गाड्या गाडया गोळा करून आणून नव्या द्राक्षबागा लावतांना चरात तळाशी घातल्या व त्या चरात जोमदार द्राक्षबागा उभ्या करून वर्षभरातच १४ ते १६ टन द्राक्षे घेतली. कॉंग्रेस गवताचे बेणे कमी करता करता त्याच्याकडून आपापली फळझाडे सुधारता येतील, ही नवी दृष्टी केवढी उपकारक ठरणारी आहे!"
पुस्तकाच्या शेवटी मनोगतात ते म्हणतात,
" प्रयोग परिवाराच्या सर्व धडपडीचे मुख्य सूत्र ’आपण प्रयोग करू या’ हे आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नवनवीन आव्हाने सोडविण्यास अशी प्रयोगबुद्धीच नेमके सहाय्य करू शकते. अशा खऱ्या प्रयोगकृतीशिवाय विज्ञानाच्या जोरावर अनेक अंगी पिळवणूक चालू राहाते याचे कारण आज उपलब्ध असणारे विज्ञान हे चालू ’व्यापारी संस्कृती’चे बटीक बनलेले असते. या व्यापारी
संस्कृतीने विज्ञानाच्या नावावर जाहिरात करून बाजारात आणलेल्या औषधे, खते, शिक्षणपद्धती, बांधकामसाहित्य इ. वस्तू हेच तेवढे विज्ञान अशी बहुतांश सुशिक्षितांची मनोधारणा बनलेली असते."
आज सेंद्रीय शेती, पर्यावरण, प्रदूषण आदींचा खूप बोलबाला झाला आहे. अमीरच्या एपिसोडमुळे तर अधिकच! घराघरातून याबद्दलचा संदेश त्यामुळे पोचला आहे. पण ज्यावेळेस या कामाला कांहीच प्रतिष्ठा नव्हती, उत्पादनवाढ हेच मुख्य उद्दिष्ट होते अशा काळात ज्यांनी खूप महत्वाचे पायाभूत असे उपयुक्त कार्य केले अशा व्यक्तीच्या कार्याच्या स्मरणार्थ हा लेख!

गुलमोहर: 

दासू, अ‍ॅनाकोंडा, एम आय बी, टर्मिनेटर .... भल्या भल्यांचे सिक्वल चालले नाहीत.... तुमच्या पडेल सिनेमाचा सिक्वल कोण बघणार?

घुबड. | 7 July, 2012 - 03:58 नवीन
दासू, अ‍ॅनाकोंडा, एम आय बी,टर्मिनेटर .... भल्या भल्यांचे सिक्वल चालले नाहीत.... तुमच्या पडेल सिनेमाचा सिक्वल कोण बघणार?>>>मास्तुरे आणि कंपु कशाला आहेत.... बघायलाच...:-P

ते शेती करत नाहीत ... हा लेख वाचता वाचता,

शेताच्या बांधावर व शेताशेतांवर माजणारे कॉंग्रेस गवत हे शब्द त्याना भावले... तिथून या शब्दानी त्यांच्या मेंदूत धाग्याचा कोंब तयार केला व हा धागा उगवला. Proud

याचे कारण आज उपलब्ध असणारे विज्ञान हे चालू ’व्यापारी संस्कृती’चे बटीक बनलेले असते.

लेखातील या वाक्याशी सहमत..

@मास्तुरे
नाही. पण आईचे वडील शेतकरी होते . त्यामुळे आजोळी वारंवार जाण्यामुळे असेल कदाचित पण शेतीविषयी एक नैसर्गिक प्रेम. यासंदर्भात कांहीही नवीन वाचले कि मी माझ्या मामांना सांगत असे. मी बागकाम करतो , स्वतःच माळ्याची मदत न घेता.
माझ्या लेखात मी स्पष्टपणे असे लिहिले आहे की -
"माझ्या घराभोवतालच्या मर्यादित जागेत मी त्या पुस्तकातील कांही अगदी थोडे छोटे प्रयोग करुन पाहिले. ते माझ्या प्रयत्नांच्या प्रमाणात यशस्वी झाले. त्या पुस्तकाच्या वाचनाने घराभोवतीच्या बागेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्ण बदलला हे मुख्यत: नमूद केले पाहिजे."

