आंतरराष्ट्रीय शालेय अभ्यासक्रमांची तोंडओळख - भाग १

Submitted by लसावि on 12 June, 2012 - 00:18

आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम म्हणजे काय?
शब्दार्थाच्या दृष्टीने अनेक देशात उपलब्ध अशा अभ्यासक्रम असा अर्थ निघतो. पण त्या अर्थाने सीबीएसई, आयसीएसई हे भारतीय अभ्यासक्रमही आंतरराष्ट्रीय ठरतात, त्यामुळे ही व्याख्या चुकीची आहे.
जगातील सर्व देशात राबवता येईल अशा, स्वतंत्र (असरकारी) संस्था/संघटनांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमाला आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम म्हणता येईल.

आंतरराष्ट्रीय शाळा अर्थात इंटरनॅशनल स्कूल म्हणजे काय?
आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम राबवणार्‍या शाळेस इंटरनॅशनल स्कूल म्हणतात. असा अभ्यासक्रम राबवण्यासाठी शाळेकडे तो अभ्यासक्रम तयार करणार्‍या संस्थेची संलग्नता (Affiliation) असणे अनिवार्य आहे.
या शाळा भारतीय अभ्यासक्रमही राबवू शकतात.
फक्त शाळेच्या नावात इंटरनॅशनल शब्द असल्याने ती आंतरराष्ट्रीय होत नाही, तसेच प्रत्येक आंतरराष्ट्रीय शाळेच्या नावात हा शब्द असलाच पाहि़जे असेही बंधन नाही.
इंटरनॅशनल स्कूलमध्ये परदेशी विद्यार्थी अथवा शिक्षक असतातच असे नाही अथवा असलेच पाहिजेत असेही बंधन नाही.

भारतात कोणते आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत?
भारतात प्रामुख्याने दोन संस्थांचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
१] International Baccalaureate अर्थात आय.बी. आणि
२] University of Cambridge International Examinations अर्थात सीआयई.

या दोन्ही संस्थांच्या अभ्यासक्रमांची ठळक वैशिष्ठ्ये काय आहेत?
१] विद्यार्थ्यांच्या माहितीत (information) भर घालण्यापेक्षा त्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचा (Skills) विकास करणे हे दोन्ही अभ्यासक्रमांचे समान सूत्र आहे.
२] विषय निवडीमधील प्रचंड लवचिकता हे देखील या अभ्यासक्रमांचे वैशिष्ठ्य आहे.
३] संपादित ज्ञानाचे उपयोजन विद्यार्थी कसे करू शकतो यावर आधारित परिक्षा पद्धती (Application based), 'घोका आणि ओका' नाही!

या शाळातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला (१०वी अथवा १२ नंतर) काय संधी उपलब्ध आहेत?
सहसा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम/शाळा यात शिक्षण घेउन १२वी नंतर विद्यार्थी अंडरग्रॅज्युएट शिक्षणासाठी परदेशात जातात. मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांना भारतात संधी नाही. सर्व महत्वाच्या भारतीय विश्वविद्यालयांनी या दोन्ही संस्थांच्या अभ्यासक्रमास/ निकालास मान्यता दिली आहे. आयबी व सीआयईच्या ग्रेड सिस्टीम्सचे भारतीय गुणांमध्ये रुपांतर (कनव्हर्जन) केले जाते व त्याप्रमाणे भारतात अ‍ॅडमिशन मिळते.
मात्र हे दोन्ही अभ्यासक्रम भारतीय प्रवेशपरिक्षांच्या (उदा. सीईटी, जेईई) तयारीच्या दृष्टीने फारसे उपयोगी नाहीत कारण त्यांचा तो अ‍ॅप्रोचच नाही. दुसरे असे की या दोन्ही अभ्यासक्रमांच्या परिक्षा आणि सीईटीसारख्या प्रवेशपरिक्षा एकाच दिवशी येऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम/शाळा यांची फी किती असते?
सर्वसाधारणपणे अशा शाळांची फी सामान्य शाळांपेक्षा जास्त असते. मुंबई-पुण्यात ही फी १ ते ३ लाख दरवर्षी एवढी आहे. बंगलोर-दिल्ली येथे यापेक्षा जास्त फी आकारणार्‍या शाळाही आहेत. शाळा निवासी असेल तर फी अजून वाढते. या सर्व अभ्यासक्रमाची पुस्तकेही महाग असतात. काही शाळा तो खर्च फी मध्येच धरतात तर काही त्यासाठी वेगळे पैसे आकारतात.
फी जास्त असण्याची अनेक कारणे आहेत. या शाळांना सरकारी अनुदान अजिबात नाही. आयबीसारख्या संस्थेशी संलग्नता मिळण्यासाठी प्रयोगशाळा, लायब्ररी, अत्याधुनिक तंत्रज्ञान इत्यादी इन्फ्रास्ट्रक्चर (त्यात शिक्षक ही आले!) अत्युत्तम असावे लागते त्यामुळेही शाळांचा खर्च वाढतो.
फी जास्त असली तरी त्या तोडीचे खर्‍या अर्थाने सर्वांगिण शिक्षण हे अभ्यासक्रम देतात, इट्स वर्थ इट!
का व कसे ते पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत काही शंका असतील तर जरुर विचारा म्हणजे पुढचा भाग लिहीताना त्या मुद्द्यांचीही चर्चा करता येईल.

गुलमोहर: 

धन्यवाद.
पुढिल भाग लवकर टाका.
लई मोट्टा डिसीजन घ्यायचा आहे. खरं तर मी तुम्हाला हे विचारणारच होते.

आगावा, फारच उपयोगी माहिती मिळत आहे. आणि ती सुद्धा अगदी माहितगार व्यक्तीकडून. धन्यवाद. Happy

लेक ऑलरेडी ICSE अभ्यासक्रम शिकत आहेच. पण पुढे निर्णय घेण्याच्या दृष्टिनं या माहितीचा खूप फायदा होईल. कारण तिला पुढे ICSE आणि IGCSE यातील अभ्यासक्रम निवडावा लागेल. आणि त्यापुढे IB चा पर्यायही असेल. जर ICSE आणि IGCSE यांबद्दलही थोडंसं सांगितलंस तर मार्गदर्शक ठरेल.

लई मोट्टा डिसीजन घ्यायचा आहे. खरं तर मी तुम्हाला हे विचारणारच होते.>>> +१.

जमलं तर आंतरजालावर हे अभ्यासक्रम राबवणार्‍या शाळांची लिस्ट असलीतर प्लीज दे.

आंतरराष्ट्रीय शालेय अभ्यासक्रमाबाबत काहीच म्हणायचे नाही. तो अभ्यासक्रम मला आवडतो.

पण भारतात राहताना हा पर्याय मी माझ्या पाल्यासाठी निवडला नसता याची कारणे शैक्षणिक पद्धत नसुन आर्थिक घटकांवर आधारीत जीवनशैली आहे.
१) फी
२) तशीच मजबुत फी असल्याकारणाने ज्या प्रकारची अतिश्रीमंत, उच्चमध्यमवर्गीय मुलं तिथे येतात त्यांची संगत आणि तदनुषंगीक येणारे विविध सामाजिक दबाव. त्यांच्या विशिष्ट ब्रँडेड वस्तु, त्यांच्या गप्पांचे स्तर, त्यांचे वाढदिवसांचे अर्थसंकल्प आणि स्नॉबरी मला एक पालक म्हणुन अस्वस्थ करते.
मुंबईत गोरेगावात एक नवीन फॅन्सी आयबी शाळा निघाली त्या वेळेस त्याची वार्षिक फी सहा लाख आणि त्यात बरीचशी हिरेव्यापार्‍यांची मुले म्हणुन सहकार्‍याने आपल्या मुलाला घातले नाही. ही दोन वर्षापुर्वीची गोष्ट. GIIS या शाळेतील सुविधा (आणि त्यांची फी) आणि इयत्ता आठवीत त्यांची अमेरिकेला जाणारी ट्रीप वगैरे पाहिले आहे
३)ही मुलं नंतर फक्त परदेशात शिकु शकतील असे वाटते. कमी साधनात शक्य तेवढे या आपल्याकडच्या शिक्षणात जाणता अजाणता अनेक स्वस्त पर्यायांचा अंतर्भाव होतो. त्याचे उगीच उदात्तीकरण न करता असे म्हणेन की मुलांना पुढे परदेशीच शिकवायचे स्वप्न असेल तर या शाळा उत्तम आहेत.
४) सुट्ट्या. इतर मुलांना सुट्ट्या असतात तेव्हा यांना नसतात सहसा कारण परदेशातील स्केड्युलनुसारच शाळेच्या सुट्ट्या. अशा प्रत्येक गोष्टीत मूल वेगळे पडत जाते हळुहळु..

