मजरूह लिख रहें है वो, अहल-ए-वफा़ का नाम...

Submitted by टवाळ - एकमेव on 23 May, 2012 - 06:07

मजरूह लिख रहें है वो, अहल-ए-वफा़ का नाम
हमभी खडे हुवे है, गुनहगार की तरह
हम है मतां-ए-कुचा ओ, बाजार की तरह
उठती है हर निगाह, खरी़दार की तरह

खरंतर असरार हुसेन खान उर्फ मजरूह सुलतानपुरी यांच्याबाबत लिहायचे ठरवले आणि पुर्णपणे ब्लँक झालो. असं मी खाजगीमधे बोलताना खुप बोलू शकेन पण ईंटरनेटवर त्यांच्याबद्दल ईतकी माहिती उपलब्ध आहे की त्यापेक्षा वेगळं आणखी काय लिहायचं हा मोठा प्रश्न होता. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अव्वल पाच गीतकारांपैकी मजरूह एक होते. पण ते गीतकार जास्त आणि कवी त्यामानाने कमी होते. उमेदीच्या काळात त्यांनी खरोखरच प्रचंड प्रमाणात उर्दु काव्यलेखन केलं होतं. पण त्यांचं शिक्षण हे सर्वसामान्य शाळा/कॉलेजात न होता मदरशांमध्ये झाल्याने अव्वल उर्दु मधील हे काव्य सर्वसामान्य रसिकांच्या आवाक्याबाहेरचं होतं. हिंदी गीतलेखनाकडे ते केवळ आणि केवळ पोटासाठी वळले. तसा काही काळ त्यांनी हकीम म्हणूनही व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. पण तो तितकासा यशस्वी झाला नाही. वर उधृत केलेली गझल ही त्यांच्या बेकारीच्या काळातली. जी नंतर मदन मोहन या जादूगाराने वापरून तिचं सोनं केलं. चित्रपटसृष्टीत येण्याच्या आधीची गझल असल्याने "मजरूह" या तखल्लूस चा वापर त्यात आहे. मजरूह चा ढोबळ अर्थ "जख़मी आत्मा".

मजरूह यांचा चित्रपटप्रवास सुरु झाला तो सैगल यांनी गायलेल्या आणि प्रचंड लोकप्रिय (अजुनही) ठरलेल्या शहाजहान चित्रपटातील "गम़ दियें मुष्तकिल, कितना नाजूक है दिल ये ना जाना" या गाण्यापासून. या चित्रपटातली सैगलनी गायलेली सगळीच गाणी लोकप्रिय ठरली. त्यातली "गम़ दिये..." आणि "जब दिलही टूट गया" ही तुफान लोकप्रिय ठरली. तरी देखील मजरूह पुढील दोन वर्षे बेकार होते. खाण्या-पिण्याचे वांधे असलेल्या या काळात राज कपूर, नौशाद, मेहबूब खान या आणि अशाच काही मित्रांनी त्यांना आधार दिला. राज कपूरने त्यांचे "ईक दिन बिक जायेगा, माटी के मोल" हे गाणे माती-मोलाने नव्हे तर त्या काळातले चांगले १००० रुपये देऊन विकत घेतलं होतं. नंतर १९४९ मध्ये आलेल्या "अंदाज" ने त्यांचं जिवनच बदलून टाकलं. नौशाद यांच्या संगीताने नटलेल्या या चित्रपटाने उत्पन्नाचे नवे-नवे विक्रम केले. पण दुर्दैव परत एकदा आड आलं. हातात असलेले काही चित्रपट पुरेच होऊ शकले नाहीत. त्यातच साहीर, प्रदिप, भरत व्यास आणि शैलेंद्र यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेपुढे मजरूह यांचे अव्वल उर्दू काव्य झाकोळलं गेलं. पैकी साहीर आणि शैलेंद्र यांचं हिंदी बरोबरच उर्दूवरही तितकचं प्रभुत्व होतं. अशीच तब्बल तीन वर्षे गेली. आणि १९५३ मधे आला "फुटपाथ" - संगीत परत एकदा नौशाद. या ही चित्रपटातली सगळीच गाणी (शाम-ए-गम़ की कसम, सो जा मेरे प्यारे, सुहाना है ये मौसम) लोकप्रिय झाली. उर्दूबरोबरच हिंदी काव्यलेखनाचा मजरूह यांचा हा प्रयत्न लोकांना आवडला. आणि गीतकार म्हणून मजरूह यांनी जी सुरूवात केली ती अखेरच्या श्वासापर्यंत ते सातत्याने गीतलेखन करत होते. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ९९१ हिंदी चित्रपटगीते मजरूह यांनी लिहीली. गीतसंख्येच्या बाबतीत फक्त आनंद बक्षी (१२५१ गीते) मजरूह यांच्यापुढे आहेत. तरीदेखील मी सुरूवातीस उल्लेख केल्याप्रमाणे साहीर, शैलेंद्र प्रभुतींप्रमाणे केवळ गाण्याच्या बोलांसाठी लक्षात रहातील अशी गाणी त्यांनी फार कमी लिहीली. त्यांची गाणी लोकप्रिय झाली. पण त्यामागे संगीताचा वाटा मोठा होता. जवळजवळ सर्वच संगीतकारांबरोबर मजरूह यांनी काम केले. पण केवळ "दोस्ती" चित्रपटातील "चाहुंगा मै तुझे, सांजसवेरें" या एकाच गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. संगीतकाराने आधीच तयार केलेल्या चालींवर गीतलेखन करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांची आणखी काही लोकप्रिय गाणी खालीलप्रमाणे -

