विस्कळीत वासेपुर - (Gangs of Wasseypur) - Review

Submitted by रसप on 30 June, 2012 - 00:31

"मोठ्या नावाजलेल्या व्यक्तींचा एकेरी उल्लेख करून किंवा ज्याला-त्याला काका-मामा-दादा-मावशी-आत्या म्हणून दाखवून आपली किती चांगली ओळख आहे असं दाखवलं, की आपणही कुणी तरी असामी बनतो." हा हमखास फॉर्म्युला जसा सर्वांना माहित आहे; तसंच "जिथे जमेल तिथे मनसोक्त भ-कार, म-कार घालून, अतिरंजित खून-मारामाऱ्या किंवा काही तरी विक्षिप्त/ विकृत/ भडक/ अश्लील/ क्रूर/ बीभत्स वगैरे चित्रण केलं की आपला चित्रपट वास्तवदर्शी होतो आणि 'हट के' ठरतो", हाही फॉर्म्युला सर्वांना माहित होत चालला आहे. 'गँग्स ऑफ वासेपुर' अश्याच पठडीतला एक तथाकथित 'हट के' सिनेमा वाटला. (इंग्रजीत नाव देणं - हाही एक 'फॉर्म्युला'!)

सिनेमाची सुरुवात होते तीच गोळ्यांच्या धो-धो वर्षावाने. वासेपुर, बिहार (आता झारखंड) मधील एक छोटंसं खेडं.. तिथले कुणी गुंड कुणाच्या तरी वाड्यावर बॉम्ब आणि गोळ्यांचा असा काही पाउस पाडतात की तिथेच कल्पना येते की पुढे तुम्हाला असं काही बघायला मिळणार आहे, जे पूर्वी क्वचितच पाहिलं असेल.
सिनेमाची एकूण कहाणी साधारणत: तीन कालखंडातली आहे. एक स्वातंत्र्यपूर्व (१९४१-४२), स्वातंत्र्योत्तर - १ (१९४७ च्या आसपास) आणि स्वातंत्र्योत्तर - २ (१९८० चे दशक).
१९४१ ची गोष्ट. धनबादजवळील वासेपुर गावात 'कुरेशी' जातीच्या सुलताना डाकूचं वर्चस्व असतं. एकंदरीतच कुरेशी, ह्या कसाई ह्या जमातीचा गावावर वचक असतो. हा भाग मुस्लीमबहुल दाखवला आहे. इथल्या मुस्लिमांचे सरळसरळ दोन भाग आहेत. एक कुरेशी आणि दुसरा इतर. तर, हा सुलताना इंग्रजांच्या रेल्वेगाड्यांना लुटत असे. गावातील 'शाहीद खान' नामक पठाण सुलतानाच्या नावाचा - धाकाचा - फायदा घेऊन त्याच्या नावाने लुटमार सुरू करतो. रेल्वेही लुटतो. ही माहिती सुलतानाला कळल्यावर तो शाहीद खानच्या संपूर्ण टोळीला कंठस्नान घालतो आणि जिवंत वाचलेला शाहीद खान बायकोच्या अन होणाऱ्या बाळाच्या प्रेमाखातर लुटमार सोडतो, वासेपुरही सोडतो आणि धनबादला येऊन कोळश्याच्या खाणीत मजुरी करू लागतो. त्याची बायको मुलाला जन्म देताना मरण पावते. मजुरांवर वचक ठेवणारा पहेलवान त्याला वेळेवर घरी जाऊ देत नाही, म्हणून तो त्यास बदडून काढतो. त्याची हिंमत व ताकद बघून कोळश्याच्या खाणीचा नवा मालक 'रामाधीर सिंग' त्याला त्याचा खास माणूस बनवतो. पण शाहीद खानच्या मनात घातक विचार असतात, जे रामाधीरला समजतात आणि वेळीच तो शाहीद खानचा काटा काढतो, अर्थात त्याला मारून टाकतो. खानाचा जुना साथीदार, खानाच्या ६-७ वर्षांच्या मुलाला घेऊन पळतो आणि त्याला वाढवतो. हा मुलगा लहान वयातच शप्पथ घेतो की, "रामाधीर सिंगला बरबाद करून बापाच्या खूनाचा बदला घेईन, त्यानंतरच केस वाढवीन!"
कट. मुलगा मोठा झाला आहे - टकला मनोज वाजपेयी, नाव 'सरदार खान'.
सरदार खान, सिनेमातील इतर प्रत्येक व्यक्तिरेखेप्रमाणे उदरनिर्वाहासाठी गुंडगिरी, लुटमार वगैरेच करत असतो. पुढे तो वासेपुरला येतो. काही तरी काही तरी करतो आणि रामाधीरला त्रास देतो. बायकांची लफडी करतो. खून करतो.. स्मगलिंग करतो.. अनधिकृत जमिनी बळकावतो.. हफ्ता वसुली करतो.. अखेरीस अगदी मासेमारीही करतो. त्याचा बदला पूर्ण होतो का? हे बघायचं असेल(च) तर सिनेमा पाहा. (नाही पाहिला, तरी फरक काहीही पडणार नाही. पण तरी......)

