विस्कळीत वासेपुर - (Gangs of Wasseypur) - Review

Submitted by रसप on 30 June, 2012 - 00:31

"मोठ्या नावाजलेल्या व्यक्तींचा एकेरी उल्लेख करून किंवा ज्याला-त्याला काका-मामा-दादा-मावशी-आत्या म्हणून दाखवून आपली किती चांगली ओळख आहे असं दाखवलं, की आपणही कुणी तरी असामी बनतो." हा हमखास फॉर्म्युला जसा सर्वांना माहित आहे; तसंच "जिथे जमेल तिथे मनसोक्त भ-कार, म-कार घालून, अतिरंजित खून-मारामाऱ्या किंवा काही तरी विक्षिप्त/ विकृत/ भडक/ अश्लील/ क्रूर/ बीभत्स वगैरे चित्रण केलं की आपला चित्रपट वास्तवदर्शी होतो आणि 'हट के' ठरतो", हाही फॉर्म्युला सर्वांना माहित होत चालला आहे. 'गँग्स ऑफ वासेपुर' अश्याच पठडीतला एक तथाकथित 'हट के' सिनेमा वाटला. (इंग्रजीत नाव देणं - हाही एक 'फॉर्म्युला'!)

सिनेमाची सुरुवात होते तीच गोळ्यांच्या धो-धो वर्षावाने. वासेपुर, बिहार (आता झारखंड) मधील एक छोटंसं खेडं.. तिथले कुणी गुंड कुणाच्या तरी वाड्यावर बॉम्ब आणि गोळ्यांचा असा काही पाउस पाडतात की तिथेच कल्पना येते की पुढे तुम्हाला असं काही बघायला मिळणार आहे, जे पूर्वी क्वचितच पाहिलं असेल.
सिनेमाची एकूण कहाणी साधारणत: तीन कालखंडातली आहे. एक स्वातंत्र्यपूर्व (१९४१-४२), स्वातंत्र्योत्तर - १ (१९४७ च्या आसपास) आणि स्वातंत्र्योत्तर - २ (१९८० चे दशक).
१९४१ ची गोष्ट. धनबादजवळील वासेपुर गावात 'कुरेशी' जातीच्या सुलताना डाकूचं वर्चस्व असतं. एकंदरीतच कुरेशी, ह्या कसाई ह्या जमातीचा गावावर वचक असतो. हा भाग मुस्लीमबहुल दाखवला आहे. इथल्या मुस्लिमांचे सरळसरळ दोन भाग आहेत. एक कुरेशी आणि दुसरा इतर. तर, हा सुलताना इंग्रजांच्या रेल्वेगाड्यांना लुटत असे. गावातील 'शाहीद खान' नामक पठाण सुलतानाच्या नावाचा - धाकाचा - फायदा घेऊन त्याच्या नावाने लुटमार सुरू करतो. रेल्वेही लुटतो. ही माहिती सुलतानाला कळल्यावर तो शाहीद खानच्या संपूर्ण टोळीला कंठस्नान घालतो आणि जिवंत वाचलेला शाहीद खान बायकोच्या अन होणाऱ्या बाळाच्या प्रेमाखातर लुटमार सोडतो, वासेपुरही सोडतो आणि धनबादला येऊन कोळश्याच्या खाणीत मजुरी करू लागतो. त्याची बायको मुलाला जन्म देताना मरण पावते. मजुरांवर वचक ठेवणारा पहेलवान त्याला वेळेवर घरी जाऊ देत नाही, म्हणून तो त्यास बदडून काढतो. त्याची हिंमत व ताकद बघून कोळश्याच्या खाणीचा नवा मालक 'रामाधीर सिंग' त्याला त्याचा खास माणूस बनवतो. पण शाहीद खानच्या मनात घातक विचार असतात, जे रामाधीरला समजतात आणि वेळीच तो शाहीद खानचा काटा काढतो, अर्थात त्याला मारून टाकतो. खानाचा जुना साथीदार, खानाच्या ६-७ वर्षांच्या मुलाला घेऊन पळतो आणि त्याला वाढवतो. हा मुलगा लहान वयातच शप्पथ घेतो की, "रामाधीर सिंगला बरबाद करून बापाच्या खूनाचा बदला घेईन, त्यानंतरच केस वाढवीन!"
कट. मुलगा मोठा झाला आहे - टकला मनोज वाजपेयी, नाव 'सरदार खान'.
सरदार खान, सिनेमातील इतर प्रत्येक व्यक्तिरेखेप्रमाणे उदरनिर्वाहासाठी गुंडगिरी, लुटमार वगैरेच करत असतो. पुढे तो वासेपुरला येतो. काही तरी काही तरी करतो आणि रामाधीरला त्रास देतो. बायकांची लफडी करतो. खून करतो.. स्मगलिंग करतो.. अनधिकृत जमिनी बळकावतो.. हफ्ता वसुली करतो.. अखेरीस अगदी मासेमारीही करतो. त्याचा बदला पूर्ण होतो का? हे बघायचं असेल(च) तर सिनेमा पाहा. (नाही पाहिला, तरी फरक काहीही पडणार नाही. पण तरी......)

