१० मे : एक महत्वपूर्ण दिनांक

Submitted by दामोदरसुत on 10 May, 2012 - 12:17

१० मे : एक महत्वपूर्ण दिनांक

१० मे १८५७ : पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या उद्रेकाचा पहिला दिवस.खरे तर एकाच वेळी हा उद्रेक घडविण्यासाठी ३१ मे हा दिनांक ठरला होता. पण नवी काडतुसे वापरण्यास नकार देणार्‍या मिरतमधील ८५ शिपायांना अत्यंत हीन वागणूक देऊन १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावून अंमलात आणल्याने तेथील तुकड्यांचा संयम सुटला. १० मे च्या सकाळीच
मिरत येथील लष्करी छावणीतून ईस्ट इंडिया कंपनीच्या गोर्‍या ब्रिटिश सैनिकांशी संघर्षाला प्रारंभ झाला. प्रथम त्यांनी आपल्या अटकेत पडलेल्या सहकार्‍यांना सोडवले आणि त्यानंतर हा वणवा संपूर्ण उत्तर भारतात पसरला.
पण त्या आधी मार्च मध्येच कलकत्त्याच्या बराकपूर छावणीतील मंगल पांडे [ यांची अमिर खान याने केलेली चित्रपटातील भूमिकेची आठवण वाचकांना असेलच] यांनी नवी काडतुसे वापरण्याच्या बळजबरीला आव्हान देऊन २९ मार्च १८५७ या दिवशी पहिली ठिणगी पाडली होती व ८ एप्रिल १८५७ या दिवशी हौतात्म्य पत्करले होते. त्यामुळे या स्वातंत्र्ययुद्धातील पहिल्या हुतात्म्याचा मान मंगल पांडे यांना आहे. १९०८ मध्ये लिहिलेल्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथात सावरकर म्हणतात, " सत्तावनच्या साली हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यबीजाला अंकूर फुटविण्यासाठी प्रथम मंगल पांड्याने त्याच्यावर आपले ऊष्ण रक्त ओतले आहे. त्या स्वातंत्र्यबीजाचा हंगाम जर पुढे मागे आला तर त्याच्या पहिल्या नैवेद्याचा मान मंगल पांड्याला आहे."

१९०८ मध्ये ब्रिटिशांनी भारतात या उठावावर जो विजय मिळवला, त्याला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यानिमित्त नाटके, आणि आनंदोस्तव साजरा करायला सुरुवात केली. नाटकामध्ये बहदुरशहा, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे यांची यथेच्छ टिंगलटवाळी असायची. या सर्वांना
चोर्-लुटारू असे रंगवले जायचे. ब्रिटनमध्ये ही नाटके लोकप्रिय झाली आणि तेथील भारतीयांना मात्र हे मुकाट्याने सहन करावे लागत होते.
त्याचवेळी सावरकरांचे '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हे पुस्तक मराठीत लिहून तयार झाले होते.
पण प्रकाशनापूर्वीच त्यावर बंदी घातली गेली होती. गुप्तपणे छापण्याच्या प्रयत्नांना तोवर यश आले नव्हते.

१० मे १९०८ : सावरकरांनी ब्रिटिशांच्या आनंदोत्सवाला प्रत्युत्तर म्हणून लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये १८५७ च्या वीरांचा गौरव करणारा समारंभ आयोजित केला. त्यावेळी बहादुरशहा, नानासाहेब, तात्या टोपे, लक्ष्मिबाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून गौरविले होते. त्यात सावरकरांनी आपल्या भाषणात त्या संघर्षाला उघड उघड स्वातंत्र्यसमर म्हटले. या समारंभाला मादाम कामा, श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या बरोबरच ब्रिटन मध्ये शिक्षण घेत असलेले भारतीय विद्यार्थि मोठ्या प्रमाणात हजर होते. त्यापैकी बहुतेकांनी स्वातंत्र्यसंग्रामात बहुमोल कामगिरी केली. त्यानंतर सप्तेंबरात त्यांच्या ग्रंथाचे इंग्रजीतील भाषांतर हॉलंडमध्ये गुप्तपणे छापून सर्वत्र गुप्ततेने प्रसारीत केले गेले. त्या इंग्रजी ग्रंथावरून ते अनेक भाषांमध्ये अनुवादित होऊन गुप्तपणे प्रसारीत झाले. या ऐतिहासिक ग्रंथालाच एक असा इतिहास आहे कि जो एक स्वतंत्र लेखाचाच विषय आहे.

