खरंतर इथे मला मराठी, महाराष्ट्रातील अ मराठी लोकांच स्थलांतर आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने भारतातील भाषिक विविधता आणि प्रांतवाद ह्याचा विचार करायचा आहे. दोन वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी मनसेच्या माध्यमातून ह्या विषयी आंदोलन केलं आणि बरच रणकंदन माजल होत. हा धुरळा आता खाली बसला आहे. विषय तसा मागे पडला असला तरी विचार करायला आपल्या मनात बरेच प्रश्न ठेवून गेला आहे.
ह्या प्रश्नाला अनेक बाजू आहेत. सर्व प्रथम हे मान्य करायला हव कि हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण माझ्या माहितीतील अनेक लोकांच आणि बऱ्याच (विशेषतः इंग्रजी) माध्यमांच तर ठाम मत आहे कि इथे मुळात कांही प्रश्नच नाही आणि हे शुद्ध राजकीय हेतूंनी प्रेरित कांड आहे. आपल्या देशातील माध्यमांवर (त्यातल्यात्यात इलेक्ट्रॉनिक) खर तर स्वतंत्रपणे लिहायला हव. कदाचित राज ठाकरेंचा हेतू फक्त राजकीय असू शकतो....किंवा तस नसेलही. पण ह्या विषयाचा अराजकीय दृष्टीने धांडोळा घेतला पाहिजे. राजकारणी लोकं ह्या विषयावर खोलात जाऊन विचार मांडत नाहीत हे एक वेळ समजू शकत पण ह्या विषयाबद्दल आपल्या सर्वसामान्य लोकांच काय मत आहे? का आपण हो-नाही-कदाचित ह्या त्रिकोणात अडकलोय? सामाजिक विज्ञानाच्या अभ्यासकांच काय मत आहे? सामाजकारणाने खरंतर राजकारणाची दिशा ठरवायला हवी पण बहुतेक उलट होतंय. संविधानात नागरिकांना स्थलांतर करण्याचा मुलभूत अधिकार दिलेला आहे ह्या एका वाक्यात संपूर्ण विषयावर बोळा फिरवणे योग्य होणार नाही.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अमराठी लोकं स्थलांतर करतात. त्याची कारण अनेक आहेत - आपलं राज्य देशातील एक आघाडीचं राज्य आहे, इथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण, शहरीकरण झालं आहे. शैक्षणिक क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे, कायदा सुव्यवस्था तुलनेने चांगली आहे. किमान स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या ४/५ दशका पर्यंत तरी नक्कीच हि परिस्थिती होती. मागच्या कांही वर्षात हे चित्र झपाट्याने बदलतंय. हे स्थलांतर मुंबईत सर्वाधिक होतं पण इतर शहरात पण हि संख्या लक्षणीय आहे उदा. पुणे, नागपूर, औरंगाबाद व जवळपास सर्व महत्वाची जिल्ह्याची शहरं. देशात काय इतरत्र अस स्थलांतर होत नाही का? होतं. पण वेगळी भाषा, संस्कृती, इतिहास असणाऱ्या लोकांच सर्वात ज्यास्त स्थलांतर महाराष्ट्रात होत. मध्य प्रदेशातून बिहार किंवा उत्तरप्रदेश, दिल्लीत स्थलांतर करणे आणि दिल्लीतून चेन्नईत स्थलांतर करणे वेगळं. राज्या-राज्यांमधली विविधता कमी अधिक प्रमाणात आहे. त्या अर्थानं अधिक विविधता असणारं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात होत. मित्रांमध्ये चर्चा करताना एक गोष्ट लक्षात येते की अमराठी लोकांना महाराष्ट्रात यायला, राहायला आणि जमलं तर स्थायिक व्हायला आवडत. माझे मित्र कामानिमित्त चेन्नई कोचीला गेले तरी त्यांची पहिली पसंती मुंबई पुण्यालाच असते. ह्याचं अजून एक कारण म्हणजे असं स्थलांतर करणं सोप्प आणि सोयीच आहे.
म्हणून काय झालं, अस स्थलांतर रोखता येत नाही ... तस करण बेकायदेशीर होईल ... आपण सर्व भारताचे नागरिक आहोत .... हा काही प्रश्न होऊ शकत नाही. माझ्या अनेक मित्राचं मत. ते बरोबर आहेत. प्रश्न हे स्थलांतर नाही तर त्या नंतरचा आहे. महाराष्ट्रात स्थलांतरित झालेली हि लोकं महाराष्ट्राच्या मूळ प्रवाहात इतक्या वर्षानंतर सुद्धा मिसळली नाहीत हे खर दुखण आहे. स्थलांतरितांचे वेगळे भाषिक, सांस्कृतिक गट महाराष्ट्रात आहेत, ते इथे रुजलेत, "भैया हात पाय पसरीच्या" चालीवर वाढीला लागलेत व त्याने महाराष्ट्रातच मराठी संस्कृती दुय्यम व हळू हळू अल्पसंख्यांक होत आहे. बऱ्याच मराठी लोकांच्या मनात हे खदखदत आहे. ह्यावर विचार व्हायला हवा. स्थलांतरितांनी मूळ संस्कृतीत मिसळायला हवं - हा संघर्ष कमी करण्यावर नामी उपाय आहे. परराज्यातून आलेल्या रेल्वे गाडीतून उतरणाऱ्या प्रत्येकाला फलाटावरच अस्खलित मराठी यायला पाहिजे अस मी म्हणणार नाही. स्थलांतरितांच्या पहिल्या पिढीत हे कदाचित शक्य होणार नाही पण दुसरी पिढी मिश्र वळणाची आणि तिसरी व त्यानंतरच्या सर्व पिढ्या पूर्णपणे मराठी संस्कृतीला आपलं मानणाऱ्या बनणे आवश्यक आहे. इतक्या कि शिवाजी महाराज म्हणाल्या बरोबर आपसूक जय त्यांच्या मुखातून निघेल, ते घरी बाहेर मराठी बोलतील आणि स्वतःला गर्वाने मराठी सांगतील. दुर्दैवाने अस कांही घडल नाही हे खर. गुप्ते आणि गुप्ता हा फक्त अडनावांचा फरक असता तर तो सुदिन.
आता काही लोक चार दोन अपवाद दाखवतील व दिशाभूल करायचा प्रयत्न करतील. आज काल थोड कोणी काही बोलल किंवा काही चर्चा केली कि हि अपवादाची मात्रा देऊन बुद्धिभेद (विचकाच खरतर) करणारे आणि आपण पण कसे (अर्ध्या हळकुंडाने) पिवळे आहोत हे दाखवणारे इथे तिथे दिसतात. उगाच क ला अ ने भागायचं आणि ज्ञ बाकी सोयीस्कर दुर्लक्षायची. हि प्रवृत्ती अशीच राहिली तर उद्या, आज जातोय तितकाही भाग अ ने क ला जाणार नाही. असो.