आले आले कंपुगिरी करणारे डुआयडी आले. धागा चालवण्यासाठी आजकाल वादग्रस्त लिहावेच लागते त्याचबरोबर प्रतिसादासाठी कंपुगिरी आणि स्वतःचे आणि दुसर्याचे डुआयडी लागतातच Happy

 

>>> शेताच्या बांधावर व शेताशेतांवर माजणारे कॉंग्रेस गवत . . . कॉंग्रेस गवताचे बेणे कमी करता करता . . ."

अत्यंत निरूपयोगी व अतिशय उपद्रवी व घातक असणारे काँग्रेस गवत समूळ नष्ट करणे अत्यंत अवघड आहे. या गवताची एकदा लागण झाली की ते सर्व शेतच खाऊन टाकते.

मूळ लेखात एका उप्द्रवी वनस्पतीचा नायनाट करण्यासाठी लेखकानेच सुचवलेल्या उपायाबद्दल लिहिले तर वनस्पतीच्या नावावरूनच कंपुकण व्हायरसचा प्रादुर्भाव व्हायला लागला आहे असे वाटायला लागले म्हणुन हा प्रतिसाद मूळ विषयाकडे आणण्यासाठीच!
कांही लोक बागेत कंपोस्ट खड्डा करून त्यात बागेतील कोरडी पाने काटक्या अशा कोरड्या गोष्टींनी तो भरतात आणि मग तो वर माती टाकून बंद करतात. ही पद्धत अयोग्य का ते दाभोळकर त्याच्या शास्त्रीय कारणांसहीत समजावून देतात आणी एक प्रयोगही करून बघायला सांगतात. वनस्पतिजन्य कोरडा कचरा मातीने न झाकता वरून पाणी मारून कुजू दिल्यास हवेतील नत्र वापरून कुजतात; त्यामुळे नत्राची नवी भर मातीत पडते. पावसाळ्यात नियमित पणे पाऊस पडला तर वेगळे पाणी घालावे लागत नाही. तो जमिनीत गाडून कुजवला तर जमिनीतीलच नत्र कुजण्यासाठी वापरतात व खत तयार करतात. त्यामुळे नत्राची नवी भर मातीत पडत नाही. ही बाब फार चांगल्या रीतीने सोप्या प्रयोगासह ते समजावून देतात .

हे उपद्रवी व घातक काँग्रेस गवत अशा तर्‍हेने जमिनीत खड्डा करून त्यात गाडून समूळ नष्ट करता येईल का?

येथे १२ जुलैपासून वसुंधरा महोत्सव होणारेय! मानवाने वसुंधरेची [पृथ्वीची ] जी वाट लावणे चालवले आहे त्याला आपल्या परीने जेव्हढे रोखता येईल तेवढे रोखूयात हाच संदेश देण्याचा त्याचा हेतू आहे.
सेंद्रीय बागकाम/शेती करणे हा त्यासाठी करायच्या अनेक उपायांपैकी एक आहे आणि जवळपास प्रत्येकजण त्यास हातभार लावू शकतो.
दाभोळकरांच्या 'विपुलाच सृष्टी'चा हाच तर संदेश आहे.
वनस्पतिजन्य कोरडा कचरा मातीने न झाकता वरून पाणी मारून कुजू दिल्यास हवेतील नत्र वापरून कुजतात; त्यामुळे नत्राची नवी भर मातीत पडते. पावसाळ्यात नियमित पणे पाऊस पडला तर वेगळे पाणी घालावे लागत नाही. तो जमिनीत गाडून कुजवला तर मात्र जमिनीतीलच नत्र कुजण्यासाठी वापरतात व खत तयार करतात. त्यामुळे मातीत नत्राची भर पडत नाही.
याउलट
बागेत कंपोस्ट खड्डा करून त्यात बागेतील हिरवी पाने, बारक्या हिरव्या काटक्या अशा हिरव्या गोष्टींनी तो भरून मग तो वर माती टाकून बंद करून पाणी मारून ओला ठेवल्यास लवकर कुजतो. यावेळी हिरव्या वनस्पतीतीलच नत्र वापरले जाते त्यामुळे नत्राची नवी भर मातीत पडते. पावसाळ्यात नियमित पणे पाऊस पडला तर वेगळे पाणी पण घालावे लागत नाही.
थोडक्यात दाभोळकर एक अगदी सोपे तत्व सांगतात की -
सेंद्रीय खत करायचे तर वनस्पतिजन्य कोरडा कचरा मातीने न झाकता वरून पाणी मारून कुजवा ; याउलट हिरवा कचरा मातीने झाकून वरून पाणी मारून कुजवा.

