एक होते कुसुमाग्रज (६): 'स्मृती' (शैलजा)

Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 12:12

kg2.jpg

'स्मृती' ही 'विशाखा' या काव्यसंग्रहातील एक गाजलेली कविता आहे.
.......
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परी स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हां
त्या माजघरातील मंद दिव्याची वात.........

कित्येक वरुसं झाली आता. आयुष्याचा दुस्तर घाट चालताना किती वाटा, वळणं आणि थांबे गाठले आणि कधीतरी मागेही टाकले. नियतीच्या नियमानुसार, नकळत, विनासायास पाहता पाहता कर्पूरगंध उडून जावा, तसंच काहीसं आयुष्याचंही होत असावं का? तरीही कधी समजून उमजून तर कधी परिस्थितीला शरण जाऊनही आयुष्य वाहतं राहिलं, पुढे पुढे जात राहिलं आणि बघता बघता कुठल्या कुठे पल्ला गाठला. पाहता पाहता सभोवताली ही लखलखती दुनिया उभी राहिली, सजली, धजली...

आणि कशी? ही लखलखती दुनिया, प्रकाशमयी जादूई नगरीच जणू (!) पहा तर खरं. जिथवर नजर जाईल तिथवर केवळ झगमगाटाचं साम्राज्य, लखलखाटाची न्यारी जादू आणि तेजाचा अपूर्व आभास. अंधाराला रिघायला वाव तरी कुठे राहिला? जिथे तिथे फक्त झगमगाट, लखलखाट आणि कदाचित त्याबरोबरच कधीतरी दबत्या पावलांनी शिरकाव करणारा कोरडा रखरखाटसुद्धा? कुठे आहे ह्या कोरड्या झगमगाटाला, स्वतःच्याच जगात मशगुल असणार्‍या ह्या लखलखाटाला एखाद्या एकाकी, भंगलेल्या मनात दडलेल्या अंधारगर्भापर्यंत पोचण्याची जाण? आहे का वेळ? इतक्या मोठ्या पसार्‍यात, झगमाटात राहूनही मन अंधारवाटांमध्ये भरकटत राहतं आहे...

अचानक आसूसून आठवत राहते मनावर साचलेली काजळी हळुवार उजळणारी, आपल्या स्निग्धाळ दीप्तीने, मनाच्या कानाकोपर्‍यातली मरगळ, अनाम भीती, अस्वस्थता आणि काहूर झटकून टाकणारी आणि सभोवतालचा अंधारही हलकेच उजळून टाकणारी मंद प्रकाशाची ज्योत. अंतर्बाह्य तेजाने उजळलेली. आजही तिचीच उणीव भासते आहे हे व्याकूळ, कातर मन शांतवण्यासाठी..

तसं पाहिलं तर काही कमी आहे इथे? ह्या आताच्या आयुष्यात? ह्याचसाठी तर केला होता ना अट्टाहास? ह्या लोभावणार्‍या मोहांपायीच तर उर फुटेपर्यंत शर्यतीत धावण्याचा निर्णय घेतला होता ना? एक जिगर होती, नशाही होती. जबरदस्त जिद्द होती. सारं काही पायापाशी आणायचं होतं. जग झुकलेलं पहायचं होतं. हातात येत असणार्‍या यशाची धुंदीही चढत चालली होती आणि त्याची बेहोषी धुंदावत होती! ते धुंदावून टाकणारे क्षण! उमललेल्या आणि आपल्या मत्त सुगंधाचा दरवळ आसमंतात उधळणार्‍या ह्या रातराणीसारखे.. पण ही क्षणैक धुंदी आता वेड नाही लावत. ह्यापासून दूर निघून जावसं वाटतं. कधीकाळी अनुभवलेला घरच्या अंगणातल्या निशिगंधाचा सौम्य, मंद आणि मनाला सुखावणारा सुगंध आठवतो, तितकच साधं सरळ आणि कदाचित म्हणूनच सोपं होतं, ते आयुष्य आठवतं, जीव इतका इतका होऊन कासावीस होतो.. ते अंगणही कधीच पारखं झालं आता.. व्याकूळ करणार्‍या ह्या मनातल्या कुपीत जपलेल्या आठवणी..

इथलं वातावरणही नशा आणणारं. ह्याचीच ना भूल पडली जिवाला? ह्या, ह्या समुद्राकडूनच मत्तपणा शिकायला मिळाला ना? किती आकर्षण वाटलं तेव्हा! तसंच बनायच होतं ना? सामर्थ्यवान! मत्त! सत्ता तिथे पैसा! या इथेच, सागराच्या साक्षीने जम बसवायचा होता, आजूबाजूच्या श्रीमंत समृद्ध जगामध्ये आपलाही एक ठसा उमटवायचा होता, एक ओळख बनवायची होती. सगळ्यांना भूल पडायला हवी, सामर्थ्याचा दरारा वाटायला हवा, अगदी ह्या समुद्राचा वाटतो तसाच, पण त्या आत्ममग्नेतचं आकर्षण वाटत नाही आता. कशासाठी? कोणासाठी? कधीकाळी जिच्या सोबतीने स्वप्नं पाहिली, जिच्या तीरावर बसून गुजगोष्टी केल्या, ती संथ वाहणारी नदी आठवते. सारी गुपितं कशी मन लावून ऐकली तिनं. शांतपणे. मनापासून. भंगलेल्या घाटावरच्या ओला वारा नेहमीच जिवाला शांतवायचा. इतकी सुरेख सोबत, कशी, कधी सुटली? गतायुष्याला केवळ स्मरणें अन् व्याकुळता भरुन उरली..

