सँटा फे, इ.

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

माझी एक मैत्रीण आहे. एकदा ती सुट्टी घेऊन एका ठिकाणी गेली. जिथे गेली ते गाव पॉप्युलर पटेल पॉइंट्स पैकी खासच नव्हतं. सहसा ती किंवा मी सुट्टी घेऊन कुठे गेलो की सुट्टीचे दिवस, आधीची, नंतरची आवराआवरी झाल्यावरच निवांत बोलणं होतं. ह्या वेळी मात्र तिचा तिथे पोचल्यावर दुसर्‍या-तिसर्‍या दिवशीच फोन आला. अगदी भरभरुन बोलत होती. एकूण ते ठिकाण मैत्रिणीला भयंकर आवडले होते. गूगल केल्यावर तिथे ऑगस्टात एक (रेडवाले) इंडियन मार्केट पण असते असे समजले. ठरलं! यंदा तिथेच उन्हाळ्याची सांगता करायची. उन्हाळा काही तिथे जाण्यासाठी 'आयडियल' ऋतू नाही. पण इंडियन मार्केट गाठायचं तर उन्हाळ्यातच जायला हवं. मग शोधाशोध करुन ऑगस्टातल्या त्या बाजाराच्या तारखांना धरुन विमान, हॉटेल, गाडी इ तजवीज केली आणि आम्ही त्या गावी धडकलो. तर त्या गावाची आणि आसपासच्या ठिकाणांची ही छोटी(?)शी ओळखः-

न्यू मेक्सिको हे अमेरिकेतले साऊथ वेस्टकडील एक राज्य. अलास्का आणि ओक्लाहोमाच्या खालोखाल इथे नेटिव्ह अमेरिकन्सची लोकसंख्या आहे. न्यू मेक्सिकोच्या ध्वजावर सुद्धा नेटिव्ह अमेरिकन्स ज्याला सूर्य संबोधतात त्या झिया (Zia) चे चिन्ह आहे. मेक्सिको पासून अगदी जवळ असल्याने इथे स्पॅनिश लोक सुद्धा भरपूर संख्येने आहेत. ह्या भागाला न्यू मेक्सिको हे नाव मेक्सिकोहून आलेल्या एका भटक्याने पहिल्यांदा दिले आणि पुढे हेच नाव रुढ झाले. सँटा फे ही नगरी ह्या न्यू मेक्सिकोची राजधानी. ह्या नगरीचे पूर्ण नाव आहे La Villa Real de la Santa Fé de San Francisco de Asís" ("The Royal Town of the Holy Faith of St. Francis of Assisi").

आम्ही न्यू यॉर्कहून (JFK) अल्बुकर्की (Albuquerque) ला गेलो. इंडियन मार्केट आणि आजूबाजूची ठिकाणं बघायला सोयीचे पडेल म्हणून हॉटेल सँटा फे गावापासून जवळ बुक केले होते. अल्बुकर्की ते सँटा फे अंतर साठेक मैल आहे. रस्त्याने 'लास वेगस' कडे जाणारे फाटे लागतात. पण मोहात न पडता आपण न्यू मेक्सिको बघायला आलोत हे लक्षात ठेवून गाडी पुढे हाकावी. सँटा फे गावातच अगदी मध्यवर्ती ठिकाणी ला फोंडा (La Fonda) नावाचे पारंपारिक पद्धतीचे बांधकाम केलेले सुंदर हॉटेल आहे. हॉटेल बघितल्यावर तिथे बुकिंग केलं नाही ह्याची फार हळहळ वाटली.

१. रिओ ग्रान्दे गॉर्ज (Rio Grande Gorge)

सँटा फे पासून साधारण सत्तर मैलांवर हे ठिकाण आहे. हा सगळा रस्ता फार सुरेख आहे. लालसर रंगाचे डोंगर, खुरटी झुडपे, मोजून मापून तासल्यासारखे लाल दगड-धोंडे सगळ्या रस्त्याने दिसत राहतात. अर्धा रस्ताभर एका बाजूस उंच डोंगर आणि दुसर्‍या बाजूस खळाळत वाहणारी रिओ ग्रान्दे नदी सोबत करतात. मध्येच ताओस गाव लागते. ताओसच्या अलीकडेच दूरवर जमिनीला मोठी भेग दिसायला लागते तीच रिओ ग्रान्दे गॉर्ज. गॉर्जवर बांधलेला पूल हे मुख्य आकर्षण (पटेल पॉइंट). हा पूल नदीपासून ६५० फूट उंचीवर बांधला आहे. पुलाच्या एका बाजूला दागिने, बसकरं, मडकी अशा सामान-सुमानाचा एक छोटा बाजार भरला होता.

