एप्रिल फ़ुल -- एक अनुभव

Submitted by निरंजन on 1 April, 2012 - 02:44

मला या प्रकाराचा जाम राग येतो. जर आपण वर्षाचे ३६४ दिवस फ़क्त व फ़क्त खर बोलत असलो तर या दिवसाच्या खोट बोलण्याला काही अर्थ उरतो व त्यामुळे एक विनोद घडतो. इथे आपण पदोपदी खोट बोलणार, समोरच्याला फ़सवणार आणि समोरच्यानी आजची तारिख लक्षात ठेऊन हे खोट बोलणं एक विनोद आहे अस मानाव अशी आपेक्षा करणार.

कदाचित आपल्याला या दिवसाचे काही चांगले वा वाईट अनुभव आलेले असतील. आपण कोणाची फ़जिती केलेली असेल कधी आपली झालेली असेल, कधी आयुष्यात परत कोणाला एप्रिलफ़ुल करणार नाही असा आपण धडा घेतलेला असेल.

चला लिहु या आपण तेच इथे.

गुलमोहर: 

मी लहान असतानाची हकिगत आहे.

एक एप्रिलच्या आधी घरात बरीच आजारपण चालू होती. माझ्या आजी तर खुपच आजारी होत्या. त्यावेळी माझ्या आईला उपास करण्याच वेडच लागलेल होत. कोणीही आजारी पडल की आई एक उपास वाढवायची. आठवड्यात तीचे जेवायचे दिवस कमीच होते.

आधले दोन दिवस आईला उपास होते. निर्जळी उपास होते ते. काहीही न खाता व पाणीही न पिता आईनी ते उपास केलेले होते. एक एप्रिल हा ही उपासाचाच दिवस होता. पण तो उपास एकवेळ जेवुन करायचा होता. अशा वेळी जेवायला सुरवात केल्यावर उठायच नाही, असा एक विचित्र नियम तीनी घालुन घेतलेला होता. जर उठल तर पुढे जेवायच नाही. जेवल तर उपास मोडला असा स्वतःला जास्तीत जास्त त्रास करुन घेणारा नियम आईनी स्वतःच घालुन घेतलेला होता.

मी व आई जेवायला बसलो. काही लागल तर उठायची जबाबदारी माझी होती व ती मी पार पाडत होतो. आईनी पहिला घास घेतला. तो घास घशाखाली गेला नसेल तर काही अंतरावर असलेल्या घरातुन एक लहान मुलगा आला व आईला म्हणाला "काकु, आई भाजली आहे लवकर चला"

आई व मी जेवण सोडुन तसेच धावत गेलो. तेव्हा घरं जवळ जवळ नव्हती. आमच्या या जवळात जवळच्या शेजार्‍याच घर आमच्या पासुन २ फ़र्लांग अंतरावर होत.

आम्ही धावतच त्यांच्या घरात गेलो. तर त्या काकुंनी हसतच आमच स्वागत केल. "एप्रिल फ़ुल" अस म्हणून आम्हाला फ़ुल बनवल. आईचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. पण काहीच बोलली नाही. मला खुप राग आला. मी म्हणालो

"ही कसली गम्मत ? आईचा गेले दोन दिवस उपास होता. आता ती उपास सोडत होती. एक घास खाल्ला आणि तुम्ही बोलावलत. आता ती उद्या जेवेल. बाहेर उन किती आहे ते बघा. आम्ही चपला घालायलाही नाही थांबलेलो. आमच सोडा, या अशा उन्हात स्वतःच्या मुलाला तरी बाहेर पाठवायला नको होतत"

आई मला "थांब थांब" म्हणत होती. पण मी बोलुन टाकल.

त्या काकुंना इतक वाईट वाटल. मनानी खुप चांगल्या होत्या त्या. म्हणाल्या "सोडा उपास. हा तुमचा उपास मी करीन. काय पाप लागायच ते मला लागेल"

याचा परिणाम असा झाला की त्या काकु मरे पर्यंत हा उपास करत राहिल्या व आईनी माझ्यामुळे दूसर्‍याला त्रास झाला म्हणून एकाच दिवसात सर्व उपास सोडुन दिले.

मी मात्र तेव्हापासुन कोणालाच एप्रिल फ़ुल केल नाही.