आपल्याला एखादी छोटी मोठी कल्पना अचानक खूप रोमांचकारी वाटते, यात काहीतरी प्रचंड काम होऊ शकेल असं जाणवत राहतं, पण थोडंसं पुढे गेल्यावर लक्षात येतं, की या गोष्टीत आपण सोडून कुणालाच रस नाही, किंवा एकुणच यात काही राम नाही. व्यवसाय-धंदा करायला निघालेल्या लोकांबाबत असं अनेक वेळेला घडलेलं आपण पाहिलं आहे. पण त्याचबरोबर अनेक वेळेला हेही बघितलं आहे, की एखाद्याला एखादी छोटी गोष्ट करून बघायची तीव्र इच्छा होते, मग तो अनेक जणांचा विरोध सहन करून किंवा प्रसंगी झुगारून त्याला पाहिजे ते करत राहतो, आणि एखाद्या दशकानंतर त्या हौसेखातर करून बघितलेल्या गोष्टीचं एखाद्या साम्राज्यात रूपांतर होतं!
हे असं घडण्यामागे नक्की काय काय असतं? नक्की कसा घडतो हा प्रवास? एखादी कल्पना व्यावहारिक पातळीवर उतरवणं हे त्या कल्पनेच्या असामान्यत्वावर अवलंबून असतं, की तीच कल्पना याआधी अनेकांना सुचली असूनही यावेळी त्या कल्पनेवर वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या मनोवृत्तीने करून बघण्यावर असतं? धंद्यात यशस्वी होण्यासाठी फक्त 'असामान्य', 'वेगळ्या वाटेवरच्या' कल्पनाच गरजेच्या असतात, की त्या कल्पनेच्या सर्वसामान्यत्वात, ती सगळ्यांना नीट माहिती असणं सुद्धा पुरेसं ठरतं?
म्हटले तर एकदम सोपे प्रश्न, आणि म्हटले तर जगड्व्याळ.
पुण्याजवळच्या शिरूरसारख्या छोट्या गावातून एक व्यवसाय सुरू होऊन अनेक अडचणींनंतर पुण्या-मुंबईचं-महाराष्ट्राचं मार्केट काबीज करणार्या, मग हळुहळू सार्या देशात गेलेल्या एका छोट्या ब्रँडने नंतर सातासमुद्रापलीकडचं जगही बघितलं. गावात-देशात जन्मलेल्या आणि परदेशातही कौतुकाचे धनी झालेल्या 'लोटस' आणि 'शबरी' या खाकर्याच्या ब्रँडचे जनक म्हणजे मनीषा आणि कल्पेश दुगड हे मनस्वी जोडपं. कामावर असीम निष्ठा ठेवणार्या गंभीर प्रवृत्तीच्या मनीषा आणि चैतन्याचा आणि अफाट पण सोप्या कल्पनांचा स्त्रोत असलेले, अखंड सळसळतं चैतन्य सतत अंगात घेऊन वावरणारे कल्पेश- हे दोघं सांगत आहेत त्यांच्या व्यवसायाबद्दल, त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या तत्वं-निष्ठांबद्दल, त्यांच्या अनेक विषयांवरच्या मतांबद्दल आणि व्यावसायिकाने घरात बाहेर कसं वागावं- यासारख्या सहजसोप्या विषयांवरही!
कसा सुरू झाला होता तुमच्या खाकर्याच्या या प्रसिद्ध ब्रँड्सचा प्रवास?
मनीषा- काही खाद्यपदार्थ लोकांना आवडतील असे चांगल्या चवीचे करता येणे- यापलीकडे या व्यवसायातलं काहीही सुरूवातीला ठाऊक नव्हतं. माझ्या सासरी परंपरागत किराणा मालाचा व्यवसाय होता. तो अचानक सोडून हे कसं कष्टाचं काम सुरू करणं सोपं नव्हतंच. घरातून आणि बाहेरूनही विरोध होता. 'हा काय हमाली कामाचा मुर्खपणा तुम्हाला सुचला आहे?' असे शब्द ऐकून झाले. नवर्याने मात्र विश्वास ठेवला..
