एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी

Submitted by मितान on 3 March, 2012 - 09:28

१२ एप्रिल २०११

आज एका प्रसिद्ध शाळेत बायोडेटा घेऊन गेले. एका मोठया कंपनीची ही शाळा. इंग्रजी-मराठी अशा दोन्ही माध्यमात मिळून जवळजवळ दोन हजार विद्यार्थी संख्या. शाळेची ओळख परिसरात चांगली. निकाल पण दरवर्षी ठीकठाक लागतो. हे सगळं पाहून वाटलं इथे मला शालेय मानसतज्ञ म्हणून काम करायला मिळावे...

मुख्याध्यापकांची वाट बघत बसले होते. "सरांच्या येण्याची काही निश्चित वेळ नसते..!" असे गुळमुळीत उत्तर मिळाल्याने किती वेळ वाट बघायची आहे हे कळत नव्हते. शेवटी सर आले ! माझ्या आधीपासून एक पालक येऊन बसल्या होत्या त्यांना डावलून मला आधी बोलावण्यात आले.

सरः बोला मॅडम
मी: मी अमुक तमुक
स्कूल सायकॉलॉजिस्ट आहे.
आपल्या शाळेत काम करण्याची इच्छा आहे.

सर : ह्म्म.. ( हातातला बायोडेटा वाचल्यासारखा करत) किती पैशे घेता तुम्ही ?

कामाबद्दल काहीही जाणून न घेता येवढ्या जबाबदार पदावर काम करणारा माणूस पहिला प्रश्न हा विचारत होता.
मग कामाचे स्वरूप सांगून झाले. उपमुख्याध्यापिकाही आल्या. सरांनी ओळख करून दिली.

बाई : म्हणजे तुम्ही औषधं वगैरे देत असाल नं...

मी : नाही. औषधं देणारे सायकिअअ‍ॅट्रिस्ट असतात. मी सायकॉलॉजिस्ट आहे. आम्ही वेगवेगळ्या काउन्सेलिंग थेरपी वापरतो. त्यासाठी आवश्यक असेल तेथे मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेतो.

सर : ओ: काउन्सेलिंग ! माझा आवडता विषय.. तुम्हाला सांगतो मॅडम, मला इथे एवढं काउन्सेलिंग करावं लागतं की कधीकधी डोकंच आउट होतं बघा !!!

मी : ( जरा चाचरत..) नाही सर, आमची समूपदेशन पद्धत वेगळी असते. मुलांच्या वर्तन विषयक समस्या, भावनिक समस्या, गटात मिसळण्यासंबंधी समस्या या आम्ही हाताळतो. त्याचप्रमाणे मुलांच्या क्षमता, बुद्ध्यांक, कल इ. समजून घेऊन त्यांना अभ्यासात आणि खेळात उत्तम यश मिळण्यासाठी आम्ही मदत करतो.

बाई : हां... म्हणजे सर, तो दहावीच्या वर्गातला तारे यांच्याकडे पाठवला पाहिजे. अहो मॅडम, एवढा दांडगटपणा करतो तो...आणि आठवीतली ती जोडी.. फेमस कपल आहे ! नववीच्या वर्गात साठपैकी ४० मुलं टारगट आहेत...

सर : त्या तारेला माझ्याकडे पाठवत जा बाई ! दोन मिनिटात सरळ होईल. आजकाल ना पालकच मुलांना फार डोक्यावर बसवतात...

मी : सर, बरेचदा नं, पालकांना मुलांना कसं वागवावं ते सुचत नाही हो... बरेचदा आपल्या वागण्यामुळे मुलांवर काय परिणाम होतात ते ही लक्षात येत नाही. त्यातून पालक आणि मुलांमध्ये बराच गुंता तयार होतो.. त्यातून बाहेर पडायला आम्ही मदत करतो.

सर : अभ्यासात मदत म्हणजे काय करता ?

