हृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉकिंग सेंट’

Submitted by Prasad Chikshe on 20 April, 2012 - 00:36

हृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉल्किंग सेंट’
१८ एप्रिल १९५१ या दिवशी विनोबांना पहिले भूदान मिळाले आणि भूदान चळवळीचा जन्म झाला. आधुनिक भारताच्या इतिहासातील ही एक विलक्षण चळवळ. आज या चळवळीला ६१ वर्षे पूर्ण होत आहेत.
गीतेवर विनोबांनी केलेल्या भाष्यात तीन योगक्रिया – यज्ञ, दान व तप – सांगितल्या.
१. यज्ञ – सृष्टीकडून आपण जेजे घेतो त्याची भरपाई करणे : उदा. जमिनीतून अन्नधान्य घेतो म्हणून तिची मशागत करणे, खतपाणी देणे. सृष्टीची झीज भरून काढणे हा यज्ञ.
२. दान – मनुष्य-समाज, आईबाप, गुरू, आप्तेष्ट इ. आपल्यासाठी मेहनत घेतात, त्यांचे उतराई होण्यासाठीं, झिज भरून काढण्यासाठी दान करणे. हा परोपकार नव्हे.
३. तप – आपण शरीर – मन, बुद्धि, इंद्रियें – वापरतो. त्यांची झीज भरून काढणें, त्याची विकारांपासून शुद्धी करणें. हे झालें तप. समाज व शरीर सष्टीबाहेर नाहीत. तसेच या तीनही क्रिया यज्ञच आहेत. (संदर्भ : विनोबा भावे, गीता-प्रवचनें, अध्याय १७)

भूदान हा काही अकस्मात, एकाएकी सुचलेला विचार नव्हता. त्यामागे विनोबांची प्रतिभा, तपश्चर्या, चिंतन, कृती या सगळ्यांचाच मिलाफ झाल्याचे आपणास दिसून येते. भूदान यज्ञाची प्रेरणा विनोबांना बालपणीच्या एका प्रसंगात दिसते.
विनोबा ऊर्फ विनू बालपणी आईला नेहमी विचारायचा,
‘आई, देव म्हणजे काय गं?’
आई म्हणाली, ‘योग्य वेळ आली की सांगेन.
भावेंच्या ‘गागोदे’ गावी अंगणात झाडाला खूप फणस येत असत. एकदा फणस कापला असता आई म्हणाली, ‘विनू, हे गरे अगोदर आजुबाजूच्या घरी देऊन ये’.
विनूने विचारलं, ‘असं का? आपण का नाही अगोदर खायचे?’
आई म्हणाली, ‘अगोदर दुसऱ्यांना देऊन मगच आपण खाल्ले पाहिजे. अरे, देतो तो देव आणि राखतो तो राक्षस.’
पुढे कित्येक वर्षांनी विनोबा या प्रसंगाबद्दल लिहितात- आईची ही शिकवण नसती तर मला भूदान यज्ञाची प्रेरणा झालीच नसती. भूदान यज्ञात लाखो एकर जमीन मिळाली आणि ती सहजगत्या वाटली गेली. या भू-क्रांतीचे बीज एका मोहरीएवढय़ा प्रसंगात दडले होते.

भूदान यज्ञामध्ये दान करताना विनोबा पारख न करताच दान करतात, असाही काही लोकांचा आक्षेप होता. या आक्षेपाला उत्तर देताना विनोबा पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीचाच प्रसंग सांगतात-
एके दिवशी दारावर एक सशक्त इसम भिक्षा मागण्यास आला. भिक्षा मागायला आलेल्या कोणालाही नकार न देणे हा तर विनोबांच्या मातोश्रींचा स्वभाव. त्यामुळे आईने त्याला भिक्षा वाढली. विनोबा म्हणाले की, “आई हा तर धडधाकट दिसतो. अशा लोकांना भिक्षा दिल्याने आळस वाढेल. अपात्राला दान केल्यास देणाऱ्याचेच अकल्याण होते.”
आई उत्तरली, ‘कोण पात्र आणि कोण अपात्र याची परीक्षा करणारे आपण कोण? दारावर आलेला प्रत्येक माणूस परमेश्वररुप समजून त्याला शक्तीनुसार देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण?’
महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात "गागोदे" नावाच्या गावात ११ सप्टेंबर १८९५ या दिवशी आचार्य विनोबा भावे यांचा जन्म झाला.त्यांचे पाळण्यातील नाव विनायक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव नरहरपंत असे होते. त्यांचे आजोबा शंभूराव हे ईश्वरभक्त होते. त्यामुळे त्यांचा घरातील वातावरण धार्मिक होते. पण घरात जातीभेद, धर्मभेद पाळला जात नसे.सर्व ईश्वराचीच लेकरे आहेत हीच शिकवण लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबविली गेली.भक्ती आणि त्यागाचे धडे शंभूरावांकडूनच विनायकाला मिळाले. विनोबांची आजी कर्तबगार व करारी होती. वयाची पन्नाशी ओलांडल्यावर ती लिहायला, वाचायला शिकली. विनोबांचे वडील गुजरातेत वडोदरा येथे होते. त्यामुळे त्यांचे बालपण आजीआजोबांजवळच गेले.