कल्पेश- बरोबर तेरा वर्षांपुर्वी, म्हणजे फेब्रुवारी १९९९ सालची ही गोष्ट. काहीही झालं , तरी हे करून बघायचं, हे मनाने घेतलं. खाकर्यामध्ये यापुर्वीच अनेक ब्रँड्स होतेच. पण त्यांच्याहीपेक्षा जास्त चांगलं करून लोकांना खाऊ घालायचं हा ध्यास होता. खाऊन लोक चार गोड शब्द ऐकवतील अशी आस होती. शिरूरमध्ये एक छोटा हॉल भाड्याने घेतला. ती जागा इतकी दुर्लक्षित होती, की सर्वप्रथम आम्हा नवराबायकोला ती हातात झाडू घेऊन झाडून काढावी लागली, काम करण्याजोगी तयार करावी लागली. आम्हां दोघांव्यतिरिक्त एक बाई मदतीला होती. त्यादिवशी तिघांनी मिळून संध्याकाळपर्यंत कष्ट करून पावणेतीन किलो वजनाचे खाकरे तयार केले, तेव्हा तिघंही घामाने निथळत होतो! मग हे खाकरे घेऊन लोकांना खायला द्यायचा उद्योग आम्ही आरंभला. त्यानंतर अनेक दिवस आम्ही शेकडो किलो खाकरे तयार करून लोकांना फुकट वाटले, खाऊन बघा, कसे झालेत ते आम्हाला सांगा- अशी विनंती करत.
लोकांनी मनापासून दाद दिली, तसं गाळलेल्या घामाचं सार्थक होतंयसं वाटू लागलं. 'चव' हा आमचा युएसपी असणार आहे, हे आम्ही ओळखलं. त्याला आम्ही पराकोटीची स्वच्छता, सर्व गोष्टींचं प्रमाण अगदी काटेकोरपणे पाळणे, कच्च्या मालाच्या गुणवत्तेबद्दल कुठेही तडजोड न करणे, कुठचेही कृत्रिम पदार्थ चवीसाठी व रंगासाठी न वापरणे- या गोष्टींची जोड दिली. आता या क्षणी मला विचाराल, या जोड दिलेल्या गोष्टीच चवीपेक्षा मला महत्वाच्या वाटतात. इतकंच नाहीतर या गोष्टींशिवायच्या चवीची कल्पनाच आम्ही आता करू शकत नाही!
पुढचं सारं मार्केटिंग, डीलर्सचं नेटवर्क.. याबद्दल सांगा.
कल्पेश- प्रत्यक्ष ओळखीतल्याच काही लोकांना आम्ही मदत करायची विनंती केली. खाकर्याच्या चवीवर त्यांचा विश्वास होताच. पुणे आणि जिल्ह्यातल्या दुकानांपर्यंत आमचा माल पोचण्यात या लोकांचा मोलाचा सहभाग होता. हेच लोक आत्या आमचे 'अधिकृत डीलर' आहेत. आम्ही कष्ट तर केलेच, पण गोड बोलून अनेक लोकांना जोडलं. लाखो रुपयांच्या भांडवलाला लाजवेल, इतकं मोठं भांडवल हे गोड बोलून जमवलेले सारे लोक होते. या लोकांच्या जोरावरच आम्ही पहिल्या दिवसाच्या पावणेतीन किलोपासून ते आज हजारो किलोपर्यंतच्या उत्पादनापर्यंत पोचलो. पहिले काही दिवस आम्ही खाकर्यांचं पॅकिंग प्लास्टिकच्या पिशव्या आणि सील करण्यासाठी मेणबत्तीचा उपयोग केला होता. आज लाखो रुपयांची मशिन्स शिरूरच्या कारखान्यात पॅकिंगचं काम करतात. पहिल्या दिवशी एका मदतनीस बाईपासून ते आज शेकडो कामगारांपर्यंत असा हा प्रवास झाला आहे. आज देशात आणि परदेशातली मागणी पुअरवता पुरवता आमची दमछक होतेय, उत्पादन क्षमता वाढवण्याचं काम हाती घ्यावं लागणार आहे. 'खाकरा तयार करणं' ही कल्पना सुरूवातीला किती सामान्य आणि 'घिसीपिटी' म्हणता येईल, अशी आम्हाला आणि अनेक लोकांना वाटली होती. ते कुणीतरी म्हटलंच आहे ना, की कल्पना अफाट नसली तरी चालेल, पण ती राबवण्यातल्या वेगळेपणात अफाटपण आहे- म्हणून!
