असणं!

Submitted by बागेश्री on 19 June, 2012 - 04:36

एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं?
की आपल्या भावविश्वाची सारी सूत्र,
त्या हाती सुपूर्द व्हावीत...
आपण रिक्त होऊन!

बेदरकारपणे स्वतःला
आयुष्याच्या आरामखूर्चीत झोकून द्यावं,
मिटल्या डोळ्यांनी आता,
ते असणं अनुभवावं!
नव्याने साठवावं!

ते असणं मात्र टिकावं, रेंगाळावं-
जगताना पुरून उरावं!
कायमच, सुख मिळालं की दु:ख
मागे रांगेत उभेच असतात, ह्या नियमाला तोडून......

गुलमोहर: 

भन्नाट गोड झाली आहे कविता. फार आवडली. एवढ्याशा कवितेत एवढं सारं मांडता येणं म्हणजे भारीच गं ! Happy

<<एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं? >>> अगदी अगदी गं. Blush
<<ते असणं मात्र टिकावं, रेंगाळावं-
जगताना पुरून उरावं! >>>>> हे पण खरंच.

आयुष्याची आरामखुर्ची >>> काय मस्त कल्पना आहे. Happy

एक नवरा(/बायको) आणि आपले आई-बाबा या दोनच ठिकाणी अशी सगळी सुत्रं सोपवुन, डोळे मिटुन झोकुन देता येतं. नै का? दोन्ही ठिकाणी माझ्यासाठी आरामखुर्च्या तयार होत्या. मात्र शेवटची ओळ वाचताना घाबरायला झालं.

एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं?
की आपल्या भावविश्वाची सारी सूत्र,
त्या हाती सुपूर्द व्हावीत...
आपण रिक्त होऊन!

>>> Easy to write , but do u really "FEEL" this ? Wink

एक नवरा(/बायको) आणि आपले आई-बाबा या दोनच ठिकाणी अशी सगळी सुत्रं सोपवुन, डोळे मिटुन झोकुन देता येतं. नै का? दोन्ही ठिकाणी माझ्यासाठी आरामखुर्च्या तयार होत्या. मात्र शेवटची ओळ वाचताना घाबरायला झालं.>> तंतोतंत पोहोचलय लिखाण मने, धन्स! ती धास्ती नांदतेच मनात, तीच उतरवलीये..

Easy to write , but do u really "FEEL" this ? >>Ofcource yes! Rather I would say, its easy to write when you have felt it intimately...!! Happy

छान!

एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं?
की आपल्या भावविश्वाची सारी सूत्र,
त्या हाती सुपूर्द व्हावीत...
आपण रिक्त होऊन!

>>> अत्यंत अचूकपणे शब्दांत पकडलं आहेस!

मी त्या सुंदर शब्दावर विचार करतोय, पुढच्या ओळी पाहता 'सुंदर'ऐवजी अजून एखादा अधिक समर्पक शब्द येऊ शकला असता का...

मी त्या सुंदर शब्दावर विचार करतोय, पुढच्या ओळी पाहता 'सुंदर'ऐवजी अजून एखादा अधिक समर्पक शब्द येऊ शकला असता का...>> नचिकेत, पुढच्या शब्दांना धरून मला, 'आश्वासक' असा शब्द बदलण्याचा मोह झाला होता, तो चपखलही वाटला..
पण मला 'सुंदर" असतं असंच म्हणायचं होतं! 'सर्वतोपरी सुंदर असणं' ते निव्वळ 'आहे' म्हणून 'सुंदरपणाच्या' पदाला पोहोचलेलं 'असणं"!!

सर्वांची खूप आभारी, लोभ असाच असावा Happy

विनायक,
निवडक १० साठी, तुझे विशेष आभार Happy

एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं?
की आपल्या भावविश्वाची सारी सूत्र,
त्या हाती सुपूर्द व्हावीत...
आपण रिक्त होऊन!
>> हे वाचल्या वाचल्या मला सुंदर ऐवजी एखाद्याचं 'व्यापलेपण' किंवा 'व्यापूनही उरलेलं असणं' असं काहीतरी सुचलं होतं. नेमकं काय ते अजूनही सांगता येत नाहीये. पण पुढील ओळी पाहता ते 'असले'पण फक्त सुंदर या एका विशेषणात बांधता येईल का, आणि बांधल्यास त्या असण्यावरच अन्याय होईल असं वाटण्याइतका अर्थ मला लागला. सुंदर हा शब्द एका मर्यादेनंतर माझ्यातली शब्दसंपदा तोकडी असल्याची जाणीव करून देतो. शब्द चित्रही सुंदर, कविताही सुंदर, मुलगीही सुंदर, वेदनाही सुंदर आणि एखाद्याचं असणंही सुंदरच? तुझ्या पुढील ओळी पाहता, ते असणं इतकं सर्वव्यापी झालंय, की त्या 'असण्या'प्रती असलेल्या भावनांमुळे अख्खं आयुष्यही एका वेगळ्याच अर्थाचे दिसू लागलंय. आजच सकाळी ज्ञानोबांचं 'तुझा तूचि देव तुझा तूचि भाव' ऐकलं आणि कदाचित असं काहितरी एकरूप वाटावं असं हे 'असणं' असेल असं वाटून गेलं. बाकी कुणा एका व्यक्तिबद्दल हे म्हणायचं असेल (तसं वर प्रतिसादातून सूचित आणि अनुमोदित झालंच आहे) तर मग मला लागलेला अर्थ फारच वेगळा आहे. Happy

अर्थात, तुला जे म्हणायचं होतं त्याचं स्पष्टीकरण तू दिले आहेसच, त्यामुळे तुला असा नेमका शब्द सापडल्याबद्दल अभिनंदन! Happy
मला मात्र नेमका शब्द सापडला नाहीये..
पुलेशु.

नचिकेत,
जे जे हवंहवंस, लोभस, गरजेचं, आपल्यातलं आपलेपण जाणवून देणारं- घेणारं, ते ते सारं सुंदर- तू म्हणतोस ती व्यापकताही!आपल्या अस्तित्वावर व्यापून राहिलेला तर अतीव सुंदर! असं मला जाणवतं, सुंदरता मला अशी भासते म्हणून तो शब्द योजावा वाटला असावा.
सकारात्मक विचारमंथनासाठी खूप आभार! (तुला शब्द सुचला की कळव रे नक्की.. Happy )

मयू, स्पेशल धन्स, निवडक १० साठी! Happy

Pages