कालाय तस्मै नमः | ------- १

Submitted by श्यामजी कुल on 10 May, 2012 - 03:03

जन्माने रशियन पण नंतर अमेरिकेचे नागरिक प्राप्त वैज्ञानिक जॉर्ज गॅमो (George Gamow)
यांनी १९३८ मध्ये अवकाशाचे वक्रत्व व अवकाशाची प्रसरणशीलता या सापेक्षतेच्या सिद्धांताशी निगडित
असणाऱ्या कल्पना सर्वसाधारण माणसाला समजणाऱ्या भाषेत कथेच्या माध्यमात सांगण्याचा प्रयत्न केला..या कथेतील तो माणूस म्हणजे बॅंकेत कारकून असणारा सी.जी.एच. टॉमकिन्स हा तरुण ! ही कथा त्यानी हार्पर्स मॅगेझिन या प्रसिद्ध मासिकाकडे पाठवली व पूर्वपरंपरेनुसार ते साभार परत आले..ते मग त्यानी बासनात बांधून ठेवले.
त्यानंतर वॉर्सा येथे भरलेल्या शुद्ध विज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत चार्लस डार्विन या मित्राशी बोलताना सहज आपल्या या लेखनाचा उल्लेख त्यानी केला.हा डार्विन म्हणजे उत्क्रान्तिवादाचा जनक डार्विनचा नातू.जोर्ज गॅमोना त्याने आपले हस्तलिखित बासनातून काढून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसकडून प्रकाशित होणाऱ्या डिस्कव्हरी या प्रसिद्ध शास्त्रीय नियतकालिकाचा संपादक सी.पी शॉ याचेकडे पाठवण्याचा आग्रह केला. गॅमो यानी तसे केले.आणि आठवड्याभरातच त्यांचे लेख प्रकाशित करत असल्याची तार त्याना मिळाली एवढेच नव्हे तर हे लेख आणखी काही भर घालून पुस्तकस्वरूपात "मि.टॉमकिन्स इन वंडरलॅंड" या नावाने १९४० मध्ये युनिव्हर्सिटी प्रेसनेच प्रकाशित केले व ते सोळा वेळा पुनर्मुद्रित करावे लागले.
१९४४ मध्ये त्याचा दुसरा भागही " मि. टॊमकिन्स एक्स्प्लोअर्स द ऍटम " प्रकाशित झाला व तो नऊदा
पुनर्मुद्रित करावा लागला.रशियन भाषा वगळता जवळ जवळ सर्व युरोपियन भाषांमध्ये व
हिंदी व मंडारिन (चिनी) मध्ये ही दोन्ही पुस्तके भाषांतरित झाली.केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसनेच डॉ.गॅमो
यांनाच या दोन पुस्तकांचे एकत्रिकरण करण्याचा आग्रह केला व त्या एकत्रिकरण केलेल्या मार्च १९९३ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकातील काही भागाचा हा अनुवाद.
===========================================
प्रकरण १
शहरातील वेग मर्यादा
त्या दिवशी बॅंकेला सुट्टी होती आणि त्यामुळे शहरातील एका मोठ्या बॅंकेतील कारकून मि.टॉमकिन्स याने आरामात उशीरा उठून रमत गमत न्याहारी करून दुपारच्या एकाद्या झकास चित्रपटास हजेरी लावण्याचा बेत निश्चित केला.त्यानी सकाळ्च्या वर्तमानपत्रातील चालू चित्रपटांचा आढावा घेतला, पण दुर्दैवाने त्याच्या पसंतीस उतरणारा साहसपूर्ण किंवा चमत्कृतिजन्य असा कोणताही चित्रपट सध्या दाखवण्यात येत नव्हता असे दिसून आले.
