“ पुणे ते पानिपत ” भाग ७ : “हिंदुस्थानच्या किल्ल्यांच्या कंठनहारामधील मोती” अर्थात ग्वाल्हेरचा किल्ला

Submitted by सारन्ग on 5 July, 2012 - 06:56

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449

“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884

“ पुणे ते पानिपत ” भाग ६ - http://www.maayboli.com/node/35939

हा भाग सुरु करण्यापुर्वी सर्वांची मनापासून माफी मागतो, हा भाग टाकायला बराच उशीर झाला. पण खरं सांगायचं तर कागदाचे तुकडे गोळा करता करता मनातील कागदावर उतरवायचं राहूनच जातं. वेळ मिळाला तेव्हा ग्वाल्हेरच्या किल्ल्याबद्दल वाचायला घेतलं आणि मग त्यातचं गुरफटून गेलो.

नववा दिवस : ११ जानेवारी २०१२

ग्वाल्हेर – धौलपुर – आग्रा

जाग आली, तेव्हा गुरुजी सगळ्यांना उठवत होते. मला देखील त्यांनी उठवलं, मी आपलं नेहमीप्रमाणे ह्म्म्म, उठतोय म्हणत अंथरुणातच पडून होतो. डोळे उघडल्यानंतर पण गुलाबी थंडीत अंथरुणातच पडून राहायची मजा काही वेगळीच. आता, गुरुजींचा सगळ्यांना उठवण्याचा दुसरा राउंड चालू झाला होता.

गुरुजी, रोज एवढ्या सगळ्या लोकांना ३ वेळा उठवायचे, त्याचे असे भाग पडायचे.

पहिला राउंड – उठ, रे बाळा, सकाळ झाली – प्रेमपूर्वक
दुसरा राउंड – अंगावरच पांघरून ओढून काढून – थोडसं कठोर होत.
९०% जनता पहिल्या दोन राउंड नंतर उठायची, आमच्या सारखे आळशी नगं तिसऱ्या राउंडची डोळे किलकिले करून वाट पाहत असायचे.
तिसरा राउंड – एका बाटलीत पाणी भरून आणत... पुढचं सुज्ञास सांगणे न लगे

हा राउंड सुरु झाला कि आम्ही झोपलेल्या सभागृहात हल्लकल्लोळ सुरु व्हायचा.
गुरुजी, उठलोय उठलोय
नको नको
आले पळ, पळ
पाणी नका टाकू हो, थंडी वाजतेय
असे एकाहून एक आवाज एकू येत असत.
कानात पाण्याचा एक थेंब जरी गेला, तरी झोप कशी मोडते याचा आपल्या सर्वाना चांगलाच अंदाज असेल.
रोज एवढ्या सगळ्या लोकांना ३ वेळा उठवणाऱ्या त्या अवलियाच कौतुक करवा तेवढं थोडंच.

परत सगळी आवराआवर झाली. गुरुद्वारात परत एकदा आमचा माथा टेकणे कार्यक्रम पार पडला.

गुरुद्वारा दाता बंदी छोड विषयी थोडेसे :
ग्वाल्हेर या किल्ल्यावर "दाताबंदी छोड" नावाचे संगमरवरी दगडाचे एक गुरुद्वारही आहे. शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग यांचे स्मारक म्हणून या गुरुद्वाराचे बांधकाम करण्यात आले. जहांगिरने येथे शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग यांना कैदेत ठेवले होते आणि इथेच त्यांची त्या करण्यात आली, म्हणून या गुरुद्वाराची स्थापना केली गेली.
गुरुद्वारा दाता बंदी छोड:
7DSCN2904.JPG

आता किल्ला बघायला सगळेजण निघालो. आज सगळ काही भरभर आवरायचं होत. काहीही करून आग्र्याला संध्याकाळ व्हायच्या आत पोहोचायचं होतं. पहिल्यांदा आग्र्याचा किल्ला बघायचा का ताजमहाल बघायचा याविषयी अजून कुणाच्यातच एकमत झाल नव्हतं. तरीही शक्य तेवढ्या लवकर आग्रा गाठण क्रमप्राप्त होतं.

ग्वाल्हेर विषयी थोडेसे :
मध्य प्रदेश मध्ये वसलेले एक शहर. हे शहर आग्र्याच्या दक्षिणेस १२२ किमी वर तर भोपाळ या मध्य प्रदेश च्या राजधानीपासून ४२३ किमी अंतरावर आहे.
ग्वाल्हेर शहराचे नाव ३ कि.मी. लांब व ९० मी. उंच अशा पठारी टेकडीवर बांधलेल्या ऐतिहासिक दगडी गढीमुळे पडले. पूर्वी ‘गोपपर्वत’,‘गोपाचल दुर्ग’, ‘गिपगिरी’ किंवा ‘गोपदिरी’ अशी नावे होती. या सर्वांचा अर्थ ‘गुराख्यांची टेकडी’ असा होतो. या शहराला अतिशय प्राचीन असा इतिहास आहे. हे शहर ग्वाल्हेर किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे
.
ग्वाल्हेर किल्ल्याविषयी थोडेसे:
जमिनीपासून साधारणतः तीनशे फूट उंचीवर हा किल्ला बांधण्यात आला आहे. पावणे दोन मैल लांबी आणि २८०० फूट रुंदी असलेल्या या किल्ल्याची तटबंदी ३५ फूट उंच आहे. किल्ल्याच्या उत्तरेला स्वर्णरेखा नदीचे खोरे, तर पश्चिमेला उखाही नावाची खोल दरी आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला ग्वाल्हेर शहर पसरलेले आहे. ग्वाल्हेरच्या या किल्ल्याला पूर्व बाजूने एक आणि पश्चिम बाजूने दोन दरवाजे आहेत. हा किल्ला पूर्व बाजूने चढावयाचा झाल्यास दगडी चढ चढावी लागले कारण या बाजूने पायर्‍यांऐवजी जवळजवळ अडीच हजार फूट दगडी चढणीचाच रस्ता आहे.या चढावाच्या शेवटी सहा संरक्षक दरवाजे अणि चौक्या आहेत. "अलमगिरी दरवाजा", "हिंदोला दरवाजा" किंवा "बालगड पोल" , "भैरव दरवाजा", "गणेश पोल", "लक्ष्मण पोल", "हाती पोल" नावांनी ते ओळखले जातात.
7DSCN2905.JPGबघण्यासारखी ठिकाणे:
मन मंदिर राजवाडा / जहांगीर महाल / करण राजवाडा
गुजरी महाल ( सध्याचं पुरातत्व संग्रहालय )/ शाहजहान राजवाडा