कुठे स्वस्त आणि सर्व आर्थिक स्तरातील मुलांसाठी IB शिक्षणप्रणालीवर आधारित साधी शाळा असेल तर या पर्यायाचा नक्की विचार करेन. हळुहळु हे लोण पसरेल तसतसे अनेक प्रयोग होतील यात शंका नाही.

वर मी मांडलेल्या मुद्यांना counter arguments
१) मुंबईत ICSE/CBSE शाळांच्या फिया तशाच काही कमी नाहीत. चाळिसहजार वगैरे आहेतच. तसेही त्यामुळे इतर आर्थिक स्तरातील फार कमी मुले या शाळांमध्ये येऊ शकतात.
२) शाळेची फी, पालकांचे आर्थिक स्तर आणि जीवनशैली. तोच मुद्दा पुन्हा उद्भवतो. आमच्या शाळेतल्या मुलांची जीवनशैली अतिश्रीमंत नसली तरी त्यात सुद्धा फारशी heterogeneity उरलेली नाही ही खरी गोष्ट आहे दुर्दैवाने. पुण्यात मला अजूनतरी ती दिसते.
३) जी साधने शाळेत उपलब्ध नाही ते आम्ही खाजगी स्तरावर पुरे करतोच. उदा- शाळेत निदान आठवीपर्यंत लॅपटॉप वापरणे अपेक्षित नाही. आमच्या मुलांना तो वापरता येत नाही का? येतोच की. शाळेत चांगले ग्रंथालय नाही. माझ्या घरीच फक्त मुलीसाठी ५०० तरी पुस्तके आहेत. भलेही ती आमच्या सगळ्या खानदानातली, आम्ही घेतलेली+ भेटीदखल मिळालेली इ.इ.इ. आहेत, पण आहेत. वगैरे..
शाळेत thought application शून्य. घरी आम्ही शाळेचा अभ्यासाव्यतिरीक्त यासाठी आमच्या मगदुरीने खूप प्रयत्न केले. त्यासाठी पालक म्हणुन किती ताण पडला ते सोडा, पाल्यावरही एक प्रकारे पडलाच की. तो आम्ही मजेत साजरा केला ते सोडा, पण मुद्दा हा आहे की तसाही 'घोका आणि ओका' प्रकारावर विश्वास नाहीच आहे आणि तशी सवय मुलीला लागू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
४) आमचे मूल तसेही वेगळेच पडणार थोडेसे कारण आमच्या घरातील वातावरण तसेही वेगळे आहेच. सुट्ट्या सारख्या असल्या काय आणि नसल्या काय.