१. एकंदरीत सिनेमाची कथा उत्कंठावर्धक आहे. पण मांडणी अत्यंत विस्कळीत वाटली. सरदार खानचं 'दुर्गा' (रीमा सेन)शी लफडं दाखविण्याचं, त्याला 'रंडीबाज' दाखविण्याचं प्रयोजन सिनेमातील इतरही काही घटना व पात्रांप्रमाणे, कळत नाही. अश्या अनेक अनावश्यक पात्र व घटनांमुळे अनेकदा असं विचार येतो की, अरे नक्की काय चाललं आहे? आणि मग अर्थातच शेवट अचानक 'कसा तरी' होतो.
२. सिनेमात सर्वात महत्त्वाचे काम कुणाचे असेल तर निवेदक! निवेदन आहे, म्हणून सिनेमा मला तरी थोडाफार कळला. अन्यथा अनन्वित तुकड्यांना एकत्र सांधणं सहज शक्य करण्याचं कसब दिग्दर्शकात आहे का? - हा वादाचा विषय ठरावा. (निवेदकाचा आवाज बहुतेक मनोज वाजपेयीचाच आहे, मी श्रेयनामावली बघण्यास थेटरात थांबलो नाही. सिनेमा संपल्या संपल्या बाहेर पडलो. कारण मला बाहेर पडून 'नॉर्मल' भारत पाहायची अनावर इच्छा झाली होती.)
३. खून, मारामाऱ्या, लुटालूट, वगैरे वगैरे इतकं सर्रास चाललेलं दाखवलं आहे की अतीच वाटावं. मान्य आहे, भारतातही असे काही भाग आहेत जिथे कायदा सुव्यवस्था नामशेषच असावी. परंतु, अश्या ठिकाणीही पोलिसांचा वावर असतोच, फक्त ते भ्रष्ट/ सामील असतात. पण सिनेमात तर म्हणजे 'जंगल कानून'च आहे! हे म्हणजे फार्रच काहीच्या काही वाटतं. हा भारत आहे की अफगाणिस्तान ?
४. दर १० मिनिटांनी कुणा ना कुणाच्या आई-बहिणीचा उद्धार केल्याने सिनेमा वास्तवदर्शी होतो, हा समज जर खरोखरच प्रेक्षक आणि दिग्दर्शक-निर्माते-लेखकांत दृढ झाला असेल, तर ही चिंतेची बाब आहे. पूर्वी 'कहानी की जरूरत' म्हणून अंगप्रदर्शन वगैरे केलं, असं म्हटलं जायचं. आता तर 'कहानी की जरूरत' म्हणून आम्ही अश्लील/ अश्लाघ्य वगैरे काही केलं नाही, असं म्हणायची वेळ आली आहे की काय? की आणायची आहे? गेट वेल सून, बॉलीवूड ! वास्तव म्हणजे शिवीगाळ नाही, अश्लीलता नाही. वास्तव भेदक असलं तरी ते परिणामकारकरीत्या दाखविण्यासाठी बिनधास्तपणाची कुबडी घेणं एक वेळ ठीक पण त्याच एका बांबूवर अख्खा तंबू उभारणार असाल, तर अल्लाह मालिक !
५. संगीत ? ते काय असतं भाऊ?
६. सिनेमातील अनेक व्यक्तिरेखा (यादव, रामाधीरचा मुलगा, दुर्गा, दुर्गेची पोरं, ई.) आणि घटना (फैजल खान - नवाझुद्दिन सिद्दिकी - ची 'डेट', त्याने वाराणसीला जाऊन बंदुका घेऊन येणे आणि पकडलं जाणे, नंतर परत तिथे जाऊन 'यादव'ला मारणे, सरदार खानची तुरुंगवारी, मासेमारी, ई.) मूळ कथेला भरकटवण्याचं काम करतात.
७. नवाझुद्दिन सिद्दिकी ला ह्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे, असं ऐकलं. पण मला तर तो सिनेमात का आहे, हेच कळलं नाही. त्याच्या अभिनय कौशल्याला अक्षरश: वाया घालवलं आहे.
८. सिनेमाच्या शेवटी 'To be continued....' आहे. ह्याचा अर्थ कदाचित कहाणी अजून बाकी आहे! हे तर अजूनच वाईट ! माझ्या मते तीन तासांत कुठलीही कहाणी पूर्णपणे मांडता आली पाहिजे. जमत नसल्यास सरळ सिरीयल काढावी!

