गंध गावाकडला...

Submitted by किरू on 11 March, 2012 - 23:54

'कोकण' हा शब्द उच्चारल्याबरोब्बर लगेच डोळ्यासमोर उभं राहतं ते देवाने मुक्त हस्ताने उधळलेलं अलौकिक वैभव. देवाने सृष्टी बनवली पण कोकण मात्र त्याने अगदी वेळ काढून आणि मन लावून बनवलं.
आकाशाला भिडणारे माड,पोफळी, निर्मनूष्य आणि म्हणूनच अप्रतिम असे समुद्र किनारे, दोन्ही बाजूने हिरवेगार असलेले लाल मातीचे रस्ते, कौलारू घरं, घरासमोर हटकून दिसणारं तुळशी वृंदावन, साधेपणा जपणारी, मनांतला भक्तीभाव जागृत करणारी देवळं.., तोच साधेपणा मनांत जपणारी माणसं आणि आपुलकी काठोकाठ भरून राहीलेली मालवणी भाषा.
माझ्याकरता सर्वात आनंदाचा क्षण कुठला माहित्येय? ज्याक्षणी माझा कोकणांत जाण्याचा विचार ठरतो तो क्षण.
प्रवासाला निघाल्यापासून तिथून परत निघेपर्यंत मी एका वेगळ्याच धुंदीत असतो. देवाच्या कृपेने माझं आजोळही तिथलच.
यावर्षी फेब्रुवारीत जायचं नक्की केलं. महाशिवरात्रीला दाणोलीला (सावंतवाडी - आंबोली) साटम महाराजांच्या मठात जायचं आणि समार्थांच्या पालखी दर्शनाचा योग साधायचा असं मनांत आलं. मग लगेच प्लॅन तयार झाला.
१८ फेब्रुवारीला निघायचं ठरलं. तस ठरवण्याकरता माझ्याबरोबर इतर कोणी नव्हतच. माझ्याच मनाचा कौल घ्यायचा होता आणि बाईकने एकटाच जाणार म्हटल्यावर घरच्यांचा.
कसंबसं घरच्या मंडळींना राजी केलं. एकटाच बाईकने जातोय म्हटल्यावर अनेकांनी मला वेड्यात काढलं. पण मला हा वेडेपणा करायला लावणार्‍या बर्‍याच गोष्टी को़कणातच आहेत हे त्यांना काय माहीत?
१८ तारखेला, शनिवारी सकाळी ६:३० वाजता अस्मादिक बाईकरूढ झाले.

झाडांमध्ये लपलेला दभोलीमधला (कुडाळ - वेंगुर्ला) पूर्णानंद स्वामींचा मठ

मठाच्या बाजूचा परिसर

सावंतवाडीचं विट्ठल मंदीर

सावंतवाडीमधल्या प्रसिद्ध तळ्याचं रात्रीचं दृष्य

वाडीहून कुडाळला जाताना

मालवण

मालवणचं प्रसिद्ध भद्रकाली मंदीर.. (रेवंडी)

मंदीराबाजूचा परिसर

आंगणेवाडीच्या वाटेवर... जंगलातून जाणारे हे घाटरस्ते वेड लावतात.

गवत उंच दाट दाट, वळत जाय पायवाट, वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे...

१८०० कि.मी. च्या प्रवासात साथ देणारी माझी Thunder Bird

माळरानावरून जाता जाता मध्येच होणारं चकाकतं सागर दर्शन

भर दुपारी मालवणला बहिणीकडे पोचलो. प्रचंड भूक लागली होती. पोचल्यावर लगेच हात पाय धुवून पानावर बसलो. तर हे असं स्वागत झालं. अगदी 'सागर'संगीत जेवण झालं. Happy

माडांच्या गर्दीत आणि कर्ली नदीच्या कुशीत असलेल्या परूळ्याच्या वाटेवर...

कोण पाहूणा आलाय असं म्हणत झाडांतून हळूच डोकावणारी कौलारू घरं..

परुळे गावातली दुतोंड वाडी हे माझं आजोळ. नितांत सुंदर असा निसर्ग लाभलेल्या गावातलं हे पुरुषोत्तमाचं देखणं देऊळ

घरी नेणारा लाल मातीचा नागमोडी रस्ता

भोगव्याचा किनारा..

