एक सॉफ्टकथा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

जुनीच गोष्ट.. इथं टाकतेय ते सगळं लिखाण एका ठिकाणी रहावं म्हणून. शोधायला आणि लिंक द्यायला सोपं जातं.

===================================================================

" बोला. "
न वळताही संयूचा चिंताक्रांत मूड लक्षात घेत मी विचारलं.
" काही नाही गं. चल ना कॅन्टीनला "
म्हणजे नक्कीच ताजा खबर.
" चल. " मी पिसी लॉक केला.
संयू माझी जवळची मैत्रीण. याच ऑफिसात फ्रेशर्सची सेम बॅच आणि पहिलं प्रोजेक्ट सुधा.
फक्त ती जावावाली आणि मी ऑरॅकल मधे. ट्रेनिंग़मधे फुल धमाल केली होतीच आणि पहिल्या प्रोजेक्टमधे पण.
या प्रोजेक्ट मधेच तिची आणि दिविशची ओळख झाली, वाढली आणि स्टेबल पण झाली. ते दोघं लग्न करणार हे सरळ दिसत होतंच.
संयू तशी बर्‍यापैकी इंजिनियर स्वभावाची. म्हणजे लाजणं बिजणं प्रकार नाहीत. नवीन प्रेमात होत असलेले साक्षात्कार मैत्रिणीला सांगणं नाही. म्हणजे काय काय घडलं ते सांगायची पण त्यात ती गम्मत नव्हती.
त्यांचं प्रेम खुलत असताना मी पाहिलं होतं. जे बदल मी दिविश मधे पाहिले ते संयू मधे दिसलेच नाहीत. अगदी सुरुवातीला ते दोघं हळूच एकांत शोधायचा प्रयत्न करायचे ना म्हणजे एकत्र कॅन्टीन, लायब्ररी. एवढंच कशाला अगदी आयटी रीटर्न्स भरायला वगैरे पण एकत्र जायचे. तेंव्हा बाकी कुणाच्या आधी माझ्या लक्षात आलेलं. पण ते संयूच्या वागण्यातून नाही तर दिविश मुळे.
ते परत आले की त्याचा चेहरा इतका खुललेला असायचा ना.
मीही स्वतःहून तिला विचारलं नाही की चिडवलं नाही. म्हटलं तिनं स्वतःच सांगू देत. कारण एकदा मला सांगितलं की त्या लपाछपीत मला जी मजा येत होती तीच संपणार होती.
आणि तसंच झालं. तिनं दिविश समोरच मला सांगितलं. तोच एकदम लाजला असं वाटलं मला. अरे हो एक सांगायचं राहिलंच.
प्रोजेक्टच्या पहिल्या दिवसापासून मला जाणवत होतं की दिविश मला नोट करतोय. सहज नजर गेली तरी नजर चुकवायचा किंवा मोठं स्माईल द्यायचा.
अरे देवा. या सगळ्या गोंधळात मला पडायचं नव्हतंच. आत्ता तरी. पण तो होताच असा की मला माझीच भिती वाटत होती.
एकदा मला एक जॉब लावायचा होता सर्वर वर. तर जॉब ची फाईल मी एडिट करायच्या ऐवजी डिलीट करून टाकली. आणि बसले चिंता करत.
" हाय " मी मान वर केली.
" एनी प्रॉब्लेम? " एक खळीतले जीवघेणे स्मित. वर माझ्या डेस्क वर कोपर टेकवून उभा आहे.
" हलो? " मी मनातल्या मनात. काय JA समजतो की काय स्वतला?
" काही नाही रे. मी ना क्रॉन जॉब ची फाईल उडवलीय. " मी ह्याला का सांगितलं?
परत एक खळीतले जी. घे. स्मि.
वैतागच आहे. आधीच मी अशी का वागतेय ते कळत नाहीये. आणि हा आपला अल्ट्रा चिल. कृष्णाचा अवतारच जणू.
" वेट "
दोन मिनिटात त्याची मेल. जॉब फाईलच्या अटॅचमेंटसह.
" ओह गॉड. थॅन्क यु सो मच. "
" अगं मी पहिल्याच दिवशी केला होता हा प्रकार त्यामुळे मी नेहमी सेव्ह करून ठेवतो ही फाईल. "
" थॅन्क यु सो मच. " मी यडबंबूसारखं परत तेच म्हणाले.