मागे एकदा एका अत्यंत रद्दड चित्रपटावर मी सडकून टीका केल्यावर एका जाणकार वाचकाने मांडलेला एक मुद्दा मला मनोमन पटला होता. सिनेमा बघायला जाताना, प्रेक्षक आणि निर्माता-दिग्दर्शक ह्यांच्यात एक छुपा करार झालेला असतो. काही निर्माता-दिग्दर्शकांचे सिनेमे हे टोटली इललॉजिकलच असतात, तर काहींचे सिनेमे जरा सेन्सिबल वगैरे असतात, काहींचे अजून काही, काहींचे अजून काही...... थोडक्यात, एकाच मोजपट्टीवर डेव्हिड धवन, मणीरत्नम, कारण जोहर, वगैरे सगळे मोजले जाऊ शकत नाहीत. हाच विचार मनात होता आणि मी अनुराग कश्यपच्या सिनेमाला मोठ्या अपेक्षेने गेलो होतो. तब्बल तीन तासांच्या गदारोळानंतर मी जेव्हा बाहेर आलो, तेव्हा थोडक्यात सांगायचं तर, मला टोटलच लागली नाही! कदाचित हा सिनेमा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या इतर अनेक सिनेमांपेक्षा किंचित सरस असेलही, नव्हे आहेच ; पण अनुराग कश्यप...? बॉस, यु एक्स्पेक्ट समथिंग बेटर प्लीज!
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/gangs-of-wasseypur-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं झालं चांगली चिरफाड केलीयेस ते. वर्तमानपत्रातून रिव्ह्युज चांगले आले होते. अनुराग कश्यप हे नाव पत्रकारांचं आवडतं असावं बहुतेक. पण राजनीती च्या रिव्ह्युपासून अशा रिव्ह्युजबद्दल सावधच राहीलेलं बरं Wink

प्रकाश झा च्या हटके वगैरे सिनेमांबद्दल आता सर्वसामान्यांना काय वाटतं ते जाणून घेऊनच मग पैसे घालवावे हा निर्णय घेतला आहे. या यादीत अनुराग कश्यपचीही भर टाकायला हरकत नाही.. ( डोकं बाहेर हेल्मेट स्टँड ला ठेवून एंजॉय करायला रग्गड मसाला सिनेमे हायेतच कि Happy )

चांगले लिहिले आहे. पार कान ला जाउन लोकांना गमछा म्हणजे इंडियन फॅशन स्टेटमेंट असे काहीतरी सांगून प्रसिद्धी मिळविलेली होती.