अचानक त्यांची दृष्टी स्थानिक विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या व्याख्यानमालिकेच्या माहितीपत्रकावर पडली.त्यात नमूद केलेली व्याख्याने आधुनिक विज्ञानातील प्रश्नावर आधारित असून आजचे व्याख्यान "आइनस्टाइनचा सापेक्षता सिद्धांत " या विषयावर होते. त्यावेळपर्यंत केवळ डझनभर
लोकांनाच काय तो हा सिद्धांत समजला आहे असे म्हटले जात होते. "मग मला या व्याख्यानाला
जायलाच हवे कोणी सांगावे .कदाचित तो सिद्धांत समजणारा तेरावा गृहस्थ मीच असेन " टॉमकिन्स
मनातल्या मनात म्हणाला.
विद्यापीठाच्या भव्य पेक्षागृहात टॉम्किन्स यांनी प्रवेश केला त्यावेळी व्याख्यान सुरू होऊन गेले होते.पांढरीशूभ्र दाढी असलेला वक्ता फळ्यावर सापेक्षता सिद्धांताच्या मूलभूत कल्पना समजावून देत होता. श्रोत्यांमध्ये बहुतांश तरुण विद्यार्थी होते आणि अतिशय लक्षपूर्वक त्याचे भाषण ऐकत होते..टॉमकिन्सला त्या सिद्धांताचा जेवढा काही भाग कळला तो फक्त एवढाच होता की कॊणत्याही हालणाऱ्या वस्तूचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक असू शकत नाही.आणि या वस्तुस्थितीमुळे अनेक चमत्कारिक व समजण्यास कठिण अशा अपवादात्मक घटना घडू शकतात,पण त्याचबरोबर प्राध्यापकानी पुढे हेही सांगितले की तो वेग सेकंदास १,८६,०० मैल इतका प्रचंड असल्यामुळे सापेक्षतेचे हे परिणाम सर्वसाधारण आयुष्यात क्वचितच अनुभवास येतात..परंतु या अनियमित परिणामाचे स्वरूप समजण्यास बरेच अवघड असते. आणि टॉमकिन्स यांच्यासारख्याला हे जरा समजायला कठीणच होते. र जवळपास प्रकाशाच्या वेगाने त्याची हालचाल झाली तर होणारे मापनपट्टीचे आकुंचन किंवा घड्याळांचे विचित्र चलन या सर्व त्या भाषणातील गोष्टी डोक्यावरून जायला लागून आपोआपच त्यांचे डोके खांद्यावर कधी टेकले हे त्याचे त्यालाच कळले नाही व त्यांने डोळे पुन्हा उघडले तेव्हां आपण सभागृहातील बाका ऐवजी एका अनोळखी शहरातील बसथांब्यावर बसची वाट पहाणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी ठेवलेल्या बाकावर बसलो आहोत असे त्याच्या प्रत्ययास आले.
शहर जुन्या पद्धतीचे पण रेखीव होते व रस्त्याच्या एका बाजूस जुनाट पद्धतीने बांधलेली महाविद्यालयाची इमारत होती.आपण स्वप्नात आहोत असे क्षणभर त्याला वाटले.पण आजूबाजूला नेहमीपेक्षा वेगळे काही घडत असल्याचे दिसले नाही.विरुद्ध कोपऱ्यात उभा असलेला पोलिस नेहमीच्याच पोलिसासारखा दिसत होता.मनोऱ्यावरील घड्याळाचे काटे पाच वाजल्याचे दर्शवीत होते.आणि चौकाच्या चारी बाजूच्या रस्त्यावर शुकशुकाटच होता..येऊनजाऊन एक सायकलस्वार समोरून हळू हळू सायकल चालवत येताना दिसला.आणि मि.टॉमकिन्सने आश्चर्याने एकदम डोळे विस्फारले कारण ते दृष्यच तसे होते.सायकलस्वार व त्याची सायकल ज्या दिशेने येत होते त्या दिशेने अगदी अविश्वसनीय रीत्या आखुड झाले होते.मनोऱ्यावरील घड्याळाने पाचचे टोले दिले. सायकलस्वाराने पेडल जोरात मारल्यासारखे वाटले पण .टोम्किन्सला त्याच्या गतीत मात्र फारशी वाढ झाल्यासारखे वाटले नाही. पण त्याचा एक परिणाम झाल्याचे जाणवले तो म्हणजे तो आणखीनच चपटा होऊन पुठ्ठ्यातून कापलेल्या चित्रासारखा दिसू लागला.त्याबरोबर अचानक मि.टॉमकिन्सला साक्षात्कार झाला मघाशी भाषणात सांगितलेले गतिमान पदार्थाचे आकुंचन ते हेच असावे व आपल्या आकलनशक्तीचे त्याला मोठे कौतुक वाटले. येथील निसर्गाची वेगमर्यादा बरीच कमी असावी त्याने विचार केला आणि त्याचमुळे कोपऱ्यावरील पोलिस इतका मंद हालचाली करत असल्यासारखा वाटतोय..फार वेगात चालणारी वाहने इथे दिसतच नाहीत..रस्त्यावर नुकतीच आलेली टॅक्सीदेखील जोरदार आवाज काढत असली तरी त्या सायकलस्वारापेक्षा तिचा वेग फारसा अधिक नव्हता.
