तुर्की सामाजिक संघर्षाचे गोठलेले बर्फ
युरोपियन युनियनमध्ये अजूनही सामिल होऊ न शकलेला तुर्कस्थान हा देश ‘युरोप आणि आशिया खंडांमधला दुवा’ हे बिरूद मानाने मिरवण्याऐवजी, आपण युरोप खंडाच्या कायम उंबरठ्यावरच राहिलो याची एक खंत मनात बाळगून आहे. त्यात अर्थातच पश्चिम तुर्कस्थानातील शहरी, सुशिक्षित समाजाचा भरणा जास्त आहे. दुसरीकडे या देशाच्या पूर्वेकडच्या सीमा अर्मेनिया, जॉर्जिया आणि इराण या देशांना भिडत असल्यामुळे, त्या भागात आर्मेनियन, साम्यवादी, कुर्दीश विचारसरणीचा जास्त प्रभाव राहिलेला आहे. एकसंधतेच्या पडद्याआड देशात सतत एक द्वंद्व सुरू आहे. असे द्वंद्व, की ज्याची इतिहासाला क्लेषकारक नोंद घेण्यावाचून पर्याय नाही. ‘स्नो’ या ओरहान पामुकलिखित कादंबरीत तुर्कस्थानातील अशाच काही सामाजिक संघर्षात्मक घटनांचे क्लेषकारक संदर्भ आपल्याला सापडतात. मॉरीन फ्रीली यांनी २००४ साली इंग्रजीत अनुवादित केलेली ही कादंबरी साकेत प्रकाशनाच्या वतीने विशाल तायडे यांनी मराठीत आणली आहे.
जर्मनीत राजकीय हद्दपारी भोगत असलेला ‘का’ हा प्रसिध्द तुर्की कवी एका बर्फाळ वादळाच्या दिवशी अतिपूर्वेकडील ‘कार्स’ या शहरात येतो; जवळजवळ वीस वर्षांनी. मुळात आपल्या आईच्या अंत्यसंस्कारांसाठी मायदेशात तो अल्प वास्तव्यासाठी आला आहे. पण इस्तंबूलमधील आपल्या राजकीय विश्लेषक मित्राच्या विनंतीवरून चार दिवसांसाठी तो कार्समध्ये येतो. त्याला कार्समधील स्थानिक निवडणुकांचे आणि तिथे पसरलेल्या स्त्रियांच्या आत्महत्यांच्या साथीचे(?) वार्तांकन करायचे आहे. त्याचबरोबर आपल्या जुन्या वर्गमैत्रिणीला, इपेकला, भेटण्याची अजून एक सुप्त इच्छा तो मनाशी बाळगून आहे. इपेकने त्याच्या मनाचा एक हळवा कोपरा व्यापलेला आहे. ही कादंबरी म्हणजे ‘का’ आणि इपेक यांची असफल प्रेमकहाणी आहे. पण या प्रेमकहाणीचे बोट धरून तुर्की सामाजिक संघर्षाचा एक व्यापक पट वाचकांसमोर उलगडला जातो.
जगभरातील इतर अनेक उदाहरणांप्रमाणेच कार्समधील संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत स्त्रिया आणि त्यांची वेषभूषा! तुर्की स्त्रिया आपले डोके नेहमी ओढणीने झाकून घेतात. असे करणार्या स्त्रियांना शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश नाकारण्याचा आदेश राष्ट्रीय राजकारण्यांनी दिला आहे. परिणामी, आपल्याला धर्माविरुध्द वागावे लागेल या विचाराने अटळ नैराश्य येऊन कार्समध्ये महिलांच्या, तरूण मुलींच्या आत्महत्यांची जणू काही साथच आली आहे. एक भारतीय म्हणून रूढी-परंपरांमधील मतमतांतरे आपल्याला नवीन नसली, तरीही तुर्कस्थानातील या बहुचर्चित ‘हेड-स्कार्फ मूव्हमेण्ट’चे कादंबरीतील विवरण वाचून मन सुन्न होते.
हा समाज आस्तिकता आणि नास्तिकता यांची योग्य प्रकारे व्याख्या करण्यासाठी सतत धडपडतो. त्यांच्यात उघडउघड तीन तट आहेत - इस्लामी मूलतत्त्ववादी, उदारमतवादी इस्लामी आणि कडव्या धार्मिकतेची काळी बाजू ध्यानात आलेले लोक. धर्माशी निष्ठा पण मूलतत्त्ववादाशी फारकत हा मधला मार्ग बहुतेकांना मान्य नाही.
या तीनही विचारसरणीचे प्रतिनिधित्त्व करणार्या अनेकांना ‘का’ आपल्या चार दिवसांच्या वास्तव्यात भेटतो. आत्महत्या केलेल्या स्त्रियांच्या कुटुंबियांनाही भेटतो. त्यांच्या मुलाखती घेतो. या सर्व पात्रांचे आपांपसांतील संवाद, चर्चा, वादविवाद हा या कादंबरीचा एक अतिशय लक्षवेधक पैलू आहे आणि त्याचे श्रेय जाते ते लेखकाच्या निवेदनशैलीकडे.