महाराष्ट्रातल्या स्थलांतरितांनी मराठीला आपलं न बनवण्यामागे अनेक कारण आहेत. ह्यातलं पहिल सर्वात महत्वाच कारण म्हणजे अस काही करण आवश्यक आहे अस त्यांना वाटतच नाही. मी भारतीय आहे आणि महाराष्ट्र पण भारतातच आहे तेंव्हा मी माझ्या भाषिक, सांस्कृतिक ओळखीने राहीन व त्यात काही वावग आहे अस त्यांना वाटत नाही. नाही म्हणायला कृपाशंकर सिंह म्हणतात कि मराठीवर संकट आलं तर रक्त सांडणारे पहिले आम्हीच असू. अर्थात ते किती खोटं आहे हे मी वेगळं सांगायला नको. महात्मा फुले माहित नसलेले अबू आजमी महाराष्ट्राचे आमदार आहेत (मटा मध्ये बातमी वाचली होती), राजीव शुक्ला महाराष्ट्रातून राज्यसभेवर खासदार आहेत (महाराष्ट्राच्या किती प्रश्नांबद्दल त्यांना जिव्हाळा आहे आणि त्यावर त्यांनी राज्यसभेत आवाज उठवला देव जाणे) कित्तेकांना संत ज्ञानेश्वर, तुकाराम माहित नाहीत, शिवाजी महाराज लुटमार करणारे होते अस काहींना वाटत, मराठी भावगीत आणि लोकगीत त्यांना परके आहेत, अभिमान वाटावा अश्या गोष्टींबद्दल त्यांना अभिमान नाही आणि चिंता वाटावी अश्या गोष्टींबद्दल त्यांना चिंता नाही. माझे कित्तेक मित्र परदेशस्थ ग्राहकांसमोर "विविधतेत एकता" गात असतात पण खरंतर त्यांना हि विविधता नकोशी असते आणि सगळं अमेरिकेसारख असत तर कित्ती बर झालं असत अस त्यांना वाटत. महाराष्ट्रातील अनेक गावात मराठी लोकांना गुजराती समाजाने एकजुटीने बाजारातून हद्दपार केले, गुजराती डॉक्टरांनी मराठी डॉक्टरांबद्दल अफवा पसरवल्या, अनेक उद्योगातून अमराठी लोक बढती व भरतीच्या वेळेस त्यांच्याच राज्यांच्या लोकांना पसंती देतात, एकत्र राहून एन केन प्रकारेण आपल्या लोकांच्या प्रभावात वाढ करत राहतात.
अस सगळ हे लोक सुखनैव इतकी वर्ष करू शकतायात म्हणून मराठीला आपलं मानण तर दूर उलट त्याबद्दल त्यांना काही साधा आदर सुद्धा राहिला नाही. मराठी खाद्यपदार्थ, शब्द, गाणी आणि शेवटी लोक - आधी माहिती नाही म्हणायचं मग माहिती असायला पाहिजे अस काही नाही अस म्हणायच मग माहिती असण्याच्या लायकीची नाहीत अस म्हणायच आणि शेवटी चक्क टिंगल करून हिणवायचं. राज ठाकरेंच्या आंदोलनानंतर ह्या क्रमात चढत्या दिशेने वाढ झाली आहे अस मला तरी दिसतंय. जर मराठी शिवाय माझ काही अडत नसेल तर मग ती दुय्यमच झाली ना. वरच्या दिलेल्या क्रमात जशी वाढ होत गेली तशी मराठी भाषा, इतिहास, संस्कृती दुय्यम आणि डाउन मार्केट ठरली.
अजून दोन उदाहरणांचा उहापोह करणं मला आवश्यक वाटत - १) कौशल इनामदारांना मुंबईमध्ये सूटच्या दुकानात घाटी म्हणून हिणवल गेल होत. त्यानंतर त्यांनी मराठी अभिमान गीताची निर्मिती केली. ह्या उपक्रमात भाग घेतलेल्यांना हे ठाऊक असेल. २) बऱ्याच वर्षांपूर्वी विनय आपटेंनी शिवाजी महाराजांवर आधारित मालिका बनवली होती पण त्यांना शिवाजी बिकता नही म्हणून सांगितलं गेल होत. खुपते तिथे गुप्ते मध्ये त्यांनीच हि गोष्ट सांगितली होती. रीमा लागुनी सुद्धा हिंदीत मराठी म्हणून काम करताना प्रयास पडले अस सांगितलं होत. कदाचित मराठी बद्दल इतर प्रांतातल्या लोकांना आकस असेल व ते पण एक कारण असू शकेल पण त्यात मी अधिक खोलात जाऊ इच्छित नाही, ते विषयांतर होईल आणि वस्तुनिष्ठ पण असणार नाही.
काही लोक म्हणतील कि अहो त्यात काय? .... आपण थोड दुसऱ्यांच घ्यावं .... त्यांनी थोड आपलं घ्यावं ... संस्कृती अभिसरणातून ती अधिक उत्तम होत जाईल. साखरेचा पाक लावलेलं हे वाक्य बुद्धिभेद करायचं अजून एक नामी शस्त्र आहे. देवाण घेवाण उत्तम पण नक्की असं घडतंय? अस्सल मराठी ताटात एखादी दाल बाटी किंवा पनीर कढाई वगैरे समाविष्ट झालं तर चांगलच आहे पण ताटात कोल्हापुरी ठेचा सोडून सगळं काही बाहेरचं असेल तर ते ताट मराठी राहील का? (उगाच नाही मराठी खानावळ शोधावी लागत.) हे फक्त एक उदाहरण होत शब्दशः अर्थ घेवू नये. देवाण घेवाण ठीक पण शेवटी ती मराठी भाषा आणि संस्कृतीच राहिली पाहिजे. तस नाही झालं तर मग तेच - विविधता नष्ट सगळं एकसारख.
हा लेख वाचणाऱ्यांना अस वाटेल कि मला काही वाईट अनुभव आलेत आणि संतापून मी हा लेख लिहितो आहे. मी खरच सांगतो कि अस काही नाही. मी शक्यतो ह्याकडे वस्तुनिष्ठपणे पाहतो. आपल्यातीलच काही लोकांना वाटते की परप्रांतीयांनी मराठीला डोक्यावर घेऊन नाचण्याची गरज नाही, थोडा आदर देणे पुरेसे आहे. मला व्यक्तीशः अस वाटत कि जर आपण मराठीला त्यांनी आपलस कराव अस म्हणालो तर किमान आदर तरी मिळेल. हे सगळ बाजूला जरी ठेवल तरी - आपल्या देशातील हि विविधता जपली जावी, भाषिक-सांस्कृतिक संघर्ष कमी व्हावा व स्थलांतरितांमुळेचे प्रश्न कमी व्हावे ह्या साठी त्यांनी स्थानिक संस्कृतीत मिसळणे अनिवार्य आहे.
असं सगळ घडायला अजून एक कारण म्हणजे आपण सर्व मराठी बंधू भगिनींनी ह्यासाठी मोलाचा हातभार लावला आहे. आपल्याच लोकांना कसा मराठी भाषेचा अभिमान नाही अस म्हणून हा मुद्दा इथे संपत नाही. थोड खोलात जाव लागेल. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०७ हुतात्म्यांचे बलिदान देऊन आपण मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करून घेतली पण मला अस वाटत कि आपण खरतर तो लढा हारलो. लौकीकाप्रमाणे युद्धात जिंकून सुद्धा तहात हरल्या सारखे. मुंबई मिळाली तरी राष्ट्र का राज्य हा पेच / हि शंका / हा घोळ आपल्या समाजात टिकून राहिला. राज्याच्या बाजूने बोलल तर राष्ट्राद्रोहाची टोच मनाला लागते आणि राष्ट्राच्या बाजूने बोलल तर भाषा संस्कृतीला दुय्यम मानावं लागत ह्या विवंचनेत आपण अजूनही आहोत. मुंबई लढ्याच्या निमित्ताने ह्या विषयावर खोल मंथन होऊन काही एक कायम स्वरूपी तोडगा विचार किमान मराठी समाजाने तरी अवलंबायला पाहिजे होता. बरेच जण दोन टोकाच्या मध्ये तर काही लोक एखाद्या टोकावर आहेत. त्यावेळेस ह्या विषयाचा अजून तड लावला तर देशात आणखी फाळण्या होतील ह्या भीतीने ते सोडून दिल असावं. स्वातंत्र्याच्या वेळेस आणि नंतर आपण बऱ्याच गोष्टी भीतीतून केल्या ज्याचा आपल्या देशावर चुकीचा परिणाम झाला अस मला व्यक्तीशः वाटत.