टॉमकिन्सने त्या सायकलस्वारालाच याविषयी विचारायचे ठरवले.पोलिसदादाचे लक्ष नाही असे पाहून जवळच उभा असणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीकडून थोड्या वेळेपुरती सायकल मागून घेऊन त्यावर त्याने टांग मारली. मघाच्या सायकलस्वाराप्रमाणेच आपलीही जाडी कमी होईल अशी अंधुक चिंता त्याच्या मनात तरळली. पण आश्चर्य म्हणजे तसा काहीही प्रकार घडला नाही.उलट त्याच्याभोवतालचा देखावा अगदी वेगळाच दिसू लागला.रस्ते आखूड वाटू लागले इमारतीच्या खिडक्या म्हणजे अगदी बारीक झरोके असल्यासारख्या तर पोलिसदादा अगदी एकादी काठी उभी असल्यासारखा दिसू लागला.
"कमाल आहे.".टॉमकिन्स मनातल्या मनात म्हणाला," आता काय घोटाळा आहे ते समजले. सापेक्षता सापेक्षता म्हणतात ती हीच असणार, सायकलस्वार कोणीही असो तो माझ्यापेक्षा जास्त वेगाने जात असेल तर चपटा झाल्यासारखा दिसतो.तो स्वत: उत्तम सायकल चालवी व आताही अगदी जोरात पेडल मारत होता परंतु आपला वेग फारच कमी वाढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.पेडल जोरात मारून त्याच्या पायात गोळे आले पण समोरव्या दिव्याचा खांबही ओलांडणे अजून त्याला जमले नव्हते. आपला वेग वाढवण्याचे आपले प्रयत्न निष्फळ ठरत असल्याची जाणीव त्याला होऊ लागली. आताच पाहिलेला सायकलस्वार व टॅक्सी यांच्या मंद गतीमागील कारण आता त्याला कळू लागले.आणि प्रकाशापेक्षा अधिक वेग प्राप्त करणे अशक्य कोटीतील आहे या प्राध्यापकांच्या शब्दांची त्याला आठवण झाली. शहराच्या दोन चौकातील अंतर आणखीनच कमी होत असल्याचे त्याना जाणवले. पुढे गेलेला सायकलस्वार काही फार दूर आहे असे वाटेना.शेवटी दुसऱ्या वळणावर त्या सायकलस्वाराला त्यानी गाठलेच,आणि आश्चर्य म्हणजे आता तो पूर्वीसारखा पुठ्ठ्याचा नसून अगदी सर्वसाधारण चांगला तगडा खेळाडू वाटणारा तरुण आहे असे त्याला दिसू लागले.
"अरेच्चा आता आमच्या दोघांचाही वेग सारखाच असल्यामुळे असे झालेले दिसते " असे मनातल्या मनात म्हणत त्या तरुण गृहस्थास उद्देशून तो म्हणाला,"माफ करा,पण इतकी कमी वेगमर्यादा असलेल्या शहरात रहाणे जरा गैरसोयीचेच आहे असे वाटत नाही का तुम्हाला?"