मी : बरेचदा मुलांचा बुद्ध्यांक खूप चांगला असतो पण अभ्यास करण्याची पद्धत न समजल्याने ती अभ्यासात मागे असतात. त्यांना अभ्यास करायचा म्हणजे काय ते सांगावं लागतं. प्रत्येक विद्यार्थी वाचन,लेखन,पाठांतर या पद्धतीने अभ्यास नाही करू शकत. त्यांना रुचणारी अभ्यासाची पद्धत आम्ही सुचवतो. स्मरण, लेखन, वाचन हे 'कौशल्य' म्हणून कसे विकसित करायचे याची तंत्र आम्ही शिकवतो. मग मुलांना अभ्यास करणं आवडायला लागतं.

सरांना बहुतेक कंटाळा आला असावा. त्यांच्या दॄष्टीने हा विषय महत्त्वाचा नाही हे स्पष्ट दिसत होते. त्यांनी पुन्हा पैशांचा विषय काढला. मी किमान अपेक्षा सांगितल्यावर 'हे काउन्सेलिंग प्रकरण भलतंच महाग आहे हो...' असा माझ्या तोंडावर शेराही मारला. आणि संचालक समितीच्या बैठकीत विषय मांडतो म्हणून मला निरोप दिला.

शर्टाच्या वरच्या गुंड्या उघड्या, हातात आठ अंगठ्या, गळ्यात जाड साखळी, तोंड रंगलेलं अशा या 'सरांकडे' बघताना राहून राहून मनात काही प्रश्न पडतायत.

चाळीस वर्षे जुनी असणार्‍या शाळेत मुख्याध्यापक असे का ?
मुलांचे मानसशास्त्र हा विषय त्यांना एवढा अनावश्यक का वाटला ?
मी विनामूल्य काम करेन असे सांगितले असते तर त्यांनी मला काम दिले असते का ?

ह्म्म... उद्या दुसर्‍या शाळेत जायचंय.

क्रमशः

गुलमोहर: 

मामी, असेच अनुभव जास्त आलेत गं Sad
आपल्या देशात मुलांना जाणीवपूर्वक वाढवणं, त्यांच्या मानसिक गरजा जाणून घेणं हे अजूनही 'फॅशनेबल' मानलं जातं. आणि हे कोण्या एका सामाजिक आर्थिक स्तरात नाही. तर सर्वच स्तरात... असो. पुढे लिहीनच..

हो लिही. माझेही डोळे उघडतील. Happy

'चाईल्ड सायकॉलॉजी' अजून शाळांपर्यंत झिरपली नसेल. मुस्काट फोडलं की पोर वठणीवर अशा संस्कृतीत वाढलेल्या शिक्षकांना अजून अ‍ॅडजस्टमेंट आली नसेल आणि बदलायची इच्छाही नसेल. Sad

मितान कठीणच आहे ग. मुख्याध्यापकांचं इम्प्रेशन असं असेल तर शाळेतल्या इतर शिक्षकांचं काय?

खरंच लिही. माझी बहीणही व्यवसायाने याच शिक्षण क्षेत्रातील आहे, तिलाही असे मुलांचे बरेच प्रॉब्लेम्स सोडवावे लागतात तसंच काऊन्सेलिंगही भरपूर करावं लागतं.

मला मुद्दा समजला नाहि.

मी विनामूल्य काम करेन असे सांगितले असते तर त्यांनी मला काम दिले असते का ? >>>
माझा स्वतःचा अनुभव आहे की दिले असते. (मी वेगळ्या विषयावर - road safety बद्दल) बद्दल शाळांना approach झालो तेव्हा मला तरी परवनागी दिली होती. अर्थातच विनामोबदला.