" फक्त थॅन्क्स? " मग काय आता?
" ओके. उद्या एक टेम्प्टेशन. " हे आमच्या प्रोजेक्टमधले चलन आहे. कुणीही कुणाचे काम केले की टेम्प्टेशन चे वायदे होतात. प्रत्यक्षात मिळते कधीतरीच. आणि मिळाले तरी एक कॅडबरी तेरा जणात वाटून खावी लागते.
" टेंप्टेशन? प्लीज रसा. ग्रो अप. " इतक्यात आमचा पिएल आला आणि ते तसंच राहिलं.
पिएलशी बोलणं चालू असताना माझ्या लक्षात आलं की तो काय सांगतोय ते मी ऐकतच नाहीये. मी दिविशबरोबरचा संवाद पुन्हा पुन्हा आठवतेय. अस्सा राग आला ना. म्हणजे माझा स्वतःचा.
आणि थोड्या वेळानं हे पण लक्षात आलं की राग त्याचा यायला हवाय तो येतच नाहीये. आणि अजूनच राग आला स्वतःचा.
आता यावर काय उपाय करावा तेच सुचत नव्हतं. मरू दे. And well i know i can brainwash myself. एका वीकेंडचं काम होतं. दोन दिवसात मी स्वतःला नक्कीच समजाऊ शकते.
" काय गं कसला विचार चालूय? " संयुक्ताबाई अवतरल्या.
" ही चिमणीनं साग़ितलेली डेटा फ़्लो डायग्रॅम उद्यापर्यंत कशी तयार होईल याचा. वीकेंडच्या आत हवीय. "
चिमणी म्हणजे आमचा पिएल. म्हणजे चिमणी एवढा नाही हं तो. साधारण दिड हिप्पोपोटॅमस इतका असेल. सारखं सिग्रेटचं धुराडं चालू असतं म्हणून आम्ही चिमणी म्हणतो. आम्ही म्हणजे मी आणि संयू.
लंचनंतर मी त्या कामाशी झगडायला सुरुवात केली. काहीतरी वेगळंच जाणवतंय. मी मान वर केली. दिविश माझ्याकडे पहात होता. पण यावेळी त्यानं दोन्हीपैकी एकही गोष्ट केली नाही. मोठं स्माईल पण नाही आणि नजर चुकवणं पण. आता काय करू? मग मीच एक मोठं स्माईल दिलं. पण तरीही तो हसलाही नाही आणि त्यानं नजरही चुकवली नाही. मी पुन्हा DFD मधे डोकं घातलं. आता मी संध्याकाळपर्यंत डोकं वर काढणार नाहीये. मी स्वतःलाच बजावलं.
चिमणीने काय स्पेसिफिकेशन्स दिले होते ते मी नीट ऐकले नाहीयेत हे मला माहिती होतं. पण ठीक आहे. त्याच्याकडे रिव्ह्यूला गेले डॉक्युमेंट की तो पुन्हा सांगेलच. एखादा तुच्छ कटाक्ष टाकेल किंवा माझ्या कॉलेजचा थोडक्यात उद्धार करेल पण त्याची तर सवय होतीच.
" हाय " पुन्हा तोच विरघळता आवाज.
" हाऽऽऽय. बोलो " मी जरा कॅज्युअल व्हायचा प्रयत्न केला आणि परत ते यडपटासारखं स्माईल दिलं.
यावेळी दोन्ही हात टेबलावर ठेवून मी तयार केलेल्या DFD चा अभ्यास चालू होता.
" Are you sure? त्याने तुला हेच करायला सांगितलंय? "
" म्हणजे? "
" म्हणजे तो सांगत होता तसं नाही करत आहेस तू. "
याने ते स्पेसिफिकेशन्स पण ऐकलेत?
" ओह मला वाटलंच काहीतरी चुकतंय " मी आत्तापर्यंत इतक्या बावळटपणे माघार घेतलेली मला आठवत नव्हती. पण काय करणार? खरंच असणार ते. माझं लक्ष नव्हतं चिमणी बोलत असताना.
