राजाराम सीताराम एक ........भाग १२....कॅम्पलाइफ

Submitted by रणजित चितळे on 26 March, 2012 - 23:43

ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट
राजाराम सीताराम....... भाग ७….. ड्रिलस्क्वेअर
राजाराम सीताराम....... भाग ८......शिक्षा
राजाराम सीताराम....... भाग ९......एक गोली एक दुश्मन।.... भाग १
राजाराम सीताराम....... भाग १० ..एक गोली एक दुश्मन।.... भाग २
राजाराम सीताराम....... भाग ११....पिटी परेड

ह्या आधीचे.......... ११ भाग येथे वाचायला मिळतील
........ फेसबुकची टाइमलाइन सुद्धा इतकी गजबजलेली असते की आपल्या आवडत्या व्यक्तीच्या बरोबर विचारांचा वार्तालाप करताना त्या कृत्रिमपणे ‘लाइक इट’ ‘लाइक इट’ करणाऱ्या त्या पानावर असलेल्या लोकांचा गोंगोट वाटायला लागतो. तसेच त्याच पानावर आजूबाजूला क्लब, जाहिराती व स्पॉन्सर्ड लिंक्स ह्या सारख्या बाकीच्या गोष्टींचा उपद्रव वाटतो. सगळेच कृत्रिम वाटायला लागते व वार्तालाप तिथेच संपतो. उरते फक्त स्वतःच्या भावनांची जाहिरात. केविलवाणी................

राजाराम सीताराम एक............... भाग १२............. कॅम्पलाइफ.

कमांडंट, लेफ्टनंट जनरल खेत्रपाल, फार रुबाबदार माणूस होता. आम्हाला त्याचे दर्शन कॅम्पच्या निमित्ताने झाले. आमच्या कोर्सच्या पहिल्या बाहेरच्या एक्सरसाईजच्या वेळेला कमांडंटने आम्हाला संबोधले.

"Gentlemen remember, the more you sweat and toil in peace, the easier to force your enemy, bleed and boil in war" जनरल खेत्रपालची ती वाक्य अजूनही आठवणीत आहेत.

आमच्या पहिल्या एक्सरसाईजचे नाव होते ‘पहला कदम’. आम्ही सारे जिसीज आपआपल्या आरामाच्या घरटूल्यांतून आयएमएमध्ये आल्यावरचा हा पहिला आऊटडोअर एक्सरसाईज. पहिल्या काही दिवसातच म्हणजे आमचे युद्धशास्त्राचे वर्ग झाल्यावर आम्हाला चार दिवसा करता "पहला कदम" ह्या एक्सरसाईज साठी रवाना केले गेले. डेहराडूनहून पंचवीस किलोमीटर अंतरावरच्या जंगलात आम्हाला घेऊन गेले. तेथल्या जंगलात टेंट बांधून चार दिवस राहायचे असा कार्यक्रम होता. पोहोचल्यावर, पाच मिनिटात टेंट कसा रचायचा त्याचे आम्हाला प्रात्यक्षिक दिले गेले. टेंट पिचींगची एक्सरसाईजच्या शेवटच्या दिवशी स्पर्धा घेतली जाणार होती. एक टेंट दोन जिसीनी बांधायचा व त्यात दोघांनी राहायचे. आमच्या बटालियनचे दोनशे टेंट लागले. मला लहान असताना ऐकलेले बाबासाहेब पुरंदऱ्यांचे शिवाजीराजांवरचे भाषण आठवले व आपणही युद्धशास्त्राचे खरोखरचे धडे घेत असल्याचा अभिमान उरी जाणवला. दर, मे महिन्याचा सुट्टीत डोंबिवलीत, नेहरू मैदानावर बमोंचा सात दिवसांचा कार्यक्रम व्हायचा.