किल्ला ३ वर्ग किमी परिसरात विस्तारलेला आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी २ मुख्य प्रवेश्वारे आहेत एक उत्तर-पूर्व बाजूला (हाती पोल) आहे तर दुसरे दक्षिण-पश्चिम बाजूला आहे. किल्ल्याच्या दक्षिण बाजूला खडकांमध्ये कोरलेल्या २१ जैन तीर्थंकारांच्या मूर्ती आहेत. यामध्येच एक पार्श्वनाथांची ( २३ वे जैन तीर्थंकार) ४० फुटाची मूर्ती आहे.

हाती पोल – हत्ती दरवाजा – हा दरवाजा किल्ल्यात प्रवेश करणाऱ्या दरवाजांनमधला सगळ्यात शेवटचा म्हणजे ७वा दरवाजा. या दरवाजातून हत्ती सहज ये जा करू शकत म्हणून हाथी पोल.

किल्ल्याचा बाहेरील भाग , एकदम कोपऱ्यात हत्ती दरवाजा दिसतोय:
7DSCN2910.JPG7DSCN2912.JPGहत्ती दरवाजा :
7DSCN2916.JPG

फक्त हत्ती दरवाजाचा मला फोटो घ्यायचा होता पण कारटी बाजूला होतील तर शपथ :
7DSCN2917.JPGशेवटी एकदाचं प्रयत्नांना यश आलं - हत्ती दरवाजा :
7DSCN2921.JPG

ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील अनेक मंदिरांपैकी "मानसालबहू" मंदिर आणि "तेली मंदिर" विशेष प्रसिद्ध आहेत. त्यापैकी ऐंशी फूट उंच व तीस फूट लांब असलेले तेली मंदिर उभट आकाराचे आहे. त्याच्या कडांना सिंहमुखे आहेत आणि त्याच्या वेदीबंधावर शिवाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत."सासबहू" किंवा "सहस्त्रबाहू" नावाने ओळखले जाणारे आणखी एक भव्य मंदिर ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर आहे. सासू-सूनेची मंदिरे म्हणून प्रसिद्ध असणार्‍या या मंदिरांपैकी मोठे मंदिरजमिनीपासून बारा फूट उंच चबुतर्‍यावर बांधले असून या मंदिराची लांबी शंभर फूट तर रुंदी त्रेसष्ट फूट आहे. हत्ती, फुले, वृक्ष, कुंभकळस, कीर्तिमुख आदि प्रकारचे सुंदर नक्षीकाम त्यावर पहायला मिळते. मंदिराचे छतही पहाण्यासारखे आहे या मंदिराच्या अर्ध्या मंडपाला कमळाच्या फुलाचा आकार दिला आहे. तर सभामंडपाच्या छतावर मधुछत्र कोरले आहे. आकाशातून विहार करणार्‍या गंधर्वांच्या मूर्तीही या ठिकाणी पहायला मिळतात. सासबहू मंदिरापैकी छोटे मंदिर सहा फूट उंच चबुतर्‍यावर बांधलेले असून ते शंभर फूट लांब आणि तेवीस फूट रुंद आहे. बारा स्तंभावर उभ्या असलेल्या या मंदिराच्या स्तंभांच्या वरच्या भागात निरनिराळी वाद्ये वाजविणार्‍या अप्सरा कोरलेल्या आहेत तर स्तंभाच्या पायाशी पद्मासन घातलेल्या गणेश मूर्ती कोरलेल्या आहेत.

या ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर हिंदू राजांनी बांधलेले पाच राजवाडे व मुसलमान राजांनी बांधलेले दोन राजवाडे आहेत. त्यापैकी हातीपोल दरवाजातून आत गोल्यावर दिसणारा मानमंदिर राजवाडा अप्रतिम आहे. तीनशे फूट लांब व एकशे साठ फूट रुंद असा हा राजवाडा राजा मान सिंगने सन १५०८ मध्ये बांधला आहे. दोन भागात विभागलेल्या या राजवाड्याच्या एका भागात राजा व त्याचा परिवार तर दुसर्‍या भागात त्याचे नोकरचाकर रहात.राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर दोन उंच मनोरे व त्यावर घुमट आहेत. या राजवाड्याला चार प्रमुख स्तंभ असून त्यावर एक मोठा घुमट उभारलेला आहे. वाड्याच्या भिंतीवर निळ्या पिवळ्या फरशांतर्गत छान कोरीव काम केलेले आहे. राजवाड्याच्या खिडक्या अर्ध अष्टकोनी असून त्यावरही छान नक्षीकाम केलेले आहे. सात मजले असलेला हा राजवाडा अनेक शिल्पे, चित्रे, नक्षीकाम,कमानी, खिडक्यांच्या सुंदरजाळ्या यांनी नटलेला आहे. या ग्वाल्हेरच्या किल्ल्यात मानससरोवर तलाव, सूरजकुंड तलाव, जोहार तलाव, कटोरा तलाव, सासबहू तलाव असे अनेक तलाव तसेच गुजरी बावडी, अनार बावडी, शरद बावडी नावाच्या विहिरी विपूल पाण्याने भरलेल्या आहेत. ( हा भाग आंतरजालावरून साभार )

इ.स. १२३२ मध्ये जेव्हा किल्ला पडला तेव्हा किल्ल्यातील राजघराण्यातील स्त्रियांनी जोहार कुंडामध्ये उडी घेऊन प्राण त्यागले.

