मेनोपॉज-१ : नेमकं काय घडतं ?

Submitted by रुणुझुणू on 30 May, 2012 - 15:12

कसलीच तयारी न करता पहिल्यांदाच गिर्यारोहणाला जाणारे किती लोक पाहिले आहेत तुम्ही ??

ज्या जागी जायचं आहे तिथला नकाशा, तिथे आधी कुणी गेलंय का, त्यांचे अनुभव काय होते, तिथलं वातावरण कसं असेल, सोबत काय न्यावं लागेल, तिथे त्रास होऊ नये म्हणून खाण्या-पिण्यात काय बदल करावे लागतील, आणि सगळी काळजी घेऊनही काही त्रास झालाच तर काय उपाययोजना करायची.....
......बहुतांशी लोक अशी शक्य तितकी माहिती गोळा करूनच गिर्यारोहणाला निघतात.
आणि असं केल्यामुळे " आपल्याला नक्की जमेल हे ! " हा आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढतो, प्रवास तुलनेने सुखकर होतो.

४-८ दिवसांच्या गिर्यारोहणासाठी एवढी तयारी करायची गरज असेल तर मग .......आयुष्याचा एक तृतीयांश काळ ज्या अवस्थेत घालवायचा त्या " रजोनिवृत्ती " म्हणजेच मेनोपॉजबद्दल माहिती करून घेण्याची आवश्यकता किती तरी पटीने जास्त आहे !

पण ह्या विषयावर खुलेपणाने चर्चा होताना अजूनही दिसत नाही. गर्भावस्थेबद्दल बर्‍याच प्रमाणात जागृती होत आहे, त्यामानाने मेनोपॉज हा विषय बर्‍याचदा दुर्लक्षित राहतो.

मेनोपॉज म्हणजे बर्‍याच स्त्रियांना बागुलबुवासारखा वाटतो...खरं स्वरुप माहीत नसल्याने आणखीनच घाबरवणारा. ह्या विषयाबद्दल बोलायला वाटणारा संकोच सोडून देऊन चर्चा झाल्या तर स्त्रियांना आणि पर्यायाने संपूर्ण कुटुंबाला नक्कीच खूप फायदा होईल.

ह्या लेखमालिकेतून मेनोपॉजविषयी शास्त्रीय माहिती देण्याचा मानस आहे.
विषय तसा मोठा आणि गुंतागुंतीचा वाटू शकेल असा आहे. त्यामुळे शक्य तितक्या हलक्या-फुलक्या भाषेत
लिहायचा प्रयत्न करत आहे. तरीसुद्धा काही गोष्टी बोजड वाटल्या तर नक्की सांगा. उलगडून सांगायचा प्रयत्न करीन.

लेखमालिकेतील विषय असे आहेत :
मेनोपॉज-१ : नेमकं काय घडतं ?
मेनोपॉज-२ : शरीरात होणारे बदल / लक्षणे
मेनोपॉज-३ : शरीराला होणारे धोके - हाडांची झीज आणि हृदयविकार
मेनोपॉज-४ : शरीराला होणारे धोके - युरिनरी इनकॉन्टिनन्स
मेनोपॉज-५ : योग्य वेळेआधी येणारा म्हणजेच प्रिमॅच्युअर मेनोपॉज
मेनोपॉज-६ : हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी
मेनोपॉज-७ : अल्टरनेटिव्ह थेरपी
मेनोपॉज-८ : जीवनशैलीतील बदल

*******************************************************************************************************************

मेनोपॉज म्हणजे काय ?

मेनोपॉजचा शब्दशः अर्थ आहे - स्त्रियांची शेवटची मासिक पाळी.
हा ग्रीक शब्द आहे. मेन म्हणजे मन्थ आणि पॉसिस म्हणजे सिझेशन

जागतिक आरोग्य संस्थेने केलेली व्याख्या : Menopause is permanent cessation of menstruation due to loss of ovarian follicular activity.

कुठली मासिक पाळी शेवटची असणार आहे, हे आधी सांगता येत नाही. त्यामुळे शेवटच्या मासिक पाळीनंतर एक वर्ष उलटून गेल्यावर 'मेनोपॉज आला' असं निदान केलं जातं.

पेरिमेनोपॉज : शेवटची मासिक पाळी येण्याच्या काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात तसे बदल घडून यायला सुरूवात झालेली असते. बर्‍याच स्त्रियांमध्ये हा काळ साधारणपणे ३ ते ४ वर्षे इतका असतो.
ह्या काळाला पेरिमेनोपॉज असे म्हणतात.