ओरहान पामुक हा २००६ सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारा तुर्की लेखक. मातृभाषेवर मनापासून प्रेम करणारा जागतिक ख्यातीचा लेखक म्हणून तो ओळखला जातो. प्रस्तुत कादंबरी २००२ साली तुर्की भाषेत ‘कार’ या शीर्षकाने प्रकाशित झाली. ‘कार’ या तुर्की शब्दाचा अर्थ ‘बर्फ’.
‘का’, ‘कार’ आणि ‘कार्स’ या शब्दांतील अनुप्रास हा निव्वळ योगायोग नाही. ‘कार’ हा ‘का’ आणि ‘कार्स’मधला जणू दुवा आहे. बर्फवृष्टी झाली, की परिसरावर बर्फाचे जणू आच्छादन पसरते. सर्वदूर सृष्टीचा एकच एक तोंडावळा दिसू लागतो. कविमनाचा, पण स्वतःचे नावही न आवडणारा ‘का’ हा असाच काहीएक विशिष्ट तोंडावळा घेऊन वावरतो. चार-पाच वर्षे त्याचे कविता करू न शकणे, प्रेमात सतत आलेले अपयश, आयुष्यातील विषण्णता, राजकीय हद्दपारी, त्यापायी मातृभूमीपासून त्याचे तुटणे, हे सारे तो आपल्या या तोंडावळ्याआड लपवू पाहतो. बर्फाच्या वादळाचे ते चार दिवस ज्याप्रमाणे त्याचे आयुष्य बदलून टाकतात, त्याचप्रमाणे ‘कार्स’ शहराचे नशीबही बदलून टाकतात. चार दिवसांनंतर वादळ शमते, स्वच्छ सूर्यप्रकाश पडतो, बर्फ वितळायला लागते, त्यांच्यात असलेला हा दुवा मोडतो आणि काहीशा अनपेक्षित परिस्थितीत ‘का’ला शहर सोडून जावे लागते; त्या परिस्थितीचे पडसाद उर्वरित आयुष्यात भोगावे लागतात आणि पुस्तक वाचून संपते तेव्हा एक शोकांतिक उदासीनता वाचकाला घेरून राहते.
कथानकात तीन हत्या आहेत, एक रक्तरंजित क्रांती आहे, एक अपहरणनाट्यदेखील आहे. पण ते सर्व वाचताना सतत एक प्रकारचे मळभ दाटल्यासारखे वाटते. कादंबरी अतिशय धीम्या गतीने पुढे सरकते. ती संथगती काहींना कंटाळवाणी वाटण्याची शक्यता आहे. पण कथानकाचा ओघ त्याची फिकीर करत बसत नाही. लेखन विस्कळीत होत चालले आहे की काय असे वाटेवाटेपर्यंत एखादे वाक्य, एखादे प्रतिक, एखादा प्रसंग असे समोर येतात, की वाचकाला आपला समज खोटा ठरल्याचे हायसेही वाटते आणि समोर आलेल्या त्या प्रसंगाबद्दल, प्रतिकाबद्दल तो नव्याने विचार करायला प्रवृत्तही होतो.
‘वेदांचा तो अर्थ आम्हासींच ठावा। येरांनी वहावा भार माथा॥’ या तुकाराम महाराजांच्या ओळींची साक्ष पटवणार्या कडव्या धर्मातिरेकाची, तसेच पाश्चात्यांच्या अंधानुकरणाची काळी बाजू दाखवण्यासाठी लेखकाने या कादंबरीत अतिशय संयत मार्ग अवलंबलेला आहे. आततायी, प्रचारात्मक वाट कटाक्षाने टाळणारी यातील लेखनपध्दती मनावर जो सखोल परिणाम करून जाते, त्याने आंतरराष्ट्रीय राजकारण, परदेशांतील समाजकारण यांत रस असणारे वाचक अतिशय प्रभावित होतील.
मात्र या प्रभावशाली लेखनाला अनेक ठिकाणी सदोष मुद्रितशोधनाचे गालबोट लागलेले आहे. हे आजकाल नव्याने प्रकाशित होणार्या अनेक पुस्तकांच्या बाबतीत दिसून येते. ‘द्य’ आणि ‘द्य’ यांच्या वापराबाबतचा संभ्रम, ‘पहायला भेटलं होतं’सारखे शब्दप्रयोग, ‘विधुर’च्या जागी ‘विदुर’ हा शब्द, ‘तुर्की’च्या जागी ‘तुर्कीश’चा विनाकारण वापर हे सारे पाहिल्यावर एकंदरच मराठी प्रकाशनव्यवसायात उत्तम मुद्रितशोधन करणार्यांची वानवा आहे की काय अशी शंका येते.
