एक होते कुसुमाग्रज (२): अलौकिक भाषासौंदर्य (बेफ़िकीर)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 12:08

kusumagraj.jpg

माणसापेक्षा संस्था मोठी. तसेच साहित्य हे साहित्यकारापेक्षा नेहमी मोठे. साहित्याला माणूस काही देऊ शकत नाही. माणूस साहित्यिक म्हणून जे काही देतो ते मुळात त्याला साहित्याने दिलेले असते व ते तो शब्दबद्ध करून समाजाला देतो. एखाद्या माणसाने साहित्यिक म्हणून साहित्याला काही देऊ केले असे होऊ शकत नाही. याची कारणे अनेक असतात. त्या माणसाचे जन्म स्थळ, भोवती असलेली राजकीय, सामाजिक, कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती, त्या माणसावर जडणघडणीच्या काळात झालेले संस्कार, त्या माणसाच्या अनुभूती व त्याच्या मनाचा कल, जो साहित्यिकाच्या बाबतीत साहित्याकडे असू शकतो अशा अनेक घटकांमुळे माणूस बनत असतो व बनत राहतो. मरण येईपर्यंत ही जडणघडण सुरूच राहते व नंतरही सुरू राहते किंवा नाही हे जाणण्यासाठी मरून बघायला लागेल. मात्र ही जडणघडण सुरू असणे व त्याच कालावधीत साहित्याच्या माध्यमातून माणसाने व्यक्त होत राहणे यात एकदा साहित्य पुढे तर एकदा मनाची बांधणी पुढे अशी स्पर्धा असते व क्लिष्टता अशी की साहित्यनिर्मिती हीसुद्धा एक मनाच्या बांधणीचीच वीट होऊन राहू लागते. याचा परिपाक होतो माणूस अंतर्बाह्य साहित्याचे व अनुभूतींचे सातत्याने होणारे मिश्रण बनण्यात व तात्यासाहेबांचे आजही रसिकमनात असलेले अधिराज्य हेच सुचवते की कुसुमाग्रज हे असेच एक मिश्रण होते. त्यांच्या साहित्याचा आवाका एका माणसाला झेपणारा नाही आणि दर्जा महाकवींच्या समूहाला काही वर्षे एकत्र बसून एकत्रितपणे केलेल्या साहित्यकृतीला कदाचित प्राप्त करता येईल.

पण प्रखर सत्य मान्य करायला हवे की कुसुमाग्रजांनी किंवा कोणीच कधीच साहित्याला अथवा कलेला काहीही दिलेले नसते. त्यांनाच त्या त्या कलेकडून साहित्यनिर्मितीद्वारे मिळणारी मनःशांती, नावलौकीक व व्यक्त होण्याची सर्वोकृष्ट शैली मिळालेली असते.

तरीही, समुद्रातून थेंब नष्ट करत गेलो तर एक दिवस समुद्रच नष्ट होईल. कुसुमाग्रज ही एक अमर लाट होती समुद्रातील. याचमुळे इतर कवी आणि कुसुमाग्रज यांची तुलना करताना कुसुमाग्रजांनी साहित्याला काय दिले या प्रश्नाला काल्पनिक म्हणताच येणार नाही.

१. भाषा - कलारसिक, येथील चर्चेपुरते काव्यरसिक मनाला भिडणारे कोणतेही साहित्य जर कविताशैलीत ऐकले, वाचले गेले तर उत्तम कविता ऐकल्याचा आनंद मिळाल्याचे गृहीत धरतात. मात्र कुसुमाग्रजांचे काव्य हे उच्च दर्जाच्या काव्यभाषेत लिहिलेले होते. ज्या भाषेत बीभत्सतेला, अश्लीलतेला अथवा अर्वाच्यतेला वावच नव्हता अशी भाषा सातत्याने व्यक्तीकरणासाठी योजणे हे असामान्यत्वाचे लक्षण आहे.

२. वैविध्य - कुसुमाग्रजांनी केलेली साहित्यनिर्मिती एका माणसात जणू संस्थाच वसली असावी इतपत आवाक्याची व वैविध्यतेची आहे. साहित्यकारांमध्ये असलेले प्रभुत्व इतक्या विविध प्रकारे व्यक्त होणे ही मराठीतील बहुधा एकमेवच घटना मानावी लागेल.

३. संवेदनशीलता - नवीन चमचे आणल्यावर टेबलावरील जुन्या चमच्यांना किती वाईट वाटले असेल यावर कल्पना सुचणे आणि ती शब्दबद्ध करणे यातून संवेदनशीलतेचे परिमाण जाणवू शकते. मी विंदा, मर्ढेकर, बालकवी व अरुणा ढेरे तसेच इतर अनेक मराठी कवींचे काव्य वाचले. तुलना करणे हे शक्य तर नाहीच पण गैरही ठरावे. मात्र कुसुमाग्रजांच्या काव्यातील मुद्दे हे सामान्यत्वाशी निगडीत, शब्दरचना ही लयबद्धतेशी व सौंदर्याशी निगडीत आणि संवेदनशीलता ही उर्दू गझलेशी निगडीत असल्यासारखी उच्च आहे.

