चूक : भाग २

Submitted by यःकश्चित on 11 June, 2012 - 05:12

चूक

==================================================

<<< मागील भाग

दुपारी दोनच्या सुमारास ढेरे दोन पोरांना घेऊन आला. तो पोलीस चौकीत येताच 'साहेब ' अशी हाक मारली.

"ए गपे, साहेब डिस्टर्ब करू नको म्हणालेत. बस जरा वेळ. ", मिसाळ्याने ढेरेला सांगितले.

ढेरे त्या दोन पोरांना बाकड्यावर बसवून आपण शेजारच्या स्टूलवर बसला.

" काय रे ढेरे, ही पोर कुठून उचलली ? यांनी काय केलंय ? "

" अरे यांनी काही केलं नाहीये. सकाळी आपण - ", तो बोलायचं थांबला आणि उभा राहिला.

सावळे साहेब बाहेर आले होते. ढेरेला उभा पाहून मिसाळही उठला. सावळेंनी पुन्हा मिसाळचा प्रश्न ढेरेला विचारला.

" साहेब, सकाळी आपल्याला जी बॉडी सापडली तिची माहिती कळाली आहे. हा मेलेला मुलगा स. म. नाडकर्णी इंजिनिरिंग महाविद्यालयातला आहे. याच नाव संतोष सिंगार. हा तिथे शेवटच्या वर्षात शिकत होता. मी त्या कॉलेजात जाऊन चौकशी केली. त्याबद्दल माहित मिळाली ती अशी की संतोष हा एक मनमिळाऊ मुलगा होता. तो कुणाशीही पटकन मैत्री करायचा. पण त्याचे सर्वात खास मित्र हे दोघे होते. ", आत्ताच घेऊन आलेल्या त्या पोरांकडे बघत तो म्हणाला,
" हे आपल्याला संतोषबद्दल जास्त माहिती देऊ शकतील. कधीही हे तिघे एकत्रच असत. नंतर मी त्याच्या घराबद्दल माहिती काढली. शहरातील सुविख्यात सिंगार ज्वेलर्सचे मालक गोपीचंद सिंगार यांचा हा मुलगा होता. त्यांच्या घरीही मी आत्ता कळवून आलोय. "
" ..आणि साहेब सर्वात महत्वाची गोष्ट ज्यासाठी मी या दोघांना इथे घेऊन आलो ती म्हणजे कालच्या रात्री हे तिघे कोळीवाड्याच्या किनाऱ्यावर पार्टी ", त्याने पिण्याची एक्शन करून दाखवली व अंगठा तोंडाला लावत म्हणाला, " पार्टी करायला गेले होते . "

" अच्छा.. म्हणजे खून या दोघांनी केलाय तर. ", सावळे त्या दोघांकडे पाहत म्हणाले.

" नाही नाही साहेब आम्ही कशाला खून करू ? आमचा जिगरी यार होता तो. " दोघेही एकदम म्हणाले.

" मग तुम्ही पार्टी करायला एवढ्या ओसाड ठिकाणी कशाला गेलात ? शहरात हॉटेल्स, रेस्टॉरंट नव्हते का. तुम्हाला खून करायचा होता त्याचा म्हणून तुम्ही अशा निर्जन ठिकाणी गेलात. "

सावळेंची ही एकदम युनिक मेथड होती. समोरच्या संशयितावर डायरेक्ट आरोप करत. जर तो खुनी नसेल तर तो खर काय ते विलंब न करता सांगेल. पण जर खुनी असेल किंवा त्याचा काही सहभाग असेल तर त्याला खोटं उत्तर द्यावं लागेल आणि त्यासाठी त्याला विचार करावा लागेल. हा विचार करायला लागणारा बारीकसा अवधीही सावळे बरोब्बर पकडायचे आणि त्याच्या प्रतिसादावर अवलंबून पुढची प्रश्नांची सरबत्ती चालू.

" नाही नाही. पार्टी संतोष द्यायचा. त्यामुळे कुठे बसायचं हेही तोच ठरवायचा. " , वाकड्याने क्षणाचाही विलंब न लावता सांगितले.

"आणि दरवेळी आम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन जायचा. आत्तापर्यंत आम्ही इतक्या वेळा पार्ट्या केल्या पण एका ठिकाणी दुसऱ्यांदा कधीच नाही. आणि - "

वाकड्याचे वाक्य तोडत रुप्या म्हणाला,

" आणि साहेब जर आम्ही त्याचा खून केला असता तर तुमच्या या हवालदाराला सांगितला कशाला असतं की आम्ही तिकडे पार्टीला गेलो होतो. "

रुप्याचा युक्तिवाद बरोबर होता. सावळेंच्या मेथडनुसार ते खुनी ठरले नव्हते. पण तरीही ते ठामपणे सांगू शकत नव्हते. सावळे त्या दोघांना बसायला सांगून आत गेले.