परप्रांतातून आलेल्या लोकांनी इथली भाषा संस्कृती आपलीसी करावी ह्यासाठी आपण आग्रह धरला नाही व काही प्रयत्न सुद्धा केले नाहीत. सुरुवातीला कुतूहल म्हणून, नंतर आपल्याच देशातले आहेत म्हणून, त्यानंतर आगत्य म्हणून किंवा मी कसा राष्ट्र प्रेमी आहे हे दाखवायला म्हणून आणि हिंदी राष्ट्र भाषा आहे ह्या चुकीच्या समजुतीतून आपण हिंदी बोलत राहिलो. आपल्याला वाटल असेल जस मी हिंदी बोलतो तस तो हळू हळू मराठी शिकेल पण आत्ता आपल्या लक्षात येतंय कि तस काही झालं नाही. आत्ता तर ते म्हणतात कि तुम्हालाच हिंदी येते तर मग आम्हीं का मराठी शिका.
काही लोक म्हणतील कि लिपी देवनागरी असल्यामुळे हिंदी शिकणं सोप आहे व त्यामुळे आपण मराठीचा आग्रह धरू शकत नाही. जे कि दक्षिण भारतीयांच्या बाबतीत होत. (आपल्या लोकांची हिंदी पण एक स्वतंत्र विषय आहे म्हणा). पण मग सारख्या लिपीचा फायदा आपल्याला हिंदी शिकायला होतो तर मग तो त्यांना मराठी शिकताना पण व्हायला पाहिजे. उत्तर भारतीयांना तर हे गंगा उलटी वाहण्याचा प्रकार वाटेल. काहींना वाटत हिंदी मुळे आपल्या युवकांच्या नौकरीच प्रमाण वाढत. मला तरी तस दिसत नाही. उलट हिंदीला विरोध करणारे दक्षिण भारतीयच मला जिकडे तिकडे दिसतात. अगदी केंद्र सरकारी नौकऱ्यामध्ये पण. खरंतर साखरेचा पाक लावलेल्या ह्या सांस्कृतिक देवाण घेवाणीत आपला आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे हेच खर.
परप्रांतीयांनी आपल्या संस्कृतीत मिसळण्यासाठी भाषा हा अत्यावश्यक आणि प्रभावी उपाय आहे. पण तो पुरेसा नाही. कानावर सतत मराठी भाषा पडणे, मराठी सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होणे, मराठी शाळेतून मराठी इतिहास शिकणे, मराठी मित्र मंडळीत वावरणे अश्या अनेकविध मार्गांनी हे कराव लागेल. (अमेरिकेत गेलेले मराठी शेवटी कसे अमेरिकन होऊन जातात ते डोळ्यासमोर आणावे.) सध्या महाराष्ट्रातच नवीन मराठी शाळांना परवानगी नाही तेंव्हा परप्रांतीयांना काय सांगणार?
भाषेच्या अनुषंगाने इथे अजून एक मुद्दा नमूद करावासा वाटतो कि हिंदी आता जवळ जवळ महाराष्ट्राची सार्वजनिक भाषा झाली आहे. टॅक्सी चालक, ऑटो चालक, चणे फुटाणे विकणारा, सुरक्षा रक्षक, बरेच दुकानदार, ग्राहक आणि एकूणच परप्रांतीय एवढे वाढले आहेत कि आपण माहित नसलेली व्यक्ती हिंदीच आहे अस समजून सरळ हिंदीत सुरु करतो. म्हणजे परप्रांतीयांच्या कानावर मराठी पडणे तर दूर त्यांना मुळी सुद्धा मराठी ऐकण्याचा त्रास होऊ नये याची व्यवस्था आपण करून ठेवली आहे. हे इतक्या धोकादायक पातळीवर आहे कि आत्ता तर थोड सुद्धा टापटीप दिसणाऱ्या बरोबर लोक सरळ हिंदीत सुरु करतात. मग समोरचा हिंदी असेल अस समजून आपण पण हिंदीत सुरु करतो. ह्याने दोन मराठी लोक महाराष्ट्रातच हिंदीत बोलत राहतात. माझ्या बाबतीत अस घडलंय. आता मी आधी सरळ मराठीतून उत्तर देतो. ह्यामूळे अजून एक होत ज्या परप्रांतीयाने मराठी शिकली असेल तो पण मराठीचा नाद सोडून देतो. मराठी चित्रपट मालिकांमध्ये पहा - त्रयस्त व्यक्ती सरळ अमराठी दाखवली जाते. मुंबई पुणे मुंबई चित्रपटात सिंहगडावरचा प्रसंग आठवा - जेंव्हा ती म्हणते कि मी कोणाशीही भांडू शकते तेंव्हा ती बाजूने जाण्याऱ्या माणसाशी हिंदीत भांडायला सुरु करते. हिंदीत का? म्हणजे त्रयस्त व्यक्ती हिंदी आहे हे गृहीत धरण्य इतपत परिस्थिती झाली आहे. दगडू शेठ गणपती मंदिराच्या बाजूला फळांचा रस विकणारा माणूस माझ्याशी असाच हिंदीत सुरु झाला. त्याला चांगला समजावला होता मी.
परप्रांतीय मराठी संस्कृतीत मिसळत नाहीत ह्याच अजून एक कारण म्हणजे मराठीची हि स्पर्धा फक्त हिंदीशी नाही तर इंग्रजीशी पण आहे. आर्थिक उदारीकरणा नंतर मराठी आणि अमराठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर इंग्रजी नौकरी व्यवसायाच्या निमित्ताने अवलंबिली. माहिती तंत्रज्ञान, डॉट कॉम आणि बी पी ओ च्या ढग फुटी नंतर इंग्रजी बोलणाऱ्यांचे नाक्या नाक्या वर पेव फुटले. ह्याच्यातून असा समाज निर्माण झाला कि इंग्रजी शिवाय नौकरी नाही, यश नाही, काही खर नाही. इंग्रजी येईल ते शहाणे, हुशार, यशस्वी आणि न येणारे मागास. हे धृवी करणच भारत विरुद्ध इंडिया ला कारणीभूत आहे अस मला वाटत. ह्या सो कॉल्ड हाय फाय लोकांना कुठलीच भारतीय संस्कृती भाषा इतिहास आता उपयोगाच्या नाहीत व सरळ केराच्या टोपलीत टाकल्या पाहिजेत अस वाटत. अमेरिकेत कायमच स्थायिक झालेल्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने मराठी संस्कृती सोडून स्थानिक संस्कृती, भाषा अनुसरली तर ते योग्य आहे पण इथे तर महाराष्ट्रातच अमेरिका वसू पहात आहे.
विवेकानंद म्हणाले होते तुम्ही आपला धर्म विसराल तर मिटून जाल. विवेकानंदांना धर्म म्हणजे कर्मकांड अभिप्रेत नसेल. मी तरी ह्याचा अर्थ असाच घेतो कि आपण जर आपली भाषा इतिहास ओळख संस्कृती विसरलो तर आपण कधीच पुढे पडू शकणार नाही. मी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता आहे. सांस्कृतिक राष्ट्रावादाशिवाय जगात विकसित झालेला एक तरी देश आहे का? मुळात राष्ट्र म्हणजे फक्त लोकांचा समूह नव्हे - संस्कृती तर डीएनए आहे राष्ट्राची. उद्या आपली संस्कृती टाकून आपण विकसित झालो तर ते काय कामाच - विकसित झाला असेल फक्त एक लोकांचा समूह - राष्ट्र आणि समाज तर नष्ट झाला असेल. गांधीजी म्हणाले होते खेड्यांकडे चला - प्रत्यक्षात खेड्याकडे नाही तर किमान आपल्या मुळांकडे चला असा अर्थ घेऊ. इथे तर आम्ही ती उखडून टाकत आहोत. बहुसंख्य लोकांची जी भाषा आहे तीच जर नष्ट झाली तर त्यांचा विकास कसा होणार.