तुमच्या खाकर्याची ही 'चव' तुम्हाला कशी 'सापडली'?
मनीषा- काहीवेळा सहज सापडली, तर अनेक वेळेला लाखो प्रयोग करावे लागले. हा प्रकार आजतागायत थांबलेला नाही. अचानक कधीतरी नवीन जबरदस्त चव प्रयोग करता करता सापडून जाते, तेव्हा होणारा आनंद शब्दांत सांगता यायचा नाही. ही अशी 'चव' एकदा सापडली, आधी केलेल्या कष्टाचं आणि अपयशाचं काही वाटत नाही. 'शबरी' हा सर्वात पहिला ब्रँड. यात गाईचं शुद्ध तूप वापरलं होतं, आजही तेच वापरलं जातं. पण मग बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी निरनिराळे 'फ्लेवर्स' तयार करण आवश्यक होतं. मग उच्च दर्जाच्या रिफाईन्ड तेलापासून बनवलेल्या विविध फ्लेवर्समधल्या खाकर्यांचा 'लोटस' हा ब्रँड आम्ही बाजारात आणला. नंतरचं हे इंग्रजी नाव ठेवण्यामागे, आमचा ब्रँड कधीतरी आम्ही परदेशातही पाठवू ही मनाशी बाळगलेली आकांक्षा होतीच, पण 'शबरी' आणि 'लोटस' या दोन्ही शब्दांचं राम आणि लक्ष्मीसारख्या देवादिकांच्या नावांशी अत्यंत जवळचं नातं आहे- हीही गोष्ट मला महत्वाची वाटते. कुणी काय म्हणेल ते म्हणो, पण या श्रद्धेने मला अनेक वेळेला आधार, हात दिलेला आहे. शिवाय चिखलासारखी कितीही वाईट आणि घाणेरडी गोष्ट असो, पण त्यातूनही कमळासारखं काहीतरी चांगलं निघतंच या गोष्टीवर माझी गाढ श्रद्धा आहे.
'एक्स्पोर्ट' कसं सुरू झालं?
कल्पेश- अक्षरशः माऊथ पब्लिसिटीवर! परदेशात शिकायला जाणार्या काही मुलांनी आमचे खाकरे तिथे खाण्यासाठी नेले. खाकरा हा पदार्थ अनेक दिवस टिकणं, चव अखेरपर्यंत तशीच राहणं, पॅकिंग अत्यंत सहजसोपं, कुठेही नेण्याजोगं आणि 'युजर फ्रेंडली' असणं, उठल्यापासून झोपेपर्यंत केव्हाही खायला योग्य असणं या गोष्टी यासाठी महत्वाच्या ठरल्या. पुढे काही दिवसांनी आपोआपच आमचे खाकरे परदेशात नेऊन विकू इच्छिणार्या उत्सुक लोकांनी आम्हाला संपर्क साधला. ही गोष्ट मात्र आमच्या नशीबाने अत्यंत सहजसाध्य झाली. सुरूवातीच्या काळात प्रचंड कष्ट उपसल्याने नंतर थोडंसं उजवं दान देवाने आमच्या पदरात टाकलं, असं आम्ही आता समजतो. आज सिंगापूर, जपान आणि इतर अनेक देशांत आमचा माल जातो आहे.
तुमच्या कारखान्याच्या वातावरणाबद्दल खूप ऐकलं आहे..
मनीषा- एकतर पहिली गोष्ट- प्रचंड स्वच्छता. साधं तंबाखूचं व्यसन असलेल्यांनाही कामावर घेतलं जात नाही, बाकी व्यसनं तर दूरच. आम्ही 'खाद्यपदार्थ' बनवतो याचा अर्थ आमची छ्होटी चूकही लोकांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते, ही गोष्ट अत्यंत काटेकोरपणे आम्ही लक्षात ठेवली आहे. निसर्गाला अपायकारक, तब्ब्येतीला धोकादायक असं काहीही मी लोकांना देणार नाही हे पहिल्याच दिवसापासून मनातून ठरवून ठेवलं आहे. कारखान्यात नियम न पाळणार्यांची गय केली जात नाही. अत्यंत सात्विक आणि आरोग्यपूर्ण वातावरणात आमचं काम चालतं. कामगारांना कुटुंबच आम्ही मानलं आहे. दरवर्षी आम्ही या सार्यांना सहलीला नेतो. नित्यनेमाने चांगली नाटकं आणि कार्यक्रमांना आम्ही त्यांना नेतो. त्यांच्या कुटुंबियांची जमेल तशी काळजी घेतो. आरोग्य आणि शिक्षणासाठीची मदत करतो. अण्णा हजार्यांवर आमची गाढ श्रद्धा आहे. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचे चार शब्द ऐकण्यासाठी म्हणून आमच्या सार्या लोकांना आम्ही राळेगणसिद्धीलाही नेलं आहे.
