कोलीमाच्या मसाला वड्या

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2012 - 02:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३-४ वाटे कोलीम
२-३ कांदे बारीक चिरुन
पाव वाटी कोथिंबीर चिरुन
१ गड्डा लसुण पाकळ्या चिरून
१ ते २ चमचे रोजचा लाल मसाला किंवा लाल तिखट
चवीनुसार मिठ
पाव चमचा हिंग
पाऊण चमचा हळद
अर्धा चमचा गरम मसाला
अर्ध्या लिंबाचा रस
१ मोठी वाटी बेसन
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

१) कोलीम साफ करा म्हणजे त्यात जर काही इतर मासे किंवा समुद्रातील इतर जिन्नस मिक्स झाल असेल तर ते काढा. एका कॉटनच्या फ़डक्यात किंवा पिठ चाळायच्या चाळणीत धुवुन घ्या.

२) आता एका भांड्यात वरील तेल सोडून सगळ जिन्नस एकत्र करून घ्या. पाणी वगैरे टाकण्याची गरज नसते कारण कोलीम ओलाच असतो. धुतल्यामुळे अजुन ओलसर होतो.

३) पॅन गॅसवर चांगला तापवून घ्या. तापला की त्यात तेल सोडा व तेल गरम झाले की गॅस मंद करून डायरेक्ट पॅनमध्येच हाताने वड्या थापा. पण हे अतिशय सावधानतेने करा. गॅस मंद करायला विसरू नका नाहीतर तेल हातावर उडेल. जर जमत नसेल तर सरळ चमच्याने टाकून त्या पसरा.

४) वड्या थापल्या की गॅस मिडीयम करा व ५-७ मिनिटे शिजू द्या.

५) नंतर वड्या उलटा बाजूने थोडे तेल सोडा व पुन्हा ५ मिनिटे शिजू द्या. करता करता इतका खमंग वास सुटातो की झाल्या झाल्या एखादी वडी मटकावली जातेच.

६) ह्या आहेत तयार कोलीमाच्या वड्या. भाकरीबरोबर अधिक रुचकर लागतात.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ ते २ वड्या याप्रमाणे आकार थापावा
अधिक टिपा: 

सगळ्यात आधी हा प्रश्न असेल की कोलिम म्हणजे काय ? तर कोलिम म्हणजे कोलंबीची पहिली स्टेप. कोलिमला रेफा असेही नाव आहे. अगदी कोलंबीचा आकारही दिसत नाही त्याला. ह्याच नुसत्या कोलीमाच्या मिठ लावून वड्या थापुन वाळवतात व त्याही भाजून तळुन खातात त्या वड्यांना पेंडी म्हणतात.

ह्या वड्या मसाल्या ऐवजी मिरची चिरुन घालूनही करतात. पण लहान मुले व म्हातार्‍या माणसांना मिरच्या लागु नयेत म्हणून मी मसालाच घालते.

खाडीत मिळणारा कोलिम हा काळा असतो तर समुद्रातील राखाडी पांढरट असतो. वरील समुद्रातील आहे.

कोलिम हा नुसता कांद्यावर सुकाही केला जातो. तोही भाकरीबरोबर रुचकर लागतो.

कोलीमाच्या स्टेप खाली देते.

१) कोलिम
२) जरा कोलंबीचा आकार आला की जवळा
३) बाळसे धरले की करंदी किंवा आंबाड
४) कोलंबी
५) मोठी कोलंबी किंवा करपाली पण करपाली ह्या काळ्या असतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages