मराठी भाषा दिवस २०१२ स्पर्धा - निकाल

Submitted by संयोजक on 7 March, 2012 - 02:50

palakhi.jpgमराठी भाषा दिवस २०१२ या उपक्रमांतर्गत घेतलेल्या स्पर्धांचा निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

म..म..मराठी, ग..ग..गोष्टी

परीक्षकांचे मनोगत :
गेल्या काही दिवसांमध्ये इथे, मायबोलीवर, मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या "नेहमीच्या गंमतगोष्टी" आणि "चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी" ह्या स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिका पाहणं/ऐकणं/वाचणं हा आमच्यासाठी एक आनंदानुभव होता. संयोजक मंडळाने या स्पर्धेसाठी आम्हाला परीक्षक म्हणून नेमल्यामुळे हा आनंदानुभव आम्हाला मन:पूत घेता आला याबद्दल आम्ही संयोजक मंडळाचे आभारी आहोत आणि आशा करतो आहोत की यात भाग घेतलेल्या पालकांना पण, ह्या प्रवेशिका त्यांच्या पाल्यांबरोबर तयार करतांना, ह्या आनंदाचा अनुभव आला असेल आणि कुठल्याही बक्षिसापेक्षा हा निखळ आनंद मोठा आहे, महत्त्वाचा आहे, हेही ते उमजून असतील.
एकूण सत्तेचाळीस प्रवेशिकांपैकी तीस प्रवेशिका दोन ते बारा या वयोगटातील (नेहमीच्या गंमतगोष्टी) आणि सतरा प्रवेशिका तीन ते चौदा या वयोगटातील (चित्रसंचावर आधारित गोष्टी) होत्या. पहिल्या गटात सहा कथन-चित्रण तर चोवीस फक्त कथन अशा वर्गवारीत होत्या. तीन ते चौदा या गटातील वर्गवारी आठ कथन आणि नऊ लेखन याप्रमाणे होती.
पहिल्या गटात दोन ते पाच वर्षांपर्यंतचे चौदा स्पर्धक, पाच ते आठ वर्षांपर्यंतचे चौदा स्पर्धक आणि आठ ते नऊ वर्षांपर्यंतचे दोन स्पर्धक होते तर दुसर्‍या गटात एक पावणे पाच वर्षाचा स्पर्धक सोडल्यास बाकी सात ते तेरा वर्षे या वयाचे स्पर्धक होते.
परीक्षण करताना आमच्या लक्षात एक गोष्ट अशी आली की "नेहमीच्या गंमतगोष्टी" मध्ये वैविध्य कमी होतं. ठराविक एक दोनच गोष्टी, त्याही काही पिढ्या जुन्या असलेल्या, कथनात वापरलेल्या दिसल्या. याचे कारण खरोखरच लहान मुलांना त्याच गोष्टी आवडतात की फक्त त्याच गोष्टी त्यांच्या कानावर पडलेल्या आहेत ह्याचा विचार करायला हवा. चित्रसंचावर आधारित कथांमध्ये लिहिलेल्या किंवा ध्वनिमुद्रित केलेल्या प्रवेशिकांमध्येसुद्धा अजून विविधता, कल्पनाशक्तीचा वापर स्वागतार्ह ठरला असता. काही गोष्टींमधे चारही चित्रांचा वापर केवळ आवश्यक आहे म्हणून निव्वळ उल्लेख करून सोडून देण्याकडे प्रवृत्ती दिसली.