या किल्ल्याच्या गौरवार्थ भारतीय पोस्ट खात्याने टपाल तिकीट सुद्धा छापले आहे ( आमचा रायगड मात्र तसाचं ) ऐतिहासिक कागदपत्र चाळली असता किल्ल्याचा इतिहास ८ व्या शतकापर्यंत मागे जातो. मुघल बादशहा बाबर ( १४८३-१५३१) तर या किल्ल्याचं “ हिंदुस्थानच्या किल्ल्यांच्या कंठनहारामधील मोती ” अस कौतुक करतो. या किल्ल्याला “ भारताचा जिब्राल्टर ”असे टोपण नाव आहे. ( अर्थात हि सर्व माहिती विकीपेडिया वरची आहे, आमच्यासाठी मात्र “ भारताचा जिब्राल्टर ” म्हणजे फक्त आणि फक्त रायगडचं) या किल्ल्यावरून, पूर्वेला वसलेल्या जुन्या ग्वाल्हेर शहराच मस्त दर्शन होतं.

किल्ल्याची बाहेरील बाजू:
7DSCN2918.JPG7DSCN2919.JPG7DSCN2920.JPG

किल्ल्याचा इतिहास मुख्यत्वेकरून दोन भागांशी निगडीत आहे
१. मुख्य किल्ला
२. मन मंदिर राजवाडा आणि गुजरी महाल.

मन मंदिर राजवाडा -
हा राजवाडा हिंदू स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे, हा राजवाडा इ.स. १५०८ मध्ये तोमर राजा मानसिंग तोमरने बांधला. या राजवाड्यामध्ये सगळे मिळून चार चौक आहेत ज्यातील २ चौक भूमिगत आहेत. तळघरामध्ये पाळणाघर, कुंड आणि फाशी स्तंभ आहे. या राजवाड्याची जमिनिपासुनाची उंची ६०० फुट आहे. १६ व्या शतकामध्ये किल्ला मुघल राजवटीखाली आल्यानंतर याचा उपयोग शाही तुरुंग म्हणून केला जाऊ लागला.
मुख्य किल्ला सर्वात पहिल्यांदा तोमर सत्तेवर असताना बांधला गेला.
दुसरा भाग मन मंदिर राजवाडा आणि गुजरी महाल ( सध्याचं संग्रहालय ) राजा मानसिंग तोमरने त्याची लाडकी राणी मृगनयनी हिच्यासाठी १५ व्या शतकामध्ये बांधला.

गुजरी महाल ( सध्याचं संग्रहालय ):
7DSCN2925.JPG

किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात प्रथम शून्य (०) या संकल्पनेचा वापर याचं किल्ल्यात केला गेला. पठाराच्या पूर्वेला असलेल्या ९व्या शतकातील हिंदू मंदिरामध्ये याचा वापर केला गेला आहे.
हे भारतातील सर्वात पहिल्यांदा वापर करण्यात आलेले शून्य आहे असे म्हणतात ज्याच्यासाठी एक ठराविक काळ ग्राह्य धरण्यात येऊ शकतो.

मन मंदिर राजवाड्याची बाहेरील बाजू:
7DSCN2915.JPGमन मंदिर राजवाड्यामधील चौक :
7DSCN2931.JPG7DSCN2937.JPG7DSCN2938.JPG

खालील चित्रात जसा हत्ती दिसत आहे तसे प्रत्येक चौकात वेगवेगळे प्राणी असतात, तेच चौक ओळखायची खूण:
7DSCN2934.JPG

ग्वाल्हेर या शब्दाची निर्मिती “गावल्पा” ( काही ठिकाणी सेज ग्वालीप असा देखील उल्लेख आहे) या संतामुळे झाली. असे म्हणतात, ग्वाल्हेरचा राजा सुरज सेन कुष्ठरोगाने आजारी पडला असता या संताने किल्ल्यावरील सुरज कुंडामधील पाणी वापरून याचा कुष्ठरोग बरा केला व राजाला पाल हे नाव धारण करण्यास सांगितले.
किल्ला ज्या टेकडीवर बांधला आहे तो भाग पूर्णपणे बसाल्ट खडकांचा आहे.
किल्ल्याचा इतिहास मात्र अर्थातच किल्ल्यावर राज्य केलेल्या जुन्या राजपूत राजांकडे जातो.
किल्ल्याची सुरवात इ.स. ५२५ मध्ये झाल्याचे आढळते. मिहीरकुळाचा सम्राट “हून” याने येथे सूर्य मंदिर बांधल्याचे पुरावे आढळतात. स्वेता हून हा इ.स. ५१० मध्ये सत्तेवर होता.
चतुर्भुज मंदिर ( विष्णू मंदिर) जे कि किल्ल्यावर येणाऱ्या वाटेतच लागते ते इ.स. ८७५ मध्ये बांधले गेले होते. हे मंदिर आणि तेली मंदिर यात बरेच साम्य आहे. तेली मंदिर देखील ८व्या शतकात बांधले गेले.

तेली मंदिर :
तेली मंदिर ८व्या शतकात बांधले. हे किल्ल्यावरील सर्वात जुने बांधकाम मानले जाते. हे एक अप्रतिम अस बांधकाम किल्ल्यावर बघायला मिळत. मानदीराची उंची साधारण ३० मी आहे. मंदिराचं छत सगळ्यात प्रथम आपले लक्ष वेधून घेतं.

तेली मंदिराचे प्रवेशद्वार:
7DSCN2951.JPGतेली मंदिर :
7DSCN2943.JPG

ऐतिहासिक संशोधन किल्ल्याचं बांधकाम इ.स. ७२७ ( आता परीकथेमध्ये ते इ.स.२७५ पर्यंत मागं जातं ) स्थानिक मुखिया सूर्य सेन कछवा याने केल्याचं सांगतं. किल्ल्यापासून २० किमी वर असलेल्या सिहोनिया गावाचा हा मुखिया.