.... अफझलखानाच्या वधावर चाललेले त्यांचे ते भाषण.... "खानाचा तळ, कोयनेच्या खोऱ्यांत पडला. त्या भयंकर निर्बिड अरण्याचे व पर्वतमय प्रदेशाचें किती वर्णन करावे? त्या अरण्यांत खानाच्या हजारो सैनिकांनाही भय वाटूं लागलें. पण खानाला मात्र अजिबात भय वाटलें नाही. तो मनांत म्हणाला, "बस अब जावली का मुल्क मेरा ही हैं।" जंगलांत तंबू ठोकण्यासाठी जरुर तेवढी जागा साफ करून उंच व भव्य तंबू उभारण्यांत आले. साखळदंडांनी हत्ती ठाणबंद करण्यांत आले. जमिनींत मेखा ठोकून घोड्याच्या रांगा बांधण्यांत आल्या. उंटांचे तांडेही बांधण्यांत आले. सैनिकांच्या हालचालींनी व इकडे तिकडे भटकण्याने तें अरण्य गजबजून गेलें. अफाट जंगलाच्या मानाने तें सैन्य चिमूटभर वाटत होते. झाडींत तें पार झाकून गेलें होतें. जावळीत पोहचल्याबरोबर मोंगल फौजांनी डेरे बांधले व फौजा डेरे दाखल झाल्या..... " ब मो पुरंदऱ्यांचे भाषण ऐकताना काय मजा यायची, संपूर्ण दृश्य अगदी डोळ्यासमोर उभे राहायचे. असे वाटायचे की आपण त्या काळात वावरत आहोत.

एका जिसी करता बांधलेल्या टेंटला "बिवोक" म्हणतात. टेंट कसला अगदी छोटा झोपण्या पुरता आडोसाच जणू. पण येथे "बिवोक" नाही चक्क टेंटच बांधायचे होते. टेंट बांधून झाल्यावर, साप, विंचू किंवा तत्सम सरपटणारे प्राणी येऊ नयेत म्हणून टेंटच्या चारही बाजूने "स्नेक पीट" खोदावा लागतो. आम्हाला "स्नेक बाईट किट" कसा तयार करायचा ते शिकवले. साप चावला तर विष चढू नये म्हणून अंगाचा भाग छोट्या धाग्याने बांधून कसा ठेवायचा, अंगाच्या भागाला एक छोटी भेग करून भिनलेले रक्त कसे काढून टाकायचे हे सर्व शिकायला मिळाले. डासांपासूनच्या संरक्षणासाठी "सन डाउन, स्लिवस डाउन" हे वाक्य किती उपयुक्त आहे हे शर्टाच्या दुमडलेल्या बाह्या, उलगडून खाली केल्यावरच कळते. जंगलात राहताना अंगाला "ओडोमॉस" किंवा "डिएमपी" तेल लावावे लागते. "डाय मेथायील फॅलेट" म्हणजेच डिएमपी तेलाने अंग चिकट होते पण डास चावत नाहीत हे कळले. टेंट मध्ये राहताना "डीटीएल्स" खोदायचा एक मोठा कार्यक्रम असतो. "डीप ट्रेंच लॅट्रीन" वेळेवर खोदले नाहीत तर सकाळी करावे लागणारे विधी किती अवघड जातात ते समजून आले. सकाळी मिळालेल्या अर्ध्या लीटरच्या पाण्यामध्ये सकाळचे विधी, तोंड धुऊन दाढी करणे व दिवस भर पाण्याची तहान भागवणे हे सगळे जमणे अवघड असते पण सवय होते. त्याने कमीत कमी पाणी कसे वापरायचे ते कळून येते.

ह्याच कॅम्प मध्ये सकाळच्या वेळेला आमचा रेडिओ टेलिफोनीचा अभ्यास होता. युद्धात रेडियोचा खूप उपयोग होतो. जवळ जवळ सगळे दळणवळण व ऑर्डर्स रेडिओवरून द्यायचे असतात. त्यामुळे रेडिओवर कसे बोलायचे त्याचा एक प्रघात आहे. त्याचे शिक्षण आम्हाला आधीच दिलेले होते व येथे त्या शिक्षणाचा उपयोग करायचा होता. प्रत्येक टेंट मध्ये एक रेडिओ सेट होता व आम्हाला रेडिओवर ऑर्डर्स ब्रॉडकास्ट करायच्या होत्या. आमचा रेडिओ टेलिफोनीचा अभ्यास सुरू झाला............

Tiger: Sparrow, Sparrow, This is Tiger, Message Over.
Sparrow: Tiger, This is Sparrow, Go Ahead.
Tiger: Acknowledge, Over.
Sparrow: Wilco, Over!
Tiger: This is Sparrow, Out. …………..