" वेगमर्यादा ?"एकादा चमत्कारिक शब्द ऐकल्याचा आविर्भाव त्याच्या उद्गारात होता," इथे आम्हाला कसलीही वेगमर्यादा नाही.,मला जिकडे जायचे असेल तिकडे मला जितक्या वेगाने जायचे असेल तितक्या वेगाने मी जाऊ शकतो,अर्थात आणखी अधिक वेग हवा असेल तर या फडतुस सायकल ऐवजी एकादी छानपैकी मोटार बाइक मला वापरावी लागेल."
"पण थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला ओलांडून गेलात तेव्हां तर तुम्ही अगदी मंद गतीने चालला होता. मी तुमच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवून होतो."
" अच्छा तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवून होतात तर," जरा दुखावल्याचा भाव त्याच्या सुरातून डोकावत होता," पण मग तरीही एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली दिसत नाही की आताच तुम्ही मला गाठल्यानंतर आपण पाच चौक ओलांडून आलो आहोत.हा वेग म्हणजे मंदगती आहे असे वाटते का?"
"पण रस्तेच आखुड झाले आहेत " .टॉमकिन्सने त्यावर प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला.
" पण त्याने काय असा फरक पडतो,आपण जोरात गेलो काय किंवा रस्त्यांची लांबी कमी झाले काय दोन्ही एकच की..आता मला ज्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचे आहे ते दहा चौक ओलांडल्यावर येते. मी तिकडे जाण्यासाठी जोरात पेडल मारले की रस्त्याची लांबी कमी होते आणि मी पोस्ट ऑफिसात लवकर जातो.खरे तर आपण तिथे पोचलोच की"सायकलवरून खाली उतरत तो तरुण म्हणाला..टॉम्किन्सने पोस्ट ऑफिसमधील घड्याळ पाहिले त्यात साडॆपाच वाजले होते. ते पाहून जिंकल्याच्या आविर्भावात तो म्हणाला "म्हणजे येवढे अंतर यायला आपल्याला अर्धा तास लागला.मी तुम्हाला प्रथम पाहिले तेव्हां बरोबर पाच वाजले होते.होय ना"
" हा अर्धा तास केवढा होता ही गोष्ट तुमच्या ध्यानात आली का पण ?’ त्या तरुणाने विचारले,आता मात्र त्याला हे मान्य करावे लागले की हा अर्धा तास काही मिनिटातच संपल्यासारखे वाटले .आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या मनगटावरील घड्याळातील काटे फक्त पाच वाजून पाच मिनिटे झाल्याचे दाखवत होते.."कमालच आहे पोस्टातले घड्याळ फारच पुढे चालते असे दिसते." तो पुटपुटला.
" किंवा असेही म्हणता येईल की तू फारच वेगात चालत असल्यामुळे तुझेच घड्याळ फारच मंद चालते आहे.पण गृहस्था तुला झालेय तरी काय?तू चंद्रावरून तर पडला बिडला नाहीस?" असे म्हणत तो तरुण पोस्टाच्या इमारतीत शिरला.
या संभाषणानंतर यावेळी या सगळ्या चमत्कारिक घटनांची उकल करायला मघाचे प्राध्यापक उपलब्ध असते तर बरे झाले असते असे वाटून ते नसल्याची हळहळ .टॉम्किन्सला वाटून गेली.तो तरुण तर बोलून चालून इथलाच रहिवासी होता आणि अगदी रांगत असल्यापासून याच परिस्थितीत तो वाढला होता.त्यामुळे या घटनांचा छडा लावायचा असेल तर तो आपल्यालाच हे त्याला कळून चुकले.म्हणून प्रथम त्याने आपले घड्याळ पोस्ट ऑफिसच्या घड्याळाबरोबर लावून घेतले आणि ते मागे पडत नाही ना याची तेथेच दहा मिनिटे उभे राहून खात्री करून घेतली.आपला सायकल प्रवास तसाच चालू ठेवत तो स्टेशनपर्यंत पोचला आणि आता पुन्हा आपल्या घड्याळातील वेळ कितपत बरोबर आहे हे तेथील घड्याळाशी तुलना करून त्याने पाहिले आणि पुन्हा ते मागे पडल्याचे त्याच्या लक्षात आले,"हा पण सापेक्षतेचाच काही तरी परिणाम असला पाहिजे " असे अनुमान काढत याविषयी सायकलस्वारापेक्षा अधिक बुद्धिमान माणसाला विचारले पाहिजे असे त्याने ठरवले.
