भटकंती - औरंगाबाद (पाणचक्की + बीबी का मकबरा)

Submitted by Chintu on 13 May, 2012 - 05:57

“दर वर्षी मी ट्रीप प्लॅन करते. यावेळी तू करायचीस.” सौ चा आदेश आला.
बरेच दिवसापासून हिची धुसपूस चालू होती, आता जर मी काही प्लॅन नाही केला तर माझं हिरोशिमा-नागासाकी झालं असतं. मी लागलीच तहाच्या बोलणीला उभा राहिलो. माझ्यावर बऱ्याच जाचक अटी लादण्यात आल्या. “यावेळी सुटी कधी काढायची आणि कुठे फिरायला जायचं हे मी ठरवायचं” हे अतिशय महत्वाच कलम तहात होतं.

मी कामाला लागलो. अजंठा-वेरूळ लेणी बघायचं ठरलं. मित्रांनी वेड्यात काढालं. “अरे मे महिन्यात औरगाबादला कोण जात का? करपशीलना गड्या.” पण आयत्यावेळी केलेला प्लॅन बजेट बाहेर जात होता. हॉटेल, ट्रेन ची तिकीट सगळीच मारामार होती.

बाकी प्लॅनिंग करणे हा माझा प्रांत नाही. हे सगळं सौ.कडे. मी नेहमी Agile mode मध्ये काम करतो. सॉफ्ट्वेअर डेव्हलपमेन्ट मध्ये सध्या Agile model आलंय. पूर्वी Waterfall model मध्ये भरपूर प्लॅनिंग(?), कॉस्टिंग, एस्टिमेशन्स केली जायची. त्यामुळे १०-१२ महिन्याच्या कामात पहिले ८-९ महिने जबरदस्त प्लॅनिंग होत असे. उरलेले २-३ महिने coding आणि testing. जर कस्टमरने मधेच काही बदल सांगितला की सगळ्या प्लॅनिंगची बोंबाबोंब लागते. मग परत कॉस्टिंग, एस्टिमेशन्स. Agile model मध्ये कस्टमरने कधी पण बदल सांगितला तरी करन्ट प्लॅनिंग मध्ये हे सगळा बदल सामउन घ्यायची तयारी ठेवावी लागते. प्लॅनिंग मध्ये वेळ न घालवता डायरेक्ट coding आणि testing ला सुरवात. त्यामुळे १२ महिन्यांनी दिसणार सॉफ्ट्वेअर २ महिन्यातच बाहेर येत. कस्टमर खुश. बिलिंग चे पैसे लवकर मिळाले म्हणून कंपनी खुश. मधल्यामध्ये १२ महिन्याची काम २-३ महिन्यात संपवावी लागल्यामुळे सॉफ्ट्वेअर डेव्हलपरचं मरण.

तर मी नेहमी Agile mode काम करण्यामुळे सगळं आयत्या वेळी प्लॅन केलं आणि सौ ला खुश केलं. औरंगाबाद ला MTDC मध्ये बुकिंग मिळाल. मे महिना त्यामुळे कडक उन्हाळ्यात औरंगाबादचा ऑफ-सीझन. पुण्याजवळ असल्याने ट्रेन बुकिंग वगैरे झंझट नाही. MTDC च ते जितक चांगल असण्याची अपेक्षा होती तितकं चांगल होत आणि एरवी फक्त झोपायला हॉटेल वर येणार तर लक्झरी हवी कशाला.

MTDC च्या आत मध्येच टुर बुकिंगच एका खाजगी हॉटेलचं काउंटर होत. दुसऱ्या दिवसाची वेरुळची टूर आम्ही बुक केली. सकाळी बस ९:३० ला येईल आणि माहिती द्यायला गाईड असेल अशी १००% खात्री दिली. सकाळी ९:३० ला बस च्या जागी टवेरा आली. आणि गाईड तरी मिळणार का? अशी शंकेची पाल मनात चुकचुकली. पाल चुकचुकणे अस का बर म्हणतात? मी आजपर्यंत पाल कशी चुकचुकते हे ऐकल नाही. कदाचित हा वाक्प्रचार मराठी भाषेला देणाऱ्या दिग्ग्जाने ऐकलं असेल.

