किती दूर राहिले शहर मानसामधले..

Submitted by भारती.. on 25 June, 2012 - 06:23

किती दूर राहिले शहर मानसामधले ..

मन उदास आहे आणि खूप एकाकी..सांज ढळते आहे आणि अधिकृत वातावरण तयार होतेय एकटेपणाचे.अटळ गतकालरंजनाचे.

या एकटेपणापासून पळण्याचे किती उपाय योजले,किती दूरदूरवर शोध घेतले.
परिणाम एकच झाला,स्वतःपासूनही दूर गेले.
पण म्हणून आणखी कुणाच्या जवळ जायची गोष्टच नको.
असे थोडेच असते,स्वतःपासून दूर म्हणजे कुणाच्या जवळ?
मग तो कोणता चकवा होता जो निरंतर आशा जागवीत होता?

मग अगदी जगाकडे पाठ फिरवून एका एकांतिक भिंतीसमोर उभी राहिले मी.
तेव्हाही हे धडधडते हृदय कुणाची कशाची वाट पहात होते ?
कुठे गेला तो आत्मसन्मान?

हे किती कथानकांचे तुकडे विखुरले आहेत अवती भवती.
हा केवढा आठवणींचा गलबलाट .मी शब्दांत उतरवले हे ओझे.
आणि मारव्याचे स्वरकोंदण त्याला योजले कुणी..
खोल खोल घरात मनात स्वतःत बुडून घेतलेला शोध ,झालेला बोध ..

किती दूर राहिले.. एक विशुद्ध भावना एकाकीपणातल्या स्मरणयात्रेची, एक गीत.

http://www.youtube.com/watch?v=9rvMGxCtlxQ&feature=plcp

भारती बिर्जे डिग्गीकर

गुलमोहर: 

आभार निंबुडा..कविता म्हणण्यापेक्षा निखळ फीलिंग देणारी ही रचना होती..तू सोडून कुणीच ऐकलेली दिसत नाही Happy असो.
'अवंतिका' या लोकप्रिय सीरीयलच्या शेवटच्या भागात अवंतिकेचे मनोगत म्हणून ही पार्श्वसंगीतात वाजवण्यात आली. एरवी तशी माझ्या ग्रूपची आवडती पण बाहेर फारशी न ऐकली गेलेली रचना.

धन्स जाई..
धन्यवाद अगो एका उत्कट प्रतिसादासाठी.तुझ्यामुळे अवंतिकाची ही लिंक मिळाली अन अजून एका स्मरणरंजनाचे धागे उलगडले..
https://www.youtube.com/watch?v=axAiJLPLqXY

भारती,

कवितेच्या (गीताच्या) ओळी हेडर पोस्ट मध्ये लिहिता का? खूप सुंदर रचना आहे.

इथे प्रतिसादात पोस्टतेय (तुमची हरकत असल्यास सांगा. नंतर प्रतिसाद संपादित करेन.)

किती दूर राहिले शहर मानसामधले
किती दूर राहिले सुह्रुद जीवी जपलेले
किती पूर खळाळत आले गेले नंतर
किती माझापासून मीच काटले अंतर

हे कोणी लिहिले वियोग प्रारब्धातील
कुणी रेशीमगाठी अचूक तोडल्या मागील
ती नियती होती की निर्णय माझेच
हे कुणी लढवले अवघड सारे पेच

घर निवांत येथे प्रेमाचा ओलावा
मन थकून परतले घेते शांत विसावा
वार्‍यावर हलती स्वतःशीच पण पडदे
ना जवळ कुणीही सांज जराशी गडदे

आज ऐकले

खूप छान आहे
'चंद्रस्वप्न एकले' पेक्षाही जास्त आवडले
गायिकेचा आवाजही छान आहे अगदी

किती वैश्विक असतात ना या अशा काही भावना! तुम्ही हे छळणारे हताश एकटेपण किती जसेच्या तसे मांडले आहे! भिडलेच! गाण्यापेक्षा कविता म्हणून जास्त आवडले.

व्वाह!!!
स्वगत आवडलं भारतीताई! Happy
नंतर निवांत ऐकेन...

ती नियती होती की निर्णय माझेच
हे कुणी लढवले अवघड सारे पेच
>> क्या बात! Happy

निंबुडा, तुलाही ठांकू Happy

वैभव, गायिका वृषाली पाटील.
फार ताकदीची तरुण गायिका आहे, खूप करियरिस्ट नसल्यामुळे थोडी मागे राहिलीय.

अमेलिया, आनंदयात्री,पारिजाता, खूप आभार. अमेलिया, तुला कविता म्हणून आवडली म्हणालीस म्हणून आठवले, मी ही कविता मित्राच्या बायकोसाठी लिहिली होती,म्हणून थोडी सोपी लिहिली, ( Wink माझ्यावर जरा दुर्बोधतेचा आळ येतो कधीकधी) , मजा म्हणजे त्या मित्रानेच हिला संगीत दिलं.त्याचा पहिलाच प्रयत्न हा.

निंबुडा कविता देण्याबद्दल खूप आभार.शीर्षक संपादित करतेय मीही.