तशी संधी लवकरच त्याच्या पुढ्यात जणु चालतच आली.चाळिशीतील एक सद्गृहस्थ त्यांच्यासमोरच आगगाडीच्या डब्यातून उतरून बाहेर पडण्याच्या तयारीने चालत निघालेले होते आणि..त्याना वाटेत एक बरीच वृद्ध दिसणारी स्त्री भेटली. पण तिने आगगाडीतून उतरलेल्या गृहस्थास " आजोबा "अशी हाक मारली हे ऐकून .टॉमकिन्सला आश्चर्याचा धक्काच बसला.आता मात्र न राहावून त्याने त्याना सामान उचलण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून जवळिक साधत आपले घोडे पुढे दामटत विचारले," तुमच्या कौटुंबिक बाबीत मी दखल देत असेन तर माफ करा पण खरच का आपण त्या आजीबाईंचे आजोबा आहात ?"
त्या गृहस्थाला हे ऐकून मजा वाटली व आपल्या छपरी मिशाआडून स्मितहास्य करीत तो म्हणाला "मग तू काय मला वॉंडरिंग ज्यू ( आपल्या पुराणातील चिरंजीवित्वाचा शाप मिळालेला अश्वत्थाम्यासारखा यालाही चिरंजीवित्वाचा शाप मिळालेला आहे. ) समजलास की काय?पण खरी गोष्ट अगदी साधी सरळ आहे..माझ्या उद्योगामुळे मला सतत प्रवास करावा लागतो आणि माझा आयुष्यातील बराच काळ धावत्या गाडीतच घालवावा लागत असल्यामुळे माझ्या शहरात रहाणाऱ्या इतर नातेवाइकांच्या मानाने मंद गतीने मी म्हातारा होतो (माझे वय वाढते). यावेळी परत आल्यावर माझी लाडकी नात मला अजून तरी जिवंत आहे हे पहायला मिळाले हे माझे भाग्यच ! पण आता मला तू माफ कर कारण मला तिला टॅक्सीत तरी भेटलायला हवे." म्हणून तो घाईघाईने टॉमकिन्सच्या मनातील प्रश्न तसेच अनुत्तरित ठेवून निघून गेला..
स्टेशनवरील उपाहारगृहात दोन सॅंडविच मटकावल्यावर टॊम्किन्स यांची बुद्धी इतकी भरधाव धावू लागली की तिची मजल सापेक्षता सिद्धांतातच काहीतरी विरोधाभास असून तो आपल्याला कळू लागल्याचा दावा करण्यापर्यंत गेली."हे असेच असले पाहिजे."तो मनाशी म्हणाला,"सगळ्याच गोष्टी सापेक्ष असतील तर प्रवास करणारी व्यक्तीच त्याच्या इतर नातेवाईकांना अगदी वयस्कर दिसणार आणि त्याला ते वयस्कर झाले असे वाटणार प्रत्यक्षात मात्र ते सगळेच तरुणच असणार" पण आपला काहीतरी गोंधळ होतोय हे त्याच्याही लक्षात येऊन " पण सापेक्षतेने काळे केस पांढरे कसे होतील,म्हणजे माझीच काही तरी चूक होत असली पाहिजे." त्यामुळे खरच ही काय भानगड आहे याची पुन्हा खात्री करून घेण्याचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून कॅफेतच बसलेल्या एकुलत्या एक माणसाकडे वळून तो म्हणाला," कृपया एक गोष्ट आपण मला समजावून देऊ शकाल का ?"त्या गृहस्थाच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पहात पुढे त्याने विचारले,"गाडीतून प्रवास करणाऱ्या माणसांच्या वयात प्रवास न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अतिशय मंद गतीने वाढ होते याच्या मागे काय कारण असू शकेल?"