त्यानं शेजारची खुर्ची ओढली. आणि मला इशार्यानं बाजुला करून तो डायग्रॅममधे फटाफट चेंजेस करायला लागला.
" दिविश " उत्तर नाही.
मी पुन्हा हाक मारली.
" बोल " नजर स्क्रीनवरच.
" मी करेन हे "
माझा आवाज इतका मृदू? मला परत माझा राग यायला लागला. बरं आणि तो शहाणा बोलत पण नव्हता. मी सरळ मॉनिटरच ऑफ करून टाकला. माझ्या डोळ्याला डोळे भिडवून तो हसला. ओह गॉड आता ही नजर वळवावी तरी कुठं? पण ती हा विचार करायच्या आधीच झुकली होती.
" गुड. झालंच आहे. दे त्याला पाठवून. " असं म्हणून तो उठला.
" तुला कुणी सांगितलाय आगावूपणा करायला ?" अर्थातच मनातल्या मनात.
" थॅंक्स " मी त्यातल्या त्यात कोरडेपणाने म्हणाले. पण नाहीच. तो पंच नव्हताच त्यात.
" फक्त थॅंक्स ?" पुन्हा तेच?
" मग काय आता कातड्याचे जोडे हवेत का ?" हा प्रश्न मी आमच्या जॉइनिंग ग्रुप मधे नक्की विचारला असता.
" बोल ना. काल पण... " माझाच आवाज आहे का हा?
" कॉफी ?"
हे सगळं काय घडतंय हे मला कळत नव्हतं असं नाही फक्त मी ते थांबवू शकत नव्हते आत्ता.
पण नो इश्युज वीकेंडला सगळं ठीक होणार होतंच.
मी कॉफी व्हेंडींग मशिनकडे निघाले.
" रसा " दिविशने लिफ्टपाशी जाताजाता हाक मारली.
" अरे कॉफी ?"
" इथे? " असं म्हणून तो हसला आणि लिफ्टमधे शिरला. आता यात हसण्यासारखं काय आहे?
" चल " मी मुकाट्याने त्याच्यामागून लिफ्टमधे शिरले.
ओह हा कॅंटीनकडे चाललाय.
खरंतर ती शेट्टीची कॉफी मला अज्जिबात आवडत नाही. पैसे खर्च करून कशाला ते रसायन घशाखाली ओतायचं?
मी हे त्याला सांगितलं.
" ठीक आहे. तू वर येऊन परत व्हेंडींगची कॉफी घे. " काय व्हिम्जी आहे हा?
" त्या DFD बद्दल थॅंक्स. सलीलने चक्क त्यात एकही चूक नाही काढली. बोल आता काय हवंय त्याबद्दल? " मी मनापासून म्हणाले. पुन्हा एक गूढ स्मित. अशावेळी नक्की कसं रिऍक्ट करायचं ते मला अजून कळलेलं नाही. प्रश्नांची उत्तरं अशा हसण्यात सापडतात का? आणि मी ती शोधणार पण नाहीये Mr. Handsome.
" हे काय त्यासाठीच तर आपण आलोय ना इथं " तो नजर माझ्यावर रोखून म्हणाला.
ओह. शहाणाच आहे हा. माझ्या डोळ्यांना आता सवय झाली होतीच खाली पहाण्याची. पण यावेळी ओठांनीही न विचार करता हळूच चीझ म्हणायची काय गरज होती?
वर आलो तर बिग बी आला होता.
आमचा बिग बी म्हणजे पिएम एकदम एव्हरग्रीन माणूस. सकाळी नऊला असो की रात्री नऊला. तितकाच लाईव्हली. हं आता त्याला आमच्यासारख्या चिल्ल्यापिल्ल्यांशी बोलायला वेळ नसतो. पण काही महत्वाचं असेल की तो वेळ काढतोच. कुठलाही प्रॉब्लेम घेऊन गेले की त्याच्याकडे उत्तर तयार.
त्याने शुक्रवारचे प्रोजेक्ट डिनर डिक्लेअर केले.
प्रोजेक्टमधल्या बॅचलर्सनी उड्या मारायच्या बाकी ठेवल्या. जसे काही इतर वेळी यांना खायला बंदी आहे.