सुरवातीला रेडिओ टेलिफोनीचा रीतसर अभ्यास चाललेला असताना मधूनच कंटाळा येऊन नकळत आम्ही आमची बकवास टेलिफोनी सुरू केली होती त्यात गाण्यांची अंताक्षरी व तत्सम बकवास सुरू झाली.
एका रेडिओवर आम्ही काय व कसे बोलतो त्यावर आमचा डिएस, कॅप्टन गिल कान ठेवून होता. थोड्याचं वेळात रेडिओवर चालणाऱ्या आमच्या पाल्हाळ गप्पा व गाणी ऐकून कॅप्टन गिलने आम्हा सगळ्यांना एकत्र बोलवून रेडिओ टेलिफोनी बद्दल समजावले, अर्थातच आयएमएतले समजावणे म्हणजे रोलिंग परेड झाल्यावर मगच.

"....Gentlemen, always remember four golden rules of radio telephony - Brevity, Simplicity Clarity and Security. Radio telephony should be like a lady's skirt: long enough to cover the essentials but short enough to keep it interesting. Yours is a night gown.............. .“ कॅप्टन गिलचे आम्हाला समजावणे चालूच होते. तेवढ्यात कॅप्टन गिलला मी नीट दाढी केली नाही अशी बहुदा शंका आली असावी. जवळ येऊन, माझ्या गालावरून हात फिरवत म्हणतो, "यू हॅव नॉट शेव्हड्ं प्रॉपर्ली. जिसी आकाश, यू नो, बाय नाऊ, शेवींग इज पार्ट ऑफ द रीग. गो नाऊ, बिफोर रोलिंग शेव्ह प्रॉपर्ली एंड कम". मला वाटले आता टेंट मध्ये जाऊन शेव्हिंग करावे लागणार पण कॅप्टन गिलचा इरादा वेगळाच होता. त्याने इकडे तिकडे पाहिले व एका दगडाकडे बोट दाखवत मला म्हणतो "पिक दॅट अप एंड बिफोर वी फिनिश आवर रेडिओ टेलिफोनी एक्सरसाईज, आय वॉन्ट टू सी युअर फेस क्लिनली शेव्हड् अॅन्ड डोन्ट फरगेट टू पूट सम आफ्टर शेव्ह, व्हेन यू शेव्ह यु्अर फेस". त्या दिवशी, त्या दगडाने गालावर असे खरचोटे उठले होते व त्या ओल्ड स्पाईसने असे झोंबले होते, की आजतागायत माझी दाढी गुळगुळीत व छान होते. आयएमएत आम्ही हेच आफ्टरशेव्ह लोशन लावायचो. त्यावेळेस हेच आफ्टरशेव्ह प्रसिद्ध होते व सहज मिळायचे. अजूनही दूरवरून ओल्ड स्पाईसचा वास आला की खरचोटे उठलेले झोंबणारे गाल मला आठवतात व आयएमएतले दिवस डोळ्यांसमोर येतात.

अंघोळ तर चार दिवस राहूनच गेली. रोज एल्युमीनीयमच्या मेसटीन मध्ये जेवण व इनॅमलच्या मगमध्ये चहा पिणे असा कार्यक्रम सुरू होता. आम्हाला ह्या चार दिवसातले अठ्ठेचाळीस तास ड्राय रेशनावर काढायचे होते. तसा आम्हाला हुकूम होता कॅप्टन गिल कडून. बऱ्याच वेळेला शक्कर पाऱ्याच्या वड्या खूप कामाला येतात. जेव्हा अठ्ठेचाळीस तास ड्राय रेशनावर काढायचे असतात तेव्हा त्यांचे महत्त्व कळते.

एक्सरसाईजमध्ये ट्रेंचेस खोदायचे फार जिकरीचे काम होते. दिवसभर दमल्यावर रात्रभर ट्रेंच खोदायचा खूप कंटाळा यायचा. खूप दमायचो. कुदळ फावडे वापरून तळहात सोलवटून गेले होते. एकदा ट्रेंच खोदले की ट्रेंचच्या सुरक्षेसाठी कोणाला तरी गस्त घालायला लागायचे. आम्हाला "थ्रिमॅनट्रेंच" रात्रभर खोदून सकाळी सूर्योदयाच्या वेळेला आपली आपली रायफल घेऊन "स्टॅन्ड टू" व्हावे लागायचे. कॅप्टन गिल नेहमी म्हणायचा "शत्रू, साधारण संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला किंवा सकाळी सूर्योदयाच्या वेळेला घात करतो. ह्याला कारण असे की चढाई करताना शत्रू साधारणपणे रात्रीच्या अंधारात वाट काढत येतो व सकाळच्या पहिल्या प्रहरी हमला करतो. हे जर जमणारे नसेल व अंतर खूप असेल किंवा चढाई खूप असेल व एका रात्रीत चढाई साधणार नसेल तर मग रात्रीच्या अंधारात शत्रू त्याच्या लक्षाच्या दिशेने मार्गक्रमण करतो व पहिला टप्पा गाठतो. लक्ष टप्प्यात आले की फॉर्मींगअप प्लेसवर शत्रचे सैन्य दिवसभर टिकून राहते व संध्याकाळी सूर्यास्ताला हमला करते. परत दिवसभरच्या दमण्याने संध्याकाळच्या वेळेला, किंवा रात्रभराच्या अपूऱ्या झोपेमुळे सूर्योदयाच्या वेळेला, डिफेन्सीव्ह पोझिशन घेतलेले सैनिक, शिथिल सापडू शकतात. ह्या शिथिलपणावर मात करण्यासाठी, डिफेंडींग फोर्सेस, ह्या दोन्ही वेळेला मुद्दामून जास्त तयारीत राहतात. ह्या प्रक्रियेला "स्टॅन्ड टू" म्हणतात".