किरण्या, पहिल्यांदा तुझ्याशी सहमत रे Proud
रसप, छानच लिहीलंच.. आधीच मार-धाड पाहून डोक्यात अशांतता करावी वाटत नाही, हे वाचल्यावर मुव्ही बघणारच नाहीये Happy

सरदार खान, सिनेमातील इतर प्रत्येक व्यक्तिरेखेप्रमाणे उदरनिर्वाहासाठी गुंडगिरी, लुटमार वगैरेच करत असतो.

सिनेमा संपल्या संपल्या बाहेर पडलो. कारण मला बाहेर पडून 'नॉर्मल' भारत पाहायची

हे आवडलं.

चित्रपट अतिशय आवडला. चित्रपटाचं व्याकरण कसं असावं, याचा वस्तुपाठ म्हणजे हा चित्रपट. अप्रतिम पटकथा, संगीत, अभिनय आणि छायाचित्रण यांमुळे एक क्षणभरसुद्धा चित्रपट कंटाळवाणा होत नाही. जरा डोळे उघडून बघितलं, तर खरा भारत यात दिसेल.

चित्रपट संपला की श्रेयनामावलीनंतर दुसर्‍या भागाची झलक दिसते. नवाजुद्दिन सिद्दिकीच्या भूमिकेचं महत्त्व यात कळतं. चित्रपटाच्या सुरुवातीच्या गोळीबाराचं रहस्यही या झलकेत आहे. नवाजुद्दिन सिद्दिकीला पुरस्कार 'टिंग्या' बनवणार्‍या मंगेश हडवळेच्या 'देख इंडियन सर्कस' या चित्रपटासाठी नुकताच मिळाला. 'गँग्स'साठी नव्हे.

बाकी, हल्ली चित्रपटाची समीक्षा करणं, म्हणजे संपूर्ण कथा सांगणं, असाच समज असावा. वृत्तपत्रांमधून हे होतंच, मायबोलीही त्याला अपवाद नाही.

चित्रपट संपला की श्रेयनामावलीनंतर दुसर्‍या भागाची झलक दिसते.>> ओह! हे पाहिलेच नाही.

मलाही जबरदस्त आवडला गेंग्स ऑफ़ वासेपुर

हां चित्रपट खर्या कहानी वर आधारित आहे, जी चार नावे स्टोरी writing मधे आहेत, त्यातल्या एक जण खरेच वासेपुर च आहे अणि त्यानेच ह्या स्टोरी चा पहिला ड्राफ्ट बनवला होता. (तो मुंबईत पाव भाजी च्या ठेल्यावर काम करतो असे वाचले कुठे तरी)

मला direction, screenplay , कास्टिंग अणि म्यूजिक compostion प्रचंड आवडल, इतका चपखल लोकल फ्लेवर दिलाय संगीताला की, हट्स ऑफ़ टू स्नेहा खानवलकर

बाकी, हल्ली चित्रपटाची समीक्षा करणं, म्हणजे संपूर्ण कथा सांगणं, असाच समज असावा + १ चिनुक्ष

समस्या अशी आहे, की प्रत्येक जण सिने-समीक्षक नसतो. सिनेमाची भाषा बहुसंख्य प्रेक्षकांना कळत नाही. 'तीन तास मनोरंजन' हाच अनेकांचा उद्देश असतो. सिनेमा कसा पहावा, याचे मार्गदर्शन सर्वांना व्हावे म्हणून ज्यांना सिनेमाची भाषा कळते, अशांनी 'गँग्ज' सारख्या वेगळ्या वाटेवरच्या सिनेमांबद्दल तरी लिहिले पाहिजे, जेणे करून माझ्यासारख्या असंख्य सामान्य सिनेरसिकांची समज वाढेल. इतर माध्यमांत गणेश मतकरी, पंकज भोसले वगैरे मंडळी असे लिखाण करतांना दिसतात. मायबोलीवर शर्मिला फडके यांसारख्या सदस्यांनी लिहिले पाहिजे.
शर्मिलाताईंना विनंती आहे, की त्यांनी वेळात वेळ काढून या सिनेमावर लिहावे. Happy

निवेदकाचा आवाज सरदार खानच्या काकाचे काम केलेल्या कलाकाराचा (पियुश मिश्रा) आहे. चित्रपट बरा आहे. पाहताना Kill Bill (किल बिल Happy ) चित्रपटाची आठवण झाली (style, naration etc).