महाराष्ट्रापासून, किंबहुना देशापासूनही दूर निवासी असल्यामुळे बर्‍याच स्पर्धकांना मराठी शब्दांचे उच्चार कठीण वाटत होते आणि इंग्रजी लकबीने ते उच्चारण्याची सवय जडलेली लक्षात आली. तथापि हा मुलांचा दोष म्हणता येणार नाही त्यामुळे परीक्षण करताना या त्रुटीकडे शक्य तितका कानाडोळा केला आहे.
गुणवत्तेचे परीक्षण करताना पहिल्या गटामधे गोष्ट स्वत: सांगणे, पालकांकडून वाजवीपेक्षा अधिक सूचना (प्रॉम्प्टिंग) नसणे, स्वच्छ आवाज, स्पष्ट उच्चार, १ ते ३ मिनिटांच्या मर्यादेचे वाजवीपेक्षा जास्त उल्लंघन नसणे आणि सादरीकरण, आवाजातील चढ-उतार, एकसुरीपणा नसणे, कथनात भावनांची व्यवस्थित अभिव्यक्ती आणि एकंदरीत परिणामकारकता हे निकष लावण्यात आले होते. ही स्पर्धा पाल्यांकरिता असल्यामुळे पालकांनी घेतलेल्या कष्टांबद्दल पूर्ण आदर ठेवूनही, गुणवत्तेच्या मोजमापात त्या अंगाला जाणीवपूर्वकच स्थान दिले नव्हते.
दुसर्‍या गटामधे गोष्ट लिखित स्वरुपात असल्यास ती स्वरचित आणि स्वलिखीत असणे, एका चित्रसंचातील सर्व चित्रांचा वापर, तोही निव्वळ उल्लेखापेक्षा जास्त आणि चपखल असणे, हस्ताक्षर, गोष्टीची लांबी, आणि कथित स्वरुपात असल्यास पालकांकडून वाजवीपेक्षा अधिक सूचना (प्रॉम्प्टिंग) नसणे, स्वच्छ आवाज, स्पष्ट उच्चार, १ ते ३ मिनिटांच्या मर्यादेचे वाजवीपेक्षा जास्त उल्लंघन नसणे आणि सादरीकरण, आवाजातील चढ-उतार, एकसुरीपणा नसणे, कथनात सुसूत्रता, भावनांची व्यवस्थित अभिव्यक्ती आणि एकंदरीत परिणामकारकता हे निकष ठेवले होते.
या सर्व निकषांवर घासून पाहिल्यावर आम्ही परीक्षक पुढील स्पर्धकाना विजेते म्हणून अभिवादन करीत आहोत.
नेहमीच्या गंमतगोष्टी – वयाचा उपगट २ ते ५ पर्यंत
विजेता क्रमांक १ - प्रवेशिका ५ स्पर्धक [इरा] प्रेषक [रैना] शीर्षक [बुड बुड घागरी]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका ९ स्पर्धक [श्रीशैल] प्रेषक [इंद्रधनुष्य] शीर्षक [मैत्रीची गंमत]
विजेता क्रमांक ३ - प्रवेशिका ३८ स्पर्धक [मनस्वी बाचल] प्रेषक [मंगेशमनु] शीर्षक [चिऊकाऊची गोष्ट]
विजेता क्रमांक ४ - प्रवेशिका ७ स्पर्धक [तनिष] प्रेषक [Manasi-Patil] शीर्षक [लाकूडतोड्याची गोष्ट]

