मेनोपॉज-२ : शरीरात होणारे बदल / लक्षणे

Submitted by रुणुझुणू on 1 June, 2012 - 13:34

ह्याआधीचा लेख - मेनोपॉज-१ : नेमकं काय घडतं ?

मागच्या लेखात आपण पाहिले की मेनोपॉज हा आजार नसून स्त्रियांच्या आयुष्यातील एक अटळ आणि पूर्णतः नैसर्गिक अशी अवस्था आहे.
त्या वेळी जाणवणारी शारीरिक आणि मानसिक त्रासाची लक्षणे ही इस्ट्रोजेन ह्या हॉर्मोनच्या कमतरतेमुळे होतात.

कुठली लक्षणे असतात ही ?

तुम्हाला हिमगौरीच्या गोष्टीतील "हाय हो, हाय हो, हाय हो" असं आनंदाने म्हणत लुटुलुटु चालणार्‍या सात बुटक्यांची फौज आठवते का ?

Disney seven dwarfs.jpg

मेनोपॉजच्या वेळी जाणवणार्‍या लक्षणांचे ' बिन बुलाये मेहमान ' मात्र आपल्यालाच "हाय हो हाय हो" असं गाणं म्हणायला लावतात....आनंदाने नाही, तर अगदी व्याकूळपणे !

menopause seven dwarfs.jpg

१.Itchy : कोरड्या त्वचेमुळे अंगावर खाज सुटणे
२.Moody : एका क्षणाला आनंदी वाटणे तर काहीच सबळ कारण नसताना दुसर्‍या क्षणी अचानक निराश वाटू लागणे
३.Sweaty : हॉट फ्लॅशेस मुळे दरदरून घाम सुटणे
४.Sleepy : हॉट फ्लॅशेस आणि हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे रात्री झोपमोड झाल्याने
दिवसभर पेंगुळल्यासारखे वाटणे
५.Bloated : पचनशक्ती मंदावल्यामुळे सतत पोट गच्च वाटणे
६.Forgetful : विस्मरण होणे
७.All dried up :योनीमार्ग कोरडा पडून शारीरिक संबंधाला त्रास होणे
आणि हे आणखी काही....

८. शारीरिक संबंधाबद्दल अनिच्छा वाटणे
९. पाळीचा अनियमितपणा
१०.त्वचा सुरकुतणे, नखे ठिसूळ होणे
११. लवकर थकवा येणे
१२. सांधे दुखणे
१३. वजन , विशेषतः पोटावरची चरबी वाढणे
१४. केस गळणे
१५. युरिनरी इनकॉन्टिनन्स - आपोआप लघवी होणे
१६. बर्निंग माऊथ सिन्ड्रोम (Burning mouth syndrome)

ह्यातली काही लक्षणे आपण जरा विस्ताराने पाहू या.

आपण आधी पाहिलं की शेवटची पाळी कधी येणार हे आधी सांगता येत नाही.
पण तुमच्या आईला ज्या वयात शेवटची पाळी आली, साधारण त्याच वयात तुम्हालाही शेवटची पाळी येण्याची शक्यता जास्त असते.
त्या वयाच्या सुमारास जर वर सांगितलेली लक्षणे दिसू लागली तर ती मेनोपॉजची सूचना असू शकते.

इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी.

प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक जडणघडण वेगवेगळी असते.
त्यामुळे ही सगळी लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये सारख्याच तीव्रतेने जाणवणार नाहीत.

काही स्त्रियांना काहीच त्रास जाणवत नाही किंवा जाणवला तरी अगदी सौम्य प्रमाणात जाणवतो.
ह्याउलट काही स्त्रियांमध्ये हा हॉर्मोनल रोलरकोस्टर फारच तीव्र परिणाम दाखवतो.

ज्या स्त्रियांना प्रिमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोमचा त्रास जास्त होतो, त्यांना मेनोपॉजचा...विशेषतः हॉट फ्लॅशेस आणि मुड स्विंग्जचा त्रासही जरा तीव्र स्वरूपात होऊ शकतो, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.

पाळीचा अनियमितपणा :
मेनोपॉजच्या काही वर्षे आधीपासून मासिक पाळी लांबणे, लवकर येणे, नेहमीपेक्षा अगदी कमी किंवा नेहमीपेक्षा थोडा जास्त रक्तस्त्राव होणे असे प्रकार होऊ शकतात.
३-४ महिने पाळी व्यवस्थित येऊन मध्येच ३-४ महिने बंद होणे, आणि काही महिने पुन्हा पहिल्यासारखी नियमित येणे असेही होऊ शकते.
ह्यात घाबरण्यासारखे काहीच नाही.