ह्या लोकांना काय वाटत कि आपल्या देशातले सगळे इंग्रजी बोलायला लागले कि सर्व प्रश्न सुटतील? आफ्रिकेतल्या कित्तेक देशात सर्व लोक इंग्रजी बोलतात मग काय ते विकसित आहेत? आणि हे मुळातच अव्यवहार्य आहे. सर्वांना इंग्रजी शिकवण्या पेक्षा इंग्रजीतल ज्ञान आपल्या भाषेत आणल्यामुळे हे प्रश्न सुटतील. उच्च शिक्षित लोकांच्या सुरुवातीच्या पिढीतील लोकांनी हे करायला पाहिजे होत पण त्या पेक्षा आपण कसे इतरांपेक्षा वेगळे आणि आधुनिक आहोत ह्याच विचारात हे लोक मश्गुल राहिले.
का बर मी महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी मराठीतून करू शकत? महाराष्ट्रात सर्व प्रकारच माध्यमिक, उच्च शिक्षण, संशोधन मराठीतून व्हायला पाहिजे. तसं झाल तर ते अधिक लोकांपर्यंत पोहंचेल , आपल्या समाजाला पाहिजे अस तंत्रज्ञान त्यातून निघेल, संशोधन वाढेल आणि नुसत परदेशातील ग्राहकांना सेवा देण्याबरोबर अधिक भरीव अस योगदान आपण देऊ शकू. वर उल्लेखलेली सांस्कृतिक देवाण घेवाण आतबट्ट्याची होणार नाही. सरकार म्हणतं विकास झालाय पण तो तळा गाळापर्यंत पोहंचला नाही. त्यासाठी बहुजन समाजाची भाषा वापरायला पाहिजे. इथे तर पहिली पासून इंग्रजी सुरु आहे. आपण तर अशी व्यवस्था करून ठेवली आहे कि बारावी नंतरच सर्व प्रकारच (कला मराठी सोडून) शिक्षण इंग्रजीत आहे. म्हणजे इंग्रजीशिवाय तुम्ही जगू शकणार नाही अशी व्यवस्था आहे. जपान मध्ये इंग्रजी नाही येत म्हणून कोणाच बिघडलय का? किंवा फ्रांसमध्ये, कोरिया, जर्मनी, रशिया. मग माझ्या महाराष्ट्रात मराठी येत पण इंग्रजी येत नाही म्हणून का बिघडाव? सुशिक्षित बरेच पालक आपल्या पाल्याला आज काल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. म्हणजे तो पाल्य शाळेत इंग्रजी शिकणार, मित्रांशी इंग्रजीत बोलणार, घरी आईला बाबांशी इंग्रजीत बोलणार, आज्जी आजोबांकडून कौतुक होणार - मग तो मोठा झाल्यावर आपल्या पाल्याला पण इंग्रजी शाळेत घालणार मग एक पिढी तयार होणार जी संपूर्णपणे इंग्रजीवर वाढलेली असेल. मग मराठी मरेल नाही तर काय? आपला पाल्य स्पर्धेच्या युगात मागे राहील ह्या भीतीने पालक अस करतात. अस सतत भीतीने गोष्टी करत राहिलो तर एक दिवस आपण मातीत जाऊ. संत तुकारामांची गाथा आपण रोज पाण्यात बुडवत आहोत. मराठी शाळांची परिस्थिती पण चिंतेचा स्वतंत्र विषय आहे.
सांस्कृतिक राष्ट्रवाद वगैरे अस काही नसत - जग फार पुढे चाललय - आता संगणकाचा जमाना आहे. माझे काही मित्र. माझे हे मित्र खरतर अमेरिकेच्या / पाश्चात्य सांस्कृतिक राष्ट्रवादाला बळी पडतायत त्यांच्याच नकळत. संगणक आला म्हणून कुठल्या देशांनी आपली भाषा सोडली? उत्तर : "भारत". जपान चीन छोटे छोटे युरोपियन देश ह्यांनी संगणकात आपली भाषा वापरायला सुरुवात केली. माझा स्विस ग्राहक जर्मन मधून आउटलूक वापरतो. आम्ही तर मराठीच सोडली मराठीतून आउटलूक काय वापरणार.
मला माहिती आहे हे काही सोप काम नाही. आपल्याला कित्तेकदा पर्यायी मराठी शब्द आठवून सुद्धा सापडत नाहीत तिथे मराठीतून उच्च शिक्षण म्हणजे अवघड काम आहे. पण त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. २०-२५ वर्षानंतर कदाचित ते प्रयत्न फळाला येतील. पण मला हि दिशा महत्वाची वाटते. काही जण म्हणतील हे इंग्रजी हिंदी शब्द मराठीत नवीन भर आहे आणि ह्यांनी भाषा समृद्ध होते. मला तस नाही वाटत. add हा शब्द मराठीत भर आहे का? शब्द उच्चारल्या नंतर मेंदूत अर्थ स्पष्ट होतो तेंव्हा तो मराठी असतो का? मी भाषा शात्रज्ञ नाही पण मला तस वाटत नाही. हं कदाचित अजून काही वर्षानंतर हा शब्द पूर्णपणे मराठी वाटायला लागेल. तस पाहिलं तर मराठीत नवीन शब्दांची भर पडत नाही हेच खर. ऑक्सफर्ड जस नवीन शब्दांची भर घालून शब्दकोश काढतो तसं मराठीत नवीन शब्दांची भर पडली आहे का? स्वा. सावरकरांनी नवीन मराठी शब्दांची भर घातली होती त्यानंतर कोणी अस केल्याच ऐकिवात नाही. मुळात भाषेचा वापर कमी होत असेल, ती प्रवाही नसेल तर तिच्यात नवीन शब्दांची भर पडणार कशी. अमेरिकेतल्या अनेक चांगल्या विनोदी मालिकांमध्ये शब्दांची जादू, नवीन शब्दांची रचना, परिस्थितीत शब्दांच्या विशिष्ट मांडणीतून निर्माण होणारा विनोद पाहायला मिळतो. पुलं एकदा म्हणाले होते अत्र्यांच्या साहित्यातली मराठी भाषा हा डॉक्टरेट करण्याचा स्वतंत्र विषय आहे.
आता मात्र माझे मित्र फुटतात. महाराष्ट्रात मराठी, कर्नाटकात कानडी राजस्थानात राजस्थानी भाषा चालतेय वाढतेय आणि अनिवार्य आहे...प्रत्येक राज्य आपल्या भाषा संस्कृतीने वाढतंय हि गोष्टच त्यांना पटत नाही ...म्हणजे आपण चक्क देशाची फाळणी करतोय अस त्यांना वाटत. एका मित्राला जेंव्हा मी सांगितला कि हिंदी राष्ट्र भाषा नाही, हिंदी आणि मराठीला संविधानात एकच दर्जा आहे तेंव्हा ते त्याला पटलं नाही. जेंव्हा संविधान दाखवलं मग पटलं, पण म्हणतो कसा - गेल्या साठ वर्षात आपण एक राष्ट्रभाषा बनवू शकलो नाही ....लाज वाटायला पाहिजे आपल्याला.