IMG_0102.JPGIMG_0119.JPGIMG_0086.JPG

अधिक माहितीसाठी इथे आणि इथे टिचकी मारा.

२. पेब्ले डे ताओस (Pueblo de Taos)

सँटा फे कडून रिओ ग्रान्दे गॉर्जकडे जाताना ताओस सोडल्यावर जरा उजव्या बाजूस (चि र(स्ते) कां जीपीस ताईंच्या भाषेत 'slight right') एक फाटा पेब्ले डे ताओसकडे जातो. तो रस्ता घेतल्यावर मैलभरातच आपण एका वर्ल्ड हेरिटेजमध्ये प्रवेश करतो. तेराव्या शतकात जन्मास आलेल्या Pueblo Indian लोकांची ही वस्ती अजून विजेसारख्या आधुनिक सुविधांशिवाय रहाते. इथली लाल मातीची घरं, वस्तीच्या मध्यातून वाहणारा स्वच्छ पाण्याचा ओहोळ आणि घरांच्या बाहेर ठेवलेली जुन्या पद्धतीची वाद्यं आणि इतर साधन-सामुग्री बघायला एकदम छान वाटलं. वस्तीच्या पार्श्वभूमीस असलेले डोंगर चित्र पूर्ण करतात. ह्यातली काही घरं आत जाऊन बघता येतात. इथे घरांच्या बाहेर अंगणात लोकांनी स्वहस्ते बनवलेले दागिने विक्रीस ठेवले होते.

तिथली दोन-तीन मजली मातीची घरं:

IMG_0125.JPGIMG_0134.JPG

चर्चः
IMG_0127.JPG

चमाड्याचे एक वाद्यः
IMG_0138.JPG

ओहोळ:
सगळ्या वस्तीचा पिण्याच्या पाण्याचा हा स्त्रोत. त्यावर एका ठिकाणी वस्तीच्या दुसर्‍या भागात जाण्यासाठी लाकडी फळ्या घालून पूल बनवला आहे. तिथून जाताना पुलाच्या मध्यभागातून जायचे असे सांगण्यात आले. म्हणजे चपलेला लागलेली धूळ-माती पाण्यात पडत नाही.

IMG_0149.JPG

अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.

** ताओस गावात बरीच रेस्टॉरंट आहेत. गॉर्मे शॉप्स, लोकल चॉकोलेट शॉप्स आहेत. गावात भटकंतीसाठी एखादा तास राखून ठेवायला हरकत नाही.

३. इंडियन मार्केट

हा वार्षिक सोहळा बघायचा म्हणून आम्ही भर ऑगस्टात- भर उन्हाळ्यात सॅंटा फे गाठलं होतं. सँटा फे गावातच हा बाजार भरतो. पाचशेहून अधिक वेगवेगळ्या जमातीच्या लोकांनी आपली कलाकुसर सादर करायला इथे हजेरी लावली होती. दरवर्षी लावतात. शेकडो छोटी-छोटी दुकानं लागली होती. हस्तकलेचे विविध नमुने- टर्क्वाइज-जेड-कोरल-मदर ऑफ पर्लचे दागिने, मातीत घडवलेली स्वयंपाकाची उपकरणी, मेक्सिकन घरांच्या आणि लोकांच्या मातीच्या प्रतिकृती, बसकरं, सतरंज्या, पखाली, रेड इंडियनांचे पारंपारिक पोशाख तिथे बघायला मिळाले. आणखी बरेच दगड-धोंडे प्रकार होते जे आम्हाला समजले नाहीत. सर्वच वस्तू सुंदर होत्या ह्यात वाद नाही पण तिथली बसकरं आणि त्यांच्या किमती बघता भारतात जायचं तिकिट काढून आपल्या देशातल्या विणकरांनी विणलेली बसकरं आणणं परवडलं असतं. ह्यात अतिशोयक्ती अजिबात नाही. तात्पुरत्या उभारलेल्या स्टॉल्समधून विकल्या गेलेल्या वस्तूंची मिलियन डॉलर उलाढाल तिथे दर वर्षी होते. एका स्टॉलवर एक आजीबाई तिची नेहमीची स्टॉलवाली दिसली नाही म्हणून चौकशी करताना दिसल्या.