एक महत्वाची गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी.
पाळी २१ दिवसांपेक्षाही कमी अंतराने येत असेल, नेहमीपेक्षा खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल, अशक्तपणा जाणवत असेल किंवा शारीरिक संबंधानंतर अंगावर रक्त जात असेल तर विलंब न करता स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.
कारण ही लक्षणे ह्या वयात उद्भवू शकणार्‍या कर्करोगासारख्या गंभीर आजाराची असू शकतात !

हॉट फ्लॅशेस / हॉट फ्लशेस :
तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी हे पाहिले असेल.
घरातील सगळी माणसे आरामात बसलेली असताना तुमची आई किंवा सासू किंवा मेनोपॉजच्या वयातील कोणीही स्त्री अचानक " हाश्श हुश्श " करत अस्वस्थ होऊन उठते आणि पंखा जोरात करायला सांगते.....अगदी थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसांतही.
तुम्ही काही न बोलता, तिच्यासाठी हा जास्तीचा वारा मनाविरूद्ध सहन करत असता....आणि पाचेक मिनिटांनी तिला स्वतःलाच थंडी वाजून येते आणि ती पंखा पूर्णच बंद करून टाकते !

घरातील लोक समंजस असतील आणि त्यांना हॉट फ्लॅशेसबद्दल माहिती असेल तर कुणी काही तक्रार करत नाही.
पण वास्तवात बर्‍याचदा त्या स्त्रीला " काय चमत्कारिक वागतेयस तू " असं ऐकवलं जातं......आणि मग पुढचे सगळे " प्रेमळ सुखसंवाद " घडतात !

पण खरंतर वर सांगितलेला प्रकार हा मेनोपॉजच्या वयातील जवळजवळ ७५-८० % स्त्रियांमध्ये दिसून येतो.
ह्या लक्षणालाच हॉट फ्लॅशेस ( किंवा हॉट फ्लशेस ) असे म्हणतात.

हॉट फ्लॅशेस का होतात ?

आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस हा भाग शरीराच्या "थर्मोस्टॅट" चं काम करतो.
म्हणजे बाहेरील तापमानामध्ये बदल झाले तरी शरीराचे तापमान फार बदलू न देण्यासाठी आवश्यक त्या हॉर्मोन्स किंवा केमिकल्सचे संतुलन करण्याची जबाबदारी हायपोथॅलॅमस अगदी बिनचूक पार पाडत असतो. आणि त्याच्या ह्या कामासाठी इस्ट्रोजेन त्याला मदत करते.

hot-flashes-hypothalamus.gif

मेनोपॉजच्यावेळी इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्याने हायपोथॅलॅमसला माहिती पुरवणारा " बहिर्जी नाइक " गायब होतो.
त्यामुळे वातावरणातील तापमानात जरासा बदल झाल्यावर, एवढंच काय, नुसता गरम चहा / कॉफी पिल्यावर सुद्धा हायपोथॅलॅमसला वाटतं, " अरे बापरे, केवढी ही उष्णता ! "

मग लगेच तो बर्‍याचशा केमिकल्सना कामाला जुंपतो आणि पटापट शरीरात अनेक बदल घडवतो.

उदा. - त्वचेच्या खाली असलेली रक्तवाहिन्यांची जाळी प्रसरण पावतात आणि जास्तीची उष्णता त्वचेबाहेर सोडतात. शरीराला थंडावा मिळावा म्हणून घामाच्या ग्रंथींमधूनही जास्त प्रमाणात घाम तयार केला जातो.

हायपोथॅलॅमसची आणि संबंधित केमिकल्सची ही लगबग साधारण ४-५ मिनिटांत थांबते......तोपर्यंत ती स्त्री घामाने थबथबून गेलेली असते. चेहरा लाल झालेला असतो. आणि बर्‍याचदा हृदयाची धडधड वाढलेली असते.

कॉफीचे अतिरिक्त सेवन, अति मसालेदार खाणे, मोनोसोडियम ग्लुटामेट(अजिनोमोटो), स्थूलपणा हे हॉट फ्लशेस आणखी वाढवायला कारणीभूत होऊ शकतात.

