काय करतेस काय हल्ली तू

Submitted by बेफ़िकीर on 20 April, 2012 - 01:47

चेहरा पाहताच थिजलो मी
आसवांच्या सरीत भिजलो मी
मीरच्या आर्त आर्त गझलेसा
जाळुनी आसमंत विझलो मी

तू म्हणालीस मी तुझी नाही
शक्यता एक व्हायची नाही
एवढेही म्हणू न शकलो मी
तूच नसलीस तर कुणी नाही

शेवटी हेच व्हायचे होते
की तुला दूर जायचे होते
हे तुलाही अमान्य होते पण
हेच गोंदून घ्यायचे होते

हात केलास जात असताना
तू कुणाचेच लक्ष नसताना
हासलो मी उगाच रडवेले
आणि रडलीस तूहि हसताना

ठीक आहेस ऐकले आहे
ऐकणे काम राहिले आहे
तू न माझी न मी तुझा कोणी
आपले सर्व संपले आहे

पण तरी वाटते अधेमध्ये
की तुला सांगते अधेमध्ये
जी हवा धाडतेस तू चुकुनी
ती इथे पोचते अधेमध्ये

याइथे तोच तो ऋतू आहे
आजही लोचनी रडू आहे
पण कशाला तुला कथा सांगू
मी तसाही म्हणा कडू आहे

आजही सांज वाटते खुनशी
आजही रात्र भासते खुनशी
तू विचारू नकोस की येथे
का सकाळी उजाडते खुनशी

सांग ना की तुझे तरी हल्ली
चालते का तुझ्या घरी हल्ली
तू नि तो यामधे तुलासुद्धा
भासते होय ना दरी हल्ली

मान्य आहे.. तुझ्या कुटुंबाला
देत असशीलही तसल्ली तू
पण मला सांग ना खरे अगदी
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काय करतेस काय हल्ली तू

काय करतेस काय हल्ली तू

===================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

मस्त

पण तरी वाटते अधेमध्ये
की तुला सांगते अधेमध्ये
जी हवा धाडतेस तू चुकुनी
ती इथे पोचते अधेमध्ये

!!!

_____/\_____

खूप आवडली.

आजही सांज वाटते खुनशी
आजही रात्र भासते खुनशी
तू विचारू नकोस की येथे
का सकाळी उजाडते खुनशी

क्या ब्बात !!!!

छानच !!

काही शब्द उगाचच परत परत येतात आणि खटकतातही. एवढा मोठा साहित्य-पसारा असलेला माणूस असा शब्द-दरिद्री तरी नक्कीच नसणार ! नाही आवडली ! Happy

ठीक आहेस ऐकले आहे
ऐकणे काम राहिले आहे
तू न माझी न मी तुझा कोणी
आपले सर्व संपले आहे..

ह्या ओळिंबद्धल काय तारिफ करु तुमची तेवधी कमिच आहे..

खुप खुप खुप सुन्दर अगदि मनापासुन

दंडवत!

मोजक्या शब्दात नेमक मांडण्याच अजब कसब आहे ज्यात त्या तुमच्या प्रतिभेला दंडवत!

-सुप्रिया.

वाह...