इमान धरम

Submitted by श्रद्धा on 22 February, 2012 - 01:25

हा चित्रपट अमिताबच्चन आणि शशीकपूर यांच्या बालपणापासून सुरू होत नाही. पहिल्याच सीनमध्ये ते थेट मोठेच्यामोठे आणि कामाला लागलेले दिसतात. खरंतर चित्रपटातली सगळी परिस्थिती 'निरुपा इन व्हाईट सारी'ला इतकी अनुकूल आहे की, तिची उणीव फार जाणवली. तर ते असो.

तर पहिलंच दृश्य कोर्टाच्या आवारातलं. मुस्लिम अमिताभ आणि हिंदू शशी हे दोघं तिथे खोट्या साक्षी देण्याचा उद्योग चालवत असतात. उद्योगातले एम्प्लॉयी हे दोघंच. दोघंही खाऊनपिऊन सुखी दिसतात तेव्हा उत्पन्न चांगलं असावं पण एवढ्या खटल्यांमध्ये हेच दोघं वारंवार साक्ष देताना दिसतायत, हे जज्ज वा विरुद्ध पार्टीचा वकील वा इतर कुणालाच खटकत नाही. तसंच, नमुना म्हणून दोघांची एक-एक साक्ष दाखवली गेली आहे, त्यात शशी साक्षीसाठी जाताना उगीचच एका माणसाच्या कुबड्या घेऊन जातो. त्या कुबड्यांमुळे बहुधा आपण ओळखू येणार नाही, अशी त्याची समजूत असावी. (बेमालूम वेषांतर..!) मग तो गीतेवर हात ठेवून खोटी शपथ घेऊन खोटी साक्ष देतो. तिकडे अमिताभपण कुराणावर हात ठेवून खोटी शपथ घेऊन खोटी साक्ष देतो. यांच्या खोट्या साक्षींमध्ये इतकी ताकद असते की, खटल्याचं पारडं तात्काळ यांच्या बाजूने फिरतं.

संध्याकाळी मग ते कामं आटपली की सहसा वस्तीत राहणार्‍या हंगलमास्तरांकडे वाईच टेकायला म्हणून येत असतात. हंगलमास्तरांना पुस्तक वाचायची आणि वाचनात मध्ये व्यत्यय आला की, हाताला लागेल ती चपटी वस्तू पुस्तकात खूण म्हणून घालायची सवय असते. मास्तरांची मुलगी श्यामली ही आंधळी असते. तिच्यासाठी ते दोघं साक्षीच्या खोट्या कमाईतून टेपरेकॉर्डर घेऊन येतात. आता आणलाच आहे तर वापरला जावा, ह्या हेतूपायी तिचं गाण्याच्या कार्यक्रमात सिलेक्शन होत नाही आणि हे दोघं तिला वस्तुस्थिती न सांगता, रिकाम्या ऑडिटोरियमात तिच्या गाण्यांचा कार्यक्रम करतात. तिथे टाळ्यांचा कडकडाट ऐकवायला तो टेप वापरतात. एवढ्या हौसेने आणलेल्या टेपचा सकृत्याला वापर झाला म्हणून आपल्यालाही बरं वाटतं.

श्यामलीला एक बॉयफ्रेंड असतो. संजीवकुमार. त्याचे वडील मोठे उद्योगपती+धनाढ्य+तस्कर+पैशाला चटावलेला माणूस+मुलाची काळजी वाटणारा बाप असतात. त्यांच्या गटात रणजीत असे नाव असलेला प्रेम चोप्रा(निरुपाबाईंप्रमाणेच रणजीतचीही उणीव भासू शकली असती, ती प्रेम चोप्राचे नाव रणजीत ठेवून अंशतः दूर केली आहे), म्हातार्‍या माणसाचा विग लावलेला पण चेहर्‍याने तरुण दिसणारा अमरीश पुरी, इत्यादी मंडळी असतात. वडील असे असल्याने मुलगा एकदम निरिच्छ आणि दुसरं टोक असतो. हंगलमास्तरांच्या मुलीशीच तो सूत जुळवतो यावरून त्याच्या सच्छीलतेची खात्री पटते. तसंच, त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो सगळे धर्म पाळत असतो. त्याच्या खोलीत एका ओळीत सगळे धर्मग्रंथ आणि क्रॉस वगैरे पवित्र गोष्टी ठेवलेल्या असतात.

