तिरंगा पनीर कोफ्ता आणि लच्छा पराठा..

Submitted by सुलेखा on 7 April, 2012 - 08:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन दिवसापुर्वी माझ्या राजाच्या शालेय समुहाला " आंतरराज्य शालेय देशभक्तिपर समुहगान स्पर्धेत "प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले.आधी शालेय नंतर आंतरराज्य स्पर्धा असे सेमीफायनल व फायनल चे स्वरुप होते.स्पर्धा पुण्याला होती.४ गायक-३ वादक आणि संगीत शिक्षिका असे ८ जण एकुण होते.मुख्य गायक राजा च होता.बक्षिस रुपात पुर्ण समुहाला एक मोठी शिल्ड,रोख पारितोषिक,व प्रत्येक गायकाला एक- एक स्मृतिचिन्ह मिळाले.या यशामुळे सगळेच खुप आनंदात होते. एकुण १४ तासाच्या बसच्या प्रवासानंतर दमलेला राजा घरी परतला.सपाटुन भूक लागली होती .स्वारी आवडता मेनु अन त्यात तिरंगा पाहुनच खुष झालीं. नेहमीसारखं साधं-साधं नको,हॉटेलसारखं हवं पण तिखट्ट जहाळही नको.या त्याच्या अटी-तटीत बसणारे घरगुती कोफ्ते आणि त्याला आवडणारे लच्छेदार पराठे पहा बरं तुम्हाला आवडतात कां ?
तिरंगी कोफ्त्याचे साहित्यः--
१५० ग्रॅम पनीर.
२बटाटे.[प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवुन २-२ असे एकुण ४ मिनिटे मावे त ठेवुन भाजुन त्यावरील साले सोलुन घ्यावे.]
१ गाजर.[वरील प्रमाणेच १ मिनिट मावेत ठेवुन घ्यावे]
२ चमचे कोथिंबीर धुवुन ,त्यातले पाणी टिपुन चिरलेली..
३ चमचे कॉर्नफ्लोअर.
६ काजु बारीक तुकडे करुन..
चवीनुसार मीठ व एक चिमुट मिरेपुड.
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली..
आता ग्रेव्ही साठीचे साहित्यः--
grevhee-tirangaa paneer kofta_0.JPG
१ मध्यम कांदा व टोमॅटो बारीक चिरलेला.
१ ईंच आले किसलेले.
१ हिरवी मिरची .बारीक चिरुन.
१ लसणीची कळी बारीक चिरुन.
२ टेबल्स्पुन तेल फोडणीसाठी.
ग्रेव्हीसाठी गरम मसाल्याचे साहित्य-
४ लवंगा,४ वेलची,४ मिरे,अर्धा चमचा जिरे
१/४ तमालपत्राचे पान.
१ ईंच दालचीनी.
१/४ चमचा जायफळ पुड.
१ चमचा धणेपुड.
१/२ चमचा जिरेपुड.
१/४ चमचा तिखट.
१०-१२ काजु पाण्यात १५-२० मिनिटे भिजवुन त्याची अर्धा कप दुधात मिक्सरमधे पेस्ट करुन घेणे .
दुधावरची साय अर्धा कप दुधात मिक्सरमधे फिरवुन घेणे.[घरगुती क्रीम ]
१ कप दुध.
लच्छा पराठासाठी-
१ १/२ कप कणिक पाव चमचा मीठ व अर्धा चमचा तुपाचे मोहन घालुन नेहमीसारखी भिजवावी.
१/२ वाटी तुप पराठा तळण्यासाठी.

क्रमवार पाककृती: 