ही स्वयंपाकाची उपकरणी:
IMG_0203.JPG

मातीच्या बाहुल्या इ विकायला ठेवून गिर्‍हाइकांच्या प्रतीक्षेत एक काकू :
IMG_0220.JPG

मातीच्या घराची प्रतिकृती:
IMG_0232.JPG

पखाली (?):
IMG_0206.JPG

स्त्रियांचा पारंपारिक पोशाख:
IMG_0227.JPG

हे असे खूप बहुरुपी तिथे होते:
IMG_0210.JPG

मातीच्या प्रतिकृती:
IMG_0218.JPGIMG_0219.JPG

एका ठिकाणी खूप गर्दी जमली होती. कोपर्‍यात गर्दीच्या वर डोकावणारी पिसं, भाले दिसले म्हणून गेलो तर रेड इंडियन वेषभूषा स्पर्धा सुरु होती. सगळ्या अमेरिकेतून लोक सोंग घेऊन आले होते. प्रेक्षकांमध्ये न्यू यॉर्कहून आलेला एक जण भेटला. त्याला भेटून आपणच अडीच वेडे इतक्या दूरून आलो नाहीत ह्याचं जरा बरं वाटलं. सगळा बाजार भटकून झाल्यावर तिथल्या सुव्हेनुर शॉपमधून लाल मिरच्यांचे छाप असलेले टंपाळ घेतले आणि हॉटेलचा रस्ता धरला.

वेषभूषा स्पर्धेतले स्पर्धकः
IMG_0213.JPGIMG_0216.JPGIMG_0212.JPG

अधिक माहितीसाठी इथेइथे पहा.

** ह्या बाजारात खूप कमी दुकानांत क्रेडिट कार्ड घेतात त्यामुळे कॅश सोबत ठेवा.
*** इथल्या वस्तू, दागिने ह्यांच्या किमती इतक्या आवाच्या सव्वा आहेत की फारशी कॅश बाळगली नाही तरी चालेल.

४. सेंट फ्रान्सिस कॅथेड्रल

गावातच एका बाजूस हे कॅथेड्रल आहे. फ्रेंच पद्धतीचे बांधकाम केलेली ही संपूर्ण इमारत लाईम स्टोनपासून बनवली आहे. स्टेन ग्लासचा अगदी सढळ वापर केलेला दिसतो. चर्चची आतली बाजू स्टेन ग्लास आणि सोनेरी रंगामुळे खूप सुंदर दिसते. इथे फार वेळ थांबता आले नाही कारण...

अशा प्रकारचे प्रार्थनास्थळ बघण्याची लेकाची पहिलीच वेळ होती. आत गेल्या गेल्या चौफेर नजर फिरवून स्पष्ट खणखणीत आवाजात प्रश्न, 'What is that guy doing up there ?' आतल्या शांततेत त्याचा आवाज जरा जास्तच लाउड आणि क्लिअर. तिथेच बसलेल्या एका आजीबाईंनी असं काही बघितलं आमच्याकडे. त्यांना शक्य असतं तर त्यांनी नुसत्या नजरेने आम्हाला वर छताला उलटं टांगलं असतं. त्याला बखोटीला धरुन शक्य तितक्या वेगाने चर्चमधून काढता पाय घेतला. तेव्हापासून जिथे कुठे जाणार असू त्या ठिकाणाबद्दल लेकाला दोन शब्द आधीच सांगण्याची सवय लावून घेतली आहे.