हे इतर लोकांना शिकवा आधी.. दुसर्याला बोला. काहीजणांना इथे काँग्रेस हे नाव दिसल्याबरोबर थरथराट होतो. जळीस्थळी त्यांना तेच दिसते. काँग्रेस फोबिआ २००२ पासुन झालेला आहे. Lol

>>> थोडक्यात दाभोळकर एक अगदी सोपे तत्व सांगतात की -
सेंद्रीय खत करायचे तर वनस्पतिजन्य कोरडा कचरा मातीने न झाकता वरून पाणी मारून कुजवा ; याउलट हिरवा कचरा मातीने झाकून वरून पाणी मारून कुजवा.

म्हणजे थोडक्यात सांगायचं तर घातक वनस्पती व कचरा, ओला असो वा कोरडा, तो कुजवा आणि नंतरच त्याचा शेतासाठी उपयोग होईल. जिवंतपणी किंवा वाळल्यावर सुद्धा, न कुजवलेले काँग्रेस गवत उपद्रवच देणार. काँग्रेस गवतासारखा अत्यंत उपद्रवी व घातक कचरा हिरवा असताना समूळ उपटून खड्ड्यात गाडा व त्यावर पाणी ओतून खड्डा बुजवून कुजवा. हेच काँग्रेस गवत वाळलेले असेल तर नुसतेच उपटून खड्ड्यात न गाडता वरून पाणी मारून कुजवा.

श्री.दामोदरसुत....

"प्रयोग परिवार" आणि 'अ‍ॅग्रोवन' यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर भागात वारंवार अशा कृषिविषयक प्रत्यक्ष चाचण्या होत असतात आणि या भागात जरी ऊसासारख्या 'हमखास चलन' पिकाने जवळपास सारी शेतजमीन व्यापली असली तरी 'झाडे लावा, झाडे जगवा' सारखे प्रकल्प आणि सेन्द्रीय खतांची उपयुक्तता याकडे शेतकरीवर्गच नव्हे तर साखर कारखाना संचालकांचेही चांगले लक्ष गेल्याने श्री.दाभोळकरांना अपेक्षित असलेली 'विपुलाच सृष्टी' आज ना उद्या या जिल्ह्यातही साकारली जाईल याबद्दल माझ्या मनी (जरी मी शहरी नागरीक असलो तरी) शंका नाही.

नाशिक जिल्ह्यात 'प्रयोग परिवारा'ने केलेल्या अथक परिश्रमामुळे 'द्राक्ष बागायती' ची गोड फळे आज त्या भागातील शेतकरी घेत आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती मला प्रत्यक्ष पुस्तकापेक्षा 'अ‍ॅग्रोवन' च्या अंकातूनच मिळाली (ऑनलाईनही आहेच) ती वाचत असताना दाभोळकर सरांनी केवळ कागदोपत्री संकल्पना न मांडता त्या प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी कार्यकर्त्यांची जी फळी उभी केली आहे त्याबद्दल तर त्याना अधिक श्रेय दिले पाहिजे.

दुर्दैवाने 'सेन्द्रीय खत' संकल्पनेला केन्द्र आणि राज्य सरकारही... त्यातही मंत्रालयातील एसीमधील अधिकारी.. 'बोल बच्चन' गिरीच करीत असल्याचे नैराश्यजनक चित्र समोर येत आहे. देशातील शेतीसाठी केन्द्र सरकार "खत" सबसिडीच्या नावे प्रतिवर्षी सुमारे ८० हजार कोटी खर्चे करते. महाराष्ट्राला त्यात ११% वाटा मिळतो....म्हणजे साधारणः आठ ते सव्वा आठ हजार कोटी गृहित धरू या. पण आजमितीला राज्य शासन ही सारी सबसिडी खत कंपन्याच्या दारात आणून टाकते (आमीर खानच्या एपिसोडमधील 'ते' खतनिर्मिती डायरेक्टर आठवत असतील तुम्हाला....विशेषतः त्यांची ती "आम्ही जे करतोय ते बरोबरच...' भाषा).