लग्न झालेल्या पोरांनी अंगठे उंचाऊन ती सोय असल्याची खात्री केली. यांना घरी खायला मिळते त्यामुळे पिण्यात इंटरेस्ट जास्त.
बायकांनी कितीला जायचेय आणि कुठे याची चौकशी केली. " लौकर होईल ना अथर्वच्या क्रेशमधे साडेदहापर्यंत चालते. " वगैरे वगैरे.
आणि मुलींनी आपल्याला काऽऽऽही फरक पडत नाही असा व्यवस्थित आव आणला. नंतर फोनवरून, रेस्टरूम मधे आणि येताजाता त्याची भरपूर चर्चा होणार होतीच. विशेषतः ड्रेसिंगची. तो एक वैताग असतो. काही जणी तर दर सोमवारी वीकेंडला कुठे आणि कितीची शॉपिंग केली याची हौसेने चर्चा करतात. काहीतरी विचित्र कपडे घालून आल्या आल्या
" ये देख कल लिया. फक्त दोन हजार " वर असे तोंडी प्राईस टॅग पण चिकटवतात. संयू पण अगदी शॉपोहोलिक नसली तरी बरंच कलेक्शन आहे तिचं. विशेषत ऍक्सेसरीजचं.
सगळा दिवस कष्टाळू माणसांनी कामं केली. बाकीच्यांनी टाईमपास केला. मग निघायचं ठरलं.
सगळ्या टीमला पुरतील इतक्या कार्स होत्या.
पटापट लोक कोंबून आम्ही निघालो.
" You are looking different today. " कारमधे बसल्यावर दिविश म्हणाला.
काय बोलू?
माझ्या बरोबर अमृता होती.
" वेगळी? का रे छान नाही का ?" तिने विचारलं.
" छान तर ती आहेच. नो डाऊट अबाऊट इट. पण आज वेगळी दिसतेय. " छान. इथे मला सॉफ्टवेअर मधल्या मुलींना पण लाजता येतं याची प्रचिती येत होती. आणि अमृता विचारतेय.
" आणि मी ?"
ह्या मॅरिड बायका पण ना बिन्धास्त विचारतात.
पण बरे झाले. आता येईल मजा. मी अगदी उत्तर ऐकायला आतुर झाले.
" सॉरी. एका वेळी मी एकाच मुलीला कॉम्प्लिमेंट देऊ शकतो. "
माय गॉड. अमृता आम्हाला चांगलीच सिनियर होती.
पण ती हसायला लागली. " You are too smart Divish. "
डिनर मधे काय वेगळं असणार? तेच स्टार्टर्स, तेच पनीर आणि त्याच तंदुरी रंगाच्या पंजाबी भाज्या. आणि काहीजणांजवळ भरलेले नाजूक प्याले.
घरी निघताना मी स्वतःला आठवण करून दिली.
रसा वीकेंड सुरू झालाय.
your time starts now.
यावर एक खात्रीचा उपाय माझ्याकडे होता.
आणि आत्ताचं तरी ठीक होतं. टीन्समधे तर काय कुठल्या मुलाच्या कुठल्या गोष्टीने आपण इम्प्रेस होऊ काही सांगता येत नाही.
माझी कॉलेजातली मैत्रीण मना तर फार रंगवून सांगायची तिचे टीन्Sअमधले सगळे मूर्खपणे.
कुणाचं अक्षर छान म्हणून आवडला, कुणाची केसांची स्टाईल छान म्हणून.
एक तर मुलगा काय मस्त सायकल चालवतो म्हणून तिचा क्रश.
तिच्या ट्युशनमधे होता तो. तो यायच्या वेळी ही बस स्टॉपवर असायची.
" तो अस्सा स्टायलिश टर्न घ्यायचा ना की बस आपुन फिदा. "
मी म्हटलं " मग काय झालं त्याचं पुढं? "
" काही नाही गं चारच दिवसांनी तो स्टायलिश टर्न घेताना धपकन पडला. आणि रडायला लागला.
श्या आठवीतल्या मुलानं पडल्यावर रडायचं असतं का? झालं माझा क्रश एकदम क्रशच झाला. "
तर या अशा एकूणच स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवांवरून काढ्यण्यात आलेला निष्कर्ष फार प्रभावी होता.
