एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी

Submitted by मितान on 3 March, 2012 - 09:28

१२ एप्रिल २०११

आज एका प्रसिद्ध शाळेत बायोडेटा घेऊन गेले. एका मोठया कंपनीची ही शाळा. इंग्रजी-मराठी अशा दोन्ही माध्यमात मिळून जवळजवळ दोन हजार विद्यार्थी संख्या. शाळेची ओळख परिसरात चांगली. निकाल पण दरवर्षी ठीकठाक लागतो. हे सगळं पाहून वाटलं इथे मला शालेय मानसतज्ञ म्हणून काम करायला मिळावे...

मुख्याध्यापकांची वाट बघत बसले होते. "सरांच्या येण्याची काही निश्चित वेळ नसते..!" असे गुळमुळीत उत्तर मिळाल्याने किती वेळ वाट बघायची आहे हे कळत नव्हते. शेवटी सर आले ! माझ्या आधीपासून एक पालक येऊन बसल्या होत्या त्यांना डावलून मला आधी बोलावण्यात आले.

सरः बोला मॅडम
मी: मी अमुक तमुक
स्कूल सायकॉलॉजिस्ट आहे.
आपल्या शाळेत काम करण्याची इच्छा आहे.

सर : ह्म्म.. ( हातातला बायोडेटा वाचल्यासारखा करत) किती पैशे घेता तुम्ही ?

कामाबद्दल काहीही जाणून न घेता येवढ्या जबाबदार पदावर काम करणारा माणूस पहिला प्रश्न हा विचारत होता.
मग कामाचे स्वरूप सांगून झाले. उपमुख्याध्यापिकाही आल्या. सरांनी ओळख करून दिली.

बाई : म्हणजे तुम्ही औषधं वगैरे देत असाल नं...

मी : नाही. औषधं देणारे सायकिअअ‍ॅट्रिस्ट असतात. मी सायकॉलॉजिस्ट आहे. आम्ही वेगवेगळ्या काउन्सेलिंग थेरपी वापरतो. त्यासाठी आवश्यक असेल तेथे मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेतो.

सर : ओ: काउन्सेलिंग ! माझा आवडता विषय.. तुम्हाला सांगतो मॅडम, मला इथे एवढं काउन्सेलिंग करावं लागतं की कधीकधी डोकंच आउट होतं बघा !!!

मी : ( जरा चाचरत..) नाही सर, आमची समूपदेशन पद्धत वेगळी असते. मुलांच्या वर्तन विषयक समस्या, भावनिक समस्या, गटात मिसळण्यासंबंधी समस्या या आम्ही हाताळतो. त्याचप्रमाणे मुलांच्या क्षमता, बुद्ध्यांक, कल इ. समजून घेऊन त्यांना अभ्यासात आणि खेळात उत्तम यश मिळण्यासाठी आम्ही मदत करतो.

बाई : हां... म्हणजे सर, तो दहावीच्या वर्गातला तारे यांच्याकडे पाठवला पाहिजे. अहो मॅडम, एवढा दांडगटपणा करतो तो...आणि आठवीतली ती जोडी.. फेमस कपल आहे ! नववीच्या वर्गात साठपैकी ४० मुलं टारगट आहेत...

सर : त्या तारेला माझ्याकडे पाठवत जा बाई ! दोन मिनिटात सरळ होईल. आजकाल ना पालकच मुलांना फार डोक्यावर बसवतात...

मी : सर, बरेचदा नं, पालकांना मुलांना कसं वागवावं ते सुचत नाही हो... बरेचदा आपल्या वागण्यामुळे मुलांवर काय परिणाम होतात ते ही लक्षात येत नाही. त्यातून पालक आणि मुलांमध्ये बराच गुंता तयार होतो.. त्यातून बाहेर पडायला आम्ही मदत करतो.

सर : अभ्यासात मदत म्हणजे काय करता ?