रैना, उत्तम पोस्ट, अगदी आयबीत शिकलेल्या विद्यार्थ्याकडून आम्ही जसे क्लेम-काऊंटरक्लेम लिहिण्याची अपेक्षा करतो तशीच!
ज्यांची मुले आज १ली ते ४थी वयोगटात आहेत त्यांनी विचार करण्यासारखी एक गोष्ट- ही मुले १२वी होउन त्यांचे करिअर निवडणार याला अजून ८-१० वर्षांचा अवधी आहे त्यामुळे अभ्याक्रमाविषयीचा निर्णय केवळ आजच्या परिस्थितीवर आधारित नसावा. त्यावेळेपर्यंत अशा सिलॅबसची व्याप्ती (विद्यार्थी आणि शाळासंख्या), अ‍ॅक्सेप्ट्न्स आणि गरज या सर्वातच मोठी वाढ झालेली असेल.
आण्खी एक मुद्दा- अशा सिलॅबसमधे शिकलेली बहुतेक मुले परदेशी जातात हे खरे आहे. पण अनेक परदेशी विद्यापीठात तुम्ही आयबी केलेले असेल तर प्रवेश सोपा होतो हादेखील फायदा आहे. दुसरे असे की परदेशी विद्यापीठांचा भारतात प्रवेश झाला आहेच आणि त्यांची संख्या वाढणार हे ही नक्कीच. त्यामुळे अजून काही वर्षांनी या अभ्यासक्रमानंतर परदेशातच जावे लागेल ही परिस्थीती बदलू शकते.

चांगला विषय आणि सुटसुटीत पद्धतीने माहिती दिल्याने वाचायला सुलभ होतंय. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

आगाऊ, आमच्या दृष्टीने अभ्यासक्रम निवडताना मुख्य निकष असेल की आम्ही कुठेही जाऊ शकतो.

भारताचाच विचार करायचा झाला तर आम्ही मेट्रो सिटीजमधे अजिबात जाणार नाही. शिवाय मुख्य सिटीमधे राहण्याचे चान्सेस देखील खूप कमी असतील. सिटीपासून ५० ते ६० किमीवर आम्ही असू. आणि काही झालं तरी समुद्राकाठीच असू Proud

भारताबाहेरचा विचार केला तर भारतापेक्षा कमी प्रगत असणार्‍या देशात (अपवादः चायना, सिंगापोर) जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि तिथेही पुन्हा तेच. शहरापासून लांब. सुदैवाने अशा प्रोजेक्ट्सच्या ठिकाणी रहाण्याची/ शाळांची वगैरे सोय केलेली असते. पण अभ्यासक्रम कुठला निवडावा अशा संभ्रमात आम्ही आहोत.

इथे मी तिला सीबीएसईला अ‍ॅडमिशन घेतली आणि पुढील ट्रान्स्फर अथवा नविन नोकरीच्या ठिकाणी शाळा आयबी अभ्यास्क्रमाची असेल तर तिला अ‍ॅडमिशनसाठी त्रास होऊ शकेल का? हे चित्र उलटे असले तरी त्रास होइल का? अशावेळेला काय करता येऊ शकेल?

काही प्रश्नः

१. ह्या शाळांचा अभ्यासक्रम १०+२ असाच असतो का? तसे असल्यास दहावी पर्यंत SSC/ICSC अशा बोर्डांतून शिक्षण घेऊन मग IB मध्ये प्रवेश मिळू शकतो का?
२. अमेरीकेत लागणार्‍या SAT करता किंवा तत्सम परदेशी परीक्षांकरता ह्या शाळांत मार्गदर्शन केले जाते का?

@नंदिनी- 'कुठेही' जाणार असशील तर प्रत्येकच सिलॅबस मिळेल याची शक्यता अर्थातच कमी आहे. सर्व बर्‍यापैकी प्रगत देशात आयबी आहे आणि सर्वच कॉमनवेल्थ देशात सीआयईदेखील आहे. मात्र यातील बहुतेक शाळा या मोठ्या शहरात/जवळ अशाच आहेत. भारतीय सिलॅबस ते इंटरनॅशनल असा किंवा उलटा प्रवास होताना अ‍ॅडमिनचा प्रॉब्लेम फारसा नाही पण पाल्याला (विशेषतः वय लहान असताना) अ‍ॅडजस्ट्मेंट करावी लागेल, इंटरनॅशनल ते भारतीय अशा बदलात खूपच जास्त!

