'कोकण' हा शब्द उच्चारल्याबरोब्बर लगेच डोळ्यासमोर उभं राहतं ते देवाने मुक्त हस्ताने उधळलेलं अलौकिक वैभव. देवाने सृष्टी बनवली पण कोकण मात्र त्याने अगदी वेळ काढून आणि मन लावून बनवलं.
आकाशाला भिडणारे माड,पोफळी, निर्मनूष्य आणि म्हणूनच अप्रतिम असे समुद्र किनारे, दोन्ही बाजूने हिरवेगार असलेले लाल मातीचे रस्ते, कौलारू घरं, घरासमोर हटकून दिसणारं तुळशी वृंदावन, साधेपणा जपणारी, मनांतला भक्तीभाव जागृत करणारी देवळं.., तोच साधेपणा मनांत जपणारी माणसं आणि आपुलकी काठोकाठ भरून राहीलेली मालवणी भाषा.
माझ्याकरता सर्वात आनंदाचा क्षण कुठला माहित्येय? ज्याक्षणी माझा कोकणांत जाण्याचा विचार ठरतो तो क्षण.
प्रवासाला निघाल्यापासून तिथून परत निघेपर्यंत मी एका वेगळ्याच धुंदीत असतो. देवाच्या कृपेने माझं आजोळही तिथलच.
यावर्षी फेब्रुवारीत जायचं नक्की केलं. महाशिवरात्रीला दाणोलीला (सावंतवाडी - आंबोली) साटम महाराजांच्या मठात जायचं आणि समार्थांच्या पालखी दर्शनाचा योग साधायचा असं मनांत आलं. मग लगेच प्लॅन तयार झाला.
१८ फेब्रुवारीला निघायचं ठरलं. तस ठरवण्याकरता माझ्याबरोबर इतर कोणी नव्हतच. माझ्याच मनाचा कौल घ्यायचा होता आणि बाईकने एकटाच जाणार म्हटल्यावर घरच्यांचा.
कसंबसं घरच्या मंडळींना राजी केलं. एकटाच बाईकने जातोय म्हटल्यावर अनेकांनी मला वेड्यात काढलं. पण मला हा वेडेपणा करायला लावणार्या बर्याच गोष्टी को़कणातच आहेत हे त्यांना काय माहीत?
१८ तारखेला, शनिवारी सकाळी ६:३० वाजता अस्मादिक बाईकरूढ झाले.
झाडांमध्ये लपलेला दभोलीमधला (कुडाळ - वेंगुर्ला) पूर्णानंद स्वामींचा मठ
सावंतवाडीमधल्या प्रसिद्ध तळ्याचं रात्रीचं दृष्य
मालवणचं प्रसिद्ध भद्रकाली मंदीर.. (रेवंडी)
आंगणेवाडीच्या वाटेवर... जंगलातून जाणारे हे घाटरस्ते वेड लावतात.
गवत उंच दाट दाट, वळत जाय पायवाट, वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे...
१८०० कि.मी. च्या प्रवासात साथ देणारी माझी Thunder Bird
माळरानावरून जाता जाता मध्येच होणारं चकाकतं सागर दर्शन
भर दुपारी मालवणला बहिणीकडे पोचलो. प्रचंड भूक लागली होती. पोचल्यावर लगेच हात पाय धुवून पानावर बसलो. तर हे असं स्वागत झालं. अगदी 'सागर'संगीत जेवण झालं. 

माडांच्या गर्दीत आणि कर्ली नदीच्या कुशीत असलेल्या परूळ्याच्या वाटेवर...
कोण पाहूणा आलाय असं म्हणत झाडांतून हळूच डोकावणारी कौलारू घरं..
परुळे गावातली दुतोंड वाडी हे माझं आजोळ. नितांत सुंदर असा निसर्ग लाभलेल्या गावातलं हे पुरुषोत्तमाचं देखणं देऊळ
घरी नेणारा लाल मातीचा नागमोडी रस्ता
हे सगळं अनुभवताना मनाला तृप्तता अशी येतच नाही. अजुन फिरायचय.. अजुन पहायचय असं सतत वाटत राहतं.
