तिरंगा पनीर कोफ्ता आणि लच्छा पराठा..

Submitted by सुलेखा on 7 April, 2012 - 08:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन दिवसापुर्वी माझ्या राजाच्या शालेय समुहाला " आंतरराज्य शालेय देशभक्तिपर समुहगान स्पर्धेत "प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले.आधी शालेय नंतर आंतरराज्य स्पर्धा असे सेमीफायनल व फायनल चे स्वरुप होते.स्पर्धा पुण्याला होती.४ गायक-३ वादक आणि संगीत शिक्षिका असे ८ जण एकुण होते.मुख्य गायक राजा च होता.बक्षिस रुपात पुर्ण समुहाला एक मोठी शिल्ड,रोख पारितोषिक,व प्रत्येक गायकाला एक- एक स्मृतिचिन्ह मिळाले.या यशामुळे सगळेच खुप आनंदात होते. एकुण १४ तासाच्या बसच्या प्रवासानंतर दमलेला राजा घरी परतला.सपाटुन भूक लागली होती .स्वारी आवडता मेनु अन त्यात तिरंगा पाहुनच खुष झालीं. नेहमीसारखं साधं-साधं नको,हॉटेलसारखं हवं पण तिखट्ट जहाळही नको.या त्याच्या अटी-तटीत बसणारे घरगुती कोफ्ते आणि त्याला आवडणारे लच्छेदार पराठे पहा बरं तुम्हाला आवडतात कां ?
तिरंगी कोफ्त्याचे साहित्यः--
१५० ग्रॅम पनीर.
२बटाटे.[प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवुन २-२ असे एकुण ४ मिनिटे मावे त ठेवुन भाजुन त्यावरील साले सोलुन घ्यावे.]
१ गाजर.[वरील प्रमाणेच १ मिनिट मावेत ठेवुन घ्यावे]
२ चमचे कोथिंबीर धुवुन ,त्यातले पाणी टिपुन चिरलेली..
३ चमचे कॉर्नफ्लोअर.
६ काजु बारीक तुकडे करुन..
चवीनुसार मीठ व एक चिमुट मिरेपुड.
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली..
आता ग्रेव्ही साठीचे साहित्यः--
grevhee-tirangaa paneer kofta_0.JPG
१ मध्यम कांदा व टोमॅटो बारीक चिरलेला.
१ ईंच आले किसलेले.
१ हिरवी मिरची .बारीक चिरुन.
१ लसणीची कळी बारीक चिरुन.
२ टेबल्स्पुन तेल फोडणीसाठी.
ग्रेव्हीसाठी गरम मसाल्याचे साहित्य-
४ लवंगा,४ वेलची,४ मिरे,अर्धा चमचा जिरे
१/४ तमालपत्राचे पान.
१ ईंच दालचीनी.
१/४ चमचा जायफळ पुड.
१ चमचा धणेपुड.
१/२ चमचा जिरेपुड.
१/४ चमचा तिखट.
१०-१२ काजु पाण्यात १५-२० मिनिटे भिजवुन त्याची अर्धा कप दुधात मिक्सरमधे पेस्ट करुन घेणे .
दुधावरची साय अर्धा कप दुधात मिक्सरमधे फिरवुन घेणे.[घरगुती क्रीम ]
१ कप दुध.
लच्छा पराठासाठी-
१ १/२ कप कणिक पाव चमचा मीठ व अर्धा चमचा तुपाचे मोहन घालुन नेहमीसारखी भिजवावी.
१/२ वाटी तुप पराठा तळण्यासाठी.

क्रमवार पाककृती: 

