सलाम आशाताई!!

Submitted by चिनूक्स on 7 September, 2008 - 19:54


asha3.jpg

गेली साठ वर्षं आशाताईंच्या स्वरानं आपल्याला भुरळ घातली आहे.
थेट मनाशी संवाद साधणारा तो आवाज...
अति कोमल. पल्लेदार. लवचिक. आर्त. अवखळ. राजवर्खी. नितळ. आरस्पानी. अद्भुत. मानुष आणि दैवीही...

हा आवाज कधी झेपावत्या प्रमत्त प्रपातांची आठवण करून देतो, तर कधी त्यात तळपत्या समशेरीची फेक असते.
तो कधी उत्तेजित करतो, तर कधी क्लांत मनावर फुंकर घालतो.
धनुष्याचा टणत्कार, शंखांचा उद्घोष असं सारं त्या आवाजात असतं.
हा आवाज पुरतं झपाटून टाकतो. वेड लावतो.

आशाताईंची स्वरांवरील हुकूमत जबरदस्त आहे. एखाद्या पदाभिषिक्त सम्राज्ञीसारख्या आशाताई त्यावर स्वामित्व गाजवतात.

'हे गीत जीवनाचे'मधील 'मुख तेरो कारो'च्या लपेटीदार ताना असोत, किंवा 'झाले युवतिमना दारुण' असो, आशाताईंचे सूर निव्वळ अचंबित करून सोडतात. 'समय ओ धीरे चलो' आणि 'कर ले प्यार कर ले', 'मेरा कुछ सामान' आणि 'मेरा नाम है शबनम', 'झुमका गीरा रे' आणि 'जीवलगा'... 'पाण्या तुझा रंग कसा?', हे आशाताईंच्या बाबतीत शंभर टक्के खरं ठरतं.

आपल्या आयुष्यात अनेक बर्‍यावाईट प्रसंगी या आवाजानं साथ दिली आहे. इतकी की आशाताईंची गाणी ऐकणं, ही आपल्या अनेकांची भावनिक गरज आहे.

आज आशाताईंचा जन्मदिन. सर्व मायबोलीकरांतर्फे आशाताईंना हार्दिक शुभेच्छा!!!


She's the one that keeps the dream alive,
From the morning, past the evening, till the end of the light.

Brimful of Asha on the forty-five.
Well, it's a brimful of Asha on the forty-five.


asha2.jpg

---------------------------------------------------------------

श्री. आनंद मोडक हे एक प्रतिभावान संगीतकार. 'घाशीराम कोतवाल', 'महानिर्वाण', 'तीन पैशाचा तमाशा' यांसारखी नाटकं असोत किंवा '२२ जून १८९७', 'कळत नकळत', 'चौकट राजा', 'दोघी', 'आई', 'नशीबवान', 'एक होता विदुषक', 'तू तिथं मी', 'गाभारा', 'मुक्ता', 'लपंडाव', 'थांग' हे चित्रपट, नवनवीन प्रयोग, सुंदर चाली, उत्कृष्ट वाद्यमेळ यांमुळे त्यांचं संगीत कायमच नावाजलं गेलं आहे. 'निवडक पुलं' या मालिकेसाठी त्यांनी तयार केलेली धून तर पुलंच्या ध्वनिफितींबरोबर घराघरांत पोहोचली. 'साजणवेळा', 'ओंजळीत स्वर तुझेच' हे सांगितीक प्रयोगही बरेच गाजले.


img1.jpg

आशाताईंनी श्री. आनंद मोडक यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली अनेक चित्रपटांत गायन केले आहे. आशाताईंचा आवाज, आणि आनंद मोडक यांच्या अप्रतिम चाली, अशी ही सुरेख गाणी आज दशकभरानंतरसुद्धा अतिशय ताजी वाटतात.
आशाताईंचे निस्सीम भक्त, आणि नंतर संगीतदिग्दर्शक, अशा दुहेरी भूमिकांत आलेले अनुभव सांगत आहेत, श्री. आनंद मोडक.. जोडीला आशाताईंची सुरेख गाणी..