१. एकंदरीत सिनेमाची कथा उत्कंठावर्धक आहे. पण मांडणी अत्यंत विस्कळीत वाटली. सरदार खानचं 'दुर्गा' (रीमा सेन)शी लफडं दाखविण्याचं, त्याला 'रंडीबाज' दाखविण्याचं प्रयोजन सिनेमातील इतरही काही घटना व पात्रांप्रमाणे, कळत नाही. अश्या अनेक अनावश्यक पात्र व घटनांमुळे अनेकदा असं विचार येतो की, अरे नक्की काय चाललं आहे? आणि मग अर्थातच शेवट अचानक 'कसा तरी' होतो.
२. सिनेमात सर्वात महत्त्वाचे काम कुणाचे असेल तर निवेदक! निवेदन आहे, म्हणून सिनेमा मला तरी थोडाफार कळला. अन्यथा अनन्वित तुकड्यांना एकत्र सांधणं सहज शक्य करण्याचं कसब दिग्दर्शकात आहे का? - हा वादाचा विषय ठरावा. (निवेदकाचा आवाज बहुतेक मनोज वाजपेयीचाच आहे, मी श्रेयनामावली बघण्यास थेटरात थांबलो नाही. सिनेमा संपल्या संपल्या बाहेर पडलो. कारण मला बाहेर पडून 'नॉर्मल' भारत पाहायची अनावर इच्छा झाली होती.)
३. खून, मारामाऱ्या, लुटालूट, वगैरे वगैरे इतकं सर्रास चाललेलं दाखवलं आहे की अतीच वाटावं. मान्य आहे, भारतातही असे काही भाग आहेत जिथे कायदा सुव्यवस्था नामशेषच असावी. परंतु, अश्या ठिकाणीही पोलिसांचा वावर असतोच, फक्त ते भ्रष्ट/ सामील असतात. पण सिनेमात तर म्हणजे 'जंगल कानून'च आहे! हे म्हणजे फार्रच काहीच्या काही वाटतं. हा भारत आहे की अफगाणिस्तान ?
४. दर १० मिनिटांनी कुणा ना कुणाच्या आई-बहिणीचा उद्धार केल्याने सिनेमा वास्तवदर्शी होतो, हा समज जर खरोखरच प्रेक्षक आणि दिग्दर्शक-निर्माते-लेखकांत दृढ झाला असेल, तर ही चिंतेची बाब आहे. पूर्वी 'कहानी की जरूरत' म्हणून अंगप्रदर्शन वगैरे केलं, असं म्हटलं जायचं. आता तर 'कहानी की जरूरत' म्हणून आम्ही अश्लील/ अश्लाघ्य वगैरे काही केलं नाही, असं म्हणायची वेळ आली आहे की काय? की आणायची आहे? गेट वेल सून, बॉलीवूड ! वास्तव म्हणजे शिवीगाळ नाही, अश्लीलता नाही. वास्तव भेदक असलं तरी ते परिणामकारकरीत्या दाखविण्यासाठी बिनधास्तपणाची कुबडी घेणं एक वेळ ठीक पण त्याच एका बांबूवर अख्खा तंबू उभारणार असाल, तर अल्लाह मालिक !
५. संगीत ? ते काय असतं भाऊ?
६. सिनेमातील अनेक व्यक्तिरेखा (यादव, रामाधीरचा मुलगा, दुर्गा, दुर्गेची पोरं, ई.) आणि घटना (फैजल खान - नवाझुद्दिन सिद्दिकी - ची 'डेट', त्याने वाराणसीला जाऊन बंदुका घेऊन येणे आणि पकडलं जाणे, नंतर परत तिथे जाऊन 'यादव'ला मारणे, सरदार खानची तुरुंगवारी, मासेमारी, ई.) मूळ कथेला भरकटवण्याचं काम करतात.
७. नवाझुद्दिन सिद्दिकी ला ह्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे, असं ऐकलं. पण मला तर तो सिनेमात का आहे, हेच कळलं नाही. त्याच्या अभिनय कौशल्याला अक्षरश: वाया घालवलं आहे.
८. सिनेमाच्या शेवटी 'To be continued....' आहे. ह्याचा अर्थ कदाचित कहाणी अजून बाकी आहे! हे तर अजूनच वाईट ! माझ्या मते तीन तासांत कुठलीही कहाणी पूर्णपणे मांडता आली पाहिजे. जमत नसल्यास सरळ सिरीयल काढावी!