इंग्रजी तिसरीपर्यंत विनायक घरातच शिकले. फक्त चित्रकला शिकण्यापुरते ते शाळेत जात. पण त्यांचे मित्रमंडळ मोठे होते. सारेचजण देशप्रेमाने भारलेले, अभ्यासूवृत्तीचे पण मनस्वी होते. लोकमान्य टिळकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. टिळकांनी "गीतारहस्य" हा ग्रंथ लिहिला हे कळताच सर्व मुलांनी गीतेचा अभ्यास करायला सुरुवात केली. शाळेमध्ये पासापुरता अभ्यास करावयाचा व बाकीचा वेळ इतर वाचनात घालवायचा असा त्यांचा दिनक्रम होता. हळूहळू शालेय शिक्षणावरचा त्यांचा विश्वास उडू लागला.
लहानपणापासून देशप्रेम आणि समाजसेवेने त्यांच्या मनात घर केले होते. हिमालयाची भीषण शांतता व ज्ञान योगाची ओढ त्यांना होती. त्याचबरोबर बंगालमधील वंदेमातरम्‌चे नारेही त्यांना खेचत होते. १९१६ मध्ये त्यांनी घर सोडले. कुठे जावे या दुविधेत होते ते. त्यांना सांसारिक मोहापासून मुक्त होऊन अध्यात्माकडे वळायचे होते व समाजसेवा करायची होती. फक्त मार्ग ठरत नव्हता.
संत विनोबा भावे यांनी आपले सारे जीवन दुस-याची सेवा करण्यात घालवले आणि भारतीय समाजाला सुसंस्कारांचा उपदेश दिला. बालपणात त्यांना त्यांचे माता-पिता विनायक नावाने बोलावत असत. परंतु महात्मा गांधींनी एकदा त्यांच्या वडिलांना पत्र लिहिले. त्यात त्यांच्यासाठी विनोबा शब्दाचा वापर केला. तेव्हापासून सर्व लोक त्यांना विनोबा भावे म्हणू लागले. विनोबाला सेवा, त्याग, सौहार्द हे संस्कार आपल्या आईकडून मिळाले. असाच एक प्रसंग आहे.
एकदा विनोबाच्या शेजारीच राहणारा एक जण आजारी पडला होता. अशा कठीण परिस्थितीमध्ये विनोबाच्या आईने शेजाऱ्यांना सहकार्य केले. ती आपल्या घरी जेवण बनवल्यानंतर शेजा-याच्या घरी जाऊन जेवण करून द्यायची आणि आजारी व्यक्तीची सेवाही करायची.
एकदा विनोबाने आपल्या आईला विचारले, आई, तू किती मतलबी आहेस, स्वत:च्या घरचे जेवण आधी बनवतेस आणि नंतर शेजा-याचे जेवण तयार करतेस.
आईने उत्तर दिले. तुला समजत नाही. विनोबा, शेजाऱ्यांचे जेवण आधी बनवले तर ते थंड होईल. त्यामुळे मी त्यांचे जेवण नंतर बनवते.
दुसऱ्याला संकटाच्या वेळी सहकार्य करण्याचा हा भाव विनोबांनी नेहमीसाठी सांभाळून ठेवला आणि त्यांचे संपूर्ण जीवन याच भावाचे प्रत्यक्ष उदाहरण बनले.
आईचा आशीर्वाद घेऊन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते बडोद्याहून निघाले. परंतु वाटेत सुरतजवळ त्यांनी एका शाळेत नाममात्र वेतनावर इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. बनारस हिंदू विद्यापीठात गांधीजींनी केलेले भाषण विनोबांनी पेपरात वाचले. त्या भाषणाचा ठसा विनोबांच्या मनावर उमटला. मनात दरवळणारे प्रश्नष लिहून त्यांनी गांधींच्या पत्त्यावर पाठवले. उत्तरही आले. विनोबांचा आणि गांधीजींचा पत्रव्यवहार सुरू झाला.
एक दिवस गांधीजींनी लिहिले, ‘आश्रमाच्या नियमाप्रमाणे जे शिकायचे आहे त्यासाठी वेळ द्या तरच शिकाल. पत्र नकोत. आश्रमात या.’