  • सुन सुन सुन सुन जाली़मा - आरपार
  • बाबूजी धिरें चलना - आरपार
  • उधर तुम हसीं हो - मिस्टर अँड मिसेस ५५
  • चलीं गोरी पी के मिलन को - एक ही रास्ता
  • नज़र लागी राजा तोरे बंगले पे - काला पानी
  • तुम जो हुए मेरे हमसफर - १२ ओ क्लॉक
  • कोई आया धड़कन कहती है - लाजवंती
  • रातभर का है मेहमां अंधेरा - सोने की चिडीयाँ
  • यें रातें यें मौसम - दिल्ली का ठग
  • न तुम हमें जानो - बात एक रात की
  • जाग़ दिल-ए-दिवाना - ऊंचे लोग
  • उसको नहीं देखा हमने कभी - दादी माँ
  • आजा पिया, तोहे प्यार दूं - बहारोंके सपने
  • तेरे नैना तलाश करें - तलाश
  • आयों कहां से घनशाम - बुढा मिल गया

याशिवाय सी.आय्.डी., तुमसां नहीं देखा, पेईंग गेस्ट, सुजाता, चलती का नाम गाडी, चायना टाऊन, फिर वोही दिल लाया हुं, दोस्ती, मेरे सनम, तिसरी मंझील, ज्वेल थिफ, दस्तक, कारवाँ, अभिमान - हे असे काही चित्रपट आहेत ज्यातली सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय झाली. एखाद्या गीतकाराची एका चित्रपटातली सर्व गाणी लोकप्रिय होण्याच्या बाबतीतला हा रेकॉर्ड आहे जो आजपर्यंत अबाधित आहे.

अशा या महान गीतकाराचा उद्या २४ मे रोजी १२ वा स्मृतीदिन आहे. त्यानिमीत्त मजरूहजींना मानाचा मुजरा !
*****************************************************
आधीच्या लेखांच्या लिंक्स -
http://www.maayboli.com/node/34700 - मन्ना डे
http://www.maayboli.com/node/34742 - नौशाद
http://www.maayboli.com/node/34833 - तलत मेहमूद
http://www.maayboli.com/node/34857 - कैफी़ आझ़मी
http://www.maayboli.com/node/34897 - प्रेम धवन

गुलमोहर: 

या रविवारच्या लोकमत पुरवणीत निफाडकरांनी '' मजरूह'' वर अप्रतिम लेख लिहिला आहे... या लेखाने अजून मजा आली वाचताना.... Happy

नेहमीप्रमाणेच मस्त आहे लेख.