@माधव- नक्कीच! १०वी पर्यंत भारतीय शाळात शिकून नंतर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. यांचाही पॅटर्न १०+२च आहे. आणि महत्वाचे म्हणजे असा बदल मुलांना झेपतो, अर्थात कष्ट करायची तयारी हवी.
SAT वगैरेची तयारी बहुतेक शाळा करुन देतात, किमान त्यांचे खासगी क्लासेसशी टाय-अप तरी असतेच. त्याहून महत्वाचे म्हणजे बहुतेक सर्व इंटरनॅशनल शाळात (१२वी पर्यंतच्या) युनिव्हर्सिटी काँसेलर असतो जो विद्यार्थ्यांना पुढील कोर्स/युनिव्हर्सिटी निवडण्यापासून ते कागदपत्रे तयार करण्यापर्यंत सर्व मदत करतो.

आगाऊ....

आपण छान माहिती दिली आहे. माधव ने जो प्रश्ण विचारला तोच मी विचारणार होते, की माझी मुलगी अत्ता ६ वीत
SSC मध्ये आहे. मी जिथे काम करते त्या मॅनेजमेंट ची स्वतः ची आय बी चे ज्युनीयर कॉलेज आहे. म्हणजे ११वी १२ वी आय.बी. मध्ये. तिथल्या प्राचार्यांनी मला हाच सल्ला दिला की १० वी SSC मध्ये करुन ८५% वर मार्क असतिल तर इकडे घेउन ये. माझ्या डोक्यातल्या शंका अशा

१. SSC केल्याने आय.बी. करताना त्रास होतो का?
२. माझी मुलगी अत्ता पासुनच फ्रेंच शिकते आहे. तिला फ्रेंच घेवुनच पुढील करीयर करायची आहे.
३. तिचा सगळा कल अभिनय, न्रुत्य, आणि विविध खाद्य पदार्थ करणे ( बघणे) ही आहे. त्या साठी आय बी उपयोगी पडेल का?
४. ११वी+१२वी आय बी केले असेल तर युरोपीयन देशात त्याचा उपयोग होतो का?
५. परदेशी शिक्षण .....म्हणजे कोणते देश आय.बी. ला मान्यता देतात?

आगाऊ, ICSE च्या शाळांत गणिताकरता पाठ्यपुस्तक नसतं का? बाकी सगळ्या विषयांकरता आहेत, चांगली दोन दोन पुस्तकं आहेत. पण गणिताचा वर्षभराचा सिलॅबस आधी माहितच नसतो.

मामी..

माझ्या माहिती प्रमाणे ICSE शाळांना स्वतः चा अभ्यास्क्रम व पुस्तके निवडायचे स्वातंत्र्य आहे. त्यांचा "सेट ऑफ बुक्स" शाळे प्रमाणे बदलु शकतो. अभ्यासक्रम साधारण सारखा असतो, पण पुस्तके मात्र प्रत्येक शाळा स्वतःच्या मर्जी प्रमाणे घेते.

आमच्या संस्थेच्या ज्या दोन शाळा आहेत, त्यांची दोन्हीची पुस्तके वेगवेगळी आहेत. जरी एकाच संस्थेच्या शाळा आहेत तरी. त्या मुळे गणिताची पुस्तके असतात. पण तुमच्या मुलीच्या शाळेत कोणती "सेट ऑफ बुक्स" वापरतात त्यावर आहे.

There are no prescribed books by ICSE like what we have in SSC or CBSE

धन्यवाद मोकीमी. गणिताकरता त्यांना पुस्तक नाही हा शाळेचा चॉईस असतो तर. ओके. तसा काही फरक पडत नाही. असाईनमेंट शीटस भरपूर घेतात आणि खूप छान शिकवतात. शिवाय हल्ली बाजारातही प्रॅक्टिसकरता उत्तमोत्तम पुस्तकं आली आहेत.

There are no prescribed books by ICSE like what we have in SSC or CBSE>> CBSE ची पण पुस्तके शाळेनुसार बदलतात.
आगाऊ - भाग २ केव्हा?

