सलाम आशाताई!!

Submitted by चिनूक्स on 7 September, 2008 - 19:54


asha3.jpg

गेली साठ वर्षं आशाताईंच्या स्वरानं आपल्याला भुरळ घातली आहे.
थेट मनाशी संवाद साधणारा तो आवाज...
अति कोमल. पल्लेदार. लवचिक. आर्त. अवखळ. राजवर्खी. नितळ. आरस्पानी. अद्भुत. मानुष आणि दैवीही...

हा आवाज कधी झेपावत्या प्रमत्त प्रपातांची आठवण करून देतो, तर कधी त्यात तळपत्या समशेरीची फेक असते.
तो कधी उत्तेजित करतो, तर कधी क्लांत मनावर फुंकर घालतो.
धनुष्याचा टणत्कार, शंखांचा उद्घोष असं सारं त्या आवाजात असतं.
हा आवाज पुरतं झपाटून टाकतो. वेड लावतो.

आशाताईंची स्वरांवरील हुकूमत जबरदस्त आहे. एखाद्या पदाभिषिक्त सम्राज्ञीसारख्या आशाताई त्यावर स्वामित्व गाजवतात.

'हे गीत जीवनाचे'मधील 'मुख तेरो कारो'च्या लपेटीदार ताना असोत, किंवा 'झाले युवतिमना दारुण' असो, आशाताईंचे सूर निव्वळ अचंबित करून सोडतात. 'समय ओ धीरे चलो' आणि 'कर ले प्यार कर ले', 'मेरा कुछ सामान' आणि 'मेरा नाम है शबनम', 'झुमका गीरा रे' आणि 'जीवलगा'... 'पाण्या तुझा रंग कसा?', हे आशाताईंच्या बाबतीत शंभर टक्के खरं ठरतं.

आपल्या आयुष्यात अनेक बर्‍यावाईट प्रसंगी या आवाजानं साथ दिली आहे. इतकी की आशाताईंची गाणी ऐकणं, ही आपल्या अनेकांची भावनिक गरज आहे.

आज आशाताईंचा जन्मदिन. सर्व मायबोलीकरांतर्फे आशाताईंना हार्दिक शुभेच्छा!!!


She's the one that keeps the dream alive,
From the morning, past the evening, till the end of the light.

Brimful of Asha on the forty-five.
Well, it's a brimful of Asha on the forty-five.


asha2.jpg

---------------------------------------------------------------

श्री. आनंद मोडक हे एक प्रतिभावान संगीतकार. 'घाशीराम कोतवाल', 'महानिर्वाण', 'तीन पैशाचा तमाशा' यांसारखी नाटकं असोत किंवा '२२ जून १८९७', 'कळत नकळत', 'चौकट राजा', 'दोघी', 'आई', 'नशीबवान', 'एक होता विदुषक', 'तू तिथं मी', 'गाभारा', 'मुक्ता', 'लपंडाव', 'थांग' हे चित्रपट, नवनवीन प्रयोग, सुंदर चाली, उत्कृष्ट वाद्यमेळ यांमुळे त्यांचं संगीत कायमच नावाजलं गेलं आहे. 'निवडक पुलं' या मालिकेसाठी त्यांनी तयार केलेली धून तर पुलंच्या ध्वनिफितींबरोबर घराघरांत पोहोचली. 'साजणवेळा', 'ओंजळीत स्वर तुझेच' हे सांगितीक प्रयोगही बरेच गाजले.


img1.jpg

आशाताईंनी श्री. आनंद मोडक यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली अनेक चित्रपटांत गायन केले आहे. आशाताईंचा आवाज, आणि आनंद मोडक यांच्या अप्रतिम चाली, अशी ही सुरेख गाणी आज दशकभरानंतरसुद्धा अतिशय ताजी वाटतात.
आशाताईंचे निस्सीम भक्त, आणि नंतर संगीतदिग्दर्शक, अशा दुहेरी भूमिकांत आलेले अनुभव सांगत आहेत, श्री. आनंद मोडक.. जोडीला आशाताईंची सुरेख गाणी..