पोस्टमेनोपॉज : स्त्रीच्या आयुष्यातील, शेवटच्या मासिक पाळीनंतरच्या उर्वरित काळाला पोस्टमेनोपॉज असे म्हणतात.

जगभरातील स्त्रियांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय ५१ वर्षे इतकं आहे.
भारतातील स्त्रियांमध्ये हे थोडं अलीकडे म्हणजे ४८ वर्षे इतकं आहे.

अर्ली मेनोपॉज : ४५ वर्षे वयाच्या आधी आलेला.
प्रिमॅच्युअर मेनोपॉज : ४० वर्षे वयाच्या आधी आलेला.
लेट मेनोपॉज : ५५ वर्षे वयाच्या नंतर आलेला.

वयाच्या फरकामुळे तयार झालेल्या ह्या व्याख्यांचा संबंध काही आजारांशी आहे. म्हणून त्यांचा उल्लेख इथे केला आहे.

हे सगळं आहे नैसर्गिकपणे घडून येणार्‍या मेनोपॉजबद्दल.

पण काहीवेळा इतर काही गोष्टींमुळे बीजांडांचं (ओव्हरीज) कार्य अवेळी थांबतं.
उदा. - सर्जिकल मेनोपॉज : शस्त्रक्रिया करून दोन्ही ओव्हरीज काढून टाकल्यामुळे आलेला मेनोपॉज.
तसेच कर्करोगासाठी घेतल्या गेलेल्या रेडिओथेरपी आणि/किंवा किमोथेरपीमुळे ओव्हरीजवर दुष्परिणाम झाल्याने आलेला मेनोपॉज.

मेनोपॉज का येतो ? म्हणजेच मासिक पाळी का थांबते ?

जी.सी. विल्यम्स ह्या शास्त्रज्ञाने असं मांडलं की, उत्क्रांतीदरम्यान अपत्यांमध्ये असलेल्या आपल्या जेनेटीक पूलचं रक्षण करण्याच्या हेतूने स्त्रियांच्या शरीरात काही बदल घडत गेले. मेनोपॉज हासुद्धा स्त्रीशरीराने आपल्यात घडवून आणलेला एक बदल आहे.

आयुष्याच्या शेवटापर्यंत स्त्रियांची गर्भधारणेची क्षमता शिल्लक राहिली तर काही गंभीर प्रश्न उभे राहतात. जसे की, साठाव्या वर्षांपर्यंत एखाद्या स्त्रीला मुले होत राहिली आणि शेवटच्या मुलाला जन्म दिल्यानंतर काही काळातच त्या स्त्रीचा वृद्धावस्थेमुळे मृत्यू झाला, तर तिच्या अपत्यांच्या जिवंत राहण्याला धोका येणार.

माणसाच्या अपत्याला स्वयंपूर्ण व्हायला इतर प्राण्यांच्या तुलनेत बराच जास्त काळ लागतो.
बहुतांश प्राण्यांची पिल्ले जशी जन्मानंतर थोड्या अवधीतच उभी राहतात, स्वतःचं अन्न मिळवायला चालू करतात....तसं माणसाच्या अपत्याबाबत होत नाही.

त्यामुळे त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर मागे राहिलेल्या अपत्यांचा उपासमारीमुळे मृत्यू ओढवू शकतो. आणि परिणामतः सगळाच जेनेटिक पूल धोक्यात येऊ शकतो.
हा जेनेटिक पूल टिकवण्यासाठी स्त्रियांच्या शरीराने ठराविक वयाच्या सुमारास आपल्यातील गर्भधारणेच्या क्षमतेचा त्याग केला.

ह्याचा परिणाम म्हणून तिला होणार्‍या अपत्यांच्या एकूण संख्येत घट झाली. पण तिच्या मृत्यूपर्यंत तिची अपत्ये साधारण १५-१६ वर्षांची होऊ शकल्याने स्वतःचं अन्न मिळवण्याइतपत आणि जेनेटिक पूल पुढे चालू ठेवण्याइतपत स्वयंपूर्ण झाली.
शिवाय तरूण मुले-मुली अन्नाच्या शोधात गेल्यानंतर ही वृद्ध स्त्री नातवंडांसोबत थांबून त्यांचं ...आणि पर्यायाने त्यांच्यामध्ये गुंतवणूक केलेल्या जेनेटिक पूलचं रक्षण करू शकली.
थोडक्यात सांगायचं तर, क्वालिटीसाठी क्वान्टिटी कमी होण्याची झळ सोसूनही माणसासाठी हा सौदा फायद्याचा ठरला.

