मराठी भाषा दिवस २०१२ स्पर्धा - निकाल

Submitted by संयोजक on 7 March, 2012 - 02:50

palakhi.jpgमराठी भाषा दिवस २०१२ या उपक्रमांतर्गत घेतलेल्या स्पर्धांचा निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

म..म..मराठी, ग..ग..गोष्टी

परीक्षकांचे मनोगत :
गेल्या काही दिवसांमध्ये इथे, मायबोलीवर, मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या "नेहमीच्या गंमतगोष्टी" आणि "चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी" ह्या स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिका पाहणं/ऐकणं/वाचणं हा आमच्यासाठी एक आनंदानुभव होता. संयोजक मंडळाने या स्पर्धेसाठी आम्हाला परीक्षक म्हणून नेमल्यामुळे हा आनंदानुभव आम्हाला मन:पूत घेता आला याबद्दल आम्ही संयोजक मंडळाचे आभारी आहोत आणि आशा करतो आहोत की यात भाग घेतलेल्या पालकांना पण, ह्या प्रवेशिका त्यांच्या पाल्यांबरोबर तयार करतांना, ह्या आनंदाचा अनुभव आला असेल आणि कुठल्याही बक्षिसापेक्षा हा निखळ आनंद मोठा आहे, महत्त्वाचा आहे, हेही ते उमजून असतील.
एकूण सत्तेचाळीस प्रवेशिकांपैकी तीस प्रवेशिका दोन ते बारा या वयोगटातील (नेहमीच्या गंमतगोष्टी) आणि सतरा प्रवेशिका तीन ते चौदा या वयोगटातील (चित्रसंचावर आधारित गोष्टी) होत्या. पहिल्या गटात सहा कथन-चित्रण तर चोवीस फक्त कथन अशा वर्गवारीत होत्या. तीन ते चौदा या गटातील वर्गवारी आठ कथन आणि नऊ लेखन याप्रमाणे होती.
पहिल्या गटात दोन ते पाच वर्षांपर्यंतचे चौदा स्पर्धक, पाच ते आठ वर्षांपर्यंतचे चौदा स्पर्धक आणि आठ ते नऊ वर्षांपर्यंतचे दोन स्पर्धक होते तर दुसर्‍या गटात एक पावणे पाच वर्षाचा स्पर्धक सोडल्यास बाकी सात ते तेरा वर्षे या वयाचे स्पर्धक होते.
परीक्षण करताना आमच्या लक्षात एक गोष्ट अशी आली की "नेहमीच्या गंमतगोष्टी" मध्ये वैविध्य कमी होतं. ठराविक एक दोनच गोष्टी, त्याही काही पिढ्या जुन्या असलेल्या, कथनात वापरलेल्या दिसल्या. याचे कारण खरोखरच लहान मुलांना त्याच गोष्टी आवडतात की फक्त त्याच गोष्टी त्यांच्या कानावर पडलेल्या आहेत ह्याचा विचार करायला हवा. चित्रसंचावर आधारित कथांमध्ये लिहिलेल्या किंवा ध्वनिमुद्रित केलेल्या प्रवेशिकांमध्येसुद्धा अजून विविधता, कल्पनाशक्तीचा वापर स्वागतार्ह ठरला असता. काही गोष्टींमधे चारही चित्रांचा वापर केवळ आवश्यक आहे म्हणून निव्वळ उल्लेख करून सोडून देण्याकडे प्रवृत्ती दिसली.