कुठच्या प्रश्नांना तुम्हाला तुमच्या या व्यवसायात नेहमीच तोंड द्यावं लागतं?
कल्पेश- सार्याच! इतर कुठच्याही धंद्यांत येतात ते सारे प्रश्न. खूप छोटे आणि खूप मोठेही. कामगारांचा, उधारीचा, गुणवत्तेला मिळत नसलेल्या 'प्रिमियम'चा, आजूबाजूच्या परिसराच्या आणि लोकांच्या वागण्याचा, शासनाच्या धोरणांपासून ते आपल्याकडच्या वीज-रस्ते-पाणी या अत्यंत बेसिक प्रश्नांचाही त्रास. हे त्रास निरनिराळे रूपे धारण करून समोर येत असतातच. आता 'प्रश्न समोर येणे म्हणजे प्रगतीची नवी दिशा असते' वगैरे अनेक मोठे लोक म्हणून गेले आहेत, तेव्हा तेच तेच बोलण्यात काही अर्थ नाही. अनेक वेळेला गनिमी काव्याने प्रश्नाला चुकांडी देऊन तो सोडवण्यापेक्षा पर्यायी मार्ग शोधणे हीही फार मोठी गोष्ट आहे, असं माझं मत. चालू असलेल्या धबडग्यात असे पर्यायी मार्ग शोधणं इतकं सोपं नसतंच. पण चिकाटीने काम केलं, की व्य्वसाय वाढतो, तसंच वाढत्या व्यवसायासोबत वाढणारे अनेक बाजूंचे 'प्रेशर' हे काम आपल्याकडून करवून घेतात, हे नक्की.
अजून निराळं काही करण्याची इच्छा आहे का? तुमच्या ब्रँड्सला एक तप लोटलं. अजून एका तपानंतर हा ब्रँड, तुम्ही स्वतःला कुठे बघत आहात?
मनीषा- 'कल्याणी नमकीन्स प्रा. लि.' या नावाखाली हे दोन्ही ब्रँड्स आम्ही इतकी वर्षे चालवले. आता 'गॉडगिफ्ट इंटरनॅशनल फूड्स लि.' या नावाखाली 'शबरी, 'लोटस' आणि इतर ब्रँड्स येतील. खाद्यपदार्थांत अजून बरंच काही करून बघायचं आहे, पण त्याबद्दल आताच सांगण्यात काही अर्थ नाही.
कल्पेश- काही हुशार लोकांकडे सुंदर कल्पना असतात, पण ती व्यवहारात आणण्ञासाठी पुरेसं पाठबळ, किंवा व्यावहारिक दृष्टी नसते. 'गॉडगिफ्ट कन्सल्टन्सी' या नावाखाली आम्ही होतकरू लोकांच्या कल्पनांना आमच्या नेटवर्कचा उपयोग करून मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी कुठचंही प्रॉडक्ट, सर्व्हिस आम्हाला वर्ज्य नसणार आहे. या कल्पनेवर अजून अकम चालू आहे. 'गॉडगिफ्ट प्रॉपर्टीज' ही कंपनी बांधकाम व्यवसायात लवकरच पदार्पण करेल. सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना अनेक बाबतीत आम्ही गुरू मानलं आहे. कळत नकळत आजवरच्या वाटचालीत अनेक ब्वेळेला त्यांनी आम्हाला स्फुर्ती दिली आहे. डीएसकेंचं हे ऋण फार मोठं आहे.
इतक्या वर्षांत काय 'शिकायला' मिळालं, धडा मिळाला, असं वाटतं?