मागे एकदा एका अत्यंत रद्दड चित्रपटावर मी सडकून टीका केल्यावर एका जाणकार वाचकाने मांडलेला एक मुद्दा मला मनोमन पटला होता. सिनेमा बघायला जाताना, प्रेक्षक आणि निर्माता-दिग्दर्शक ह्यांच्यात एक छुपा करार झालेला असतो. काही निर्माता-दिग्दर्शकांचे सिनेमे हे टोटली इललॉजिकलच असतात, तर काहींचे सिनेमे जरा सेन्सिबल वगैरे असतात, काहींचे अजून काही, काहींचे अजून काही...... थोडक्यात, एकाच मोजपट्टीवर डेव्हिड धवन, मणीरत्नम, कारण जोहर, वगैरे सगळे मोजले जाऊ शकत नाहीत. हाच विचार मनात होता आणि मी अनुराग कश्यपच्या सिनेमाला मोठ्या अपेक्षेने गेलो होतो. तब्बल तीन तासांच्या गदारोळानंतर मी जेव्हा बाहेर आलो, तेव्हा थोडक्यात सांगायचं तर, मला टोटलच लागली नाही! कदाचित हा सिनेमा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या इतर अनेक सिनेमांपेक्षा किंचित सरस असेलही, नव्हे आहेच ; पण अनुराग कश्यप...? बॉस, यु एक्स्पेक्ट समथिंग बेटर प्लीज!
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/gangs-of-wasseypur-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जसं काही लोकांना माठ्या, ठोम्ब्या, अस्ताव्यस्त, चुरगळलेला 'घना'(पक्षी एलदुगो) आवडू शकतो, अगदी तसाच हा अस्ताव्यस्त, विस्कळीत, आणि काहीच्या काही 'वासेपूर' आवडू शकतो.

सिनेमा त्यातही हिंदी सिनेमाची आपल्या मनात असलेली जी प्रस्थापित चौकट आहे त्यातल्या बहुतेक गृहितकांना वास्सेपूर जोरदार हादरे देतो. वास्तववादी-पॅरलल इत्यादी प्रकारचा सिनेमा आपल्याला आता नवीन नाही पण वास्सेपूर त्यातही वेगळी वाट धरतो.
वास्सेपूरची सुरुवातच अफ़ाट आहे. टीव्हीवर ’सास भी कभी...’ चे टायटल चालले आहे, लोक तन्मयतेने बघत आहेत आणि धाडकन गोळीबार सुरु होतो. वास्तव जीवन आणि मिडीआतून दिली जाणारी गुंगीची गोळी यातली भयानक विसंगती यापे़क्षा प्रभावीपणे मांडता येणे अवघड आहे.
वास्सेपूर अत्यंत हिंसक सिनेमा आहे. तसे तर टिपिकल अ‍ॅक्षन सिनेमेही हिंसक असतातच. पण वास्सेपूरची हिंसकता त्यातील गोळीबार, रक्तरंजित दृष्ये यामुळे नाही. ती आहे त्यातील पात्रांच्या जीवनातील हिंसेच्या सहज अस्तित्वाने, हिंसा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असण्याने. ही अशी अपरिहार्य, सहज हिंसा जास्त धक्कादायक आणि करुणही आहे.