ट्रॉम्बेच्या टाटा फंडामेन्टल रीसर्च इन्स्टिट्यूटने काही वर्षापूर्वी (आत्ता नेमके साल आठवत नाही...) घनकचर्‍यापासून खत निर्मितीचा एक सविस्तर प्रोजेक्ट....अर्थात तज्ज्ञांकडून....शासनाला सादर केला होता. त्यात असे मांडले होते की प्रतिवर्षी साधारणतः ८०० कोटी खर्च केल्यास राज्यातील सर्व प्रकारच्या शेतीसाठी सेन्द्रीय खत अगदी मोफत पुरविणे शक्य आहे. पण....असले 'मोफत' पॅकेजीस सरकारी बाबूला का पसंत पडत नाहीत, यावर चर्चा करण्यातही अर्थ नसतो. ८०० कोटी म्हणजे राज्याला मिळणार्‍या केन्द्र सबसिडीपेक्षाही कितीतरी कमी रकमेत सेन्द्रीय खताची निर्मिती होऊ शकते, इतपत तरी तज्ज्ञांनी दाखविले होते. केन्द्र सरकारनेही किमान प्रायोगिक तत्वावर तर एखाद्या विभागापुरती देशातील कोणत्याही (अगदी ईशान्येकडील छोट्या) राज्यात राबविली तरी चालेल; आणि मग त्यातून निष्पण्ण होणारे 'प्रोज् अ‍ॅण्ड कॉन्स' विचारात घेऊन सेन्द्रीय खताबाबत पुढील कार्यवाही व्हावी यासाठी दाभोळकरांसारख्या अनेकांनी पत्रापत्री केली होती......पण संबंधित विभागाकडून प्रत्युत्तराची एक माशीही त्या कार्यालयातून उडाली नाही....हे या चळवळीचेच दुर्दैव म्हणावे लागेल.

तुम्ही लेखात आणि अन्य प्रतिसादात या संदर्भात मांडलेली मते वैयक्तिक पातळीवर जरी अनेकांनी घेतली तरी त्यातून काही चांगले निकाल येत आहेत असे दिसत गेले तरी त्या अनुषंगाने शासकीय पातळीवर अशा जागा दाखविण्यासाठी 'प्रयोग परिवार' आणि अ‍ॅग्रोवन पुढाकार घेत राहील असे त्यांच्या परंपरेवरून वाटते.

अशोक पाटील

याआधी दाभोळकरांनी सांगितलेले खालील तत्व उद्धृत केले होते.

बागेत कंपोस्ट खड्डा करून त्यात बागेतील हिरवी पाने, बारक्या हिरव्या काटक्या अशा हिरव्या गोष्टींनी तो भरून मग तो वर माती टाकून बंद करून पाणी मारून ओला ठेवल्यास लवकर कुजतो. यावेळी हिरव्या वनस्पतीतीलच नत्र वापरले जाते त्यामुळे नत्राची नवी भर मातीत पडते.

यातही पावसाळ्यासाठी त्यांनी आणखी एक पर्याय सांगितला आहे.
या पर्यायात वनस्पतीच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर केलेल्या चरवजा आळ्यात जर हिरवा काडीकचरा टाकला आणि पाऊस जर नियमितपणे पडत असेल तर मातीने झाकून टाकण्याची आवश्यकता नाही. यामुळे झाडाला मिळणारे फायदे हे मातीने चर झाकून मिळणार्‍या फायद्यांपेक्षा कसे वेगळे असतात तेही दाभोळकरांनी सोप्या भाषेत विषद केले आहे.
सध्या पावसाळा चालू आहे. बागकामात कुंड्यांमध्ये पालेभाजांच्या काड्यांवर हे प्रयोग अगदी छोट्या प्रमाणात देखील करून बघता येतात असा माझा अनुभव आहे.
माबोवर बागकामात रस घेणारे अनेक जण दिसतात. त्यांच्यापैकी अनेकांनी असे प्रयोग केले असतील. मोठ्या शहरांमधून बायोकल्चर सारख्या पावडरी देखील किरकोळीने मिळू शकतात. त्यांचे सेंद्रीय बागकामाचे अनुभवही वाचायला आवडतील.