आता या कछवा पाल कुळाचा इतिहास :
१. राजा सुरज पाल ने ३६ वर्षे राज्य केले नंतर त्याचा मुलगा
२. रसक पाल १ वर्ष गादीवर राहिला आणि नंतर त्याचा मुलगा
३. नरहर पाल ११ वर्ष सत्तेवर होता. एका शिकारी दरम्यान त्याचा मृत्यू झाला. नरहर पाल ने महादेव मंदिर बांधले आणि नरहर तेला गाव वसवले.
४. या नंतर अमर पाल सत्तेवर आला आणि नंतर त्याचा मुलगा
५. भीम पाल ज्याने भीमेश्वर महादेव मंदिर बांधले. भीम पालने ३६ वर्ष राज्य केले. याच्या नंतर
६. गंग पाल सत्तेवर आला. हा २१ वर्ष गादीवर होता. याने प्रसिद्ध गंगोला तलाव बांधला. याचा मुलगा
७. राज पाल १० वर्ष सत्तेवर होता.
८. याच्यानंतर भोज पाल सत्तेवर आला, जो कि ९ वर्षे सत्तेवर होता, याने चतुर्भुज रायचे मंदिर, भगवान कृष्णाचे शिल्प बनवले. हे शिल्प एकाच दगडामध्ये कोरल्यामुळे प्रसिद्ध आहे. याच्यानंतर याचा मुलगा
९. पद्म पाल गादीवर आला, ज्याने ९ वर्षे सत्ता स्वतः कडे ठेवली. याने लक्ष्मी-नारायण शिल्पाची निर्मिती केली. याच्यानंतर
१०. अनंग पाल गादीवर आला. असे म्हणतात हा सेज ग्वालीपला भेटला, ज्याच्यामुळे त्याच्या कुळाला चांगले दिवस आले होते. सेज ग्वालीपने याला सामान्य धातूंपासून सोने बनवायचे ज्ञान दिले. याच्या कारकीर्दीमध्ये ५ तोळा सोन्याची नाणी चलनात होती.
११. याच्यानंतर इंद्र पाल गादीवर आला, हा सुमारे ३ वर्षे सत्तेवर होता. हा प्रजाजनांनमध्ये अप्रिय होता. याच्यानंतर
१२. जीत पाल गादीवर आला, याने सुमारे १४ वर्षे राज्य केले. जीत दुर्ग मंदिर हे याच्याच कालावधीमध्ये बांधले गेले. याच्यानंतर
१३. बसंत पालने १७ वर्षे राज्य केले.
१४. धुंद पाल ११ वर्षे सत्तेवर होता.
१५. यानंतर लक्ष्मण पाल फक्त ४ वर्षे गादीवर आला आणि नंतर त्याचा मुलगा
१६. नहर पाल सुद्धा फक्त २ वर्षे गादीवर होता.
१७. भंडार पाल याने सुमारे ११ वर्षे राज्य केले, यानेच भांडेर किल्ला बांधला.
१८. याच्यानंतर याचाच मुलगा अजाझ पालने ९ वर्षे राज्य केले.
यानंतर अनुक्रमे असपाल, सीस पाल , भोज पाल, भैरोन पाल, गुणपत पाल, चौरा सुख पाल, गावू मुंत पाल, नागीश पाल, बुद्ध पाल, मध पाल, बीर पाल, कांत पाल, किरात पाल, दानी पाल, भीप पाल हमीर पाल, चतर पाल, भूमिन्द्र पाल, धीर पाल, नागेंद्र पाल, सुध पाल, सिंधू पाल, मधू पाल, ओवर पाल, बुडनु पाल, जय पाल, संधान पाल, बालभद्रा पाल, गुंधरप पाल, सैज पाल, देवेंद्र पाल, रामचंद्र पाल, धोंदर पाल, सरोमंद पाल, पर्दमन पाल, रसक पाल, दीपक पाल, अनंत पाल, गज पाल, जगदीश पाल, गंजी पाल, रामदेव पाल, सिवानी पाल, हिरचंद पाल, बिरख पाल, तिलक पाल, बिजय पाल, धांदेर पाल, नैन पाल, हरलैक पाल, प्रताप रुद्र पाल, कैसर पाल, असद पाल, इंद्र पाल, मौन पाल, करम पाल, इसार पाल, मोन पाल, सागर पाल, बिशंभर पाल, रतन पाल, धोर पाल, बुध पाल यांनी या किल्ल्यावर राज्य केले.
नाव वाचून कंटाळा आला ना???? पण खरी रंजक माहिती तर यातच आहे.
विचार करा,
पाल वंशाचा आदिपुरुष सुरज पाल पासून ते बुध पाल पर्यंत सुमारे ८४ राजांनी ९८९ वर्षे या पाल राजांनी राज्य केले. या ९८९ वर्षात राज्यावर संकटे नसतील आली ? युद्धे नसतील झाली ? नैसर्गिक आपत्ती नसतील ओढवल्या ? मत्सरी लोकांनी दगाबाजी करायचा प्रयत्न नसेल केला ? अर्थात हे सर्व काही झाले असेलच, पण “पाल” या वंशाने या सर्वाना पुरून उरत चक्क थोडे-थोडके नाही तर तब्बल ९८९ वर्षे सत्ता अबाधित ठेवली. हा या गोष्टीचा भक्कम पुरावा आहे कि या ९८९ वर्षांमध्ये ग्वाल्हेरच्या साम्राज्याने अतिशय सुंदर असे दिवस नक्कीच अनुभवले असणार. अजून जरा नीट बघितलं कि असे दिसून येते कि आपल्याकडे जसे बाजीराव पहिला, बाजीराव दुसरा अशी नामावली असते तसे येथे दिसून येत नाही. विशेष म्हणजे या ८४ राजांपैकी एकाचेही नाव परत दुसऱ्याने धारण केले नाही. “पाल” हे कुटुंब या सगळ्याची नोंद नक्कीच ठेवत असावे असे वाटते.
बुध पालच्या मुलाने पाल हे आडनाव सोडून तेज करण हे नाव धारण केले. आणि सेज ग्वालीपने सांगितल्याप्रमाणे पाल कुटुंबियांच्या वाईट दिवसांना सुरवात झाली.
अंबर (जयपूर) चा प्रमुख रण मूल याच्या मुलीशी तेज करणचा विवाह झाला. विवाहानंतर हत्ती, घोडे आणि अजून बऱ्याच किमती वस्तू घेऊन आलेल्या बायकोकडे तेज करण जास्तचं आकर्षित झाला.
रण मूलने भविष्याचा विचार करून तेज करणला अंबरचे राज्य, तेज करण अंबरला राहूनच राज्य करेल या अटीवर दिले. महत्वकांक्षी असलेल्या तेज करणने अंबरच्या वाढत्या साम्राज्याचा विचार करता या मागणीला लागलीच होकार दिला. ग्वाल्हेर साम्राज्य अंबर साम्राज्याच्या तुलनेत त्या मानाने लहानसे आणि किमती नव्हते. तेज करणच्या अनुपस्थिती मध्ये ग्वाल्हेरचे राज्य राम देव प्रतिहार बघू लागला. दोन वर्षे यशस्वीरित्या व्यवस्थापन केल्यानंतर अधिकृतपणे ग्वाल्हेरचे राज्य त्याला देण्यात आले. असा तऱ्हेने पाल राजांची सत्ता संपुष्टात येऊन प्रतिहार सत्ता उदयास आली.