आपला देश एक खंडप्राय देश आहे, इथली एक एक राज्य स्वतंत्र देशाच्या क्षमतेची आहेत, तेंव्हा आपापल्या भाषा संस्कृतीच्या पायावर उभे राहून एकमेकांशी व बाहेरील देशांशी व्यापार उद्दीम करून ते विकसित होऊ शकतात आणि खरतर तेंव्हाच भारत पण विकसित होईल हे पटायला एवढ अवघड का आहे? आपली भाषा संस्कृती बाळगली तर ती देशाच्या व इतर राज्यांच्या विरोधात जाण्यासारखं आहे आणि मग देशाची फाळणी होईल ह्या भीतीत आणि भ्रमात आपण किती दिवस राहणार? विविधतेत एकता जे आपण म्हणतो ते कित्ती वरवरच आहे आणि आपल्यालाच त्यावर कसा विश्वास नाही हे ह्यानिमित्ताने कळत. भारत हा जगातील एक विलक्षण देश आहे जिथे एवढी विविधता आहे. हे वास्तव मान्य करू, हि विविधता टिकवू, वाढवू, आपापल्या राज्यात आपापली संस्कृती ह्या सोप्या तत्वाने त्यातील संघर्ष मिटवू आणि जेंव्हा एक एक राज्य आपल्या उच्चतम क्षमतेला पोहंचेल तेंव्हाच खऱ्या अर्थाने भारत महान असेल हे पटायला का एवढ अवघड आहे? मग नाही आम्हाला राष्ट्र भाषा - कुठे बिघडलं...राष्ट्र भाषा नाही म्हणजे आमची एकता अखंडता धोक्यात येते? मी जर मराठी नसेल तर मी भारतीय राहू शकतो का? माझं भारतीय असणं माझ्या मराठी असण्याशी संलग्न आहे. मराठी, कानडी, गुजराती, बिहारी अश्या अनेकविध ओळखीतूनच भारतीय ओळख तयार होते. आपण वेगळे झालो तर संपलो हे आपण इतिहासातून शिकलोय. पण आपण भाषिक सांस्कृतिक मुस्कटदाबीने संघर्षाने एकत्र राहिलो तर मूळ उद्देश्यालाच हरताळ फसल्यासारख होईल.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मुद्याकढे मी परत वळतो. आपल्या देशात संघराज्य व्यवस्था (Federal) केंद्राकडे झुकणारी आहे. आणखीन एका फाळणीच्या भीतीने तसं केल गेल होत. पण हि भीती अजूनही आपल्यात आहे हेच दिसत. हि भीती काढून टाकून आपण खऱ्या अर्थाने संघराज्य निर्माण केलं पाहिजे ज्यात वर उल्लेखिलेल्या विचारांचा अंतर्भाव असेल.
उठता बसता अमेरिकेची उदाहरण देणाऱ्या माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो कि अमेरिकेची संघराज्य व्यवस्था इतकी मूलगामी आहे कि त्यांच नावच मुळी अमेरिकी संघराज्य अस आहे. आपल्याही देशाच नाव भारतीय संघराज्य अस आहे पण आपल्याला प्रजासत्ताक असल्याचा इतका टेंभा आहे कि आपण संघराज्य आहोत हे विसरतो. अमेरीकेचे सार्वभौमत्व (ज्याला इंग्रजीत Sovereignity म्हणतात) ते त्यांच्या राज्यात विभागून आहे. म्हणजे अमेरिकेची राज्य सार्वभौम आहेत. त्यांना स्वताःच संविधान आहे आणि प्रत्येक राज्याच स्वताःच सर्वोच्च न्यायालय पण आहे. अर्थातच केंद्र सरकारच्या संविधान आणि कायद्या विरोधात राज्य सरकारांना जाता येत नाही. आपल्या कडे संयुक्त सूची बद्दल केंद्राला शेवटचा अधिकार दिलेला आहे तर अमेरिकेत संविधानात नमूद नसलेले अधिकार राज्य सरकारांसाठी राखीव ठेवलेले आहेत. अमेरिकेत रोजच्या जीवनाशी संबधित कायदे हे मुख्यत्वे करून राज्य सरकारांची आहेत.
मला वाटत मला काय म्हणायचं आहे ते मी मांडलय. तुम्ही जरूर आपले विचार अभिप्राय नोंदवा. कोणाकडे अधिक माहिती असल्यास अवश्य लिहा. कोणाला आवडला नसल्यास आणि वेगळा युक्तिवाद असेल तर ते हि जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
धागे डिलीट केले म्हणून त्यात
धागे डिलीट केले म्हणून त्यात मांडलेला विचार डिलीट कसा करणार?
अहो धागेच काय, माणसे मेली तरी विचार नाहीसे होत नाहीत, फक्त बदलतात.
भाषा मरणार नाही, बदलेल, कारण जसे बर्याच लोकांना वाटायला लागते की आपल्या भाषेतील वाक्प्रचार जुने, भावना (म्हणजे emotions), व्यक्त करायला (म्हणजे express करायला) पुरेसे (म्हणजे adequate) नाहीत, शिवाय इंग्रजी, हिंदीच सोयीचे (म्हणजे convenient) वाटते. बघा ना मराठी कार्यक्रमात मराठी गाणी म्हंटली तरी ती छान, उत्तम नसून, fantastic असतात, एखादा नाट्यप्रयोग केला असे न म्हणता performance दिला असे मराठी परीक्षक, महाराष्ट्रात बसूनच बोलतात. शिवाय खुद्द राज ठाकरे सुद्धा म्हणतात, एकही मारा, पण क्या स्सॉल्लीड मारा! - सगळ्यांना कळायला पाहिजे ना.
आपल्या प्रथा जुन्या, आपले साहित्य जुने - कालानुसार उचित (fashionable) नाहीत हो. शिवाय एकदम नवीन, कालानुरूप (म्हणजे, modern, fashionable) हं!!
जाउ द्या झाले काळाचा महिमा देवाला पण कळत नाही म्हणे, माणसाला काय कळणार!!!
खरे तर हिंदी सिनेमातली टप्पोरी भाषा हीच राष्ट्र भाषा करावी, सर्वांना समजते, बोलता येते, व्याकरणाची झंझट नाही, कुठल्याहि भाषेतले शब्द आले तरी चिंता नाही!!
भाषा ही बदलती राहिलेली आहे..
भाषा ही बदलती राहिलेली आहे.. आदीवासी कुठलीतरी गोल त्रिकोन लिपि असलेली भाषा वापरत असतील . मग काही 'हुशार' लोकांची संस्कृत आणि इतरांची प्राकृत भाषा झाली. नंतर सगळ्यांचीच भाषा एक झाली. ('हुशार' लोकानी संस्कृत बोलायचे का सोडले, का त्या भाषेत कुणी बोलतच नव्हतं, ती फक्त ज्ञानाच्या गुप्त साठवणुकीची कोड लँग्वेज होती,यावर कुणी प्रकाश टाकू शकेल का ? ) संस्कृतीदेखील बदलतीच राहिलेली आहे. या देशातील पूर्वापार संस्कृती फक्त आदिवासींच्यातच टिकून आहे. बाकी सगळेच लोक कुठून कुठून या देशात आलेले आहेत, कोण दहा हजार वर्षापूर्वी आले, कोण १००० वर्षापूर्वी आले हा केवळ तपशीलाचा फरक.. आपल्या संस्कॄतीवर ज्याने त्याने प्रेम करावे आणि तिच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत.. पण कुणी दुसरं काही करत असेल तर तो उपरा, त्याने आमच्या देशाच्या संस्कृतीवर आक्रमण केले असले भावनिक गळे काढू नये. त्याची भाषा, त्याचे कपडे, त्याचे सण ... त्याचं तो बघेल, तुम्ही तुमचं बघा.. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतात जे जे काही होतं ते सगळं आता भारतीयच आहे.