आपले हत्यार नेहमी आपल्या जवळ असले पाहिजे. अगदी झोपताना व सकाळचे प्रातर्विधी करताना सुद्धा. कॅम्पमध्ये हे शिकायला मिळते. हत्यार जर कोणा कडून हरवले तर त्याच्या वर रेलीगेशनचीच वेळ येते. हत्याराचा सांभाळ, संरक्षण व आदर ह्याला खूप प्राधान्य दिले जाते कारण युद्धात आपले हत्यार हाच आपला दोस्त व आपला साथी ठरणार असतो. मरे पर्यन्त फक्त आपले हत्यारच आपल्या बरोबर असते. सुरवातीला, सुरवातीला सवय नसल्या कारणाने कोणा जिसीचे हत्यार काहीतरी काम करताना राहून जायचे, सुटायचे. जिसी सुब्बूला हा धडा डिएस गिलने त्याचा "नमुना" बनवून शिकवला आणि त्याच्याच काय पण आमच्या पण लक्षात राहिले जन्मभर.

ट्रेंच खोदून झाल्यावर, सकाळच्या वेळेला आम्ही स्टॅन्ड टू मध्ये सज्ज राहिलो होतो. आमचे कसेतरी खोदलेले ट्रेंचस् बघून कॅप्टन गिलचा पारा चढला. म्हणाला "बगरर्स धिस इज हौ यू हॅव डग युअर ट्रेंचेस्". ह्याला कारण की आम्ही जेमतेम दोनदोन फुटाचे ट्रेंचेस खणून ठेवले होते. कितीही भरभर केले तरी प्रत्येकाच्या कुवती प्रमाणे व हातात असलेल्या वेळेत तेवढेच जमले होते. खरे तर आम्ही चार, चार फूट ट्रेंच खोदायला पाहिजे होते. नाहीतर दोन फूट ट्रेंच खोदण्याचा काहीच उपयोग नव्हता. ट्रेंच मध्ये उभे राहिल्यावर छाती पर्यन्त जर जमीन नाही आली तर संरक्षण ते काय मिळणार. दिवसभराच्या श्रमाने व रात्रीच्या खोदण्याने आम्हाला केव्हा एकदा झोपतो असे झाले होते. त्या रात्री प्रत्येकाला फक्त दोनतास रात्री झोपायला मिळाले होते. बाकीच्या वेळेत गस्त घालणे व खोदायचे काम चालू होते. झोपेतच कसेतरी खोदून टाकले आम्ही ट्रेंचस्. परितोष शहा कॅम्पसाठी आमचा कंपनी कमांडर होता. त्याला पकडून कॅप्टन गिल म्हणतो "यू हॅव डग धिस ट्रेंच. नाऊ आय वॉन्ट यू टू गो इनसाईड धिस" असे म्हणत कॅप्टन गिलने परितोष शहाला त्या दोन फुटाच्या ट्रेंच मध्ये अक्षरशः कोंबलेन. "इन वॉर यू विल नॉट गेट धिस मच टाइम बगर्स, दॅट टाइम एव्हरी बडी वूड गो फॉर सिक्स फिट ट्रेंचेस. एंड यू विल डिग विथ युअर मेस टिन्स, विथ युअर फिंगरस्, विथ युअर नेल्स् बिकॉज एव्हरी बडी विल रीक्वायर डिगींग टूल्स् अॅन्ड दे वील ऑलवेज बी इन शॉर्ट सप्लाय... ". खरे तर युद्धा मध्ये संसाधनांचा व वेळेचा अभाव नेहमीच जाणवतो. त्यामुळे जी बाजू जास्त तयारीत असते त्या बाजूची सरशी होते. युद्धात शत्रू पेक्षा वेळेशी झुंजण्यातच अर्धी शक्ती निघून जाते. The more you sweat and toil in peace….. ह्या वाक्याची सार्थकता तेव्हा कळते.