नेहमीच्या गंमतगोष्टी – वयाचा उपगट ५ ते ८ पर्यंत
विजेता क्रमांक १ - प्रवेशिका ४७ स्पर्धक [मुक्ता] प्रेषक [स्मिताके] शीर्षक [दगडाचं सूप]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका २२ स्पर्धक [ईषू] प्रेषक [मवा] शीर्षक [कबुतर आणि मुंगी]
विजेता क्रमांक ३ - प्रवेशिका ३१ स्पर्धक [मैत्रेयी] प्रेषक [संपदा] शीर्षक [गोगलगाय व चिमणी]

नेहमीच्या गंमतगोष्टी – वयाचा उपगट ८ ते १२ पर्यंत
विजेता क्रमांक १ - प्रवेशिका १ स्पर्धक [नचिकेत] प्रेषक [पौर्णिमा] शीर्षक [शब्द म्हणजे शस्त्र]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका १० स्पर्धक [शंतनू शिंदे] प्रेषक [शर्मिष्ठा] शीर्षक [धाडसी सावरकरांची गोष्ट]

चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी – वयाचा गट ३ ते १४ वर्षे - उपगट लेखन
विजेता क्रमांक १ – प्रवेशिका १६ स्पर्धक [अवनी] प्रेषक [मंजिरी] शीर्षक [स्वप्नातील सायकल]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका ११ स्पर्धक [राहुल] प्रेषक [लोला] शीर्षक [सोनेरी सायकल]
विजेता क्रमांक ३ - प्रवेशिका १५ स्पर्धक [मानसी कुलकर्णी] प्रेषक [अनघा_कुल] शीर्षक [जंगलातले साहस]

चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी – वयाचा गट ३ ते १४ वर्षे - उपगट कथन
विजेता क्रमांक १ - प्रवेशिका २४ स्पर्धक [अक्षज] प्रेषक [बिल्वा] शीर्षक [राजूची गोष्ट]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका ४० स्पर्धक [साजिरी] प्रेषक [साजिरा] शीर्षक [चिंकीची गोष्ट]
विजेता क्रमांक ३ - प्रवेशिका २९ स्पर्धक [अनन्या] प्रेषक [मी अनन्या] शीर्षक [थापाड्या चिंटू]
विजेता क्रमांक ४ - प्रवेशिका १९ स्पर्धक [मनस्व मादुस्कर] प्रेषक [Monalip] शीर्षक [मॅजिक टोमॅटो]

- mkarnik, अनुदोन

वेळात वेळ काढून, सर्व प्रवेशिका तपासून, निकष ठरवून, ही जबाबदारी यथायोग्य पार पाडल्याबद्दल मुकुंद कर्णिक आणि विद्युल्लता महाबळ यांचे संयोजनमंडळातर्फे मनःपूर्वक आभार. फार मोठे काम केले आपण!
_____________
मी मराठी
विजेता सभासद: HH
_____________
कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार
विजेते सभासद: भरत मयेकर,अश्विनीके, मन्या२८०४
_____________
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

*****************
स्पर्धांसाठी बक्षिसं प्रायोजित केल्याबद्दल श्री. आशिष पाटकर (मनोविकास प्रकाशन, पुणे) व श्री. श्याम देशपांडे (समकालीन प्रकाशन, पुणे) ह्यांचे आम्ही शतश: आभारी आहोत.

प्रायोजक समकालिन प्रकाशन- नव्या जगाचा, नव्या समाजाचा, नव्या प्रश्नांचा थांग शोधणं, ते समजून घेणं आणि मराठीतील वाचकांशी पुस्तकरूपानं संवाद साधणं, हा समकालीन प्रकाशन सुरू करण्यामागचा विचार आहे.त्यामुळेच प्रकाशनाच्या नावात समकालीन हा शब्द आहे. ऑगस्ट २००६ मध्ये खरेखुरे आयडॉल्स हे समकालीनचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे-लढणारे, सर्वसामान्यांचं जीवन सुकर व्हावं यासाठी संशोधन करणारे, प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते, संशोधक, अधिकारी अशा अनेक कार्यरत व्यक्तींची ओळख करून देणारं हे पुस्तक. एकीकडे या व्यक्तींच्या कामाला सलाम करणारं आणि त्याचवेळी आदर्शच ठेवायचा तर तो अशा कामांचा ठेवा, असं आवाहन तरुणांना करणारं. गेल्या चार वर्षांमध्ये या पुस्तकाच्या १८ आवृत्त्या निघाल्या, त्यावरून वाचकांचा प्रतिसाद लक्षात यावा.
खरे़खुरे आयडॉल्स ते नुकत्याच प्रकाशित झालेल्या अनिल अवचट यांच्या मुक्तांगणची गोष्टपर्यंतच्या सर्व पुस्तकांना वाचकांनी - आम्हाला हेच हवं होतं-, असं म्हणत उदंड प्रतिसाद दिला आहे. चरित्र, आत्मचरित्र, राजकीय- सामाजिक आणि शोधक ललित अशा विविध फॉर्म्समधून समकालीन प्रकाशनाची पुस्तकं प्रकाशित होत आहेत. विषयांची निवड, दर्जेदार लेखकांचा शोध, वाचकांप्रति बांधिलकी, निर्दोष अंतरंगासाठी कष्ट अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अल्पकाळातच समकालीन प्रकाशन हे मराठीतील अव्वल प्रकाशकांच्या रांगेत विराजमान झालं आहे.
samakaaleen%20prakaashan%20logo.jpg