IMG_0306.JPGIMG_0312.JPG

५. सँटा फे डाउन टाउन

काय लिहिणार ! अतिशय सुंदर सुबक गाव आहे. गावात दोन्ही तिन्ही वेळा गेलो तेव्हा तिथल्या रस्त्यांवरुन रमत गमत चक्कर मारत, मध्येच एखाद्या दुकानात शिरुन थोडी खरेदी, एखाद्या चौकात कुणी अवलिया आपली कला सादर करत असेल त्याची मौज घेत वेळ कसा गेला खरोखर कळलंच नाही. अँटिक्स आणि लेदरच्या वस्तू अपार मिळतात. इथे घासाघीस पण होते..होत असावी. एका हँड बॅगची किंमत ऐकून मी पाठ वळवल्यावर दुकानातल्या काकू 'तुला केवढ्याला हवी ?' असं म्हणाल्या तेव्हा लक्षात आले. त्यानंतर मात्र मी घासाघीस कौशल्य पणास लावून बॅग हस्तगत केली. सँटा फे गावात आणि आजूबाजूस असंख्य आर्ट गॅलरिज/स्टुडिओज आहेत. झुरिकला गेलो होतो तेव्हा दिवसाच्या कुठल्याही प्रहरी कॅफेच्या बाहेर बसून कॉफी ढोसत सिगरेटी फुंकणारी तिथली जनता बघितली तेव्हा हेच त्यांचं जगणं असं वाटलेलं. तसं इथे लोकं कलेशिवाय दुसरं काही जगतच नाहीत असं वाटत राहतं. गावात सगळ्या रस्त्यांवर कुठे कुठे आर्ट पीसेस ठेवले/लावले आहेत.

IMG_0248.JPGIMG_0241.JPGIMG_0242.JPGIMG_0190_0.JPGIMG_0192.JPG

मेक्सिकन फूड आवडत असेल तर खाण्या-पिण्याची इथे भरपूर चंगळ आहे. तशी ती सगळीकडेच असते पण इथे शाकाहारींना सुद्धा फक्त सॅलड किंवा फ्राइज वगैरे खाण्यावर समाधान मानावं लागत नाही. गावात भटकत असताना एक आजीबाई स्वतःहूनच फोटो काढून देते म्हणाल्या. दोन दिवस तिथे राहून सुद्धा आम्ही कॅफे पास्काल मध्ये जेवलो नाही ह्याचं त्यांना भारीच आश्चर्य वाटलेलं दिसलं. आम्हाला ह्या कॅफेचं नाव सुद्धा माहिती नव्हतं. आजीबाईंना टाटा केल्यावर अर्थातच आम्ही आधी ह्या कॅफेचा रस्ता धरला. तिथे पोचल्यावर आता आश्चर्याची पाळी आमच्यावर आली. दुपारी एक वाजता 'ब्रंच'ची वेटिंग लाइन ४५ मिनिटांची होती. तिथे नंबर लावला. पण फारच अपेक्षाभंग झाला. मेनु अगदी मोजका होता , जेवण पण काही खास नव्हते.

IMG_0251.JPG

कॅफेच्या समोरच्या चौकात ओबड-धोबड दगडांचा वापर करुन बनवलेलं कारंजं आहे. कारंज्याच्या भोवती दगडांची बाकडी आहेत.

IMG_0256.JPG

चौक ओलांडून गेलं की समोरच द चिली नावाचं गॉर्मे शॉप आहे. तिथे आपल्या गिट्सच्या इंस्टंट इडली बिडली पिठांसारखे इंस्टंट साल्सा पाकिटं मिळाली. तयार साल्साचे पण छपन्न प्रकार होते. तिथ आम्ही ग्रीन आणि रेड चिली सॉस घेतले, अप्रतिम होते.

६. बान्देरा ज्वालामुखी

पहिले दोन दिवस सँटा फे गाव आणि आजूबाजूची ठिकाणं बघण्यात घालवल्यावर आम्ही जरा अल्बुकर्कीकडे सरकलो. आजवर कधी ज्वालामुखी बघितलेला नसल्याने बान्देरा बघायचाच होता. अल्बुकर्कीपासून पश्चिम दिशेस १०० मैलांवर हे ठिकाण आहे. मुख्य रस्ता सोडल्यावर २५ मैलांची स्टेट पार्कमधून जाणारी चढण आहे. वळणा-वळणांचा, जंगलातून जाणारा हा रस्ता जितका सुरेख तितका निर्जन आहे. वस्ती नाही, इतर वाहनं नाहीत, टुरिस्ट इन्फॉरमेशन सेंटर्स नाहीत, गॅस स्टेशन नाहीत, हरणा-बिरणांचे फक्त बोर्ड दिसतात. इथल्या सगळ्याच ठिकाणांचं ते वैशिष्ट्य म्हणता येईल. आपण नक्की चुकलो आणि आता परतीचा रस्ता धरावा की थोडं आणखी पुढे जावं असं वाटल्या शिवाय आपण इप्सित स्थळी पोचतच नाही. जीव यथायोग्य टांगणीला लागल्यावर एकदाचा ज्वालामुखीकडे जाणारा 'बाण' दिसला.