मी : बरेचदा मुलांचा बुद्ध्यांक खूप चांगला असतो पण अभ्यास करण्याची पद्धत न समजल्याने ती अभ्यासात मागे असतात. त्यांना अभ्यास करायचा म्हणजे काय ते सांगावं लागतं. प्रत्येक विद्यार्थी वाचन,लेखन,पाठांतर या पद्धतीने अभ्यास नाही करू शकत. त्यांना रुचणारी अभ्यासाची पद्धत आम्ही सुचवतो. स्मरण, लेखन, वाचन हे 'कौशल्य' म्हणून कसे विकसित करायचे याची तंत्र आम्ही शिकवतो. मग मुलांना अभ्यास करणं आवडायला लागतं.

सरांना बहुतेक कंटाळा आला असावा. त्यांच्या दॄष्टीने हा विषय महत्त्वाचा नाही हे स्पष्ट दिसत होते. त्यांनी पुन्हा पैशांचा विषय काढला. मी किमान अपेक्षा सांगितल्यावर 'हे काउन्सेलिंग प्रकरण भलतंच महाग आहे हो...' असा माझ्या तोंडावर शेराही मारला. आणि संचालक समितीच्या बैठकीत विषय मांडतो म्हणून मला निरोप दिला.

शर्टाच्या वरच्या गुंड्या उघड्या, हातात आठ अंगठ्या, गळ्यात जाड साखळी, तोंड रंगलेलं अशा या 'सरांकडे' बघताना राहून राहून मनात काही प्रश्न पडतायत.

चाळीस वर्षे जुनी असणार्‍या शाळेत मुख्याध्यापक असे का ?
मुलांचे मानसशास्त्र हा विषय त्यांना एवढा अनावश्यक का वाटला ?
मी विनामूल्य काम करेन असे सांगितले असते तर त्यांनी मला काम दिले असते का ?

ह्म्म... उद्या दुसर्‍या शाळेत जायचंय.

क्रमशः

गुलमोहर: 

एवढ्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद Happy

माझं क्षेत्र भारतात अजूनही रुळलेलं नाही. म्हणून सध्या तरी ते लोकांच्या गळी उतरवण्यात खूप एनर्जी जाते.

आगाऊ, तुम्ही म्हणताय ते तंतोतंत पटलं. मुलांच्या मानसशास्त्राबाबत इतर क्षेत्रांएवढीच दोन टोकं बघायला मिळतात. गंभीर आजारांकडे कामचलाऊ औषधं घेऊन दुर्लक्ष करणारे लोक आणि शिंक आली तरी एमाराय करायला निघणारे लोक !!!! चालायचंच. यात जो काम करायला तयार आहे त्याने आपला विवेक वापरावा असं अपेक्षित असतं.

स्वरमुग्धा, ग्राममंगलशी संपर्कात आहे Happy सुदैवाने सध्या जिथे काम करते तिथे समानधर्मी लोक पुष्कळ भेटतायत....

गुरुजी, सध्या तेच करतेय. अत्यल्प मोबदल्यात काम करतेय. अगदी पेट्रोलचा खर्च निघेल इतपत मोबदला !!!! लोकांना आता कामाचं महत्त्व कळतंय. नवी वाट चालताना हे होणार हे गृहीत धरल्याने आर्थिक बाबतीत फारसा मनस्ताप होत नाही.

श्री, या लेखांमधून मी कोणतीही खरी नावं, शाळा-संस्था-व्यक्तींची सांगू शकत नाही. क्षमस्व Happy

आज पुढचा लेख..

माझी मुलगी पुण्याच्या बाहेर पौडरोडवरच्या पिरंगुटजवळच्या शाळेत होती. तिथेही फुलटाईम सायकॉलॉजिस्ट बाई होत्या. पुण्याच्या महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीची ही मुलींची सैनिक शाळा आहे. तिथेही संपर्क साधल्यास काही मदत्/माहिती मिळू शकते.