******************
नियमावली

१. सर्व विजेत्यांना ईमेलद्वारे संपर्क करून पारितोषिक कसे घेऊन जावे हे सविस्तर कळवण्यात येईल. पारितोषिक हवे असल्यास आपले खरे नाव, पत्ता कळवणे बंधनकारक असेल.
२. सर्व बालस्पर्धकांना संयोजन मंडळातर्फे पीडीएफ स्वरुपात प्रशस्तीपत्रक पाठवण्यात येईल. प्रशस्तीपत्रक हवे असल्यास त्यासाठी पाल्याचे नाव कळवणे बंधनकारक असेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बक्षिसांसंदर्भात प्रतिसाद देणार्‍या सर्वांनी हे लक्षात घ्या २०१० पासून सुरू असलेल्या या उपक्रमात दरवर्षी आपण विजेत्यांना पारितोषीके दिली आहेत. यंदा संयोजकांकडून एक गोष्ट राहिली ती ही की घोषणेत हे लिहिले नव्हते. त्याबद्दल त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली आहे.

पुढील उपक्रमांत बक्षीसे द्यायची की नाही हे आपण ठरवू. त्यावेळी तुमचे प्रतिसाद नक्कीच विचारात घेऊ. आता या विषयावर चर्चा पुरे करून आलेल्या प्रवेशिकांचा तसेच इतर लेखनाचा आस्वाद घेउया.

अरेरे..
स्पर्धा म्हणून जाहीरच केलेली नाही त्यामुळे आता ही स्पर्धा 'करता' येणार नाही हे एकाच्याही लक्षात येऊ नये??

मयेकर, तुमच्या पहिल्या प्रश्नाला १०० ब.वडे. मंजूडीने संयोजक सदस्याच्या बाबतीत लिहिलेला किस्सा वाचून खरंच वाईट वाटले. "स्पर्धा का नाहीत", "बक्षिसे का नाहीत" असे कोणी विचारल्याचेही दिसत नाही, तेव्हा अपेक्षेचा प्रश्नच नव्हता. उत्तेजना'साठी' काही द्यायचं आहे तर ते सर्वांनाच द्यायला हवे ना? नाहीतर देऊच नका, फक्त विजेते निवडा. (नंबर न देता, गेल्या दोन वेळी हेच केले होते. फक्त पहिल्या वर्षी विजेते नसलेल्यांनाही बक्षीस दिले होते, गेल्या वर्षी फक्त विजेत्यांना दिले.)

संयोजकांची दिलगिरी मला कुठे दिसली नाही. फक्त प्रशासनाकडे व्यक्त केली असेल तर माहीत नाही.

मला संयोजकांची अशी मेल आली आहे-

---------------
नमस्कार,

सर्वप्रथम 'म म मराठी .. ग ग गोष्टी' ह्या मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्य­­क्रमात आपल्या पाल्यानी भाग घेतला, त्याबद्दल तुम्हा आईवडिलांचे आणि आमच्या छोट्या बालमित्रांचे समस्त मायबोलीकरांतर्फे कौतुक, आभार आणि अभिनंदन!

आजच्या नवीन पिढीला इंग्रजी वा इतर कुठल्याही भाषेसोबत मराठी भाषेची गोडी लागावी, मराठी भाषेचे सामर्थ्य कळावे, त्यातले सौंदर्य जाणवावे या हेतूने हा कार्यक्रम ठेवला होता. आपण हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता साथ दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.

आमचे आणि आपले हे प्रयत्न केवळ ह्या स्पर्धेपुरते मर्यादित नाही! अगदी जन्मापासून आपली आपल्या भाषेसोबत नाळ जोडली गेलेली असते. तिचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे.
जिथे कुठे तुम्ही असाल - महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, भारताबाहेर, मराठी लोकांमधे वा अमराठी लोकांमधे -- तिथे राहून आपल्या भाषेच्या प्रसाराला हातभार लावावा अशी नम्र विनंती. केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे.

सोबत आपल्या पाल्याचे प्रशस्तीपत्रक जोडले आहे.