कल्पेश- 'उधारीवर काम करायचं नाही' हे! मी आधी स्वतःपासून सवय लावून घेतली आहे, कुठचीही गोष्ट उधारीवर घ्यायची नाही. मग 'माल मी उधारीवर देणार नाही', हे ठरवणं थोडं सोपं गेलं. एकदा का 'उधारी' हा विषय धंद्यात, देवाणघेवाणीत आला, की तुमच्या हातातून बर्याच गोष्टी सुटून जातात. कंट्रोल राहत नाही. गुणवत्ता, वक्तशीरपणा, स्वछ व्यवहार आणि वागणं या गोष्टींचा बळी दिला जातो. पुढे हा प्रकार वाढल्यावर व्यावहारिक गाडं रूळावरून घसरतं, ते परत कधीच नीट सरळ न होण्यासाठीच! माझं वागणं स्वच्छ आहे, माझा माल उच्च दर्जाचा आहे, त्यामुळे मी उधार देणार नाही- हे आजतागायत मी पाळलं आहे. एकदा अशी भुमिका घेतल्यावर बरेच प्रश्न बाद होतात. समोरच्यालाही तशी सवय पडून जाते. परिणाम इतकाच, की रात्री शांत झोप लागते!
नवीन उद्योगात पडू इच्छिणार्यांना काय संदेश द्याल?
कल्पेश- रात्री दहाच्या आत झोपा, आणि पहाटे पाचला उठा! (दोघेही हसतात.) चेष्टेचा भाग नाही हा. स्वतःचं वागणं सुधारणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या वागण्यातल्या छोट्या छोट्या छान गोष्टींतूनही तुम्ही एक विशिष्ट प्रकारची 'डिग्निटी' मिळवता. यातूनच पुढे तुम्ही हक्काने- अधिकाराने इतरांच्या चूका दाखवू शकता. उद्योगात पडू इच्छिणार्यांना भविष्यात अनेक लोकांचा विश्वास संपादन करायचा असतो. या अशा छोट्या गोष्टींतून तुम्ही घडत जाता, समोरच्याला दिसत जाता. समोरच्यांचा विश्वास संपादन करत जाता. त्यांना तुम्ही 'प्रॉमिसिंग' वाटू लागता. 'दहाच्या आधी झोपणं' हे फक्त तीनच शब्द नाहीत. त्यात व्यसनरहित आरोग्यपूर्ण जगणं, आणि शुद्ध विचारवृत्ती जागृत ठेवणं हे असं बरंच काय काय येतं. व्यसनं असतील, तर तुम्ही धंदा नीट करू शकणार नाही. विचारशक्ती ताजी ठेऊ शकणार नाही. पहाटेची वेळ ही नेहमीच नव्या कल्पनांना, उत्साहाला आणि चैतन्याला जन्म देते. त्यावेळी झोपून राहू नका..!
***
'सकाळ' आणि 'मिटकॉन' तर्फे आयोजित 'महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार' व सुवर्णपदक शबाना आझमी यांच्या हस्ते स्वीकारताना मनीषा दुगड.
मनीषा दुगड यांना 'क्रांतीज्योती सावित्रीबाई पुरस्कार', 'तेजस्विनी उद्योगरत्न पुरस्कार', 'चरैवेति आंत्रप्रेन्युअर्स आऊटस्टँडिंग वुमन अॅवार्ड', 'अजित युवा उद्योजक पुरस्कार' इत्यादी इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
***
प्रतिसादांत विचारल्या जाणार्या प्रश्नांचं स्वागत आहे.
***
उत्तम परिचय. धन्यवाद.
उत्तम परिचय. धन्यवाद.
उत्पादनाचा दर्जा, उधारीबद्दलची पॉलिसी, देवावर श्रद्धा, उत्तम व व्यसन रहित वागणूक, शुद्ध विचार वृत्ती या बद्दल १००% सहमत.
शुभेच्छा.
छान! मला नॉन्व्हेज वर्ज्य
छान!
मला नॉन्व्हेज वर्ज्य असल्यामुळे जपान मधे बरेच दिवस लोटस खाकर्या वरच 'जगलो' आहे. अगदी आधी पासुन ह्यांच्या प्रगतीचा मी एक साक्षीदार आहे
छान परिचय. माहितीही खुप
छान परिचय. माहितीही खुप उपयोगाची! धन्यवाद!