हे सगळं अनुभवताना मनाला तृप्तता अशी येतच नाही. अजुन फिरायचय.. अजुन पहायचय असं सतत वाटत राहतं.
कर्लीच्या पुलावरून पाहिलेला अविस्मरणीय सूर्यास्त, पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात घाटी चढून जाताना चंद्राच्या नीतळ प्रकाशात न्हाऊन निघालेला खालचा परिसर.. नदी आणि त्याही पलीकडे असलेला तो चमचमणारा चंदेरी समुद्र. अंधार पडल्यावर माझा मामेभाऊ, दीपक आणि शेजारचा गुरू यांच्याबरोबर जाऊन नदीवर पकडलेल्या कुर्ल्या, गार गार वारा अंगावर घेत, नदीवरच्या छोट्याशा पूलावर पहुडताना पाहिलेल्या असंख्य चमचमत्या चांदण्या, त्याचवेळेस त्या शांततेला चिरणारा, लांबवरून येणारा एखाद्या टिटवीचा आवाज, चुलीवरच्या जेवणाचा घमघमाट, रानातला सुगंध, काजी भाजतानाचा खरपूस वास, तेवणार्‍या एखाद्याच समईच्या प्रकाशाने आणि उदबत्तीच्या धुराने भारलेला देवळाचा अंधारा गाभारा, भर दुपारी पोफळीच्या बागेत शिरून अनुभवलेला तो थंडावा. रात्री एक, दीडच्या सुमारास आंबोलीच्या जंगलातून निर्मनुष्य रस्त्यावरून खाली सावंतवाडीत उतरताना आंत आंत शिरलेला गारवा.., दिवेलागणीला पुरुषोत्तमाच्या देवळांत अनुभवलेली अभूतपूर्व शांतता..
किती आठवणी!!
तिथला निसर्ग आणि प्रत्येक वेळेस प्रेमाने चौकशी करणारा, पाहुणचार करणारा कोकणी माणूस यांच्या प्रेमात आपण कधी पडतो हे आपल्यालाच कळत नाही. .

आलो तेंव्हा शेजार पाजारचे सगळे 'किरणो मोटरसायकल घेऊन इलो हा' म्हणत माझ्या भोवती गोळा झाले होते. सगळ्यांच्या नजरेत आश्चर्य आणि कौतुक.
'कधी इलस?, कसो इलस?' 'किती वेळ लागलो?' 'वाटेत कसलो त्रास झालो नाय मा?' 'खय थांबलस?' प्रेमाने विचारलेले असंख्य प्रश्न.. पुढच्या वेळेस मोटरसायकलने यायचं नाही असं प्रेमाने दटावणारी शेजारची आजी.
जातानाही आपल्याच घरचा पाहूणा निघालाय अशा रितीने प्रेमाचा निरोप देणारी ही माणसं. हे सगळं सोडून यायचं जीवावर येतं.

फोटोतून जमेल तेवढं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलाय. पण खरं कोकण अनुभवण्याकरता 'येवा, कोकण आपलाच असा' हे निमंत्रण मनावर घेऊन तिथे जायला हवं.. तो स्वर्ग अनुभवायला हवा.

गुलमोहर: 

किरण,
अरे मागची सीट रिकामी????
क्या बात है?
फोटो लय भारी आहेत. लाल मातीचे रस्ते खुप दिवसांनी बघत आहे. नदी काठ्चे देऊळ,रस्ते,नदी,
नारळाची झाडे सर्व काही अप्रतिम. एकट्यानी एवढा प्रवास !!!!! सलाम आहे तुला आणि तुझ्य थंडर बर्डला.
प्रवास वर्णन म्हणजे 'याची डोळा पाहीले' असे वाटते.

किर्‍या,किडे आणि वेड या दोन गोष्टी असल्याशिवाय असे प्र्वास होत नाहीत.! Happy
पणजी ते इकडे राजापूर व्हाया गगन्बावडा असा प्राकार आणि असेच अनेक बाईकप्रवास आठवले आमचे!
TB घ्यायची इच्छा प्रबळ केलीस!

Zakas ! Happy

Pages