कृपया हे प्रशस्तीपत्रक दाखून आपल्या पाल्याचे बक्षीस मायबोलीच्या कार्यालयातून घेऊन जाण्याची व्यवस्था करावी.

--------------

ही 'स्पर्धा' झाली आणि राहुलला नंबर दिलाय हेच मला मान्य नाही. वर नंबर आलाय पण बक्षीस हवे असेल तर त्यासाठी भारतातून कोणालातरी विशिष्ठ गावच्या कुठल्यातरी 'देवळाशेजारी', 'दुकानाच्यावर' असा पत्ता असलेल्या ठिकाणी जाऊन ते आणून इकडे पाठवावे लागेल हे त्याला सांगण्याची माझ्यात हिंमत नाही. Happy मी हे बक्षीस घेऊ इच्छित नाही.

धन्यवाद.

बापरे! इथे एव्हढा गदारोळ चाललाय!

स्पर्धा, बक्षिसं, त्यासंबंधी वाद, शाब्दिक वाद बाजुला ठेवुन केवळ पुढच्या पिढीत मराठी भाषेची आवड/जाण निर्माण करण्यासाठी आपण काय करु शकतो? याचा विचार करुयात का?

ह्या सर्व वादाचे कारण सुरुवातीला म.. म मराठी , ग.. ग गोष्टी ही स्पर्धा जाहीर न करणे हे आहे. संयोजकांकडून घडलेली ही चूक अजाणता असावी असे मला वाटते.>>>>>> असामी +१

आपल्याला कधी कधी काही गोष्टी इतक्या महत्वाच्या वाटत नाहीत पण त्याच गोष्टी दुसर्‍या कोणाला खुप महत्वाच्या वाटू शकतात ह्याचा परत एकदा प्रत्यय आला. मराठी भाषेबद्दल ओढ वाटावी आणि थोडं फार शिकायला मिळाव आणि मुख्य म्हणजे काहीतरी वेगळं करायचा आनंद मिळावा म्हणून हा कार्यक्रम खरच छान आहे. फक्त स्पर्धा म्हंटल की नंबर येतात आणि ते एक पालक म्हणून बघितल तर ते नको वाटतं. तसं बघायला गेलं तर इतकी काही मोठी गोष्ट नाहीये (माझ्या दॄष्टिनी) पण सहसा आपल्या मुलांशी आपण खरं बोलतो, कार्यक्रमाबद्दल इतकं काही सांगितल्यावर फक्त तुला बक्षिस नाही मिळाले (आणि खरंतर कार्यक्रमामागे बक्षिस हा मुळ विचार नसताना) हे ही सांगणे आलेच. त्यात काही वाईट आहे का? कदाचित नाही पण एकंदरितच स्पर्धा असली की काही शिकण्यापेक्षा, अनुभवण्यापेक्षा जिंकण्याला आपोआप महत्व दिलं जातं.
संयोजक आणि प्रशासन ह्याबाबती पुढच्यावेळी काळजी घेइल ह्याची आशा नाही तर खात्री आहे. राहिला प्रश्न कुठल्याशा बाफं वर झालेल्या चर्चेबद्दल, तर त्याला इतकं महत्व देऊ नये असं वाटत. बोलणारी व्यक्ती संयोजक मंडळातली असली तरी संयोजक मंडळ सगळ्याच गोष्टी कंट्रोल करु शकत नाही आणि प्रत्येक व्यक्तीनी (संयोजक टीम अंतर्गत) आपापली जवाबदारी ओळखून वागायला पाहिजे.
एकंदरित ह्या काही त्रुटी, चुका सोडल्या तर कार्यक्रम छान होता.

'ती स्पर्धा होती' हे मुलांना न सांगणे शक्य असेल का? एक आपले वाटले म्हणून विचारले.