My god.. सुंदर>>>???
अहो पारिजाता जी ; नुसतेच सुंदर काय म्हणताय ....फार फार सुंदर लिहितात भरतीताई
त्यांचे मायबोलीवरचे आजवरचे समग्र लेखन पहाच
कविता व कवियत्री कशी असवी हे त्यांच्या कडून तुम्हाला नक्कीच शिकायला मिळेल

भारती,
हे गीत ऐकलं मी आताच्या गेल्या रविवारी...
प्रचंड भावलं... ज्या आर्ततेने वृषालींनी गायलंय त्याने परिणाम खूप वाढलाय...
पण इथे तुमच्या धाग्यावर फक्त मनोगत दिसले, गीतातले शब्द नाही, म्हणून प्रतिसाद राहून गेला होता...

किती पूर खळाळत आले गेले नंतर
किती माझापासून मीच काटले अंतर>> भारती, ऐकतानाही वाटले होते... किती माझ्यापासून मीच कापले अंतर.. हे ही चालले असते का?

घर निवांत येथे प्रेमाचा ओलावा
मन थकून परतले घेते शांत विसावा
वार्‍यावर हलती स्वतःशीच पण पडदे
ना जवळ कुणीही सांज जराशी रडते>> अफाट सुंदर ओळी, भारती...!!

आणि

"किती दूर राहिले शहर माणसामधले" ह्या ओळीसाठी शब्दच नाहीत... चपखलपणे एकटेपणा व्यक्त झालाय... व्व्वा!!

व्वा!! सुरेख...
तुझी शब्दयोजना आणि त्याला लाभलेलं मारव्याचं कोंदण खरंच सुरेख!

गायिकेचा आवाजही गोड आहे..
धन्यवाद भारतीताई.. मस्त!

भारती,

करेक्शन बद्दल धन्यवाद. माझा प्रतिसाद मी संपादित केला आहे.

"किती दूर राहिले शहर माणसामधले" ह्या ओळीसाठी शब्दच नाहीत >>
बागु, मानसामधले! तुझा टायपो झालाय का? की तसेच वाचलेस?

वैभव,किती ते कौतुक ! इथे कोणीच कमी नाही, मलाही तुम्हा सर्वांच्या रचना प्रचंड भावतात ..
निंबुडा,पुनरेकवार आभार ..
बागेश्री , खरेच 'कापले' ही चालले असते, एखादा विविक्षितच शब्द का येतो याचे उत्तर देता येत नाही.
अन निंबुडाने सांगितल्याप्रमाणे ते 'मानसा'मधले (मनामधले) शहर आहे, ते ऐकताना 'माणसा'मधलेही वाटू शकते.
कलायडोस्कोप फिरवावा तसे अर्थ बदलतात.पण भाव तोच रहातो.
धन्स अंजली, होय,तो भाव स्थिर रहातो मारव्यामुळे .

भारती...
<<किती दूर राहिले शहर मानसामधले>>
मी शब्दांत उतरवले हे ओझे.... इतकं तरल ओझं इतकं गहिरं अन थेट काळजात उतरणारं...
तुला साष्टांग नमस्कार, बाई.

हे कोणी लिहिले वियोग प्रारब्धातील
कुणी रेशीमगाठी अचूक तोडल्या मागील >> वाह..
ती नियती होती की निर्णय माझेच
हे कुणी लढवले अवघड सारे पेच >> क्या बात है...

फारच सुंदर गायलं आहे... अप्रतिम रचना...

पहील्यांदा काय लिहीलय हे कळालच नाही.. मग कविता वाचली मग स्वगत वाचलं मग गाण पुन्हा ऐकल.. तेंव्हा कळल.. माझ्या सारखच इतरांच झाल असणर म्हणुनच कोणी प्रतिसाद दिला नसेल. Happy

वृषाली पाटील ह्यांचा आवाज फार सुंदर आहे हो.. त्यांना प्रतिसाद नक्की कळवा.

दाद, तुझी दाद मिळाली , इतरही समानधर्मियांची. अजून काय हवं असतं ? कुणीतरी म्हटलंय ना कवितेतच की 'तुझा एकटेपणा अन माझा एकटेपणा सोबत करतील ना एकमेकांची ..'

सत्यजीत, आभार, होय आता कळतेय की असा काहीसा प्रकार झाला असेल या लेखनाचा कारण हे मी माबोवर आल्याआल्या टाकलेले दोन धागे होते. एक हे गीत, अन दुसरे 'पंढरपूर'..अर्थात्,'अनलंकृत माझा प्रियतम' हे माझे गाणे , वृषालीनेच गायलेले. (नक्की ऐका.)दोन्ही वाचले/ऐकले गेले नाहीत. मलाही या लेखनाचे नक्की वर्गीकरण कसे करावे कळत नव्हते तेव्हा. (अजूनही गोंधळ आहेच !)
वृषालीला सर्वांच्या काँप्लिमेंट्स कळवेनच. तिला फार आनंद होईल.

हे किती कथानकांचे तुकडे विखुरले आहेत अवती भवती.
>>
खरच, या तुकड्यांचे काय करायचे हा एक प्रश्न आहे. बरं सगळे तुकडे काळानुसार बदलतात, संदर्भ बदलतात. अर्थ बदलतात आणि जे कोलाज तयार होते ते म्हण्जे 'आज' हा जो 'आज' आहे तोही उद्या बदलतो.
असे का?
कधी कधी मला अतिशय उबग येतो 'हेल्पलेस'पणाचा. एकही तुकडा आपला स्वतःचा हक्काचा नाही, परावलंबित्व.
असो
खुप छान लिहिलय. आवडले.