कर्लीच्या पुलावरून पाहिलेला अविस्मरणीय सूर्यास्त, पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात घाटी चढून जाताना चंद्राच्या नीतळ प्रकाशात न्हाऊन निघालेला खालचा परिसर.. नदी आणि त्याही पलीकडे असलेला तो चमचमणारा चंदेरी समुद्र. अंधार पडल्यावर माझा मामेभाऊ, दीपक आणि शेजारचा गुरू यांच्याबरोबर जाऊन नदीवर पकडलेल्या कुर्ल्या, गार गार वारा अंगावर घेत, नदीवरच्या छोट्याशा पूलावर पहुडताना पाहिलेल्या असंख्य चमचमत्या चांदण्या, त्याचवेळेस त्या शांततेला चिरणारा, लांबवरून येणारा एखाद्या टिटवीचा आवाज, चुलीवरच्या जेवणाचा घमघमाट, रानातला सुगंध, काजी भाजतानाचा खरपूस वास, तेवणार्या एखाद्याच समईच्या प्रकाशाने आणि उदबत्तीच्या धुराने भारलेला देवळाचा अंधारा गाभारा, भर दुपारी पोफळीच्या बागेत शिरून अनुभवलेला तो थंडावा. रात्री एक, दीडच्या सुमारास आंबोलीच्या जंगलातून निर्मनुष्य रस्त्यावरून खाली सावंतवाडीत उतरताना आंत आंत शिरलेला गारवा.., दिवेलागणीला पुरुषोत्तमाच्या देवळांत अनुभवलेली अभूतपूर्व शांतता..
किती आठवणी!!
तिथला निसर्ग आणि प्रत्येक वेळेस प्रेमाने चौकशी करणारा, पाहुणचार करणारा कोकणी माणूस यांच्या प्रेमात आपण कधी पडतो हे आपल्यालाच कळत नाही. .
आलो तेंव्हा शेजार पाजारचे सगळे 'किरणो मोटरसायकल घेऊन इलो हा' म्हणत माझ्या भोवती गोळा झाले होते. सगळ्यांच्या नजरेत आश्चर्य आणि कौतुक.
'कधी इलस?, कसो इलस?' 'किती वेळ लागलो?' 'वाटेत कसलो त्रास झालो नाय मा?' 'खय थांबलस?' प्रेमाने विचारलेले असंख्य प्रश्न.. पुढच्या वेळेस मोटरसायकलने यायचं नाही असं प्रेमाने दटावणारी शेजारची आजी.
जातानाही आपल्याच घरचा पाहूणा निघालाय अशा रितीने प्रेमाचा निरोप देणारी ही माणसं. हे सगळं सोडून यायचं जीवावर येतं.
फोटोतून जमेल तेवढं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलाय. पण खरं कोकण अनुभवण्याकरता 'येवा, कोकण आपलाच असा' हे निमंत्रण मनावर घेऊन तिथे जायला हवं.. तो स्वर्ग अनुभवायला हवा.












































पुढच्या वेळेस मोटरसायकलने
पुढच्या वेळेस मोटरसायकलने यायचं नाही असं प्रेमाने दटावणारी शेजारची आजी.
प्रचिपण लय भारी
जातानाही आपल्याच घरचा पाहूणा निघालाय अशा रितीने प्रेमाचा निरोप देणारी ही माणसं. हे सगळं सोडून यायचं जीवावर येतं. >>>> यातच सर्व येत , मस्त रे किरु
सगळेच प्रचि, लई भारी
सगळेच प्रचि, लई भारी
अप्रतिम. कोकणाचे सुरेख दर्शन.
अप्रतिम. कोकणाचे सुरेख दर्शन. आणि बाइकवरून फिरण्यात तर आणखीच बहार
राम चालेल मला Healthy
राम

चालेल मला Healthy Competition
ग्रेट.....!
ग्रेट.....!
किर्या, सगळे प्रचि एक से एक
किर्या,
सगळे प्रचि एक से एक आहेत.
सगळे फोटो एकापेक्षा एक
सगळे फोटो एकापेक्षा एक आहेत
पण सागर संगीत जेवण यम्म्म्म्म्म्म्म्म्म्म.
च्यायला, काय चित्रं आहेत राव,
च्यायला, काय चित्रं आहेत राव, कस्काय जमतं तुम्हाला काही समजत नाही
पुन्हा एकदा टोपी काढली
काय लिहावं तेच समजत नाही आहे
किरु.... एकदम मॅड फोटोज यार
किरु.... एकदम मॅड फोटोज यार !!
अप्रतिम.
अप्रतिम.
>>काय लिहावं तेच समजत नाही
>>काय लिहावं तेच समजत नाही आहे>> आक्षी खरं!! जिप्स्याला मुजरे घालून झाले आता तुला रे किरु !!
ती लाल मातीची पाणंद, माडाची झाडा, कौलारु घरा बघून खुळवाक झाला हा.
आईशप्पथ.. सुरेख फोटोज, मस्त
आईशप्पथ.. सुरेख फोटोज, मस्त वर्णन! जीव घेणार रे तुम्ही लोक एक दिवस.. कोकण, रॉयल एन्फील्ड आणि क्याम्रा. आणि तेही एकट्यानंच? बासच. खल्लास.
कोकणात लै रेमटावलीये बाईक.. पण नेहमीच पल्सर, स्प्लेंडर, आरेक्स१०० वगैरे.. रॉयल एनफील्डवर कोकणभ्रमंती करायची तीव्र इच्छा आहे. सध्या इनोवर भागवतो आहे!