Sad

यावर वाद होऊ नयेत असेही वाटले

मुलांनी इतका गोड सहभाग घेतला होता

अपून अभी चुप्प बैठता है

ठरावीक शब्दावरुन जो वाद घडला तो साडल्यास -

हि स्पर्धा आहे / होती हे कोणालाच खरेच माहिती नव्हते, हे कसे शक्य आहे? गेली २ वर्षे तर हि स्पर्धा म्हणुनच घेतली गेली. म्हणजे ह्या वर्षी देखील तसे असणार हे गृहित धरायला हवे होते. उलट जाणत्या मंडळींनी संयोजकांच्या ते राहिलेले वाक्य लक्षात आणुन द्यायचे होते. असे मला प्रामाणीकपणे वाटते.

इतके दिवस या वादात मी पडले नाही कारण - हो या आयडीच्या मुलाला बक्षीस मिळाले म्हणुन हा आयडी संयोजकांची बाजु घेतो असे चित्र तयार व्हायला नको होते मला. (अजुनही हे लिहिताना मी हा प्रतीसाद पोस्ट करु का नको यावर विचार चालु आहे.)

हा उपक्रम चांगला झाला, दरवर्षी होतो. त्यातील आनंद घ्यायला हवा. रहाता राहिले बक्षीसांचे तर प्रमाणपत्र तर सगळ्यांनाच पाठवले आहे ना. (कि नाही :अओ:) तर जे काही वस्तुरुप बक्षीस आहे तेदेखील त्या ठरावीक दिलेल्या पत्त्यावर जायला जमले, तसा योग जुळुन आला तरच घेतले जाणार. म्हणजे बक्षीस मिळालेल्यापैकीपण किती जण ते घेणार माहिती नाही.

आता प्रश्ण उरला, मुलांच्या जिंकण्याचा. मुळात हल्ली सगळीकडे उगवलेले स्पर्धांचे पेव बघता मुलांना म.भा.दि. ची स्पर्धा असे सांगीतले तर काय झाले? नंबर आला तर 'अरे वा आनंदच आहे' पण नाही आला तर त्या पाल्याने ती गोष्ट सांगताना / लिहिताना जो अनुभव घेतला तो तर कमी होणार नाही ना. आपण पाल्यासोबत घालवलेला अमुल्य वेळ वाया तर गेला नाही ना. कि आपल्या पाल्याला कधी हार माहिती नाही? तसे असेल तर उत्तम आहे. जर यशाच्या प्रत्येक पायरीवर आपला पाल्य चढत असेल तर छान, पण कधितरी या पायर्‍यांवर अडकावे लागते नव्हे कधितरी उतरावे लागते हे मुलांना कळायला हवे. कळायला हवे.

भाग घे, ते जास्त महत्वाचे, कोणतीही स्पर्धा असो भाग घेउन पहा, जिंकले ठिक नाही तरि ठिक, असे आपण मुलांना सांगतोच ना हल्ली? जर सांगत नसाल तर सांगा अशी विनंती मी या निमित्ताने करु ईच्छिते. बाकी मुलांना काय, आपणच प्रेस्टीज इश्यू न करता रस्त्यावरील अगदि २० रु. चे खेळणे नेले तरी किंवा एखादे अ‍ॅक्टीवीटी बुक नेले व हेच ते बक्षीस म्हणुन सांगीतले तरी आनंद होतो. त्यांना यातले काही कळते का? स्पेशली मी तरी मुलाला उगाच भाग घेतला म्हणुन पण असे काहीना काही देते. जेणे करुन त्याचा कॉन्फीडन्स वाढावा. त्याने कुठे कसे गाणे म्हटले वा गोष्ट सांगीतली हे माहित देखील नसते पण अरे वा आज तु गोष्ट सांगीतलीस ना म्हणुन तुला ही कीचेन, तुझ्या सायकलला वापर असे काही दिले असता मुलांना पण आवडते. (हां पण, तु गोष्ट सांगीतालीस तरच मी असे असे देईन हे मात्र चुक. लाच नकोच)

असो मी फक्त माझी प्रतिक्रीया लिहीली. मला या माझ्य पोस्टवर वाद नकोच प्लीज.

संयोजक, मला येत्या काही दिवसात दिलेल्या पत्त्यावर / त्या गावात जायला जमले, काही निमित्ताने मी अथवा घरातले कोणी गेले तर जे असेल ते बक्षीस घेउन येईन, नाही जमल्यास नाही जाणार. पण कोणालाही जाउन बक्षीस आणुन ठेवा असे सांगणार नाही.

