कोलीमाच्या मसाला वड्या

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2012 - 02:27
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३-४ वाटे कोलीम
२-३ कांदे बारीक चिरुन
पाव वाटी कोथिंबीर चिरुन
१ गड्डा लसुण पाकळ्या चिरून
१ ते २ चमचे रोजचा लाल मसाला किंवा लाल तिखट
चवीनुसार मिठ
पाव चमचा हिंग
पाऊण चमचा हळद
अर्धा चमचा गरम मसाला
अर्ध्या लिंबाचा रस
१ मोठी वाटी बेसन
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

१) कोलीम साफ करा म्हणजे त्यात जर काही इतर मासे किंवा समुद्रातील इतर जिन्नस मिक्स झाल असेल तर ते काढा. एका कॉटनच्या फ़डक्यात किंवा पिठ चाळायच्या चाळणीत धुवुन घ्या.

२) आता एका भांड्यात वरील तेल सोडून सगळ जिन्नस एकत्र करून घ्या. पाणी वगैरे टाकण्याची गरज नसते कारण कोलीम ओलाच असतो. धुतल्यामुळे अजुन ओलसर होतो.

३) पॅन गॅसवर चांगला तापवून घ्या. तापला की त्यात तेल सोडा व तेल गरम झाले की गॅस मंद करून डायरेक्ट पॅनमध्येच हाताने वड्या थापा. पण हे अतिशय सावधानतेने करा. गॅस मंद करायला विसरू नका नाहीतर तेल हातावर उडेल. जर जमत नसेल तर सरळ चमच्याने टाकून त्या पसरा.

४) वड्या थापल्या की गॅस मिडीयम करा व ५-७ मिनिटे शिजू द्या.

५) नंतर वड्या उलटा बाजूने थोडे तेल सोडा व पुन्हा ५ मिनिटे शिजू द्या. करता करता इतका खमंग वास सुटातो की झाल्या झाल्या एखादी वडी मटकावली जातेच.

६) ह्या आहेत तयार कोलीमाच्या वड्या. भाकरीबरोबर अधिक रुचकर लागतात.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ ते २ वड्या याप्रमाणे आकार थापावा
अधिक टिपा: 

सगळ्यात आधी हा प्रश्न असेल की कोलिम म्हणजे काय ? तर कोलिम म्हणजे कोलंबीची पहिली स्टेप. कोलिमला रेफा असेही नाव आहे. अगदी कोलंबीचा आकारही दिसत नाही त्याला. ह्याच नुसत्या कोलीमाच्या मिठ लावून वड्या थापुन वाळवतात व त्याही भाजून तळुन खातात त्या वड्यांना पेंडी म्हणतात.

ह्या वड्या मसाल्या ऐवजी मिरची चिरुन घालूनही करतात. पण लहान मुले व म्हातार्‍या माणसांना मिरच्या लागु नयेत म्हणून मी मसालाच घालते.

खाडीत मिळणारा कोलिम हा काळा असतो तर समुद्रातील राखाडी पांढरट असतो. वरील समुद्रातील आहे.

कोलिम हा नुसता कांद्यावर सुकाही केला जातो. तोही भाकरीबरोबर रुचकर लागतो.

कोलीमाच्या स्टेप खाली देते.

१) कोलिम
२) जरा कोलंबीचा आकार आला की जवळा
३) बाळसे धरले की करंदी किंवा आंबाड
४) कोलंबी
५) मोठी कोलंबी किंवा करपाली पण करपाली ह्या काळ्या असतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोलिम नाही मिळाले तर बोन लेस मासे मिक्सर मधुन काढुन पुढिल क्रुती केली तर चालेल का की काहीच्याकाही बनेल

मस्त दिसताय्त वड्या Happy

नाव वाचल्यावर 'कोलिम म्हणजे काय???' असा विचारच करत होते... तर खाली तु उत्तर दिल्लच आहेस Happy

प्रिती ह्याच दिवसांत मिळतो ये लवकर.

बोनलेस माश्यांना कोलिमची चव नाही येणार पण वेगळा प्रकार म्हणून करू शकतेस.

लाजो धन्स.

कोणते कलम लावावे?