महाराष्ट्रापासून, किंबहुना देशापासूनही दूर निवासी असल्यामुळे बर्‍याच स्पर्धकांना मराठी शब्दांचे उच्चार कठीण वाटत होते आणि इंग्रजी लकबीने ते उच्चारण्याची सवय जडलेली लक्षात आली. तथापि हा मुलांचा दोष म्हणता येणार नाही त्यामुळे परीक्षण करताना या त्रुटीकडे शक्य तितका कानाडोळा केला आहे.
गुणवत्तेचे परीक्षण करताना पहिल्या गटामधे गोष्ट स्वत: सांगणे, पालकांकडून वाजवीपेक्षा अधिक सूचना (प्रॉम्प्टिंग) नसणे, स्वच्छ आवाज, स्पष्ट उच्चार, १ ते ३ मिनिटांच्या मर्यादेचे वाजवीपेक्षा जास्त उल्लंघन नसणे आणि सादरीकरण, आवाजातील चढ-उतार, एकसुरीपणा नसणे, कथनात भावनांची व्यवस्थित अभिव्यक्ती आणि एकंदरीत परिणामकारकता हे निकष लावण्यात आले होते. ही स्पर्धा पाल्यांकरिता असल्यामुळे पालकांनी घेतलेल्या कष्टांबद्दल पूर्ण आदर ठेवूनही, गुणवत्तेच्या मोजमापात त्या अंगाला जाणीवपूर्वकच स्थान दिले नव्हते.
दुसर्‍या गटामधे गोष्ट लिखित स्वरुपात असल्यास ती स्वरचित आणि स्वलिखीत असणे, एका चित्रसंचातील सर्व चित्रांचा वापर, तोही निव्वळ उल्लेखापेक्षा जास्त आणि चपखल असणे, हस्ताक्षर, गोष्टीची लांबी, आणि कथित स्वरुपात असल्यास पालकांकडून वाजवीपेक्षा अधिक सूचना (प्रॉम्प्टिंग) नसणे, स्वच्छ आवाज, स्पष्ट उच्चार, १ ते ३ मिनिटांच्या मर्यादेचे वाजवीपेक्षा जास्त उल्लंघन नसणे आणि सादरीकरण, आवाजातील चढ-उतार, एकसुरीपणा नसणे, कथनात सुसूत्रता, भावनांची व्यवस्थित अभिव्यक्ती आणि एकंदरीत परिणामकारकता हे निकष ठेवले होते.
या सर्व निकषांवर घासून पाहिल्यावर आम्ही परीक्षक पुढील स्पर्धकाना विजेते म्हणून अभिवादन करीत आहोत.
नेहमीच्या गंमतगोष्टी – वयाचा उपगट २ ते ५ पर्यंत
विजेता क्रमांक १ - प्रवेशिका ५ स्पर्धक [इरा] प्रेषक [रैना] शीर्षक [बुड बुड घागरी]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका ९ स्पर्धक [श्रीशैल] प्रेषक [इंद्रधनुष्य] शीर्षक [मैत्रीची गंमत]
विजेता क्रमांक ३ - प्रवेशिका ३८ स्पर्धक [मनस्वी बाचल] प्रेषक [मंगेशमनु] शीर्षक [चिऊकाऊची गोष्ट]
विजेता क्रमांक ४ - प्रवेशिका ७ स्पर्धक [तनिष] प्रेषक [Manasi-Patil] शीर्षक [लाकूडतोड्याची गोष्ट]