शिवाय शाळेचे नाव लिहिले तर बरे पडेल. कारण शर्टाच्या वरच्या गुंड्या उघड्या, हातात आठ अंगठ्या, गळ्यात जाड साखळी, तोंड रंगलेलं असा मुख्याध्यापक मी अजुन तरी पाहिला नाहि कोणत्याच शाळेत. एकदा जाउन भेट घ्यायला आवडेल.

मितान Sad
जर तू या शैक्षणिक संस्थांच्या वरच्या पदाधिकार्‍यांना अ‍ॅप्रोच करू शकलीस तर? बरेच वेळा त्या त्या भागातील सुशिक्षित, प्रतिष्ठित व्यावसायिक वगैरे पण शिक्षण संस्थांच्या गवर्निंग काउन्सिल्सवर असतात. आणि त्यांना जर या अशा गोष्टी पटल्या तर खाली शाळा-मुख्याध्यापक या पातळीवर त्या अंमलात आणायला तुलनेने सोप्या जाव्यात. निदान असं मला वाटतं.

हा भाग वाचताना वाईट वाटलं.
तुझे अनुभव वाचायला खूप आवडेल. पुढचे भाग पण येऊदे लवकर.

धन्यवाद मितान! चांगल्या विषयावर वाचायला मिळेल तुझ्या डायरीतुन!
पुढचे भाग येऊ देत लवकर! Happy

छान लिहेले आहे पण असे मुख्याध्यापक असतात का? मला तर रेप्युटेड शाळांचे वरचे अधिकारी जास्त डिग्निफाइड व रिस्पेक्टेड भेटले आहेत. त्यांना उच्च शिक्षण पण असते कंपलसरी ना?
येथील मुलीच्या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वतःच सायकॉलॉजी च्या उच्च शिक्षित असून काउन्सेलिन्ग करतात. मी शाळाप्रवेशासाठी गेले असताना मुंबईतील शाळेचा चांगला अनुभव आला.
शिक्षिकांनी पालकांचाच एक क्लास घेतला व तुम्ही मुलांच्या अभ्यासात, वाढीत सकारात्मक सहभाग घेतलाच पाहिजे तुम्ही लक्ष दिले पाहिजे कारण वागायचे कसे ते मुले तुम्हाला बघूनच शिकतात.
सद्गुणांचे महत्त्व इत्यादी सांगितले. मला त्या बाई खूप रिस्पेक्टेड व सेंटर्ड वाटल्या.

तुमच्या कामाची खूप गरज आहे. एक लेख मालिका नक्की लिहा.

असे मुख्याध्यापक असतात का ?
हो. असतात. विशेषतः संपूर्ण सरकारी अनुदानावर चालणारी शाळा असेल तर बोलायलाच नको...
अर्थात चांगले अनुभवही खूप आहेत माझ्या गाठोड्यात.. सांगेनच Happy

चाणक्य, तुमचा विषय फक्त मुलांशी संबंधित होता. तुम्हाला वर्कशॉप किंवा भाषणासाठी वेळ देणं त्यांना काहीच अवघड नव्हतं. कारण ते झाल्यावर स्टाफला काही काम करायचं नव्हतं. काउन्सेलिंगसाठी मुलं येतात तेव्हा असे जाणवते की बरेचदा शिक्षक आणि पालक यांची काहीतरी चूक होत असते. मग आम्ही सुचवलेले उपाय त्यांना करावे लागतात. जास्तीचे काम ! जास्त डोकं खर्च करणं कोणालाच आवडत नाही....

दिनेशदा, काही प्रातिनिधिक केस स्टडीज् पण लिहिणार आहेच

वरदा, मला संस्थाचालकांना भेटण्याची गरज पडली नाही. अन्यथा ते होतंच डोक्यात.