(No subject)
सुंदर परिचय! यांचा हा ब्रँड
सुंदर परिचय!
यांचा हा ब्रँड अमेरिकेत नाही का? इथे आम्हाला लक्ष्मी ब्रँडचे जुने, वासाळलेले खाकरे मिळतात.
सुरेख मुलाखत. मनीषा दुगड
सुरेख मुलाखत. मनीषा दुगड ह्यांच्या श्रद्धेचं खरंच कौतुक वाटलं.
अरे वा! छान परिचय! ग्राहक
अरे वा! छान परिचय!
ग्राहक सेवा संदर्भात या क्षेत्रात नव्याने पाऊल टाकणार्या उद्योजकांना काय सांगू शकाल?
छान परिचय! धन्यवाद! यांचा हा
छान परिचय! धन्यवाद!
यांचा हा ब्रँड अमेरिकेत नाही का? इथे आम्हाला लक्ष्मी ब्रँडचे जुने, वासाळलेले खाकरे मिळतात. +१
मस्त परिचय आणि मुलाखत. दुगड
मस्त परिचय आणि मुलाखत. दुगड दांपत्याला शुभेच्छा.
मस्त! दुगड दांपत्याला
मस्त!
दुगड दांपत्याला शुभेच्छा. >> +१
छान परिचय.
छान परिचय.
मुलाखत आवडली!!
मुलाखत आवडली!!
छान ओळख करून दिलीत.
छान ओळख करून दिलीत.
मस्तय. धन्यवाद साजिरा. या
मस्तय. धन्यवाद साजिरा.
या व्यवसायाचे स्वरूप इतके मोठे असू शकते असे वाटले नव्हते. छान वाटले वाचून.
- खाकरे तयार करतात कसे?
- ते किती हेल्दी असतात?
छान वाटले वाचुन.
छान वाटले वाचुन.
छान. दुगड यांना भेटलो आहे.
छान.
दुगड यांना भेटलो आहे. मस्त हसरे आणि बडबडे व्यक्तिमत्त्व.
साजिरा.. मस्त परिचय...
साजिरा.. मस्त परिचय...
छान परीचय. धन्यवाद साजिरा
छान परीचय.
धन्यवाद साजिरा
जमल्यास, खाकर्याच्या पाकिटाचा किंवा ब्रँडचा फोटो टाकावा. हा खाकरा कदाचित खाल्लाही असेल, पण 'लोटस' किंवा 'शबरी' अशी नावे डोळ्यासमोर चटकन येत नाहीयेत.
'लोटस'च्या एका फ्लेवरच्या
'लोटस'च्या एका फ्लेवरच्या पॅकेजिंगचा फोटो.
वर विचारले गेलेले प्रश्न दुगड दांपत्याच्या कानावर घातले आहेत. ते लवकरच इथे उत्तरे देतील.
शुन्यातून विश्व कसे उभारता
शुन्यातून विश्व कसे उभारता येते याचं उत्तम उदाहरण! कल्पक बुद्धीला मेहनतीची जोड असेल, तर काहीही करून दाखवता येऊ शकतं, हे प्रकर्षाने जाणवलं मुलाखत वाचताना. मनीषा आणि कल्पेश दुगड यांना शुभेच्छा.
धन्यवाद साजिरा.
- खाकरे तयार करतात कसे? >>
- खाकरे तयार करतात कसे?
>> अगदी थोडक्यात सांगायच तर आपली नेहमीची पोळीच अगदी पातळ लाटायची व ती कडक अ खुसखुशीत होइ पर्यंत भाजायची. हल्ली (जसे की लोटस मधे आहे) ह्यात वेगवेगळे मसाले टाकुन (पावभाजी, मेथी) निरनिराळे फ्लेव्हर्स उपलब्ध करता येतात. चांगल्या प्रतीचे खाकरे ३-४ महीने सहज टीकतात
- ते किती हेल्दी असतात?
>> माझ्या अंदाजे जेवढी पोळी हेल्दी असते तेवढेच. आमच्या कडे नाश्त्याला बर्याचदा तुप-खाकरा चटनी हा प्रकार असतो
>>रात्री दहाच्या आत झोपा, आणि
>>रात्री दहाच्या आत झोपा, आणि पहाटे पाचला उठा!