तसेच, कादंबरीतील तुर्की विशेषनामे मूळ उच्चारपध्दतीप्रमाणे लिहिली जायला हवी होती असे वाटते. उदाहरणार्थ, कथानायकाचे संपूर्ण नाव (Kerim Alakuşoğlu) ‘करीम अलाकुसोग्लू’ऐवजी ‘करीम अलकुशोलू’ असे यायला हवे. नायकाचे बालपण ज्या शहरात गेले (Nişantaş), त्याचा उच्चार ‘निसान्तास’ असा नसून ‘निशान्ताश’ असा आहे. इण्टरनेटच्या जमान्यात ही माहिती मिळवणे आजकाल फारसे कठीण राहिलेले नाही. या गोष्टी वरवर किरकोळ वाटत असल्या तरी अनुवादाच्या एकसंधतेवर याचा नक्कीच परिणाम होतो.
ओरहान पामुक यांनी तीन वर्षांपूर्वीच्या आपल्या मुंबई दौर्यात पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हटले होते, की "भाषांतरानेच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. काही गोष्टी वा बारकावे भाषांतरात हरवतात, पण काही चांगल्याची भरही पडते." लेखकाच्या या आशावादाची वाचकांना काही ठिकाणी गरज भासते. कारण ही कादंबरी दुहेरी भाषांतराचे घाव सोसून मोठ्या हिमतीने स्वतःला सिध्द करते; वाचकांसमोर ठामपणे उभी राहते.
----------
स्नो. ओरहान पामुक. अनुवाद - विशाल तायडे.
साकेत प्रकाशन. पृष्ठे ४७२. मूल्य ३५० रुपये.
खूप आवडला पुस्तक-परिचय !!!
खूप आवडला पुस्तक-परिचय !!! प्रवाही आणि प्रभावीही !! उत्सुकता निर्माण झालीये पुस्तकाविषयी !
.
.
उत्तम परिचयासाठी धन्यवाद! या
उत्तम परिचयासाठी धन्यवाद!
या कादंबरीबद्दल ओझरते वाचले होते. लायब्ररीत इंग्रजी आवृत्ती मिळाली तर नक्कीच वाचेन!
ललितादेवी, १. >> तुर्की
ललितादेवी,
१.
>> तुर्की सामाजिक संघर्षाचे गोठलेले बर्फ
बर्फ नेहमी गोठेलेलेच असते!
२.
>> या गोष्टी वरवर किरकोळ वाटत असल्या तरी अनुवादाच्या एकसंधतेवर याचा नक्कीच परिणाम होतो.
पूर्णपणे सहमत! मराठी ही वाक्संगत (फोनेटिक) भाषा असल्याने योग्य उच्चार अनुवादित होणे अपेक्षित आहे.
३.
>> .....आंतरराष्ट्रीय राजकारण, परदेशांतील समाजकारण यांत रस असणारे वाचक अतिशय प्रभावित होतील.
किती साली घडते ही कादंबरी? ज्याअर्थी साम्यवादाचा उल्लेख आलाय त्याअर्थी शीतयुद्धाच्या दरम्यान असावी. मात्र अचूक कालखंड कळल्यास औत्सुक्यशमन होईल! ::-)
बाकी आपल्या पुस्तकपरिचयाने औत्सुक्याचे शमन होण्याऐवजी ते अधिकच चाळवले जाते!
आ.न.,
-गा.पै.
चांगली ओळख. पुस्तक मिळवायचा
चांगली ओळख. पुस्तक मिळवायचा प्रयत्न करीन!
चांगला पुस्तक परिचय! वाचणेत
चांगला पुस्तक परिचय! वाचणेत येइल.
अतिशय सुन्दर कादम्बरी
अतिशय सुन्दर कादम्बरी आहे.
इन्ग्लिश आव्रुत्ती खुपच उत्क्रुष्ट आहे.
पुस्तक परिचय आवडला .
पुस्तक परिचय आवडला . वाचन्याचा नक्की प्रयत्न करेल.
मी ओरहान पामुक यांचं ंमाय नेम इस रेड' हे पुस्तक वाचल आहे. ही एक ऐतिहासिक थरारक गोष्ट आहे. हे पुस्तक थेट आपल्याला १६ व्या शतकातल्या इस्तनाबूल मधे घेऊन जाते . पण तुम्ही लिहील्या प्रमाणे "कादंबरी अतिशय धीम्या गतीने पुढे सरकते. ती संथगती काहींना कंटाळवाणी वाटण्याची शक्यता आहे". जर तुम्हाला पामुकांची शैली आवडली असेल तर हे पुस्तक पण आवडेल. आणि इंग्रजी भाषांतरे मधे मूळ भाषे चा गोडवा हरव ला आहे अस मला हे पुस्तक वाचताना नेहमी वाटल.