(या लेखातला बराचसा भाग श्रवणीय (mp3) असून तो ऐकण्यासाठी आपल्या संगणकावर आणि न्याहाळकावर Flash plugin असणे आवश्यक आहे)श्री. आनंद मोडक
---------------------------------------------------------------

श्री. गो. नी. दांडेकर, अर्थात गोनीदा, आणि आशाताई यांचं अतिशय सुंदर मैत्र होतं. सुरुवातीला 'गोनीदांच्या साहित्याची एक चाहती' असलेल्या आशाताई आणि गोनीदा, एकमेकांचे 'friend, philosopher, guide' होते. 'जैत रे जैत' या कादंबरीतील गोनीदांनी चितारलेली 'चिंधी' ही मनस्वी आशाताईंचंच दुसरं रूप आहे.


img2.jpg

अतिशय तरल, सुंदर असलेल्या या नात्याविषयी 'मर्मबंधातली ठेव' या लेखात गोनीदांनी लिहिलं आहे. गोनीदांच्या कन्या, डॉ. वीणा देव यांनाही आशाताईंचं हे मैत्र लाभलं. 'परतोनि पाहे' या पुस्तकात त्यांनी आशाताईंवर एक अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. त्याच लेखाचं वीणाताईंनी केलेलं वाचन...


---------------------------------------------------------------

आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त श्री. शंकर महादेवन यांनी दिलेल्या शुभेच्छा..

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका साधना सरगम यांनी दिलेल्या शुभेच्छा..
श्री. सुधीर गाडगीळ यांनी दिलेल्या शुभेच्छा..

---------------------------------------------------------------

'कळत नकळत' व 'एक होता विदुषक' या चित्रपटांतील गाणी वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती स्मिता तळवलकर (अस्मिता चित्र) व श्री. सुरेश अलुरकर (अलुरकर म्युझिक हाऊस, पुणे) यांचे मनःपूर्वक आभार.

---------------------------------------------------------------
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स... खूप खूप खूप धन्यवाद.. सगळे ऑडिओ ऐकले.. वीणाताईंचं हे वाचन ही अतिशय छान आहे.. !

चिन्मय काय सुंदर सुंदर लेखन वाचायला आणि श्रवणाला इतकं काहीतरी छान तू देत आहेस.. मायबोलिचे चित्र पालटतं आहे. पुन्हा चांगले दिवस येत आहेत.. धन्यवाद!

आहा!
चिनूक्स, तुला किती धन्यवाद द्यायचे?
आनंद मोडकांची मुलाखत ऐकताना रेडीयोवर कार्यक्रम ऐकतो तसे वाटले Happy
वीणा देवांनी तर नि:शब्द केलं. गहिवरून आलं ऐकता ऐकताच!
जीवेत् शरदः शतम् आशाताई!

टेक्निकलीही मुलाखत खूप आवडली. झटकन लोड होणार्‍या क्लिप्स, सुस्पष्ट आवाज, गाण्यांचे मिक्सिंग- सगळेच १ नंबर! इतक्या सफाईदार टेक्निकमुळेच हे ऐकणे शक्य झाले. टेक्निकल टीमचे विशेष आभार!

छान! अजून ऑडीयो नाही ऐकल्यात...
आशाताईन्बद्दल काहीही लिहीणे, वाचणे वा ऐकणे म्हणजे अव्याहत वाहणार्‍या जिवंत झर्‍याला निव्वळ कॅमेरा मधे बन्दीस्त करू पहाण्यासारखे आहे... ते कधी पुरतच नाही!!
एक सूचना-विनंती: "सलाम आशाताई" असे शीर्षक देता येईल का..? इतक्या महान कलाकाराला एकेरी सम्बोन्धण्यापेक्षा असे खास "मराठमोळी" अन आदरयुक्त सम्बोधणे (विशेषत: या वेबसाईटवर) अधिक योग्य वाटते.

चिनू..... अरे काय मेजवानी दिलीस रे........ अप्रतिम !! तुझे मनापासून धन्यवाद Happy

चिनुक्स.. आशा ताईंच्या वाढदिवशी मेजवानी मिळाली मायबोलि करांना...अप्रतिम !!!
वा! आजचा दिवस सफल झाला... आणि आवाज पण अगदी स्पष्ट आहे ऑडीओ चा.. धन्स रे...

@योग,
शिर्षकात बदल सुचवल्याबद्दल धन्यवाद. बदल केला आहे.

दुसर्‍या टॅबमधे श्री मोडकांचं कथन ऐकतेय. सुरेख! सकाळ अगदी प्रसन्न झाली. Happy
(कालपासून आशाताईंची गाणी ऐकण्याचा सपाटा सुरु केलाय. निखळ आनंद!)