आमचा पुढचा एक्सरसाईज होता "आगे बढ". एक्सरसाईज सात दिवसांचा होता. ह्यामध्ये मॅपरिडींग करत जंगलातून, नाल्यातून वाट काढत दुश्मनाच्या दडून बसलेल्या बंदूकधाऱ्याला किंवा आतंकवाद्याला पकडायचा इरादा असतो ह्या एक्सरसाईज मध्ये. मजा यायची, जेव्हा बेसावध राहिल्यावर डिएस एकदम कानापाशी येऊन ओरडायचा तेव्हा..... "कंपनी कमांडर अमित वर्मा यू आर डेड!". मग त्याला थोड्या वेळेसाठी त्या एक्सरसाईज मधून कंपनी कमांडरला बाहेर काढले जायचे व आमच्यावर आमची युद्धातली पुढची खेळी अमित वर्मा म्हणजेच आमच्या कंपनी कमांडरला सोडून राबवण्याची पाळी यायची. ह्या मुळे चढाईची योजना बनवतानाच ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा लागायचा. कोण कोठली कामे करणार व आपल्यातला सहकारी घायाळ झाला किंवा ऐनवेळेला मेला तर कोणाचे काम कोणी करायचे हे आधीच ठरवलेले असायचे…..

कॅम्पच्या शेवटी कॅम्पफायर झाला. कॅम्पमधल्या सगळ्या थकावटीची होळी ह्या कॅम्पफायर मध्ये झाली. डिएसचे कडक वागणे, त्या शिक्षा, आतापर्यंत अंगवळणी पडलेले रोलिंग, क्रॉलिंग सगळे सगळे संपले होते. त्यादिवशी आम्हाला डिएस व बाकी अधिकाऱ्यांचे एक वेगळेच रूप बघायला मिळाले. संध्याकाळी छान मोठी शेकोटी पेटवली गेली व सगळ्यांना स्नॅक्स व बिअरची मेजवानी मिळाली. अशा श्रम परिहाराला "रम पंच" म्हणतात हे नंतर कळले मला. डिएस व बाकी अधिकारी सगळ्यांशी गंमत गोष्टी करत कॅम्प मधल्या आमच्या चुका आठवून आठवून हसत होते. आम्ही जिसींनी मिळून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्रत्येक जिसीनी जमेल तशी आपआपली अभिव्यक्ती सादर केली. अमित वर्माने "ओ SSSS साथीरे, तेरे बीना"... हे "मुक्कदर का सिकंदरचे" गाणे म्हटले. आम्हाला खूप आवडले. अमितने अगदी त्याची राखी त्याच्या डोळ्या समोर उभी आहे अशा भावनेत गाणे म्हटले. आम्ही त्याच्या कडून त्याच्या मैत्रिणीचे खूप कौतुक ऐकले होते. अमितचे वडील लष्करात अधिकारी होते. त्यांच्या सहकाऱ्यांमधल्या एका अधिकाऱ्याची ती मुलगी. अमित व ती लहानपणा पासून एकमेकांना ओळखत होते. दोघांचेही वडील पायदळाच्या गार्डस् रेजीमेंट मध्ये काम करायचे. अमित आम्हाला सैन्या बद्दलची थोडी थोडी माहिती द्यायचा. वासरात लंगडी गाय होती अमित म्हणजे. मला सैन्याबद्दलची काही खास माहिती नव्हती. सैन्य व त्यातले आयुष्य म्हणजे आमच्यासाठी मोठे रहस्य होते. युद्ध तर रोज रोज होत नाहीत. मग जेव्हा युद्ध नसते तेव्हा सैन्य करते काय असा मला नेहमी प्रश्न पडायचा. तो सैन्या मधल्या गोष्टी सांगायचा व आम्ही कान देऊन त्या ऐकायचो. रेजीमेंटला "युनिट" असेही म्हटले जाते हे त्याच्या कडूनच ऐकले होते. दोघांचेही वडील एकाच युनिट मध्ये असल्या कारणाने, ते दोघे गार्डस् रेजीमेंटच्या बाकीच्या अधिकाऱ्यांना ओळखत होते. युनिटमधले जवान व शिपाई त्यांना आपले वाटायला लागले होते. अमितने इनफनट्रीत जायचे व गार्डस् रेजीमेंट मध्येच जायचे असे ठरवले होते. गार्डस् ची तीच युनिट मिळेल