ग्वाल्हेरचे प्रतिहार राजे:
१. सलाम देव
२. बिक्रम देव
३. रतन देव
४. शोभांग देव
५. प्रमल देव

तुर्की अतिक्रमण:
इ.स. १०२३ मध्ये गझनी चा महमूद याने किल्ला काबीज करायच्या हेतूने आक्रमण केले पण त्याचे आक्रमण परतून लावले गेले. पुन्हा बऱ्याच वर्षांनी, इ.स. ११९६ मध्ये कुतुबुद्दीन ऐबकने किल्ल्यावर ताबा मिळवला. पण इ.स. १२११ ला किल्ल्याचा ताबा गमावला. इ.स. १२३१ मध्ये लुतुमिषने किल्ला बळकावला. जेव्हा तिमुरलेनने जेव्हा दिल्लीवर हल्ला केला होता, त्यावेळेस झालेल्या उठवादरम्यान नरसिंह रावने किल्ला काबीज केला.

तोमर राज्यकर्ते :
राजपुतांच्या तंवर वंशामधील परमल देव आणि अधार देव हे दोघे भाऊ होते. दान्डोर्लीच्या परगाण्यामध्ये असलेल्या इसमामोला गावाचे दोघे रहिवासी. एका काळोख्या रात्री हे दोघे पहारा करत असताना मुसळधार पाऊस सुरु झाला. सुलतान त्याच्या सज्जा मधून या दोघांकडे बघत होता. हे दोघे सिकंदर खानचे सैनिक असूनसुद्धा यांना त्याच्यापासून हिरावून घेतल्यावर देखील हे दोघे अतिशय कर्तव्यदक्षपणे सेवा करत असताना बघून सुलतान या दोघांवर खुश झाला. त्यांनी या दोघांना, त्यांची कोणतीही एक इच्छा पूर्ण करायचे आश्वासन दिले. या दोघांनी अतिशय चतुरपणे, आम्ही खालेल्ल्या मिठाला कायम जागत आलो असताना देखील आमची मुले जंगलामधून भटकतात, तेव्हा त्यांच्यासाठी एखाद घर दिल तर बरं होईल. अतिशय धूर्तपणे राजपुती पद्धतीने त्यांनी सुलतानाला, आम्हाला आमच्या कुटुंबियांसाठी ग्वाल्हेरचा किल्ला दिला तर फार उपकार होतील अशी याचना केली. या दोघांना दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये बोलावण्यात आले. दरबारामध्ये सुलतानाने अतिशय खुबीने या दोघांना ग्वाल्हेर इनाम म्हणून दिले.
हे दोघे दिलेले सत्तेचे परवानगी पत्र घेऊन वंशपरंपरेने चालत आलेल्या ग्वाल्हेरच्या किल्ल्याचा प्रमुख सय्यदकडे केले, पण सय्यदने त्यांचे हे पत्र फारसे मनावर घेतले नाही, वंशपरंपरेने चालत आलेल्या ग्वाल्हेरच्या किल्ल्याचा प्रमुख हे पद सोडायला तो तयार नव्हता. तरीही या दोघांनी आपले येणे जाने चालूच ठवले आणि सय्यदचा विश्वास संपादन केला. एकदा त्यांनी विश्वास संपादन केल्यानंतर सय्यदच्या कुटुंबाला जेवणासाठी रानीपुरा या गावी बोलावले. जेवणात गुंगीचे औषध मिसळे गेले होते आणि अशा रीतीने सर्वजण गाढ झोपेत असताना, सर्वांची अतिशय थंड रक्ताने हत्या करण्यात आली.

१. परमल देव उर्फ वीर सिंग उर्फ बीर सिंग देव – इ.स. १३७५ – दान्डोर्लीचा जमीनदार : ग्वाल्हेरचा राजा सय्यदची हत्या करून किल्ल्यावर कब्जा
२. उदहरन देव: वीर सिंगचा भाऊ – काही काळ सत्ता याच्या हातात होती.
३. लक्ष्मण देव तोमर
४. विरम देव - इ.स. १४०० : वीर सिंगचा मुलगा
५. गणपती देव तोमर - इ.स. १४१९
६. दुंगर सिंग - इ.स. १४२४ : मध्य भारतातील मुख्य सत्ता म्हणून ग्वाल्हेरचा विस्तार, गणेश दरवाजा याने बांधला.
७. कीर्ती सिंग तोमर - इ.स. १४५४ – मेवारचा राना कुंभ याच्या साथीने मालव्याचा मेहमूद खिलजी विरुद्ध युद्ध केले.
८. मंगल देव – हा कीर्ती सिंगचा मुलगा. तोमरगढच्या अंबा आणि धोद्री भागात १२० गावे याच्या हाताखाली होती. इ.स. १५१६ मध्ये ग्वाल्हेर किल्ला पडल्यानंतर यानेच परत तो जिंकायचा प्रयत्न केला.
९. कल्याणमल्ला तोमर – इ.स. १४७९
१०. मान सिंग तोमर – इ.स. १४८६ – तोमर राजवटीमधील सर्वात महान राजा. संगीतकार आणि दृपत घराण्याचा पिता.
११. विक्रमादित्य तोमर – इ.स. १५१६ ते इ.स. १५१८ - इ.स. १५१८मध्ये इब्राहीम लोदिने किल्ला जिंकला.
१२. रामशहा तोमर – इ.स. १५२६. ग्वाल्हेर मधून हुसकावलेला. हलदीघाटीची लढाई महाराणा प्रताप बरोबर लढला.
१३. सालीवाहन तोमर – इ.स. १५७६ – हा सुद्धा हलदीघाटीची लढाई महाराणा प्रताप बरोबर लढला.