कृपया किती दिवसात हे न्यावे याचा खुलासा आपल्या मेल मधे नाही. तसा करु शकलात तर बरे. म्हणजे नाहिच जमले त्या काळात तर तसे कळवता येईल व आपण ज्या कोणाला हे वाटपाचे काम दिलेय त्यांना देखिल बरे पडेल. हो, नाहितर ६-८ महिन्यांनी कोणितरी त्यांच्याकडे जावे बक्षीस मागायला व ते गृहस्थ ब्लँक असे नको व्हायला. शिवाय त्यांनी तरी ते किती दिवस सांभाळावे नाहि का.

monalip सध्यातरी आपण अथवा आपले नातेवाईक/ मित्र यापैकी कोणी बक्षिस घेऊन जाणे हा पर्याय उपलब्ध आहे.
मुदत व इतर पर्यायांबद्दल प्रशासनाशी चर्चा करून आपल्याशी लवकरच संपर्क साधला जाईल.

'स्पर्धा' हे घोषणेत लिहीले गेले नाही. क्षमस्व.
मागील दोन वर्षांच्या निकालांची परंपरा पाहता स्पर्धा असण्याला मायबोलीवर आक्षेप असेल असे अनुमान काढता आले नाही त्यासाठी संयोजक मंडळ दिलगीर आहे.
उलट ऐनवेळेस का होईना, विजेत्यांना काहीतरी देता येईल याबाबत आम्हाला संतोष होता.

हे प्रशस्तीपत्रक सर्व सहभागी छोट्या दोस्तांना पाठवले आहे.
prapa_sample_1.jpg

तसेच पुन्हा एकदा परीक्षकांशी संपर्क साधून "उत्तेजनार्ह" की "उत्तेजनार्थ" याबाबत संयोजक मंडळ निर्णय घेईल.

संयोजक मंडळ, प्रशस्तीपत्रक मिळाले, धन्यवाद!

तसेच पुन्हा एकदा परीक्षकांशी संपर्क साधून "उत्तेजनार्ह" की "उत्तेजनार्थ" याबाबत संयोजक मंडळ निर्णय घेईल.>>
आपल्या योग्य निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे. सर्वानुमते, निकालातील शब्द 'उत्तेजनार्ह'च ठेवण्याचे ठरले तर कृपया मी ९ मार्च २०१२ रोजी केलेल्या विनंतीनुसार 'म.. म.. मराठी, ग..ग.. गोष्टी - प्रवेशिका १४ (मंजूडी)' हा धागा अप्रकाशित करावा.

वैद्यबुवा आणि monalip, तुमच्यासाठी संयोजकांना पाठवलेल्या ईमेलीतील हा एक भाग, कदाचित तुमच्या मनातील गैरसमज दूर व्हायला मदत होईल :

मायबोलीच्या मराठी भाषा दिवस उपक्रमात माझ्या पाल्याने सहभागी होण्याचे हे पहिले वर्ष नाही. ह्याआधीच्या सर्व उपक्रमात तिचा सहभाग होता. बक्षीस मिळणे - न मिळणे हे कळण्याइतकं तिचं वय नाही. यंदाच्या वर्षी तिला पारितोषिक मिळालं नाही म्हणून मी हा उहापोह करतेय की काय असे माझ्या पोस्टींवरून संयोजन मंडळासह अनेकांना वाटणे साहजिक आहे. परंतु निकालाच्या बाफवर लिहिल्याप्रमाणे केवळ सहभागाखातर तिची प्रवेशिका पाठवलेली होती. तिच्या प्रवेशिकेवर आलेले प्रतिसाद तिच्या उत्तेजनासाठी पुरेसे आहेत. ते प्रतिसाद तिला वाचून दाखवल्यावरचा तिच्या चेहर्यावरील आनंद अवर्णनीय होता. "आई, मला कधी हे सगळं वाचायला येईल?" असा प्रश्न तिने मला विचारला आणि मला वाटतं की यातच मराठी भाषा दिवस उपक्रमाचं यश आहे.