हे आमंत्रण विनोबांच्या आयुष्यातील एक फार मोठा सण होते. त्यांचे पाय गांधीजींच्या आश्रमाकडे वळले.
७ जून १९१६ या दिवशी या दोन महात्म्यांची भेट झाली ती गांधीजी स्वयंपाकघरात भाजी चिरत असताना. विनोबांच्या मनावर श्रमसंस्काराचा धडा उमटला. आजवर अफाट बौद्धिक श्रम घेतले होते, आता शारीरिक कष्ट सुरू झाले. पहिले सहा महिने या दोघांमध्ये संवादच नव्हता. या आश्रमीय दिवसांबद्दल विनोबा लिहितात- ‘गांधीजींच्या चरणांजवळ बसून या असभ्य माणसाचा सेवक झाला. मी स्वभावाने एखाद्या जंगली जनावरासारखा आहे. बापूंनी मला पाळीव जनावर केले.’आपल्या आध्यात्मिक मानवतावादी विचारांच्या सहाय्याने चंबळच्या खोर्याूतील दरोडेखोरांनाही बदलले. या सर्वांत आध्यात्मिक साधनेचा हात त्यांनी कधीच सोडला नाही. भूदान चळवळ गाजली. ‘टाइम’ मासिकाने व ‘यॉर्कर’ या अमेरिकेतील वर्तमानपत्राने विनोबांच्या साधेपणाला जगासमोर मांडले. सत्याग्रह, चळवळ, ज्ञानसाधना, शिक्षा वाटप सर्व काही केले. त्यांचे मत होते की, ‘जो देतो तो देव, जो राखतो तो राक्षस.’ त्यांना परदेशात ‘द वॉल्किंग सेंट’ असे म्हणत. त्यांच्या पदयात्रांनी व गांधीभक्तीने त्यांना परदेशात ओळख मिळाली.

त्यांनी भगवा रंग ओढून अध्यात्माची टपरी लावली नाही. कार्य केले, पण पोस्टर लावले नाही. समर्पण एवढेच त्यांनी आयुष्यभर केले. कविता लिखाण अग्नीत टाकले आणि स्वत:च्या जीवाची आहुती समाजसेवेच्या अग्नीकुंडात दिली. हल्लीच्या बाबांनी व संत होण्याची इच्छा बाळगणार्यांीनी विनोबांचे आयुष्य समजून घ्यावे.
अमेरिकेचा प्रवास करून परतलेल्या एका मद्रासी गृहस्थाने विनोबांना विचारले, ‘विज्ञानात बाह्य कसोटी असते तशी आत्मज्ञानात असते का?’
विनोबा हसत म्हणाले, ‘एक थप्पड मारून पहावे, रागावला तर समजावे की हा आत्मज्ञानी नाही, अजून कच्चा आहे!’
विनोबां जीवनातील एक सत्यघटना येथे देत आहोत. दृढ विश्वास आणि संकल्प यांचे महत्त्व या घटनेतून आपल्या ध्यानात येऊ शकेल.

आचार्य विनोबांकडे एकदा एक दारूडा तरुण आला. हात जोडून विनवणी करू लागला, ‘मी खूप दु:खी आहे. मला दारूने घेरले आहे. दारू सोडायची माझी तीव्र इच्छा आहे, पण दारू सुटत नाहीय. आपण काहीतरी उपाय सांगा.’

विनोबाजींनी थोडा विचार केला आणि दुस-या दिवशी भेटीस बोलावले.

दुस-या दिवशी तो तरुण सकाळी लगबगीने आला. त्याने विनोबाजींना हाक दिली. विनोबा म्हणाले, ‘अरे आत ये.’