किल्ल्याचा मध्ययुगीन इतिहास :
इ.स. १५१९ मध्ये इब्राहीम लोदीने किल्ल्याचा ताबा घेतला आणि लोदी राजवट लागू झाली. इब्राहीम लोदीच्या मृत्युपश्चात मुघल सम्राट बाबरने किल्ल्याचा ताबा घेतला. पण शेर शाह सुरी बरोबर झालेल्या युद्धामध्ये बाबरचा मुलगा हुमायून याला पराभव पत्करावा लागला आणि सुरी राजवट सुरु झाली. इ.स. १५४० मध्ये शेर शाह सुरीच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा इस्लाम शाहने राजधानी दिल्लीवरून ग्वाल्हेरला हलवली. ग्वाल्हेर हे ठाणे पश्चिमेकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांपासून सुरक्षित होते. इ.स. १५५३ मध्ये जेव्हा शेर शाह सुरी मरण पावला तेव्हा आदिल शाह सुरीने हिंदू योद्धा हेमू उर्फ हेम चंद्र विक्रमादित्याला साम्राज्याचा पंतप्रधान cum भूदल प्रमुख बनवले. आदिल शाह सुरी स्वतः चुनारला गेला, हि जागा त्याला जास्त सुरक्षित वाटत होती. कमकुवत आदिल शाह सुरी विरुद्ध झालेले उत्तर भारतामधले अनेक छोटे-मोठे उठाव हेमुने या किल्ल्याच्या आश्रयाने चिरडले. इ.स. १५५३ ते १५५६ मध्ये किल्ला फार मोठ्या प्रमाणात सक्रीय राहिला. येथेच हेमुने सलग २२ लढाया लढल्या आणि जिंकल्या. अकबरच्या सैन्याचा १५५६ मध्ये आग्रा आणि दिल्ली येथे पराभव केल्यानंतर हेमुने उत्तर भारतामध्ये “हिंदू राज्य ”, “विक्रमादित्य ” या नावाने सुरु केले. ७ ऑक्टोबर १५५६ मध्ये दिल्लीमधील जुन्या किल्ल्यामध्ये हेमुचा राज्याभिषेक झाला आणि हेमू “सम्राट हेम चंद्र विक्रमादित्य ” या नावाने ओळखला जाऊ लागला. राजधानी परत एकदा दिल्लीला हलवण्यात आली आणि सर्व राज्यकारभार जुन्या किल्ल्यामधून बघितला जाऊ लागला.
अकबराने किल्ला ताब्यात घेतल्यानंतर, येथे महत्वाच्या कैद्यांसाठी खास तुरुंग बनवण्यात आला. येथेच कितीतरी राजघराण्यातील दुर्दैवी लोकांना मृत्युसदनास धाडण्यात आले. त्यातील काही दुर्दैवी लोक असे
१. अकबराने त्याचा चुलत भाऊ कमरानला बंदी केले आणि नंतर मारले.
२. औरंगजेबाने त्याचा भाऊ मुरादला कैदेत टाकले आणि नंतर देशद्रोहाचा आरोप ठेवून मारले.
३. सुलेमान आणि सेफर शेखो हे अजून दोन दुर्दैवी ज्यांची येथे हत्या करण्यात आली.
४. जहांगिरने येथे शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग यांना कैदेत ठेवले होते. नंतर त्यांची येथेच त्या करण्यात आली.

राणा जाट राज्यकर्ते:
मुघल साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर जाट लोकांनी किल्ल्यावर ताबा मिळवला. जाट राणा च्या गोहाड राजवटीने किल्ला ताब्यात घेतला. जाट राज्यकर्ते महाराजा भीम सिंग राणा (१७०७-१७५६) आणि महाराजा छतर भीम सिंग राणा (१७५७-१७८३) यांनी किल्ल्यावर ३ वेळा ताबा मिळवला.
१. महाराजा भीम सिंग राणा ( १७४०-१७५६)
२. महाराजा छतर सिंग राणा ( १७६१- १७६७)
३. महाराजा छतर सिंग राणा ( १७८० – १७८३)

मराठा राज्य :
१७३६ मध्ये महाराजा भीम सिंग राणाने मालवा आणि ग्वाल्हेरचा किल्ला मराठ्यांचा पराभव करून जिंकला. १७४०-१७५६ असे किल्ल्यावर राज्य केले. १७७९ मध्ये मराठ्यांच्या सिंदिया दलाने किल्ला जिंकला आणि बचाव दल उभे केले. पण इस्ट इंडिया कंपनीने किल्ल्यावर ताबा मिळवला. ऑगस्ट १७८० मध्ये किल्ला परत महाराजा छतर सिंग राणाकडे गेला. त्यावेळेस त्याने मराठा फौजांचा पराभव करून परत एकदा किल्ला स्वतःच्या ताब्यात ठेवला. १७८४ मध्ये महादजी शिंदेनी (मराठा साम्राज्याचे लष्करप्रमुख) परत एकदा किल्ला आपल्या अधिपत्याखाली आणला. १८०८ ते १८४४ मध्ये सिंदिया आणि इंग्रज यांच्या अधिपत्याखाली आलटून पालटून किल्ला राहिला. जानेवारी १८४४ च्या युद्धानंतर किल्ला सिंदियांच्या हातात आला पण तो देखील इंग्रजांची वसाहत म्हणून.