(या लेखातला बराचसा भाग श्रवणीय (mp3) असून तो ऐकण्यासाठी आपल्या संगणकावर आणि न्याहाळकावर Flash plugin असणे आवश्यक आहे)



श्री. आनंद मोडक




---------------------------------------------------------------

श्री. गो. नी. दांडेकर, अर्थात गोनीदा, आणि आशाताई यांचं अतिशय सुंदर मैत्र होतं. सुरुवातीला 'गोनीदांच्या साहित्याची एक चाहती' असलेल्या आशाताई आणि गोनीदा, एकमेकांचे 'friend, philosopher, guide' होते. 'जैत रे जैत' या कादंबरीतील गोनीदांनी चितारलेली 'चिंधी' ही मनस्वी आशाताईंचंच दुसरं रूप आहे.


img2.jpg

अतिशय तरल, सुंदर असलेल्या या नात्याविषयी 'मर्मबंधातली ठेव' या लेखात गोनीदांनी लिहिलं आहे. गोनीदांच्या कन्या, डॉ. वीणा देव यांनाही आशाताईंचं हे मैत्र लाभलं. 'परतोनि पाहे' या पुस्तकात त्यांनी आशाताईंवर एक अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. त्याच लेखाचं वीणाताईंनी केलेलं वाचन...






---------------------------------------------------------------

आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त श्री. शंकर महादेवन यांनी दिलेल्या शुभेच्छा..





सुप्रसिद्ध पार्श्वगायिका साधना सरगम यांनी दिलेल्या शुभेच्छा..




श्री. सुधीर गाडगीळ यांनी दिलेल्या शुभेच्छा..





---------------------------------------------------------------

'कळत नकळत' व 'एक होता विदुषक' या चित्रपटांतील गाणी वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती स्मिता तळवलकर (अस्मिता चित्र) व श्री. सुरेश अलुरकर (अलुरकर म्युझिक हाऊस, पुणे) यांचे मनःपूर्वक आभार.

---------------------------------------------------------------
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Admin,
धन्यवाद!

chinoox,
अप्रतिम रे... सर्व क्लिप्स ऐकल्या पण मोडक सरान्च्या क्लिप्स केवळ मेजवानी.

चिनुक्स, खुप खुप धन्यवाद. मस्तच आहे सगळे.
आशाताईंना वाठदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

चिनुक्स सुन्दर नजराण्या बद्दल धन्यवाद.
आशाताईंना माझाही सलाम!!

--
धन्यवाद,
kadamcd@gmail.com

केवळ अ.प्र.ति.म. रे चिनू. किती धन्यवाद द्यावेत तुला इतक्या सुरेख कामगिरीबद्दल! जियो!!!

चिनू खूप खूप खूपच धन्यवाद. सर्व क्लिप्स श्रवणीय आहेत. पुन्हा पुन्हा ऐकण्याजोग्या..

चिनू, धन्यवाद शब्द फारच अपुरा वाटायला लागला. Happy

आज ऐकल्या सगळ्या क्लिप्स.. खूप छान जमवलस. एकदम सुरेख. आनंद मोडक आणि वीणाताई, दोघंही किती आत्मीयतेने बोलले आहेत! शुभेच्छाही छान.

वाह !! चिन्मय, अतिशय छान ! आजची संध्याकाळ आनंदात गेली ..... खूप धन्यवाद !

चिनूक्स : सुरेख ........... Happy

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गणपती बाप्पा मोरया .......... Happy

चिनू. आभार मानावेत तरी किती अन कसे, अशी अवस्था करून ठेवलीस, रे. क्ष म्हणतोय तशी 'त्या' एक जाणीव आहेत.... त्यामुळे थोड्याशा शब्दातीतही. गूळही गोडच अन साखरही. मग गोडी वेगळी कशी वर्णायची?.... ती चाखूनच कळते Happy
आशाताईंना मनापासून शुभेच्छा!
आशाताई, ह्या प्रतिक्रिया वाचत असाल तर एक मागणं आहे..... तुम्ही आत्मचरित्र लिहावं. एक अतिशय घडा-मोडिंचं आणि तरीही मनस्वी आयुष्य जगलेला तुमच्यासारखा कलाकार.... कधी आयुष्याच्या हातात छिन्नी देतो आणि कधी कलेच्या हातात.... कधी आयुष्यं कला घडवते अन कधी कला आयुष्य? हे "आत्मगान" तुम्ही करावं अशी खूप इच्छा आहे..... तुम्हीच पेलू शकाल तो स्वर!
माझी ही इच्छा नक्की कशी तुमच्यापर्यंत पोचवावी..... ते न कळे! पण पोचावी ही इश्वरचरणी प्रार्थना.

फारच सुंदर........