सर्वात आधी कोफ्ते नंतर ग्रेव्ही त्यानंतर पराठे या क्रमाने करायचे आहे.
पनीर,बटाटे,गाजर किसुन वेगवेगळे ठेवावे.
२ चमचे पनीर वेगळे ठेवावे.
कोथिंबीर धुवुन्,त्यातले पाणी टिपुन्,चिरुन घेणे..
१ चमचा पनीर व अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर हे दोनही जिन्नस थोडे थोडे गाजर व कोथिंबीरीवर घालावे त्यात कणीभर मीठ व किंचित मिरेपुड घालुन गाजर व कोथिंबीरीचे दोन वेगवेगळे गोळे तयार करावे.
पनीर व बटाट्याचा किस एकत्र करुन त्यावर २ चमचे कॉर्नफ्लोअर,मीठ,मिरेपुड व हिरवी मिरची घालुन एक मोठा गोळा तयार करावा .
कढईत कोफ्ते तळायला तेल मंद गॅसवर तापायला ठेवावे.
कोथिंबीर व गाजराच्या मिश्रणाचे"तिरंगा साठी" प्रत्येकी २ -२ गोळे तयार करावे..
गाजराच्या गोळ्याची खोलगटवाटी तयार करुन त्यात कोथिंबीरीचा गोळा ठेवुन गोल गोळा तयार करावा..
हा गोळा ,पनीर+बटाट्याचा एक मोठा गोळा घेवुन त्याची खोलगट वाटी करुन त्यात भरावा.
असे एकुण २ तिरंगे तयार करायचे आहेत्.उरलेल्या पनीर्+बटाटयाच्या मिश्रणाचे गोल कोफ्ते करा.साधारण ६-७ कोफ्ते तयार होतात.
आता उरलेले अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर एका लहान प्लेट मधे घालुन त्यावर हा प्रत्येक गोळा घोळवुन घ्यावा .त्यानंतर तो कढईत तळण्यासाठी टाकावा. असे केल्याने गोळे कढईतील तेलात टाकल्यावर फुटणार नाहीत .हे कोफ्ते मंद आचेवर सोनेरी रंगावर तळुन कागदावर जास्तीचे तेल टिपण्यासाठी काढुन ठेवावे..
तिरंगे कोफ्ते थंड झाले कि सुरीने मधोमध कापुन २ भाग तयार करा.तिरंग्याचे सुंदर रंग दिसतील.
आता ग्रेव्ही करायची आहे--
कढईत एक टे.स्पु.तेल गरम करावे त्यात जिरे,मिरे,लवंगा,तमालपत्र्,दालचिनी, हे गरम मसाल्याचे सामान घालावे .कांदा टाकुन तो परतला कि टोंमॅटो घालावा.परतावे हिरवे मिरची.तिखट घालावे. मिश्रण एकजीव झाले कि त्यात १ १/२ कप पाणी घालुन परतावे .थोडे थंड झाले कि मिक्सरमधुन याची पेस्ट करुन घ्यावी..
पुन्हा १ टे,स्पुन तेल गरम करुन त्यात ही ग्रेव्ही परतावी.उकळी आली कि त्यात १ कप दुध्,काजुची पेस्ट,जायफळ पुड व अर्धे क्रिम घालुन ढवळावे.पुन्हा एक छान उकळी येवु द्यावी. छान क्रिमी/पांढरट रंगाची ग्रेव्ही तयार झाली..
लच्छा पराठा--
मंद गॅसवर तवा तापत ठेवा.
भिजवलेल्या कणकेचा पोळीसाठी घेतो तितका गोळा घेवुन एक पोळी लाटा.त्यावर सगळीकडे थोडेसे तुप लावुन घ्या.त्यावर थोडीशी पिठी भुरभुरवुन घ्या.
पोळीच्या वरच्या टोकापासुन अर्ध्या ईंचाची उलट-सुलट पंख्यासारखी घडी शेवटापर्यंत घालावी.
एक लांब पट्टी तयार होईल.
या पट्टीचा घडी घातलेला भाग वर ठेवुन एका टोकापासुन दुसर्‍या टोकापर्यंत जिलबीसारखी गोल गुंडाळी करत आणणे.आता पिठी लावुन ही गुंडाळी लाटायची आहे.फक्त लाटताना वरची बाजु कायम वरच ठेवायची आहे.तरच त्याचे लच्छे/पापुद्रे सुटतील.
paratha  teen bhaag.JPG
लाटलेला पराठा व गोल गुंडाळी अशी दिसते.
paratha 003.jpg
लाटलेला पराठा तव्यावर मंद आचेवर दोन्हीकडुन तुप सोडुन गुलाबीसर रंगावर भाजुन घ्यावा.
असे सगळे पराठे करावे.
तिरंगी कोफ्ता प्लेट मधे वाढला त्यावर चमच्याने क्रीम पसरले .गरमागरम लच्छा पराठा वाढला. कांदा,हिरवी पात व गाजर चे सॅलड वाढले.स्पर्धेतले देशभक्तीपर गाणे गुणगुणत राजा जेवायला बसला .तिरंगा पाहुन स्वारी खुपच खुष झाली .मनापासुन दाद देत स्वारी पोटभर जेवली.माझ्याही मेहनतीचं सार्थक झालं.
पहा बरं.. पानातला मेनु कसा दिसतोय ते..lachchaa paraatha.JPGlachchaa paraatha.JPG

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी..
अधिक टिपा: 

पनीर,बटाटा,गाजर्,कोथिंबीरीत पाणी अजिबात नसावे म्हणुनच ते कापडावर टिपुन घ्यावे.पाणी असल्यास कोफ्ता तेलात तळताना सुटेल.
क्रिम ऐवजी दुधावरची साय व थोडे दुध घेतले आहे.पनीर सोडल्यास बाकी वस्तु घरातल्याच नेहमीच्या वापरातल्या आहेत.
तिखट,मिरचीचे प्रंमाण आवडीनुसार वाढवावे.
कोफ्ते तळायला फार तेल लागत नाही.
नियोजनबद्ध केल्यास पाउण तासात पुर्ण मेनु तयार होतो.