समाजाच्या भूकभावना भडकावणे - कलम ००७

दंड - माबोच्या किमान दहा सदस्यांना ( त्यात मी असेन) जेवायला बोलावणे

दंड न भरल्यास - पुढील सहा महिने कोणतीही पाककृती देता येणार नाही

स्पर्धेसाठी शुभेच्छा

अवांतर - वड्यांसोबत मिरच्या आणि टोमॅटो ठेवण्याचे काही कारण आहे का? एक तर वडी खायला मिळेना आणि सजावट करतायत वर

ह घ्या

छान. हा तूम्ही किनार्‍यालगत राहता म्हणून मिळत असणार. आमच्याकडे कधी आणल्याचे आठवत नाही. (यापेक्षा जरा मोठा आणतात.)
अश्याच वड्या शिंपल्यातील मास्टांच्या पण करतात.

बेफी आहो जेवणात सलाड लागेल ना म्हणून टोमॅटो व पांढरा कांदा आणि मसाला स्पर्धा म्हणजे तिखट मिरची पाहीजेच.

कधी येताय जेवायला ?

हो आमच्याकडे अजुन कालवांच्याही अशा वड्या करतात दिनेशदा.

तुम्ही म्हणाल तेव्हा येऊ

आपल्याला काय

यायचा जायचा खर्च कैलास गायकवाड करतील संस्थेतर्फे

तुम्ही 'ह घ्या' ही दोन अक्षरे वाचलीत की नाही हे तुमच्या प्रतिसादावरून समजले नाही Proud

Happy

जागू मस्त वड्या दिसतायेत, आम्च्याकडे ह्या कोलीमची भजी करतो आम्ही. साहित्य सेमच Happy आता ह्या वड्या पण करायला हव्यात. कुरकुरीत होणार नक्कीच अशा पद्धतीने.

टोकू कुठे राहता तुम्ही ? समुद्र किनारी नक्कीच कारण इतर ठिकाणी शक्यतो नाही मिळत. खुप जणांना हा प्रकारच माहीत नाही.

मला वाटतं मावशी कोलिमाची चटणी पाठवायची..पण ते काळं असायचं....ती शेवटी माहिती दिलीय ती एकदम मस्त आहे.....
मला त्या स्टेप्स माहीत नव्हत्या..सध्या छोट्या कोळंब्यापण नाही आहेत जिथे आहोत तिथ...डायरेक्ट टायगर प्रॉन्स...:)
मस्त रेसिपी....स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्र्प.

असामी, श्री Lol

वेळकाढू, सृष्टी धन्यवाद.

वर्षू अरे वा मग नक्की कर ग. आणि मी आधी माश्यांच्या रेसिपी मध्ये कोलिम सुका दिला आहे तोही करुन बघ तो पण रुचकर लागतो.

मस्त रेसिपी ! अर्थातच नेहमीसारखीच, तोंपासु..... कोलिम मलाही माहीत नव्ह्ता. पण माझी आई करंदी वापरुन पोळे टाकायची. तुझी वरचीच रेसिपी... फक्त नुसत्या लसणाएवजी आले+लसुण पेस्ट वापरायची. वरण्+भात आणि असा करंदीचा पोळा. अहाहा...... जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

व्वा, फार छान स्टार्टरला चांगला पर्याय! Happy
ह्या वड्या सुक्या कोलिमाच्या(जवळा) पण करता येऊ शकतात काय?

टोकू कुठे राहता तुम्ही ? समुद्र किनारी नक्कीच कारण इतर ठिकाणी शक्यतो नाही मिळत. खुप जणांना हा प्रकारच माहीत नाही.>>>>>>>>>>>>> मी समुद्रकिनारी रहात नाही हो, समुंदर और मेरा दूर दूर तक कोई संबंध नही Proud
पण आमच्याकडे(माहेरी) बाजारासाठी मुंबईहुन येणार्‍या कोळणी ह्या कोलमाचे वाटे विकायला घेऊन येतात. सासरी मिळत नैत. Sad

विद्यांक, स्वाती धन्यवाद.

चातक पेस्ट केली असती तर आल-लसुण घातल असत. पण मी लसुण कापुन घातल. तशी काही माश्यांना आल्याची इतकी खास आवश्यकता नसते. जसे कोलिम, जवळा, खुबे, कालव. धन्स.

सारीका तू कोथिंबीरवड्या करू शकतेस ना अश्या.

टोकू नशिबवान आहेस कारण मुंबईलाही बर्‍याचजणांना हा प्रकार माहीत नाही Happy

Pages