@अशोक

आपण सेंद्रीय खतांसंदर्भात सरकारी धोरणांबद्दल दिलेल्या बहुमोल माहितीबद्द्ल धन्यवाद! कोल्हापूर जिल्ह्यात मात्र सेंद्रीय शेतीबाबत आस्था निर्माण होते आहे हे आशादायक आहे. दाभोळकरांचा पुस्तकात दिलेला पत्ता कोल्हापूरचाच आहे. ते आता कोठे असतात याची कल्पना नाही.

>>नाशिक जिल्ह्यात 'प्रयोग परिवारा'ने केलेल्या अथक परिश्रमामुळे 'द्राक्ष बागायती' ची गोड फळे आज त्या भागातील शेतकरी घेत आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती मला प्रत्यक्ष पुस्तकापेक्षा 'अ‍ॅग्रोवन' च्या अंकातूनच मिळाली (ऑनलाईनही आहेच) ती वाचत असताना दाभोळकर सरांनी केवळ कागदोपत्री संकल्पना न मांडता त्या प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी कार्यकर्त्यांची जी फळी उभी केली आहे त्याबद्दल तर त्याना अधिक श्रेय दिले पाहिजे.<<

आजही 'प्रयोग परिवार' कार्यरत आहे फक्त दाभोळकरांचे नाव लेऊन फक्त हे मला 'अ‍ॅग्रोवन' मधूनच समजले आणि त्यामुळे सुमारे दहा वर्षांपूर्वी घेतलेल्या 'विपुलाच सृष्टी' ची आठवण झाली. कार्यकर्त्यांच्यात विज्ञानदृष्टी आणण्यासाठी मार्गदर्शनासाठी लिहिलेल्या लेखांचाच पुस्तकात समावेश असल्याने प्रयोग परिवाराने केलेल्या कामाचे उल्लेख आलेले आहेत्.

>>आजमितीला राज्य शासन ही सारी सबसिडी खत कंपन्याच्या दारात आणून टाकते (आमीर खानच्या एपिसोडमधील 'ते' खतनिर्मिती डायरेक्टर आठवत असतील तुम्हाला....विशेषतः त्यांची ती "आम्ही जे करतोय ते बरोबरच...' भाषा).<<

यावरून दाभोळकरांच्या खालील टिप्पणीची आठवण व्हावी. -

खऱ्या प्रयोगकृतीशिवाय विज्ञानाच्या जोरावर अनेक अंगी पिळवणूक चालू राहाते याचे कारण आज उपलब्ध असणारे विज्ञान हे चालू ’व्यापारी संस्कृती’चे बटीक बनलेले असते. या व्यापारी
संस्कृतीने विज्ञानाच्या नावावर जाहिरात करून बाजारात आणलेल्या औषधे, खते, शिक्षणपद्धती, बांधकामसाहित्य इ. वस्तू हेच तेवढे विज्ञान अशी बहुतांश सुशिक्षितांची मनोधारणा बनलेली असते
."

श्री.दामोदरसुत....

तुम्ही "विपुलाच..." बद्दल लिहिताना दाभोळकरसरांचा कोल्हापूरातील पत्ता दिला आहे, तो त्या प्रकाशनसंस्थेचा आहे. अर्थात सर तिथे नेहमी येजा करीत असतात हे खरेच.

प्रत्यक्ष निवृत्तीनंतर सर आता सातार्‍यात राहतात.
पत्ता :
प्रा. श्री. अ. दाभोळकर
पत्ता : 'सहज', 51 प्रतापसिंह हौ.सोसायटी, सातारा.
(मोबाईल वा लॅण्डलाईन लागलीच मिळू शकला नाही. पण तुम्हाला हवा असल्यास मी जरूर मिळवून देईन.)

