त्या वासंतिक श्वासांची वर्दळ अजून आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 10 May, 2012 - 02:53

गझल
त्या वासंतिक श्वासांची वर्दळ अजून आहे!
गंधोत्सव कधीच सरला; दरवळ अजून आहे!!

आटल्या मोठमोठाल्या सा-या नद्या परंतू......
द्यायला दिलासा मजला, मृगजळ अजून आहे!

कण रणरणते वाळूचे, की, म्हणू माणसे ही?
त्यांच्यातच मानवतेची हिरवळ अजून आहे!

आई, वडील दोघांची तसबीर फक्त आहे;
इतकीच बंगल्यामध्ये अडगळ अजून आहे!

काळजात माझ्या होते पडझड घडीघडीला;
हृदयाची धडधड म्हणते: वादळ अजून आहे!

मंदीर यशाचे माझ्या गेले कुठे कळेना;
त्याच्या पायाभरणीचा कातळ अजून आहे!

बघताना वाट सख्याची गतप्राण जाहली ती;
गालावर ओघळलेले काजळ अजून आहे!

मी पुढे, माझिया मागे माझे नशीब येते;
पण, त्याच्या चालीमध्ये मरगळ अजून आहे!

पारवा तिच्या मौनाचा घुमतो मनात माझ्या;
ती झुळूक कधीच गेली.....सळसळ अजून आहे!

>>-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

प्रोफेसर साहेब, आपल्या प्रतिसादातून खूपच शिकायला मिळते आहे. गझल उलगडण्याचे हे काम चालूच ठेवावे.

Pages