आंतरराष्ट्रीय शालेय अभ्यासक्रमांची तोंडओळख - भाग १

Submitted by लसावि on 12 June, 2012 - 00:18

आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम म्हणजे काय?
शब्दार्थाच्या दृष्टीने अनेक देशात उपलब्ध अशा अभ्यासक्रम असा अर्थ निघतो. पण त्या अर्थाने सीबीएसई, आयसीएसई हे भारतीय अभ्यासक्रमही आंतरराष्ट्रीय ठरतात, त्यामुळे ही व्याख्या चुकीची आहे.
जगातील सर्व देशात राबवता येईल अशा, स्वतंत्र (असरकारी) संस्था/संघटनांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमाला आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम म्हणता येईल.

आंतरराष्ट्रीय शाळा अर्थात इंटरनॅशनल स्कूल म्हणजे काय?
आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम राबवणार्‍या शाळेस इंटरनॅशनल स्कूल म्हणतात. असा अभ्यासक्रम राबवण्यासाठी शाळेकडे तो अभ्यासक्रम तयार करणार्‍या संस्थेची संलग्नता (Affiliation) असणे अनिवार्य आहे.
या शाळा भारतीय अभ्यासक्रमही राबवू शकतात.
फक्त शाळेच्या नावात इंटरनॅशनल शब्द असल्याने ती आंतरराष्ट्रीय होत नाही, तसेच प्रत्येक आंतरराष्ट्रीय शाळेच्या नावात हा शब्द असलाच पाहि़जे असेही बंधन नाही.
इंटरनॅशनल स्कूलमध्ये परदेशी विद्यार्थी अथवा शिक्षक असतातच असे नाही अथवा असलेच पाहिजेत असेही बंधन नाही.

भारतात कोणते आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत?
भारतात प्रामुख्याने दोन संस्थांचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
१] International Baccalaureate अर्थात आय.बी. आणि
२] University of Cambridge International Examinations अर्थात सीआयई.

या दोन्ही संस्थांच्या अभ्यासक्रमांची ठळक वैशिष्ठ्ये काय आहेत?
१] विद्यार्थ्यांच्या माहितीत (information) भर घालण्यापेक्षा त्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचा (Skills) विकास करणे हे दोन्ही अभ्यासक्रमांचे समान सूत्र आहे.
२] विषय निवडीमधील प्रचंड लवचिकता हे देखील या अभ्यासक्रमांचे वैशिष्ठ्य आहे.
३] संपादित ज्ञानाचे उपयोजन विद्यार्थी कसे करू शकतो यावर आधारित परिक्षा पद्धती (Application based), 'घोका आणि ओका' नाही!

या शाळातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला (१०वी अथवा १२ नंतर) काय संधी उपलब्ध आहेत?
सहसा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम/शाळा यात शिक्षण घेउन १२वी नंतर विद्यार्थी अंडरग्रॅज्युएट शिक्षणासाठी परदेशात जातात. मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांना भारतात संधी नाही. सर्व महत्वाच्या भारतीय विश्वविद्यालयांनी या दोन्ही संस्थांच्या अभ्यासक्रमास/ निकालास मान्यता दिली आहे. आयबी व सीआयईच्या ग्रेड सिस्टीम्सचे भारतीय गुणांमध्ये रुपांतर (कनव्हर्जन) केले जाते व त्याप्रमाणे भारतात अ‍ॅडमिशन मिळते.
मात्र हे दोन्ही अभ्यासक्रम भारतीय प्रवेशपरिक्षांच्या (उदा. सीईटी, जेईई) तयारीच्या दृष्टीने फारसे उपयोगी नाहीत कारण त्यांचा तो अ‍ॅप्रोचच नाही. दुसरे असे की या दोन्ही अभ्यासक्रमांच्या परिक्षा आणि सीईटीसारख्या प्रवेशपरिक्षा एकाच दिवशी येऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम/शाळा यांची फी किती असते?
सर्वसाधारणपणे अशा शाळांची फी सामान्य शाळांपेक्षा जास्त असते. मुंबई-पुण्यात ही फी १ ते ३ लाख दरवर्षी एवढी आहे. बंगलोर-दिल्ली येथे यापेक्षा जास्त फी आकारणार्‍या शाळाही आहेत. शाळा निवासी असेल तर फी अजून वाढते. या सर्व अभ्यासक्रमाची पुस्तकेही महाग असतात. काही शाळा तो खर्च फी मध्येच धरतात तर काही त्यासाठी वेगळे पैसे आकारतात.
फी जास्त असण्याची अनेक कारणे आहेत. या शाळांना सरकारी अनुदान अजिबात नाही. आयबीसारख्या संस्थेशी संलग्नता मिळण्यासाठी प्रयोगशाळा, लायब्ररी, अत्याधुनिक तंत्रज्ञान इत्यादी इन्फ्रास्ट्रक्चर (त्यात शिक्षक ही आले!) अत्युत्तम असावे लागते त्यामुळेही शाळांचा खर्च वाढतो.
फी जास्त असली तरी त्या तोडीचे खर्‍या अर्थाने सर्वांगिण शिक्षण हे अभ्यासक्रम देतात, इट्स वर्थ इट!
का व कसे ते पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत काही शंका असतील तर जरुर विचारा म्हणजे पुढचा भाग लिहीताना त्या मुद्द्यांचीही चर्चा करता येईल.