शिवाय खुद्द राज ठाकरे सुद्धा
शिवाय खुद्द राज ठाकरे सुद्धा म्हणतात, एकही मारा, पण क्या स्सॉल्लीड मारा! - >>> झक्की, तो अमर अकबर अँथनी मधला बराच लोकप्रिय संवाद आहे. अमिताभने मारलेला. आता मराठीत त्या तोडीचा कोणता शोधणार राज ठाकरे. फार फारतर "डॅम इट" म्हणेल
आदीवासी कुठलीतरी गोल त्रिकोन लिपि असलेली भाषा वापरत असतील >>>
संदेश - मुलांनी एकॉन वगैरेंची गाणी ऐकण्याचा भाषेशी संबंध नाही. मराठीत तरूणांशी कनेक्ट करतील अशी गाणी सहसा येतच नाहीत. गेल्या काही वर्षात निदान थोडीतरी आलीत पण एकूण नाहीतच फारशी. दिल चाह्ता है सारखे त्या त्या वेळच्या तरूणांनी उचलून धरलेले पिक्चर मराठीत असतील की नाही शंकाच आहे. सध्या जे काही प्रयत्न दिसतात ते ही फार यशस्वी नसतील असा अंदाज आहे.
झक्की, >>> एकही मारा, पण
झक्की,
>>> एकही मारा, पण क्या स्सॉल्लीड मारा! - सगळ्यांना कळायला पाहिजे ना.
तुम्ही एकच प्रतिसाद लिहिलाय, पण स्सॉल्लीड लिहिलाय!
>>> सर्वांचा इंग्रजीशी संबंध
>>> सर्वांचा इंग्रजीशी संबंध येत नसतानाही आपण सर्वांना इंग्रजी शाकावातोच ना? शिवाय मग काय आपण ज्या वेळेस जो देश प्रगत असेल त्यांची जी भाषा असेल ती आत्मसात करणार कि कधी आमचीही भाषा प्रभावी असावी इतरांना पण ती शिकाविसी वाटावी अस काही करणार. आज हे हास्यास्पद वाटतंय कारण फार कमी क्षेत्र अशी आहेत जिथे इंग्रजी शिवाय चांगल काम करून पैसा व नाव कमावता येईल. जेंव्हा अश्या संधी व्यापक प्रमाणात उपलब्ध होतील तेंव्हा हा विरोध मावळेल.
सहमत! इंग्लिश भाषेवर प्रभुत्व पाहिजेच आणि त्या बरोबरीने आपली मातृभाषा मराठी पण तितकीच चांगली यायला पाहिजे. हिंदी शिकण्याची अजिबात गरज नाही. ज्यांना हिंदी शिकायची आहे ती त्यांनी स्वेच्छेने शिकावी. मात्र महाराष्ट्रातल्या शाळेत हिंदी शिकवू नये किंवा हिंदीची सक्ती अजिबात असू नये. मराठी व इंग्लिश या दोनच भाषा सक्तीच्या असाव्यात. जर उ.प्र.,बिहार इ. राज्यात शाळेत हिंदी व इंग्लिश या दोनच भाषा सक्तीच्या आहेत, बंगालमध्ये व दक्षिणेतल्या राज्यात त्यांची मातृभाषा व इंग्लिश या दोनच भाषा सक्तीच्या आहेत, तर मग महाराष्ट्रात मराठी व इंग्लिश व्यतिरिक्त हिंदी ही जास्तीची भाषा सक्तीने का शिकायची?
मास्तुरे, तुमच्या या
मास्तुरे, तुमच्या या प्रश्नाचे मागे पहिल्या पानावर दिलेले आहे.. हिंदीची सक्ती नाही.. द्वितीय भाषा म्हणून अनेक भाषांची सोय आहे. तुम्हाला हवी ती निवडा.. जास्त लोकांची जी डिमांड आहे, त्याची सोय होते. पण तुम्हाला हिंदी नको असेल दुसरी कुठली हवी असेल तर तुम्ही स्वतःच्या बळावर त्याचा अभ्यास करुन ती भाषा निवडू शकता.
http://www.dnaindia.com/speakup/report_mind-your-second-language-state-g...
गंमतच आहे, एक तज्ञ सांगतात इंग्रजी शिकू नका. दुसरे म्हणतात हिंदी शिकू नका..
आधी तुमचं एकमत करा , मग बघू आम जनतेने काय करायचे.
बिहारमध्येही तीन भाषा आहेत.. http://mycollege.in/timetables/bihar-ssc-exam-timetable.php हिंदी, इंग्रजी आणि एक आणखी कुठलीतरी
आणि दोनच भाषा शिका असा तुमचा आग्रह असेल, तर हिंदी बरोबरच संस्कृत देखील बंद होईल..
मग काही मंडळी चार सुभाषितं आणि कोल्ह्या कुत्र्याच्या पंचतंत्राच्या कथा याच्या जिवावर संस्कृत प्रेमाचे कृत्रिम प्रदर्शन करत फिरतात त्यानी काय करायचं ?
संस्कृतच्या टिमक्या मग कोण वाजवणार?
असे करु नका. का स्वतःचे नुस्कान करुन घेताय? 
आमच्या शाळेत 'अ' तुकडीला १००
आमच्या शाळेत 'अ' तुकडीला १०० मार्कांचे संस्कृत, नो हिन्दी. ब तुकडीला ५०-५० हिंदी-संस्कृत व क तुकडी पासून पुढे १०० मार्कांचे हिन्दी असे काहीतरी होते. म्हणजे शाळांना हिन्दीची सक्ती नसावी तेव्हाही.
>>> आमच्या शाळेत 'अ' तुकडीला
>>> आमच्या शाळेत 'अ' तुकडीला १०० मार्कांचे संस्कृत, नो हिन्दी. ब तुकडीला ५०-५० हिंदी-संस्कृत व क तुकडी पासून पुढे १०० मार्कांचे हिन्दी असे काहीतरी होते. म्हणजे शाळांना हिन्दीची सक्ती नसावी तेव्हाही.
तुम्ही वर दिलेले हे पर्याय ८ वी पासून असतात. त्यापूवी ५ वी ते ७ वी हिंदी भाषा इंग्लिश व मराठीच्या बरोबरीने शिकावीच लागते. ८ वी पासून १० वी पर्यंत तुम्ही वर दिलेले पर्याय असतात.
म्हणजे थोडक्यात (१) हिंदी भाषा ५ वी ते ७ वी सक्तीची आहे आणि (२) ८ वी पासून १० वी पर्यंत पूर्ण १०० गुणांचे हिंदी किंवा पूर्ण १०० गुणांचे संस्कृत किंवा हिंदी-संस्कृत ५०-५० असे शिकावेच लागते. म्हणजे १० पर्यंत किमान ३ भाषा (हिंदी-संस्कृत घेतले तर ४) शिकण्याची महाराष्ट्रात सक्ती आहे.
पण इतर बर्याच राज्यात फक्त २ भाषा शिकण्याचीच सक्ती आहे (मातृभाषा व इंग्लिश). ज्यांना तिसरी भाषा शिकायची आहे त्यांना ती शिकता येते, पण तिसरी भाषा शिकणे अभ्यासक्रमात सक्तीचे नाही.
उदा. तामिळनाडूत फक्त तामिळ व इंग्लिश भाषेची सक्ती आहे. हिंदी किंवा इतर कोणतीही भाषा एखादा विद्यार्थी आवड म्हणून शिकू शकतो, पण तिसरी भाषा शिकण्याची अजिबात सक्ती नाही. असेच धोरण बंगालमध्ये व सर्व दाक्षिणात्य राज्यात आहे.
महाराष्ट्रातून त्रिभाषा सूत्र हद्दपार करून द्विभाषा सूत्र लागू करणे आवश्यक आहे. फक्त मराठी व इंग्लिश भाषा सक्तीची असावी. इतर कोणतीही भाषा शिकणे हे ऑप्शनल असावे.