पहिल्या भागाची शेवटची फ्रेम इतकी भारी आहे ना...मी टोटल फिदा त्या शॉट्वर Happy
मला अतिशय आवडला.. इतक्या घटना, इतकी माणसं, इतकी नाती.. इतके कॉम्पेक्स फॉर्म घेऊन येतात ना समोर... क्या बात है Happy

मला आवडला... गाणी निव्वळ अप्रतिम आहेत Happy Happy

अनुरागकडून अपेक्षा वाढल्याने, त्याच्या इतर सिनेमांशी ह्याची तुलना होणे स्वाभाविक आहे. दुसरा भाग बघायला उत्सुक आहे. एका हिंदी ब्लॉगवर ह्या सिनेमाबद्दल वाचले होते, त्यातला काही भाग इथे द्यावा म्हणतो... ब्लॉगची लिंक सोबत देतोय.

http://wp.me/pv36D-2nk

जनाब, ये एक सच्ची कहानी पर आधारित है. फिल्म में कोई हीरो नहीं है. मतलब, conventional defintion वाला तो कतई नहीं. सरदार खान निहायती कमीना, शातिर, ठरकी और एक हत्यारा है. राह-चलते आदमी को जो चाक़ू गोद-गोद के मारने में हिचकी नहीं लेता उससे आपको बहुत sympathy तो नहीं होनी चाहिए.

अगर आप ऐसे इंसान को ढूंढ रहे हैं जो किसी महिला की इज्ज़त लुटने से बचाता है, या किसी गाँव को डाकुओं के आतंक से या फिर जिसकी बहन की हत्या हो गयी है और ऐसी ज़बरदस्ती थोपी हुई sympathy आपको चाहिए तो साहब ये गलत फिल्म है आपके लिए. यहाँ कहानीकार आपको ज़बरदस्ती कुछ “feel” करवाने की कोशिश नहीं कर रहा है. ये वो manipulative सिनेमा नहीं है जहाँ हीरो के आंसू निकलते ही पीछे से १०० violin मेघ-मल्हार बजाने लगते हैं और आपकी रुलाई फूट पड़ती है. वो काम आजकल के prime-time TV shows बेहतर कर लेते हैं.

इसे एक new-wave कह लीजिये या फिर सालों से चली आ रही इस तरह की फिल्मों का mainstream हो जाना कह लीजिये कि आज की हर फिल्म आपको manipulate नहीं करती बल्कि काफी कुछ आपकी judgment पर छोडती हैं और वासेपुर इस मामले में मील का पत्थर साबित होगी. आज से कई साल बाद तक इसका नाम याद रखा जायेगा जिसने सही मायने में unconventional और conventional के बीच की रेखा को पूरी तरह मिटा दिया.

ये कहानी बड़े शहरों को जोड़ते हुए किसी चौड़े highway की नहीं है, बल्कि उस highway से उतर के पांच मील अन्दर, इधर-धर दौड़ती हुई पगडंडियों और टूटी सड़कों की कहानी है. Problem आपको तब होगी जब आप highway पर अपनी air-conditioned कार में बैठे हुए ही अन्दर की तरफ देखेंगे.

थोडा सा धूप में बाहर निकलिए और अन्दर जाकर देखिये..

क्योंकि ये भी ज़रूरी है.

बाकी, हल्ली चित्रपटाची समीक्षा करणं, म्हणजे संपूर्ण कथा सांगणं, असाच समज असावा. वृत्तपत्रांमधून हे होतंच, मायबोलीही त्याला अपवाद नाही.>>> Proud

बाकी, हल्ली चित्रपटाची समीक्षा करणं, म्हणजे संपूर्ण कथा सांगणं, असाच समज असावा. वृत्तपत्रांमधून हे होतंच, मायबोलीही त्याला अपवाद नाही.