पालीने चुकचुकून अगोदरच सांगितलं होत त्याप्रमाणे गाईड नव्हता. भरलेले पैसे पाण्यात गेले होते. आलीय भोगासी, अस म्हणून आम्ही निघालो. ड्रायवर च्या बाजूला एक म्हातारा, मधल्या सीटवर एक कुटुंब, मागच्या एका आडव्या सीटवर एक म्हतारा आणि दुसऱ्या आडव्या सीटवर मी आणि सौ.

गाडी निघाली. पहिला स्टॉप पाणचक्की. उंचावरून पडणार पाणी गाडीवाल्याने दुरुनच दाखवलं. “आंत बघायला काही नाही. आपण पुढे जाऊ.” “हा! वोह क्या उंचाईसे पानी गीर राहा है! और क्या देखना” - मधल्या सीटवरील कुटुंब प्रमुख. आम्ही हट्टाने उतरलोच.

तुर्कताज खान या निजामाच्या विश्वासू सेवकाने १६९५ मध्ये पाण्यावर चालणारी चक्की बनवली. जातं फिरवण्यासाठी लागणारी शक्ती उंचावरून पडणाऱ्या पाण्याने मिळते. त्याकाळी या चक्कीचा वापर गोर-गरीब, यात्रेवर निघालेले यात्रेकरू करीत. एका मशिदवजा इमारतीमध्ये मोधोमाध पाण्याचा एक हौद, हौदाच्या मध्यभागी एक कारंजं. हौदाच्या एका बाजूला उंचावरून पाणी पडतं आणि तिकडेच एका छोट्या खोली मध्ये धान्य दळण्यासाठी जातं आहे. मे महिना असूनही पाण्याला बऱ्या पैकी जोर होता.

18mm - ISO 100 - F/8 - 1/400s
पाणचक्की परिसरात काढलेला एक माझा आवडता फोटो.

पाणचक्की पासून साधारण १०-१५ मिनिटाच्या अंतरावर "गरीबांचा ताज" म्हणून नावाजलेला बीबी का मकबरा आहे. हा बांधला , मुघल राजपुत्र आझम शाह याने. मुघल राजा औरंगजेब याच्या पहिल्या बायकोचा, म्हणजे रबिया दुरानी हिचा हा मुलगा. आपल्या आईची आठवण म्हणून ताज सारख काही तरी बांधाव म्हणून या राजपुत्राने आपल्या बापाकडे हात पसरले. औरंगजेबाने आपल्या पूर्वजांनी केलेली चुक(?) परत न करता फक्त ७ लाख राजपुत्राला दिले. ३ अरब २० करोड रुपये खर्च आलेल्या ताजमहालची बात तर काय औरच. हा मकबरा लाल आणि काळ्या दगडांबरोबर, संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासुन बनविलेला आहे.ज्यास स्टक्को प्लॆस्टर असे म्हणतात. लोकं जसं Apple iPad घायला जमत नाही तर Samsung tab, किंवा iPhone च्या जागी Samsung चा कुठला तरी Android फोन घेतात तसं जो पर्यंत आग्रा जाऊन ताज बघत नाही तो पर्यंत एकदातरी औरंगाबाद ला जाऊन बीबी का मकबरा बघुन यावं.

बीबी का मकबराचे हे काही फोटो.
18mm - ISO 100 - F/8 - 1/400s

18mm - ISO 100 - F/8 - 1/500s

22mm - ISO 100 - F/8 - 1/400s

क्रमश:
♦♦♦♦♦

सूची
बीबी का मकबरा - http://en.wikipedia.org/wiki/Bibi_Ka_Maqbara
पाणचक्की - http://en.wikipedia.org/wiki/Panchakki
MTDC - http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/HTML/MaharashtraTourism/Default.aspx?strpage=../MaharashtraTourism/CitiestoVisits/Aurangabad/AurangabadAttraction.html

पुर्वप्रकाशीतः http://bahawa.blogspot.in/2012/05/blog-post.html

गुलमोहर: 

औरंगाबाद बाफवर विचारले असते तर थोडीफार माहिती मिळाली असती. MTDC च्या दर्जाबद्दल अनुमोदन.
एकुणच पर्यटन खात्याने औरंगाबादसाठी मिळणारा निधी योग्यप्रकारे न वापरल्याने,हळु हळु भारतीय आणि परदेशी पर्यटक पाठ फिरवत आहेत.