ह्यालाच "ग्रँडमदर थेअरी" असे म्हणतात.
ह्या थेअरीबद्दल अनेक वाद-प्रतिवाद आहेत. इतर काही थेअरीजही मांडल्या गेल्या. पण आपण इथेच थांबून आपल्या मूळ विषयाकडे वळू या. Happy

मासिक पाळी का थांबते ?

प्रजननक्षम काळात स्त्रीशरीरात काही ठराविक हॉर्मोन्सचा सुसंबद्ध ऑर्केस्ट्रा सतत चालू असतो.
ह्या कलाकारांनी (हॉर्मोन्सनी) काही चुका केल्या तर ऑर्केस्ट्राची सुसूत्रता बिघडते, आणि काही समस्या उद्भवू शकतात.

GnRH (जी एन आर एच), FSH ( फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन), LH (ल्युटिनाइजिंग हॉर्मोन), Prolactin (प्रोलॅक्टिन), Thyroid hormones (थायरॉइड हॉर्मोन्स), Estrogen (इस्ट्रोजेन), Progesterone (प्रोजेस्टेरॉन)
हे ऑर्केस्ट्रातील काही ठळक कलाकार.

HPO axis.jpg

हायपोथॅलॅमस मधून निघालेलं GnRH (जी एन आर एच) हे हॉर्मोन पिट्युटरी ग्रंथीला संदेश देतं. पिट्युटरीने पाठवलेली FSH ( फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन) आणि LH (ल्युटिनाइजिंग हॉर्मोन) ही दोन हॉर्मोन्स ओव्हरीजना संदेश देतात.

ओव्हरीजमध्ये दर महिन्याला काही ठराविक बीजांच्या आकारमान आणि कार्यामध्ये बदल घडत असतात.
FSH आणि LH च्या प्रभावाखाली ह्या बीजांमधून Estrogen (इस्ट्रोजेन) आणि Progesterone (प्रोजेस्टेरॉन) ही हॉर्मोन्स तयार होतात.

ह्या सगळ्या हॉर्मोन्सच्या प्रमाणांमध्ये योग्य वेळी योग्य ते बदल घडत असल्यामुळे प्रत्येक महिन्याला पाळी येते. ( किंवा स्त्रीबीजांचा शुक्राणूंशी संयोग झाल्यास गर्भधारणा होते.)

Hormonal cycle.jpg

ओव्हरीतील एकूण बीजांची संख्या ठरलेली असते. म्हणजे पुरूषांच्या शरीरात जसे नवीन शुक्राणू पुन्हा-पुन्हा तयार होत राहतात, तसं स्त्रियांमध्ये होत नाही.

आईच्या पोटात असताना १२ ते २० आठवड्याच्या स्त्रीगर्भाच्या ओव्हरीमध्ये स्त्रीबीजांची संख्या ही सर्वात जास्त असते....म्हणजे साधारण ७० लाख इतकी.
ह्यातील बरीचशी बीजे गर्भावस्थेतच नष्ट होतात. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या ओव्हरीजमध्ये साधारण २० लाख बीजे शिल्लक असतात.

पहिली मासिक पाळी ते शेवटची मासिक पाळी ह्या ३०-३५ वर्षांच्या काळात साधारणपणे ४०० बीजे परिपक्व होऊन बाहेर पडतात.

Ovary at menopause.gif

मेनोपॉजच्या वयापर्यंत ओव्हरीजमधील स्त्रीबीजांचा साठा जवळजवळ संपत आलेला असतो.
त्यामुळे पिट्युटरी ग्रंथीकडून आलेल्या FSH आणि LH चे आदेश पाळायला आणि त्यानुसार इस्ट्रोजेन तयार करायला पुरेशी स्त्रीबीजे शिल्लक नसतात. परिणामी रक्तातील इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी कमी होत जातं.

आणखी जास्त प्रमाणात FSH पाठवून उपयोग होईल ह्या आशेने पिट्युटरी ग्रंथी FSH पाठवतच राहते. परिणामी रक्तातील FSH चं प्रमाण वाढत राहतं. (म्हणूनच काहीवेळा मेनोपॉजचं निदान करण्यासाठी FSH ची पातळी मोजली जाते.)

