भटकंती - औरंगाबाद (घृश्नेश्वर + वेरूळ/एलोरा)

Submitted by Chintu on 13 May, 2012 - 23:32

मागील भागवरुन पुढे: भटकंती - औरंगाबाद (पाणचक्की + बीबी का मकबरा)

...जो पर्यंत आग्रा जाऊन ताज बघत नाही तो पर्यंत एकदातरी औरंगाबाद ला जाऊन बीबी का मकबरा बघुन यावं.
♦♦♦♦

गाडी आता देवगिरीच्या किल्ल्या कडे आली.
"आत काही नाही, खंडर आहे सगळं. वर जायला ४ तास लागतात." - ड्रायवर
"इससे अच्छा अपन घृश्नेश्वर चालते है. १२ ज्योतीर्लींगोमे से एक है." - मधल्या सीटवरील कुटुंब प्रमुख
"दोपहर के १२ बजे है. अब येह किला कौन चढ पायेगा." - दोन म्हतार्यापैकी एकजण
"येताना आपण इथे उतरून किल्ला चढू या लोकांना जायचं तर जाउ दे." - सौ आणि मी

देवगिरी सोडून आम्ही घृश्नेश्वर मंदिरात पोहोचलो. देवगिरी समोर नकार घंटा वाजवणारे, घृश्नेश्वरच्या मंदिरात असतील नसतील त्या सगळ्या घंटा वाजवत होते.

वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जिर्णोद्धार केला. सध्याचे आस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक असेलेल्या या मंदिराच्या जागेचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या पौराणिक ग्रंथात मिळतो.

टिपः
१) मंदिरपरिसरात फोटोग्राफीस मनाई आहे. मी प्रयत्न करुन पाहिला. पकडलो गेलो Happy
२) मंदिराबाहेर फुल/हार विकणार्‍या दुकानात आपल्याला हव्या असतील त्याच वस्तु घ्याव्या. दुकानदार गळ्यात मारण्यात एक नंबर आहेत. उदा. फुल-१०रु, नारळ-१०रु, साखरफुटाणे-१०रु, पिंडीवर वाहण्यासाठी दुध-१०रु ई. ई. करुन पुजेच्या ताटाची किंमत ६०-७० रु वर जाते.
३) मंदिरात शंकराच्या पिंडीवर बेल आणि फुलं याशिवाय काहिही वाहण्यास मनाई आहे. त्याव्यतीरिक्त काही नेल्यास ते मंदिराच्या गाभार्‍या बाहेरच ठेवुन घेतात, व बाहेर पड्ल्यावर ते परत न्यावं लागत.
४) मंदिर हे विशिष्ट पोंगापंडितांनी भरले आहे. त्यामुळे गाभार्‍यातुन बाहेर आल्यावर कोणी गंध/टिळा लावायला बोलवले तर तो लाउन घ्यावा, नमस्कार करुन पुढे जावे व परत दुसरा गंध/टिळा लाउन घ्यावा. पैसे ठेवण्याच्या भानगडीत पडू नये.
५) दान ठेवा/ चढावा ठेवा, देव तुम्हाला आशिर्वाद देईल असे मंदिराच्या गाभार्‍यातील पुजारी दर २ से़कंदानी ओरडत असतो. भक्तांनी आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरावी.
६) अतिशय मह्त्वाची सुचना - पुरुष/मुलांना या मंदिरात प्रवेश करण्याअगोदर कंबरेच्यावरचे सर्व कपडे काढावे लागतात. त्यामुळे दर्शनाला जाताना भोके न पडलेली, बर्‍यापैकी पांढरी दिसणारी, पिवळी न झालेली बनियान घालावी.
वरिल ६ वी गोष्ट मला माहीत नव्हती. मी टि-शर्ट काढल्यावर सौ. ने हळुच कानात शिव्यांची लाखोली वाहिली.

आता आम्ही पोहोचलो होतो ते वेरुळच्या लेण्यात. लेणी पाहतांना गाईड असतातर बरं झाल असत असं सारखं वाटतं होतं. तरी अगोदर बरीच माहिती इंटरनेट वरून वाचल्यामुळे ती उणीव भरून निघाली. ५-१० व्या शतकात डोंगर पोखरून ही लेणी तयार केली आहेत. इथे बौध्द, जैन आणि हिंदू अशा तीनही समाजाच्या देवतांची कोरीव शिल्पे आहेत. यात गुफा क्र. ३०-३४ व १६ अधिक देखण्या आहेत.

३० ते ३४ या साधारण जैन गुंफा आहेत ३२ वी इंद्रसभा ही २ मजली एका अखंड कातळात कोरलेली गुंफा आहे. या इंद्रसभे बाहेर एक देउळ आणि हत्ती उभा आहे. इंद्रसभेच्या आत एक मोठा सभामंडप असुन त्याच्या छतावर सुंदर नक्षीकाम असलेले कमळ आहे.

कैलासनाथ, गुंफा क्र १६. ही एक भव्यदिव्य मंदिरा एवढी मोठी आहे. अनेक मजली असलेली हे मंदिर एकाच मोठ्या कातळातून कोरून काढलं आहे. या परिसरातील ही सर्वात मोठी गुफा आहे. शंकराच्या निवासस्थान कैलास पर्वताचा देखावा ह्या लेण्यात कोरला आहे.

