या पावसाळयाआधी
तयारी करावी म्हणतोय थोडी..
भेगा पडल्यात थोड्या त्या बुजवून टाकाव्यात ..
नाहीतर ऐन पावसाळ्यात
पाउस भेगातून मनभर पसरतो उगाच
या वेळी असं व्हायला नको..
आपली चादर स्वप्नांची ..
ती स्वच्छ धुवून ,
कोरडी करून घ्यायला हवी ..
नाहीतर पावसाळाभर ..
तिच्या पापणीला ओली स्वप्न येतात हल्ली ..
या वेळी असं व्हायला नको..
ती छत्री आपली . .
तिचं काय काय दुरुस्त करायचं कळत नाही..
तुटल्या काडया ,
कि कापड रंगबेरंगी ?
ते करता येईल
तुझ्या माझ्या मिठया चोरट्या ,दुरुस्त होत नाहीत ..
पण तरी छत्री नीट करायला हवी ..
काळं कापड लावावं ..
कुठल्याच रंगामुळे काहीच आठवायला नको ..
या वेळी असं व्हायला नको..
खरंतर हे सगळं ..
केलं होतंच की मागच्या वेळीही !!!
पण तरी चुकार पाउस गाठतो मला!
झिरपतो अवचित कुठूनही ..!
अन मग....
ते सगळं होतं जे व्हायला नको..!
तरी दर वेळी वाटतं ...
की ...........
_विनायक
२५ मे २०१२
सुंदर लिहिली आहे
सुंदर लिहिली आहे
Pages