+१००

ज्ञानेशसी सहमत

लोकल फ्लेवर म्हणता येईल, असं वाटत नाही. काळाशी, स्थळाशी सुसंगत नसलेली वाद्यं आहेत, संगीतही त्या त्या काळाशी, स्थळाशी सुसंगत नसलेलं आहे. पण ते इतकं अफाट आहे, की चित्रपट बघताना असं काही जाणवतही नाही. गाण्यांपेक्षा मला पार्श्वसंगीत जास्त आवडलं. अर्थात अनेक गाणी पार्श्वसंगीताचा भाग बनूनच येतात. या रविवारच्या इंडियन एक्स्प्रेसच्या 'आय' पुरवणीत स्नेहा खानवलकर, अमित त्रिवेदी यांच्यासारख्या वेगळे प्रयोग करणार्‍या संगीतकारांवर मस्त लेख आहे.

एक तर दबंग, रावडी राठोड सारखे सिनेमे असतात. यांत अभिनेत्याची एकंदर इमेज, बरं नाव असलेल्या अभिनेत्रीसोबत प्रेम, रोमान्स आणि नाचगाणी, आंगिक आणि शाब्दिक विनोद यांचा वापर, टाळीशिटीजनक संवाद आणि रक्त सळसळवणारी अ‍ॅक्शन. हा तर आपल्या बॉलिवुडचा मुख्य प्रवाह.
या मुख्य प्रवाहातही सामाजिक प्रश्न हाताळणारे, निव्वळ प्रेमकथा-सुडकथा-बंडकथा दाखवणारे चित्रपट, निव्वळ विनोदी-नर्मविनोदी फार्सिकल चित्रपट असेही उपप्रवाह असतातच.

पण हाच फॉर्म्युला वापरून सिनेमे बनवणंही इतकं सोपं नसतं. आम्हा प्रेक्षकांना असं कुणीही सहज फसवू शकत नाही. गोवारीकर, फराहखान सारख्यांचेही काही सिनेमे हाच फॉर्म्युला वापरूनही बॉक्स ऑफिसवर आवाज न करता पडतात. कारण त्यातला मुर्ख हास्यास्पद विनोद आपल्याला अजिबात आवडत नाही. अशाच प्रकारे फसलेल्या प्रेमकथा-सुडकथा-बंडकथांना आपण बरोबर जागा दाखवतो. सुभाष घई आणि प्रकाश झा यांनी देखील नीट काम नाही केलं, तर आपण त्यांना खाली बसवतो. बॉलिवुड की नस नस जो पहचानते है!

यानंतरही 'प्रेक्षक' म्हणून खरंच प्रगल्भ झालो आहोत का, हा खरा प्रश्न आहे. इथं 'प्रगल्भता' हा शब्दप्रयोग मी 'बौध्दिक कुवत' या अर्थी वापरला नाही. 'पडद्यावर दिसणारं कितपत सत्य, वास्तव असू शकेल?' हा एक भाग; आणि 'सत्य / असत्य किंवा वास्तव / अवास्तव- जे काय असेल ते पडद्यावर नक्की कशा प्रकारे मांडलं आहे?' हा दुसरा भाग. आपण 'बॉलिवुड'चे आदर्श प्रेक्षक झालो खरे. त्यापलीकडे कधी जाणार हा खरा प्रश्न. मुख्य कारण म्हणजे आपले सिनेमे बदलायची तयारी दाखवत आहेत. 'टाळ्या शिट्या नाही दिल्या चालतील, पण काय दाखवलं आहे, कशा पद्धतीने दाखवलं आहे- ते कृपया बघा' असं निर्माते दिग्दर्शक म्हणू लागले आहेत.