अमा, तुम्ही अशा शाळेशी संबंधित आहात ही खूपच आनंदाची गोष्ट आहे Happy मी तुम्ही सांगितल्यासारख्या शाळाही अनुभवल्यात. डायरीच्या पुढच्या पानात येईलच ते Happy

मितान, लेख आवडला!
सर्वप्रथम शिक्षकांचे काँन्सेलिंग व्हायला हवे यात शंकाच नाही.
पण हा फक्त एक प्रकार आहे. महागड्या शाळांमधून लंबक दुसर्‍या बाजूला जाऊन 'ओव्हरकाँसेलिंग' होताना दिसते. विद्यार्थ्याच्या वागणुकीतील प्रत्येक छोट्या बदलाने हवालदिल होणारे पालक आणि त्याला लगेच काहीतरी फर्मास नाव असलेले डायग्नोसिस देणारे काँसेलर हा ही मुद्दा आहे.
मला बर्‍याचवेळा असं वाटतं की अतिविश्लेषण आणि पूर्ण निग्लिजन्स या दोन्हीच्या मधे असलेली, मुलांच्या नैसर्गिक वाढीला/बदलला लक्षात घेऊन पुढे जाणारी सिस्टीम असायला हवी.
अजून लिही, वाट बघतोय!

आगाऊ,

तशी सुवर्णमध्य साधणारी निवासी गुरुकुलपद्धती पूर्वी भारतात होती. तिथे विद्यार्थ्यावर आपसूक लक्ष ठेवलं जाई. मुख्य म्हणजे मुलांकडून साधना (योग, प्राणायाम, ध्यानधारणा, इत्यादि) करवून घेतल्याने टोकाचे वर्तन होत नसे.

गुरुकुलात फी नसे. मात्र मुलास काम करावे लागे. त्यामुळे फुकट न खाण्याचे संस्कार आपोआप होत. मी नोकरीस लागेपर्यंत (वय वर्षे २१) आईबापांचे फुकट खात होतो. अर्थात दानशूर व्यक्ती गुरुकुलास सढळ हस्ते मदत करीत, शिवाय गुरुकुलाची उत्पन्नाची इतर साधनेही असंत (शेत, पशुपालन, रान).

आ.न.,
-गा.पै.

आगाऊला अनुमोदक!! मितान, वेगवेगळ्या अनुभवांवर आधारित तुझी ही लेखमालिका खूप इंटरेस्टिंग आणि उद्बोधक ठरणार हे नक्की!! Happy

मितान अनुभव लिहीलात याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद देखिल. अगं अशीच परीस्थिती आहे. माझ्या शाळेतले सद्ध्याचे शिक्षक बघून मला खूप वाईट वाटतं. काही सुचवलं तर चालेल का? पुण्यात ग्राममंगल म्हणून एक संस्था आहे. त्यांची खाजगी स्वरूपाची प्रयोगशील शाळा आहे. अतिशय वेगळ्या रीतिनं ही मंडळी शिक्षण हाताळते. त्यांच्याशी संवाद / संपर्क साधलात तर नवीन वाटा पण कळतील आणि समानशील व्यक्ती ही मिळतील.

मितान, कठीण आहे असे 'सर' लाभलेल्या शाळांतल्या विद्यार्थ्यांचं!
लिहीत रहा.

>>अतिविश्लेषण आणि पूर्ण निग्लिजन्स या दोन्हीच्या मधे असलेली, मुलांच्या नैसर्गिक वाढीला/बदलला लक्षात घेऊन पुढे जाणारी सिस्टीम असायला हवी.
आगाऊ, किती बरोबर लिहिलंय!

आणखी येऊ देत मितान. ते मुख्याध्यापक आणि त्या उपमुख्याध्यापकच तुझे पहिले विद्यार्थी होऊ शकले असते.
आगाऊला अनुमोदन.

बहुतेक प्रस्थापीत लोकान्चा अटीट्युड असाच असतो. तुला शक्य झाल्यास आठ्वड्यात १ तास विनामोबदला काम करुन सुरुवात कर. तुझ्या कामाचे स्वरुप व महत्व लक्षात आल्यावर हेच मुख्याधापक वेगळा विचार करतिल (?).

Pages