मुस्काट फोडलं की पोर वठणीवर अशा संस्कृतीत वाढलेल्या शिक्षकांना अजून अ‍ॅडजस्टमेंट आली नसेल आणि बदलायची इच्छाही नसेल. >>>>>>>अनुमोदन
अतिविश्लेषण आणि पूर्ण निग्लिजन्स या दोन्हीच्या मधे असलेली, मुलांच्या नैसर्गिक वाढीला/बदलला लक्षात घेऊन पुढे जाणारी सिस्टीम असायला हवी.>>>>>>> +१

मित्तान, अतिशय सुंदर लेख आहे. Happy मानसशास्त्राबाबात जागरूकता ही आजची सर्वात निकडीची गरज आहे.
सुदैवाने काही मोजक्या शाळांमध्ये स्कूल कौन्सिलर्स असतात. आमच्यावेळी आमच्या शाळांमध्ये नव्हते. Sad माझी मैत्रिण सुद्धा एका रेप्युटेड शाळेत स्कूल कौन्सिलर आहे. पण मित्तान म्हणतेय त्या प्रकारचे लोक नक्की भेटतात. आजच्या काळातल्या खाजगी शाळा म्हणजे प्रचंड स्पर्धा, खूप पैसे घेऊन आपण वेगवेगळ्या सुविधा कशा पुरवतो हे दाखवण्यात अग्रेसर. दुर्दैवाने स्कूल कौन्सेलिंग ही गरज आहे हे विसरून या लोकांनी, ती एक सुविधा आहे हे बिंबवलं आहे लोकांच्या मनावर. Sad

अजून लिही, वाचायला आवडेल.

छांगला लेख आहे मितान .. अजुन वाचायला नक्कीच आवडेल Happy

तुला जमेल तेव्हा एक 'चाईल्ड सायकॉलॉजी आणि पेरेंटिंग' वर एखादा लेख लिहिशील का प्लिज? आम्हा सर्वच पालकांना त्याचा खुप उपयोग होइल Happy

मितान, चांगला लेख. अजुन लिही.

शाळांमधून लंबक दुसर्‍या बाजूला जाऊन 'ओव्हरकाँसेलिंग' होताना दिसते. विद्यार्थ्याच्या वागणुकीतील प्रत्येक छोट्या बदलाने हवालदिल होणारे पालक आणि त्याला लगेच काहीतरी फर्मास नाव असलेले डायग्नोसिस देणारे काँसेलर हा ही मुद्दा आहे.
मला बर्‍याचवेळा असं वाटतं की अतिविश्लेषण आणि पूर्ण निग्लिजन्स या दोन्हीच्या मधे असलेली, मुलांच्या नैसर्गिक वाढीला/बदलला लक्षात घेऊन पुढे जाणारी सिस्टीम असायला हवी.>>>>
आगावु अगदी बरोबर.
इथे अमेरिकेत चाईल्ड सायकॉलॉजी concept अतिशय उत्तम प्रकारे राबवला जातो. पण अतिविष्लेषणामुळे येणारे प्रॉब्लेम बर्‍याच वेळा इथे दिसतात. esp. ADD/ADHD लेबल मुलांवर लावण्या बाबतीत.

ओह. अजुन लिही मितान. या लेखनाची पालकांनाही तेवढीच गरज आहे. आम्हालाही कळु दे हा विषय आणि त्यातले खाचखळगे.

शर्टाच्या वरच्या गुंड्या उघड्या, हातात आठ अंगठ्या, गळ्यात जाड साखळी, तोंड रंगलेलं अशा या 'सरांकडे' बघताना राहून राहून मनात काही प्रश्न पडतायत. >>>>असे सर..अवघड आहे

मला बर्‍याचवेळा असं वाटतं की अतिविश्लेषण आणि पूर्ण निग्लिजन्स या दोन्हीच्या मधे असलेली, मुलांच्या नैसर्गिक वाढीला/बदलला लक्षात घेऊन पुढे जाणारी सिस्टीम असायला हवी.>>>>>

१००% सहमत ! लेख आवडला Happy

मितान, कठीण आहे असे 'सर' लाभलेल्या शाळांतल्या विद्यार्थ्यांचं!
लिहीत रहा. + १

Pages