माहितीचा स्रोत: 
माझी पंजाबी मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं पाककृती. फोटो पण सही आहेत! लवकरच करून बघणार. लाछा पराठा मैद्याचा नाही तर कणकेचाही इतका सुंदर बनतो हे बघितल्यावर आता नक्की करणार.

(कोफ्ताकरीतलेच रंग इतके सुंदर आहेत की त्यांच्यासाठी प्लेन आणि एकरंगी भांडं फोटोत चाललं असतं असं नाही का वाटत?)

Mastach !
Mrunmai is mhaning right Happy
White kinva black color chya dish madhe ekdam sahi disel.

Mastach !
Mrunmai is mhaning right Happy
White kinva black color chya dish madhe ekdam sahi disel.

वाचली रेसिपी. महान आहे. पराठ्यांचा फॅन करुन गुंडाळी करायची आहे त्या स्टेपपासून फोटो काढला असतात तर माझ्या नीट लक्षात आलं असतं.
आणखीन एक प्रश्नः कोफ्त्यांच्या साहित्यात तुम्ही कॉर्नफ्लोअर लिहिलं आहात पण कोफ्ते करतानाच्या स्टेपमध्ये ते वापरलेलं दिसलं नाही. ती स्टेप चुकून मिस झालीये का?
(एक सजेशनः इथे कोफ्त्यांचा फोटो काढताना पांढरी प्लेट वापरली असतीत तर फोटो आणखीन उठून दिसला असता)

मस्त रेसिपी. मलाही सायो म्हणतेय तसंच वाटतंय. लच्छा पराठ्यांच्या फॅन स्टेपपासून फोटो हवे होते.

सायो.कॉर्नफ्लोअर बद्दल लिहीले आहें..वाचताना ते माझाही लक्षात आले होते.पण इंटरनेट चा संपर्क तुटल्याने लिहीता येत नव्ह्ते..
आडो,सायो, लच्छापराठाच्या स्टेप्स टाकते.अगदी सोप्या आहेत.
तुम्हां सर्वांचे प्लेट बद्दलचे सजेशन आवडले..

अरे बापरे. फार सुरेख दिसतय सुलेखाताई.

खरं सांगु का मी तुमच्या काही पाककृती (विद्यार्थी कठिण मजकूर ऑप्शनला टाकतात त्याप्रमाणे) ऑप्शनला टाकते. इतका सुगरणपणा जमणे शक्य नाही. पण तुम्ही लिहील्यामुळे काही स्त्रिया किती निगुतीने आणि मेहनतीने स्वयंपाक करत असतील ते लक्षात येते नेहमी. Happy

तुमच्या घरच्यांना ते किती भाग्यवान आहेत ते माहित आहे ना? Happy

सुलेखा,आज मी दोन्ही करुन पाहिले.नवरोजी खूष झाले.लच्छा पराठा तर लई भारी.पराठा झाल्यावर तो जर दोन्ही कडेने प्रेस केला तर पापुद्रे छान सुटतात.

पराठा सही आहे, मला कळली त्याची कृती Happy धन्यवाद !
पण कोफ्ता म्हणजे वेळखाऊ काम, पाऊण तासात तर माझी प्रीलीमनरी तयारीच होईल.

वॉव!! झक्कास कृती आणि फोटोही मस्त... तोंडाला पाणी सुटले Happy
अगदी भरपूर वेळ हाताशी असेल आणि एखादा रॉयल मेनू करायचा असेल तेव्हा हे तिरंगी कोफ्ते नक्कीच करून बघणार. बाकी इतक्यात एखाद्या रविवारी कणकेचा लाच्छा पराठा नक्कीच करून पाहणार.

सर्वप्रथम तुमच्या राजा चे अभिनंदन! Happy

मस्त आहे पाकृ. थोडी खटपट वाटत्येय पण एंड रिझल्ट एकदम वॉव Happy
पराठ्यांचा फोटु भारीच! नक्की करुन बघणार.

लाजो,किती पटकन प्रतिसाद्.खुपच आवडलं मला..[पराठ्याचा दुसरा फोटो अगदी लहान झाला ,त्याच फोटोला चुकुन दोनदा मिनीमाइझ केले.पाहिल्यावर पुन्हा रि-साईझ्..या पराठ्यांपेक्षा कठिण..असो पण फोटो- प्रकरण जमले मला.]

Pages