नेहमीच्या गंमतगोष्टी – वयाचा उपगट ५ ते ८ पर्यंत
विजेता क्रमांक १ - प्रवेशिका ४७ स्पर्धक [मुक्ता] प्रेषक [स्मिताके] शीर्षक [दगडाचं सूप]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका २२ स्पर्धक [ईषू] प्रेषक [मवा] शीर्षक [कबुतर आणि मुंगी]
विजेता क्रमांक ३ - प्रवेशिका ३१ स्पर्धक [मैत्रेयी] प्रेषक [संपदा] शीर्षक [गोगलगाय व चिमणी]

नेहमीच्या गंमतगोष्टी – वयाचा उपगट ८ ते १२ पर्यंत
विजेता क्रमांक १ - प्रवेशिका १ स्पर्धक [नचिकेत] प्रेषक [पौर्णिमा] शीर्षक [शब्द म्हणजे शस्त्र]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका १० स्पर्धक [शंतनू शिंदे] प्रेषक [शर्मिष्ठा] शीर्षक [धाडसी सावरकरांची गोष्ट]

चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी – वयाचा गट ३ ते १४ वर्षे - उपगट लेखन
विजेता क्रमांक १ – प्रवेशिका १६ स्पर्धक [अवनी] प्रेषक [मंजिरी] शीर्षक [स्वप्नातील सायकल]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका ११ स्पर्धक [राहुल] प्रेषक [लोला] शीर्षक [सोनेरी सायकल]
विजेता क्रमांक ३ - प्रवेशिका १५ स्पर्धक [मानसी कुलकर्णी] प्रेषक [अनघा_कुल] शीर्षक [जंगलातले साहस]

चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी – वयाचा गट ३ ते १४ वर्षे - उपगट कथन
विजेता क्रमांक १ - प्रवेशिका २४ स्पर्धक [अक्षज] प्रेषक [बिल्वा] शीर्षक [राजूची गोष्ट]
विजेता क्रमांक २ - प्रवेशिका ४० स्पर्धक [साजिरी] प्रेषक [साजिरा] शीर्षक [चिंकीची गोष्ट]
विजेता क्रमांक ३ - प्रवेशिका २९ स्पर्धक [अनन्या] प्रेषक [मी अनन्या] शीर्षक [थापाड्या चिंटू]
विजेता क्रमांक ४ - प्रवेशिका १९ स्पर्धक [मनस्व मादुस्कर] प्रेषक [Monalip] शीर्षक [मॅजिक टोमॅटो]

- mkarnik, अनुदोन

वेळात वेळ काढून, सर्व प्रवेशिका तपासून, निकष ठरवून, ही जबाबदारी यथायोग्य पार पाडल्याबद्दल मुकुंद कर्णिक आणि विद्युल्लता महाबळ यांचे संयोजनमंडळातर्फे मनःपूर्वक आभार. फार मोठे काम केले आपण!
_____________
मी मराठी
विजेता सभासद: HH
_____________
कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार
विजेते सभासद: भरत मयेकर,अश्विनीके, मन्या२८०४
_____________
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

*****************
स्पर्धांसाठी बक्षिसं प्रायोजित केल्याबद्दल श्री. आशिष पाटकर (मनोविकास प्रकाशन, पुणे) व श्री. श्याम देशपांडे (समकालीन प्रकाशन, पुणे) ह्यांचे आम्ही शतश: आभारी आहोत.

प्रायोजक समकालिन प्रकाशन- नव्या जगाचा, नव्या समाजाचा, नव्या प्रश्नांचा थांग शोधणं, ते समजून घेणं आणि मराठीतील वाचकांशी पुस्तकरूपानं संवाद साधणं, हा समकालीन प्रकाशन सुरू करण्यामागचा विचार आहे.त्यामुळेच प्रकाशनाच्या नावात समकालीन हा शब्द आहे. ऑगस्ट २००६ मध्ये खरेखुरे आयडॉल्स हे समकालीनचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे-लढणारे, सर्वसामान्यांचं जीवन सुकर व्हावं यासाठी संशोधन करणारे, प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते, संशोधक, अधिकारी अशा अनेक कार्यरत व्यक्तींची ओळख करून देणारं हे पुस्तक. एकीकडे या व्यक्तींच्या कामाला सलाम करणारं आणि त्याचवेळी आदर्शच ठेवायचा तर तो अशा कामांचा ठेवा, असं आवाहन तरुणांना करणारं. गेल्या चार वर्षांमध्ये या पुस्तकाच्या १८ आवृत्त्या निघाल्या, त्यावरून वाचकांचा प्रतिसाद लक्षात यावा.
खरे़खुरे आयडॉल्स ते नुकत्याच प्रकाशित झालेल्या अनिल अवचट यांच्या मुक्तांगणची गोष्टपर्यंतच्या सर्व पुस्तकांना वाचकांनी - आम्हाला हेच हवं होतं-, असं म्हणत उदंड प्रतिसाद दिला आहे. चरित्र, आत्मचरित्र, राजकीय- सामाजिक आणि शोधक ललित अशा विविध फॉर्म्समधून समकालीन प्रकाशनाची पुस्तकं प्रकाशित होत आहेत. विषयांची निवड, दर्जेदार लेखकांचा शोध, वाचकांप्रति बांधिलकी, निर्दोष अंतरंगासाठी कष्ट अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अल्पकाळातच समकालीन प्रकाशन हे मराठीतील अव्वल प्रकाशकांच्या रांगेत विराजमान झालं आहे.
samakaaleen%20prakaashan%20logo.jpg