अप्रतिम. केवळ अप्रतिम. फार फार धन्यवाद चिनुक्ष....

वा! अतिशय सुरेख पर्वणीच म्हणायची ही. मला घरी गेल्याशिवाय ऐकता येणार नाहीये पण हे बघूनच चिनुक्स तुझे अभिनंदन करावेसे वाटले!

आशाताईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा! आपल्या स्वर्गीय आवाजानं कोट्यवधी रसिकांच्या आयुष्याचं सोनं करणार्‍या आशाताईंना माझा प्रणाम!

चिन्मय, खरोखरच अप्रतिम! केव्हा घरी जातोय आणि ऐकतोय असं झालं होतं. आशाताईंना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा!

ही आंतरजालातील माझी एक अत्यंत आवडती क्लिप.

[video:http://www.youtube.com/watch?v=tgHP7maJeR0]

वा! मलाही घाई झालिये घरी जाउन ऐकायची! Happy
खुप धन्यवाद.

अतिशय सुन्दर चिनुक्ष. धन्यवाद!
हा लेख वाचताना आणि एअकताना तु ह्यामागे घेतलेली मेहनत पण जाणवतेय.

आशा ताईंना वाढ दिवसाच्या शुभेच्छा!!!

SALUTE to THE Music GODDESS !!!

आशा ताई,
आप जियो हजारो साल
साल के दिन हो पचास लाख Happy

आशाताईंना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!

चिनुक्स, अप्रतिम... धन्यवाद.

आशाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

चिनूक्स,
तू तर खजिनाच उपलब्ध करून दिला आहेस.

चिनुक्ष

धन्यवाद.

घरी जाउन ऐकायला हवे!

कालच "धिन्गाणा डॉट कॉम" वर आशाबाईंच्या "गेले द्यायचे राहुन" च्या एका कडव्याच्या विविध गायकांच्या नकला ऐकत होतो. अप्रतिम!

आशाताईना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

वाह.. क्या बात है?? निव्वळ अप्रतिम............. आशा भोसले ह्या नावातच सूर भरलेला आहे. आनंद मोडकानी सांगितल्या प्रमाणे हा 'चिरतरूण आवाज.. ज्या आवाजाला वय नाही'.. अगदी पटलं..
आशाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

चिन्मय ...
धन्स ! धन्स !! धन्स !!! धन्स !!!! धन्स !!!!! धन्स !!!!!!
आनंद मोडकांची मुलाखत काय अप्रतिम आहे रे !
बाकीच्या क्लिप्स अजून ऐकायच्या आहेत पण कधी एकदा तुला प्रतिसाद देतो असं वाटायला लागलं.