१० मे १९३७ : सावरकरांची स्थानबद्धतेतून मुक्तता व राजकारणात भाग घेण्यास परवानगी.

१० मे २०१२ : या उठावाची सुरवात झाली त्याला १५५ वर्षे झाली. त्या निमित्त सर्व हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन!

गुलमोहर: 

व्वा ! काय विलक्षण योगायोग आहे हा..... १० मे या दिवसाच्या २४ तासापैकी केवळ ४ मिनिटे बाकी असतानाच मी हा धागा पाहिला आणि या एकाच दिवशी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या चार महत्वाच्या घटना घडल्या होत्या हे समजले आणि क्षणभर थरारूनच गेलो.

१० मे १८५७ - दीडशे वर्षापेक्षा जास्त काळ....! भयाण अंधार्‍या वाटेवर पडलेल्या एका उग्र वाटेवर त्या ठिणगीच्या आधारे ज्यानी "उद्याच्या उषःकालासाठी" नीडरपणे अव्याहत अथक वाटचाल केली त्यांच्या प्रत्येक कृतीला मनःपूर्वक अभिवादन या निमित्ताने करताना उर अभिमानाने भरून येतो.

धन्यवाद दामोदरसुत...या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल.

अशोक पाटील

धन्यवाद दामोदरसुत...
छान अभ्यास

सेनापती ,

आपल्याकडे अजुन काही असल्यास, कृपया माहिती द्यावी हा प्रेमळ आग्रह .

chan

छान Happy

माझ्याकडे Tatya Tope: Operation Red Lotus हे तात्यांच्याच वंशजांनी संशोधन करुन लिहीलेले पुस्तक आहे.
१८५७ च्या स्वातंत्रसमराबाबत डोळे उघडणार्‍या अनेक गोष्टी त्यात आहेत. हे स्वातंत्र्ययुद्ध का असफल ठरले, व इतर अनेक गोष्टी त्यात आहेत. सावरकरांच्या पुस्तकात काही तॄटी राहून गेल्या असतील तर त्याचेही स्पष्टीकरण ह्यात मिळते. हे पुस्तक Rupa Publications नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे व ऑनलाईन पैसे भरून मागवल्यास ५-६ दिवसाच्या आत घरपोच येते.

महत्वाची टीपः हे पुस्तक म्हणजे ऐतिहासिक कादंबरी नव्हे. नकाशे, भाषांतरित पत्रे, व इतर तत्सम पुरावे यांनी भरलेला महत्वाचा ऐतिहासिक दस्तैवज आहे.

प्रतिसादाबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!
मंदार्_जोशी यांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद! त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकातील लोकांना फारसा माहित नसलेला महत्वाचा भाग थोडक्यात एका लेखाद्वारे तात्या टोपे यांच्या जन्म दिनी किंवा पुण्यतिथी दिनी मायबोलीवर द्यावा ही विनंति.
सावरकरांना त्याकाळात ब्रिटन मध्ये मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्यांनी १८५७ वर एक अजरामर ग्रंथ लिहिला. त्यानंतर कितितरी नवनवीन कागदपत्रे खुद्द ब्रिटिशांनीच खुली केली आहेत त्यामुळे माहितीत खूप भर पडते आहे. ' १८५७ चे बंड नव्हते तर ते स्वातंत्र्यसमर होते' हे निर्भयपणाने मांडून स्वातंत्र्यसंग्रामात उतरण्याची प्रेरणा देणारा ग्रंथ लिहिण्याचे ऐतिहासिक कार्य सावरकरांनी स्वतः क्रांतिकार्यात व्यस्त असूनही केले.

मंदार धन्यवाद रुपा प्रकाशनाच्या पुस्तका बद्दल लिहिलेस म्हणून.

दामोदरसुत आपल्यालाही धन्यवाद. आय पी एल च्या नादात लोकांना माहीत नाही त्यांच्या पुर्वजांनी काय खस्ता खाल्यात ते.

आपल्या स्वातंत्र्य संग्रामात भारतातल्या प्रत्येक कुटुंबातला एक एक बळी गेला असता तर आज आपल्या लोकांना त्याची जास्त किंमत राहिली असती.