अशा "इम्प्रेस्ड बाय" मधे सारख्या वाईट गोष्टी शोधायच्या. निगेटिव्ह पॉईंट्स. आणि तो स्पार्क कुठे आग लावायच्या आत विझवूनच टाकायचा.
हा उपाय चालतो. चालतोच.
फक्त अगदी अर्ली स्टेजमधेच ऍक्शन घ्यावी लागते.
आणि काही पथ्यं पाळावी लागतात.
पहिलं म्हणजे हे ठरवलं की स्वतःच्या ब्रेन्वॉशिंगसाठी थोडा वेळ काढायचा ज्यावेळी " तो " तुमच्यासमोर नसेल.
आता किती वेळ ते तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे.
दुसरं सतत सावध रहावं लागतं. आणि तुमचं मन खंबीर हवं. जरा कुठं मनाने दुबळेपणा दाखवला की प्रेमाचा ज्वर दुप्पट वेगाने उलटणारच टायफॉईडसारखा.
आता दिविशचे निगेटिव्ह पॉईंट्स काय याच्यावर विचार सुरू झालेला.
हं मला नाव नव्हतं आवडलं त्याचं. हे काय नाव आहे का? अर्थ काय म्हणे त्याचा. उगीच कायतरी स्टायलिश नाव ठेवायचं म्हणून काही पण. मी दिविशवर गुगलून पाहिलं. अनपेक्षित आणि इर्रेलेव्हंट उत्तरं आली.
ज़ेकोस्लोवाकियामधे आडनाव असतं म्हणे दिविश. वा.
आणि स्वाहिली इंग्लिश आणि अजून एका कुठल्या तरी भाषेच्या मिश्रणाला पण divish म्हणतात.
थोडक्यात कुठल्या हिंदुस्तानी भाषेत तरी त्याला काही अर्थ नाहीये.
आता हा काही फारसा सॉलिड पॉईंट नव्हता. आणि या मौलिक माहितीमुळे त्या स्पार्क मधे काहीही फरक पडला नाहीये हे मला कुठेतरी जाणवत होतं पण सध्या असू दे.
खरं तर त्याच्यात न आवडण्यासारखं मला काही सापडेनाच. आणि मी तरी इतका अट्टहास का करत होते?
मी काही extra ordinary होते आणि अतिशय उज्ज्वल भविष्य माझी वाट पहात होतं असं काही नव्हतं. वाट्टेल ते करून खूप पैसा मिळवायचाच किंवा परदेशात जाऊन स्थायिक व्हायचंच अशी ध्येयं ही मी स्वतःपुढे ठेवली नव्हती. माझ्यावर घरातून कुठली जबाबदारीही नव्हती किंवा कुणाच्या तरी अपूर्ण अपेक्षा महत्वाकांक्षांचे ओझेही नव्हते.
आणि तो काही मला लगेच लग्नाची मागणी घालत नव्हता. किंवा या आणि अशा छोट्या मोठ्या प्रसंगांमधून मी त्याला आवडतच असेन असा ठाम निष्कर्षही निघत नव्हता.
मग हे असं कमिटमेंट फोबिक सारखं का वागत होते मी?
मी ठरवलं होतं जो कुणी असेल तो पहिला आणि शेवटचा. दोन मैल चालल्यावर कळणार की अरे हा रस्ता जातच नाहीये माझ्या गावाला.
काय अर्थ आहे त्याला? आणि अशा किती वाटा चालायच्या दोन दोन मैल?
त्या कंपॅटिबिलिटी चेक्स मधे मला काडीचा रस नव्हता.
एकदा ठरवलं की हाच तो की मग तोच तो.
बर आता हे त्यालाही वाटायला पाहिजे नाही का?
दोन मैल चालल्यावर तुम्हाला नाही समजा वाटलं तरी त्यालाही वाटू शकतंच की रस्ता चुकलाय असं.
आणि मला आत्ता तरी कमिटमेंटच्या गोंधळात पडायचं नव्हतं.
मी करत होते ते काम मला आवडत होतं. शिक्षण संपलं होतं. ऑफिसात छान ग्रूप तयार झाला होता. कॉलेजातला ग्रूप अजून संपर्कात होता.