कोई आया धड़कन कहती है ह्याचे शब्द पण चालीवर बांधले असतील तर कमालच आहे. इतके वर खाली होणारे सूर आहेत की त्यावर शब्द सुचणे अवघडच आणि या गाण्याचे शब्द चालीशी अगदी इमान राखून आहेत.

उत्तम लेख,

गाण्यांच्या यादीपेक्षा चित्रपटांची यादीच जास्त बोलकी आहे.

पहिल्याच गीतातल्या शब्दांवर लता आणि मदनमोहनचे एवढे गारुड आहे, कि ते शब्द त्याच चालीवर वाचावे लागतात !

सुंदर आणि तितकाच माहितीपूर्ण लेख ट.ए.....

प्रस्थापित शासनव्यवस्था आणि समाजावरील अन्यायाच्या विरोधात करीत असलेल्या लिखाणाबद्दल १९४८-४९ च्या सुमारास मजरूह आणि त्यांच्याबरोबरीचे त्यांचे साथीदार याना सरकारने त्यावेळेच्या पायंड्यानुसार अटक केली होती. माफीनाम्यावर सुटकाही देवू केली. पण मजरूह यानी त्यावर सही करण्यास नकार दिला व त्याबदल्यात दोन वर्षाचा तुरुंगवास पत्करला. दोन वर्षाच्या त्या तुरुंगवासातून बाहेर आल्यानंतर मात्र मजरूह सुलतानपुरींनी मुंबईच्या चित्रपटसृष्टीत असे काही आपले पाय रोवले आणि आपल्या प्रतिभेचा आविष्कार दर्शविला की अगदी त्यांच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत ते कधीच त्या मोहमयी दुनियेतून बाहेर गेले नाहीत.

चोप्रा बॅनर्सने जसे साहिर, आर.के. ने शैलेन्द्र-हसरत, तसेच नासिर हुसेन यानी मजरूह शिवाय चित्रपटनिर्मिती केली नाही आणि मजरुह यानी त्यांच्या चित्रपटांना भरभरून यश आपल्या लेखणीद्वारे मिळवून दिल्याचा इतिहास आहेच. सचिनदेव बर्मन आणि पुढील पिढीतील राहुलदेव बर्मन या दोघांशीही त्यांचे सूर खूपच सुंदर जुळले होते. देव आनंद यांच्या 'गाईड' चा सन्मानयीय अपवाद वगळता (त्यात शैलेन्द्र) बहुतांशी चित्रपटांतील गीतांना मजरूह स्पर्श लाभला होता.

मदन मोहन यांच्या 'दस्तक' या एकमेव चित्रपटाची गीते लिहून ते थांबले असते तरी त्या एकाच चित्रपटामुळे ते कायमचे आमच्या लक्षात राहिले असते.

अशोक पाटील

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद ! Happy

@ अशोकजी - "मदन मोहन यांच्या 'दस्तक' या एकमेव चित्रपटाची गीते लिहून ते थांबले असते तरी त्या एकाच चित्रपटामुळे ते कायमचे आमच्या लक्षात राहिले असते." - अगदी अगदी ! Happy

शिर्षक पाहताक्षणीच ताबडतोब धागा उघडुन वाचला.
(नेहमीप्रमाणेच) अप्रतिम लेख!!!!!