सावळेंनी एक नंबर फिरवला.

" हेलो..काय डॉक्टर.. किती वेळ लावणार अजून ? "

" काम चालू आहे साहेब. रिपोर्ट फायनल स्टेजला आहे. दीड-दोन तासात आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट पाठवतोच आहोत. तूर्तास तुमच्या तपासाला दिशा मिळावी म्हणून मी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो."

" ठीक आहे. सांगा. "

पहिली गोष्ट मृत्यूचे कारण फारच अजब आहे. मला काही कळतच नाहीये. पण जे रिपोर्टमध्ये आहे ते सांगावे लागेलच. मृत्यू दोन पद्धतीने झाला आहे. "

" काय म्हणालात ? दोन पद्धतीने ? "

" हो हो ऐका.. त्याला गळा दाबून मारण्यात आलाय.आणि त्याच्या गुडघ्याच्या दोन्ही वाट्या तुटल्या आहेत. आणि दुसरे कारण त्याला हृदयविकाराचा जोरदार झटका येऊन हृदय बंद पडल्यामुळे तो मेला आहे. "

" डॉक्टर आता मलाच एक झटका येईल. एका व्यक्तीचा दोन वेळा मृत्यू कसा काय होऊ शकतो ? "

" ते काम तुमचं आहे साहेब. आता रिपोर्टमध्ये जे आहे ते मी सांगितलं. पुढे तपास तुम्हीच करायचा आहे. "

" हम्म... तेही आहे म्हणा. डॉक्टर एक काम करू शकाल का ? "

" जरूर."

" गळा दाबून मारण्यात आलेली आणि हृदयविकाराची वेळ तुम्ही सांगू शकाल का ? "

" हो हो.. का नाही. पण त्यासाठी काही आणखी टेस्ट्स कराव्या लागतील. मी ह्या वेळा तुम्हाला रिपोर्टमध्ये लिहून पाठवेन. "

" अच्छा.. धन्यवाद डॉक्टर.. "

सावळे फोन ठेऊन बाहेर आले. त्या दोघांकडे पाहून ते म्हणाले,

" हा तुमची नावे काय ? "

" मी दिनेश वाकडे. "

" आणि मी रुपेश खोत. "

" तुम्ही राहता कुठे आणि तुमचे पालक काय करतात ? "

" मी रामनगरच्या चालीत राहतो. माझे बाबा कोर्टात क्लार्क आहेत. ", दिनेश.

" मी इथला नाही. मी मुळचा कोल्हापूरचा. तिकडे अॅडमिशन नाही मिळाली म्हणून इकडे आलो. माझे वडिलांचे कोल्हापुरात एक प्लास्टिक शॉप आहे. इथे मी रामावती अपार्टमेंटच्या जवळ एक रूम घेऊन राहतो. " रुपेश

" म्हणजे कोळीवाड्याजवळच की ! " सावळे

" होय साहेब "

" बर मला काल रात्री काय काय झाल ते नीट सविस्तर सांग. एकही गोष्ट गाळू नकोस. "

रुपेशने कालच्या रात्री जे जे केलं ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थितपणे सांगितलं.

" अच्छा. आता मी विचारतो त्या प्रश्नांची नीट आठवून विचार करून उत्तरे दे. "

रुपेशने मान डोलावली.

" काल संतोषला हार्टअॅटॅक आला होता का ? "

" नाही "

" तुम्ही संतोषला गेली तीन वर्षे ओळखत असाल. बरोबर ? "

" मी तीन वर्षे ओळखतो. पण हा दिनेश ११वी १२वी पासून ओळखतो. "

" याला कुणी शत्रू होता ? किंवा असं कुणी जे सतत याच्या वाईटावर असत. "

" अहो इन्स्पेक्टर साहेब, संतोषला कॉलेजमध्ये काय म्हणतात माहितेय का ' सबका मददगार याने संतोष सिंगार' मग अशा व्यक्तीला कुणी शत्रू असेल का ? "

" काही सांगता येत नाही. याचं कधी कुणाशी भांडण झालेलं असू शकत आणि त्याचा बदला म्हणून... "

" भांडणाचा बदला खुनाने ? "

" तेही सांगता येत नाही. आजकाल काहीही होऊ शकत. "

" हम्म.. पण संतोष इतका फ्रेंडली वागायचा सर्वांशी की भांडण म्हणजे काय हे बहुतेक त्याला माहीतच नसाव. "

" ठीक आहे. तुम्ही आता जाऊ शकता. पण गरज लागली तर मी तुम्हाला परत चौकशीसाठी बोलवेन. जाताना तुमचे नंबर त्या डायरीत लिहून ठेवा. "

" ओ.के. सर ", असे म्हणून त्यांनी आपापले नंबर त्या डायरीत लिहिले आणि दरवाज्यात पोहोचतो तोच ई. सावळेंची हाक ऐकू आली,

" एक मिनिट, इकडे या. एक शेवटचा प्रश्न राहिला. "

ते दोघे वळले.