ह्याची त्याला खात्री होती. आम्हाला आता पर्यन्त सैन्या बद्दल बरीच माहिती झाली होती. अमित मुळे रोज त्या माहितीत भर पडायची. भारतीय सैन्याचे पायदळ, रणगाडा, तोफखाना, सॅपर्स एंड माईनर्स, पॅरा कमांडो, आर्मीचे वायूदळ, सिग्नल्स् असे विविध लढाऊ दल आहेत किंवा आर्मस् आहेत. प्रत्येक लढाऊ दलाच्या आपल्या अशा रेजीमेंट्स, बटालियन्स् किंवा स्कॉड्रन्स् आहेत. उमेदवारीची पहिली काही वर्षे सैन्याधीकाऱ्याला, कमीशन्ड ऑफिसर झाल्यावर मिळालेल्या युनिट मध्ये घालवावी लागतात. एकदा त्याला एका युनिट मध्ये कमीशन मिळाले की पहिली दहा बारा वर्षे तो त्याच युनिट मध्ये राहतो व शिकतो. त्याची युनिट जिथे जाईल तिथे जातो. युनिटची जागा दर तीन वर्षाने बदलते. युनिट, त्यातले जवान, त्यातले अधिकारी हे सगळे त्याचे कुटुंब बनते. युनिट मधले ज्येष्ठ अधिकारी त्याचे मार्गदर्शक व शिक्षक बनून राहतात. हे सगळे ऐकून आम्हाला कधी एकदा आमची युनिट मिळते असे व्हायचे. लग्नाचे वय झालेल्या एखाद्या मुलीला जसे सासर कसे असेल, कोठे असेल असे प्रश्न सतावतात तसे आम्हाला आमच्या युनिट बद्दल वाटायचे. ह्या उलट अमित. त्याला हवी असलेली युनिट मिळणारच हे त्याला माहीत असल्या कारणाने निश्चिंत होता. आयएमए मध्ये कोर्स संपण्या पूर्वी, प्रत्येक जिसी कडून त्यांना कोठले लढाऊ दल पाहिजे ते जाणून घेतले जाते. प्रत्येक जिसीची आवड, कोर्स मधली त्याची कामगिरी व युनिट मधल्या रिक्त जागा ह्यावर एखाद्या जिसीला मिळणारी युनिट अवलंबून असते. त्यात पेरेंटल क्लेमला खूपं महत्त्व दिले जाते. पेरेंटल क्लेम, म्हणजे जर कोणाचे वडील एखाद्या युनिट मध्ये असतील व त्या अधिकाऱ्याच्या किंवा जवानाच्या आयएमएत शिकणाऱ्या मुलाला त्याच्या वडिलांची युनिट पाहिजे असल्यास, त्याच्या त्या निवडीला प्राधान्य दिले जाते. पेरेंटल क्लेम हे आपल्या सैन्य दलाचे वैशिष्ट्य आहे. एकाच युनिट मध्ये वाढल्या मुळे व त्याच युनिट मध्ये आता अधिकारी म्हणून आल्या मुळे, युनिट प्रती आपुलकीचा तीव्र भाव जागृत होतो, आपलेपणा येतो. लढाईत अशा "आपल्या" युनिट विषयी वाटणाऱ्या आपुलकीचा खूप उपयोग होतो. त्या आपुलकीपोटी, लढाईत, अधिकाऱ्यांनी शौर्याच्या मोठ्या गाथा कोरून ठेवल्या आहेत. भारतीय सैन्याचा इतिहास अशा घटनांनी समृद्ध आहे. बऱ्याच वेळेला असे दिसून आले आहे की जवान किंवा अधिकारी युद्धात देशासाठी नव्हेतर त्यांच्या युनिटच्या मानासाठी स्वतःचे प्राण देतात. हे सगळे जाणूनच भारतीय सैन्यात पेरेंटल क्लेमची मुद्दामून तरतूद केली गेली आहे. असा हा वारसाहक्क दावा फक्त लढाऊ दलांसाठीच आहे. ह्याच पेरेंटल क्लेम मुळे जिसी अमित वर्माला गार्डस् रेजीमेंट मिळणार हे जवळ जवळ निश्चित होते. त्याच्या मैत्रिणीला सुद्धा तेच हवे होते असे तो आम्हाला कित्येकदा म्हणाला होता. आम्हाला आयएमएच्या रुक्ष दिनचर्येत अमित व त्याच्या मैत्रिणीचा विषय चघळायला खूप आवडायचा. त्याची आम्ही खूप खिल्ली उडवायचो. पण खरे तर आम्हाला त्याचा हेवा वाटायचा.