=======================
"आणि ही रे?' पुसतसे सावकार
उडे हास्याचा चहुकडे विखार
========================
थांबल्या त्या हालचाली, थांबले काळीज हो
आणि माश्यांचा थवा मुद्रेवरूनी बागडे
========================
खड्ग लावूनी उराला बायकांना वेढती
आणि दारी ओढती
भोवती बाजार-हाटी मांस आणि कातडे
जा जरा पूर्वेकडे
=========================
श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
===========================

संवेदनशीलता म्हणजे केवळ स्वानुभूतींना प्रखरपणे मांडून थोर कवी ठरणे नव्हे तर परचित्तरवेशाचा भासही होणार नाही इतके प्रभावी काव्य तेही साध्या साध्या व काही वेळा काल्पनिकही अनुभूतींवर आधारलेले.

४. आकृतीबंधः
कुसुमाग्रजांच्या विशाखामध्ये कवितेच्या आकृतीबंधाबाबत ठाम भूमिका दिसते. कवितेला लय व वृत्त असावे याबाबतची आग्रही भूमिका दिसते. अनेक वर्षांपूर्वी या कवीने आजच्या कवींना आणि त्यांच्या मुक्तछंदाला दिलेला हा शाब्दिक तडाखा आकर्षक व प्रभावी आहे. मात्र याचा कवीमनावर असलेला परिणाम दुर्दैवाने घटत असताना दिसतो.

५. विषयवैविध्य - कवितेला अर्थातच विषयांचे वावडे कधी नसतेच पण कुसुमाग्रजांच्या कवितेत युद्ध, प्रेम, प्राणी, पक्षी, आकाश, तारे, नैसर्गिक संकटे, निसर्ग या सर्वांनाच समान व विस्मयकारक वाव मिळतो. ही व्याप्ती नक्कीच मराठीतील एखाद्या कवीला एकट्याला सोसेल अशी वाटत नाही. लाखो आंधळ्यांना हत्ती वाटावा तसे लाखो मराठी रसिकांना कुसुमाग्रज स्वतःपुरते व आपले आपले असे समजतात. कवीला सर्वच विषयात मुक्त शब्दफेरा मारता येतो हे गृहीत धरले तरी प्रत्येक विषयात ताकदीने चित्ताकर्षक रेखाटणी असामान्य कवीलाच जमते. 'मातीची दर्पोक्ती' ही कविता या मुद्याच्या पुष्ट्यर्थ असलेले सर्वात सुंदर उदाहरण म्हणता येईल.

वरवर पाहता ही कवीच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत असे म्हणता येईल. मात्र त्याचबरोबर कुसुमाग्रजांनी हे मराठी कवितेला दिलेले दानही आहे. एका कवीच्या काव्यात एक गुण दिसेल तर दुसर्‍याच्या दुसरा, कुसुमाग्रज जणू सर्वांचा अर्क.

कुसुमाग्रजांनी इतके लिहिले की शेवटी ते निसर्गाचे मानवाशी संपर्क साधण्याचे माध्यमच झाले. या पातळीला साहित्यकार पोचणे हे साहित्यकाराच्या प्रवासातील खूप पुढचे व अनेकांना कधीच न गाठता आलेले स्थानक.

वरील सर्व मुद्दे गौण ठरावेत अशी एक गोष्ट कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याला दिली.

ती म्हणजे अलौकिक भाषासौंदर्य. मराठी भाषेचे इतके सुंदर रूप क्वचित पाहायला मिळते. अशा पातळीला भाषा सांभाळून निसर्गातील कोणतीही सूक्ष्मातिसूक्ष्म वा भव्यातिभव्य घटना सादर करणे हे शक्य असल्याचे त्यांनीच दाखवून दिले.

कुसुमाग्रज हे त्यामुळेच मराठीभाषेच्या साहित्यप्रवासातील एक अद्वितीय हिल स्टेशन म्हणावे लागेल, जेथे पोचल्यावर अथवा जेथून पुढे जाताना आपले मन सुंदर झालेले असते.

हे एका माणसाने एका भाषेला दिलेले दान!

-'बेफिकीर'

final3_mbd.jpgप्रकाशचित्रे प्रताधिकार आणि मनःपूर्वक आभार- कुसुमाग्रज प्रतिष्ठान

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

संवेदनशीलता म्हणजे केवळ स्वानुभूतींना प्रखरपणे मांडून थोर कवी ठरणे नव्हे तर परचित्तरवेशाचा भासही होणार नाही इतके प्रभावी काव्य तेही साध्या साध्या व काही वेळा काल्पनिकही अनुभूतींवर आधारलेले.>>>>
वा. छानच लिहिलेय. सगळाच लेख आवडला.

छान Happy

Pages