तुझे नक्षत्रांचे देणे

Submitted by निंबुडा on 30 April, 2012 - 02:34

माझ्या प्रेमाचं आभाळ
दिलं तुला मी आंदण
बदल्यात चंद्रस्पर्श
अंग अंगाला गोंदण

तुझे अवचित येणे
असे माझ्या आयुष्यात
जशी काळोख्या रातीला
लाभे चांदणपहाट

उधाणल्या ह्या मनाला
मग भरतीची लाट
तुझ्या ओलेत्या खुणांनी
गच्च माझी पायवाट

ओल्या रेतीत मनाच्या
शंख-शिंपले सयींचे
रंगीबेरंगी क्षणांना
तयांत मी गुंफियले

सांग फेडायचे कसे
देणे नक्षत्रांचे तुझे
तुझ्या प्रेमाच्या तोडीचे
फक्त हृदयच माझे

तेच अर्पिते मी तुला
देण्या अन्य नसे काही
बाकी काहीही देऊन
ऋण फिटणार नाही

गोड प्रेमाचा वर्षाव
नित्य असा बरसू दे
माझ्या चांदण्याचा गाव
तुझ्या डोळ्यांत वसू दे

ब्लॉगवर पूर्वप्रकाशित

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वाह.

साजूक नाजूक स्त्री कविता, शब्दांची योजना आकर्षक, काही ठिकाणी (अष्टाक्षरीतही असे होऊ शकते) लय हारवत आहे, कवितेच्या शीर्षकात अष्टाक्षरी असे लिहिण्याचे काही खास प्रयोजन नसते असे आपले माझे मत. शुभेच्छा

लयबद्धतेकडे आणि सफाईदारपणाकडे चांगली वाटचाल..

सहजतेसाठी काही आगाऊ बदल सुचवतो,

अंगांगावरी - अंग अंगाला

जशी काळोख्या रात्रीला - इथे रातीला केले की कमालीचे हळूवार होईल

सयींचे शंख शिंपले - शंख शिंपले सयींचे आधिक सहज होईल

बदल लगेचच केले पाहिजेत असे काही नाही.... भविष्यातल्या रचनांत पटल्यास अंतर्भूत करावेत.

धन्यवाद!

काही ठिकाणी (अष्टाक्षरीतही असे होऊ शकते) लय हारवत आहे,

सहमत

कवितेच्या शीर्षकात अष्टाक्षरी असे लिहिण्याचे काही खास प्रयोजन नसते असे आपले माझे मत.

सहमत, कविता आशयाने भिडत असते पण लय हा पद्याचा अविभाज्य भाग आहे हे लक्षात ठेवावेच लागते.

निंबूताई,

ज्याम आवडली. पण अष्टाक्षरीला ८ कडवी हवीत! Happy

आठवं कडवं माझ्यातर्फे :

अंगी अंगी भरियेला
फक्त तुझा स्पर्श स्पर्श
नकळत विरतात
सरलेली वर्ष वर्ष

मर्यादा ओलांडल्यास क्षमा असावी! Happy

आ.न.,
-गा.पै.

अष्टाक्षरीला आठ कडवी हवी असतात की नाही हे आपल्याला माहीत नाही, तसे काही असल्यास जाणकारांनी कृपया सांगावे

कणखर,

>> असे काही नसावे असा अंदाज......... मलाही माहीत नाही!

मलाही माहीत नाही. मी आपलं उगाच बोललो की ८ कडवी हवीत! Happy

आ.न.,
-गा.पै.

बेफि आणि विदिपा,
प्रतिसादांबद्दल धन्यवाद Happy

काही ठिकाणी (अष्टाक्षरीतही असे होऊ शकते) लय हारवत आहे >>
नक्की कुठे ते लक्षात आणून देता का? अष्टाक्षरी हा प्रकार नव्यानेच हाताळत आहे. Happy

कवितेच्या शीर्षकात अष्टाक्षरी असे लिहिण्याचे काही खास प्रयोजन नसते असे आपले माझे मत >>>
सध्या "अष्टाक्षरी" हा प्रकार शिकाऊ मोड मध्ये आहे. म्हणून जाणकारांचे लक्ष वेधून घेणे इतकाच उद्देश होता. Happy तुम्ही म्हणता तर वगळते तो शब्द शीर्षकातून Happy

गा.मा.,
नवीन कडवे छानच आहे. Happy

अष्टाक्षरीला ८ कडवी हवीत! >>> असा नियम आहे का जाणकारांनी कृपया सांगावे!

विदिपा,
तुम्ही सुचविलेले बदल आवडलेत. कविता सांपदित करतेय. Happy

अंगांगावरी गोंदण>> अंगावरील गोंदण

सयींचे शंख-शिंपले>> शंख शिंपले सयींचे

या दोन ठिकाणी लय हारवली होती

अष्टाक्षरीला कडव्यांच्या संख्येचा कोणताही नियम नसतो

निंबुडा - अष्टाक्षरीत नवीन शिकण्यासारखेही काही नसते, आठ अक्षरे झाली की झाले. आपण एकदा 'हे मी शिकतोय' असे म्हणालो की शिकवणार्‍यांची रांग लागते Proud

या दोन ठिकाणी लय हारवली होती
>>
ओके. धन्स. मग आता विदिपांनी ह्या दोन्ही ठिकाणी सुचविलेले बदल केल्यानंतर कवितेला लय सापडली असावी अशी आशा करते Happy
सुचवण्यांबद्दल परत एकदा आभार Happy

अष्टाक्षरीत नवीन शिकण्यासारखेही काही नसते, आठ अक्षरे झाली की झाले. >>>
मलाही आधी असेच वाटले की हो. की ८ अक्षरे झाली की झाले. Proud पण ते ठराविक ठिकाणी पॉज, शब्दांची अदलाबदल केली की आधी नसलेली पण नंतर गवसलेली लय इ. शिकलेच की नवीन. Happy

निंबुडा तुमच्या शिकाऊ वृत्तीचे खूप कौतुक.

शिकताना मते उगाचच ठाम नसावीत हे इतर काही संदर्भावरून इथे नमूद करीत आहे. तुमची तशी नसतात हे फार बरे आहे. प्रत्येकालाच जीवनाच्या अंतापर्यंत काही ना काही शिकायचेच असते हे सत्य काही महान कवींनी अजून स्वीकारलेले नाही हे दुर्दैव! Sad

ओल्या रेतीत मनाच्या
शंख-शिंपले सयींचे
रंगीबेरंगी क्षणांना
तयांत मी गुंफियले >>>> हे अधिक आवडलं.

मस्तंच जमल्ये कि Happy

अवांतर :

अष्टाक्षरी हा प्रकार नव्यानेच हाताळत आहे. >>> मग शीर्ष्कका पुढे (L) असे लिहु शकतोकी Proud

उधाणल्या ह्या मनाला
मग भरतीची लाट
तुझ्या ओलेत्या खुणांनी
गच्च माझी पायवाट
>>>>
वा!
निंबे तू शिकतेयेस अस म्हणलं तर मी अजुन सुरुवातही केली नाही अस म्हणावं लागेल Sad
इतकं छान Happy
मला आवडली

निंबुडा ....... हा प्रयत्न अधिक सफाईदार झालाय.
तुझं काव्य सुरेख आहेच. आवडेश Happy
अष्टाक्षरी हा प्रकार मस्त आहे ना !! मला जाम आवडतो.

Pages