******************
नियमावली

१. सर्व विजेत्यांना ईमेलद्वारे संपर्क करून पारितोषिक कसे घेऊन जावे हे सविस्तर कळवण्यात येईल. पारितोषिक हवे असल्यास आपले खरे नाव, पत्ता कळवणे बंधनकारक असेल.
२. सर्व बालस्पर्धकांना संयोजन मंडळातर्फे पीडीएफ स्वरुपात प्रशस्तीपत्रक पाठवण्यात येईल. प्रशस्तीपत्रक हवे असल्यास त्यासाठी पाल्याचे नाव कळवणे बंधनकारक असेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा! पारितोषिके देखील आहेत? या स्पर्धा अश्या होत्या की ज्यात भाग घेणे हाच मोठा आनंद होता. Happy चित्रहाराच्या निमित्तने कुसुमाग्रजांच्या कविता पुन्हा पुन्हा वाचल्या गेल्या.

<<मुळात ज्याची उत्तीर्ण होण्याची आर्हता आहे तो "उत्तेजनार्ह' असतो>>

अजिबात पटलं नाही.
xxxx+अर्थ म्हणजे xxxxसाठी.
चरितार्थ , सांत्वनार्थ, विचारार्थ : जगण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी, विचार करण्यासाठी. तसेच उत्तजनार्थ : उत्तेजन देण्यासाठी (यात उत्तीर्ण कुठून आले?)

अर्हता = पात्रता असा अर्थ घ्यायचा तर बाकीच्यांची उत्तेजन देण्याइतकीही लायकी नाही असे म्हणायचे की काय?

माझ्या मते परीक्षा, परीक्षक असे शब्द आहेत.

येवढे निकष लाऊन घेतलेली परिक्षा म्हणजे मोठ्यांनी छोट्यांसाठी घेतलेली स्पर्धा, असं उगाच वाटल ..पण स्पर्धा म्हंटली की हे सगळं आलंच Sad I hate स्पर्धा..

मुलांना मज्जा आलीना बस्स... मुलांना मोकळं सोडा आणि मग ते काय मज्जा मज्जा करतात ते बघा...

चला आता मुलांनी करमणुक केली ना.. आता मोठ्यांची पाळी मुलांची करमणूक करण्याची.. एखादी छानशी गोष्ट किंवा बालकविता मुलांसाठी सादर करा... सगळे निकष आम्हालाच काय म्हणुन?

आपल्या मित्रांनी काय धम्माल केली ना.. सगळेच बेस्ट आहेत.. क्यू के हर एक फ्रेंड बेस्ट होता है... आणि बच्चा पार्टी तर नेहमीच बेस्ट... बच्चा पार्टी जिंदाबाद!!!!

संयोजक काका, काकू, मावशी, मामा, आज्जी, आजोबांन्नो, थांकू....

वर उत्तेजनार्ह आणि उत्तेजनार्थ वर बरीच उहापोह आहे.
उत्तेजनार्ह = उत्तेजन देण्यास पात्र
उत्तेजनार्थ = उत्तेजन देण्यासाठी

तर मला वाटतंय की मूळ लेखात दिलेली लीस्ट ही विजेत्यांची आहे
तर विजेता क्र. १, २ आणि उत्तेजनार्ह (उत्तेजन देण्यास पात्र) विजेता या अर्थी "उत्तेजनार्ह" हा शब्द बरोबर आहे.

थोडक्यात उत्तेजनार्ह हे विजेत्यासाठी आलेले विशेषण असावे. (आणि उत्तेजनार्थ हे बक्षिसासाठीचे विशेषण आहे. उदा. उत्तेजन देण्यासाठी बक्षिस.)