सर्वात आधी कोफ्ते नंतर ग्रेव्ही त्यानंतर पराठे या क्रमाने करायचे आहे.
पनीर,बटाटे,गाजर किसुन वेगवेगळे ठेवावे.
२ चमचे पनीर वेगळे ठेवावे.
कोथिंबीर धुवुन्,त्यातले पाणी टिपुन्,चिरुन घेणे..
१ चमचा पनीर व अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर हे दोनही जिन्नस थोडे थोडे गाजर व कोथिंबीरीवर घालावे त्यात कणीभर मीठ व किंचित मिरेपुड घालुन गाजर व कोथिंबीरीचे दोन वेगवेगळे गोळे तयार करावे.
पनीर व बटाट्याचा किस एकत्र करुन त्यावर २ चमचे कॉर्नफ्लोअर,मीठ,मिरेपुड व हिरवी मिरची घालुन एक मोठा गोळा तयार करावा .
कढईत कोफ्ते तळायला तेल मंद गॅसवर तापायला ठेवावे.
कोथिंबीर व गाजराच्या मिश्रणाचे"तिरंगा साठी" प्रत्येकी २ -२ गोळे तयार करावे..
गाजराच्या गोळ्याची खोलगटवाटी तयार करुन त्यात कोथिंबीरीचा गोळा ठेवुन गोल गोळा तयार करावा..
हा गोळा ,पनीर+बटाट्याचा एक मोठा गोळा घेवुन त्याची खोलगट वाटी करुन त्यात भरावा.
असे एकुण २ तिरंगे तयार करायचे आहेत्.उरलेल्या पनीर्+बटाटयाच्या मिश्रणाचे गोल कोफ्ते करा.साधारण ६-७ कोफ्ते तयार होतात.
आता उरलेले अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर एका लहान प्लेट मधे घालुन त्यावर हा प्रत्येक गोळा घोळवुन घ्यावा .त्यानंतर तो कढईत तळण्यासाठी टाकावा. असे केल्याने गोळे कढईतील तेलात टाकल्यावर फुटणार नाहीत .हे कोफ्ते मंद आचेवर सोनेरी रंगावर तळुन कागदावर जास्तीचे तेल टिपण्यासाठी काढुन ठेवावे..
तिरंगे कोफ्ते थंड झाले कि सुरीने मधोमध कापुन २ भाग तयार करा.तिरंग्याचे सुंदर रंग दिसतील.
आता ग्रेव्ही करायची आहे--
कढईत एक टे.स्पु.तेल गरम करावे त्यात जिरे,मिरे,लवंगा,तमालपत्र्,दालचिनी, हे गरम मसाल्याचे सामान घालावे .कांदा टाकुन तो परतला कि टोंमॅटो घालावा.परतावे हिरवे मिरची.तिखट घालावे. मिश्रण एकजीव झाले कि त्यात १ १/२ कप पाणी घालुन परतावे .थोडे थंड झाले कि मिक्सरमधुन याची पेस्ट करुन घ्यावी..
पुन्हा १ टे,स्पुन तेल गरम करुन त्यात ही ग्रेव्ही परतावी.उकळी आली कि त्यात १ कप दुध्,काजुची पेस्ट,जायफळ पुड व अर्धे क्रिम घालुन ढवळावे.पुन्हा एक छान उकळी येवु द्यावी. छान क्रिमी/पांढरट रंगाची ग्रेव्ही तयार झाली..
लच्छा पराठा--
मंद गॅसवर तवा तापत ठेवा.
भिजवलेल्या कणकेचा पोळीसाठी घेतो तितका गोळा घेवुन एक पोळी लाटा.त्यावर सगळीकडे थोडेसे तुप लावुन घ्या.त्यावर थोडीशी पिठी भुरभुरवुन घ्या.
पोळीच्या वरच्या टोकापासुन अर्ध्या ईंचाची उलट-सुलट पंख्यासारखी घडी शेवटापर्यंत घालावी.
एक लांब पट्टी तयार होईल.
या पट्टीचा घडी घातलेला भाग वर ठेवुन एका टोकापासुन दुसर्‍या टोकापर्यंत जिलबीसारखी गोल गुंडाळी करत आणणे.आता पिठी लावुन ही गुंडाळी लाटायची आहे.फक्त लाटताना वरची बाजु कायम वरच ठेवायची आहे.तरच त्याचे लच्छे/पापुद्रे सुटतील.
paratha  teen bhaag.JPG
लाटलेला पराठा व गोल गुंडाळी अशी दिसते.
paratha 003.jpg
लाटलेला पराठा तव्यावर मंद आचेवर दोन्हीकडुन तुप सोडुन गुलाबीसर रंगावर भाजुन घ्यावा.
असे सगळे पराठे करावे.
तिरंगी कोफ्ता प्लेट मधे वाढला त्यावर चमच्याने क्रीम पसरले .गरमागरम लच्छा पराठा वाढला. कांदा,हिरवी पात व गाजर चे सॅलड वाढले.स्पर्धेतले देशभक्तीपर गाणे गुणगुणत राजा जेवायला बसला .तिरंगा पाहुन स्वारी खुपच खुष झाली .मनापासुन दाद देत स्वारी पोटभर जेवली.माझ्याही मेहनतीचं सार्थक झालं.
पहा बरं.. पानातला मेनु कसा दिसतोय ते..lachchaa paraatha.JPGlachchaa paraatha.JPG

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी..
अधिक टिपा: 

पनीर,बटाटा,गाजर्,कोथिंबीरीत पाणी अजिबात नसावे म्हणुनच ते कापडावर टिपुन घ्यावे.पाणी असल्यास कोफ्ता तेलात तळताना सुटेल.
क्रिम ऐवजी दुधावरची साय व थोडे दुध घेतले आहे.पनीर सोडल्यास बाकी वस्तु घरातल्याच नेहमीच्या वापरातल्या आहेत.
तिखट,मिरचीचे प्रंमाण आवडीनुसार वाढवावे.
कोफ्ते तळायला फार तेल लागत नाही.
नियोजनबद्ध केल्यास पाउण तासात पुर्ण मेनु तयार होतो.