>>'दहाच्या आधी झोपणं' हे फक्त तीनच शब्द नाहीत. त्यात व्यसनरहित आरोग्यपूर्ण जगणं, आणि शुद्ध विचारवृत्ती जागृत ठेवणं हे असं बरंच काय काय येतं. व्यसनं असतील, तर तुम्ही धंदा नीट करू शकणार नाही. विचारशक्ती ताजी ठेऊ शकणार नाही. पहाटेची वेळ ही नेहमीच नव्या कल्पनांना, उत्साहाला आणि चैतन्याला जन्म देते. त्यावेळी झोपून राहू नका..!
१०० % खर ...
मनीषा आणि कल्पेश दुगड यांच मनापासुन अभिनंदन. शुन्यातुन विश्व उभ केल तुम्हि.
मनीषा आणि कल्पेश दुगड
मनीषा आणि कल्पेश दुगड यांच्याबद्दल वाचायला खूप आवडलं.
खरोखर माणसाजवळ नेहमी काहीतरी नवीन करून बघण्याची उत्सुकता, कल्पकता,मेहनत करायची तयारी ,आयुष्यात डिसिप्लिन असेल तर त्याला यश मिळणारच हे या दंपतीने सिद्ध करून दाखवलंय.
यांना खूप शुभेच्छा!!
यांचा ब्रँड हाँगकाँग मधे मिळेल का??
उत्तम परिचय. खाकरा हा माझा
उत्तम परिचय. खाकरा हा माझा आणि माझ्या नवर्याचा आवडता प्रकार आहे. हे खाकरे अमेरिकेन कधी येतील???
वर्षू-चीन-हाँगकाँगात एजन्सी घ्यायचा विचार आहे का?
छान परिचय. धन्यवाद साजिरा
छान परिचय. धन्यवाद साजिरा
छान वाटलं वाचून..!चांगला
छान वाटलं वाचून..!चांगला परीचय!
कल्पु..छान आयडिया सुचवलीस ..
कल्पु..छान आयडिया सुचवलीस ..
यू नेव्हर नो!!!!!
>>>'दहाच्या आधी झोपणं' हे
>>>'दहाच्या आधी झोपणं' हे फक्त तीनच शब्द नाहीत. त्यात व्यसनरहित आरोग्यपूर्ण जगणं, आणि शुद्ध विचारवृत्ती जागृत ठेवणं हे असं बरंच काय काय येतं. व्यसनं असतील, तर तुम्ही धंदा नीट करू शकणार नाही. विचारशक्ती ताजी ठेऊ शकणार नाही. पहाटेची वेळ ही नेहमीच नव्या कल्पनांना, उत्साहाला आणि चैतन्याला जन्म देते. त्यावेळी झोपून राहू नका.>>><<
+१
अमेरीकेत मिळणारे खाकरे एकदम बेकार चवीला. वास येतो व चव गेलेली.
तसे खाकरा "इतका" काही हेल्दी प्रकार नाही आहे. त्याला तूप चोपडून भाजतात. इती शेजारच्या गुजु काकू बनवताना पाहून सांगतेय. आता सर्व जण तसेच( गुजु काकूंसारखेच) खाकरे बनवत असतील तर माहीती नाही.
घरी बनवायला सोप्पय पण भाजणं हा कठिण प्रकार आहे तसा.
>रात्री दहाच्या आत झोपा, आणि
>रात्री दहाच्या आत झोपा, आणि पहाटे पाचला उठा!
>>'दहाच्या आधी झोपणं' हे फक्त तीनच शब्द नाहीत. त्यात व्यसनरहित आरोग्यपूर्ण जगणं, आणि शुद्ध विचारवृत्ती जागृत ठेवणं हे असं बरंच काय काय येतं. व्यसनं असतील, तर तुम्ही धंदा नीट करू शकणार नाही. विचारशक्ती ताजी ठेऊ शकणार नाही. पहाटेची वेळ ही नेहमीच नव्या कल्पनांना, उत्साहाला आणि चैतन्याला जन्म देते. त्यावेळी झोपून राहू नका..!
छान वाटलं वाचून..!चांगला परीचय!
छान वाटलं वाचून..! दुगड
छान वाटलं वाचून..! दुगड दांपत्याला शुभेच्छा.
Pages