त्वचेवर परिणाम :
वयोपरत्वे स्त्रीपुरुष दोघांमध्येही त्वचेतील बदल होतात.
त्या सोबतच इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे त्वचेतील कोलॅजेनचे प्रमाण घटते, त्वचा सैल पडते.
काही स्त्रियांना त्वचेवर खूप खाज सुटते.
गर्भावस्थेत काही स्त्रियांना चेहर्‍यावर काळपट डाग पडतात तशा प्रकारचे डाग पडू शकतात.
त्याला मेलॅस्मा (Melasma) असे म्हणतात.

melasma.gifMood Swings ( मनाच्या स्थितीमध्ये अकारण बदल होणे ) :

हायपोथॅलॅमस शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यात महत्वाचे काम करतो हे आपण पाहिले.
पण त्याबरोबरच इतरही अनेक महत्वाची कामे तो पार पाडतो. उदा. - तहान, भूक, झोप, तसेच आपल्या भावनांचेही नियंत्रण करण्यात हायपोथॅलॅमसची महत्वाची भूमिका असते.

hypothalamus.jpg

मेनोपॉजच्या वेळच्या हॉर्मोन्सच्या गोंधळामुळे आपल्यातील "फील गुड" - म्हणजेच आनंदाच्या संवेदना जाणवायला कारणीभूत असणार्‍या एन्डॉर्फिन्सचे (Endorphins) संतुलन बिघडते.
त्यामुळे काहीही कारण नसताना उगीच डोळे भरून येणे, उदास-हतबल वाटणे असे घडू शकते.

अर्थातच हे सगळ्या स्त्रियांमध्ये घडतेच असे नाही.
मेनोपॉजचा थेट संबंध प्रत्येक वेळी असतोच असेही नाही.
बर्‍याचदा ह्या काळात होणार्‍या (Empty nest syndrome) मुळेही असे घडू शकते.

मुले मोठी झालेली असतात, त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात स्थिरता आणण्यात गुंतलेली असतात, बर्‍याचदा लांब - परदेशात असतात, काहीवेळा जोडीदार मध्येच साथ सोडून निघून गेलेला असतो, शारीरिक त्रास वाढलेले असतात, व्यायामाचा अभाव असू शकतो.
ह्या सगळ्या गोष्टींमुळे मन जास्त vulnerable बनू शकते.

ज्या स्त्रिया वय वाढल्याने होणार्‍या नैसर्गिक बदलांना सकारात्मकरित्या सामोर्‍या जातात, त्यांच्यात मूड स्विंग्जचे प्रमाण तुलनेने कमी आढळून येते.

लैंगिक संबंधांबद्दल अनिच्छा
वयाप्रमाणे स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही लैंगिक संबंधाबद्दल इच्छा कमी होऊ शकते.
मेनोपॉजचा ह्याच्याशी थेट संबंध नसला तरी योनीमार्ग कोरडा पडल्याने संबंधात त्रास होणे, युरिनरी इनकॉन्टिनन्स ( शारीरिक संबंधांच्या वेळी आपोआप लघवी होणे ), अपुरी झोप झाल्याने आलेला चिडचिडेपणा, तसेच मधुमेहासारखे आजार ह्याला कारणीभूत ठरू शकतात.

पोट गच्च वाटणे :
मेनोपॉजच्या वयात बर्‍याच स्त्रियांमध्ये अपचन, पोट गच्च वाटणे ह्या तक्रारी दिसून येतात.
हॉर्मोनल असंतुलन हे एक कारण आहेच. पण त्यासोबत - व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी ह्या गोष्टीही कारणीभूत असतात.

इथेही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी.
अपचन, पोट गच्च वाटणे, फुगल्यासारखे वाटणे ही लक्षणे मेनोपॉजच्या वयाच्या आधी कधी जाणवली नसतील, आणि ह्याच काळात ह्या गोष्टींचा त्रास वरचेवर जाणवू लागला, जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून किंवा नेहमीची पित्तावरची औषधे घेऊनही फरक पडत नसेल तर स्त्रीरोगतज्ञांच्या सल्ल्याने पोटाची सोनोग्राफी करून घेणं हितावह आहे.
ह्या वयात होऊ शकणार्‍या ओव्हरीजच्या कर्करोगाची लक्षणे अशा स्वरूपाची असू शकतात !

बर्निंग माऊथ सिन्ड्रोम (Burning mouth syndrome):
तोंडामध्ये उगीचच मातकट किंवा कडू चव येणे, जिभेवर चुरचुरल्यासारखे वाटणे हे मेनोपॉजनंतर जास्त आढळून येते. असे होण्याचे नक्की कारण माहीत नाही.
हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे लाळेच्या संरचनेमध्ये आणि टेस्ट बडस् च्या संवेदनांमध्ये बदल झाल्याने असे घडत असावे असे मानले जाते.

ही आहेत मेनोपॉजच्या वेळी आणि नंतर जाणवणारी काही लक्षणे.
" व्यक्ती तितक्या प्रकृती " ह्या प्रमाणे भिन्न स्त्रियांमध्ये भिन्न लक्षणे जाणवू शकतात. वर उल्लेख केलेल्या लक्षणांव्यतिरिक्त काही लक्षणे सुद्धा जाणवू शकतात.