इकडे बांधकामावर काम करणार्‍या तामीळ रेखाबाई मराठी श्रीराम लागूंना भाऊ आणि उत्तरभारतीय शशीकपूरला बॉयफ्रेंड मानतात. तिकडे ख्रिश्चन हेलन आपण खरा काय उद्योगधंदा करतो हे आपल्या निरागस मुलीला कळू नये आणि तिची वडिलांना भेटायची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मुस्लिम अमिताभला तिचा औटघटकेचा, खोटा खोटा नवरा होण्याची गळ घालते मग शिखांचा रिप्रेझेंटेटिव्ह असावा म्हणून संजीव कपूरचा माजी सैनिक असणारा दोस्त म्हणून उत्पल दत्त येतो.

तर असं सगळं सुरळीत चालू असताना, कुरळ्या केसांचा भयंकर विग लावून चमत्कारिक दिसणारा शेट्टी श्यामलीला पळवून नेऊन अतिप्रसंग करू पाहतो. तेव्हा इतर लोकांमुळे ती वाचते आणि झटापटीत त्याच्या पांढर्‍या कोटाचा खिसा ओरबाडून फाडून काढते. तो खिशाचा तुकडा कुणीतरी तिच्याच बॅगेत टाकतं आणि हंगलमास्तर तो तुकडा नेहमीप्रमाणे खूण म्हणून गीतेत घालून टाकतात.

इकडे कुठल्याकी कारणामुळे संजीवकुमारचे वडील बाकी ग्यांगला नकोसे होतात आणि त्यांना मारण्यासाठी ते शेट्टीलाच सुपारी देतात. शेट्टी त्यांना मारायला येताना तोच कोट घालून येतो (गरिबी फार वाईट! एवढ्या सुपार्‍या घेऊनही त्याच्याकडे एका नव्या कोटापुरतेही पैसे उरत नसतात. किंवा तो लकी कोट असेल..) पण त्याला त्याने लाल खिसा शिवून घेतलेला असतो. (त्याचा विग पाहून त्याला सौंदर्यदृष्टी नाही, हे आपल्याला आधीच कळलेलं असतं. त्यामुळे पांढर्‍या कोटाला लाल खिसा पाहून आपण चकित वा खिन्न होत नाही.) वडिलांना मरत असलेले पाहून संजीवकुमार धावत त्यांच्यापाशी येतो तेव्हा त्या लाल खिशाची प्रतिमा त्याच्या मनात पक्की बसते. ('जानी दुश्मन' इफेक्ट!) मग पोलिस येतात आणि जो कुणी प्रेतापाशी असेल आणि रक्तरंजित कपड्यांत असेल तोच खुनी, या तत्त्वानुसार संजीवकुमारला अटक करतात. बाकीची ग्यांग संजीवकुमारचा काटा निघावा आणि खटला आपल्या मनासारखा व्हावा म्हणून, अमिताभशशी याच शुभंकरांना (मॅस्कॉट!) खोटी साक्ष द्यायला बोलावते आणि हेही दोघे मस्तपैकी खोटी साक्ष देऊन येतात आणि घरी आल्यावर त्यांना हाच तो श्यामलीचा होणारा पती, हे शुभवर्तमान कळते. आता केलेल्या सगळ्या गोष्टी उलट करण्याची व खोटेपणाची वाट सोडून चांगली कामे करण्याची मोठीच जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते.

शशीकपूरला लहानपणापासून एका मुस्लिम चाचांनी मुलासारखं सांभाळलेलं असतं. ते डबेवाले असतात. अतिआजारपण, अतिश्रम आणि भूक अशा तीन गोष्टींमुळे त्यांचं पोचवायचा डबा हातात असतानाच प्राणोत्क्रमण होतं. ते जाताजाता त्यांचं एक कुराण शशीला सांभाळून ठेवायला सांगून जातात. शशी त्यांच्या घरून ते कुराण लाल कापडात लपेटून नेत असताना पाऊस सुरू होतो आणि शशीच्या खिशाच्या तिथे कापडाचा लाल डाग पडतो. तोही तोच शर्ट घालून संजीवकुमारला भेटायला जातो. लगेच ट्यूब पेटून तो त्या माणसाबद्दल या दोघांना सांगतो आणि शेट्टी पकडला जातो.