विविध ठिकाणाहून आलेले ते जिसीज आणि त्यांच्या फुललेल्या प्रतिभा अनुभवायची एक संधी म्हणजे पहिल्या सत्राच्या मध्ये होणारी सोशल्स्. अॅकॅडमीतले दिल्लीवाले, चंडीगढवाले - दिल्ली व चंडीगढ सोशल करायचे. मराठी जिसी एकत्र जमून - तांत सोशल करायचे. तसेच मल्लू सोशल, बॉन्ग सोशल ह्याच बरोबर प्लटून सोशल, कंपनी सोशल, बटालियन सोशल, एनडीए स्कॉड्रन सोशल, आरआयएमसी सोशल अशी अनेक सोशल्स् होत राहायची. अशा सोशल्स् मधून कोणी गाणी म्हणायचे, कोणी स्वतःच्या कवितांचे वाचन करायचे, छोट्या नाटिका बसवल्या जायच्या तर कोणी एखादे तंतुवाद्य वाजवून आपले कर्तब दाखवून सुंदर मैफिल जमवायचे. बंगाली मुले सुंदर गाणी म्हणण्यात पटाईत. प्रत्येकाच्या घशात किशोरकुमार बसलाय असे वाटायचे व प्रत्येकाला रविंद्रसंगीत यायचे. रवींद्रनाथांनी दहा हजारावर कविती लिहून ठेवल्या आहेत. रवींद्रनाथांच्या प्रतिभेची झलक अशाच जिसींजने गाईलेल्या रविंद्रसंगीताने मला करून दिली. ह्या सोशल्स् मधून जिसीजच्या वेगवेगळ्या प्रतिभा साकार व्हायच्या.

शेवटचा व सगळ्या कॅम्पचा बाप म्हणजे चिंडिटस्. ह्या कॅम्पनंतर आऊटडोअर एक्सरसाईजचे सत्र संपते. आयएमएत झालेल्या सगळ्या एक्सरसाईजचे व शिकवलेल्या साऱ्या युद्धशास्त्राचा परिपाक चिंडिटस् एक्सरसाईजने होतो. ह्या कॅम्प मध्ये "भदराज" नावाचे भले मोठे पर्वत शिखर सर करायचे असते. पर्वत शिखर कसले, पर्वत समूह म्हणावे लागेल त्याला. त्यामुळे चिंडिटसला कधीकधी "भदराज" असे पण म्हटले जाते. कॅम्प जिथे संपतो तेथून, डोंगर दऱ्याखोऱ्यातून जवळजवळ पन्नास किलोमीटरचा "रनबॅक" करावा लागतो. तो सुद्धा चिंडीट ड्रेसमध्ये, आपली वैयक्तिक रायफल घेऊन. हा रनबॅक म्हणजे, आयएमएच्या सगळ्या बटालियन्स मध्ये कोणती बटालियन पहिल्यांदा पोहोचते त्याची चुरस असते. शंभर ते एकशेवीस जिसींच्या समूहाच्या रनबॅक साठी मोठा ताळमेळ साधावा लागतो.

हनुमानाला लागलेल्या शापा मुळे त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव नव्हती, किंबहुना त्याला माहीतच नव्हते की तो एका प्रचंड शक्तीचा धनी आहे म्हणून. जाणीव नसल्यामुळे तो त्याच्या शक्तीचा योग्य उपयोग करू शकत नव्हता. जांबुवंताने ही जाणीव करून देण्याचे काम केले. भदराजच्या कॅम्प आम्हाला आमच्यातील आंतरिक शक्तीची जाणीव करून देतो. देवाने दिलेल्या व आपल्या अंगात दडलेल्या मानसिक व शारीरिक शक्तीचा अनुभव ह्या कॅम्प द्वारा मिळतो व त्याची परिणती प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढण्यात होते.