गुलमोहर: 

@ नंदिनी- भारतीय अभ्यासक्रमात 'माहिती'वर जास्त भर आहे तर इंटरनॅशनलमधे 'क्षमते'ला. त्यामुळे असा सिलॅबस शिकणारा विद्यार्थी अचानक भारतीय सिलॅबस करु लागला तर त्या माहितीच्या भाराखाली दबण्याची शक्यता वाढते.
@ निंबुडा- सीआयईवरील वेगळ्या भागाची वाट पहा!

खुप माहीतीपुर्ण लेखमाला सुरु केलीत त्याबद्द्ल धन्यवाद......

CBSE , ICSE , IGCSE या तिघांच्या अभ्यासक्रमात नेमका फरक काय आहे....... जर सतत देश-परदेश (मुख्यतः युरोप,गल्फ, सिंगापुर्,मलयशिया) करावे लागत असेल, तर मुलांच्या दृष्टीने यातील कोणत्या बोर्डमध्ये अ‍ॅडमिशन घेणे योग्य आहे? सध्या माझा मुलगा लहान (नर्सरी) आहे, तो ज्या शाळेत जातो ती CBSE बोर्डाची शाळा आहे. एकदा CBSE बोर्डाच्या शाळेत काही इयत्ता शिकले तर पुढे ICSE , IGCSE या बोर्डातील पुढील इयत्तेत अ‍ॅडमिशन मिळते का ? अभ्यासक्रमात मोठा फरक पडतो का?

माहितीपूर्ण लेखमाला! धन्यवाद!>>> +१
ज्यांची मुले या प्रकारच्या शाळांत जातात त्यांचे अनुभव वाचायला आवडेल.

रैना, फी बाबतीत व्यक्त केलेल्या मतास अनुमोदन. अजुन व्हरायटी ऑफ प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत....

तुम्ही सर्वांनी केंद्रीय विद्यालयाचा ह्यात का नाही विचार केला?

रैना, छानच लिहिलेस. मला त्या ट्रिपांच फार नवल वाटत! खरच गरज आहे का इतक्या लहान वयात इतक्या लांब लांबच्या परदेशात ट्रीपा काढायची? ही चक्क फसवणून आहे शाळेच्या नावाखाली लुबाडण्याची आणि एक ग्लॅमर तयार करण्याची.

तुम्ही सर्वांनी केंद्रीय विद्यालयाचा ह्यात का नाही विचार केला? >> अहो विषय आंतरराष्ट्रीय शालेय अभ्यासक्रमांची तोंडओळख असा आहे. त्यामुळे त्यात केंद्रीय विद्यालयाचा विचार कसा करायचा. त्यात फक्त cbse चा अभ्यासक्रम असतो.

पुण्यातली RIMS international school IGCSE जी NIBM रोड वर आहे त्याचा कोणाला अनुभव आहे का किंवा काही माहिती आहे का? symbiosis international school मध्ये पण IGCSE आहे पण ती लांब पडेल म्हणून ह्या शाळेचा विचार करतोय

Pages