या सिनेमाच्या भाषेबद्दल अनेक आक्षेप आहेत पण मला तरी यातील कोणतीही शिवीगाळ अनाठायी, अनावश्यक, केवळ एक फॅड म्हणून आहे असे वाटले नाही. ते पात्र जी भाषा बोलेल ती ते बोलते. आता तशी भाषा तुमच्या ’सभ्य’ जीवनाचा भाग नाही हा त्या पात्राचा दोष कसा? मुळात चित्रपटाची भाषा ही त्यातल्या पात्रांची भाषाच असली पाहिजे, नाही का? (वास्सेपूरी भाषेबद्दल ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी आपण एका दिवसात किती आणि कोणत्या शिव्यांचा वापर करतो याची जरा नोंद ठेवावी!)

काही ठिकाणी वास्सेपूरचा टोन डॉक्यु-ड्रामा सारखा होतो, पण तेही फ़ार हुशारीने वापरले आहे उदा. नेहरुंचे ट्रिस्ट विथ डेस्टीनी भाषण. त्रिशूल, कसम पैदा करनेवाले की अशा हार्डकोअर बॉलोवूडचा जनमानसावरील प्रभाव याचाही उपयोग एक सबटेक्स्ट असा केला आहे. काही ठिकाणी तर ती फ़िल्मी पात्रे आणि हे खरे जीवन यांच्यातली सीमाच पुसट होते.

वास्सेपूरचे संगीत हा एक अजब प्रयोग आहे, एक नवा प्रयोग. ज्यांनी स्नेहा खानविलकरचा एमटीव्ही साउंड ट्रिपिंन हा कार्यक्रम पाहिला असेल त्यांना या मुलीच्या सांगितीक हुशारीची माहिती असेलच. वास्सेपूरचे संगीत त्याचाच पुढचा भाग आहे. पार्श्वभूमीला गाणी हा प्रकार आता हिंदी सिनेमाला नवीन नाही पण वास्सेपूर याही बाबतीत वेगळा आहे. त्यातील गाण्यांची रेंज प्रचंड आहे. खाणमजूरांची भयानक परिस्थिती आणि पार्श्वभूमीला चाललेले ’एक बगल में सिसकियां’ सारखे अप्रतिम काव्य हा तर मास्टरस्ट्रोक आहे. गेल्या काही वर्षात अनेक नवे दिग्दर्शक हिंदी सिनेमातील गाण्यांच्या वापराला नवी दिशा, नवे परिमाण देत आहेत. टीपिकल ’मधुर’ आवाज असलेल्या गायकांच्या जागी मोहित चौहान सारख्या ऑड आवाजाला हिरोचा आवाज म्हणून वाव मिळणे ही एक पायरी आणि खर्‍या-खुर्‍या भोजपूरी कलाकारांनाच ’वुमनियां’ गायची संधी मिळाणे हा त्यातलाच एक पुढचा टप्पा.

वास्सेपूर एक ’स्लाईस ऑफ़ लाइफ़’ दाखवते. थोडीच ठळक पात्रे आणि त्याभोवतीच फ़िरणारी कथा ही सिनेमाची नेहमीची रीत. पण वास्सेपूरमधे आपल्या आयुष्यात ज्याप्रकारे अनेक लोक सतत येत-जात असतात तशीच गडबड आहे. काही वेळा त्यामुळे सिनेमा विस्कळीत वाटण्याचा संभव आहे. पण सिनेमाचा प्रचंड कालपट लक्षात घेता इतकी पात्रे असणे अपरिहार्य आहे.

आपण सिनेमा का पाहतो? याचे सर्वात साधे उत्तर मनोरंजनासाठी हेच आहे. कोणीही आपल्या ’सांस्कृतीक जाणिवा’ वगैरे समृद्ध वगैरे व्हाव्या म्हणून सिनेमा पहात असतील तर त्यात काही अर्थ नाही. मुळात कोणताही सिनेमा जेंव्हा बनवला जातो तेंव्हा त्यामागचा सर्वात मूलभूत उद्देश प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हाच असावा असे मला वाटते. वास्सेपूरने माझे मनोरंजन झाले, भरपूर झाले. संधी मिळाली तर परत तो एकदा पहायलाही मी तयार आहे आणि दुसर्‍या भागाची वाट पाहतो आहे.