मंजूडी, या प्रतिक्रिया वाचल्या आहेतच. Happy व वरील विचार / प्रतिक्रिया हे निव्वळ टोटल चर्चेवरील मत आहे. कोणीही कृपया ते वैयक्तीक घेउ नयेच.

शब्दार्थाबाबत दोन्ही बाजूने मते आल्यामुळे 'उत्तेजनार्ह' अथवा 'उत्तेजनार्थ' हे दोन्ही शब्द न वापरण्याचा संयोजक मंडळाने निर्णय घेतला असून त्यानुसार योग्य ते बदल करण्यात आले आहेत याची कृपया नोंद घ्यावी. आपण नोंदवलेल्या मतांसाठी मनःपूर्वक आभार.

"दुर्दैवाने या गप्पांच्यात संयोजन मंडळातील एक सदस्य होता, त्याबद्दल दु:खमिश्रीत आश्चर्यही वाटले>>
मंजूडी, आपण कृपया सप्रमाण अधिक आणि नेमकी माहिती देऊ शकाल का याबाबत? संयोजकांपैकी कोणीही अश्या प्रकारचे व्यक्तव्य केले असण्याची शक्यता अतिशय कमी आहे. इतर मायबोलीकर सदस्यांची चर्चा झाली असल्यास संयोजकमंडळ त्यास जबाबदार ठरु शकत नाही हे आपणांस मान्य असेलच."

तसेच आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर :
प्रशस्तीपत्रक हवे असल्यास म्हणजे 'हवे असल्यास'. नको असल्यास प्रश्नच नाही. काही पालकांना मुलांचे नाव जाहीर करायचे नसते. त्यांनी मुलांच्या टोपणनावाने प्रवेशिका पाठवल्या. तेव्हा त्यांच्या इच्छेचा मान राखला आहे.
प्रत्येक शब्द हा प्रत्येकाला लागू होत नाही. ज्यांनी पाठवताना आधीच नाव पाठवले त्यांना हे लागू होत नाही.

शब्दार्थाबाबत दोन्ही बाजूने मते आल्यामुळे 'उत्तेजनार्ह' अथवा 'उत्तेजनार्थ' हे दोन्ही शब्द न वापरण्याचा संयोजक मंडळाने निर्णय घेतला असून त्यानुसार योग्य ते बदल करण्यात आले आहेत याची कृपया नोंद घ्यावी. >>> मन:पुर्वक धन्यवाद! Happy

मंजूडी, आपण कृपया सप्रमाण अधिक आणि नेमकी माहिती देऊ शकाल का याबाबत?>>> त्या बाफवरच्या पोस्टी मी सेव केलेल्या आहेत. आपल्याला ईमेलने पाठवू की इथेच जाहीर करू? Happy

प्रशस्तीपत्रक हवे असल्यास म्हणजे 'हवे असल्यास'. नको असल्यास प्रश्नच नाही. काही पालकांना मुलांचे नाव जाहीर करायचे नसते. त्यांनी मुलांच्या टोपणनावाने प्रवेशिका पाठवल्या. तेव्हा त्यांच्या इच्छेचा मान राखला आहे.
प्रत्येक शब्द हा प्रत्येकाला लागू होत नाही. आधीच पाठवलेल्या प्रत्येक नावासाठी मंडळ आभारी आहेच. >>>सर्व बालस्पर्धकांना संयोजन मंडळातर्फे पीडीएफ स्वरुपात प्रशस्तीपत्रक पाठवण्याचा निर्णय जाहीर केल्यावर हवे असल्यास/ नको असल्यासचा प्रश्न उद्भवत नाही. इथे 'हवे असल्यास' हे शब्द टाळून सर्व पालकांना 'आपापल्या पाल्यांची नावे कळवावीत' अशी विनंती करता आली असती किंवा पाल्यांच्या टोपणनावाने प्रशस्तिपत्रक पाठवता आले असते.
असो. झाले तेवढे वाद/ चर्चा/ उहापोह पुरे झाले.
माझ्याकडून या सगळ्याला पूर्णविराम. Happy

Pages