@मोकीमी - SSC केल्याने आय.बी. करताना त्रास होण्याचे कारण नाही. कदाचित इकॉनॉमिक्स/बिझनेस अँड मॅनेजमेंट असे एकदम नवे विषय शिकताना सुरुवातीला जड जाईल पण बहुतेक मुलांना हे जमते. वेगळी आवड असलेल्या मुलांसाठीतर आयबी आदर्श आहे, कारण यासगळ्याची तिथे किंमत होते. जवळजवळ १२५ देश आणि २००० विद्यापीठे यांनी त्याला मान्यता दिली आहे.

आगावा,
कधीचे कबूल केले होतेस तो लेख आता लिहितो आहेस! Happy

खूप छान माहिती. पुढचा भाग लवकर टाक.

IGCSE हा प्रकार पण आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमामधेच मोडतो ना? मागे तुला विचारले होते (बहुदा विपू मधे) की आमच्या इथे केंब्रिज ईंटरनॅशनल स्कूल आहे. त्यांच्या कडे ८+४ पॅटर्न आहे. व IGCSE बोर्ड आहे. ह्या बोर्डाविषयी पण माहिती जमलं तरे ह्याच धाग्याच्या हेड पोस्ट मधे अ‍ॅड करशील का? (माझ्या विपूत तुझा स्क्रॅप आहे की ते पाहते.)

धन्स.. आगाउ

माझ्या विचारांना पुष्टी मिळाली. अजुन एक शंका

परदेशी विद्यापिठां मध्ये प्रवेषा साठी आय बी केलेल्या ( ११वी+१२वी) विद्यार्थ्यांना तोफेल किंवा तत्सम परिक्षा द्यायला लागते का?

पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.....

भारतीय सिलॅबस ते इंटरनॅशनल असा किंवा उलटा प्रवास होताना अ‍ॅडमिनचा प्रॉब्लेम फारसा नाही पण पाल्याला (विशेषतः वय लहान असताना) अ‍ॅडजस्ट्मेंट करावी लागेल, इंटरनॅशनल ते भारतीय अशा बदलात खूपच जास्त!>>> याबद्दल जरा अजून माहिती देशील का प्लीज. मी सध्यातरी सीबीएसई अभ्यासक्रम विचारात घेतेय. आयबीसाठी मला शाळाचाच प्रॉब्लेम होऊ शकतो. शाळाची लिस्ट मिळाली तर कदाचित पुन्हा एकदा विचार करता येइल.

माझ्या माहितीप्रमाणे टोफेल किंवा तत्सम परिक्षा पोस्ट्ग्रॅड कोर्ससाठी लागतात. १२वी नंतर 'सॅट' पुरते, काही ठिकाणी त्या विशिष्ट विषयाची 'सब्जेक्ट सॅट' ही द्यावी लागते.

मी मार्च मधे चालू केलेल्या ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल बद्दल माहिती हवी आहे ह्या धाग्याच्या अनुषंगाने आगाऊ बरोबर विपू मधे केलेली चर्चा इथे डकवते आहे:

आगाऊ, माझ्या विपूला तू नंतर उत्तर दिल्याचे दिसत नाहीये. आता इथेच दे बघू!

++++++++++++++++++++++++++++++++++++++
आगाऊ

2 March, 2012 - 14:48
काही IGCSE मुद्द्याबाबत-
यूके चलनात पैसे हा अजब प्रकार आहे, नेव्हर हर्ड!
८वी नंतरची परिक्षा- त्याला चेकपॉईंट म्हणतात, ही फार महत्वाची नसते, कंपलसरीही नसते.
९-१० वेगवेगळे नसतात त्याला एकत्रपणे १०वी नंतर परिक्षा असते- ही मात्र महत्वाची आणि कस पाहणारी असते.
८वी नंतर शाखा निवडण्याचा मुद्दा बरोबर आहे, पण ज्यांना सायन्स नकोच आहे त्यांना इकॉनॉमिक्स, अकाऊंटस असे विषय आणि कोणतेही एक सायन्स घेता येते ही सोय आहे.
अर्थात तुम्ही कोणतेही दोन वा तीन्ही सायन्स अधीक ह्युमॅनिटीज असेही काँबो घेउ शकता, मुलं हे करतात आणि चांगल्यापैकी करतात.
IGCSE मधून १०वी केल्यावर तुम्ही त्यातच पुढे ११-१२वी करु शकता किंवा परत भारतीय बोर्ड निवडू शकता. त्यांचा कोटा वगैरे मुद्दे त्रासदायक नाहीत.
++++++++++++++++++++