ऑप्शन याचा अर्थ एकाने शिकायचे
ऑप्शन याचा अर्थ एकाने शिकायचे आणि दुसर्याने काहीच शिकायचे नाही असा होत नाही.. हिंदी ऑप्शनल याचा अर्थ हीम्दी नसले तरी त्याऐवजी काही तरी विषय घ्यावाच लागतो. एकाने पाच विषय आणिएकाने सहा विषय असे घडत नाही.
म्हणजे १० पर्यंत किमान ३ भाषा
म्हणजे १० पर्यंत किमान ३ भाषा (हिंदी-संस्कृत घेतले तर ४) शिकण्याची महाराष्ट्रात सक्ती आहे.
हा भ्रम आहे.. भाषा ३ ४ असल्या तरी लिपी एकच आहे. मराठी मनुष्य देवनागरी आणि रोमन अशा दोन लिप्या शिकतो. दक्षिणी माणुअसही त्याची लिपी आणि रोमन शिकतो.
मराठी माणुस पैली ते चौथी देवनागरी लिपी आणि मराठी शिकतो.. पाचवीला रोमन लिपी आणि इंग्रजी शिकतो.. हिंदी भाषा नवीन असली तरी लिपी आधीच शिकून झालेली असते. त्यामुळे पाचवीला हिंदी प्रथमच येत असली तरी धडे कविता मोठ्याच असतात. पण ते जड जात नाही, कारण काही शब्दही सारखेच आहेत. तीच कथा संस़्रुतची. आठवीला संस्कृत नवीन आले तरी अगदी लिपी शिकण्यापासून सुरुवात नसते. म्हणुन ते जमते.
आता दक्षिणेत काय हॉइल बघा.. पहिली ते चौथी दक्षिणी लिपी आणि भाषा शिकली. मग पाचवीला रोमन आली. आता त्या मुलाला हिंदी शिकवायची झाली तर पुन्हा देवनागरीचे अ आ इ ई शिकवावे लागतील. एकाच वेळी दोन नव्या लिप्या आणि दोन नव्या भाषा शिकता येतील का? संस़्रुत बाबतही तेच होते. एकदम आठवीला त्याना संस्कृत शिकणे कसे शक्य आहे? देवनागरीचा परिचय नको?
त्यामुळे आपली व त्यांची तुलना होऊ शकत नाही.. आपणही दोन लिप्या शिकतो, तेही दोनच शिकतात.
काही ठिकाणी तीन लिप्या होतही असतील. उदा. महाराष्ट्रात उर्दु माध्यम असेल तर उर्दु, हिंदी, इंग्रजी असे शिकावे लागेल. सीमाभागातील मुलं मराठी, कन्नड, इंग्रजी अशा भाषा शिकतात. पण एकंदर आपलंच जास्त सोपं आहे.. एका लिपीत तीन भाषा शिकुन होतात. आणि भोजपुरी, राजस्तानी, हरियानवी आणि आणखी दोन चार भाषा काही प्रमाणा त स मजू शकतात..शास्त्रीय बंदिश सगळी नाही समजली तरी १५ पैकी ४-५ शब्द तरी समजतात. काही नाहीच समजले तरी वाचता तरी येतच.
हायला, गझलेकडे वळले तेव्हा
हायला, गझलेकडे वळले तेव्हा मला वाटले जामोप्यांनी खोडसाळपणा सोडला की काय?!! पण...............
यात खोडसाळ काय आहे? सर्व सत्य
यात खोडसाळ काय आहे? सर्व सत्य आहे.
सत्यं ब्रूयात् प्रियं
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यम् अप्रियम्
>>> हायला, गझलेकडे . . .
>>> हायला, गझलेकडे . . . खोडसाळपणा सोडला की काय?!! पण...............
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही !
Old/Bad habits die hard !
बघा, मास्तुरीनी लगेच दोन
बघा, मास्तुरीनी लगेच दोन लिप्या वापरुन दाखवल्या.
लिपी सारखी असल्याने बळजबरीने
लिपी सारखी असल्याने बळजबरीने जास्त भाषा शिकणे समर्थनीय असेल तर युरोपमधल्या नागरिकांनी इंग्लिश, दॉईच, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, रशियन अशा अनेक भाषा आनंदाने शिकल्या असत्या.
मराठी लोकांना हिंदी शिकायला
मराठी लोकांना हिंदी शिकायला काय त्रास पडतो आणि हिंदी शिकल्याने त्यांचे काय नुकसान होते बरे?
<<का बर मी महाराष्ट्रात
<<का बर मी महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी मराठीतून करू शकत? महाराष्ट्रात सर्व प्रकारच माध्यमिक, उच्च शिक्षण, संशोधन मराठीतून व्हायला पाहिजे. तसं झाल तर ते अधिक लोकांपर्यंत पोहंचेल , आपल्या समाजाला पाहिजे अस तंत्रज्ञान त्यातून निघेल, संशोधन वाढेल आणि नुसत परदेशातील ग्राहकांना सेवा देण्याबरोबर अधिक भरीव अस योगदान आपण देऊ शकू. >>
भाबडेपणा टेन्ड्स टू इन्फिनिटी - क्षमस्व
अजून भारताने स्वतःच्या जीवावर एक साधे स्वयंचलीत वाहनही तयार केलेले नाही. टाटांच्या नॅनोचे इंजिन हा टाटांचा शोध नाही. भारताच्या प्रत्येक रस्त्यावर धावणारे प्रत्येक स्वयंचलीत वाहन हे परदेशातील संशोधनातून निर्माण झालेल्या इंजिनवर व तंत्रज्ञानावर धावत आहे. मराठीतून माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकीची पदवी घेऊन आपण करणार काय आहोत? 'इंजिन' या शब्दाला मराठी पर्यायही प्रचलीत नाही. पण इंजिन रोज सगळे वापरणार. फक्त 'एन्जिन' अशा उच्चाराऐवजी इंजिन असा उच्चार करणार इतकेच
एखाद्या भाषेने जोर धरायला त्या भाषेच्या भाषिकांची संस्कृती तेवढी प्रगत असावी लागते. तंत्रज्ञान, वैद्यकीय संशोधने, साहित्य, कला, उद्योग या सर्वच आघाड्यांवर
सर्व शिक्षण मराठीतून केल्यास महाराष्ट्रात तेवढे उद्योग निर्माण करावे लागतील. किंवा ते शिक्षण घेतलेल्यांनी इतरत्र तसे उद्योग स्थापायला लागतील जेथे व्यवहार मराठीतून होतील
मला वाटलेच होते ही शंका
मला वाटलेच होते ही शंका येणार.. तुम्ही सांगितलेल्या भाषांची फक्त लिपि सारखी आहे. पण त्या भाषा अगदी भिन्न भिन्न आहेत. नुस्त्या एकाच लिपित लिहिलं तर भाषा सारख्या होत नाहीत, उद्या मराठी चायनीज लिपित लिहिले तर मराठी आणि चायनीज या सारख्या भाषा होत नाहीत. पण मराठी हिंदी संस्कृत यात नुसती लिपिच सारखी नाही, तर कितीतरी शब्द, नामे, धातू, व्याकरणाचे नियम हे सगळेच सारखे आहे. त्याचा भाषा शिकताना फायदा होतो..
उद्या मराठी चायनीज लिपित
उद्या मराठी चायनीज लिपित लिहिले तर मराठी आणि चायनीज या सारख्या भाषा होत नाहीत. >>
जामोप्या, रशियन , जर्मन आणि
जामोप्या, रशियन , जर्मन आणि इंग्लिश लिपी कुठे सारखी आहे?
>>> मराठी लोकांना हिंदी
>>> मराठी लोकांना हिंदी शिकायला काय त्रास पडतो
विनाकारण एक जास्तीची भाषा शिकायला लागते. एक जास्तीची भाषा शिकण्याला दिलेल्या वेळात दुसरे आवडीचे व जास्त उपयोगी विषय शिकता येतील.