अंडरवर्ल्डबद्दल जिज्ञासा आपणा सर्वांनाच असतं. तिथलं जग कसं असेल, तिथली नाती, भावभावना, बोलणंचालणं कसं असेल- याचा आपण विचार आपण अनेक वेळा करतो. त्याचं वास्तव / अवास्तव / भडक चित्रण करणारे अनेक सिनेमे आपण बघतो. मात्र या जगाच्या एका विशिष्ठ सुप्त आकर्षणापोटी का होईना, आपल्याला तिथले लोकही 'नायक' म्हणून हवे असतात. त्यांनाही सामान्य माणसागत प्रश्न असतील. हातात चाकू असला तरी त्यांच्याही मनात पाकपुक होत असेल, इतकंच नव्हे, तर त्यातले काही डरपोकही असतील, हलकट असतील, 'बेवकुफ' असतील, चोरून 'कोठी'वर जात असतील, बायकांना शेलकी शिवीगाळ करत असतील- हे काही सहजासहजी पचनी पडत नाही. ते स्वीकारलं समजा तरी पडद्यावर दाखवलेलं आवडत नाही. अंडरवर्ल्डचा नायक म्हणजे फुल्ल अ‍ॅक्शन, रात्रंदिवस हातात बंदूक आणि तोंडातून सतत हादरवून टाकणारे डॉयलॉग्ज- हे आपण बघत आलो. त्याचं घर, कपडे, वावरणं, मित्र हे सारंच महान, चकचकीत, डोळे मोठे करून बघत राहावं असं. यातलं कुणीही आणि काहीही सामान्य नाही. मुळात काहीही 'सामान्य' पडद्यावर बघायची आपल्याला आपल्या बॉलिवुडने सवयच ठेवली नाही!

गुन्हेगारी जगातही आपल्यासारखीच माणसं असतात. त्यांच्या बर्‍याच गोष्टी सामान्य असू शकतात. त्याचे कपडे मळके-साधे असू शकतात, तो (सरकते दरवाजे, हिर्‍यांच्या तिजोर्‍या, स्विमिंग पूल, मोठी झुंबरं आणि दोन दोन जिने असलेले प्रचंड दिवाणखाने नसलेल्या) छोट्या-अडचणीच्या-झोपडपट्टीतल्या घरात राहत असू शकतो, बायकोकडून थपडा खाऊ शकतो, त्याची मुलंही तुमच्याआमच्या मुलांसारखीच सामान्य असतात, वागतात, साधे कपडे घालतात, चिडतात, रडतात. तो सिनेम्याचा नायक असला, आणि त्याने आयुष्याचं ध्येय-बिय काही ठेवलं असलं, तरी ते अर्धवट राहू शकतं- हे वास्तव चित्र 'गँग्ज ऑफ वासेपूर' सारखे सिनेमे घेऊन येतात. परदेशी चकचकाट नसलेल्या या कलाकृती खर्‍या अर्थाने आपल्या समाजाशी-संस्कृतीशी बांधिलकी दाखवतात. आपलं प्रतिबिंब दाखवतात. या चित्रपटांचं स्वागत केलं पाहिजे. एक प्रेक्षक म्हणून माझी जबाबदारी मी समजतो. कारण 'चित्रपट बघणे' हा आता फक्त माझ्या करमणुकीचा भाग राहिलेला नाही. एक तर माझ्या जगण्याचं ते प्रतिबिंब आहे, हे एक; आणि माझ्या रोजच्या जगण्यावर त्याचा मोठा परिणाम होतो- हे दुसरं. Happy

या आरशात बघायची सवय आता मला झाली पाहिजे. या आरशात कसं बघायचं- हे खास करून शिकणं आता गरजेचं आहे. भारतीय प्रेक्षकाला असे सिनेमे कसे बघायचे- या प्रशिक्षणाची गरज आहे, असं अनुराग कश्यप जे म्हणाला, त्याला माझं अनुमोदन. मला प्रशिक्षणाची गरज आहे, याचा अर्थ मला सिनेमे कळत नाहीत, बघता येत नाहीत, किंवा मी मठ्ठ आहे असा होत नाही. माझ्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणार्‍या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता यायलाच हव्यात. बडजात्या, चोप्रा, जोहर, रोशन, घई, झा, भट यांच्या सिनेम्यांवर मी एक्स्पर्ट कॉमेंट करू शकतोच आहे की आधीपासून..! याचा अर्थ- त्यापेक्षा अजून जास्त आणि जास्त विषयांवर, पातळ्यांवर बोलण्याचा माझा हक्क आहे, माझी गरजही आहे. Happy