आता वास्सेपूरसारख्या सिनेमाने मनोरंजन होणेच चूक आहे असे म्हणणे असेल तर मुद्दाच संपला!!!

पफेक्ट आगाउ.....................
.

जसे सत्या या चित्रपटाने अंडरवर्ल्ड च्या दुनिये कडे बघण्याचा नवी नजर दिली....तशीच नजर बदलली या चित्रपटाने

चांगला सिनेमा आहे. एकदम वास्तववादी.

वरिल लेखात क्र. ८ मुद्दा
>>८. सिनेमाच्या शेवटी 'To be continued....' आहे. ह्याचा अर्थ कदाचित कहाणी अजून बाकी आहे! हे तर अजूनच वाईट ! माझ्या मते तीन तासांत कुठलीही कहाणी पूर्णपणे मांडता आली पाहिजे. जमत नसल्यास सरळ सिरीयल काढावी!<<

मुळात हा चित्रपटच पाच तासाचा आहे , हे किती आक्षेप घेणार्‍यांना माहिती आहे? ह्या चित्रपटाचे पहिले दर्शन 'Cannes Directors' Fortnight' ला करण्यात आले होते, त्यावेळी संपूर्ण लांबीचा चित्रपट दाखवण्यात आला. बॉलीवूड आणि हिंदी दर्शक ह्यांची मानसिकता लक्षात घेऊन मग तो दोन भागात प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले.

आगाउ, साजिरा, मस्त पोस्ट्स. Happy

आपण शहरांत रहातो, तेही सहसा महाराष्ट्राच्या. त्यातही आपण बहुतांशी मध्यमवर्गीय. त्यामुळे बर्‍याचदा लोकांना हिंसा जीवनाचा अविभाज्य भाग आहे - आपल्या नसली तरी उर्वरित समाजाच्या - हे कदाचित तेव्ह्ढ्या प्रकर्षाने जाणवत नसेल. मी शहर सोडून फार हिंडलेय, फार शहाणपण अंगात आलंय असं काही नसलं तरी शहरातलं 'आपलं' दैनंदिन जीवन हे किती बेटासारखं आहे आणि त्या बेटाबाहेरचं वास्तव हे आपल्यापेक्षा किती वेगळं, उग्र आणि अनेकदा कल्पनातीत आहे हे अगदी वैयक्तिक पातळीवर बघितलंय अनुभवलंय...

वास्सेपूर एक ’स्लाईस ऑफ़ लाइफ़’ दाखवते. थोडीच ठळक पात्रे आणि त्याभोवतीच फ़िरणारी कथा ही सिनेमाची नेहमीची रीत. पण वास्सेपूरमधे आपल्या आयुष्यात ज्याप्रकारे अनेक लोक सतत येत-जात असतात तशीच गडबड आहे. काही वेळा त्यामुळे सिनेमा विस्कळीत वाटण्याचा संभव आहे.>> +१. चित्रपट व्सिकळीत वाटतो ह्यापलीकडे मला तरी काहीच खटकले नव्हते आधी पण हे निरिक्षण चपखल आहे.

आमचं नेहमीच वरातीमागुन घोडं.
पहिला भाग काल पाहिला. Bowled over. . "इक बगल" ने वेड लावलं पार.
बाकी दोघी बायका निष्प्रभ वाटल्या तुलनेने. काय राव, यांच्या देहबोलीत घरकामाचा काहीच कार्यानुभव नसल्याचे इतके खुपते.
एवढे अप्रतिम संवाद मिळुनही असे का? Uhoh बॅरी जॉनच्या शिष्येला शोभते का हे..
ती जे काय कामं करते, त्यातल्या हालचालींना काहीच लय नाही.
दुसरी तर धन्यवादच आहे. असो.

बाकी मस्तं.
ते नरेशन कोणाचं आहे. त्या माणसाचे डिक्शन काय भारी आहे.

Pages