ह्याशिवाय इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे स्त्रियांच्या आरोग्याला काही कायमस्वरूपी धोकेसुद्धा (Health Risks) उत्पन्न होऊ शकतात.
त्यांच्याविषयी पुढच्या लेखात.

- रुणुझुणू (स्त्रीरोगतज्ञ)

********************************************************************************************************************

- सर्व चित्रे जालावरून साभार.
- डिस्क्लेमर :
सदरहू लेखाचा उद्देश मेनोपॉज ह्या विषयावरील माहिती देणे हा असून त्या संदर्भातील काही सल्ला-उपचार इत्यादी असतील ते डॉक्टरी सल्ल्यानुसारच करावेत.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुणु, लिंक्स नकोतच. असाच सुटसुटीत लेख छान दिसतोय. आणि चित्रेही अगदी मस्त दिसतायत.

तुझ्या लेखमालिकेचा पहिला भाग-

मेनॉपॉज-१ : नेमकं काय घडतं.

आजच्या लोकसत्ता मधे http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=229952:...

याच काळात स्त्री व्यसनाधीन व्हायची शक्यता असते, असा उल्लेख आहे. पुढच्या लेखात, त्याबद्दलही लिहिणार ना ?

प्रत्येक स्त्री ला 'मेनॉपॉज" ला सामोरे जावेच लागते.या गूढ विषयाची उकल सहज सोप्या भाषेत करुन दिली आहे.ज्यांचे गर्भाशय आधीच काढुन टाकले आहे अशा स्त्रीयांनाही मेनॉपॉज चा त्रास त्या सुमाराला होतो.असेही पाहण्यात आले आहे.तसेच काहींना पस्तीशीनंतर लगेच हा त्रास जाणवतो वास्तविक हे पाळी जाण्याचे वय नसते ना?

<<मेनोपॉजच्यावेळी इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्याने हायपोथॅलॅमसला माहिती पुरवणारा " बहिर्जी नाइक " गायब होतो.>> मस्त वाक्य.

आवडले दोन्ही लेख.

हाही भाग माहितीपूर्ण व सोप्या, रंजक भाषेत सांगितल्यामुळे मस्त झालाय.
रुणुझुणू, तुला लेखाच्या सुरुवातीला किंवा शेवटी अगोदरच्या / नंतरच्या लेखांच्या लिंक्स देता येतील. Happy

सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या कौतुकामुळे लिहायला उत्साह वाटतो. Happy

साती आणि अकु,
लिंक्स टाकल्याबद्दल धन्यवाद. काहीतरी गडबड होत होती.

दिनेशदा,
पुढचा लेख ऑस्टिओपोरॉसिसवर आहे. त्यात नाही, पण उपाययोजनेच्या लेखांमध्ये नक्की लिहीन.

<<अगदी नीट पोचतंय सगळं. >> शिल्पा_के, तो आणि तोच हेतू आहे. साध्य होतोय हे वाचून आनंद झाला. धन्यवाद Happy

सुलेखा,
<< तसेच काहींना पस्तीशीनंतर लगेच हा त्रास जाणवतो वास्तविक हे पाळी जाण्याचे वय नसते ना?>> बरोबर. हे पाळी जाण्याचे नैसर्गिक वय नाही. ह्याविषयी प्रिमॅच्युअर मेनोपॉज ह्या लेखात सविस्तर लिहिणार आहे.

डिस्क्लेमर आवडले.
त्यात 'तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच' करावे अशी सुधारणा केलीत तर बरे असे वाटते.

हा ही लेख उत्तम.
बहिर्जी नाईकचे वाक्य मलाही आवडले. काय घडतं ते अगदी परफेक्ट समजतंय. Happy
(हायपोथॅलॅमसच्या अशा परिणामांबद्दल मला माहिती नव्हतं.)

रुणुझुणू, अगदी म्हणजे अगदीच सुंदर सोप्या भाषेत लिहित्येस ग. हे वाचताना काहि गोष्टी काही व्यक्तींचे वागणे रिलेट करता येतेय असे वाटते. खरे तर बर्‍याचदा असतो एकेकाचा स्वभाव असे म्हणुन आपण बर्‍याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण आता हे वाचुन तो स्वभाव तसा का असतो वा होतो ह्याची कारणे कळत आहेत.

कदाचीत हे अंदाज चुकीचे पण असु शकतात पण इतरांकडे व स्वतःकडे पहायचा एक नवा दृष्टीकोन मिळत आहे नक्कीच. Happy

Pages