मन रिझवायची काही कमी साधनं नाहीत इथे! काही काही, कशाचीच कमतरता नाही. करमणूकीतलं वैविध्य, मदिरा, मदिराक्षी, तुमच्या यशात सहभागी होऊन जल्लोष करणारी तशीच यशस्वी मंडळी.. आयुष्यातली अजून नवीन यशाची शिखरं पादाक्रांत करायला हवीत, अजून खूप यशस्वी व्हायला हवं असं वाटायला लावणारा माहौल.. पुन्हा एकदा झगमगाट, लखलखाट, कोलाहल, एका लखलखत्या आयुष्याची वेड लावणारी झिंग..

पण आताशा कधीतरी ह्या सार्‍या पसार्‍यातून मन उठून निघून जाऊ पाहतं.. त्याला थोड्या काळासाठी का होईना, सगळ्या कोलाहलापासून दूर कुठेतरी एकटं जाऊन कधीकाळी ऐकलेला आर्त अभंग आठवायचा आहे, आत रुतून राहिलेल्या त्या सच्च्या सूराच्या आठवणीत पुन्हा एकदा हरवून जायचं आहे, कधीकाळी पाहिलेल्या कोण्या नजरेतली अबोल भावना पुन्हा एकदा अनुभवायची आहे.. स्मरणात का होईना..

पुन्हा एकदा पूर्वीसारखा मोकळा श्वास घेता येईल का? ह्या जीवघेण्या, व्याकूळ बनवणार्‍या आठवणी..

- शैलजा
kg2.jpgप्रकाशचित्रे प्रताधिकार आणि मनःपूर्वक आभार- कुसुमाग्रज प्रतिष्ठान

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामर्थ्याचा दरारा वाटायला हवा, अगदी ह्या समुद्राचा वाटतो तसाच, पण त्या आत्ममग्नेतचं आकर्षण वाटत नाही आता. कशासाठी? कोणासाठी? कधीकाळी जिच्या सोबतीने स्वप्नं पाहिली, जिच्या तीरावर बसून गुजगोष्टी केल्या, ती संथ वाहणारी नदी आठवते. सारी गुपितं कशी मन लावून ऐकली तिनं. शांतपणे. मनापासून. भंगलेल्या घाटावरच्या ओला वारा नेहमीच जिवाला शांतवायचा. इतकी सुरेख सोबत, कशी, कधी सुटली? गतायुष्याला केवळ स्मरणें अन् व्याकुळता भरुन उरली..

एखादं सुंदर स्वगत असावं असं वाटलं. आवड्या

छानच मांडलंय अंतरंग. अभिनंदन.
स्वतः कुसुमाग्रज त्र्यंबकेश्वरच्या डोंगरापायथ्याशीं शांत वातावरणातल्या एका अतिथिगृहात चिंतन, मनन व लिखाणासाठी नियमितपणे जाऊन रहायचे, असं त्यांच्या नाशकातल्या एक निकटवर्तियाने मला सांगितलं होतं; वरचं वाचून त्याचीच आठवण झाली !

पाउलवाटा मागे टाकून डामरी/सिमेटी महामार्गावर पोचलेल्या प्रत्येकाचेच मनोगत लिहिले आहे!

<< पाउलवाटा मागे टाकून डामरी/सिमेटी महामार्गावर पोचलेल्या प्रत्येकाचेच मनोगत लिहिले आहे! >> १००% सहमत. संवेदनशील प्रत्येकाचेच !!!

मस्तच. माझी फार्फार आवडती कविता , शैलजा Happy

एकदम मर्ढेकरांची थोडीफार अशाच अंगाने जाणारी कविता आठवली (कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो...) . आणि तिचा पाय खेचून जमिनीवर आणणारा शेवट -
बरा म्हणून हा इथे
दिवा पारवा पार्‍याचा
बरी तोतर्‍या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा

इतके वर्षं या दोन्ही कवितांना जोडणारा समान धागा - गतायुष्याचं स्मरणरंजन आणि गाव ते शहर या स्थलांतरातून येणारं एक अपरिहार्य उपरेपण (डिस्प्लेसमेन्ट आणि एलिअनेशन) - कधीच लक्षात आला नव्हता. तो हा लेख वाचताना अचानक ठळकपणे जाणवला. धन्यवाद शैलजा...

सुरेख लिहीलं आहेस शैलजा. परदेशात थोड्याफार फरकाने हा अनुभव येत असतो त्यामुळे मनात खास स्थान असलेली ही कविता.

मनावर साचलेली काजळी हळुवार उजळणारी, आपल्या स्निग्धाळ दीप्तीने, मनाच्या कानाकोपर्‍यातली मरगळ, अनाम भीती, अस्वस्थता आणि काहूर झटकून टाकणारी आणि सभोवतालचा अंधारही हलकेच उजळून टाकणारी मंद प्रकाशाची ज्योत. >>> सुरेख!

मस्त Happy

'संसाराचे मर्म' विचारतो भा.रा. तांब्यांचा 'तो' त्याच्या सखीला. त्याचे उत्तर दिलय त्या सखीने ह्या कवितेत असेच वाटते मला. तू मात्र कवितेचे मर्म अगदी अलगद उकलून दाखवले आहेस.

खूप आधी वाचली होती तेंव्हा नव्हती आवडली ही कविता. तारकादळे अशा सुंदर शब्दानंतर कुसुमाग्रजांनी व्याकुळता का मिसळलीये चित्रात असे वाटले होते तेंव्हा. तेंव्हा काही गोष्टी कळायला योग्य वेळ यावी लागते हेच खरे. Happy

Pages