अशोक पाटील

@अशोक
सरांचा पत्ता दिल्याबद्दल धन्यवाद! फोन नं वा ई मेल पत्ता मिळाल्यास जरूर द्यावा. मी त्यांना मेल वर लिहीन. पत्रामधून मला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होता येते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

दासू,

धन्स ! एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्या बद्द्ल !

अशोक साहेब ,

१०० % अनुमोदन !

टाटा फंडामेंटल च्या प्रोजेक्टबद्दल माहिती होतीच पण आज जाणवले की सरकारी निष़्क्रीयता आड आली.

भारत सरकार+ ईफ्को व क्रूभको + ओमान शासन यांनी, ओमान मध्ये उरीयाचा प्रोजेक्ट २००३ साली
लावला आणि २००५- ६ ला तो चालु झाला. त्या प्रोजेक्ट मध्ये दिवसाला २५३० ट्न उरीया उत्पादन होते.
संपुर्ण उत्पादन १५ वर्षांसाठी फक्त भारत सरकारलाच विकावे लागेल. ह्या प्रोजेक्ट मध्ये भारताने ५४००
कोटीचा निवेश केला आहे.

जेंव्हा जग सेंद्रिय पदार्थांकडे जात असताना सुद्धा भारत सरकार ने असे निर्णय घ्यावे ह्या बद्द्ल आश्चर्य वाटते.

पाकिस्तानात असा प्रयोग जोर धरू लगला आहे. तेथिल शहरात काही लोक घरो घरी जाऊन कचरा गोळा
करतात व अश्या सेंद्रिय खत बनव णार्या कंपन्याना विकतात. त्या मुळे शहर अनायास स्वच्छ रहायला
मदत होते.

रेफः http://www.aljazeera.com/news/asia/2011/12/201112193155297451.html

>>अरुण देशपांडेही असे प्रयोग करतात ना?<<
असे वाचनात आले आहे. पण 'विपुलाच सृष्टी' वरूनच मी मार्गदर्शन घेतले आहे.
@विवेक नाईक
धन्यवाद. सेंद्रीय खतांबाबत शासकीय अनास्थेविषयी श्री अशोक यांनी लिहिले होतेच. आता आपण आणखी एक उदाहरण आपण दिले आहे ते खूप बोलके आहे.

या लेखाच्या एका वाचकाने विचारले, "त्या पुस्तकाच्या वाचनाने घराभोवतीच्या बागेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्ण बदलला असे आपण लिहिता. म्हणजे नेमके काय झाले?"

हा फार चांगला प्रश्न आहे. फार लांबण न लावता दृष्टिकोन कसा बदलतो याचे फक्त एकच उदाहरण देतो.

हे पुस्तक वाचण्याआधी बागेत कोठेही गवत वाढले की मी अस्वस्थ व्हायचो आणि तातडीने ते काढून टाकायचो, जणू कांही गवत म्हणजे बागेचे शत्रूच! कांही कारणाने काढण्यास उशीर झाला तर हे गवत आपल्याला हव्या असलेल्या वनस्पतींचे अन्न फ़स्त करते आहे असे वाटायचे. पण ’तण देई धन’ असे एक प्रकरणच पुस्तकात दिले आहे कि जे वाचून मला गवताविषयी वाटणारी अवाजवी काळजी दूर झाली.
वनस्पतीच्या कोठल्या भागात वनस्पतीला लागणारी कोणती द्रव्ये असतात ते त्यात दिले आहे. गवत सर्वत्र उगवते. ते जमिनीत खाली गेलेले विखुरलेले अन्नघटक वापरून वाढते आणि ते गवत उपटून आपण खताच्या खड्ड्यात टाकून मातीने झाकले की झाले. जणू गवताने ते सर्व घटक गोळा करून आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. आणि ते जरूरीप्रमाणे हवे तिथे , हवे त्या प्रमाणात वापरण्याची सोयच केली आहे. मग गवत काढण्यात थोडे पुढे मागे झाले तरी काही बिघडत नाही.
दाभोळकर लिहितात, " एक मोठी रासायनिक प्रयोगशाळेची व्यवस्थाच प्रत्येक वाढ्णाऱ्या वनस्पतीच्या स्वरूपात आपणास तिचा उपयोग करण्यास खुणावित असते."