चिन्मय, झकास काम केलं आहेस!
बाकी आशा ही आशाच राहणार.. त्यातंच ती आमच्या मनाच्या किती जवळ आहे हे दिसून येतं..
त्या व्यक्तीबद्दल यांत किंचितही मानसन्मानाच्या पोकळ गप्पा नाहीत.. मी तर "त्यांना" व्यक्तिश: ओळखंत पण नाही.. पण त्याची गरज वाटू नये इतकी "ती" जवळची आहे..
आशा व्यक्ती नाही.. ती एक मनातली जाणीव आहे जी लहानपणी "नाच रे मोरा" मधून लडीवाळपणा करते.. बचपनके दिन भी क्या दिन थे मधल्या नुसत्या तानेमधून ते दिवस ती कधी विसरून देत नाही .. ..
पौंगडावस्थेत तीच आशा "जा जा जा रे नको बोलू जा ना" मधला अवखळपणा देते.. "काली घटा छाए मोरा जिया तरसाए" म्हणताना ज्याच्या ह्रदयात कालवाकालव होत नसेल तर त्या माणसाला ह्रदय नाही असा बिनठोक निर्णय देता येतो.. भेंड्यांमध्ये इ आला कि "इना मिना डिका" हमखास म्हणणारे जेव्हा "इशारों इशारों मे दिल लेने वाले" म्हणू लागतात तेव्हा त्यांनी तो उंबरठा पार केलाय ही खूणगाठ बांधायला काहीच हरकत नाही!
"आ दिलसे दिल मिलाले" मधली तिची अनाहूत नवरंग प्रिती आपली वाटायला लागते.. मग ते अगदी त्या नवरंगमधल्या नटीच्या अनुनासिक आवाजाची नक्कल करून गायलेलं का असेना.. उगाचच "दो लफ्झो़की है" गात बसावसं वाटतं.. "निगांहे मिलानेको जी चाहतां है" मधला तिने श्वासावर किती ताबा ठेवलाय.. आणि त्याचा ताना घेताना किती मस्त उपयोग केलाय हे कळतं, पण त्यापेक्षा ती "मुलाकात का कोई पैगाम दिजे के छुपछुपके आने को जी चाहता है और.. आके न जाने को जी चाहता है" म्हणते तेव्हाची प्रेमातली असहाय्यता जवळची वाटते.. हे गीत जीवनाचे मधल्या मुख तेरो कारो पेक्षा तेव्हां "खुळ्या खुळ्या रे पावसा किती भिजविसी मला" जास्त मोहून टाकतं..
"बैल तुझे हरणावाणी ..गाडीवान दादा" म्हणत तारूण्यात तोच आवाज "मलमली तारूण्य" घेऊन येतो.. एखादी रात ... अकेली है म्हणत अशीही येते की "ढलती जाए रात, कहले दिलकी बात" म्हणत म्हणतच "रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलांस का रे" वर अलवार पोहोचायचं असतं..
त्या वयांत आलेले कडूगोड अनुभव तिच्याच सोबतीने पचवायचे असतात.. "जाईए आप कहां जाएंगे" मधल्या आर्ततेला दाद न देता दूर गेलेल्या कुणाला तरी "चैनसे हमको कभी आपने जिने न दिया" असं म्हणताना काळजात टोचणार्‍या सुयांचा आणि त्या आवाजाचा संबंध नाही असे शपथेवर सांगता येईल का?
पुणे युनिव्हर्सिटीतल्या "त्या" ठिकाणी न चुकता "यही वो जगह है" आठवतं त्यात आशाचा सहभाग किती आणि त्या खुळ्या प्रेमाचा किती हे कुठलही गणित मांडून सांगता येणार नाही.. त्यातल्या "वो दिन आपको, याद कैसे दिलाए" मधल्या "कैसे दिलाए" मधली अगतिकता वेडावून जाते की तिचा आवाज.. हे सांगता येणं अशक्य.. केवळ अशक्य..
आता "क्षेमालागी जीव उतावीळ माझा, म्हणवूनि स्फुरतांत बाहू" मध्ये पण तीच अगतिकता आहे.. पण ती त्या परमपुरूषाच्या आलिंगनासाठी आहे.. "क्षेम देऊ गेले पण मी ची मी एकली, आसावला जीव रावो" मध्ये अनुभवाच्या पलिकडची ज्ञानियाची अवस्था तिच्या आवाजात ऐकायची नाही तर कुणाच्या!
म्हणून आशा .. माझ्यासाठी फक्त आशा आहे.. माझ्या आधीच्या पिढीला ती आशा होती.. मला ती आशा आहे.. आणि माझ्या पुढच्या पिढीला देखील ती आशाच असेल..
तोच माझा तिच्या चिरतरूण आवाजाला सलाम असेल.

चिनूक्स,
मस्तच. अप्रतिम. दुसरा शब्दच नाही.
सगळ्यांचेच ऑडीओ मस्त. मला आनंद मोडक आणि वीणाताईंचे भाग सगळ्यात जास्त आवडले ऐकायला.
आशाताईंना ७५ व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

व्वाह !! चिनूक्स !! काय सुरेख मेजवानी दिलीस मित्रा !!

आशाताईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !!

चिन्मय क्या बात है!

आशा तईंचे फोटो पण ठेवणीतले आहेत, त्यांच्या सारखेच एकदम हसरे-खट्याळ Happy

सुरेख .. चिनूक्ष, छानच!

आशाताईंना सलाम माझाही!

एकच विनंती, आनंद मोडकांच्या अनुभव कथनात background ला चालू असलेल्या गाण्यामुळे थोडं diversion होतंय .. तर त्या बाबतीत काही करता येईल का?

किती सुंदर आहेत सगळ्यांची मनोगतं! घरी आल्याबरोबर ऐकली...
गजानन, Happy मी सुद्धा ही क्लिप गेल्या वर्षभरात पन्नासेक वेळा तरी पाहिली असेल!

Pages