घरात इकडची काडी तिकडे करत नव्हते.
हे असं सुखाचं आयुष्य त्या नजरेच्या खेळासाठी गमवायची आपली तयारी नाही बाबा.
वर माझ्या इतर कमिटमेंटमधे असलेल्या मित्रमैत्रिणींचं मी पहात होतेच.
खरं सांगू का? वाईट कुणीच नसतं. पण एखाद्याच्या मते चांगलं असेल ते आपल्या मते असेलच असं थोडंच आहे?
उगीचच कुठल्या गाडीवर भेळ खायची किंवा हेच गाणं ऐकायचं असल्याही बाबतीत त्याग करायचे तर तो माणूस त्या लायकीचा पाहिजे ना.
सुरूवातीला सगळे best foot forward च्या प्रयत्नात असतात त्यामुळं सगळं छान छानच वाटतं.
आत्ता नाही का मला वाटतंय की काय आहे दिविशमधे न आवडण्यासारखं? तसं.
तर थोडक्यात मी हे असं स्वतःला थांबवणार. जमेल तितकं. तसंच irresistable असेल कुणी तर त्यानं प्रूव्ह करावंच स्वतःला.
इतके दिवस arranged marriage ची चेष्टा करून झाल्यावर आता वाटायला लागलं की तेच बरंय निदान त्यात काही खात्रीचे फायदे तरी असतात.
अशी मी छान पैकी स्वतःच्या मनाची तयारी केली.
आणि कित्तीतरी गोष्टी सापडल्या मला. तो smoke करतो. त्याला मराठी समजतं पण बोलता येत नाही. आणि त्याला सरदारजीचे आणि हत्तीमुंगीचे जोक्स आवडत नाहीत.
आता मला माहितीय तुम्ही काय म्हणाल. स्मोकिंग चं ठीक आहे पण भाषा आणि pjs यात काय मोठसं?
पण खरंच मराठीच नीट नसेल कळत तर माझ्या कविता त्याच्यापर्यंत पोचणार कशा? आणि फालतू जोक्स वर जो नाही हसू शकत त्याला आनंदी रहायला किती प्रयत्न करावे लागत असतील?
हे आपले माझे फंडे बर्का. आणि वर त्यांचा परिणाम होणार की नाही कुठं माहिती होतं. एका बाजूला मला हे जाणवत होतंच की हे मी माझं मलाच जस्टीफाय नाहीये करू शकत.
सोमवारी दुपारी मला चिमणीने छोट्या मीटींगरूम मधे बोलावलं. मी चेहर्‍यावरचं आश्चर्य बाजूला ठेवलं आणि गेले.
" रसा ऑनसाइटला जाशील का? तू काम करतेयस ते मॉड्युल आता संपत आलंय. त्यानंतर integretion and deployment साठी ऑनसाईट रिक्वायरमेंट आहे. आणि पुढे पण या क्लायंटची पुढची लीड्स आहेत. साधारण एक ते दीड वर्ष. "
मी लगेच उत्तर दिलं नाही हे बघून " विचार कर आणि सांग अजून वेळ आहे. " लगेच मोबाईलची बटनं दाबायला सुरुवात. म्हणजे थोडक्यात ' आता निघा ' .
मी जागेवर पोचले आणि त्याक्षणी फोन वाजला.
.....
" हॅलो "
" काय म्हणाला सलील ?" नाव सांगायची गरज नव्हतीच.
" ऑनसाईट चे विचारले. "
" ओह. सही है. " फोन कट. मी विचार करायच्या आत माझ्या क्युबिकल मधे हजर खळीतल्या स्माईलसकट.
" मग तू काय सांगितलंस? जातेयस ना ?" त्याच्या आवाजात कुठेतरी हलल्याची जाणीव होतेय का हे मी शोधत होते.
पण अगदी तसा भास सुद्धा नाही झाला मला.
" मी विचार नाहीये केला अजून. "
" का घरचा प्रॉब्लेम आहे का ?"