किल्ल्यावरील कलाकुसर :
7DSCN2923.JPG7DSCN2933.JPG१८५७ च्या उठावाचा इतिहास :
ग्वाल्हेरच्या किल्ल्यात अजून एक घडलेली घटना म्हणजे राणी लक्ष्मी बाईने लढलेले युद्ध. १८५७ च्या उठावाच्या काळातील ती एक प्रभावी व्यक्तिमत्व होती. राणी लक्ष्मी बाईला इतिहासात भारताची "Joan of Arc" हि उपाधी दिलेली आहे. तिने इंग्रजांविरुद्ध पहिली लढाई झांशी येथे एप्रिल १८५८ मध्ये लढली, त्यात तिचा पराभव झाला, पण तिथून निसटून तिने परत मोर्चेबांधणी करायला सुरवात केली.
दुसरी लढाई तिने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात शिंद्यांविरुद्ध लढली. यात शिंद्यांच्या विरुद्ध ती, पेशवे आणि बांद्याचा नवाब लढले. हि लढाई तिने १ जून १८५८ ला जिंकली, त्यावेळी मराठ्यांचे पेशवा पंतप्रधान म्हणून नानासाहेब गादीवर होते. पण शिंदे ग्वाल्हेरहून आग्र्याला पळाले. तरीही इंग्रजांनी आपला लढा चालूच ठेवला, १६ आणि १७ जून १८५७ च्या युद्धात झांशी वरून राणीने युद्ध सुरु ठेवले तर राणीच्या उरलेल्या सैन्याने ग्वाल्हेर किल्ला आणि शहर वाचवण्यासाठी युद्ध सुरु ठेवले. यातच राणीचा १७ जून १८५८ ला मृत्यू झाला. ह्यू रोजने किल्ला जिंकून परत शिंद्यांच्या ताब्यात दिला.
तर असा आहे हा ग्वाल्हेरच्या किल्ल्याचा इतिहास.

मोहीम हत्ती दरवाजा बघून लगेचच मार्गस्थ झाली. आम्ही मात्र अधाशासारखे किल्ला न्याहाळण्यासाठी किल्ल्यात घुसलो. किल्ला बघून आता निदान २-३ दिवस तरी इथेच मुक्काम टाकावा अस वाटलं, पण.....सालं सगळ आयुष्याचं गाडं या “ पण ” च्या इथेच घुटमळतं. असो

शक्य तितक्या लवकर किल्ला बघून निघायचा या हेतूने आम्ही किल्ल्यात घुसलो. बघतो तर आज कितीतरी कार्यकर्त्यांनी मोहिमेला टांग दिली होती तर, त्यात खुद्द मोहिमेचे सेनापती निखील्रराजे पण होते. मग निखिलने एक मार्गदर्शक बरोबर घेतला आणि आम्ही मन मंदिर राजवाड्यात घुसलो. राजवाडा बघूनच डोळ्याचे पारणे फिटले. मार्गदर्शक माहिती सांगत होता. अर्थात काही खरी काही फेकुगिरी ( अर्थात ती फेकुगिरी होती ते आत्ता कळलं ) मनसोक्तपणे किल्ला बघून घेतला. नेहमीप्रमाणे किल्ल्याचे सर्व भाग बघायला खुले नव्हते. किल्ला चांगलाच भूल-भुलय्या आहे. एक सारखेच दिसणारे आतमध्ये चार चौक आहेत. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केले तरच तुम्हाला त्यातील बारकावे कळून येतात. जोहर कुंडाची हकीकत ऐकताना मात्र अंगावर सरसरून काटा आला.
किल्ला बघून झाल्यावर आम्ही आमचा मोर्चा पुरातत्व संग्रहालयाकडे वळवला. या जागी अगोदर गुजरी महाल होता. संग्रहालय साधारण २ तासात मस्तपैकी पाहून होते. किल्ल्यात तसेच संग्रहालयात जायला नाममात्र प्रवेश फी आहे. संग्रहालयात इ.स. पूर्व पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील हिंदू आणि जैन शैलीच्या मूर्ती आहेत.

7DSCN2952.JPG7DSCN2953.JPG
संग्रहालय आणि किल्ला बघून झाल्यानंतर साधारण ११ च्या सुमारास आम्ही निघालो.
थोडं पुढ जाताच मला उजव्या बाजूला एक विचित्र बांधकाम दिसलं.
स्वाग्या, थांब, अरे हे बघ काय आहे.
स्वागतने पण शहाण्यासारखी गाडी बाजूला घेतली. एक मस्त अस मंदिर होतं. मी भरभर फोटो काढले.
( हे लिखाणं करत असताना मला कळालं कि ते तेली मंदिर होतं म्हणून ;))

आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी आवर्जून पहावा असा हा किल्ला. मध्य प्रदेश सरकारचं याबाबतीत तरी कौतुक आहे कि किल्ला अजूनही चांगल्या अवस्थेत आहे भले रस्ते नसेनात का चांगले. Happy
किल्ला ग्वाल्हेर शहरापासून फक्त ३.२ किमी अंतरावर आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ३ हा ग्वाल्हेर मधूनच जातो. झांशी हे ग्वाल्हेरला राष्ट्रीय महामार्ग ७५ ने जोडलेले आहे.
या सर्व गडबडीत सास-बहु मंदिर बघायचं राहूनच गेलं. भविष्यात सासूला आणि बायकोला घेऊनच सास-बहु मंदिर बघायला येऊ म्हणत शेवटी एकदाचा आम्ही ११२० ला ग्वाल्हेर किल्ला सोडला आणि बाईक आग्र्याच्या रस्त्याला लागली. अजून १२१ किमी अंतर कापायचं होतं.