जिप्स्या सावध हो.. तुझ्या
जिप्स्या सावध हो.. तुझ्या इलाक्यात अजुन एक तगडा स्पर्धक एंट्री करतो आहे..>>>>
राम , हा भिडू जुनाच आहे. मध्येच गायब झाला होता म्हणून जिप्स्याचं फ़ावलं


फारतर जिप्स्या किरुला स्पर्धक म्हणुन आला आणि डोइजड झाला असं म्हणा.
किर्या, आता थांबू नकोस रे बाबा !
मस्तच कोकणची लालमाती आणि
मस्तच
कोकणची लालमाती आणि चीऱ्याची घरे मनाला भुरळ घालतात.
सुंदर फोटो़!! पण
सुंदर फोटो़!!
पण पुढच्यावेळेस बाईकवरून एकटा जाऊ नकोस रे... मित्रांचा गृप असेल तर मग ठीक....
वा! नेत्रदीपक फोटो.
वा! नेत्रदीपक फोटो. आवडले!
'येवा, कोकण आपलाच असा' हे निमंत्रण मनावर घेऊन तिथे जायला हवं.. तो स्वर्ग अनुभवायला हवा.>>>
हेही पटले. रुचले.
तो स्वर्ग अनुभवून, आमच्यापर्यंत यथास्थित पोहोचवल्याखातर मन:पूर्वक धन्यवाद!
हा भिडू जुनाच आहे. मध्येच
हा भिडू जुनाच आहे. मध्येच गायब झाला होता म्हणून जिप्स्याचं फ़ावलं >>>>>फावायचं काय त्याच्यात. त्या काय "रिकाम्या जागा होत्या का" भरायला.
फारतर जिप्स्या किरुला स्पर्धक म्हणुन आला आणि डोइजड झाला असं म्हणा.>>>>>>असंही बर्याच लोकांना डोईजड झालोयच
किरू, तु मात्र असेच मस्त प्रचि टाकत जा.
किरण मस्तच फोटो रे... माझ गाव
किरण मस्तच फोटो रे... माझ गाव वेंगुर्ला... सातेरी देवी चा मागे परब वाड्यात आमच घर आहे.
यीथे कतार ला बसल्या बसल्या मला तु कोकणात नेलसरे... अप्रतीम ...संजय परब..
सुरेख फोटो.
सुरेख फोटो.
किरु, सुरमई रवा फ्राय का रे?
किरु, सुरमई रवा फ्राय का रे? आणि लाल कालवण? मजा आहे एका मुलाची
अगदी रॉयल सफर झालेली दिसतेय..
अप्रतिम फोटो.
अप्रतिम फोटो.
किरु, तुजा आवतान नाकारल्याचो
किरु, तुजा आवतान नाकारल्याचो परिणाम एवढो भयंकर..?? दुसर्या ट्रेकांक उगाच गेलंय असा झालाहां!! भन्नाट प्रचि नि वर्णन.
मस्त फोटो आणी वर्णन
मस्त फोटो आणी वर्णन
वा सुरेख फोटो !!
वा सुरेख फोटो !!
किरू बावा , सुंदर सुंदर !!!
किरू बावा , सुंदर सुंदर !!!
<< ह्म्म्म्म्म, आता मरायला
<< ह्म्म्म्म्म, आता मरायला काही हरकत नाही >> गेल्या जन्मीं मीं असंच म्हणालो होतो, तरीही ह्या जन्मीही कोकणाच्याच पाशात अडकलोय !!!
मित्रा, सुंदर
मित्रा,
सुंदर प्रचि...
मंदिराचा फोटो तर फारच छान...
अशीच निरव शांतता असलेली देवळे मला आवडतात..
किरु, झब्बुसाठी तयार
किरु, झब्बुसाठी तयार रहा...
या मे महिन्यात कोकण, बाईक, अन नवा SLR कॅमेरा सर्वकाही तयार आहे...
गिरीश... झब्बुसाठी तयार
गिरीश...
झब्बुसाठी तयार रहा...>>>... एक सांगू का?... मे महिन्यातली कोकण ट्रीप शक्यतो रद्द करा, कारण यंदा पाण्याचे हाल खूप लवकर सुरु झालेत. त्यामुळे तुम्हां लोकांचे खरेच हाल होतील, शिवाय जे अपेक्षीत निसर्ग-सौन्दर्य तुम्हाला अनुभवायचे आहे, ते मे महिन्यात अनुभवता येणार नाही... त्यापेक्षा तुम्ही दसरा-दिवाळी नंतरचा सिझन कोकण-सफरी साठी निवडा, अशी माझी एक विनंती...
मस्त फोटो - किरु
मस्त फोटो - किरु
Pages