" नाही रे तसं काही नाही. माझं मलाच "
" रसा तुला वेड लागलंय का? किती चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. लगेच सांगायचे ना हो म्हणून "
" अरे जायचे आहेच मला एक अनुभव म्हणून. पण लॉन्ग टर्म आहे ना. इतक्या लांब इथलं सगळं आयुष्य सोडून एकटं रहायचं. माझी सगळ्याच गोष्टींशी अटॅचमेंट जरा जास्तच असते. "
" ते सगळं सोड रसा. चार दिवसात सवय होईल. आणि इतकी माध्यमं आहेत की संवादासाठी. फोन्स, मेल्स, व्हॉईसचॅट्स. "
हे मला मान्य होतं पण तरीही.
" आणि काय ठेवलंय इथं? या देशाचं काहीही होणार नाहीये आणि इथं रहाणार्‍यांचंही.
मी तर पहिला चांस मिळाला की पळणार इथून. पैसा, लाईफस्टाईल काही नाहीये इथं. "
" अरे इथंच राहून आपलं हे इतकं सगळं चांगलं झालंय की.
एक ते दीड वर्ष आणि अजून पुढे किती काय माहित? इतके दिवस? मी जर तिथे ऍडजस्ट झाले तर मलाच ते नकोय.
मला इथेच रहायचंय. "
" why r u being filmy? मागच्या वीकेंडचा RDB डोक्यातून उतरला नाहिये का अजून? I wonder तू सॉफ्टवेरमधे आलीसच कशी?
सीमेवर जायचे ना लढायला. एवढे आहे ना तर चल राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा म्हणून दाखव पूर्ण. "
इतके caustic remarks आणि ते खळीतलं हसू तसंच. फक्त त्यात आता स्पष्ट उपहास मिसळलेला.
ही चेष्टा असेल तर मला ती आवडली नव्हती.
" हे बघ प्रश्न राष्ट्रगीताचा आणि प्रतिज्ञेचा नाहीये. ते तर मला आठवतं आहेच पूर्ण. पण तू माझी व्हायवा घ्यावीस
इतकं तुला ते आठवतंय का? आणि ते येण्याचा मला मनापासून इथंच राहू वाटण्याशी काय संबंध आहे?
खरंतर ही उत्तरं मी तुला द्यायची मला काही गरज नाहीये.
तरीही तू अगदी software generation ला represent करण्याचा आव आणतोयस ना म्हणून बोलले."
माझा आवाज खालीच होता पण चेहरा नेहमीप्रमाणे लालबुंद झाला असणार. तो एकदम गप्प झाला आणि निघून गेला.
थोडा वेळ मला काहीच सुचले नाही. आता मला जाणवले की जरा जास्तच सिरियसली घेतले हे मी.
ती नजर माझ्यावर रोखलीय हे मला जाणवलं. पण आता ती उतारावरून अपरिहार्यपणे खालीच धावणार्‍या पाण्याची
ओढ नव्हतीच माझ्या नजरेत. मी वर पाहिलंच नाही.
थोड्या वेळाने लक्षात आलं की माझे दोन्ही प्रॉब्लेम्स संपलेत.
मी चिमणीकडे गेले. त्याला सांगितलं. मी आत्ता सहा महिन्यांपर्यंत नक्की जाऊ शकेन असं दिसतंय. पुढचं नाही सांगता येत.
अशी requirement असेल तर मला interest आहे.
" ठीक आहे. मग तू या मॉड्युलच्या integretion आणि deployment साठी तरी जाशील ना.
खरं सांगायचं तर तू तिकडे असशील ना तर तू मॅनेज करशील गं. आणि क्लायंट मला रात्रीबेरात्री उठवणार नाही.
मला इथे शांतपणे झोप लागेल. "
हा काय कौतुक करतोय की काय माझं? मी हवेत जाण्यापूर्वीच
" म्हणजे आता इतके दिवस हेच काम केलेल्या कुणालाही मी हेच म्हटले असते. " हा आहेर.
" And by the way you are better than the lot, these people are asking me to drive the project with. "
त्याच्या चेहर्‍यावर पुन्हा ते मेंढरं हाकणार्‍याचे भाव आले. मी निघाले.
आणि दुसरं म्हणजे आता कुठलेही निगेटिव्ह पॉईंट्स शोधायची गरज नाही हे कळलं होतं.
जायचे सगळे सोपस्कार संपत आले होते. कागदपत्रं, बांधाबांध, खरेदी.