दरम्यानच्या काळात ग्यांग गप्प बसलेली नसते. ती या तिघांच्या सुपार्‍या देते. पण इकडे या दोघांकडे आता कुराण व गीतेच्या प्रती असतात. रात्री गुंड या दोघांना मारायला येतात. गुंडाने हळूच दरवाजा उघडल्यावर मोठा टेबलफ्यान लावला असावा, तशी अमिताभने झोपताना समोर ठेवलेल्या कुराणाची पाने फडफडू लागतात. गुंड दार बंद करतो पण बहुधा फॅन चालूच ठेवतो कारण पाने उडतच राहतात. साहजिकच अमिताभला जाग येते आणि तो फाईट देऊन वाचतो. तिकडे शशी गीता(पुस्तक!) छातीवर घेऊन झोपलेला असतो, त्यामुळे गुंडाने चाकू मारल्यावर तो गीतेच्या पार जात नाही (चाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल काय?) आणि शशीही वाचतो. संजीवकुमारला मारायला आलेल्या माणसाला तो येशूचे वचन सांगून त्याचे मन पालटवतो.

ग्यांगचा बदला घेण्याचे अमिताभ आणि रेखाकडे काहीतरी तगडे कारण हवे म्हणून ग्यांगने बनवलेल्या नकली औषधाच्या इंजेक्शनामुळे हेलन मरते आणि ग्यांग बिल्डिंग बांधताना कमी दर्जाची सामग्री वापरायला भाग पाडते तेव्हा बिल्डिंग कोसळून रेखाचा मुकादम असलेला भाऊ मरतो.

शेवटच्या मारामारीला सगळ्या धर्मांचे, प्रांतांचे लोक एकत्र जमतात आणि नेहमीप्रमाणे जबर हाणाहाणी होते. फायनली, प्रेम चोप्राच्या हातात बंदूक आणि पर्यायाने सगळी परिस्थिती आलेली असतानाही हेलनच्या मुलीने आई गेल्यावर श्यामलीच्या गळ्यात घातलेला क्रॉस उन्हात लखलखतो आणि त्याने प्रेम चोप्रा विचलित झाल्याने अमिताभशशी चपळाई करून त्याच्यावर मात करतात.

अशाप्रकारे, अमिताभशशीला धर्मग्रंथांचे खरे महत्त्व कळाल्याने शेवटी सिनेमा संपतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा

असे सर्व काही सुरळीत सुरू असताना>>

गीता (पुस्तक)>>

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि>>

तगडे कारण>>

लाल कपड्याचा तुकडा>>

रणजीत हे नांव ठेवून काही अंशी>>

ग्यांग गप्प बसलेली नसते>>

Lol

Lol

Lol

अरेरे इतका सुंदर धार्मिक चित्रपट न पाहिल्याचे अतोनात दु:ख होत आहे. अशा तरल, हळूवार, 'धर्म ही लिमलेटची गोळी आहे' हे त्रिकालाबाधित सत्य तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करणार्‍या या उच्च चित्रपटाची ओळख मोठ्या मनाने आम्हाला करून दिल्याबद्दल आमच्या जीवनातील एक न्यून कमी झाले आहे अशी भावना वारंवार उचंबळून येत आहे. याबद्दल आपले उपकार आम्ही आजन्म विसरणार नाही.

ग्यांग हा शब्द मज मनास फारच भावला आहे. तो जर कधी वापरावासा वाटला तर आपण हरकत तर घेणार नाहीत ना?

पुढच्या नास्तिक पिढ्यांकरता "धार्मिक पुस्तके आपल्या सर्वांच्या जीवनात कशाकशाप्रकारे महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात" याचे हे एक उत्तम उदाहरण ठरो. रोज रात्री झोपताना पंख्याखाली जर गीता, कुराण किंवा झेन अवेस्ता उघडून ठेवले तर चोर कशाला शिरतोय घरात!!!