साजिरा मस्त लिहालयेस

मला अजुन एक गोष्ट मनापासून आवडली ह्या सिनेमातली, ती म्हणजे त्यात येणारा under the belt and black humor.....अश्लील असला तरी खरा खुरा विनोद.....आणि खरच अश्याच पध्ततीने सादर होतो हे स्वतः पाहिलंय मी

चिनुक्ष च हे पटल कि गाणी काळाशी, स्थळाशी सुसंगत नसलेली वाद्यं आहेत>>>>पण ती भन्नाट आहेत हे नक्की...

>>या आरशात बघायची सवय आता मला झाली पाहिजे. या आरशात कसं बघायचं- हे खास करून शिकणं आता गरजेचं आहे. भारतीय प्रेक्षकाला असे सिनेमे कसे बघायचे- या प्रशिक्षणाची गरज आहे, <<

अजिबात नाहि पटलं.

चित्रपट स्टोरी टेलींग, सादरीकरणात फसला (प्रेक्षकांना नाहि झेपला) तर तो दिग्दर्शकाचा दोष आहे.

चित्रपट कसे बघायचे, हे सिंगल माल्ट कशी प्यायची असं सांगण्या सारखं आहे का? Happy

'सिनेमा बघणं' हा एक वेगळा चर्चेचा आणि बीबीचा विषय आहे.
पण तरीही प्रशिक्षणानं सिनेमा बघायला जमेलंच असं नाही असं मला वाटतं. मुळात सिनेमा हे माध्यमच असं आहे ना की त्याबद्दल ओढ हवी, पॅशन हवी ! मग आपोआप ते वेडच तुमच्या डोळ्यावरच्या समाजाच्या, भाषेच्या, कंडीशनींगच्या पट्ट्या एक एक करत हळूहळू दूर करत.. आणि तुमच्याही नकळत तुम्ही 'सिनेमा बघायला' लागता.
नुकताच एक नव्या पीढीचा कोरियन सिनेमा पाहिला... आणि हे असंही जग असू शकतं, कोणाच्या मनात असेही विचार असू शकतात, माणसं अश्याही वातावरणात वाढतात ह्याचा धक्का बसला...
इस्ट युरोपियन सिनेमा आधी पचायला अवघड जायचा. त्यातली माणसं अशी कशी काय असू शकतात ? हाच पहिला प्रश्न... पण माझ्या जगाच्या बाहेर असलं तरी त्या लोकांसाठी 'ते त्यांचं जग' आहे, ह्या विचारापाशी आल्यावर त्यातली माणसंही 'मी त्या जागी असते तर कदाचित अशीच वागले असते' इतकी ओळखीची वाटायला लागतात. निदान माझ्यासाठी तरी ही 'मी आणि माझ्याभोवतीचं जग' ही झापडं काढण्यात सिनेमाचा खूप खूप मोठा वाटा आहे.

बरं सगळेच पाहिलेले चित्रपट आवडतात का? जमलेले असतात का? अजिबातच नाही..
पण जोपर्यंत असे न जमलेले चित्रपट पाहात नाही, तोपर्यंत 'एखादा मस्त जमलेला चित्रपट' तुम्हाला काय प्रतीचा आणि किती आनंद, समाधान देऊन जातो तोही अनुभव नाही...

राजचं म्हणणं पटलं मला.
काही गोष्टी शिकवून करण्यात मजा नाही तर त्या करून शिकण्यात जास्त मजा आहे.. माझ्यासाठी सिनेमा ही अशीच एक गोष्ट Happy

Pages