(क्रमशः)

आपण राष्ट्रव्रत घेतले का

त्या संबंधी येथे अजून वाचा
http://rashtravrat.blogspot.com/
आणि येथे
http://bolghevda.blogspot.com/
(मराठी ब्लॉग)

गुलमोहर: 

कडक _/\_ Happy

नुकताच मावसभाउ त्याच सहा महिन्याच ट्रेनिन्ग संपवुन घरी आला होता तेव्हाही अशाच बर्‍याच गोष्टी त्याच्या तोंडुन ऐकल्या.
त्याची पासिन्ग आउट परेडची सीडी बनवुन दिली होतीच आर्मीने. ती पाहताना रोमांच येतात अंगावर.

सरजी - नेहेमीप्रमाणेच एक कडक सॅल्यूट.
हा लेखही नेहेमीप्रमाणे मनाची मरगळ दूर हटवणारा, उत्साह वाढवणारा, औत्सुक्य निर्माण करणारा असा आहे.
यातले बरेच मुद्दे सिव्हिलियन्सना लागू होतात.
विशेषतः - <<<सकाळी मिळालेल्या अर्ध्या लीटरच्या पाण्यामध्ये सकाळचे विधी, तोंड धुऊन दाढी करणे व दिवस भर पाण्याची तहान भागवणे हे सगळे जमणे अवघड असते पण सवय होते. त्याने कमीत कमी पाणी कसे वापरायचे ते कळून येते.>>> हे पुणेकरांना प्रचंड लागू आहे - जिथे पुणेकर मंडळी तोंड धुवायलाच चार चार बादल्या पाणी वापरतात.......

हनुमानाला लागलेल्या शापा मुळे त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव नव्हती, किंबहुना त्याला माहीतच नव्हते की तो एका प्रचंड शक्तीचा धनी आहे म्हणून. जाणीव नसल्यामुळे तो त्याच्या शक्तीचा योग्य उपयोग करू शकत नव्हता. जांबुवंताने ही जाणीव करून देण्याचे काम केले. भदराजच्या कॅम्प आम्हाला आमच्यातील आंतरिक शक्तीची जाणीव करून देतो. देवाने दिलेल्या व आपल्या अंगात दडलेल्या मानसिक व शारीरिक शक्तीचा अनुभव ह्या कॅम्प द्वारा मिळतो व त्याची परिणती प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढण्यात होते.>>>> तुमच्या या अशा प्रेरणादायी लेखांमुळे आम्हा सामान्य वाचकालाही आपल्या अंगात दडलेल्या मानसिक व शारीरिक शक्तीचा अनुभव यावा अशी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो.

रणजित,

चांगला भाग. मस्त रंगवलाय. Happy

तुम्ही कधी सियाचेनला होतात का? जमल्यास तिथले अनुभव (स्वत:चे व/वा इतरांचे) लिहा. खूप ऐकलंय तिथल्याबद्दल. तिथे म्हणे वय वर्षे २५ ते ३५ च्या युवकांनाच पाठवतात. तेही जास्तीतजास्त ५ वर्षे. सलग १ वर्षापेक्षा ठेवत नाहीत. वेतनात खास सियाचेन भत्ता मिळतो आणि पुढे निवृत्तीवेतनात देखील चालू राहतो. खूप काही ऐकलंय. खरेखोटे देवजाणे!

आ.न.,
-गा.पै.

चिमुरी, झकासराव, मित, सतिश.., पुरंदरे शशांक, कंसराज, शूम्पी, गामा पैलवान, मामी आपणास धन्यवाद.

गामा पै - पुर्वी ४०० रु भत्ता मिळायचा आता ७५०० रु मिळतो. पेन्शन मध्ये काही फरक नाही.

रणजितजी
मस्त लिहीता, हा भागही उत्तम. धंन्यवाद.

पाण्याच्या बाबतीत डोंबिवलीकर सध्या अशीच काटकसर/ भागवा भागवी करत आहेत.

नेहेमीप्रमाणे मस्तच !
लढाईत, अधिकाऱ्यांनी शौर्याच्या मोठ्या गाथा कोरून ठेवल्या आहेत. > याबद्दल जास्त वाचायला खूप आवडेल.

रणजितजी , कडक सॅलुट .....
पुढ्च्या भागाची प्रतिक्षा...
हे सगळे भाग चक्क पीडीफ मधे ठेवलेय .... या बद्दल क्षमस्व...