माहितीचा स्रोत: 
माझी पंजाबी मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे पाकृ. पराठ्यांप्रमाणे कोफ्त्याचे ही स्टेप बाय स्टेप फोटो हवे होते.

छानच.

सस्मित,
कोफ्ता करणे कठिण नाही. पुरणपोळीचे पुरण जसे भरतो तसेच पण एकात एक दोनदा भरायचे आहे [जर तिरंगी करायचे असतील तरच .एरवी पनीर बटाटा ,कॉर्नफ्लोअर मिश्रणाचा गोल /लांबट गोळाच करायचा आहे इतकेच्.]बाकी ग्रेव्ही कोणत्याही रसभाजीसाठी करतात तशीच फक्त थोडे काजु ,दुध्,साय घालुन करायची.कांदा-लसुण न घालताही करता येते .त्याऐवजी ओले/सुके खोबरे व थोडेसे तीळाचे कुट वापरायचे.तयार गरम मसाला ही वापरता येतो.

सुलेखा.. लच्छा पराठा काय दिस्तोय..
मी पूर्वी लाटलेल्या पोळीच्या बारीक पट्ट्या कापून गुंडाळत असे.. आता तुझ्या पद्धतीचा करत जाईन..
सुपर्ब फोटो !!! Happy

सुलेखा
अगं काय काय करायला लावते......परवा बाळ कैर्‍या आणायला पळवलंस!
आता पनीर!
अगं इतक्या चवदार रेसिपीज टाकतेस की लग्गेच कराव्याश्या वाटतात!
हो.......आणि राजाचं अभिनंदन!

सुलेखाताई, ही पराठ्याची जिलबीसारखी गुंडाळी घातल्यावर लाटताना ती गुंडाळी जिथे संपते तिथे उघडत नाही कां? तुम्ही लाटलेल्या पराठ्यात तर असं दिसत नाहीये कुठे.

आडो, गुंडाळी केली कि जिथे संपते ते टोक जवळच्या पट्टीला दाबुन घ्यायचे म्हणजे पराठा लाटताना सुटणार नाही. अजुन एक ,पिठी लावुन लाटताना वर असलेली बाजु कायम वरच ठेवायची आहे.कारण वरच्या भागातले पापुद्रे वेगवेगळे दिसतात.

वा! मस्त रेसिपी आणि फोटो. लच्छा पराठा नक्की करून बघणार.
तुमच्या राजाचे अभिनंदन Happy
स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा!

जबरी फोटो आहेत. फार खटपट नसल्याने पराठा सहज करण्यासारखा आहे. कोफ्ता करी मात्र मुहुर्त बघून करावी लागणार Happy

सुंदर फोटो सुलेखा!! पराठा नक्की करुन बघणार. स्टेपबाय्स्टेप फोटो टाकल्याने फारच सोपे वाटत आहेत. धन्यवाद Happy

आज लच्छा पराठा केला होता. बर्‍ञापैकी जमला. Happy

आम्ही एस एन डी टीला असताना आमच्या बिल्डिंगमधले कँटीन सोडून फॅशन डीझाईनवाल्या बिल्डिंगमधे एका सरदारजीच्या कँटीनमधे जायचो. एक तर ते आमच्या कँटीनपेक्षा स्वस्त होतं. शिवाय तिथे मेनू लिमिटेड असायचा पण एकदम चविष्ट, लच्छा पराठा आणि एखादी पंजाबी ग्रेव्ही वर छास घेतलं की नंतरच्या लेक्चरला पेंगायची गॅरंटीच. Proud

सुलेखाताई, तुमच्या राजाला अभिनंदन सांगा. Happy

कोफ्ता इतका निगुतीचा ,वेळखाऊ आहे का? >>> बाकीच्यांचं माहिती नाही पण बेसिक फोडणी शिवाय आणखी काहीही वाटण-घाटण-चिराचिरी-कुटाकुटी असली की माझा उत्साह ओसरतो बहुतेक वेळा. स्वाती आंबोळेने टाकलेल्या कृतीने उंधियो करायला अजून मुहुर्त शोधते आहे Wink

सही आहे रेसिपी. एकदम तोंपासु!!
सिंडरेला... पण करुन बघच एकदा तो उंधियो, एकदम टेस्टी होतो!!!