निंबुडा

2 March, 2012 - 15:18
यूके चलनात पैसे हा अजब प्रकार आहे, नेव्हर हर्ड! >> शाळेतच असे सांगितले गेले होते. अजुनही एका कडून अशीच इन्फो मिळाली होती.
बाकी ते ८वी चा चेकपॉइंट आणि ९वी + १० वी एकच जॉइंट परीक्षा वै. नव्याने कळले.
IGCSE मधून १०वी केल्यावर तुम्ही त्यातच पुढे ११-१२वी करु शकता किंवा परत भारतीय बोर्ड निवडू शकता. त्यांचा कोटा वगैरे मुद्दे त्रासदायक नाहीत.
>>>
हे नीट एक्प्लेन कर ना. कळलं नाही. त्या शाळेत मिळालेल्या माहिती प्रमाणे ८व्या ग्रेड नंतर पुढे ४ वर्ष स्पेशलायझेशन आणि १२ वी नंतर कॉलेज स्वतंत्ररीत्या. आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे १० वी ची ती एग्झाम झाली की परत ११ वी ला इतर बोर्डांप्रमाणे हवी ती साईड घेऊन कॉलेज शिक्षण घेता येते. मनात आता संभ्रम निर्माण झाली आहे.
ही IGCSE वाली शाळा खरं म्हणजे अंतरा च्या दृष्टीने मला परफेक्ट वाटली होती. शिवाय त्यांनी एक्प्लेन केलेला अभ्यासक्रम व शिकविण्याची पद्धत वगैरे आवडली होती. पण आम जनता जे करते त्या पेक्षा वेगळी वाट चोखाळायची थोडी भीती वाटतेय.
शिवाय अजून एक-दोघांनी असेही सांगितले की IGCSE चा पोर्शन इतर भारतीय बोर्डांपेक्षा २ वर्षे पुढे असल्याने भारतीय मुलांना जड पडतो. आणि त्या उलट एकाने सांगितले की अ‍ॅक्च्युअल केस अगदी उलटी आहे. जसे आपल्याकडे साडेतीन हे वय प्री प्रायमरी स्कूलिंग साठी पार असणे आवश्यक आहे ते इंटरनॅशनली एखाद - दोन वर्ष पुढे आहे. म्हणजे उदा. एखादा अ‍ॅब्रॉड मध्ये शिकणारा मुलगा समजा आता १० वर्षाचा आहे तर इंडीयात असला असता तर ४थीत असता पण अ‍ॅब्रॉड मध्ये तो २रीतच असणार. त्यामुळे इंटरनॅशनल अभ्यासक्रम जरी (भारतीय अभ्यासक्रमांच्या तुलनेत) २ वर्षे पुढे असला तरी त्या त्या इयत्तांमधली मुलेही वयाने भारतीय मुलांच्या तुलनेत २ वर्षे मोठीच असतात. तेव्हा मला असा प्रश्न आहे की IGCSE बोर्डवाले मुलांना शाळेत घेताना भारतीय रुलनुसार घेणार (दिड वर्षाचे असताना प्लेग्रूप. अडीच ला नर्सरी इ.) तर मग भारतीय मुलांना इंटरनॅशनल अभ्यासक्रम खरोखरच २ वर्षे बोजड नसणार का?
वेताळाचे प्रश्न संपता संपत नाहीत. तेव्हा हे विक्रमादित्या, या प्रश्नांची उत्तरे माहिती असूनही दिली नाहीस तर .......

++++++++++++++++++++++++++++++++++++++

Pages