त्याला आश्चर्य वाटले. विनोबा एका खांबाला घट्ट पकडून उभे होते. तरुणाने जिज्ञासेने असे करण्याचे कारण विचारले.

विनोबा म्हणाले, ‘अरे या खांबाने मला पकडून ठेवले आहे. कितीतरी वेळ झाले पण खांब मला सोडत नाहीय.’

तरुणाला आश्चर्य वाटले आणि हसूही आले. तरुण म्हणाला, ‘खांबाला तर तुम्ही स्वताच पकडले आहात. तुम्ही खांबाला सोडा म्हणजे आपोआप तुमची सुटका होईल.’

विनोबा हसले. तरुणाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ‘बाळ मी हेच तर तुला सांगणार होतो. दारूला तू कवटाळून बसलास. तू ठरवलास तर तुझे व्यसन सुटू शकेल.’

तरुणाचे डोळे उघडले. त्याने दृढनिश्चय केला आणि त्याचे व्यसन सुटले. तुम्हालाही कोणत्यातरी व्यसनाने घेरले आहे असे वाटत असेल तर आज आणि आताच दृढ निश्चय करा.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विनोबांनी समाजकार्याचा जो मार्ग निवडला त्याविषयी सांगताना ते म्हणतात,
‘‘माझे काम आश्रमापुरतेच मर्यादित राहणार नाही. आश्रमामध्ये मी दही बनवितो आहे. पुढे समाजरूपी दुधात त्याचे विरजण घालून त्याचे दही बनवायचे आहे.”

विनोबांच्या या विचारातून अनेकांनी प्रेरणा घेतल्याचं दिसतं. आमटे कुटुंबिय, बंग दाम्पत्य आदींच्या समाजकार्याचा हाच आधार आहे. पुढे आणीबाणीच्या काळात स्वातंत्र्यावरती काळे ढग दाटून आले, लोकशाही मूल्यांचा संकोच होऊ लागला. त्याकाळी जेपींच्या आंदोलनाने पुन्हा एकदा सामाजिक संवेदना चाळवल्या. अशाप्रकारे समाजवादी, गांधीवादी विचाराने भारावलेली एक पिढी निर्माण झाली.

चोहोबाजूंनी अंधारून येत असताना तेवत राहिलेल्या ज्योतीइतकंच महत्त्वाचं आहे या पिढीचं काम. नव्या समाजरचनेचं काम अनेक पिढ्यांना मिळून करावं लागेल. ती एक प्रकारची रिले रेसच. जुन्या पिढीने आपला पल्ला संपला की नव्या पिढीच्या हाती बॅटन द्यावी. नव्या पिढीने ती घ्यावी.
यात रामचंद्र रेड्डी,शोभनाताई रानडे,महेंद्रसिंह प्रसाद (वय 85, रा. शिंगोडिया, बिहार),कृष्णमल जगन्नाथन आणि संकरलिंगम जगन्नाथन,रमाकांत आत्माराम पाटील,जपानच्या युरिको इकिनोया यांची ही गाथा...,पवनार आश्रमाचे व्यवस्थापक गौतमजी बजाज,विजय दिवाण,डॉ. आशिष सातव आणि डॉ. कविता सातव

यासर्वांबाबतीत व विनोबांबद्दल अधिक लेखन वाचण्यासाठी माझा ब्लॉग नक्की वाचा.
http://prasadchikshe.blogspot.in/2012/04/blog-post_19.html

आपला प्रसाद

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रसाद, गेले अनेक दिवसांपासुन मायबोलीवर विनोबांबद्दल लिहावे असे मनात होते. तुमच्या लेखाने ती ईच्छा पुर्ण झाली. अर्थात विनोबा हा एका लेखात मावणारा विषय नाहीच.
राम शेवाळकरांचे विनोबांवर असलेले व्याख्यान अनेकवेळा ऐकले आहे, जेव्हा ऐकतो तेव्हा डोळे पाणावतात.
भारताचे सुदैव असे महान लोक जन्माला आले, आणि त्याच वेळेस दुर्दैव कारण आजकाल हे असे लोक विस्मरणात जात आहेत.

..