:" त्याला मीच कारण आहे" त्या गृहस्थाने इतक्या सहज उत्तर दिले की त्याविषयी शंका मि.टॉमकिन्सना येणे शक्यच नव्हते
" तर मग तुम्ही किमयागाराच्या तत्त्वज्ञानातील जादूच्या कांडीचे रहस्य उलगडलेले दिसते.वैद्यकीय शास्त्रात आपण अगदी नामवंत व्यक्ती असणार.येथील वैद्यकीय अध्यासन आपणच भूषवीत असाल."त्याच्याकडे आदराने पहात त्याने उद्गार काढले."छे छे " इतका सन्मान मिळाल्यामुळे भांबावून गेल्यासारखा मन हलवीत तो गृहस्थ उत्तरला" मी साधा या लोहमार्गाचा ब्रेकमॅन आहे."
"ब्रेकमन ? काय म्हणालास ब्रेकमॅन ?"धरणीकंपाचाच धक्का नसल्यासारखा .टॉमकिन्सच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. ."म्हणजे गाडी स्टेशनात आल्यावर थांबवण्याचे काम तू करतोस असेच ना?"
" अगदी तसेच जेव्हां जेव्हां मी गाडीचा वेग कमी करतो तेव्हां प्रवाश्यांच्या वयात अधिक वाढ होते.अर्थात इंजिन ड्रायव्हरचाही यात हात आहे बरका "अगदी सरळपणे त्याने मान्य केले "कारण तोच गाडीचा वेग वाढवतो ना"
."पण त्यामुळे तर प्रवास करणारे लोक तरुण रहातात हे कसे काय?"टॉमकिन्सने विचारल्यावर तो उत्तरला,
"ते कस काय होत ते काही मला सांगता येत नाही पण तस आहे खरे मी एकदा आमच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्राध्यापकाला हाच प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मला न कळणाऱ्या भाषेत लंबेचवडे भाषणच ठोकले आणि शेवटी ते काहीतरी ते सूर्यावरील ग्रॅव्हिटेशन रेडशिफ्ट की काय --हो हाच शब्द त्याने वापरला असे मला वाटते-- त्याच्याशी संबंधित आहे असे तो म्हणाला. तुम्हाला काही हे रेडशिफ्टबिफ्ट माहीत आहे का?." "नाssही बुवा " जरा अडखळतच टॉमकिन्स म्हणाला आणि ब्रेकमॅनही डोके हलवीत निघून गेला.
अचानक टॉमकिन्सच्या खांद्यावर एक जाडजूड हात पडून त्याना गदगदा हलवीत असल्याचे वाटून त्याने समोर पाहिले तर आपण कॅफेत नसून प्राध्यापकांचे भाषण चालू असलेल्या त्याच सभागृहातील एका खुर्चीवर बसलेले आहोत असे त्याला आढळले.दिवे मंद झालेले होते सभागृह पूर्ण रिकामे होते आणि तेथील पहारेकरी "उठा साहेब आता आम्हाला सभागृह बंद करायचे आहे" असे म्हणून आपल्याला उठवीत आहे असे त्याला जाणवले. आणि मुकाट्याने उठून तो बाहेर जायला निघाला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जॉर्ज गॅमो (George Gamow) यांच्याविषयी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद!
अनुवाद देखील अप्रतीम!

श्यामजी कुल,

मस्त लेख आहे. जॉर्ज गॅमावची लेखन शैली रोचक आहे. अनुवादही फक्कडसा जमलाय. जॉर्ज गॅमाव माझा शाळकरी वयातला आवडता लेखक. त्याच्या पुस्तकांवर तर बालपण सरलं कीहो आमचं! Happy

जुन्या आठवणी जागृत झाल्या!

आ.न.,
-गा.पै.