आईच्या मते माझ्या लग्नाच्या खरेदीची रंगीत तालीम होती ही.
शुक्रवार माझा या ऑफिसातला शेवटचा दिवस होता.
मला कळलं नाही तो कधी माझ्या शेजारी येऊन उभा राहिला ते.
" रसा मला बोलायचं होतं तुझ्याशी. "
" बोल ना "
" मी बोललो ती माझी प्रामाणिक मतं होती. तुला दुखवण्यासाठी नाही म्हणालो मी.
आणि आता शेवटी तू चालली तर आहेसच. ते बोललो नसतो तर काहीतरी बदललं असतं असं वाटतंय मला. " उत्तराच्या अपेक्षेने त्याने पाहिलं.
मी काहीच बोलले नाही. एक अख्खं मिनिट.
"You know something rasA? You are a nice girl. And somehow I have realized that I have lost you without any fault of mine."
शब्द डोक्यात शिरायच्या आत तो गेला होता.
खरं सांगू दिविश? तू मला नाही मीच तुला गमावलंय. पण तेच बरंय.
आधी मी प्रयत्न करत होते तुझ्यात काहीतरी वाईट शोधायचा. मला आवडत नाही असं काहीतरी. जे मी स्वतःच जस्टीफाय करू शकत नव्हते.
पण आता ही तुझी मतं ऐकली ती न आवडण्याचा प्रश्न नाहीये पण माझ्याशी न जुळणारी आहेत हे नक्की.
तेंव्हा एकत्र येउन दुःखी रहाण्यापेक्षा थोडे दिवस हृदयातली कळ सोसावी आणि एक छोटीशी छान आठवण जपून ठेवावी कायमची.
माझं मन एकदम निरभ्र झालं होतं.
नवीन मेल चा ऍलर्ट आला. दोन क्युट छोटी मुलं शाळेत चाललेली. त्यावर "Friends?" एवढंच लिहीलेलं.
मी समोर पाहिलं. तो प्रसन्न हसला. जणू त्याच्या मनातलं जाळं फिटून तोही माझ्यासारखाच निरभ्र झाला असावा असा.

समाप्त.

प्रकार: 

थँक्स सन्मी Happy

ही माझी अतिशय आवडती कथा आहे. जुन्या मायबोलीतली लिंक सेव करून ठेवली होती. आता ही लिंक सेव करते. Happy

मला वाटत आधी अर्धि च वाचली होती मी. मस्त जमली आहे.
'खरं सांगू का? वाईट कुणीच नसतं. पण एखाद्याच्या मते चांगलं असेल ते आपल्या मते असेलच असं थोडंच आहे?'
'पण आता ही तुझी मतं ऐकली ती न आवडण्याचा प्रश्न नाहीये पण माझ्याशी न जुळणारी आहेत हे नक्की.'
ही वाक्य विशेष मस्त

वाचल्याबद्दल आभार..
चिऊ, प्रिया, इंद्रधनू खरंय, थोडी खाली डोकं वर पाय अशीच झालीय ही गोष्ट. जेंव्हा लिहीली होती तेव्हा पार्ट्स मधे लिहीली होती. सुरूवात संयूच्या गोष्टीनं झाली पण घराचा पाया घालायला जावं आणि खणताना खाली जुनं गाव सापडावं तशी ही रसाची एक लपून राहिलेली गोष्ट सापडली. मग तीच सांगितली.
एक गोष्ट म्हणून रेसिपी चुकलीच आहे जरा. तरीपण रसाचं पात्र आवडतं असल्यामुळं जवळची आहे माझ्यासाठी.
Happy

मंजू, Happy

आवडली Happy एकदम ओघवती, गुंगवून ठेवणारी..

आणि रेसिपी चुकलेली वगैरे अजिबात नाहीये, सरधोपटपणा नाहीये, हेच या रेसिपीचं वेगळेपण Happy

अप्रतिम .. !!! कथानक मस्त झाले आहे.. Happy नायिकेने तिच्याच मनाशी केलेला संवाद कथेला खिळवून ठेवण्याचे काम यशस्वीरीत्या करत आहे.. आवडेश...!! Happy