गाडी पार्क करुन टुरिस्ट सेंटरमध्ये गेलो. हे ठिकाण Candelaria कुटुंबाच्या अधिपत्यात आहे. इथली सर्व व्यवस्था तेच बघतात. हे त्यांच्या मालकीचं आहे की काय माहिती नाही. समोरचा डोंगर चढून गेल्यावर ज्वालामुखी दिसेल अशी माहिती तिथे मिळाली. अस्वल दिसल्यास मोठ्याने आरडा-ओरडा करा म्हणे (आवाज तर फुटला पाहिजे!). पलीकडच्या डोंगरावर ही अस्वले राहतात आणि अधून मधून रस्ता चुकतात. आलीया भोगाशी.. म्हणत निघालो. रस्त्यात एक जाडजूड काठी उचलून घेतली उगीच. ज्वालामुखी दहा हजार वर्षांपूर्वी उसळला होता. हे फील्ड ऑफ लाव्हा आहे असे वाचले होते पण म्हणून सगळीकडे कोळसाच कोळसा असेल असे अजिबात वाटले नव्हते. साधे 'समर फ्लिप-फ्लॉप्स' घालून अजिबात चालता येत नव्हते. तिथे चांगली ग्रिप असलेले ट्रेकिंग शूज घालूनच जायला हवे. बरं त्या कोळशावर चालताना होणार्‍या आवाजाने अस्वलास आम्ही इकडे आहोत हे कळेल ही पण भिती होतीच. ही चढण चढताना खूप झाडांची अर्धवट जळकी खोडं दिसतात. कोळशातून उगवलेली, फुललेली रोपटी दिसतात. निसर्गाचीच दोन रुपं एकमेकांवर कुरघोडी करतात जणू.

डोंगर चढल्यावर आठशे फूट खोल आणि अर्धा मैलभर परिघ असलेला हा कोन समोरा येतो. आता निद्रिस्त असला तरी तो कोन बघितल्यावर पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही. भरीस भर व्होल्कॅनो चित्रपटातली दृष्य आठवतात. लेकाला खांद्यावर घेऊन कितपत बुंगाट पळता येईल असाही एक विचार मनास शिवून गेला. कोनाच्या एका बाजूस जमिनीला भली मोठी भेग पडलीये. पानांची सळसळ, आमचा पायरव, झाडांची जळकी-कुजकी खोडं, ती भेग सगळं एकदम गूढ वातावरण वाटत होतं. जरा वेळ थांबून फोटो काढून तिथे पडलेले पाच सहा दगडधोंडे घेतले आणि परतीची वाट धरली. वाटेत आणखी चार-दोन (मानवी) जोडपी दिसल्यावर फारच हुश्श वाटले. अस्वल काही कुठे दिसले नाही.

IMG_0505.JPG

७. बर्फाची गुहा

टुरिस्ट सेंटरच्या एका बाजूने ज्वालामुखीकडे जाता येतं तर दुसर्‍या बाजूसच ही बर्फाची गुहा आहे. हे ठिकाण The Land of Fire and Ice म्हणून ओळखलं जातं. हजारो वर्षांपूर्वी नेटिव्ह पेब्लो (Pueblo) जमातीच्या लोकांनी शोधलेली वाटच आजही गुहेकडे घेऊन जाते. ही ट्रेल फार सुंदर, शांत आहे. गुहा लाव्हारसापासून बनली आहे. आतले गुहेतले टेंपरेचर ३१ फॅ पेक्षा जास्त कधीच होत नाही. आत साठलेल्या बर्फावर सुर्यपकिरणं पडून सुंदर हिरवा रंग परावर्तित झाला होता. सध्या तिथे २० फूट जाडीचा बर्फाचा थर तयार झाला आहे. गुहेबाहेर हिवाळ्यात पडलेल्या बर्फाचे (स्नो) वितळलेले पाणी आणि पावसाच्या पाण्याची त्यात दर वर्षी भर पडते.