(मराठी व्याकरणाचे धडे नव्याने गिरवेन म्हणतेय! :अओ:)

सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन.. Happy आणि जे जिंकलेले नाहीत त्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन कारण त्यांनी देखील आम्हाला छान छान गोष्टी ऐकवल्या.. Happy

प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचा विजेता , तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकाचा विजेता.
''स्पर्धकाची कामगिरी उत्तेजनार्ह आहे.'' असे म्हणता येईल, पण ती सगळ्याच स्पर्धकांची असते. नाही का?

सर्व सहभागी बालकलाकरांचं व त्यांच्या पालकांचं अभिनंदन!!

सस्पेन्स !!!!! एच्चेच बक्षीसं घेणार का ? Lol Light 1

संयोजक काका, काकू, मावशी, मामा, आज्जी, आजोबांन्नो>> संयोजक आज्जी, आजोबा?? Uhoh Proud

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन!!

अर्रे ! चित्रहार ही स्पर्धा होती? Happy मला॑ वाटलेलं खेळच आहे आणि मी कॅडबरीवरसुद्धा खुश होते :-). संयोजक, धन्यवाद Happy

बाकिच्या विजेत्यांचे अभिनंदन Happy

सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन! Happy

सर्व स्पर्धकांचं आणि संयोजक / परीक्षकांचंही कौतुक. छान झाला यंदाचा कार्यक्रम. Happy

धन्यवाद संयोजक आणि परीक्षक. सर्व विजेत्यांचं आणि स्पर्धकांचं अभिनंदन. अजून बर्‍याच गोष्टी वाचायच्या, ऐकायच्या आहेत.

>>पीडीएफ स्वरुपात प्रशस्तीपत्रक
अगदी हीच विनंती करायला आले होते. आभारी आहे.

सर्व छोट्या दोस्तांचे आणि त्यांच्या आई-बाबांचे अभिनंदन! Happy

संयोजक मंडळाचे खुप कौतुक आणि आभार्स Happy

सर्वांना धन्यवाद.

चिनूक्स, काही चुका नक्कीच राहिल्या आहेत. जसे परिक्षण, परिक्षक, लिखीत, पेक्शा, महत्त्वाचा, अभिव्यक्ती हे शब्द. ते परीक्षण, परीक्षक, लिखित, पेक्षा, महत्वाचा, अभिव्यक्ति असे हवे होते. या चुका का व कशा नजरेतून सुटल्या याचे विवेचन न करता एव्हढेच म्हणतो की संयोजकाना त्या दुरुस्त करण्याची विनंती करणारी ईमेल मी पाठवली आहे. राहता राहिला उत्तेजनार्थ आणि उत्तेजनार्ह या शब्दांवरील उहापोह. मनोगतानंतर निकाल लिहिताना मी 'स्पर्धकाना विजेते म्हणून अभिवादन करतो आहोत' असे म्हटले आहे. यादीमध्येही बक्षिस क्रमांक असे न म्हणता विजेता क्रमांक असे म्हटले आहे. ते स्पर्धकाला नजरेत ठेवून आहे, बक्षिसाला नाही. त्यामुळे स्पर्धक 'उत्तेजनास पात्र (म्हणून उत्तेजनार्ह) आहे' हा माझा प्रयोग नक्कीच चुकीचा नाही. तिथे 'उत्तेजनार्थ' करणे चुकीचे ठरेल.

भरत मयेकर, काय म्हणू? कुणीतरी म्हटलेले आहे तसेच काहीतरी मीही म्हणतो झाले - 'all are equal, but some are more equal".

निंबुडा, तुमचे विशेष आभार.

मंजूडी, असहमत होण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. मी त्याची कदर करतो.

उत्तेजनार्ह/र्थ बद्दलची वरची चर्चा वाचून माझे दोन पैसे.

उत्तेजनार्थ बक्षीस असू शकतं तर उत्तेजनार्ह लेख असू शकतो.

म्हणजे असं म्हणता येईल की अमुकतमुक यांचा लेख उत्तेजनार्ह वाटला म्हणून त्यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येत आहे.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!!

संयोजकांनी खुप मेहनत घेऊन छान छान कार्यक्रम सादर केले त्याबद्दल त्यांचे कौतुक आणि धन्यवाद!

Pages