>>>>> शशी त्यांच्या घरून ते कुराण लाल कापडात लपेटून नेत असताना पाऊस सुरू होतो आणि शशीच्या खिशाच्या तिथे कापडाचा लाल डाग पडतो. तोही तोच शर्ट घालून संजीवकुमारला भेटायला जातो. लगेच ट्यूब पेटून तो त्या माणसाबद्दल या दोघांना सांगतो आणि शेट्टी पकडला जातो. >>>> मज अल्पमतीस ही घटना कळली नाही. त्याची फोड केलीत तर मनास फार संतोष लाभेल.

असे उदबोधक आणि प्रेरणादायी लिखाण आपल्या हातून वारंवार घडावे आणि आमच्या रिकाम्या ज्ञानदीपांत परीक्षणरूपी तेल घालून अज्ञानाचा अंधःकार दूर करावा अशी नम्र विनंती.

मामी, धारमीक ग्रंथांनी मन सुद्द जाल्याबरुबर भासाबी सुद्द न पवित्र होतीय का नाई? Proud तुझे पोस्ट याची साक्ष देत आहे.

अगं, कुराण ज्यात बांधलेले असते त्या लाल कापडाच्या तुकड्याचा रंग जात असतो. शशी पाऊस लागू नये म्हणून ते स्वतःच्या पांढर्‍या शर्टाआड धरून घेऊन येत असताना कापडाचा रंग जाऊन खिशाच्या ठिकाणी लाल डाग पडतो. तोच घालून संजीवकुमारला भेटायला गेल्यावर 'ऐसा कुछ तो मैने पहले भी देखा हय..' असे त्याला जाणवते आणि तो शेट्टीच्या कोटाबद्दल या दोघांना माहिती देतो. तोवर इकडे श्यामली घरभर पसारा करून अमिताभच्या मदतीने गीतेतला मूळ पांढरा तुकडा बाहेर काढते. त्या तुकड्यावरून हे शेट्टीचा बार गाठतात. ('सुतावरून स्वर्ग'स्टाईल!)

मामी - Lol माझ्या विनम्र आग्रहास्तव आता तुम्ही एका चित्रपटाचे परिक्षण लिहाच लिहा.

अल्पमती - अहो शेट्टी नाही का लाल कपडा खिश्यासाठी वापरतो. शशीकुमारांच्या लाल कपड्यावरून हरीभाईंना शेट्टीचा लाल कपड आठवतो हे कित्ती सोप्पंय

माझ्या अंध:कार दूर केल्याबद्दल धन्यवाद.

बेफी, आधी असले सिनेमे संपूर्ण बघायची हिंमत येऊ द्यात. मग नक्की लिहीन. Happy

नविन पुणेरी पाटी
चोरांकरता - या घरात पंख्याखाली गीता (पुस्तक) असते. ती वार्‍याने फडफडते. तस्मात घरात शिरण्याची तसदी घेऊ नये.

माते, केवळ महान आहेस. चाकूवाला पंच अ श क्य!! Lol

विगवाल्या शेट्टीसाठी तरी बघायलाच हवा..

गीतेच्या पार जात नाही (चाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल काय?) >>>>> Lol
लय भारी लिवलय Rofl

मामीच्या पोष्टी Rofl

गीतेच्या पार जात नाही (चाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल काय?) >> हा सर्वात भारी होता. श्यामलीचे आंधळे काम करणारी अभिनेत्री कोण होती?

लईच भन्नाट लिवलंय वो Rofl

हाताला लागेल ती चपटी वस्तू >>>> Lol

पांढर्‍या कोटाला लाल खिसा पाहून आपण चकित वा खिन्न होत नाही >>> Lol

चांगली कामे करण्याची मोठीच जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते. >>>:हाहा:

खल्लास, येड्यासारखा हसतोय Rofl
म्या हा शिनेमा शशीअमिताभ खोटी साक्ष देउन संजिवकुमारला अडकवतात इथप्रेंत पायला होता,
संजीवकुमारच्या खोलीचे इंटेरिअर ज्याने केलेय तो महान आहे!

Pages