मासिक पाळीचं चक्र चालू राहण्यासाठी आवश्यक असणारी सुसूत्रता बिघडल्याने ते चक्र बंद पडतं....आणि असं एक वर्षापर्यंत चालू राहिलं तर मेनोपॉज आला असं मानलं जातं !

ह्या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येईल की मेनोपॉज हा आजार नसून स्त्रीशरीराची अटळ आणि पूर्णतः नैसर्गिक अशी अवस्था आहे.

असं असूनही बहुतांश स्त्रिया मेनोपॉजला का घाबरतात ? त्यावेळी इतका शारीरिक आणि मानसिक त्रास का होतो ??

ह्याचं उत्तर आहे - इस्ट्रोजेनची कमतरता आणि त्यामुळे दिसू लागलेली लक्षणे !

आधी सांगितल्याप्रमाणे स्त्रियांच्या शरीरातील हॉर्मोनल ऑर्केस्ट्रामधील इस्ट्रोजेन हा एक अतिशय महत्वाचा कलाकार आहे. स्त्रीशरीरातील अनेक अवयव आणि त्यांची कार्ये ह्याच्यावर इस्ट्रोजेनचा प्रभाव आणि नियंत्रण असते.
खाली दिलेल्या चित्रावरून ह्याची कल्पना येईल.

Effects of estrogen.gif

मेनोपॉजच्या वेळी रक्तातील इस्ट्रोजेनची पातळी अगदी कमी झाल्याने त्याच्या प्रभावाखाली असलेल्या अवयवांवर विपरीत परिणाम होतो.

.........घरातील स्त्री चार दिवस बाहेर गेली की -
" तू गेल्यावर फिके चांदणे
घर परसूही सुने सुके,
मुले मांजरापरी मुकी अन्
दर दोघांच्या मधे धुके "
..........अशी अवस्था होऊन सगळे भांबावतात ना अगदी तसंच इस्ट्रोजेन नाहीसं झाल्यावर शरीरातील अवयवांचं होतं. Happy

त्यातही जर हे सगळं अनपेक्षितपणे, मनाची कसलीच पूर्वतयारी नसताना घडलं तर त्या स्त्रीला ह्या बदलांसोबत जुळवून घेणं खूप कठीण जातं.
संशोधनात असं आढळून आलं आहे की, ज्या स्त्रियांना ह्या बदलांची आधीपासून माहिती असते, त्यांना मेनोपॉजमुळे होणारी त्रासदायक लक्षणे कमी तीव्रतेने जाणवतात.

हे बदल आणि त्यामुळे जाणवणारी लक्षणे ह्याबद्दल पुढच्या लेखात.

- रुणुझुणू (स्त्रीरोगतज्ञ)

*******************************************************************************************************************

- सर्व चित्रे जालावरून साभार.
- वैद्यकीय बाबींशी संबंधित काही इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत. पण कुणाला त्यांच्यासाठी बोलीभाषेतील मराठी प्रतिशब्द माहीत असल्यास सांगा. मी योग्य ते बदल करीन.

डिस्क्लेमर :
सदरहू लेखाचा उद्देश मेनोपॉज ह्या विषयावरील माहिती देणे हा असून त्या संदर्भातील काही सल्ला-उपचार इत्यादी असतील ते डॉक्टरी सल्ल्यानुसारच करावेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम उपक्रम, रुणुझुणू. उदाहरणे देऊन समजावून सांगण्याची पद्धत आवडली.
लेखमालेला शुभेच्छा.

रुणुझुणु, सर्वप्रथम या विषयावर लिहीते आहेस म्हणुन आभार! अगदी कालच यासंदर्भात विचार करत होते!

वाचला! अतिशय उपयुक्त माहिती सोप्या शब्दात दिली आहेस!

खरं तर ही सिरीज सार्वजनिक का करु नये असे मला वाटले. सार्वजनिक केल्यास ज्या माबोकर स्त्रीया संयुक्तात नाहीत त्यांना आणि ज्या माबोकर पुरुषांच्या घरातील स्त्रीया मेनोपॉजमधुन जाताहेत्/जाणार आहेत त्यांना नक्कीच फायदा होईल. वंध्यत्व आणि गर्भारपण यासारख्या विषयावर चर्चा होते तशी या महत्वाच्या पण दुर्लक्षित विषयाची जाणीव लोकांना होईल!

रुणुझुणु, अतिशय सोप्या शब्दांत फार महत्त्वाची माहिती देत आहेस. चित्रंही माहिती समजून घ्यायला अतिशय सोपी आणि उपयोगी आहेत. धन्यवाद.