अप्रतिम! आज या क्लिप्स खूप आनंद देऊन गेल्या. महिन्याभरात आशाताई दोनदा भेटल्या! Happy
आशाताईंचा कार्यक्रम १५ ऑगस्टला झूरिकला झाला, तो अनुभव मंत्रमुग्ध करणारा होताच.. त्यांचं स्टेजवरील भारुन टाकणारं अस्तित्व, त्याची सुरांची व स्वरांची लयलूट... स्वर्गीय!

कार्यक्रमानंतर त्यांना जाऊन भेटावसं वाटत होतं. परत वाटलं... काय बोलू मी त्यांच्याशी? जसं विणाताई म्हणाल्यात तसं.... आजपर्यंत लाखो लोक त्यांना सांगून गेले असतील त्याच्या गाण्यांबद्दल! त्यांचं व माझं जग संपूर्ण भिन्न, तरीही त्या माझं भावविश्व कसं व्यापून आहेत हे मी तिथल्या गर्दीत कसं सांगू शकणार होते?
नाच रे मोरा, चलो चलें माँ, इक परदेशी मेरा दिल ले गया, आंखों में क्या जी?, अच्छा जी मैं हारी, वो हंस के मिले हम को, यही वो जगह है यही वो फिजाएं, अब के बरस भेज... ते...राधा कैसे न जले... या असंख्य गाण्यांबद्दल दोन मिनिटात कसं बोलता येईल? तशीच परत आले. चार दिवस आशाताईंचे प्रत्यक्ष ऐकलेले स्वर मनात उमटत होते!

आशाताईंना त्यांच्या वाढदिवसाबद्दल अनेक शुभेच्छा! तुम्ही अशाच गात रहा.....

चिनूक्स, मस्त आहे लेख.

क्ष तुझी प्रतिक्रियाही छान.

सगळ्यांचीच मनोगते ऐकायला खूप छान वाटली. वीणाताईंचे वाचन ऐकायला तर फारच मजा आली!

चिनु , काय लिहू तु घेतलेल्या ह्या efforts बद्दल. निव्वळ अप्रतीम. अगदी शेवटी आज जागून पाहीली. आंनद मोडक ह्यांच्या पण गोष्टी खूप आवडीने एकल्या.
आता आशांजी बद्दल.... अगदी हज्जर वेळा त्यांची गाणी एकली आहेत.खरे तर वीणाताईनी म्हटल्याप्रमाणे प्रेम म्हणजे काय हे ह्या गाण्यातून कळले किंवा त्याची चाहूल ह्याच गाण्यातून कळली वयात आल्यानंतर. केव्हा तरी पहाटे,फुलले रे क्षण माझे, मलमली तारुण्य माझे,चांदण्यात फिरताना,माझा होशील का.... नी बरीच.खरे तर काही इतकी romantic जुनी गाणी मला माझ्या आईमुळे पहील्यांदा पोहचली नी सगळे तीचे संग्रह मी चक्क चोरून घेवून आले इथे(तीला न सांगता). आता तर youtube मुळे इथे US ला बरीचशी मेजवानी दीलीय. ४-५ वर्षापुर्वी काही जुनी गाणी खूप कष्ट घेवून मिळत.

आणि जसे वरती कोणीतरी म्हटले आहे ना ओळख नसताना देखील त्या ओळखीच्या वाटतात............

चिनु किती छान.
सिम्प्ली ग्रेट.
अगदी क्रुतक्रुत्य झालो बाबा.
अमोल

चिन्मय,

अतिशय सुरेख! फार मनापासून केलंयस सर्व.. रेकॉर्डिंग पण सुंदर आहे. अगदी रेडिओ ऐकल्याचा अनुभव आहे.. खूप खूप धन्यवाद!

हे तू नक्की कसं केलंस याविषयी खूप कुतूहल वाटलं. म्हणजे या सर्व लोकांशी संपर्क करून भेटून मुलाखती घेतल्यास की स्टुडिओत बोलावून रेकॉर्डिंग केलंस की कसं?

धन्यवाद मंदार.
स्टुडीओत रेकॉर्डींग करणं मला परवडण्यासारखं नाही.
श्री. आनंद मोडक, डॉ. वीणा देव, सुधीर गाडगीळ व शंकर महादेवन यांच्या घरी जाऊन रेकॉर्ड केलं. साधना सरगम यांचं रेकॉर्डींग फोनवर केलं.

आज "युवतिमना दारुण" ऐकत असताना ह्या लेखाची आठवण आली आणि दहा वर्षांपूर्वीचा लेख वर काढावासा वाटला. आशाबाईंना हार्दिक शुभेच्छा! आणि धन्यवाद चिनूक्स!

Pages