" काल तुम्ही पार्टी करताना वेगळे वा विशेष काही जाणवले तुम्हाला ? म्हणजे संतोषच्या वागण्यात बोलण्यात बदल वगैरे किंवा असे काही जे याधी कधी घडले नाही. "

" अं....अं..... " फार विचार करून रुपेश म्हणाला, " नाही साहेब, विशेष असं काहीच झालं नाही. आम्ही नेहमीसारखे आलो, पार्टी केली आणि नेहमीसारखे गेलो. " आणि एकदम काहीसे आठवून म्हणाला,

" हा साहेब, काल वाकड्याने - ", तो एकदम बोलायचा थांबला.

वाकड्याकडे पाहत ' ही असली फालतू गोष्ट इन्स्पेक्टरना सांगावी का नको. ते उगाच हसतील आपल्यावर. आणि मेन म्हणजे वाकड्या उगाच अडकेल यात. मित्राला असं अडकवणे बरे नाही. आपण नंतर वाकड्याशी एकट्यात बोलू. ' असा विचार करीत असतानाच सावळे ओरडले ,

" वाकड्याने काय ? "

' पण वाकड्या तर आपल्याच रूमवर होता. मग तो कसा अडकेल' असा विचार करून तो बोलला,

" काल वाकड्याने फस्ट टाईम निघण्याची घाई केली. "

सावळे वाकड्याकडे पाहत म्हणाले,

" काय रे , काल घाई का केलीस ? "

" साहेब क...क काल ", वाकड्या जरासा बिचकत होता.

" क..काही नाही साहेब.. असाच म्हणालो होतो मी काल. "

" अरे खर खर सांग. मी तुझ्यावर खुनाचा आरोप नाहीये ठेवत. फक्त काल तू घाई का केलीस ते सांग. म्हणजे आपल्याला कदाचित एखादा क्लू मिळेल. खुन्यापर्यंत पोहोचण्यासाठी. "

थोडा विचार करून तो बोलला,

" स्..साहेब. काल मला वाटत होतं की कुणी आमचा पाठलाग करत आहे. आणि आमच्यावर नजर ठेऊन आहे. "

" काय सांगतोस. तुला असं कधी वाटल कि आपला पाठलाग होतोय. "

" आम्ही बीचच्या मेनरोडला आल्यापासून. मी मागे वळून पाहिलंही पण रात्रीची वेळ असल्याने मला अंधारात काहीच दिसलं नाही. "

" काही विशेष खुण त्या पाठलाग करणाऱ्याबद्दल "

" विशेष असं काही नाही..पण एक गोष्ट साहेब आम्ही मेनरोडवरून बीचकडे येताना मला एक आवाज ऐकू येत होता. ' छुन..छुन..' असा. फारच बारीकसा आवाज होता. पैंजणाचा असतो ना तसा. मी या दोघांना सांगणार होतो. पण म्हणलं नको सांगायला. एकतर प्यायच्या मूडमध्ये आहेत हे. उगाच आपलीच टिंगल उडवतील. म्हणतील ' च्यायला वाकड्या तुला प्यायच्या आधीच चढली की रे '. मी गप् बसलो. आणि नेहमीपेक्षा कमीच प्यायलो. नंतर तो आवाज पण बंद झाला. "

" ओह.. आय सी ", पुढच वाक्य ते मनात बोलले, ' म्हणजे माझा अंदाज खरा ठरला खुनी हि कुणी बाई आहे. आता त्या नेकलेसची माहिती काढावीच लागणार. '

" अच्छा ठीक आहे..तुम्ही दोघे निघू शकता. "

असे म्हणून खिशातून इक्लेयर्स काढत सावळे आत निघून गेले.

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोष्ट तुम्ही छान लिहितात पण एकच सुचविते, शेवट अनपेक्षित करण्यापेक्षा शेवटाकडे जाण्याचा मार्ग जास्त अनपेक्षित असला की रहस्यकथा अधिक खुलते.
आधिच्या कथेवरुन सुचना, बाकी लिहिले छान आहे.

छान लिहीले आहे. खुप इंटरेस्टिंग आहे. पन क्रमशः बघुन वाईट वाटले. आता पुढचा भाग लवकर टाका.