मुख्य मंदिराच्या आसपास रामायण, माहाभारातातील कथा, हत्ती, सिंह तसेच बरेच काल्पनीक प्राणी कोरलेले आहेत. ह्यातील काल्पनीक प्राणी हे चिनी ड्रगन, तसेच चिनी पौराणीक गोष्टीत आढळणार्‍या प्राण्यांसारखे दिसतात.

खालील फोटोत उजव्या बाजुला महाभारतातील एक प्रसंग दाखवला आहे. तर डाव्या बाजुला एक काल्पनीक प्राणी दिसतो.

क्रमश:

♦♦♦♦♦

सूची
घृश्नेश्वर - http://en.wikipedia.org/wiki/Grishneshwar
वेरुळ / एलोरा - http://en.wikipedia.org/wiki/Ellora_Caves
MTDC - http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/HTML/MaharashtraTourism/Defaul...

पुर्वप्रकाशित - http://www.bahawa.blogspot.in/#!http://bahawa.blogspot.com/2012/05/blog-post_14.html

गुलमोहर: 

फोटो सुंदर आहेत.

एमटीडीसी च्या टुर्स मध्ये पूर्वी चांगले गाइड मिळायचे. सकाळी ८ च्या सुमारास औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकावरुन त्यांची एक अजिंठ्याला जाणारी आणि एक वेरुळ, देवगिरी किल्ला, घृष्णेश्वर, पाणचक्की, बिबी का मकबरा इ ठिकाणांना जाणारी बस सुटायची. दोन्ही बसेसना पूर्वी भरपुर गर्दी असायची. त्यातले निम्मे पर्यटक कोरियन असायचे. पाहूण्यांना घेवून आम्ही बर्‍याचदा या टुर्सनी जायचो. शेवटचं साधारणतः ६-७ वर्षांपूर्वी गेलो होतो आम्ही.

कैलासनाथ, गुंफा क्र १६. ही एक भव्यदिव्य मंदिरा एवढी मोठी आहे. अनेक माजली असलेली हे
छान आहे, मजली असे करा !

यातली कैलास गुफा किंवा कैलास मंदिर हे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने आश्चर्य आहे. एक भलीमोठी कँटीलिव्हर (नेमकी साइझ आत्ता आठवत नाहीये) कॅनॉपी /मंडप आहे या गुफेमध्ये.

तसेच कैलास गुफेमधलं मंदिर कोरताना आधी कळस आणि नंतर पाया असे उलटे कोरलेले आहे असे म्हणतात. (याबद्दल एक आख्यायिका सुद्धा आहे. कोण्याएका राजाच्या बायकोने घृष्णेश्वरापेक्षा मोठे किंवा त्यासारखेच एक मंदिर बांधून मागितले होते. तिने त्या मंदिराचा कळस महालातून बघितल्याशिवाय जेवणार नाही असं ठरवलं होतं. म्हणून राजाने आधी कळस कोरून घेतला आणि नंतर खालचे मंदिर कोरण्यात आले. Happy

@अल्पना :
>>एमआयडीसी च्या टुर्स मध्ये पूर्वी चांगले गाइड मिळायचे. <<

एमआयडीसी = महा. इंडस्ट्रियल डेव्हलप्मेंट कॉर्पोरेशन.
तुम्हाला, एम टी डी सी = महाराष्ट्र टूरिझम डेव्हलप्मेंट कॉर्पोरेशन असे म्हणायचे आहे बहुतेक.

देवगिरीचा किल्ला एकदम बघण्यासारखा आहे. परत संधी मिळाली तर नक्की चुकवू नका. बाकी माहिती/फोटो छान!

तसेच कैलास गुफेमधलं मंदिर कोरताना आधी कळस आणि नंतर पाया असे उलटे कोरलेले आहे असे म्हणतात. >> हो माहिती पुस्तकातही तसाच उल्लेख आहे. त्या स्थापत्यशास्त्राला सलाम. दुमजली गुंफा हा प्रकार फक्त तिथेच पाहिला होता. मात्र सोंड तुटलेले गजशिल्प पाहुन फार वाईट वाटते.

महाराजांनी आग्रा भेटीला जाताना वाटेत घृश्नेश्वराचे दर्शन घेतले होते.

देवगिरीचा किल्ला एकदम बघण्यासारखा आहे >> अगदी खरयं.. आम्ही २६ जानेवारीला गेलो होतो तेव्हा किल्ल्यावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पहावयास मिळाला.

त्या एमटीडीसी च्या टुरमध्ये भद्रा मारुतीचा स्टॉप असतो का? खुलताबादच्या औरंगजेबाच्या कबरीजवळ पूर्वी बस थांबवायचे.

पण चिंटु आणि कुटंबीय हे खाजगी टुरच्या गाडीने गेले होते असे वाचल्यासारखे वाटले.
एमटीडीसीची बस खुलताबादला कबरीजवळ थांबवायचे.

@महागुरु: हो खुलताबाद ला गेलेलो. औरंगजेबाची कबर पाहिली. टुर MTDC ची होती, MTDC बाहेर contract देते. जास्त लोक नसल्याने त्यानी Tavera पाठवली. आणि १० पेक्षा कमी लोक असतील, तर गाईड मिळत नाही. हे त्यानी आम्हाला सांगितल नाही. उलट तिकडच्या "मधाळ" बाई ने खोट सांगितल की ८ लोक आहेत.