पहिल्याच गीतातल्या शब्दांवर लता आणि मदनमोहनचे एवढे गारुड आहे, कि ते शब्द त्याच चालीवर वाचावे लागतात !>>>>>

मदन मोहन यांच्या 'दस्तक' या एकमेव चित्रपटाची गीते लिहून ते थांबले असते तरी त्या एकाच चित्रपटामुळे ते कायमचे आमच्या लक्षात राहिले असते.>>>>>दिनेशदा, अशोकजी +१*

दस्तक मधली लताची गाणी गेटच आहेत पण त्यामूळे रफीचे, तुमसे कहूँ एक बात परोंसी, हल्की हल्की.. हे जरा कमी ऐकवले गेले. अंगावर मोरपिस फिरल्यासारखे वाटते हे गाणे ऐकून (याचे चित्रीकरण मात्र बटबटीत आहे.)

नेहमीप्रमाणे चांगला लेख.

पहिल्याच गीतातल्या शब्दांवर लता आणि मदनमोहनचे एवढे गारुड आहे, कि ते शब्द त्याच चालीवर वाचावे लागतात ! >> 'वाचले जातात' असेच म्हणावे लागेल Happy

"दस्तक" एकुणच अपेक्षाभंग करतो. गाणी मात्र सगळीच अप्रतीम.

अप्रतिम लेख, टवाळ -ए-कमेव Happy
सुंदर!
अगदी कालच 'हम है मतां-ए-कुचा ओ, बाजार की तरह...' हेच गाणं रिपिटवर किती वेळा ऐकलं असेल...
आणि नेमका मजरूह साहेबांचा स्मृतीदिन... माहीतही नव्हतं!

"मदन मोहन यांच्या 'दस्तक' या एकमेव चित्रपटाची गीते लिहून ते थांबले असते तरी त्या एकाच चित्रपटामुळे ते कायमचे आमच्या लक्षात राहिले असते.".... प्रश्नच नाही... अगदी.

मदन मोहन वर लिहा नं... एका लेखावर पुरणार नाही... ती एक लेखमालिकाही होईल Happy

छान लिहिलेत. अशोक पाटील यांच्या प्रतिसादाची वाट पहात होतो. आर डी-एस डी ही नावे घेतल्याशिवाय मजरूह का फसाना पूरा नही होगा.
त्यांना एकच फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले हे वाचून नवल वाटले आणि फिल्म फेअर अवॉर्डस बद्दल जे ऐकलंय ते खरे असावे असे वाटू लागले. त्यांच्या रूपाने हिंदी चित्रपटांतील गीतकाराला प्रथमच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला तेव्हा छान वाटले.
हिंदी चित्रपटगीतांत सनम, बलम अशा शब्दांची भरती करण्याचे श्रेय मजरूहना जाते असे वाचल्याचे आठवते.

दिनेशदा, दस्तक या चित्रपटाचा विषय तसा बोल्ड होता आणि चित्रपटाच्या कथेच्या संदर्भात रफीचे ते गाणे मला योग्य वाटले. हम है मता ए कुचा..ही मजरूहची स्वतंत्र रचना असली तरी चित्रपटातल्या प्रसंगाशी सुंदर जुळलीय. दस्तकमधली बैंया ना धरो आणि माई री मैं कासे कहूं (यात मदन मोहनचा आवाज ऐकायला मिळतो) ही ऑल टाइम फेव्हरिट.

चांगला, माहितीपूर्ण उपयुक्त लेख, ही मालिकाही सुंदर

या लेखावरील दिनेश , अशोक , दाद आणि भरत यांचे प्रतिसादही वाचनीय व सुंदर

धन्यवाद

साठे, मला आपले असे वाटते की ही ललित मालिका नसून लेखमालिका आहे (लेखनाच्या व विषयाच्या स्वरुपानुसार) व म्हणून आपण ती लेख म्हणून प्रकाशित केलीत तर? Happy

चुभुद्याघ्या

टवाळा, मस्त लेख Happy
फुटपाथ या सिनेमाला संगीत खय्याम आणि तिमीर बारन या दोघांनी दिलय. नौशाद ने नाही.