नंदिनी,लच्छा पराठा हा पंजाबी-सरदारांकडे नाश्त्याला बनवतात .त्यांचा "मख्खन वाला" असतो.आणि साइझ -जाडी दोन्ही भरपुर असते.करारा भाजलेला असतो.सोबत कालवण ही जशास तसं असते.थोडक्यात नाश्ता "भरपेट". मग जेवण खुपच उशिरा.

वत्सला ,सामी प्रित,ज्ञाती,सृष्टी -तुमचे प्रतिसाद खूपच आवडले.

मी दोन वेळा ट्राय केला लच्छा पराठा. पण तुमचा दिसतोय तसा लच्छेदार नाही झाला. पहिल्यांदा पालक पराठा केला. डार्क ग्रीन रंगामुळे लेयर्स दिसत नाहीत असं वाटलं. पण साध्या कणकेचा केल्यावर सुद्धा तेच Sad

पोळी लाटल्यावर तूप लावणे आणि पीठ भुरभुरणे ह्या दोन पायर्‍या गाळल्यामुळे का ? की फार पातळ लाटल्यामुळे ? घड्या "जपानी पंख्या"साठी घालतो तशाच घालायच्या ना ?

सिंडरेला,
पोळी अगदी पातळ लाटायची नाही कारण अगदी पातळ लाटली तर गुंडाळी करुन पुन्हा लाटताना त्याचे लेयर्स लाटले जावुन एकजीव होतील्.व भाजल्यावर एकसारखीच पोळी दिसेल्.तेव्हा पोळी थोडी शी जाड लाटायची.तसेच या लाटलेल्या पोळीवर तेलाचे/तुपाचे बोट फिरवुन त्यावर पिठी भुरभुरवायची व जपानी पंख्यासारख्या उलट -सुलट [एकाच दिशेने नाही] घड्या घालुन घट्ट/एकसंध रोल करायचा आहे.तेल व पिठीमुळेच हे वेगवेगळे पापुद्रे सुटतील्.तुला तेल/तुप नको असेल तर फक्त एकच बोट तेलात डुबवुन सगळीकडे लाव पण पिठी मात्र छान घाल .पोळी दोन्हीकडुन तशीच भाजुन घे.[न तळता.]भाजुन झाली कि ति पोळपोटावर उभी धरुन हलकेसे खाली दाबायची कि पापुद्रे सुटलेले दिसतील. मी या पोळीला तुपाचे एक बोट च फिरवले आहे.पण पिठीमुळेच लेयर सुटलेले दिसत आहेत.

सिंडरेला म्हणतेय तसा लच्छेदार माझाही नाही झाला.म्हणजे खाताना जाणवलं तरी नाही. फक्त खुसखुशीत लागत होता एवढं नक्की. आज फोटो टाकायचं जमवतेच.

आडो ,वरुन पिठी चांगली /सगळीकडे लागेल अशी घाला. पिठीमुळेच पापुद्रे सुटतील्.पुडाचे चिरोटे करताना आपण साटा लावतो ना ,तेव्हाच पापुद्रे सुटतात्.पण इथे तुप्/तेल तितकं जास्त नको म्हणुन तेलात भिजलेले एक बोट फिरवायचे .तेवढे पुरते.पिठी जास्त घाला .नंतर पंख्याची वळकटी ची गोल-गोल ,घट्ट गुंडाळी करा.पिठी लावुन लाटा.वर असलेली बाजु वरच ठेवा.[कारण बाजु पलटली तर त्याचे पापुद्रे दाबले जातील]
थोडेसे विषयाला धरुन अवांतर :-तेलाचा वापर न करता दुपोडी पोळी करायची असेल तर अशी करुन पहा--
फुलके करायचे नसतील ,दुपोड्या असतील तेव्हा लांबट लाटुन मधुन चिमटीने दाबायचे म्हणजे जोडलेले दोन गोल तयार होतील.या दोनही गोलावर पिठी पसरायची .व एका गोलावर दुसरा गोल दाबायचा मग पोळी नेहमीप्रमाणे लाटायची.व तव्यावर भाजायची .अशी पोळी फुगते व मऊ ही रहाते.

मंदार--खुप खुप धन्यवाद..

Pages