IMG_0549.JPG

** टुरिस्ट सेंटरमध्ये शुद्ध तांब्यातले खूप सुंदर दागिने मिळतात. मी घेतलेले ब्रेसलेट इ. अजिबात काळे पडलेले नाहीत.

८. सँडिआ पीक ट्राम वे

हा ट्राम वे ह्या ट्रिपमधला एक अविस्मरणीय अनुभव. सँटा फे आणि अल्बुकर्कीच्या मध्ये हे ठिकाण आहे. अल्बुकर्कीच्या थोडं अलीकडे एक्झिट घेतलं की सँडिआ डोंगरास सामोरा ठेवून ५-६ मैलांचा रस्ता आहे. इथे पण चुकलो रे गड्या म्हणेपर्यंत ट्राम वे ची काहीही चाहूल लागत नाही. मध्येच कसिनोकडे जाणारा फाटा लागतो. कसिनो कनेटिकटात पण आहेत तेव्हा फाट्याला फाट्यावर मारुन पुढे गेलो.

२.७ मैलांचा हा ट्राम वे अमेरिकेतला सगळ्यात जास्त लांबीचा आणि सगळ्यात जास्त उंचीवर जाणारा रोप वे आहे. ७,००० फुटांवर एक टॉवर आणि साधारण ८,७०० फुटांवर दुसरा, अशा दोन टॉवर्सनी हा रस्ता (?) तोलून धरला आहे. पहिला टॉवर पार करताना चांगलाच हिंदोळा बसतो. ते टॉवर्स कसे बांधले इ माहिती जाताना देतात. पण सगळे लक्ष बाहेर, खाली बघण्यात असल्याने नंतर लेख लिहायची वेळ आलीच तर विकिदेवांना शरण जावे.

दिवसभरात चार की पाच फ्लाइट्स (?) जा-ये करतात. पैकी सूर्यास्ताची वेळ वर (वर म्हणजे डोंगरावर) जाण्यासाठी उत्तम. खाली दाट किबोआचे अरण्य आणि समोर पसरलेली रिओ ग्रान्दे व्हॅली. झरझर अस्तास जाणारे सूर्यदेव आणि त्याच गतीने रंग बदलणारे आकाश. दूर गावांमध्ये चमकू लागलेले दिवे. फार मनोहारी देखावा आहे हा सगळाच.

ट्रेकर्ससाठी/हायकर्ससाठी सँडिआ पीक हे आकर्षणाचे केंद्र आहे. पायी डोंगर चढून मग खाली उतरताना ट्राम घ्यायची ट्रेकर्सची रीत असावी असं आमच्या ट्राममधल्या दोघांच्या बोलण्यावरुन वाटलं. खाली अस्वलं पण दिसतील असं सांगण्यात आलं होतं. मान मोडेपर्यंत वाकून बघितलं तरी एक सुद्धा अस्वल दिसलं नाही. एकंदरीत न्यु मेक्सिकोतल्या अस्वलांनी आमची फारच निराशा केली.

वर डोंगर माथ्यावर एक आणि पायथ्याशी एक अशी दोन रेस्टॉरंटस् आहेत. बाहेर डेकवर बसून सूर्यास्त बघायला खूप छान वाटत असणार. दुर्दैवाने आम्ही गेलो त्या दुपारी पाऊस पडून गेल्याने प्र-च-ड थंडी होती. त्यामुळे बाहेर बसून जेवता आले नाही.

IMG_0347.JPG

अधिक माहितीसाठी इथे पहा.

९. इकडचं-तिकडचं
ह्या भागात असलेली प्रेक्षणीय स्थळे बर्‍यापैकी दूर-दूर असल्याने आणि पब्लिक ट्रान्सपोर्टची बोंब असल्याने हे सगळं बघण्यासाठी गाडी भाड्याने घेणे हाच एक पर्याय आहे. अल्बुकर्की आणि सँटा फे असे दोन इंटरनॅशनल एअर पोर्ट्स आहेत. वर उल्लेखल्या प्रमाणे अल्बुकर्की ते सँटा फे अंतर साधारण एक तासाचं आहे. ही सगळी ठिकाणं एकमेकांपासून मोअर ऑर लेस एक तासाच्याच अंतरावर आहेत. व्हाइट सँड ड्युन्स अल्बुकर्कीच्या दक्षिणेस (बहुतेक) थोडे दूर आहेत. तिथे आम्ही वेळे अभावी गेलो नाही. हवामानाचा विचार करता वसंत ऋतू किंवा उन्हाळ्याचे सुरुवातीचे दिवस इथे फिरण्यासाठी 'आयडियल' म्हणता येतील. पण इंडियन मार्केट बघता येणार नाही.