वाचनीय लेख.
सोलापूरात 'विनूची आई' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाला सोलापूरच्याच ज्ञानप्रबोधिनीत सुमारे दोन वर्षांपूर्वी गेलो होतो. त्यावेळी कविवर्य नारायण सुर्वे यांची 'माझी माय' ही अप्रतीम कविता सुरुवातीस म्हणण्यात आली. त्यावेळी विनोबाजीच नव्हेत तर त्यांच्या दोन्ही भावांवरही त्यांच्या आईचा केवढा प्रभाव होता ते ऐकले. त्यावेळी 'मला नातवाला पहायचेय रे असा आग्रह न धरता 'आपल्या तीन्ही मुलांच्या देशकार्याला वाहून घेण्याच्या इच्छेला प्रोत्साहन देणारी आई' असे वर्णन श्री विवेक घळसासी यांनी केलेले आठवते. पुस्तक लिहिणार्‍यांचे नाव नेमके आठवत नाही पण बहुदा कुलकर्णी होते असे वाटते.
त्या नेटक्या समारंभाची आठवण यानिमित्त झाली
सत्पात्र कोण हे ठरवणे कठीण आहे हे मान्य करूनही दान मात्र सत्पात्रीच हवे असे वाटते..

दिनेशदा,दामोदरसुत,बी,महेश
नमस्कार
आपले खूप खूप धन्यवाद ...मी अगदी नवा आहे इथे.

मी काही लेखक नाही. ई- शाळेत आलो व मस्त शैलीत लिहिणारे अनेक दिसले. मराठीत लिहिणे म्हणजे माझ्या सारख्या अर्धवट इंग्रजीत बोलणाऱ्या व्यक्तीला अतिशय भीतीदायक वाटे. काना, मात्रा, वेलांटी यांचे नियम तसे फारसे माहित नाहीत. इंटरनेटवर blog पण काढला २४ जानेवारी २००८ मध्ये. पण स्वतःचे असे मराठीतील लेखन कधीच केले नाही. Blog वर माझ्या फक्त २० पोस्ट आहेत. यावरून मी नियमित Blog लिहीत असेल याचा अंदाज नक्कीच आपल्याला येईल. या आधी मी मोडक्या तोडक्या रोमन लिपीतून माझे अनुभव व्यक्त करत होतो. ई-दुनियेत आल्यावर मात्र सतत काहीतरी व्यक्त करावे वाटत गेले पण काही ओळींच्या पेक्षा जास्त कधीच नाही. एकदा धारिष्ट्य केले व लिहिले. AC मध्ये बसून PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला superlike करणाऱ्यातला मी...... या सर्वांमुळे मी थोडं फार लिहितो ....
http://prasadchikshe.blogspot.in/ आता इथे पण लिहीत जाईल आपल्या सारख्यांचे मैत्र व्हावे हीच इच्छा .

,

प्रसाद, आपला ब्लॉग पाहिला, विनोबांबद्दल येथे दिलेला लेख आपण अधिक विस्तृत स्वरूपात तिकडे लिहिलेला आहे. अन्य लेख अजुन वाचले नाहीत.
तुमच्या लेखनावरून असे वाटत नाही की त्यामधे खुप समस्या / उणिवा आहेत. तसेही नियमित लिहिणारे सर्वजण कुठे अगदी १००% शुद्ध लिहू शकतात (मी देखील त्याला अपवाद नाही).
माबोवर तुमचे स्वागत, आणि पुलेशु (म्हणजे पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा)

प्रसाद - एक छोटीशी सूचना.. मराठी लिहायचे असेल तर वॉकिंग किंवा पूर्ण नांव इंग्रजीत लिहा.. वॉल्किंग असा लिहू नका...

महेश,udayone,महागुरु,परदेसाई

नमस्कार
आपले खूप खूप धन्यवाद ....
परदेसाई |आपण म्हणता ते अगदी योग्य आहे .....अजून टंकलेखन शिकत आहे नक्की प्रगती करतो. आपले मार्गदर्शन हवे आहे.

महेश,महागुरू आपले मार्गदर्शन असल्यास नक्कीच अधिक लिहील. मायबोलीवर खूप चांगले वाचायला मिळते त्यामुळे लेखन अधिक सुधारेल .

आपला प्रसाद

प्रसाद, मी काय मार्गदर्शन करणार ? तुमचा ब्लॉग पाहिला त्यामधे तुमच्या कार्याची व्याप्ती पाहिली. ती एवढी जबरद्स्त आहे की तुम्हीच समस्त मायबोलीकरांना मार्गदर्शन करू शकाल.