धागा सार्वजनिक नसेल तर कृपया करावा.

अतिशय सुंदर रित्या सादर केलेला उपयुक्त लेख.

ओव्हरीतील एकूण बीजांची संख्या ठरलेली असते. >>>
आईच्या पोटात असताना १२ ते २० आठवड्याच्या स्त्रीगर्भाच्या ओव्हरीमध्ये स्त्रीबीजांची संख्या ही सर्वात जास्त असते....म्हणजे साधारण ७० लाख इतकी. ह्यातील बरीचशी बीजे गर्भावस्थेतच नष्ट होतात. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या ओव्हरीजमध्ये साधारण २० लाख बीजे शिल्लक असतात. पहिली मासिक पाळी ते शेवटची मासिक पाळी ह्या ३०-३५ वर्षांच्या काळात साधारणपणे ४०० बीजे परिपक्व होऊन बाहेर पडतात. >>>

हे अजूनपर्यंत माहितच नव्हतं. धन्यवाद रुणू Happy

एका ठराविक वयानंतर आयुष्यातला गर्भारपण व बाळंतपणाचा विषय संपतो पण इस्ट्रोजेन कमी तयार झाल्यामुळे, ज्या गोष्टी आपल्याला आयुष्य संपेपर्यंत वापरायच्या आहेत (मेंदू, हृदय, यकृत आणि हाडं) त्यांची हानी होणार. ही हानी कमी होण्यासाठी चाळीशी आली की काय काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे?

धागा सार्वजनिक करण्याबद्दल अनुमोदन.

मृदुला,
धन्यवाद. टायपो सुधारला आहे.

संयुक्ता व्यवस्थापनाच्या विचारणेवरून, आधीच्या काही लेखांप्रमाणे संयुक्ताला समोर ठेवूनच लेख लिहिले होते.
पण धागा सार्वजनिक करण्यात काहीच हरकत नाही. केला आहे. Happy

रुणुझुणू , लेख उत्तम जमलाय. या काळात होणारे मानसिक बदल / तणाव याबद्दल पण लिहिणार ना ?
घरातील मंडळींना याची कल्पना नसल्याने, बरीच गुंतागूंत होते, घरात.

उपयुक्त विषय आणि सार्वजनिक केल्यामुळे घरातील पुरूषांना पण आपल्या घरातली स्त्री शारिरीक आणि मानसीक दृष्ट्या कशातून जातेय त्याची कल्पना येईल....
म्हणजे आजकाल डिलिव्हरी रूममध्ये एकदा का नवर्^याने बायकोच्या कळा पाहिल्या की मग बाकी मुलांसाठी मदत करतानाची भावना वेगळी असते तसं.... (तसं नसेल तर ही भावना नसते असा दावा नाही आहे....हे फक्त त्यातल्या त्यात विषयाला धरून दिलेलं उदा. आहे... कृ गै. नसावा)

आभार रूणुझुणु.........

रुणुझुणू , लेख उत्तम जमलाय. या काळात होणारे मानसिक बदल / तणाव याबद्दल पण लिहिणार ना ?
घरातील मंडळींना याची कल्पना नसल्याने, बरीच गुंतागूंत होते, घरात. >>>>> अनुमोदन.

शरीरात बदल तर पुरुषांच्याही होतात, मला वाटते त्याला र्अ‍ॅन्ड्रोपॉज म्हणतात ना?

त्या ही विषयीची माहिती आपण जरुर द्यावी, आपल्या लेखणीत असे विषय उत्तम रित्या हाताळण्याची ताकद आहे Happy Happy Happy

पु.ले.शु.

धन्स ही मालिका सुरु केल्याबद्दल. अतिषय उपयुक्त माहिती, सोप्या भाषेत लिहायची तुझी हातोटी आवडेश Happy

फारच सोप्या भाषेत करून सांगितलास गं, त्यामुळे सर्व समजतंय..
संपूर्ण सिरीज फॉलो करणार आणि त्याचबरोबर घरातील महिला, ज्या ह्यातून जात आहेत/ जाणार आहेत त्यांनाही माहिती तुझ्याच सोप्या शब्दात समजावेनही.

युटरस काढून टाकणे- हा प्रकार डॉक्टर्स सुचवतात- ते ऑपरेशन त्रासदायी आणि बरेचदा शेवटाचा पर्याय म्हणून केले जाते- अज्ञान आहे ह्याबद्दल, म्हणूनच त्याबद्दल जाणून घेण्यास आवडेल Happy

Pages