लिहिताना नक्कीच काही चुका झाल्या असतील, विशेषतः इतिहास लिहिताना, तरी जाणकारांनी त्या बिनधास्तपणे सांगाव्यात. आंतरजालावर गुगलून गुगलून इतिहास मी माझ्या तोडक्या-मोडक्या भाषेत मांडायचा प्रयत्न केला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात प्रथम शून्य (०) या संकल्पनेचा वापर याचं किल्ल्यात केला गेला.
>>>> म्हणजे नेमके काय केले होते , कळाले नाही म्हणून विचारतोय, स्पष्ट केलेत तर समजायला सोपे जाईल

खुप छान अनुभव आणि प्रवासवर्णन

सारंग माहितीच्या बरोबरीने (विशेषतः महालांची माहिती आहे तिथे) फोटो असते तर अजून मजा आली असती..

लेखांवर एकत्रित सगळे झाल्यावर प्रतिक्रिया देणार...

छान इतिहास अगदि उलघडून लिहलाय,
प्रकाशचित्रेही सुंदर.

>>सरी लढाई तिने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात शिंद्यांविरुद्ध लढली. यात शिंद्यांच्या विरुद्ध ती, पेशवे आणि बांद्याचा नवाब लढले. हि लढाई तिने १ जून १८५८ ला जिंकली आणि मराठ्यांचे पेशवा पंतप्रधान म्हणून नानासाहेब फडणीस गाडीवर आले.<<

इथे काहीतरी गफलत आहे, तुम्हाला नानासाहेब पेशवे म्हणायचे असावे, आणि तसेही नानासाहेब पेशवे हे ह्या बंडातील प्रमुख नेते होते. आणि त्यावेळी ते मराठ्यांचे पेशवा पंतप्रधानच होते.

सारन्ग..खूपच छान वर्णन करतोस आणि किति सुन्दर महिती दिलिस वाचतना अस वाटत होत कि आम्हि हि तुझाब्रोबर किल्ला पाहत आहोत.अप्रतिम..............

प्रफुल्ल – अरे म्हणजे अस म्हणायचं आहे कि जेव्हा भारतात शून्य हि संकल्पना वापरण्यास सुरवात झाली तेव्हा ति नेमकी कधी झाली हा प्रश्न येतो तेव्हा त्यांना या किल्ल्यावर शून्य (किंवा त्या सारखे दिसणार आकार ) कोरलेले आकार आढळले. म्हणून शून्य हि संकल्पना साधारण त्यावेळेस वापरली गेली म्हणून ९ वे शतक हा काळ ग्राह्य मनात येऊ लागला.
अर्थात हे सर्व माझ्या मनाच स्पष्टीकरण, कोणी जाणकार भेटला तर तुला जास्त कळवेनच.

हिमांशु : मन मंदिर राजवाडा आणि संग्रहालय बघण्यातच येवढा वेळ गेला कि बाकीच जास्त काही बघताच आल नाही आणि गाईडने पण बाकी ठिकाण बंद आहेत बघता येणार नाहीत म्हणून सांगितली.

विजय दा – तुम्ही फार मोठी चूक दाखवून दिलीत, त्यामुळे तुम्हाला जितके धन्यवाद देईन तितके कमीच, योग्य बदल केला आहे.

मानसी – प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

मस्त सुरुय रे... Happy

एवढे दिवस काढण कठीण आहे नायतर मलाही पुणे ते पानिपत आणि लेह लडाख एकदा तरी बाइकवर करायचे आहेत. Happy

सारंग.... खुपच छान चालु आहे ही मालीका.... प्रत्येक नविन येणार्‍या भागाबरोबर जास्तीत जास्त माहिती मिळते आहे ... मस्तच Happy

सारंग - ही माहिती खूप छान दिलीस - माझ्या मनात हे वाचताना सारखा एकच प्रश्न येत होता - एवढी आक्रमणे झाली तरी या किल्ल्याचा फारसा विध्वंस झालेला दिसत नाही, बहुतेक शिल्प काम वा इमारती शाबूत दिसताहेत - हे कसे काय ?????

माहिती खूप छान दिलीस वाचताना सारखा एकच प्रश्न येत होता - एवढी आक्रमणे झाली तरी या किल्ल्याचा फारसा विध्वंस झालेला दिसत नाही, बहुतेक शिल्प काम वा इमारती शाबूत दिसताहेत...

खूप छान आहे

चिमुरी, झकासराव, शापित गंधर्व, यो, शशांक, शेखर आणि नितीन प्रतिसादाबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.
झकासराव >>>> तुम्ही म्हणता तस माझही लेह लडाख राहिलंय, बघू आता कधी पूर्ण होत ते. खर आहे , आज-काल च्या जगात एवढे दिवस सुट्टी मिळत नाही. तरीही बघा प्रयत्न करून
शशांक व शेखर >>>> एवढी आक्रमणे झाली तरी या किल्ल्याचा फारसा विध्वंस झालेला दिसत नाही, बहुतेक शिल्प काम वा इमारती शाबूत दिसताहेत ?????? खरच माझ्याकडे पण या प्रश्नाच उत्तर नाही.

sarvat aadi tar than you amhla itke mast likhan vachyla dilybadal. tumchya 1st part lach comment dyache hoti pan matle nahi aadi pude kay jale te janun genyat jast uskuta hoti.. khup chan lihta tumhi.. tumchya sobat amhi sudha maja keli asech vatle..
great aahes mitra.. amhi nuste college budvale pan tycha asa upyog kadi kela nahi re.. aaj khup vait vatey tyache.. javu de je jale te..
aani ti snehal soryy to snehal aahe hey sagitale tybadal thanks mala vatle itkya lambchya prvasat patvali koni tari.. heeee

aso asech lihit ja... aani ha ek question aahe itki sarv historey tumlac tevach mahiti hoti ka tithe gelyvar samjali????????????

चैताली प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद
मला लिहितानाच जाणवलं होत कि स्नेहल म्हटलं कि सगळ्यांना मुलगीच वाटणार म्हणून अगोदरच नमूद केल. नसते गैरसमज नकोत Wink
पटवतोय कसली , विचारांना कृतीची जोड देण्यात आम्ही लहाणपणापासूनच मागे आहोत Happy
साधारण १५ ते २० % इतिहास माहित होता, बाकीचा आता लिहितानाच समजतोय, पण हेही नसे थोडके Happy