लेख आवडला! आपल्या ब्लॉगला धावती भेट दिली. लेखणी निराळी असल्याचे जाणवले! पुढील लिखाणास हार्दिक शुभेच्छा!

नाना नेने,श्री,धन्यवाद
महेश मी शिक्षण क्षेत्रात काम करतो त्या मुळे प्रत्येक व्यक्तीत एक गुरु नक्कीच लपलेला असतो याचा अनुभव पावलोपावली येतो.

>> मी काय मार्गदर्शन करणार ? तुमचा ब्लॉग पाहिला त्यामधे तुमच्या कार्याची व्याप्ती पाहिली. ती एवढी
>> जबरद्स्त आहे की तुम्हीच समस्त मायबोलीकरांना मार्गदर्शन करू शकाल.

अनुमोदन!

प्रसाद चिक्षे, तुमच्यासारखे लोक मायबोलीवर येणे ही समस्त वाचकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. Happy
आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान मी पहिल्यांदा फेसबुक वर लिहीत असे ते पण खूप थोडे. मग ग्रुप मध्ये ते पण तात्कालीन ....पण पुढे थोडे खोलात जाऊन लिहावे वाटायला लागले मग ब्लॉग वर लिहीत असे पण लिखाणावर साधक बाधक चर्चा अजीबात नाही फक्त भेटी आणि लाईक .....मायबोली वर मात्र मला वेगळच दिसतंय इथे चोखंदळ वाचक आहेत दोन दिवसांपासून खूप खुश आहे कुणी तरी माझे लिखाण नीट वाचते आहे व त्यावर योग्य त्या प्रतिक्रिया देत आहे ......आपल्या सर्वांबरोबर एका नव्या क्षितिजाचा शोध नक्की लागेल असे वाटते ...धन्यवाद .....

प्रसाद चिक्षे,
मायबोलीवर अनेक जाणकार आणि दर्दी लोक आहेत. ते वेळोवेळी प्रोत्साहन तर देतीलच आणि काही सुचना असतील तर त्याही सांगतील.
भा.शि.प्र.सं. चा मी पण एक माजी विद्यार्थी. फेसबुकवर काही वेळा तुमचे लिखाण वाचले आहे. वेगळे काही वाचल्याचा अनुभव नक्की मिळतो.

अशा लोकांविषयी काहीही बोलण्याची पात्रता नसतानाही असं म्हणु इच्छिते की असं काम करायला मनाची प्रचंड तयारी हवी अन कसलाही लोभ नसावा लागतो जे सामान्य नाही.

अशा लोकांच्या वागण्यापैकी एखादा टक्का जरी रोजच्या जगण्यात वागायचा प्रयत्न करते. जमतंच असं नाही पण प्रयत्न करणं हे काम आहे. नकारात्मक विचारांचे लोकं तोच नकारात्मक विचार इतरांना देताना आजुबाजुला पाहीले की वाईट वाटतं.

महागुरु, आनंद वाटला भेटून ......आपणपण भा.शि.प्र.सं. चा मी पण एक माजी विद्यार्थी अहात हे एकूण छान वाटले काल अंबाजोगाईची एक बहीण भेटली मायबोलीवर खूप मस्त वाटले .....

शिल्पा बडवे आपण म्हणतात ते अगदी खरे आहे असे लोक आपल्याला फक्त वंदनीय राहतात पण अंशत: सुद्धा त्यांचे अनुकरण आपण करत नाहीत ......विचार आवडणे, पटणे, स्वीकारणे, आत्मसात करणे मग त्या बद्दल बोलणे व कृतीत उतरून ते आपल्या जीवनाचा भाग होणे ही अवघड प्रक्रिया आहे पण असाध्य नक्कीच नाही ......सुरुवात करणे अवगड जाते मग पुढचा मार्ग सोपा असतो. पण सुरवातच होत नाही ही खंत असते.

अरे प्रसाद - तू विनोबांचा चाहता / भक्त आहेस हे माहित नव्हते - वा, वा मलाही विनोबांविषयी आदर असून त्यांची अनेक पुस्तके माझ्या संग्रहात आहेत - विचार पोथी, प्रेरक पत्रांश तर प्रचंडच आवडतात.....
विनोबांसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही - एकमेवाद्वितीयम...... - त्यांना कायमच प्रणाम.......
तुझा ब्लॉग आता जरुर वाचणार.....

Pages