>>> आणि हिंदी शिकल्याने त्यांचे काय नुकसान होते बरे?
तुम्हाला हिंदी समजत असल्याने समोरचा हिंदीभाषिक तुमची भाषा अजिबात न शिकता थेट हिंदीतच, म्हणजे त्याच्या मातृभाषेत, बोलतो आणि तुम्हाला हिंदी येत असल्याने तुमचा संवाद तुमच्या मातृभाषेत न होता त्याच्या मातृभाषेत म्हणजे हिंदीतच होतो. तुमच्या स्वतःच्या राज्यात तुमच्या मातृभाषेत संवाद न होता परप्रांतीयाच्या मातृभाषेत संवाद होतो.
पण तुम्ही जेव्हा परराज्यात जाता तेव्हा तुमच्या मातृभाषेत संवाद न होता, परराज्याच्या मातृभाषेत संवाद होतो. म्हणजे थोडक्यात तुमच्या स्वतःच्या राज्यात आणि परराज्यात परप्रांतीयांशी बोलताना तुमच्या मातृभाषेची गरजच पडत नाही.
पण ज्या अहिंदी राज्यात हिंदी सक्तीची नाही, तिथे गेलेले हिंदीभाषिक झकत स्थानिक भाषा शिकून घेतात. त्यामुळे त्या राज्यात त्या त्या राज्यातल्या मातृभाषेतच संवाद होतो.
जर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्लिशच्या बरोबरीने हिंदी सक्तीने शिकावी लागते तर उ.प्र., बिहार इ. राज्यातल्या विद्यार्थ्यांना हिंदी व इंग्लिशच्या बरोबरीने मराठी किंवा कुठलीतरी इतर भारतीय भाषा सक्तीने शिकविली पाहिजे. तसे करायचे नसेल तर महाराष्ट्रात हिंदीची सक्ती रद्द करून तो पर्यायी विषय ठेवला पाहिजे.
एकतर त्रिभाषा सूत्र सर्व राज्यांना लागू करा किंवा महाराष्ट्रात द्विभाषा सूत्र लागू करा. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र आणि दक्षिणेतल्या, पूर्वेतल्या तसेच उत्तरेतल्या राज्यांना मात्र द्विभाषा सूत्र हीच खरी समस्या आहे.
बेफिकीर ह्यांना अनुमोदन पण
बेफिकीर ह्यांना अनुमोदन पण काही गोष्टी पटल्या नाहीत. शोध काय सगळे फक्त इंग्लिश मध्येच लागले क? अजिबात नाहीत. ह्या सगळ्या यूरोपिया देशांनी आपले तंत्रज्ञान वगैरे आपआपल्या आणले. आईनस्टाईनला तर इंग्रजी फारसे येत पण नव्हते. आपल्याकडे पण बरेचसे व्यवहार स्थानिक भाषेतूनच चालतात. प्रश्न कंपनी मध्ये कामकाजाची भाषा कोणती ह्याचा आहे. इंजिनला कशाला मराठी शब्द हवा आहे. घ्याकी वेगळ्या भाषेतला शब्द. काय बिघडले. इंग्लिश मध्ये असे कितीतरी शब्द बाहेरूनच आले आहेत की. मग मराठीत का नको.
पण आता सगळ्या भारतात स्थानिक भाषांना दुय्यम स्थान आले आहे. आर्थिक गोष्टी जेंव्हा स्थानिक भाषेत होतील तेंव भाषा वृधींगत होईल नाहीतर भाषा लगेच नाही मेली तरी हळूहळू लयाला जाईलच
मास्तुरे, आपला देश तरुण आहे.
मास्तुरे,
आपला देश तरुण आहे. अहमदनगरला औरंगजेब होता आणि सोलापूरखाली आदिलशाह
अशा रीतीने हिंदी सर्वत्र बोलली जात असणे हेही त्यामागचे (हिंदी सिलॅबसमध्ये असण्याचे) कारण आहे. एक दिवस अचानक उठून तुम्ही (म्हणजे सरकार) भाषिक निर्णय घेऊ शकत नाही. अनेकजण वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत असतात. महाराष्ट्रात 'अमराठी' लोक आज वाढलेले असतील, पण ते मुळातच 'बडी तादात' से आहेत. (की तादाद?). जाल तेथे अमराठी माणसे पिढ्यानपिढ्या राहात आहेत.
त्यामुळे हिंदी ही गरज आहे. तशी मराठी ही उत्तरेतल्यांची गरज नाही. मराठ्यांनी झेंडे रोवले असले तरी ते तात्कालिक आहे. तेथे सत्ता त्याच लोकांची (अमराठी व परदेशीयसुद्धा ) प्रामुख्याने होती.
तसेच दक्षिणेत इतिहासात आपले राज्य नव्हते.
तेथे हिंदी भाषिकांचेही नसेल तितका काळ, नक्की माहीत नाही
शोध काय सगळे फक्त इंग्लिश
शोध काय सगळे फक्त इंग्लिश मध्येच लागले क? अजिबात नाहीत>>
मी कुठे हे म्हणालो?
मी हे म्हणालो:
<<भारताच्या प्रत्येक रस्त्यावर धावणारे प्रत्येक स्वयंचलीत वाहन हे परदेशातील संशोधनातून निर्माण झालेल्या इंजिनवर व तंत्रज्ञानावर धावत आहे>>
<<का बर मी महाराष्ट्रात
<<का बर मी महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी मराठीतून करू शकत?
कोण नाही म्हणतय तुम्हाला? बघा प्रयत्न करुन. तुम्ही काय शिकला? बी ई ना? तुमची चार वर्षाची पुस्तकं गोळा करा आणि सगळी मराठीत भाषांतरीत करा.. मग प्रकाशक गाठा. पुस्तकं छापा. विद्यापीठाचं मन वळवून मराठी देखील माध्यम ठेवायला सांगा. प्रत्येक कॉलेजात इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेतले तज्ञ मास्तर नेमा की झालं! फार अवघड नाही नै का?
भारतात उच्च शिक्षण हा प्रकार इंग्रजानीच आणला.. त्यांचीच पुस्तके वाचून डॉक्टर इंजिनियर व्हायचे आणि आजही तसेच आहे. ( निदान वैद्यकीय्बाबतीत तरी, बहुतांश पुस्तके लंडन्च्या एका प्रकाशनाची असतात. स्थानिक लोकांची पुस्तके परिक्षेत पेपर लिहायला वापरली जातात. पण मुख्य ज्ञानाचा स्त्रोत परदेशी पुस्तकेच.)
फक्त हैद्राबादच्या निजामाने इंग्रजांची इंजिनियरिंगची पुस्तकं उर्दूत रुपांतरीत करुन उर्दू इंजिनियर तयार केले होते, असे ऐकीवात आहे. खरे खोटे खुदा जाने.
इंजिन शब्द मराठीत तसाच राहिला तर भाषेची प्रगतीच झाली. राया माझ्या हिरीला इंजीन बसवा ! इतकं छान गाणं मिळालं..
इंजिनला यंत्र म्हणतात ना? मग
इंजिनला यंत्र म्हणतात ना? मग पर्यायी शब्द नाही कसा? मशीनला पण तेच म्हणतात ना?
इंजिनला यंत्र म्हणतात
इंजिनला यंत्र म्हणतात ना>>
इंजिनला यंत्र म्हणत नाहीत
मला वाटतं गणित, विज्ञान, आणि
मला वाटतं गणित, विज्ञान, आणि वैद्यक्शास्त्र इंग्रजीतूनच शिकवावं.
आणि बाकीचं, म्हणजे इतिहास वगैरे विषय मराठीतून.
तुम्ही डिक्शनरी मीनिंग सांगत
तुम्ही डिक्शनरी मीनिंग सांगत असणार बहुतेक
Pages