समर्थ जगते आहे..!

Submitted by बागेश्री on 3 April, 2012 - 10:55

कोंदावेत श्वास जरा
घुसमटावे स्वतःशी,
साकळता अश्रू खारे
थोपवावे पापणीशी..

ओघळणारे ते दु:ख
अप्रुप काय तयांचे?
जपावेत ह्रदयाशी
सण करावेत त्यांचे!

चढवावेत मजले
जमवून क्षण दु:खी,
तटबंदी घडवावी
भक्कम, असली, पक्की!
पडावाच मग बंद
नवदु:खांचा हा भाता,
ताटकळावे दु:खांनी
मज पाहण्यास आता..!

येवो ते नष्ट करण्या
मी ही सावरले आहे..
इर्षा त्यांना, माझी वाटो
समर्थ जगते आहे!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान आहे.. मला फारसे कळत नाही ह्यातले..

चढवावेत मजले
जमवून क्षण दु:खी,
तटबंदी घडवावी
भक्कम, असली, पक्की!

हे आवडले... Happy

कोंडावेत, ओघळणारी ती दु:खे, साकळता ..... हे काही बदल करायला हवेत बहुधा Happy

बाकी नेहमीचंच..... नेहमीसारखंच Sad

इर्षा त्यांना, माझी वाटो
समर्थ जगते आहे! >>>>>>>>>>>>>>>>> हे छान आहे. Happy

तुमची कविता फॉर्म्युलात अडकत चाललीय का? वेदनांचे सण वाचल्याला फार दिवस झाले नाहीत. शेवटच्या चार ओळीतला भाव आबि स्टाइल पण आधी वाचल्यासारखा वाटतोय...मुखवटा का अशाच काही कवितेत.

मयेकरजी
शेवटच्या ओळी वेगळ्या आहेत- आधी वापरला नाही आहे हा भाव.
वेदनांचे सण या आधी ही आलाय, पण इथे कॉन्टेक्स्ट बदललेला आहे
तरीही विचार करते Happy

दक्षे धन्स.

जपावेत ह्रदयाशी
सण करावेत त्यांचे!>>

हे छान

चढवावेत मजले
जमवून क्षण दु:खी,
>>

हेही, यावरून वैभव जोशींचा शेर आठवला

क्षणांवर काळजीपूर्वक क्षणांची चवड रचलेली
उभे आयुष्य म्हणजे फक्त डोलारा असू शकतो

पडावाच मग बंद
नवदु:खांचा हा भाता,
ताटकळावे दु:खांनी
मज पाहण्यास आता..!>> खयाल छान आहे

अशा अनेक गोष्टी भावणार्‍या असूनही कवितेचा ओव्हरऑल इफेक्ट भावत नाही. (अवांतर वाटेल कदाचित, पण हे काही इतरही कवितांबाबत झाल्यासारखे आठवते).

याची कारणे माहीत नाहीत. भुंगा आणि मयेकर म्हणतात तसा तोचतोचपणा असेल वा अभिव्यक्ती असेल.

मला आणखी एक कारण वाटते की अनेक कवितांमध्ये कवीने स्वतःकडे कसले ना कसले श्रेष्ठत्व घेतलेले दिसते. या कवितेत स्वतःच्याच दु:खांची स्वतःच भिंत बांधल्यामुळे नव्या दु:खांना पोचता न आल्यामुळे असूया वाटत आहे हे श्रेय स्वत:कडे घेतलेले दिसते. येथे डॉ. अनंत ढवळे यांचे एक वाक्य, जे मला तसेही नेहमीच आठवते, ते प्रकर्षाने आठवते की 'चित्रामधून स्वतःला डिलीट करून कविता रचावी, जेणेकरून निखळ संवेदना व्यक्त होते'. कवितेत 'मी'ला सर्वात अधिक स्थान मिळत आहे असे मला तरी वाटते.

माझी मते पटतील असे नाही, पटावीत असेही नाही. जे वाटले ते लिहिले.

शुभेच्छा व धन्यवाद

-'बेफिकीर'!

शेवटच्या कडव्यांतील जिद्द, हिंमत हे भाव थोडे अधिक समर्थतेने उमटले असते तर कविता अधिक प्रभावी झाली असती असे वैम.
दु:खांना रोखायला दु:खांची तटबंदी ही कल्पना चांगली वाटली.

अष्टाक्षरी आहे ना?

भुंग्याच्या सजेशन्स ना माझेही अनुमोदन!

दु:खी क्षणांची तटबंदी करण्याची कल्पना आवडली.

कोंडावेत, ओघळणारी ती दु:खे, साकळता ..... हे काही बदल करायला हवेत बहुधा>> भुंग्या, सुचनांसाठी आभार Happy
साकळणे हा बदल केला आहे, श्वास कोंदणे, असाच शब्दप्रयोग केला आहे.
शुभे, निंबे Happy

निंबे हो गं, अष्टाक्षरी आहे!
आबासाहेब, उकाका धन्यवाद!

बाकी नेहमीचंच..... नेहमीसारखंच >>>>>>>>>मलाही असंच वाटलं.

ओघळणारे ते दु:ख
अप्रुप काय तयांचे?
जपावेत ह्रदयाशी
सण करावेत त्यांचे!>>>>>>छान.

बाकी नेहमीचंच..... नेहमीसारखंच >>>>>>>>>मलाही असंच वाटलं.>> Happy

धन्स कोठीकरजी, स्मितू

बाग्ज, सुरेख आणि सुंदर ! कवितेचा आशय फार छान आहे.

इर्षा त्यांना, माझी वाटो
समर्थ जगते आहे! >>>> ह्म्म Happy कालच्या आणि परवाच्या चॅटचा संदर्भ घेवुन वाच तुझ्याच ओळी तुच परत आणि लक्षातही ठेव. Wink येन्जॉय माडी Happy