आम्हाला ट्राय स्टेटच्या रहदारीची सवय असल्याने रस्ते बर्‍यापैकी ओसाड वाटले. इंटरस्टेट हायवेवर स्पीड लिमिट(?) बर्‍याच ठिकाणी ८५ पर्यंत आहे. पण हाय वे वरचे रेस्ट एरिया, गॅस स्टेशन्स आणि गावं खूप जास्त अंतरांवर आहेत. 'पॉटी ट्रेनिंग इन प्रोग्रेस' असलेली बाळं सोबत असतील तर जरा पंचाईत होते. गाडीचं खानपान सुद्धा वेळच्या वेळी केलेलं बरं.

IMG_0034.JPGIMG_0078.JPGIMG_0074.JPGIMG_0171.JPG

विषय: 

प्रवासवर्णन आवडलं. पटेल/टूरिस्टी पॉईंट्सच्या मागे न लागता जर निवांतपणे थोडं वेगळं वातावरण, कल्चर अनुभवयाचं असेल, तर सँटा फे सारखं ठिकाण विरळच. मुख्य चौकाजवळ असणारं 'जॉर्जिया ओ'कीफ म्युझियम'ही भेट द्यावं असं. [दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात इथे मोठा हॉट एअर बलून फेस्टिवल भरतो. तोही अतिशय प्रेक्षणीय.]

आत गेल्या गेल्या चौफेर नजर फिरवून स्पष्ट खणखणीत आवाजात प्रश्न, 'What is that guy doing up there ?' आतल्या शांततेत त्याचा आवाज जरा जास्तच लाउड आणि क्लिअर. तिथेच बसलेल्या एका आजीबाईंनी असं काही बघितलं आमच्याकडे. त्यांना शक्य असतं तर त्यांनी नुसत्या नजरेने आम्हाला वर छताला उलटं टांगलं असतं.
Proud

नंदन, धन्यवाद Happy लेख मुशोसाठी एका माबोकरास दिला होता तेव्हा तुम्ही पण न्यू मेक्सिको/सँटा फे वर प्र.व. लिहिल्याचं समजलं. इथे लिंक द्याल का ?

छान माहिती व फोटो. प्लस तुझा ब्रँड ऑफ ह्युमर. खूप दिवसांनी लिहीलेस.
मातीचे चर्च व कलाकृती खूप आवडल्या.

मस्त आहे प्रवासवर्णन. ग्रँड कॅनिअनच्या उत्तर ते दक्षिण काठ यामधला प्रवास आठवला - खास करून तिसर्‍या फोटोत. वस्तूंच्या किमती तिकडेही अव्वाच्या सवा होत्या. आदिवासी (मागास या अर्थाने नव्हे तर मूळ रहिवासी या अर्थाने) आणि मध हे समिकरण भारतातही परिचयाचे असल्यामुळे आम्ही फक्त तिकडून मध घेतला होता.

तो ओहोळ आणि मातिचे चर्च - खूपच सुंदर फोटो आहेत.

आहाहा ओहोहो...
कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन...
समर्स ऑफ १९९९,२००० आणि २००१.. सान्टा फे मधे घालवलेले आयुष्यातले सगळ्यात भारी समर्स.
आता तुझ्याकडून प्रेर्णा (;)) घेऊन कधीतरी आमचा सान्टा फे ऑपेरा आणि त्यासंदर्भाने आठवणींबद्दल लिहिते Happy

सिंडरेला, खुपच छान फोटो आणि माहिती तर मस्तच!!! आता जायची इच्छा होतेय.
१-२ दिवसात सँटा फे करायला जमेल का (जर LA वरुन जायच असेल तर?)
अजुन जर माहिती पहिजे असेल तर विचारु का? Happy

तो मातीचा बांधकाम असलेला चर्च कितॉ क्युट आहे Happy

नी, ओह नो.
बघुया इतके दिवस हाताशी आहेत का? नाहितर मग दुसर काहीतरी ठरवाव लागेल LA च्या जवळचं ..

Mast lihilays. photo chaan Happy mala tya bahulya ani matichya kalakruti khup awadalya.

मस्त वर्णन आणि सुंदर फोटो. मातीची घरं आणि बाहुल्यांचे फोटो फारच आवडले.

>>>आत गेल्या गेल्या चौफेर नजर फिरवून स्पष्ट खणखणीत आवाजात प्रश्न, 'What is that guy doing up there ?' Lol

Pages